Saturday, April 26, 2014

लग्नाचे रसायनशास्त्र

लग्नाला जवळ जवळ दोन तपे उलटली. लग्न हवंच कशाला, ही सगळी मानवकृत ढोंगी नैतिक बंधने आहेत वगैरे तरुणाईतील बंडखोर विचार केव्हाच मागे पडले. त्यावेळी ढोंगी वाटणारं बंधन कधी घालून घेतलं ते कळलं नाही. मुहूर्तावर लागलेले लग्न ही एक घटना असली तरी ती एक दीर्घ अशी भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया आहे असं वाटतं. श्रेष्ठ, वडील लोकांच्या साक्षीनं एका विशिष्ट मुहूर्तावर चालू झालेली. प्रक्रियेत अनुभूत असलेल्या दोन्ही पदार्थांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार आणि भवतालच्या परिस्थितीनुसार ही प्रक्रिया घडत जाते. सुरुवातीच्या काळात दोन्ही पदार्थ एकमेकातील भिन्न गुणधर्म पाहून आकर्षित होतात. दोन्ही पदार्थांची संयुजा अस्थिर असल्याने एकमेकांना स्वत:कडे असलेले विद्युतपरमाणु खुशीने देतात. कालांतराने दोघांची संयुजा स्थिर होते. मग रंग, रूप, चव इत्यादि बाह्य गुणधर्म यांचा तक्ता भरला जातो.

आता ज्ञानजिज्ञासा अंतर्गुणांकडे वळते. मग मोरचूदाची (कॉपर सल्फेट) पांढरी पूड पाणी घातल्यावर निळी होते अशा प्रकारच्या प्रक्रियांची ओळख होऊ लागते. कोणत्या विशिष्ट तापमानाला पदार्थ नेल्यास त्याचा रंग बदलतो अथवा अमुक अमुक रसायनाशी संपर्क आल्यास तत्काळ पेट घेतो हे ध्यानी येऊ लागते. काही फ़ॉस्फरस पेण्टॉक्साईड सारखे पदार्थ तर नुसत्या हवेच्या वा पाण्याच्या संपर्कात आले तरी पेटणारे असतात. त्यांना दुसऱ्या पदार्थाच्या असण्याचीपण गरज लागत नाही. अशा वेळी त्यांना सदैव रॉकेलमध्ये बुडवून ठेवण्यासारखे उपाय करून शांतता/स्थिरता प्राप्त करावी लागते. काही वेळा प्रक्रियेतील एक पदार्थ अरगॉन वायुसारखा रंगहीन, वासहीन आणि चवहीन असतो, राग, लोभ, मत्सर, प्रेम, द्वेष इत्यादि तमोगुणांपासून मुक्त असतो. कोणतीही प्रक्रिया घडूच शकत नाही मग. असे पदार्थ अगदी सल्फ्युरिक आम्लासोबतही आरामात राहू शकतात. थोड्याफार यशस्वी लग्नांपैकी हा एक प्रकार. काही पदार्थ स्वत:हून कोणतीही प्रक्रिया करण्यास उत्सुक नसतात. मग अशा प्रक्रियांना धक्कास्टार्ट करण्यासाठी मध्यस्थ (कॅटालिस्ट) लागतात. काही वेळा उष्माक्षेपी (एग्झोथर्मिक) प्रक्रियेत स्फोट होतो, उर्जा उत्सर्जित होते, आजुबाजूच्या परिसराची मोडतोड होते. अशा वेळी दुसऱ्याने सुरक्षित स्थळी आसरा घेऊन काही काळानंतरच तोंड बाहेर काढावे हे उत्तम नाही तर तीच प्रक्रिया पुन्हा व्हायची शक्यता असते. तर काही वेळा प्रक्रिया उष्माशोषी (एण्डोथर्मिक) असते. अबोला धरणे, माहेरी निघून जाणे, अश्रू ढाळणे ही त्याची काही उदाहरणे होत. उष्माशोषी प्रक्रियेवर योग्य वेळात नियंत्रण न केल्यास त्याचे उष्माक्षेपी प्रक्रियेत रूपांतर होण्याची शक्यता वाढते. अत्यंत अनुभवी शास्त्रज्ञच असे प्रयोग करू शकतात. तुम्ही आम्ही करू नयेत हा इशारा. काही वेळा पदार्थ नैसर्गिकपणे प्रतिकर्षित करणारे असतात. अशा पदार्थांत काही प्रक्रिया होऊ न देणे सयुक्तिक ठरते.

अनेक वर्षे या प्रक्रिया चालू राहतात. त्यातून तग धरलेले पदार्थ आता स्थिर झालेले असतात. स्फोट घडून गेलेले असतात, ज्वलन झालेले असते, द्रवीकरण झालेले असते, स्फटिकीकरण झालेले असते. एकमेकांच्या समग्र गुणधर्मांची माहिती झालेली असते. एक संपृक्त द्रावण तयार झालेले असते. ओलाव्याने आलेली निळाई असते. नियंत्रित केलेल्या ज्वलनाने आलेली ऊब असते. एकमेकांचे उकळते बिंदू माहीत झालेले असल्याने तपमान शीतल झालेले असते. अशा वेळी आपल्याकडे जे गुणधर्म नाहीत ते आपल्या जोडीदाराकडे आहेत हे लक्षात येते आणि त्याचा अभ्यास आपण आधी का केला नाही असे वाटते. संघर्ष, विरोध यातून सर्व गुणदोषांची भेट घडल्याशिवाय चांगले गुण दिसत नाहीत. ते आता दिसू लागतात. आणि हाच क्षण असतो पुन:श्च हरि ओम म्हणायचा. नव्याने आपल्या जोडीदाराकडे पहायचा, त्याच्या गुणांकडे पाहण्याचा, दोषांकडे दुर्लक्ष करण्याचा. शेवटी रसायन तयार व्हायला दोन्ही पदार्थ त्यांच्या गुणदोषांसकट आवश्यक असतात. नुसते रसायन नको तर स्थिर, संपृक्त, समृद्ध पण हवे! इत्यलम.

 

No comments:

Post a Comment