Friday, April 4, 2014

फॉरेन रिटर्न देशभक्ती

एकदम खरीखुरी गोष्ट. आमचा परांजप्या त्यावेळी तरुण होता. अभ्यासू होता. वर्गात पुढच्या बाकावर बसायचं धाडस करणारा होता. रोज गृहपाठ करणारा होता. परीक्षेच्या आधी महिना महिना तयारी करणारा होता. आम्ही बाकीची "२१ अपेक्षित" वाली जनता त्याच्याकडे आदराने पहायचो. आम्ही "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" पंथाचे, परांजप्या "हा माझा मार्ग एकला" पंथाचा. दिवसभर उंडारून आमचा दिवस "जय जय राम कृष्ण हारी" टाईप संपायचा. तर परांजप्या "थकलो, दमलो, परि चालणे मला" या आवेशात नाईट मारायचा. ऐन नववीत त्याला छान चष्मापण लागलेला होता. मुलींकडे नजर वरकरून पण पहायचा नाही, पण एखाद्या मुलीने त्याची वही मागितली तर लगेच द्यायचा. अशा वेळी त्याच्या चष्म्यावर वाफ आलेली दिसायची, हात थरथरायचा. लेकाचा आम्ही मागितली तर द्यायचा नाही. परांजप्याचे नातेवाईक मुंबईला होते. ते कधी कधी ह्याच्यासाठी पाठ्यक्रमाबाहेरची पुस्तके घेऊन यायचे. अशा वेळी हा ते पुस्तक घरी दडवून गुपचूप अभ्यास करायचा. आम्ही मोठ्या भावंडांनी वापरलेली, कव्हर नसलेली, झाशीच्या राणीला मिशा काढलेली, चहाचे डाग पडलेली, अशी परंपरागत वा पिढीजात वारसाहक्काने मिळालेली पुस्तकं वापरायचो. परांजप्या चौथी आणि सातवी अशा दोन्ही स्कॉलरशिपच्या परीक्षा पास झाला. आम्ही ठेविले अनंते तैसेची राहावे म्हणून अभ्यास केलेले, पण मागची जनता वर्गात येणार म्हणून मास्तरांनी पुढच्या वर्गात ढकललेले.

पुढे आम्ही दोघे तिघे उनाडपंथी इंजिनियरिंगला गेलो. परांजप्या पण गेला. आम्हालापण इंजिनियरिंगला प्रवेश मिळाला याचा परांजप्याला मोठा विषाद वाटला होता. म्हणायचा लेको, इथं आलात खरं पण चार वर्षांची नैया पार करायची आहे. आता परांजप्या पेटून अभ्यास करायचा. आम्ही ऑप्शनची चर्चा करत असताना हा छद्मी हसायचा. वादविवादात भाग घ्यायचा, आणि सद्यस्थितीवर कडाडून टीका करायचा. आपल्या देशाचं काही होणार नाही, ही लाचखोरी, आरक्षण, जातीय राजकारण हे असंच चालू राहणार. आपल्याला शिस्त नाही, आपण असेच गलिच्छ राहणार, असेच रस्त्यावर थुंकणार. गुंड असेच माजणार, दिवसा ढवळ्या खून पाडणार, पोलिस पैसे घेऊन त्यांना सोडणार. राजकारणी असेच घोटाळे करणार, आपण त्यांना असेच निवडून देणार. संसदेवर असेच हल्ले होणार, सरकार त्यांच्याशी चर्चा करणार. भगवे उतणार, हिरवे माजणार, निळे भडकणार पण आम्ही असेच जगणार. माजलेले नवश्रीमंत असेच बेदरकार गाड्या चालवणार, असेच अपघात होणार, बघायला जमलेले कोण पोलिसांच्या भानगडीत पडणार म्हणून पंचनाम्याच्या वेळी गायब होणार. असं खूप काही तिडिकेने बोलत राहायचा. पण निवडणुकीच्या वेळी वर्गाचं प्रतिनिधित्व कर म्हणून सांगितलं तर म्हणायचा नाही रे बुवा, असली रिकामटेकडी कामं करायला वेळ नाही मला. आम्ही काही जण पुढे अभाविपचं काम करू लागलो तेव्हा हसायचा, म्हणायचा छान, वाहा राष्ट्रप्रेमाचे ओझे, भाजा लष्कराच्या भाकऱ्या. इथे सबमिशन आलंय तोंडावर आणि तुम्ही राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या गप्पा करताय. म्हणायचा बाबांनो तुम्ही करा हे सगळं, पण भारतात भविष्य नाही. तुम्ही कितीही केलंत तरी काही बदलणार नाही. असं काहीबाही बोलायचा. मग तू काय करणार अस विचारलं तर म्हणायचा, मलाही शिवाजी जन्माला यावा असं वाटतं पण माझ्या घरात नको, शेजारी खुशाल येवो.

पुढे परांजप्या थेट फॉरेनला गेल्याचं कळलं. अधूनमधून वार्षिक भेटीवर भारतात आला की भेटायचा. हातात बिसलेरीची बाटली असायची. केस थोडेसे विरळ, मागे हटलेले. चष्मा तर होताच पूर्वी, पण आता सोनेरी काड्यांचा झालेला. सुखवस्तूपण दिसायचं. पण परिस्थितीवर पूर्वीसारखा टीका करायचा नाही. आपुलकीनं बोलायचा. ज्या मित्रांशी त्याचं जमायचं नाही त्यांचीही चौकशी करायचा. नजर जुन्या खुणा, इमारती, रस्ते शोधत असायची. आमची हॉस्टेलची बिल्डिंग पाडून नवी केल्याचं पाहून खूप हळहळला, म्हणाला किती आठवणी होत्या रे. भिडे मास्तरांची मिसळ खायला गेल्यावर जुनी इमारत जाऊन तिथे बहुमजली इमारत झालेली पाहून खट्टू झाला होता. हे सगळं असलं तरी भारतात झालेले काही बदल चांगले आहेत म्हणायचा. राष्ट्रीय महामार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, विमानतळ पाहून आनंदित व्हायचा. राजकारणावर चर्चा करायचा. पूर्वी राजकारण्यांवर घसरणारा तो, आता चौकाचौकात अण्णा, दादा आणि तात्यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छांचे स्वत:च लावलेले निर्लज्ज फलक पाहून मनमुराद हसायचा. म्हणायचा, जबरी! होऊ द्या खर्च! त्याला एक प्रकारे भारतातील अनिष्ट गोष्टींपासून अलिप्त आणि दूर राहण्याचा वर मिळाल्यासारखा होता. पण म्हणायचा, ही आबा, दादा, तात्या असली घाण भारतातून नष्ट झाली पाहिजे. अण्णा हजाऱ्यांना पाठिंबा द्यायचा. पुन्हा एक वर्षासाठी दिसेनासा व्हायचा.

आता परांजप्या परत पेटून उठला आहे. त्याला हवा तसा शिवाजी शेजारच्या घरात जन्माला आला आहे. परांजप्या सढळ हाताने शिवाजीला मदत करतो आहे. एवढेच नव्हे तर शिवाजीचा परमभक्त असा मावळा पण बनला आहे. फक्त इंग्रजी येणाऱ्या आपल्या मुलांना "शिवाजी अँड हिज मावळेज" असं इंग्रजीत लिहून समजावतो आहे. ती मुले "शिवाजी अँड हिज मवालीज" असे वाचत आहेत. फक्त ही मावळेगिरी ऑनलाईन चालू आहे. कधी फेसबुकवरून चेवाचेवाने पाठिंबा व्यक्त करून तर कधी डॉलर पाठवून. इकडे शिवाजीही या व्हर्चुअल मावळ्यांच्या मदतीने आता आणतोच स्वराज्य असे म्हणू लागला आहे. फरक इतकाच आहे की इथे रायबाचं लगीन केव्हाच लागलं आहे, तानाजी काडीने कान कोरत कोरत, "म्हाराज, तुमी व्हा फुडं, हा म्या आलूच बगा." असं म्हणून म्हाराजांनाच कोंडाण्यावर चढाईसाठी पाठवतो आहे. म्हाराज जर हरलेच तर हा डॉलरचा दोर लगेच कापला जाणार आहे. परांजप्या पुन्हा आपले पूर्वीचे जीवन चालू ठेवणार आहे, वर्षाकाठी एखादी चक्कर "इंडिया"त मारणार आहे.

परंतु हल्लीच काही असेच मावळे, सर्व सोडून या प्रतिशिवाजीच्या फौजेत प्रत्यक्ष दाखल झाल्याचे कळते. आमच्या गावचा गोंद्या टेलरही दहा वर्सं मुंबईत काढून आला. तिथं म्हणे मोठ्या मोठ्या सायबांचे सूट शिवत असे. सुट्टीला गावात आला की रुबाबात हिंडायचा. तंग विजार घालायचा, खिशातला कंगवा काढून भांग पाडायचा. पुढं गावात बदल झाले, रस्ते झाले, त्यावर विजेचे दिवे आले. गोंद्याला वाटलं, गावाकल्डी मान्सं लई सुधारली. मुम्बैचा गाशा गुंडाळला आन आला गावात. है! निस्ता गाजावाजा करून दुकान टाकलं. दुकानाला नाव दिलं "टेक्सास टेलर्स"! खाली रुबाबात लिहिलं होतं "प्रोप्रा. गोविंद, बॉम्बे रिटर्न" ! ते वाचून चार दिवस गावातली मान्सं लई खिदळली आणि नंतर आपापल्या उद्योगात गढून गेली. चालू रोजी गोंद्या पायजमे आणि बंडी पेशालिस्ट झाला आहे. संध्याकाळी दुकानाच्या फळीवर चार माणसं जमवून मुम्बैच्या गमती सांगत बसतो. गावगाडा तसाच चालू आहे.
 

No comments:

Post a Comment