Saturday, July 26, 2014

ब्रँड अँबॅसिडर

नाव - सानिया मिर्झा. सध्या. 
उमर - एकवीस, सॉरी, अठ्ठावीस. सध्या. 
धंदा - पूर्वी टेनिस. सध्या घरकाम. (पार्टीसाठी बिर्याणीच्या ऑर्डर्स घेतो)
राष्ट्रीयत्व - भारतीय! सध्या.
सध्याचा पत्ता - वैसे हम अभी दुबई में है. अगले हफ्ते हमारे घर लाहोर जाऊंगी. अब्बू अम्मी हैदराबादमें है इसलिये दो दिन इंडिया  होके आऊंगी.
कायमस्वरूपी पत्ता - फिलहाल तो लाहोर
तक्रारीचे स्वरूप - मला ब्रँड अँबॅसिडर बनवणेबाबत
तक्रार - महोदय, माझ्या असे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, ब्रँड अँबॅसिडर होणेसाठी देशप्रेम वगैरे असणे आवश्यक आहे. आपल्याला असा शब्द शाळेतपण दिसला नव्हता. मग सर्वात प्रथम मी हिंदी टू इंग्लिश टू उर्दू डिक्शनरी काढून अर्थ पाहिला. तरी कळला नाही. मग आमच्या यांना विचारून पाह्यला. त्यांनी इमिजिएट सांगितला, वफादारी. या देशात जन्माला येणे एवढेच पुरेसे नाही? मी या देशाची मुलगी आहे आणि राहणार. फक्त या देशात राहणार नाही. आपल्याला माहितच आहे, सध्या टेनिसमध्ये काय आपले दिवस चांगले ऱ्हायले नाहीत. महंगाई कसली वाढली आहे. शोएबमियांना ब्रेकफास्टपासून डिनरपर्यंत मुर्गी लागते. सध्या क्रिकेट नाय काय नाय. त्यामुळे दिवसभर लोळत असतात. अंघोळीलासुद्धा उठत नाहीत. फक्त जेवायला बोलावलं की उठतात. लग्नाआधी काय काय स्वप्नं पाहिली होती. वाटलं होतं, बेगम होऊन निवांत बसावं, झी टीव्ही पाहावा. किती दिवस टेनिसची ब्याट चालवणार? तशी बोंबलायला चाललीही किती म्हणा? सिंगलपेक्षा डबल्समधेच बरं होतं. पार्टनर स्ट्राँग असला म्हणजे झालं. वाटलं तसंच लग्नाचंपण करावं. टेनिसला जेवढा भाव नाही तेवढा क्रिकेटला आहे. पार्टनर चांगला वाटला होता. पहिल्यांदा वाटलं, चांगला बॅट्समन बिटसमन असेल. बाकीचे प्लेयर काय गावले नाहीत. शोएबमियां एकटेच अवेलेबल होते. बरोबर घावले. आता कळतंय का अवेलेबल होते ते. ब्याटिंग यथातथाच होती. ब्याटिंग नाय तर बॉलिंग तरी जमते का पाहावं म्हणून ते करून पायलं. पण तिथं पण हात वाकडा करून बॉलिंग टाकली म्हणून यांची करियर संपली म्हणे. सा महिने नुसतेच घरी बसून होते. मग कुठल्या तरी इंग्लंडच्या क्लबनं काम दिलं, आणि यांनी लगेच घेतलं. पण ते कामसुद्धा धड पूर्ण नाही केलं. मधेच सोडून आले. एशिया कपमध्ये घेतलं म्हणून. तो कप काही मिळाला नाहीच. क्लब गेला कपही गेला. शेवटी यांनाच टीममधून काढून टाकलं. आता चहासुद्धा कपमध्ये घेत नाहीत. घरातील सगळे कप फोडून टाकले आहेत. रोज लुंगी गुंडाळून टीव्हीसमोर बसलेले असतात. वर माशा मारायला माझी टेनिसची ब्याट वापरतात! मग मला परत टेनिसचं धुपाटणं हातात घेणं आलंच ना? नवरा जर असा निकम्मा असेल तर घरच्या बाईनंच पदर खोचून उभं राहावं लागतं. सुदैवाने भारतात ही पोस्ट चालून आली. आणि काम पण तसं सोपं आहे. इंटरव्ह्यू एकदम सोपा होता. मला म्हणाले तेलंगण राज्याचा ब्रँड अँबॅसिडर अशी पोस्ट आहे. आता हे कुठलं राज्य म्हणायचं बाई? दोन महिने भारतात नव्हते तर तेवढ्यात एक अख्खं राज्यच निर्माण झालं. आपल्याला काय करायचं आहे म्हणा. मला माझ्या कामाशी मतलब. तेलंगण तर तेलंगण. तेलवंगण असतं तरी मला चाललं असतं. वेळच्या वेळी ठरलेले चंदकिशोर मोजून हातात द्या म्हणजे झालं. माझी एवढीच माफक अपेक्षा आहे. पहिल्यांदा "ब्रँड अँबॅसिडर"चं काम आहे म्हटल्यावर मी अशी चिडले होते म्हणून सांगू! मी काय अँबॅसिडरसारखी दिसते? लग्न झाल्यावर जरा सुखवस्तू झाले म्हणून तडक अँबॅसिडर म्हणायचं? निदान फियाट तरी म्हणा. फियाटला काठीनं खूप बदडून काढलं आणि जर ती सुजली तर ती अँबॅसिडरसारखी दिसेल. मी काही एवढी जाड झाली नाहीये हं! मग त्यांनी कामाचं स्वरूप सांगितलं ते बरं केलं. नुसते फोटो द्यायचे आणि सांगतील त्या कार्यक्रमांना हजर राहायचं. मी स्वच्छ सांगितलंय, ते भारताचे झेंडेबिंडे हातात धरणार नाही हं, आमच्या यांना आवडत नाही ते.

आता कमवण्यासाठी देशप्रेमपण दाखवायला लागलं म्हणजे  कठीणच झालं. भारताला पाण्यात पाहणाऱ्या, दहशतवादी हल्ला करणाऱ्या देशात राहिले म्हणून काय झालं? ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. माझा जन्म भारतातील आहे हे एवढं पुरेसं नाही? भारतात राहिले असते तर बरं झालं असतं असं वाटू लागलं आहे. मग 'स्त्री' कार्ड, 'धर्म' कार्ड सगळं वापरता आलं असतं. पण काही हरकत नाही. सुदैवाने भारतातच स्वत:च्या "देशा"पलीकडे पाहणारी जनता खूप आहे. त्यांना हे सगळं सुचेलच. तेच लढतील माझ्या वतीने. मी इथे आरामात पाकिस्तानात बसेन. नुसती एक प्रतिक्रिया देईन ट्विटरवर, मग बघा कसे हे निधर्मीवादी, स्त्रीशक्तीवाल्या अग्निशिखा कशा माझ्या बाजूने उभ्या राहतात ते. मला विरोध करायला कारण तरी काय? म्हणे "पाकिस्तान हा भारतावर हल्ले करणाऱ्या दहशतवादी लोकांचा देश आहे. ज्याचे निर्माणच मुळात भारतद्वेषावर आधारित आहे, त्या देशात आपली सोयरिक करणे मुळात गाढवपणाचे. बरं, केलात गाढवपणा, ठीक आहे, तुम्ही आणि तुमचे ते पाकिस्तानी गाढव, सुखात त्या पापस्तानात राहा. आम्हाला त्याचे सोयर नाही आणि सुतकही नाही. पण म्हणून या गाढवपणाला "ब्रँड अँबॅसिडर" म्हणून मान्यता देण्याचा डबल गाढवपणा आम्ही करायचा का? हा प्रश्न बाई म्हणून उपस्थित केलेला नाही. एखाद्या पुरुषानं जरी हे केलं असतं तरी आम्ही आक्षेपच घेतला असता." आता मी काय बोलायचं अशा आरोपावर? आता तिथे दहशतवादी बुजबुजले आहेत त्याला काय करणार ते तरी? आमच्या लाहोरच्या घरात झुरळं आणि उंदीर यांचा बुजबुजाट आहे. शोएबला किती सांगून पाहिलं, तो म्हणतो अपनेको थोडेही खाते है? तू सो जा आरामसे. खरं तर लग्न म्हणजे माझा गाढवपणाच झाला आहे, पण चूक मान्य करणे हे कुठल्याच बाईच्या रक्तात नसते, माझ्या तरी का असावे? मरुदे, मी नुसती प्रतिक्रया देईन. भारतातीलच बायका तो आरोप हाणून पाडतील. मी बाई आहे हे कित्ती बरं झालं नै? हवं तसं बदलता येतं. समानता हवी असेल तर स्त्रीपुरुष समान आणि आपण अपराध केला असेल तर मी स्त्री, अबला, माझ्यावर सगळे कसे तुटून पडताहेत असं दोन्ही बाजूंनी बोंबलता येतं. शिवाय ज्याचा कशाशीही संबंध नाही असा मुद्दा काढून मूळ वादाचा मुद्दाच गायब करणं हे तर आम्हा बायकांचं कसब. तेव्हा या माझ्या भारतीय रणरागिण्या ही सर्व शस्त्रं वापरून, मला जो कुणी विरोध करतो आहे त्याला बरोबर ठेचतील. काही म्हणा, आम्ही बायका एरवी एकमेकांच्या झिंज्या जरूर धरू, पण स्त्रीवर अन्याय होतो आहे अशी हूल उठवली की सगळ्यांच्या झिंज्या धरून उपटायला आम्हाला जास्त आवडतं. आश्चर्य म्हणजे ती लक्ष्मी माझ्या बाजूने उभी राहिली आहे. तशी माझी तिची फार ओळख नाही. एफबी फ्रेंड फक्त. कसले फडतूस फोटो टाकत असते स्वत:चेच. स्वत:वरच खूष असते. आणि हा शोएबमिया चवीने पाहत असतो तिचे फोटो. अस्सा राग येतो ना. पण प्रत्यक्षात मी तिच्या फोटोवर नेहमी, कित्ती क्यूट, वॉव हॉटी! असल्या कॉमेन्टस टाकत असते. मेली उंटासारखी उंचच्या उंच नुसती, मी तिच्यापेक्षा कित्तीतरी स्लिम आहे.

तर महोदय, मी मागील वर्षी जून १५ ते २० आणि  या वर्षी जानेवारीचा पूर्ण महिना भारतात होते. एकदा हैदराबादच्या एअरपोर्टमधून बाहेर येताना, एक भिकारी दिसला तर त्याला मी शंभर रुपयांची मदत केली होती. त्यावरून माझं कनवाळू व्यक्तिमत्व आणि समाजसेवेची मला किती हौस आहे ते सहज दिसेल. पुढं कळलं की ते सत्यम कॉम्प्युटर्सचे राजू होते म्हणे. आणि असंही कळलं की मी दहा रुपये दिले असं ते सगळ्यांना सांगत सुटले आहेत. अगदी खोटं! मी शंभर दिले होते! तेव्हा, मुद्दा असा की मी पूर्ण अस्सल भारतीय आहे हो! सगळे भारतीय जसे लांब उडी मारून युरोप, अमेरिकेत जातात तसे मीपण करायचा प्रयत्न केला. पण टेनिसवर सगळे लक्ष असल्याने लांब उडीत फारशी प्रगती झाली नाही. मी युरोपवर नजर ठेवून उडी मारली खरी पण ती पाकिस्तानात पडली हे माझे दुर्दैव. पदरी पडले आणि पवित्र झाले अशी अवस्था माझीपण आहे. बहुतांशी भारतीय स्त्रियांची अवस्था अशीच नाही काय? आणखी किती भारतीय असायला हवे मी? तेव्हा, कृपया माझ्या तक्रारीची नोंद घेणेत यावी आणि माझी या पदावर तत्काळ नेमणूक व्हावी ही विनंती.

ता.क. - मला अजून अँबॅसिडर हे नाव कसंसंच वाटतंय. ते बदलून मर्सिडीझ वगैरे करता येईल का? वजन कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हो, पहिला पगार उचल म्हणून मिळेल का?

Friday, July 25, 2014

आपली पन गटारी

बोले तो, इंडिया आपुन का देश है. आपल्या देशातले सर्वे लोक आपले भाव हायेत. आपल्या देशावर आपला तरी लय लव हाये. आपल्या देशातील समुद्ध आनी विविधतेणे वगैरे नटलेल्या सर्वे मिस आन मिशेस परंपरांचा आपल्याला अभिमाण हे. त्या परंपरांचा पाईप (भौतेक पाईक आसनार. कैच्या कैच. पाईपच बराबर) होन्याची आपली लेवल नाय पन प्रयेत्न जरूर करनार. मी आपल्या म्हाताराम्हातारीचा, गुर्जणांचा आन माज्या देशातील सर्वे वडिलांचा एकदम मान ठेवनार आन सर्वेन्ला रिस्पेक्ट देनार हेची ग्यारंटी. आपली कंट्री आन आपले सर्वे कंट्रीवाले यांच्याशी आपण एकदम इमानदार ऱ्हानार आशी आपन कसम खातो. आसली टाप कंट्री बनवणाऱ्याचे आन ती पिनाऱ्याचे कल्यान करने हेच्यातच आपलेबी सौख्य सामावले आहे. जै हिंद!

आपन ही कसम रोज खातो. सकाळी पयलेछूट आपल्याला कंट्रीचीच आटवन होते. त्याबिगर आपली स्कूटर ष्ट्रेट जात नाय. येक गिलास पोटात खाली झाला की मग आपले डोक्यामदले गियर चालू पडतात. रोडपन कसा येकदम सपष्ट दिसतो. वाटतं, आयला, येवढे खड्डे कदी झाले? काल रात्री तर काय दिसले नायत. पन काल स्कूटर चालवत आलो की अन्याच्या रिक्षेतून आलो? भौतेक रिक्षेतूनच आसनार. साला पक्या जरा जास्तच पेला काल. रिक्षेत मांडी घालून बसला होता. रिक्षेमुळं हालत होता की ब्रम्हानंदी टाळी लागल्यानं डुलत होता काय समाजलं नाय. अन्यापन येवस्थित होता. तेला आधीच बोललो, चढली आसंल तर चालत जाऊ. तर म्हनतो बास का राव, काडली का आपली इज्जत भायेर. येका हापनं कवा आऊट झालो का आपन. तेला बोललो आरे पन अशा चार हाप झाल्या राव आपल्या. शेवटी काउंटरवरला आन्ना बोलला, शेठ, दोन वाजले, मापी करा, बंद करायची वेळ झाली, फुकट डिपारमेंटची तकतक नको आपल्याला. पक्या तेला म्हनतो, चल ए बस कर, एक चिकन लाॅलिपाॅप पाठव पयले. डिपारमेंट गेलं xxत! मायला आपन पितो म्हनून तर डिपारमेंट चालतं. तू हप्ता बंद कर, कायदा आन सूव्येवस्ता म्हंजे या तुज्या हॉटेलमदी नाचनाऱ्या आयटेमची नावं वाटतील. आपन न्हेमीचं गिऱ्हाईक म्हनून आन्ना थंड घेतो. सोता पीत न्हाई. मंत्रालयाला जाऊन शपथ घेतली म्हनतो. आपल्याला पयले ते कायच सुधरलं नाय. मंत्रालयाचा आन शपथेचा संबंध हाय कबूल, पन ती पाळण्याचा काय संबंध? आमी पेलो म्हणून काय पन फेकतो काय आसं बोललो तेला. तर काउंटरच्या मागे लावलेला येक फोटो दाखवला आन म्हनतो शेठ, हे आमचा मंत्रालय. राघवेंद्रस्वामीसमोर शपथ खाल्लं आमी. येवढं दारू आमच्या नजरेसमोरून जातं, आपन अजाबात शिवलो न्हाई. पक्या म्हनतो, बरं केलंस, आमाला कमी पडून उपेगाची न्हाई. एक हाप डीएसपी आन दोन सोडा पाटव. येक बरं, अन्या पेला की येकदम चीप बसतो. पक्यासारका तेचा बोलबचन होत नाय. पक्याची बातच वेगळी. 'बसलो' की पयले मोबाईल काडून हेला फोन कर तेला फोन करून बोलाव असले उद्योग चालू. तीन चार पोटात गेले की मग परत फोन. पन या टायमला तेंच्या आयमायची आटवन काडून बोलावतो. काई आसो, जे हजर नसतील तेंच्या नावानं गिलासातले चार थेंब चारी दिशेला उडवून मगच आपली जय भवानी होत आसते. काल गटारी झाली. आपन आन्नाला आदीच बोलून रिझर्व्हेशण करूण ठेवलेलं. मागून तकतक नको. आपन येरवी कुटलंच रिझर्व्हेशण करत नाय. रेल्वेचा नाय, बसचा नाय, थेटरचा नाय आन नाटकाचा नाय. आपल्याला थिते रिझर्व्हेशण लागत पन नाय. आपली लय वळख सगळीकडं. पन गटारी म्हटलं तर नाटक नाय पायजे आपल्याला. कडक येवस्था पायजे. घरची मंडळी लय डोकं खातात, पन आपली निष्ठा अढळहे. गेल्या वर्षी आमची मंडळी जानार होती मुंबयला. नेमका तो दिवसबी गटारीचा. आट दिवस रोज डोक्याशी कटकट. रिझर्व्हेशण केलं का, रिझर्व्हेशण केलं का. आपल्या डोक्यात गटारीचं प्लानिंग. विसरलो राव रिझर्व्हेशचं पार. मग जो काय कुटाणा. मग अन्याला बोललो, गाडी मिळव. आमच्या मंडळींना सोडायला मी, अन्या आन पक्या तिघेबी गेलो गाडीतून. मंडळींना सौंशय आलाच. आपल्याला सोडायला सगळी जत्रा कशी काय म्हनून. तेनला बोललो पक्षाची मिटिंग लावलीय सायबांनी. त्या वर्षीची आपली गटारी साकीनाक्याला झाली.

जितक्या वेळा म्हनून गटारी झाली आहे, आम्हा तिगांपैकी कुनालाच फारशा तेच्या आटवनी नाहीत याचं लय आश्चर्य वाटतं आमाला. आपली स्मरणशक्ती येवढी तेज, मग येकपन गटारी कशी काय आटवत नाय? नंतर पुन्ना आन्नाकडे गेलो की आन्ना काय वाट्टेल ते आटवनी आमच्या म्हनून खपवतो. येकदा म्हने आसंच गटारीला आन्नाकडे बसलो होतो तर एक दोन डिपारमेंटं आली आनि म्हने बार बंद करा. तवा म्हने मी त्यानला बोललो, आरं तुमी काय बंद करनार रे, आत्ता तुमचं बाप, आबा इतं आमच्याबरोबर बसलं होतं गटारीसाटी. आन म्हने मी डायरेक १०० नंबर फिरवला, कंट्रोलरूमला बोललो,"आबांना फोन द्या. हितं कायदा आन सूव्येवस्तेचा प्रश्न निर्माण झाल्याला आहे. कायदा म्हनतो गटारी ऑलाऊड हे जरूर करा, सूवेवस्ता म्हनते करू नका. काय ही येवस्ता म्हनायची का म्यानेजमेंट? तुमी हातावर तंबाखू येकदा चोळून तयार केल्यावर गोळी लावू नका म्हटलं तर आईकाल का? गोळी लावून छान हसत बसताय की. आनि हितं आमी गिलास भरलाय, सोडा टाकलाय, समोर चिकन तंगडी हाये, पंकज उधासबाबाचं मुजिक चालू हे आन तुमी म्हंता घरी जावा? भरल्या गिलासावरनं उठवताय?" मी आन्नाला बोललो आपन आसं म्हननं पासिबलच नाय. मी आसं म्ह्टलं खरं, पन आपन येवस्तित आसलो की कुणाच्या बाला भेत नाय, आन मग काय पन बोलून जातो. पन येक झालं, कंट्रोल रूमवर धावपळ झाली. गटारीला सगळी नेते मंडळी कुटं ना कुटं 'बसलेली' आसणार, खरंच येकादा लोकल फुडारी आसला तर काय घ्या आसा विचार होऊन या दोन डिपारमेंटला ढोस मिळाला, आन ती दोगं फुटली. आन्ना कसाही आसला तरी येकदम मानुसकीवाला. जाताना तेंच्या हातावर दोन गांधीबाबा ठेवून बोलला, ऱ्हांऊद्या, येवढी राउंड टाकताय, वाया नको जायला. तुमचीबी गटारी आसंलच चालू. फोटोतल्या गांधीबाबापेक्षा कागदी गांधीबाबाचा लय उपयोग होतो. जाताना आपल्याला आन आन्नाला सल्युट ठोकून गेले. हे सगळं आन्ना म्हंतो म्हनून खरं, आपल्याला तर कायच आटवत नाय.

कालसुद्धा आन्नाच्या इथून निघाल्याचं अजाबात आटवत नाय, पन घरला पोचल्याचं येकदम ध्येनात हे. त्याचं कारण म्हंजे पक्या. किती वेळा बोललो, रिक्षेत मांडी घालून बसू नकोस. तर ऐकलं नाय, मांडी घालून बसला आनि "मुझे दुनियावालो, शराबी न समझो, मैं पीता नही हुं, पिलायी गयी है" चालू होतं. अन्या रिक्षा चालवत होता म्हंजे कडेकडेने पुढं नेत होता. पक्याच्या घराच्या गल्लीत शिरलो, घर आलं तरी अन्या काय रिक्षा थांबवेना. आरं थांब हितंच आसं वराडलो, तर येड्यानं आसा काय ब्रेक लावला, पक्या जो मांडी घालून बसलावता, मांडी न मोडता पुढं कोलमडला. डोकं खाली आन मांडी वरच्या दिशेनं. बर पडून तेला काहीच फरक पडला नाय, तोंडानं "मुझे दुनियावालो" चालूच होतं. आता याला उतरवायचा कसा या इचारात मी आनि अन्या. बरं, याला भायेर काडायचा तर आमचे पाय तरी धड पायजेत. आमी दोगं रिक्षेच्या भायेर उतरून उत्तरदक्षिण, पूर्वपश्चिम शोधत बसलो हुतो. रात्रीची येळ, दिशाबी कळायची मारामार. शेवटी रिक्षा सापडली, त्यात आडाकलेला पक्याबी दिसला. तेला वढून भायेर काडायला लागलो, पन ज्याम आडाकलेला गडी. वढून वढून पार घाम निगाला. चडलेली सगळी उतरली. शेवटी अन्याला बोललो, जा तेच्या घरातनं आन कुनाला तरी बलावून. अन्यानं दार ठोठावलं. पक्याचा मोठा भाऊ भायेर आला. अन्या येकदम दोन पावलं मागे सरून आदबीनं हुबा. भावाला काय कळल्याबिगर ऱ्हातंय व्हय? आमाला शिव्या देतच आला आन त्यानं पक्याची एकूण परिस्थिती पायली. येका दमातच पक्याला वडून भायेर काडला. आयला, आमाला कसं काय न जमावं ते? तेच्या भावाला म्हनलो,"थांक यू बर का! कसं काय सुचलं तुमाला आसं भायेर काढणं?" पक्याचा भाऊ बोलला,"गॅसचा सिलेंडर रिक्षेतून आनला की आसाच भायेर ओढावा लागतो. जावा आता तुमी तुमच्या तुमच्या घरला आन पडा चीप." अन्यानं रिक्षा तिथंच सोडली आनि आमी दोगं चालत डुलत घरी आलो. येक गोष्ट बरी झाली, निदान ह्या येळेला तरी गटारीची येक तरी आटवन डोक्यात ऱ्हायली.

Thursday, July 24, 2014

एका पक्षियाने

हॅरी हा एक ग्रे हेरॉन. रोज दिसणारा. एखाद्या ऋषीसारखे अर्घ्य देत असल्याप्रमाणे पाण्यात उभा असायचा. स्तब्ध. ध्यान लावलेले असायचे. पण अत्यंत सावध असायचा. कुणाची चाहूल लागली की पंख पसरून संथपणे आकाशात झेप घ्यायचा. उडायची घाई नसायची. त्या उडून जाण्यामागे भीतीपेक्षा उद्वेग जास्त असावा असं मला वाटायचं. पाच सहा फुटांचा प्रचंड पंखपसारा. एखादे हेलिकॉप्टर जसे गोल वर्तुळ घेऊन उंची गाठते तसेच हा पण करायचा. प्रथम प्रथम मला तो पन्नास फुटांच्या आतसुद्धा येऊ देत नसे. पन्नास फुटांची ओळख तीस फुटांवर येण्यासाठी दोन वर्षे लागली. अजूनही त्या तीक्ष्ण घाऱ्या डोळ्यांनी तो माझ्यावर नजर ठेवत असतो. आदरयुक्त अंतर ठेवणे हा एक आमच्यातील करार आहे. हॅरी नेहमी एकटा दिसतो. त्याच्या बरोबर कुणी सखा सवंगडी नसतो. अगदी विणीच्या हंगामातही त्याच्याबरोबर कुणी सखी नसते. हा पक्षी एखाद्या शापित गंधर्वाप्रमाणे असा एकाकी का? असा कोणता प्रमाद त्याच्याकडून घडला असावा की त्याला ही एकांताची शिक्षा मिळाली असावी? संपूर्ण ग्रे हेरॉन जमात तशी एकाकीच जगणारी म्हणा. आमच्या सोसायटीच्या साधारण दोनचार चौरस मैलांच्या परिसरात नैसर्गिक झाडी, डबकी मुबलक. माणसेही तशी जगा आणि जगू द्या या तत्वावर विश्वास ठेवणारी. त्यामुळे हॅरीला तसा धोका काहीच नव्हता. त्याला हॅरी हे नावही कौतुकाने दिलेले. त्याचं तो जगायचा, माणसे आपापली जगायची. असे एकूण सहजीवन चालू होते. अकस्मात एकदा हॅरीच्या चोचीमध्ये प्लास्टिकचा एक तुकडा दिसला. प्रथम वाटले मासा पकडताना एखादा कपटा चोचीत आला असेल. पण हॅरी तो तुकडा काढण्यासाठी प्रयत्न करतो आहे असे वाटले. जरा जवळ जाऊन खरेच अडकला आहे का हे पाहावे म्हणून दोन चार पावले पुढे गेलो. वास्तविक आमच्या कराराचा भंग झाला म्हणून उडून जायला हवे होते. पण आज तसे झाले नाही. तो तुकडा काढण्याच्या नादात त्याचे लक्ष नव्हते. मग माझ्या लक्षात आले की तो तुकडा चोचीच्या वरच्या भागात चोच आरपार जाऊन अडकला होता. मी अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र तो उडून गेला. सोसायटीतील काही कनवाळू मंडळींनीही ते पाहिले होते. काही जणांनी मग प्राणिनियंत्रण कक्षाशी संपर्क करून काय करता येईल ते विचारले. त्यांचे म्हणणे असे पडले की यात काही ढवळाढवळ करू नये. त्यातूनही तुम्हाला एवढे वाटत असेल तर तुम्ही त्याला घेऊन या. एका दृष्टीने त्यांचे म्हणणे बरोबरही होते. बदलत्या परिस्थितीशी प्राणिमात्रांचे अनुकूलन होणे ही नैसर्गिक प्रक्रिया. डार्विनच्या सिद्धांतानुसार जे बदलतील ते टिकतील. जे टिकणार नाहीत ते नाश पावतील. पण प्लास्टिक निर्मिती ही काही नैसर्गिक प्रक्रिया नाही. मानवाने आपल्या सोयीसाठी जे जे काही केले आहे त्याची तुलना काचेच्या वस्तूंच्या दुकानात उन्मत्त बैल गेल्यावर जे होईल त्याच्याशीच करता येईल. ही पृथ्वी जणू आपल्याला आंदण मिळाली आहे असे आपले वर्तन असते. हॅरीच्या चोचीतील तो तुकडा पाहून अपराधी वाटू लागले होते. त्या बिचाऱ्याला ते काय आहे तेसुद्धा माहीत नव्हते. हॅरी तसा सहा सात वर्षांचा असावा. म्हणजे सर्वसाधारण वयाच्या दृष्टीने वयस्कर. जोवर तो तुकडा त्याच्या चोचीत आहे तोवर त्याला भक्ष्य मिळवता येणार नव्हते. मानसिकदृष्ट्या त्रास होईल तो वेगळाच. हॅरी उपासमारीने मरणार अशी भीती वाटू लागली होती. त्यातून तो पुढे चारपाच दिवस दिसलाच नाही. मग ती शंका बळावू लागली. वाट पाहणे एवढेच हातात होते. आणि आज तो पुन्हा दिसला! नुसताच दिसला नाही तर, त्याच्या चोचीतील तो प्लास्टिकचा तुकडाही गायब होता! अगदी एखाद्या आजारी माणसाने परगावी जाऊन शस्त्रक्रिया करून घेऊन आल्याप्रमाणे आला होता. मी समाधानाने त्याला पाहिले.

म्हणजे इतके दिवस हे सहजीवन आहे असे आम्हांस तरी वाटत होते. सहजीवनासाठी प्रयत्न लागतो. डोळसपणे इतरांच्या गरजा पाहण्याची संवेदनशीलता लागते. आपल्या नकळत आपल्या जीवनशैलीतून आपण अनेक न दिसणारे परिणाम घडवून आणत असतो. टाईम-लॅप्स फोटोग्राफीसारखे तंत्रज्ञान वापरून आपल्या जीवनशैलीचा पर्यावरणावर कसा परिणाम झाला आहे हे पाहता आले पाहिजे. आपले सुख, आपल्या गरजा, आपले राहणीमान यात आपण इतके बुडून गेलेलो आहोत की आपल्याला परिणामांची फिकीरच नाही. शहरातील जागा संपल्या, चला उपनगरे तयार करू. बिल्डर तर नफेखोरी घेऊन बसले आहेतच. नगर अधिकाऱ्यांना किती बिझनेसेस आले, किती उलाढाल झाली याची फिकीर. तत्काळ जमिनी बिगरशेती होऊन जातात. पर्यावरणाचे सर्टिफीकेट देणारा बसलेला असतो एखाद्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात. त्या परिसरातील जैववैविध्याचा अभ्यास नाही, किती प्राणी अथवा जाती बेघर होतील याची फिकीर नाही. त्यांच्या बेघर होण्याने पर्यावरणावर दूरगामी परिणाम किती होईल याचाही विचार नाही. प्राणी अथवा पक्षी दिसला तर त्याला त्रास न देणे अथवा जीव न घेणे म्हणजे आपण सहजीवन म्हणत असू तर त्या सहजीवनाला काही अर्थ नाही. परस्परपूरक राहणीमान हेच खरे सहजीवन. जोवर आपण आपल्या गरजांची पूर्तता इतर प्राणिमात्रांच्या जीवनाकडे न पाहता करत राहू, तोवर आपण आपले राहणीमान जरूर उंचावू, पण एक प्राणीजात म्हणून मानव या प्राण्याचे अध:पतनच करू. 

Tuesday, July 22, 2014

चार बोतल व्होडका

परवाच कुठेशीक सध्याच्या चित्रपटसंगीताबद्दल गळा काढून लिहिलेले वाचले. लहान मुले असलेल्या त्या बापाचा कळवळा लेखातून जाणवत होता. आईबापांनी मुलांना समाजविघातक गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी आटापिटा करावा, रोज संत ज्ञानेश्वर, तुकयाचे अभंग यांच्याशिवाय त्यांच्या कानावर काहीही पडू नये यासाठी जिवापाड धडपड करावी आणि एखाद्या सिनेमाच्या गाण्याने या मुलांना "चार बोतल व्होडका" ते  "छत्तीस चोवीस छत्तीसचा तडका" एकाच दिवसात शिकवावा असे काहीसे सध्या झाले आहे असा एकंदरीत त्या बिचाऱ्या बापाचा सूर होता. खरं आहे हो. लहानपणी आमचा व्यासंग भीमरूपी महारुद्रा, रामरक्षा, मनाचे श्लोक यांपलीकडे जात नव्हता. आमचे वडील आणि चित्रपट यांचा छत्तीसचा आकडा होता. एकदा कधी नव्हे ते (कदाचित आईने टुमणे लावले असेल) सिनेमाला न्यायला तयार झाले. त्यावेळी आमच्या गावात एकमेव चित्रपटगृह होते. कोकणातील गाव ते. मुंबईला दहा वेळा आपटून "तयार" झालेले चित्रपट आमच्या गावात सावकाशीने येत. कधी कधी गाजलेलेही येत. चारपाच वर्षांनी. थेटरवर मग पोष्टरे लागत. जो कोणी तगडा हीरो अथवा रूपगर्विता हिरवीण असेल त्यांचे चेहरे त्यावर झळकत. त्याकाळी थेटरमध्ये बाहेर काचेच्या कपाटात चित्रपटातील प्रसंगांचे रंगीत फोटो लावायची पद्धत होती. तो एक ट्रेलरचा प्रकार असावा. आम्ही मुले कुतूहल आणि उत्सुकतेने ते फोटो पाहत असू. तर आम्ही अत्यंत उत्साहाने सिनेमा पहायला निघालो खरे. कोणता चित्रपट आहे तेही माहीत नव्हते. थेटरवर पोहोचल्यावर पाहिले, चित्रपटाचे नाव होते "ज्यूली". तिकिटे काढून आम्ही आत जाणार तेवढ्यात वडिलांचे लक्ष लावलेल्या फोटोंकडे गेले. साधारणपणे १० सेकंद ते फोटो न्याहाळून ते म्हणाले, "चला मंडळी, घरी चला!" आमची वरात गेली होती तशी परत आली. ज्यूलीचे नेमके दु:ख काय होते ते समजले नाही. त्यानंतर तो चित्रपट पहायचा योग साधारण वीसेक वर्षांनी आला. तेव्हा लक्षात आले "अरेच्या, असं आहे होय?" बाबांची चूक नव्हती, ज्यूलीची समस्याच तशी ज्वलंत होती. फारच सामाजिक शिक्षण करणारा चित्रपट होता तो. लोकांच्या शिक्षणाचे जाऊद्या, या सिनेमातील एक गाणे - "माय हार्ट इज बीटींग" गाणाऱ्या प्रीती सागरवर मात्र दूरगामी परिणाम झाले. तिने तिचे पूर्ण आयुष्य नर्सरी ऱ्हाईम्स, लहान मुलांच्या गोष्टी वगैरे करण्यासाठी अर्पण केले. 'यंग बर्डस आर मेटिंग, व्हाईल आय एम वेटिंग" वगैरे शब्द गाऊन तिला संन्यस्त व्हावेसे वाटले असे म्हणतात. कारण पुढे पुढे तिने टीव्हीवर भजनेही गायलेली मी पाहिली होती. अर्थात आताच्या गाण्यांच्या तुलनेत "माय हार्ट इज बीटींग" हे गाणे सध्या भजनप्रकारात मोडते. (गरजूंनी यूट्यूबवर शोध घेऊन खातरजमा करावी. खूपच उत्साही लोकांनी दादरा-गरबा अथवा भजनी ठेक्यावर म्हणून पाहावे, छान जमते)

तर, ज्यूलीच्या धक्क्यातून सावरायला जरा वेळ लागला. त्याच सुमारास "संन्यासी" नावाचा चित्रपट आला. ज्यूलीवर उतारा म्हणून मुलांनी असा आध्यात्मिक सिनेमा पाहावा असे कोणत्याही सोज्वळ आईवडिलांस वाटणे साहजिक होते. या चित्रपटाची कथा केवळ असामान्य होती. सर्वात प्रथम नायकाच्या बापास दारुडा, स्त्रीलंपट असा दाखवून वडील या जमातीचा मुलांच्या मनावरील अनावश्यक आदरयुक्त पगडा दूर केला होता. मग अशा मुक्त मनाने मुलांना पुढे सिनेमाचा आस्वाद घेता येतो हे दिग्दर्शक-निर्मात्यांनी ओळखले होते. नायकाची आई सुलोचना, स्वयंपाकास सिद्ध व्हावे त्याप्रमाणे स्वत: पदर खोचून मुलाचे चरित्र घडवायला उभी राहिली होती. एकच ध्येय - मुलास बापाप्रमाणे होऊ न देणे. अशा आईचा गाजराचा हलवासुद्धा बिघडत नाही तर मुलगा कसा बिघडेल? शिवाय बिघडू नये याची पूर्ण खात्री म्हणून नायकाचे काम आपला राष्ट्रीय संत, महंत, देभप अभिनेता मनोजकुमार यांस दिले होते. हा मनुष्य जन्माला आला तेच डॉक्टर, नर्स, आईवडील यांना आशीर्वाद देत आणि वन्दे मातरम म्हणत. सुलोचनाने आपल्या या कुलदीपकास स्वच्छ चारित्र्याचे असे काही डोस दिले की त्याच्या गाडीने ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम ही स्टेशने घेतलीच नाहीत. गाडी तडक संन्यासाश्रम स्थानकावर जाऊन थांबली. आता स्टेशनवर गाडी थांबली की चायवाले, काकडी/पेरूवाले कुणी तरी काही तरी विकायला येणारच. त्याप्रमाणे आरती नावाची मेनका (हेमा मालिनी) या बाबाला "चल संन्यासी मंदिर में" असा लडिवाळ आग्रह करू लागली. आणि हे महाराजही "नको हो, मी नाही त्यातला, हे पाप आहे हो" वगैरे सलज्ज अभिनय करू लागले. वास्तविक महाराजांची गाडी या स्टेशनात ठरलेल्या वेळेच्या कितीतरी आधी येऊन थांबल्यामुळे सायडिंगला टाकण्यात आली होती. दोन घटका मंदिरात जाऊन येण्याइतका वेळ नक्कीच होता. "तेरा चिमटा मेरी चुडीयां, दोनो साथ बजायेंगे, साथ साथ खनकायेंगे" हे ऐकून तिला नक्की काय करायचे आहे असा प्रश्न आमच्या बालमनास तेव्हा पडला होता. हेमा मालिनी चिमटा आणि चुडीयां दोन्ही स्वत:च्याच हातात घेऊन नाचत होती, त्यामुळे आता या महाराजांचा चिमटा आणखी कुठला असा प्रश्न कुणाही बालकास पडेल. मी तसे आईला विचारले तर "मेल्या, नको त्या शंका कशा रे तुला!" असे डायरेक्शन आणि एक सणसणीत धपाटा मिळाला. पुढे तर "तेरा कमंडल, मेरी गगरीयां साथ साथ छलकायेंगे" असेही ती कवटाळीण (म्हणजे हेमा मालिनी) म्हणू लागली तेव्हा तर तिच्या मनात काहीतरी काळेबेरे आहे याची आम्हांस खात्री पटली. गाण्याच्या शेवटी मनोजकुमारही "बोलो सियावर रामचंद्र की जय" असे म्हणून गंगेत उडी मारतो. पण तोपर्यंत हे गाणे आम्हा मुलांचे प्रबोधन करण्यात यशस्वी ठरले होते.

तात्पर्य, तेव्हाची सगळीच गाणी काही "देहाची तिजोरी" वाली नव्हती. सुरेश भटांनी जी काही गाणी लिहिली आहेत ती ऐकून "चार बोतल व्होडका" वगैरे गाणी हे यज्ञसमयी इंद्रदेवादिकांस केलेले तर्पण वाटते. यज्ञयागात सोमरसाचे अधिष्ठान पुरातन कालापासून आहे. असो. तेव्हा, चल संन्यासी मंदिर में, माय हार्ट इज बीटींग इत्यादिक प्राथमिक गाण्यांवर तयार झालेला पिंड जेव्हा सुरेश भटांची विरह गीते ऐकू लागला तेव्हा वाटले हा खरा पी.एच.डी. चा अभ्यासक्रम.

मालवून टाक दीप, चेतवून अंग अंग
राजसा किती दिसांत, लाभला निवांत संग
गार गार या हवेत घेऊनि मला कवेत
मोकळे करून टाक एकवार अंतरंग

उगाच शब्दच्छल नाही. विरहिणीने मोठ्या हळुवारपणे, रसिकतेने परंतु ठामपणे आपल्या सख्याने काय करायला हवे ते सांगितले आहे. पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी यातील एक एक शब्द घेऊन त्याचे रसग्रहण करावे आणि शोधनिबंध सादर करावा एवढे या शब्दांचे सामर्थ्य आहे. तसेच आणखी एक गीत. तरुण आहे रात्र अजुनि. यात प्रेमिका "तरुण आहे रात्र अजुनि, एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे " असा जाब आपल्या प्रियकराला विचारते. या गाण्यात जेवढा बोधप्रद संवाद आहे तेवढा कोणत्याच गाण्यात नाही. शिवाय तो एकतर्फी संवाद असल्याने सत्यतेच्या अधिक जवळ जाणाराही आहे. समस्त वैवाहिकांचे निशाजीवनसार अथवा निराशाजीवनसार या गाण्यात मांडले आहे. अलीकडील कुठल्याच कवीत ही प्रतिभा (आणि हिंमत) नाही. ही गाणी ऐकून पुढे आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवले आहे याची वास्तवकारी जाणीव मुलांना होते, ती त्याला सामोरे जाण्यासाठी सिद्ध होतात. अर्थात हे सर्व वाङमय उपलब्ध असूनही आमच्या व्यासंगात फारसा फरक पडला नाही. तसे नर्मदेतील धोंडेच राहिलो. मग आताच मुलांवर गाण्यांचा वा सिनेमांचा वाईट परिणाम होतो असे का वाटावे? पूर्वी मुलांना असली गाणी सहज उपलब्ध होत नव्हती असे म्हणावे तर उपर्निर्दिष्ट सर्व गाणी रेडिओवर सतत लागत. एवढेच नव्हे जी स्वत:ला रसिक समजत अशी मराठी मंडळी ही गाणी मोठ्याने गुणगुणत. "चल संन्यासी मंदिर में", "मोकळे करून टाक एकवार अंगअंग" हे तेवढे रसिक प्रतिभेचे लक्षण आणि "ओ मेरी रानी, तेरी जवानी, तेरे बदन पे फिसलता पानी" असे ह.भ.प. हनीसिंग यांनी म्हटले की मात्र ते निकृष्ट, हीन दर्जाचे, मुलांवर वाईट परिणाम करणारे गाणे कसे काय बुवा? जे न देखे रवि, ते देखे कवि, हे जर खरे असेल तर रा. रा. हनीसिंग "तेरे बदन पे फिसलता पानी" यावरच थांबले आहेत, फार खोलात शिरलेले नाहीत यावरून त्यांची सभ्यता सिद्ध होत नाही काय? तेव्हाच्या मुलांत आणि आताच्या मुलांत काय फरक आहे? मला वाटते प्रत्येक पिढी आधीच्या पिढीच्या दोन पावले पुढे असते. त्यांची आकलनशक्ती अधिक असते. अधिक धिटाई असते. नव्या वाटांवरून जाण्याची इच्छा असते. आधीच्या पिढीपेक्षा सारासार विचारशक्तीही जास्त असते. घरातील वातावरण जर सुसंस्कृत असेल तर बाहेरील वातावरणाचा परिणाम मुलांवर फारसा होत नाही. उलट चांगले काय वाईट काय हे चांगले समजू लागते. अर्थात नियमाला अपवाद असतोच. तेव्हा बाजारात व्होडका मिळणे थांबेल अशी अपेक्षा करून उपयोग नाही. व्होडका पिऊन काय होते हे मुलांपर्यंत नेले म्हणजे पुरे. हभप हनीसिंग, प्रात:स्मरणीय मिकासिंग यांचा भांगडा धुडगूस गल्लीत कितीही चालो, आपल्या मुलांनी गणपतीतील बेभान ढोलताशा ऐकला असेल आणि त्या भक्तीचा कल्लोळ पाहिला असेल तर गणपतीसमोर भगवे झेंडे उंचावून नाचणारी, उच्चरवाने आरती म्हणणारी मुलेही हीच असतील. तेवढी आपली संस्कृती नक्कीच प्रबळ आहे. ती संस्कृती मुलांसमोर नेणारे आपण ही आपलीच जबाबदारी आहे. इत्यलम. 

Saturday, July 19, 2014

काका! मला वाचवा!

स्थळ - शनिवारवाडा 
काळ - पावसाळी दुष्काळ
पात्रे - नारायणराव, वाघोबादादा, पृथ्वीसिंग गारदी, सरदार बारामतीकर आणि इतर नेहमीचेच यशस्वी

(सकाळचा प्रहर आहे. वाडयात अजून म्हणावी तशी लगबग सुरू झालेली नाही. नारायणराव लवकर उठले आहेत. त्यांचा आवाज अंत:पुरातून येतो आहे. विंगेतून एक कोंबडी जिवाच्या आकांताने धावत रंगमंचावर येते. कुठे जायचे हे न कळून ती नुसतीच सैरावैरा पळते आहे. तिच्या मागून नारायणराव धावत येतात आणि तिच्या मागे धावू लागतात.)

नारायणराव- आवशीक xx! खंय जातलंय आता? रंव थंयसरच! न्हानपणासून कोंबडये पकडतंय. हो नारोबा असो सोडूचो नाय तुका. सकाळचो व्यायाम आसा हो माजो.
आनंदीबाई - बाई बाई बाई! पुरे झालं हो नारायणराव कोंबड्या पकडणं! उच्छाद मांडला आहेत नुसता. सकाळपासून कोंबड्यांची पकपक आणि तुमची मालवणी शिव्यांची कलकल. अहो! ऐकलंत का? इकडून नुसतं 'सामना' तोंडापुढे धरून बसणं चाललं आहे. आज पुरश्चरण नाही वाटतं? सूर्य वर येऊन अर्धी घटका लोटली. कसलं बाई ते पुरश्चरण आणि? घटकाघटका सूर्याकडे टक लावून बसायचं ते? प्रकृतीत फारसा फरक कसा तो दिसत नाही, पण चष्मा मात्र लागला आहे.
वाघोबादादा (जरबेने)- काय लावलंय हो? आम्ही हा "सामना" वाचण्यासाठी म्हणून काही तोंडासमोर धरला नाही. या नारोबांच्या कोंबडी षौकाचा परिणाम आहे. या कोंबड्या वाड्यात येतात, सैरावैरा पळतात, मनास येईल तिथे 'प्रसाद' सोडतात. या सर्वाचा परिपाक म्हणून हा दरवळ वाड्यात पसरला आहे, त्याचे शक्यतो निवारण या 'सामना' ने करतो आहे. आमचे पुरश्चरण गेल्या महिन्यातच संपन्न झाले. सूर्याकडे टक लावून पाहणे निश्चितच आमच्या राजकीय मनसुब्यास उपयुक्त झाले आहे. माधवरावांस जरी पेशवाई प्राप्त झाली तरी या वाघो भरारीस मरहट्ट प्रांतिचा पंतप्रधान हा सन्मान प्राप्त होणारच.
नारायणराव - असा तुमका वाटतां. काय समाजल्यात? खरो माजो हक्क तो. हल्ली दुसरां काय करूक नाय म्हणान मी कोंबडये पकडतंय. तुमकां आमचो षौक तेवढो दिसता, तुमी नाटकशाळा ठेवून असत ता काय कोणी बोलूचा नाय, व्हय मां?
वाघोबादादा - खामोष! लहान तोंडी मोठा घास? तोही या वाघो भरारीसमोर? दिल्लीच्या तख्तापर्यंत, अटकेपर्यंत ज्याची तलवार गाजली त्याच्या समोर? तळपत्या सूर्याच्या डोळ्यास डोळा देण्याऱ्या या वाघासमोर?
नारायणराव - म्हायती आसा. बैलगाडीच्या खालसून कुत्रो चलता, तेका वाटता आपण चालतो म्हणान ही बैलगाडी चालतासा. खरां काय ता तुमका आमका म्हायती. माजो हक्क मी घेवन रवतंलंय. हो मी चललंय.
(नारायणराव पकडलेली कोंबडी काखेत पकडून घेऊन जातात)
वाघोबादादा - नमकहराम! या दौलतीशी बेईमानी? या वाघोभरारीशी टक्कर? (संतापाने येरझाऱ्या घालतात)
आनंदीबाई - मी म्हणते, इकडच्यांनी जरा संतापणं कमी करावं. आमच्यावर राग धरता, भावोजींवर चिडता, पुरश्चरण करताना सूर्य लवकर प्रसन्न होत नाही म्हणून त्याच्यावर भडकता. प्रसन्न झाला तर भीक टाकल्यासारखे फळ दिले म्हणून त्रागा केलात. परवा भावोजी दर्शनास आले तर डोक्यावरून उपरणं घेऊन झोपल्याचं सोंग घेऊन पडून राहिलात. अशानं तबियत कशी चांगली राहणार? मी तर म्हणते आता आपण काही दिवस त्र्यंबकास जाऊन राहावं.
वाघोबादादा - बाईसाहेब, हा नारायणराव लाडावलेला आहे. जिथे जातो तिथे याला केवळ साखरभात, पंचपक्वाने हवी असतात. मिळाली नाहीत की हा थयथयाट करतो. साखरभात माझा हक्क आहे म्हणतो. जाऊदे त्याला. कुठे साखरभात मिळतो ते पाहूदे.

(पडदा उघडतो तेव्हा आनंदीबाई महालात सचिंत बसल्या आहेत. सेवक वर्दी घेऊन येतो)
सेवक - मुजरा सरकार. आपण सांगावा धाडल्याप्रमाणे पृथ्वीसिंग गारदी आला आहे.
आनंदीबाई - ठीक आहे. पाठवून दे.
(पृथ्वीसिंग गारदी इकडे तिकडे पाहत हळूच आत येतो)
पृथ्वीसिंग - मुजरा सरकार. हा गारदी सेवेस हाजिर आहे.
आनंदीबाई - पृथ्वीसिंग, खास कामगिरी आहे. नारायणराव तुला ज्ञात असतीलच.
पृथ्वीसिंग - होय सरकार. आत्ताच सदरेवर कोंबड्यांना दाणे टाकताना दिसले होते.
आनंदीबाई - कामगिरी गुप्त आहे. या कानाची त्या कानाला खबर होता कामा नये. समजलं?
पृथ्वीसिंग - आज्ञा व्हावी सरकार. मला स्वत:लाही दोन कान आहेत याचीसुद्धा मला खबर नाही.
आनंदीबाई - आम्ही लिहिलेला खलिता मिळाला?
पृथ्वीसिंग - होय सरकार. परंतु तो फोडलेला होता. सरकार, आपले बारामतीकर सरदार नेहमी आमची पत्रे चोरून वाचतात असा आम्हांस संशय आहे.
आनंदीबाई - आमच्या हुकुमाची तामिली व्हावी.
पृथ्वीसिंग - जशी आपली आज्ञा. (अदबीने झुकून, पाठ न दाखवता महालाबाहेर जातो)

(आनंदीबाई आणि वाघोबादादा महालात बसले आहेत. आनंदीबाई काहीतरी सांगत आहेत. तेव्हढ्यात बाहेर गलका, आरडाओरडा होतो. नारायणराव धावत महालात प्रवेश करतात. मागोमाग पृथ्वीसिंग गारदी येतो)
नारायणराव - घात! घात! काका! माका वाचवा! हो गारदी माझ्या जिवावर आयलो आसा! शिरां पडली या मुघल राज्यार! माका सरदार करतले म्हणून सांगल्यानी. सरदार नाय काय नाय, उलटो हो गारदी माका मारूक सोडलो माज्यार. काका, माका तुमच्या सैन्यांत परत येंवचा आसा. काय बोलून गेलंव तेची मापी करा.
वाघोबादादा - अरे चोरा! माफी करा काय? जाताना आम्हांस जो त्रास देऊन गेलास त्याचे काय? त्यावेळीस आमचे ग्रह ठीक नव्हते, तर सरदारकी मिळेल या आशेने आम्हांस सोडून गेलास. आता आम्ही या राज्याचे राजे होणार अशी स्वप्ने पडू लागली आहेत तर लगेच आलास! ते काही नाही! तुला माफी नाही!
पृथ्वीसिंग - एल्गार! जिले-इलाहीसमोर आमच्याबद्दल नाही नाही ते सांगून हा नारायणराव आमचा कात्रज करीत होता. आता बरा सापडलास. वाघोबादादा, याला एकच शिक्षा - याला खरंच तुमच्या सैन्यांत प्रवेश द्या आणि एखाद्या अवजड खात्यावर बसवा.
नारायणराव (अत्यंत अजीजीने)- नको! नको! दादानू! मापी करा! ह्येचा काय्येक ऐकू नकात. माका एक सैनिक म्हणून येवंचा आसा. माजी काय्येक मागणी नाय आता. मागणी करान करान या अवस्थेत इलंय. एवडो एक चानस द्या माका!
(तेवढ्यात बारामतीकर सरदार प्रवेश करतात. )
वाघोबादादा - बारामतीकर! तुम्ही इथे काय करताय? कोण आहे रे तिकडे? यांना आत कोणी सोडलं?
बारामतीकर - वाघोबादादा, आम्ही तुमचे मित्र! आम्हांस अशी खबर मिळाली की नारायणरावांस काही दगाफटका होत आहे, त्याची आपणास पूर्वसूचना द्यावी यासाठी आलो होतो. आम्ही तसे कुणालाही भेटायला कुठेही जात असतो.
(आनंदीबाई आणि पृथ्वीसिंग एकमेकांकडे पाहतात)
नारायणराव - काका! ह्येंचा पण काय्येक ऐकू नकात. पूर्वसूचना खंयची? मी कसो मरतंय त्याची मजा बगूक आयलेसत हे.
वाघोबादादा - नारायणा! तुझी कर्में तूच फेड हो! मी काही मध्ये पडायचा नाही. तुला आश्रय तर मी मुळीच द्यायचा नाही.
नारायणराव (आकांताने)- काका! काका !
(पृथ्वीसिंग त्याला ओढत घेऊन जातो. विंगेतून दीर्घ किंकाळी, झटापट ऐकू येते. मग शांतता पसरते. वाघोबादादा, आनंदीबाई आणि बारामतीकर सरदार एकमेकांकडे पाहत असतात)
आनंदीबाई - चला! इकडचा आता मार्ग मोकळा झाला!
वाघोबादादा (दटावून) - बाईसाहेब! बारामतीकर, तुम्ही अजून इथे का? या आता आपण. तमाशा संपला.
(नारायणराव प्रवेश करतात. पैरणीच्या चिंध्या झाल्या आहेत, विजार नको तिथे फाटली आहे. केस अस्ताव्यस्त झाले आहेत. गालावर पाच बोटे उमटलेली स्पष्ट दिसत आहेत.)
नारायणराव - आवशीक xx! माका तुमचा सैन्य नको आणि ता मुघल सैन्य पण नको. मी चललंय कणकवल्येक. हो माजो राजीनामो. (पृथ्वीसिंगच्या हातात कागद देतो) आता मी काय तां कणकवल्येक जावन सांगतंय. (जातो)
आनंदीबाई - राजीनामा? पृथ्वीसिंग! काय चालवले आहे हे?
पृथ्वीसिंग - बाईसाहेबांच्या आज्ञेवरून त्यांची "मानधरणी" केली सरकार!
आनंदीबाई (आश्चर्याने)- मान धरणी? पृथ्वीसिंग, मान धरणी??
पृथ्वीसिंग - होय सरकार. मान पकडून छान धरणी केली तेव्हा कुठे वठणीवर आले नारायणराव.
आनंदीबाई (कपाळावर हात मारून) - कर्म! तुम्हाला वाचता येतं असं गृहीत धरलं होतं आम्ही. अहो, "मनधरणी" करा असं म्हटलं होतं आम्ही!
पृथ्वीसिंग (खिशातून कागद काढून त्यांच्या हातात देतो) - बाईसाहेब, आपणच वाचा. मानधरणी असं लिहिलं आहे.
आनंदीबाई - खरंच! अगो बाई, हे काय? कुणी तरी एक काना नंतर टाकलेला दिसतो आहे. हा "म" चा "मा" कुणी केला?
(पृथ्वीसिंग, वाघोबादादा आणि आनंदीबाई चमकून बारामतीकरांकडे पाहतात)
बारामतीकर (नजर टाळत) - अरेच्या, या सगळ्यात विसरलोच. आम्हाला दिल्लीस निघायला हवं. येतो आम्ही!
(गडबडीने निघून जातात. पृथ्वीसिंग, वाघोबादादा आणि आनंदीबाई एकमेकांकडे हताश होऊन पाहत असताना पडदा पडतो)

Wednesday, July 16, 2014

वैदिक सुंता

काँग्रेसने लावलेले धर्मनिरपेक्षतेचे रोपटे आता चांगले फोफावून त्याला रसाळ गोमटी फळे लगडू लागली आहेत. असेच एक गोंडस गोजिरवाणे रसाळमधुर फळ म्हणजे वैदिक. खूप दिवस हे फळ उंचावर फांद्यांमध्ये लपून राहिले होते. काँग्रेसी धर्मनिरपेक्षतेच्या वृक्षाची ही फळे वैशिष्टयपूर्ण गुणधर्माची आहेत. अनेक दिवस कच्चे असलेले फळ इशाऱ्यासरशी पिकून खाली पडते आणि त्याच्या परिपक्वतेच सुगंध आसमंतात दरवळतो. या फळाचा मूळ रंग भगवा असतो, पण जसजसे हे फळ पिकत जाते तसे त्याचा रंग हिरवा होत जातो. पी. व्ही. नरसिंहरावांच्या वेळी धरलेले फळ पिकायला इतकी वर्षे लागली. नाही म्हणायला काँग्रेसच्या ब तुकडीबरोबर हे बालक आपनृपति केजरीसिंहांच्या गळ्यात गळा घालून फोटो काढून घेताना दिसले होते. वाममार्गी, चुकलो, वामपंथी (वाटेला पंथ म्हटले की राजमार्ग होतो) अपचनमुखी सीताराम येचुरी हेही त्या फोटोत काखा वर करून उभे होते. तेव्हा हा गुटगुटीत इसम रबडी विकणारा असून फावल्या वेळात गंगेच्या घाटावर पंड्येगिरी करणारा असावा असे वाटले होते. अंगी नाना कळा वगैरे बाळगून असेल अशी काही शंका आली नव्हती. त्या फोटोत, केजरीरामांच्या प्रभावळीमुळे हा वानर फिका पडला होता. येचुरीतर सदैव दुर्मुखी. चुकून स्वत:चा हसरा चेहरा पाहिला तर ते स्वत:वरच चिडतात असे ऐकले आहे. डाव्यांनी कसे नेहमी असंतुष्ट राहावे, सदैव अन्याय होऊन राहिला आहे असा चेहरा ठेवावा असे काहीसे शिक्षण बहुधा दिले जात असावे. या अद्भुत युतीचे पुढे काय झाले कळले नाही, पण "आपलेच घोडे आणि जाऊद्या पुढे" वृत्तीचे तिघे एकत्र आल्यावर घोडेच काय गाढवसुद्धा बसकण मारील. ही तथाकथित धर्मांध शक्तींच्या विरोधातील मंडळी ज्या विचाराला, धर्माला धर्मांध म्हणत आहेत त्याच धर्माच्या सहिष्णुतेमुळे त्यांना हे करायला मिळत आहे हे विसरतात. हिंदू हा धर्म कधीच नव्हता, नाही. तो एक विचार आहे. प्रत्येकाला स्वतंत्रपणे विचार करू देणारा आहे. संघाने केवळ तोच विचार मांडला. प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम या मध्यवर्ती संकल्पना ठेवून नि:स्वार्थी काम करणारी संघटना म्हणजे संघ. मी लहानपणापासून शाखेत जात होतो. जसे जात हा शब्द कधी शाखेत ऐकला नाही तसेच मुसलमानांना शत्रू माना असेही शाखेत कधी ऐकले नाही. संघात येण्यासाठी राष्ट्र ही संकल्पना मान्य असणे आणि निर्विवाद देशप्रेम या दोनच गोष्टी आवश्यक आहेत असे मला वाटते. मग तो कोणत्याही धर्माचा असो. हिंदूधर्माचा आणि राष्ट्राचा अभिमान हा मुसलमान द्वेष होत नाही. या निर्बुद्ध वैदिकसारखी मंडळी ते सिध्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही असो, मुळात प्रश्न संघ आणि मुसलमान असा नाहीच आहे. जो मनुष्य दहशतवादी म्हणून सिध्द झाला आहे, ज्याने २६/११ सारखा भयानक हल्ला देशावर घडवून आणला, त्याची भेट हा इसम कोणत्या अधिकारात घेतो? या मनुष्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप का ठेवू नये? लोकशाही आहे म्हणून कुणीही उठतो आणि मनाला येईल ते करतो. ही कसली लोकशाही? पत्रकारशुचिता हा शब्द आता लुप्त झाला आहे. आता ज्या प्रकारे पत्रकारिता केली जाते ते पाहून तिचा उपयोग शस्त्र, साधन म्हणून केला जातो आहे असे दिसते. लोकशाहीमध्ये लोकांना जाणून घेण्याचा अधिकार आहे या सबबीखाली हे पत्रकार लोक निर्लज्जपणे धंदा करत असतात. होय, आता पत्रकारिता हा एक मान्यताप्राप्त व्यवसाय राहिला नसून धंदा झाला आहे. पण मला वाटते राष्ट्रद्रोह करण्यासाठीसुध्दा एक प्रकारची द्वेषी का होईना मानसिकता लागते. वैदिक यांच्याकडे तेवढी बुद्धी नक्कीच नाही. लोकशाहीमध्ये सर्व लोकांचे प्रतिनिधित्व मान्य असते. त्यात विचारी, अविचारी, गुणी, दुर्गुणी, काही नितांत मूर्ख आणि वैदिक यांच्यासारखे वैचारिक सुंता झालेले मूर्ख लोकही आले.

प्रश्न असा पडतो की या रबडीप्रताप वैदिकाला आताच हा उपद्व्याप का सुचला असावा? अनेक वर्षे पत्रकारिता करून प्रसिद्धी न मिळाल्याचा परिणाम की बोलवत्या धन्याचा इषारा पाळण्याचा प्रयत्न? हे नक्कीच एक षडयंत्र आहे. पापस्तानात जाणे, सईद हाफिज या दहशतवादी गुन्हेगाराची भेट घेणे, त्यासंबंधी मीडियावर यथेच्छ सार्वजनिक बोंब ठोकणे ही वैदिक या इसमाची वैयक्तिक कुवत असूच शकत नाही. याला नक्कीच भारतातीलच कुणीतरी मदत केली आहे किंवा आपण मागे राहून याला पुढे केले आहे. आणि हा इसम केवळ प्रसिद्धी मिळेल या लालसेने हे सर्व करण्यास तयार झाला आहे. भारताचा इतिहास आहे. परधार्जिणे, राज्यद्रोही हरामखोर भारताने भरपूर पाहिले आहेत. पण या वैदिकसारखा मूर्ख हरामखोर पहिलाच. मूर्ख म्हणून सोडून द्यायचा की हरामखोर म्हणून थोबाडून काढायचा असा प्रश्न पडला आहे. असो, भावना, देशप्रेम, धारातीर्थी पडलेले जवान हे सगळे बाजूला ठेवून विचारूया, कशासाठी हे सगळे केले? त्याचेही उत्तर मिळत नाही. हा इसम टीव्हीवर आला आणि अखंड वेळ अगम्य शब्दात भुंकत होता. जर काही बाजू असेलच, तर ती मांडायची संधी लोकशाहीनेच दिली होती, तीसुद्धा याला वापरता आली नाही. याचे कारण एकच, काही बाजूच अस्तित्वात नाही. ती असूच शकत नाही. दहशतवाद्याचे समर्थन करताच येणार नाही. हिंसा हा ज्यांचा मार्ग आहे त्यांना आणि त्यांचे समर्थन करणाऱ्यांना उत्तर मात्र लोकशाही मार्गाने द्यावे लागते हे केवळ दुर्दैवी आहे. बलात्कार करणाऱ्यांचे "लहान मुले आहेत ती, चुका करणारच" असे समर्थन करणारा मुल्ला मुलायम सिंग आणि दहशतवाद्याला मिठ्या मारणारा वैदिक यांच्यात फरक नाही. बेजबाबदार आणि राष्ट्राला घातक अशी विधाने किंवा कृती करणाऱ्यांना जबर शिक्षा होण्याची गरज आहे. यापुढे दहशतवादाचा कोणताही त्रास झाल्यास प्रथम या वैदिकला टायरमध्ये टाकून चौकशी करावी. मुलायम आणि वैदिक यांची वैचारिक सुंता तर झालीच आहे, त्यांना विनंती आहे की या लोकांनी टीव्हीवर सार्वजनिक सुंता करून घ्यावी. च्यानेलवाल्यांचा टीआरपी वाढेल, लोकांना करमणूक मिळेल आणि या लोकांना सुंत्याचे समाधान. तुका म्हणे ऐशा नरा, मोजून माराव्या पैजारा.

Friday, July 11, 2014

फैनाबाज फायनान्स


जेटली या नावातच वेग आहे. वेग अनेक प्रकारचे असतात नुसताच वेग, संवेग, आवेग, उद्वेग. मार्शल आर्टवाले चित्रपट मला आवडतात. त्यातील जेट ली हा एक आघाडीचा चायनीज नट. वेग, संवेग यावर पुरते नियंत्रण असलेला. अन्यायाविरुध्द पेटून उठणारा, आपल्या मास्तरांच्या (पक्षी: गुरू) वधाचा बदला घेणारा, राष्ट्र बलवान होण्यासाठी पश्चिमेशी लढा देणारा. मास्तरांच्या वधाचा बदला घेणे ही एक अगम्य गोष्ट सोडली तर त्याचे चित्रपट पाहताना थक्क होऊन जायला व्हायचं. आम्ही शाळेत असताना मास्तर नुसते आजारी पडले तरी आनंदकल्लोळ व्हायचा, बदला वगैरे घेणं मनातसुध्धा आलं नसतं. त्यामुळे जेट लीबद्दल आदर वाटायचा. शिवाय आजपर्यंत दणकट आणि टिकाऊ असलेली ही एकच चायनीज वस्तू मला दिसलेली आहे. आमचे देशी नट-बोलट पाहताना दया यायची. हल्लीचे जरा व्यायाम करणारे असतात. पण पूर्वीचे आठवून पहा. संजीवकुमार, राजेशखन्ना, दे.भ.प. मनोजकुमार ही सर्व मंडळी व्यायाम म्हणून लोण्यात माखलेले पराठे खात असावीत असेच वाटायचे. राजकारण हा एक रंगमंचच. त्यात वावरणारे हे रंगकर्मी. अभिनयक्षेत्र आणि राजकारण यांच्यातील सीमारेषा पुसट आहे. अर्धे पाऊल इकडचे तिकडे झाले की  माणूस राजकारणात यायचा तो अभिनयक्षेत्रात जातो आणि ते वाकडे पडले की अभिनयक्षेत्रात असणारा माणूस राजकारणात. गरजूंनी आजूबाजूला उदाहरणे पहावीत. रितेश देशमुख यांचा सन्माननीय अपवाद वगळता अभिनयाचे पाणी शेवटी राजकारणाच्याच वळचणीला जाताना दिसते. असो. विषयांतर झाले. तात्पर्य, आपल्याकडे जेट ली सारखा हनुमंत का नाही असे सारखे वाटायचे. बऱ्याच काळाने का होईना ही विच्छासुद्धा पुरी होते आहे. आता चिनी लोकांना तुमच्यासारखा जेटली आमच्याकडेही आहे हो असे अभिमानाने आपल्याला सांगता येईल. ते हातवारे, तो अभिनिवेश, ती तडफ, जिभेवर लीलया नाचत असलेल्या आर्थिक संज्ञा, श्रीमंतांविषयीची कळ आणि गरीबांविषयी कळकळ ओसंडून वाहताना पाहिली आणि हाच आपला तारणहार याविषयी मनात शंका उरली नाही.

भारतीयांना प्रगती हवी आहे, देशाचा बेकारीत जगायचा अजिबात 'मूड' नाही, गरिबांना मध्यमवर्गात यायचे आहे अशी आश्चर्यकारक माहिती त्यांच्या भाषणातून कळली. म्हणजे तशी शंका होतीच, पण खुद्द जेटलींनी सांगितल्यामुळे विश्वास बसला. हे गरीब लोक नेहमीच असलं काही तरी मागत असतात. पूर्वी रेल्वेत चांगले फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास होते. गरीब लोक नेहमी थर्ड क्लासचं तिकीट काढून सेकंडमध्ये जाऊन बसायचे. रेल्वेने त्यांची ही इच्छा ओळखली आणि अत्यंत हृदयद्रावक कृती केली. थर्ड क्लास रद्द करून त्यालाच सेकंड करून टाकले. थर्डक्लासवाले आपोआप सेकंडला अपग्रेड झाले. जेटलींच्या करुणप्रेमळ मनात असेच काहीसे असणार. भारतातील बहुसंख्य जनता दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत असताना त्यांच्या घशात बिसलेरीच्या पाण्याचा घोटसुद्धा जाणार नाही. आणि लोकांच्या मूडचा काही भरंवसा नसतो. आज म्हणतील बेकारी नको, उद्या म्हणतील नोकरी नको. त्यामुळे पूर्वीच्या सरकारचे वांधे झाले होते. जेटली यांनी ते बरोबर हेरले आणि आपण ते हेरल्याचे भाषणात सांगितले. उगाच कुणी म्हणायला नको, आम्ही लई मुडात आलो होतो, पण तुम्ही नाट लावलात. मूड असो वा नसो, आता विकास होणारच. पण आता आम्हाला आशेचे हिरवे कोंब उगवताना दिसताहेत असे त्यांनी म्हटल्यावर उगाचच आपण म्हसरू झालो आहोत आणि लुसलुशीत कोंब चरत आहोत असे दृश्य डोळ्यासमोर आले. पण त्यांच्या पुढच्या वाक्याने गुराख्याने दांडक्याचा एक तडाखा मागील पायावर ठेवून दिल्याप्रमाणे वाटले. माझ्या आधीच्या मास्तरांनी माजं काम लई आवघाड करून ठेवल्यालं आहे. या वर्षात वित्तीय तूट ४. १ टक्क्यावर आणायचं काम माझ्यासमोर आहे. पण हे आव्हान मी तुमच्या वतीनं स्वीकारतो. हे वाक्य उच्चारताना त्यांनी आपल्या चेहऱ्याचा बेस्ट अँगल टीव्ही कॅमेऱ्याला दिला. सभागृहात बाकीचे घामाने निथळत असताना जेटलींच्या माथ्यावरील काही स्वतंत्र बाण्याचे केस वाऱ्याने भुरूभुरू उडत होते, अगदी चित्रपटात दीपिका पदुकोणचे उडतात तसे. आपल्याला वित्तीय तूट, खर्चात कपात, ठोक देशी उत्पादन असले शब्द ऐकले की भीती वाटते. तूट, कपात, ठोक हे शब्द थेट भाई लोकांच्या शब्दकोषातून घेतल्याप्रमाणे वाटतात. त्यामुळे या अहिमहींना सामोरे जाणारे जेटली अधिकच शूर वाटू लागले. कमीत कमी सरकार ठेवून लोकांना जास्तीत जास्त शासन करून दाखवू हे ऐकल्यावर बरे वाटले. ज्यांना शासन घडले पाहिजे असे लोक आमच्या चाळीतच कितीतरी आहेत.

एक नाही दोन नाही तब्बल १०० कोटींची तरतूद असलेल्या योजना पाहून भान हरपते. आमच्या ऑफिसात आमच्यासाठी नवीन माठ आणि साहेबांच्या केबिनला एसी बसवला होता तेव्हा संपूर्ण स्टाफ हरखून गेला होता. केवळ माठाचे गार पाणी प्यायला मिळते म्हणून आम्ही सर्व कारकून उन्हाळ्याचे सर्व दिवस ओव्हरटाईम करत होतो. साहेबाशी उभा दावा असणारा आमचा रेग्या, केवळ एसीत उभे राहायला मिळते म्हणून काही तरी काम काढून साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या शिव्या खाऊन येत होता. तसाच काहीसा आनंद आताही झाला. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सादर करताना त्यांच्या डोळ्यात पित्याची ममता आणि करडी जरब दोन्ही दिसत होती. फिल्म इंडष्ट्रीतील सर्वात यशस्वी बाप झालेले (फक्त भूमिकेच्या अनुषंगाने) श्रीयुत आलोक नाथ उर्फ बाबूजी म्हणाले,"ये है संस्कारी पुरुष का लक्षण. मैने प्यार कियाच्या सेटवर भाग्यश्री पटवर्धनला मी मुलगी मानले. तिच्यावर खूप संस्कार केले. तर तिने त्या हिमालयासारख्या थंड अभिनयाच्या इसमाशी लग्न केले. आता काय बोलणार? तेव्हा, बेटी बचाओला माझा पूर्ण पाठिंबा आहे. " दुसरी योजना म्हणजे वनबंधू कल्याण. वनबंधू कल्याण हा खरोखर ज्वलंत प्रश्न आहे. पूर्वीच्या सरकारने ठाणे जिल्ह्यातील कातकऱ्यांचे भलं करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्यासाठी कॉम्प्युटर क्लासेस, गृहकर्जात गाडीकर्जात सवलत, सुलभ हप्त्यांवर वॉशिंग मशीन इत्यादि इत्यादि. पण वनबंधूंना विकासच नको असतो असे लक्षात आले. शेवटी ठाणे शहरात बिल्डर लोकांना काय वाट्टेल ते करा अशी परवानगी दिली. त्यांनी सगळी आजूबाजूची जंगले सफाचट करून शहराचा विकासच विकास करून टाकला. त्यामुळे ठाणे शहराच्या आसपासचे कातकरी कल्याण तालुक्यात गेले. कल्याण असेही करता येते. जेटली वनबंधूंच्याबद्दल बोलताना विशेष गंभीर आणि व्याकूळ झाले होते. एsssss भाsssssय, वाल्या दिलीपकुमारसारखे. त्याने तरी विकासाची गाडी वनबंधूसाठी थांबते का पाहू. उरलेला भारत तरी विकासासाठी आतुर झाला आहे.

शेवटी संकल्प हा सोडण्यासाठी असतो. आणि तो सोडायचा असतो तो देवदयेने पुरा होईल या आशेने. तसाच हा अर्थसंकल्प सोडला तर आहे, फक्त आता देवदयेची वाट पहायची आणि हे जम्बो जेटली आपल्याला सुखरूप कुठेतरी उतरवेल याचा नवस करायचा. काही असो चायनीज प्रॉडक्टला तोडीस तोड एक तरी भारतीय माल निघाला याने आमचा दीस गोडु झाला आहे.

Wednesday, July 9, 2014

उ.सं.डु.

अर्थात, उपाध्यक्षांच्या संसदीय डुलक्या!

मला दोन सेकंद डुलकी काय लागली आणि या मीडियावाल्यांना जणू काही लॉटरीच लागली. पेपरमध्ये काय, सोशल मीडियावर काय सगळीकडे माझे डुलकी काढतानाचे फोटो, कार्टून दिसत आहेत. ही:ही:ही:! ममा म्हणतेच नेहमी, झोपल्यावर मी कसा आणखीनच निरागस दिसतो. मला ते अज्जिबात आवडत नाही. मी काही लहान नाही आता. चांगला आठवीत गेलो आहे. ममा म्हणते एव्हाना तू ग्राज्वेट होऊन स्वत:च्या पायावर उभा राहायला हवा होतास. कैच्या कैच. उद्या म्हणेल आत्तापर्यंत तुझं लग्न होऊन माझ्या मांडीवर नातवंडं खेळवायला हवी होतीस. शिवाय तिला माझी स्वप्नंच कळत नाहीत. मागे एकदा माझ्या स्वप्नात छान उंदीर आला होता. टॉम आणि जेरीतल्या जेरी सारखा. खरं तर तो मीच होतो. मनमोहन अंकल झाले होते टॉम. ते मस्त झोपले होते तर मी हळूच जाऊन त्यांची शेपूट त्यांच्या मागील पायातून पुढे घेऊन पुढच्या पायाला बांधून टाकली. स्पाईक कोण झालं होतं माहितेय का? नमोअंकल. स्पाईक नाहीये असं बघून मी त्याची प्लेट पळवली आणि टॉमच्या शेजारी आणून ठेवली. ही:ही:ही:! आता स्पाईकने पाहिलं की टॉमची पळताभुई थोडी होईल. शेपूट पुढच्या पायाला बांधून त्याला पळताना पाहून अशी मज्जा येईल ना…ही:ही:ही:! ममाला स्वप्न सांगितलं तर तिला काहीच मज्जा वाटली नाही, उलट मलाच म्हणाली तुला कधी कळायला लागणार आहे रे बाबा! तिला काय हवं असतं कुणास ठाऊक. म्हणाली, माणसाने कशी मोठी स्वप्नं पहावीत. तू मोठी स्वप्नं पाहायला हवीस. स्वप्न मोठ्ठ कसं करायचं? ते काय आपल्या हातात असतं? कधी कधी भयानक स्वप्न पडतं, तेव्हा ते खूप दिवस चालू आहे असंच वाटतं. एकदा असंच माझी तोंडी परीक्षा चालू आहे असं स्वप्न पडलं होतं. कुठले सर परीक्षा घेत होते कुणास ठाऊक, मी कधी त्यांना आमच्या शाळेत पाहिलंसुद्धा नव्हतं. विषयही कसला तरी कठीण, ज्याचं ओ की ठो माहीत नाही असा. इकडे तिकडे पाहिलं, कुणी मदत करायला आहे का, तर कुणीच नाही. एका खुर्चीत मी आणि समोरच्या खुर्चीत ते खोकड सर. मला दरदरून घाम फुटलेला. उत्तर नीट नाही दिलं तर मी नववीत जाणार नाही असं सारखं सांगत होते. वर ही परीक्षा सगळ्यांना टीव्हीवर आत्ता दिसत आहे असा दम देत होते. नाईटमेअर नाईटमेअर म्हणतात हेच असणार. एक तासाची परीक्षा पण संपतच नव्हतं स्वप्न. मी सारखं एकच उत्तर देत होतो. शेवटी मला वाटतं त्या सरांनाच माझी दया आली, किंवा कंटाळा आला. तेच माझ्या स्वप्नातून निघून गेले. ममाला म्हटलं, बघ हे तरी मोठं स्वप्न होतं ना? तर न बोलता निघूनच गेली. आता हवीत तशी स्वप्नं पाडायची तरी कशी माणसानं?

पण काही म्हणा, दाढी काढल्यावर मी एकदम बालक दिसू लागलो आहे. ब तुकडीतल्या त्या लाजिया फिल्मीचा फोन आला होता. अय्या! कित्ती गोsssssड दिसतोस रे तू! असं किंचाळत होती. मी आता तुझ्या वर्गातच ट्रान्स्फर करून घेणारे म्हणाली. मी तिला सांगितलं आहे, तू असा फोन करत जाऊ नकोस, ममाला आवडत नाही ते. तुला प्ले-डेट हवी असली तर तुझ्या आईला ममाला फोन करायला सांग. आणि हो, आधीच सांगतो, ममा मला रेटेड आर गेम्स खेळायला देत नाही. मी फक्त क्यांडी क्रश, मारिओ खेळतो. लपाछपी खेळायची असेल तर मला दोनदा पकडलं तर एकदा आऊट. आणि पहिला डाव तुझ्यावर. माझ्यावर डाव आला तर मी फक्त दहापर्यंत आकडे मोजणार. तसे मला शंभरपर्यंत येतात पण दहानंतरचे आठवायला लागतात. तुलाच कंटाळा येईल. तर मला म्हणाली चालेल. आमच्या वर्गात बसून मला कंटाळा आला आहे. सगळे लेकाचे स्वत:ला हुशार समजतात. आमचा मॉनिटर, नुसता फुशारक्या मारतो आणि मोठ्ठे मोठ्ठे आकडे म्हणतो. पण प्रत्यक्षात त्याला चारपर्यंतच लिहिता येतात. मोठ्याने म्हणतो चारशे बत्तीस आणि फळ्यावर चार लिहून थांबतो. 'शे' आकड्यात कसे लिहायचे म्हणतो. काय करायचाय असला मॉंनिटर? त्यापेक्षा तूच कित्ती छान. दहापर्यंत आकडे येतात आणि लिहूपण शकतोस. हो ना? मी हो म्हटलं. लिहायला थोडंच लागणार आहे? ही:ही:ही:! मग ती उगाच काही अगम्य बोलत राहिली. मला बहुधा डुलकी लागली असावी. जाग आली तेव्हा फोनची ब्याटरी डाऊन होऊन बंद पडला होता. फोन कानावर ठेवून तसाच लवंडलो असणार. तोंडातून लाळ गळून स्क्रीनवर जमा झाली होती. शी! त्या दिग्गीअंकलसारखी लाळ गाळू नकोस असं मला ममा नेहमी सांगत असते. त्यांचा आणि ममाचा काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. मला तरी लाळ गाळण्यात अनैसर्गिक असं काही वाटत नाही. मला चिंच, आवळा, आमसूल बघून जबड्यातून कळ येते आणि लाळ सुटते. तसंच काहीसं त्यांना होत असावं. ही थिअरी तपासून बघावी म्हणून मी एकदा बैठकीत त्यांच्यासमोर चिंच चोखत बसलो होतो. पण त्यांना काहीच झालं नाही. मग तो नाद सोडून मी सगळ्या चिंचा बैठक संपेतोवर फस्त केल्या. बैठक संपल्यावर टीव्हीवाले आले. त्यातली एक टीव्हीवाली दिग्गीअंकलचा इंटरव्ह्यू घेत होती. इंटरव्ह्यू संपल्यावर पाहिलं तर अंकल रुमाल घेऊन लाळ पुसत होते. हात्तिच्या! म्हणजे चिंचांचा परिणाम झाला तर! फक्त जरा वेळ लागला. त्याचाच विचार करत बसलो आणि डुलकी लागली. स्वप्नात ती टीव्हीवाली चिंच झाली होती. उंच झाडावर लगडली होती. दिग्गीअंकल उड्या मारून ती हाताला लागतेय का बघत होते. त्या उड्या पाहून मी खिदळत होतो. त्यांना म्हणालो, अंकल, दगड मारा ना त्यापेक्षा. तर म्हणाले अरे ही चिंच अलगद काढावी लागते. आणि ते एकदम स्वत:च फांदीला त्या चिंचेच्या शेजारी जाऊन लगडले. पण ते आता पपई झाले होते. चष्म्यासकट. चिंचेला हात लावायला त्यांना हातच नव्हते. खी:खी:खी:! चिंचामृताचा योग. जाग आली तेव्हा गाडीत होतो. मला बूस्टरसीटवर बसायला अजिबात आवडत नाही. मला मुळात गाडीतच बसायला आवडत नाही. ममा नेहमी विंडोलॉक करते. आणि थांबल्यावर नेहमी कुणीतरी बाहेरून दरवाजा उघडल्याशिवाय मला उतरता येत नाही. आय हेट चाईल्ड लॉक! मी एकदा दरवाजाला बाहेरून आणि ममाच्या सीटच्या हेड रेस्टला च्युईन्ग गम लावून ठेवणार आहे. तिचा अंबाडा आईसक्रीमवर चेरी ठेवल्याप्रमाणे दिसेल.

ममा मला तिच्याबरोबर ऑफिसमध्ये घेऊन जाते ते मला खूप बोअर होतं. तिथे मोठ्ठी क्लासरूम आहे. वयाने खूप मोठी माणसं शिकायला येतात. समोर एक सर बसलेले असतात. पण ते काहीच करत नाहीत. विद्यार्थीच खूप बोलत असतात. खरं तर आरडाओरडच करत असतात. काही काही वेळा मज्जा येते. काही जण सरांसमोर जाऊन धिंगाणा घालतात, कागद वर फेकतात, कचरा करतात. आणि बाकीचे बेंच वाजवत त्यांना सपोर्ट करतात. अशा वेळी मी पण बाक वाजवतो. एकदा मी बाकावर उभं राहून शिट्टी पण वाजवली. एक लालूअंकल म्हणून आहेत. ते खूप विनोदी आहेत. ते मला खूप हसवतात. एकदा त्यांनी मला म्हशीचे वेगवेगळे आवाज काढून दाखवले. म्हैस माजावर आली की कशी ओरडते, भूक लागली की कशी ओरडते, चारा दिला नाही तर कसा धिंगाणा घालते. त्यांच्याकडे खूप म्हशी आहेत. त्याचं म्हशींवर खूप प्रेम आहे. म्हशींचंही त्यांच्यावर आहे. त्यांना पोलिसांनी तुरुंगात घातलं होतं तर त्यांचं घर म्हणे एका म्हशीनंच सांभाळलं होतं. मी त्यांना माजावर आलेली म्हैस म्हणजे काय असं विचारलं. तर त्यांनी क्लासमधल्याच एका बंगाली बाईकडे बोट दाखवलं. म्हणाले माजावर आलेली नाही, पण माजलेली नक्की आहे. माजावर आलेली दाखवेन कधीतरी, बिहारला ये कधी तरी, आमच्या गोठ्यात आहेत खूप. ते आणखी काही सांगणार होते. पण ममानं ओढून नेलं. असं काही तरी होत असलं की मग बोअर होत नाही. आता सध्या खूपच बोअर होतं. लालूकाका नसतात, कपिलकाका नसतात, दिग्गीकाका तर सध्या हनीमूनवर आहेत असं कळलं. त्यामुळे त्यांचीपण मज्जा नसते. मग डुलकी लागणार नाही का? लोकांना काय जातंय हसायला? एकदा इथं या क्लासमध्ये येऊन दिवस काढून दाखवा म्हणावं.

आज कुणीतरी फोन केला. म्हणे अमृत मासिकाच्या कार्यालयातून बोलतोय. आमचं एक पॉप्युलर सदर होतं, उ. सं. डु. ऐकलं होतं का कधी? मी म्हणालो मासिक म्हणजे पुस्तक ना? वाचायचं? आमच्या बाबांनी खूप जमवली होती पुस्तकं. तर ते म्हणाले,"असू द्या, असू द्या. सगळेच काही पुस्तकं वाचत नाहीत. तर सांगायचा मुद्दा, आमचं ते सदर फार चांगलं होतं. पण मासिक पुढे बंद पडलं. आज आपला फोटो पाहिला आणि एक कल्पना सुचली. तुम्ही हे सदर लिहा, आमचं मासिक पुन्हा चालू होईल. म्हणजे तुम्हाला तसं लिहावं लागणार नाही. तुम्ही जसे नेहमी वागता तसेच वागा. आमच्या सदराला खूप मटेरिअल मिळेल. सदराचं नाव असेल "उपाध्यक्षांच्या संसदीय डुलक्या". कसं वाटतं? मी म्हणालो, ठीक आहे, पण जोडाक्षरं फार होताहेत. तशी म्हणाले, मग "उप संसदीय डुलकी" हे कसे? तुम्हीच ठरवा म्हटलं, मला थोडंच वाचायचं आहे? पण त्यांना म्हणालो आहे, तुम्ही ममाला फोन करा. तिने परवानगी दिली तरच मी हे काम घेईन.

Tuesday, July 8, 2014

राळेगणसिद्धीची भाकणूक

आवंदाच्या शेतीचं  काय खरं नाही. लोकसभेत पार उखडून टाकलेली तणं मात्र परत माजायला आली. राष्ट्रवादी संतांची ही टोळी आता शेतकऱ्याचा कैवार घेत याला भेट त्याला भेट करत हिंडू लागली आहे. संतशिरोमणी मा. ना. खा. स्वत: पार पंतप्रधानाना भेटून आले. बोळक्या तोंडातून काय बोलले कुणास ठाऊक, ते कधीच सांगत नाहीत. पण भेटून आले खरे. यांनी बोळकं उघडमिट केलं, त्यांनी दाढी खाजवली आणि हे समाधानकारक चर्चा झाली असं सांगत तुंदिल हलवत परत आले. हे म्हणजे शेतात माजलेल्या किडीने शेतकऱ्याची भेट घेऊन शेतीच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यासारखं झालं. अर्थात बरोबर आहे म्हणा, शेत वाळलं तर कीड काय खाणार, कडबा?  तर संतशिरोमणी गेले दिल्लीला आणि ज्युनिअर संतमंडळींना पाठवले अण्णांच्या दर्शनाला. स्वत: शिरोमणी गेले असते. पण मागच्या त्या थप्पड प्रकरणात अण्णांचे एका थपडेने समाधान झाले नसल्याचे त्यांनी उघड बोलून दाखवले होते. न जाणो आपण जाऊ आणि अण्णा ती कसर भरून काढतील. या भीतीने मग शिरोमणींनी स्वत: जाणे टाळले असावे. शिवाय ते स्वत:ला राष्ट्रीय पातळीवरचे नेते समजत असल्याने चिल्लर स्थानिक नेत्यांना अथवा प्रतिष्ठितांना ते भेटत नाहीत. तडक पंतप्रधान किंवा किमान राष्ट्रपती तरी लागतो. शिवाय अण्णांकडे गेले की जमिनीवर बसावे लागते, खाली बसले की पोटाचा पसारा मांडी घालू देत नाही. पंतप्रधानांकडे गेले की बुडाला ऐसपैस अशी बैठक मिळते. पंतप्रधान होणे तर आता शक्य नाही, किमान त्यांच्या खुर्चीसमोर तरी बसता येईल असाही एक गोड आशावाद त्यामागे असावा. जो पक्ष इतकी वर्षे सत्तेत आहे, ज्या पक्षाचा महाराष्ट्राच्या जलसंपत्तीचा मंत्री आहे, करोडो रुपये खर्च करून कालवे, धरणे बांधण्याचा नुसता फार्स केला आणि प्रत्यक्षात करंगळी दाखवून ते भरण्याची वेळ आणली त्या पक्षाच्या नेत्यांनी गळे काढत त्याबद्दल चर्चा करावी हे पाहून ऊर कसा भरून आला. लोकसभेच्या पराभवानंतर या लोकांनी जणू रुद्राक्षाच्या माळा घालून अंगभर भस्म चोपडून साधुत्वाचे सोंग घेतले आहे. हे संत नव्हेत, साधूच. संत लौकिकार्थाने सर्वसंगपरित्याग करतात, साधू लोक बहुतांशी संधीसाधू असतात. नदीच्या किनाऱ्यावर छान कुबडीवर हात ठेवून डोळे बंद करून परमेश्वराचे ध्यान करत असल्याचा आव आणतील. पण प्रत्यक्षात हळूच एक डोळा किलकिला करून लोकांच्या मौल्यवान वस्तूवर किंवा एखाद्या मुग्ध कन्यकेवर डोळा ठेवतील.

ज्युनिअर साधू यांनी अण्णांची भेट घेऊन विचारले तरी काय? दुष्काळी परिस्थितीवर चर्चा म्हणजे नेमके काय? आन्ना, आवंदा काय पावसपाण्याचं खरं दिसत न्हाय. दुष्काळ तसा हायेच, पन या येळेस डिलक्स दुष्काळ दिसतो हाये. काय करावं म्हन्ता? पक्षात चर्चा झाली तशी. पण तुमाला ठावंच हाय, येक जण गंभीरपणं बोलेल तर शपथ. इतके दिवस बरं होतं, दुष्काळ आसला तरी चर्चा करायला लागावी अशी परिस्थिती न्हवती. पन आता जर चर्चा न्हाई झाली तर विधानसभेत आमच्या मतांचा दुष्काळ व्हईल ह्ये नक्की. मग आसं लक्षात आलं की आमच्यात येक बी आसा न्हाई की ज्येनं दुष्काळ पाह्यला हाये. आन काय करायला हवं याचा पत्ता आसेल. दादा तर बैठकीत हासतच हुतं. काही विचारलं तरी करंगळी वर. आबांना इचारलं तर म्हनले आता नळाला पानी येत नसंल तर पलम्बरला बलवा. काय कुटं कचरा, झाडपाला अटकतोय पायपात, मग कशाला यील पानी? आमच्या येशा पलम्बरला सांगतो. बेणं लई हुशार हाय. कुटला पन नळ दाखवा, ठीक करनार म्हणजे करणारच. बरोबर पानी चालू करतोय बघा. आनी तिकडं ते आमचे हानुमान, मंत्रीपद काय घावलं आट महिन्याचं, बगतो, इचार करतो, शेक्रेटरींचा सल्ला घेतो आनि कारवाई करतो म्हणू लागले हायेत. ह्येच जर पूर्वीचं आसतं तर पयले पावसाच्या नावानं शिव्यांची बरसात झाली असती आन मग राडास्टाईल आंदोलन. यांचं आंदोलन म्हंजे जे आंदोलन करत्यात त्यांच्या विरोधात आंदोलन. तर आशी दिव्य प्रभावळ जमल्याली हाये पक्षात. तवा अन्ना, तुमीच सांगा उपाय. तुमी जलसंधारणा क्षेत्रात काम केल्यालं हाये. काय केलं म्हंजे पाऊस पडंल? जरा मार्घदर्शण करून सोडा. चंद्राबाबूंनी शपथ घेताना म्हुर्त पाळला न्हाई म्हणूनपण पावसानं बैदा केलीय आसं बी ऐकतो, तुमाला ते खरं वाटतया का? आता सद्याच्या राजकारणात कवा शपथ घ्यावी लागेल आन कवा मोडावी लागंल कुणी सांगावं? आमच्या हानुमानाला कदी शपथ घ्यावी लागेल आसं सपनात पन आलं नसंल. आनि आमाला हारल्याबद्दल बक्षीस म्हणून ही वसाडगावाची झागिरी भेटंल आसंपन वाटलं नव्हतं. आयला सायेब एशीमदे पंतप्रधानासमोर गुजराती बिअर घ्येऊन, आन आमी हितं राळेगनशिद्दीला शेणानं सारवलेल्या जमिनीवर, गाईचं दूध समोर घ्येऊन बसलो आहे. आसो, तर अन्ना, उपाय सांगा.

अण्णा म्हणाले,"उपाय सांगतो. जरा टोकाचा आहे. पण परिस्थितीही टोकाची आहे. तुमच्या आबांचा तो बेष्ट पलम्बर आहे ना, त्याला लावा कामाला. म्हणावं पयले दादांचा गळका नळ बंद करून टाक. उगाच जीमिनीची नासाडी चालवलीय. हा नळ गळायचा थांबला की जमिनीचा कस वाढेल, झाडं वाढतील. झाडं वाढली की जमिनीची धूप थांबेल. जमिनीची धूप थांबली की ग्राउंड वॉटर टेबल सुधारेल. हे खालून काही द्यायचं टेबल नाही. खालून घ्यायचं बंद करा, हे टेबल सुधारेल." ज्युनिअर थक्क झाले. त्यांनी अण्णांना साष्टांग नमस्कार घातला. "अन्ना, तुमी लैच थोर आहात. आपल्यासाठी कायतरी करायची इच्छा हाये. तुमी फक्त सांगा, हुकूम करा." अण्णा मागच्या लोडावर टेकले, काही वेळ विचार केला आणि म्हणाले,"आमच्यासाठी खरंच काही करणार असाल तर सांगतो. आयुष्यात कसलीही इच्छा ठेवली नाही. पण एकच इच्छा आहे, दुर्दम्य आहे, प्रबळ आहे. काही काही वेळा अनिवार इच्छा होते पण स्वत:ला आवरतो." एवढं बोलून अण्णा थांबले. ज्युनिअर सटपटले. आयुष्यभर ब्रह्मचारी राहिलेला माणूस. काय मागत्यात काय की! सोपं काम न्हाई. कुठून बोलून गेलो असं त्यांना झालं. चुळबुळत ते अण्णांकडे पाहू लागले. अण्णा पुढे बोलू लागले,"दोन वर्षांपासून मनात आहे. तेव्हा हे कराच. त्यावेळेस मी मनापासून बोललो होतो,"क्या ? एकही मारा?" खरंच, किमान सहा तरी हव्या होत्या. तीन डावीकडे, तीन उजवीकडे. एकच बसली, पाच बाकी आहेत. कराल तेवढ्या पुऱ्या? एवढी एक विच्छा माजी पुरी करा." 

Thursday, July 3, 2014

छग्गूदादा बाहुबली

छग्गूदादा प्येटला. निसता प्येटला न्हाई तर भुईनळ्यावाणी प्येटला. मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुरसुर करून गरागरा फिरला. कुणाच्या धोतरात तर कुणाच्या इजारीत ठिणग्या उडाल्या. येरवी ढेरीवर हात फिरवत, काडीनं दात कोरत, नुकत्याच हाणलेल्या बिर्याणीची चव डोळे मिटून आठवत, अर्धवट झोपेत जनकल्याणाचे ठराव ऐकणारी ही मेंबरं टाण उडाली आन पळता भुई थोडी झाली. कुणी येकदम खुर्चीवरच चढून मांडी घालून बसलं, तर कुणी ,"आं? काय झालं? हायकमांडनं निरीक्षकं पाठवली व्हय? मायला ह्ये हाय कमांड म्हंजे कमांड हाय आन आमची हाय हाय!" असं कायबाय बोलत इकडंतिकडं भेदरून पाहत होती. हितं छग्गूदादा थैमान घालतेला. "हे काय सरकार हाय का गवरमेंट? लोकांची कामं करत न्हाई समजू शकतो मी. तुमचा हक्कच हाये तो. आपन सोता तो हक्क बजावलेला हाये. रोज कोन ना कोन तरी येऊन माझं पन डोकं खातो. परतेक वेळेला मी सांगतो आरे मी सार्वजनिक बांधकाम मंत्री हाये. सार्वजनिक हे बांधकामाचं इशेषण झालं, माझं नाही. तवा काम न करणं मी समजू शकतो. आरे पन तुमी माजंपन काम करायला न्हाई म्हनता? या छग्गूदादाला? काम तुमच्याच फायद्याचं हाये. आन निवडणुकांच्या टायमाला आसली कामं न्हाई करायची तर कवा करायची?" छग्गूदादा फुटाण्यावाणी फुटत होता. मराठा समाजाला आरक्षण डिक्लेर झालं आणि आरक्षणाच्या कुरणात चरणारं जित्राप येकदम भानावर आलं. आयला आता ह्ये पन इथं चरणार व्ह्य रं? मंग आमचं काय होयाचं हो? आमची मतं इचारायला कोन येतंय का न्हाय आता? आशी चर्चा सुरु झाली आन छग्गूदादाच्या डोक्यात येकदम टयूबलाईट पेटली. ह्योच टाईम हाये. आणि इतकी वर्षं हृदयात जपून ठेवलेला इषय उफाळून आला. विद्यापीठाचा आन छग्गूदादाचा संबंद फक्त नावापुरता. म्हंजे खरंच नावापुरता. दिसलं विद्यापीठ की बदल नाव हा सगळ्याच टोपीकुमारांचा छंद. छग्गूदादाच्या हाताला येकपण विद्यापीठ लागू देत नव्हते. शेवटी इद्यापीठ न्हाई तर न्हाई, निदान शाळांचं तरी नामांतर करावं का असा पन विचार त्याच्या मनात आला होता. नूमवि किंवा पार्ले टिळक या दोन नावांपर्यंत तो येऊन पोचला होता. तेवढ्यात येकदा आसंच पुण्यातून फिरताना पुणे विद्यापीठाचा बोर्ड दिसला. आन त्याला वाटलं आयला ह्ये विद्यापीठ राह्यलंच की. मग त्याला आशीपन शंका आली की मायला हे बदलूनच पुणे विद्यापीठ झालं नसंल ना? उगाच मागणी करायची आन लोकांनी म्हणायचं काय दर दोन वर्षांनी बदलता काय? झेपत नसेल तर इतकी पिऊ नये माणसानं. बरं, चौकशीसाठी आत जावं तर टेन्शन. ल्हानपणापासूनच शिक्षानाशी संबंधित काही आसलं की छग्गूदादाला टेन्शानच येयाचं. शिक्षान कमी आनि शिक्षा जास्त आसा प्रकार होता. त्यामुळंच शाळा कॉलेजांची नावं बदलण्यामागे एक आसुरी आनंदपन भेटत असावा. विद्यापीठाचं नाव बदलायचं आसेल तर आनंद डब्बलच. छग्गूदादाचा एक पाव्हणा विद्यापीठात शिपाई म्हणून लागला होता. छग्गूनंच लावला होता. मग पाव्हण्यानंच म्हाईती आणली, ऑल क्लिअर, आजून काही कुणी नाव बदलल्यालं न्हाई, तुमी खुशाल मागणी करा.

मग आता नाव न बदलल्यालं विद्यापीठ तर घावलं, पन नाव तरी कुणाचं देयाचं हा प्रश्न हुताच. आयला बामणांचं राजकारण बरं, काई बी क्येलं तरी मत दुसऱ्यालाच देत्यात. आपल्याकडं ओबीसी म्हटलं तरी त्यात बी लई पोटजाती. येका पोटजातीतल्या कुणाचं नाव सुचवावं तर बाकीच्या पन्नास पोटजाती निवडणुका आल्या म्हंजे आपल्या पोटावर पाय ठेवणार. पुरुषाचं नाव द्यावं तर बायकांनी म्हणावं आमी काय शिकत न्हाय व्हय? बाईचं नाव दिलं तर कुणी उघड विरोध करीत न्हाई. हां ह्येच बरं. नामांतराला कुणी विरोध केलाच तर त्यालाच जातीयवादी म्हटलं की मग कुनी काय म्हनत न्हाई. तसे काही शाने आसतातच. छग्गूदादानं नाव पन आसं निवडलं की विरोध करायचं कामच न्हाई. म्हाराष्ट्रात येक बरं हाये, शिवाजी म्हाराज, फुले, आंबेडकर आशी नावं घेतली की काय पण करायला मोकळीक. मग पर्वा सभेत छग्गूदादाला कुणी तरी प्रश्न इचारला, आरे पन कशाला नाव बदलायचं नाव? आता तुझ्या आईबापसानं प्रेमानं नाव छगन ठेवलं. आता लोकांनी काय पण आर्थ काढला तरी तेंनी नाव बदाललं का? न्हाई न्हवं? तुमी त्यांचे छगन आनि आमचे छग्गूदादाच राह्यला. नाव बदाललं म्हणून तुमची ही छपरी मिशी जानार न्हाई किंवा हानवटी मानेतून भायेर येनार न्हाई. मग आसं आसतांना नाव का बदलायचं हो? छग्गूदादा आपल्या गटाण्या डोळ्यांनी वटारून तेच्याकडं पहात राह्यला. परस्परच उचलला कुणीतरी त्याला आन सभा फुडं सुरु राहिली. लोक कायपण म्हणूदयात, छग्गूदादानं कुणाच्या बापाचं आईकलं न्हाई तर या लोकांचं कसकाय आईकील? मंग रीतसर मागणीच केली. इद्यापिठात अर्जी गेली. तिथं तर काय सगळीच सरकारी. कुणी तरी आर्ज दाखल करून घेतला. नावबदल या खात्याच्या फायलीत टाकून दिला. महिने वर्षं गेली. त्यावर रीतसर धूळ चढली. आन आता छग्गूदादाला त्याची आठवण झाल्यावर ती फाईल काढली गेली. विद्यापीठातले साहेब म्हणले, काय काढलं हो? इद्यार्थ्याचं नाव बदलायचं तर आधी पयले मयत नसल्याचा दाखला जोडा, रेशन कार्डाची झेरॉक्स जोडा. मग त्यांना कुणीतरी सांगितलं, अहो विद्यार्थ्याचं नाव नाही, आपल्या इद्द्यापीठाचंच बदलतायत. आणि त्यांच्या कानात हळूच छग्गूदादा कोन हायेत ते सांगितलं. आपलाच मानूस हाये हे बगून सायबांनी ठराव चर्चेला घेऊन पास करून टाकतो अशी हमी दिली. आन तसा पास पण करून टाकला.

छग्गूदादा आता तडतडत होते. "आणि येवढा सगळा जुगाड करून झाल्यावर खुद्द मंत्रीमंडळात "हां, बघू, तुमच्या साहेबांशी बोलून निर्णय घेऊ" आसं म्हणणं म्हंजे… आमच्या सायबांनी आरक्षण डिक्लेर केलं तेव्हा आमाला विचारलं होतं का? लोकसभेत पक्षाचं धोतर फिटलं आन सायबांना काय करू आन काय नको आसं झालं. मंत्रीपदं काय दिली, उलटापालट काय केली. ते कमी पडल आसं वाटून आरक्षण काय दिलं. मालक सगळ्या जिमिनींचा मताविना भिकारी आशी अवस्था झाली त्यांची. तुमी तुमचं मतांचं आरक्षण बगणार आणि आमि बगायला गेलं की, चर्चा करतो, बगतो, सायबांचा मूड आसला तर विचारतो व्हय? आरं या सायबांचा मूड यायचे दिवस चाळीस वर्षांपूर्वीच संपले. आता ते फक्त सत्ता पाह्यली की मुडात येतात. मग कुणासंगंबी चालतो मूड. मग थितं दाढी काय आन साडी काय. आपन काय साधू संत न्हाई आसं सांगून झाल्यालंच हाये, आता साधूची लावलेली लंगोटीबी कदी सोडत्यात तेच बगतो. आता काय त्यांचं लाजायचं वय ऱ्हायलं न्हाई, लाजवायचं मात्र नक्की आलंय. पन मीबी काय कमी न्हाई. 'राडा' संस्कृतीत वाढलो आपन. आपल्याला नागव्याचं भ्या वाटत न्हाई. तुमी लंगोटी सोडलीत तर आपनपन सोडू. बगु कोन पैला बेशुद्ध पडतो ते. सगळं सोडून देऊ पन विद्यापीठाचं नाव बदलूनच दाखवतो. थांबा! जाता कुठे!" छग्गूदादाला वाटलं आपन सगळं सोडून द्यायची धमकी दिल्यावर तरी मेंबरं ताळ्यावर येतील. पन कुठलं काय. मंत्रीमंडळातली खोंडं ती. लाजत्यात काय ती. शिन्मा चालल्यागत बसून या बाबाचा तमाशा बगत होती. मग छग्गूदादा भडाकला आन म्हनला,"मायला, आत्ताच्या आत्ता नाव बदला, न्हाय तर मी भायेरच जातो. येकदा गेलो तर परत येनार न्हाई बरका. इचारा त्या शिवाजीवाल्यांना. येकदा तेंची धरलेली सुरवार सोडली ती आजवर. आजवर फक्त सायबांच्या प्यांटचा पट्टा धरून ऱ्हायलो. पन आता तेंनीच प्यांट सोडून दिली आन मी नुसता पट्ट्याचं बक्कल घिऊन हुबा हाये. तेवा ते कवाबी सोडून देईन. इचार करा!" कुणी कायच बोललं न्हाई तवा मात्र छग्गूदादा बैठकीतून तडक भायेरच पडला. दोन मिण्ट सगळी शांत बसली आन लगेच फुडच्या ठरावावर बोलू लागली.

नंतर आसं कळलं की छग्गूदादा तरातरा जे भायेर पडले ते रस्त्यावर आल्यावर तेंच्या ध्यानात आलं की आपन सायबांच्या गाडीतून आलो होतो. सायेब तर केवाच निघून गेले. सायेब बरोबर म्हणून पाकीट पन आनलं न्हाई. तेवढ्यात आमचे रामदासजी सायकल घिऊन आले. ते म्हनले, लिफ्ट देऊन नंतर मदेच सोडून देयाचा आणभव कसा आसतो आपल्याला चांगलं म्हाईती हाये. म्हनून आता शेकंडहँड सायकल घेतली आहे. कदीमदी पंमचर होते पन दुसऱ्यावर अवलंबून तरी ऱ्हावं न्हाई लागत. बसा मागं. डब्बलशिट जाऊ.