Wednesday, April 30, 2014

ईश्वराचे अस्तित्व

परमेश्वराचे अस्तित्व हा विषय इतका आदिम आहे की तो फारसा कुणी मनावर घेत नाही. परंतु मोठी मोठी माणसे देव, परमेश्वर यांच्याबद्दल बोलू लागतात तेव्हा त्याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. ते बरेच आहे म्हणा. त्यानिमित्ताने थोडासा विचार करता येतो. मध्यंतरी उत्क्रांतीवादी बिल नाय आणि निर्मिती/निर्माणकर्तावादी  केन हँम यांचा वादविवाद प्रसारित झाला होता. एक प्रखर शास्त्रज्ञ आणि दुसरा पराकोटीचा बायबलवादी. एक निरीक्षणाने सिद्ध झाल्याशिवाय काहीही न स्वीकारणारा तर दुसरा डोळे झाकून प्राचीन लिखाणावर विश्वास ठेवणारा. उत्क्रांती झाली हे निर्विवाद सत्य आहे. पुरावे, निरीक्षणे यांनी ते सिद्ध होते. ज्या नियमाच्या अनुसार एखाद्या निरीक्षणात न आलेल्या गोष्टीचे भाकीत करता येते आणि त्यानंतर प्रत्यक्ष निरीक्षणाने ते सिद्ध करता येते असे नियम म्हणजे विज्ञान. डार्विनने फूटभर निमुळत्या दांड्याचे एक फूल पाहिले. त्या दांड्याच्या तळाशी मध होता. त्याने असे भाकीत केले की ज्याला हा मध सहज काढता येऊ शकेल असा अत्यंत लांब तोंडाचा एखादा प्राणी या परिसरामध्ये अस्तित्वात असलाच पाहिजे. आणि पुढे  काही वर्षांनी खरोखरच एक फुटभर लांब शोषनळी असलेला पतंग त्या परिसरात आढळला.

जीव किंवा जीवसंस्था यांची जी काही उत्क्रांती झाली त्याचे एक सरळ साधे सूत्र होते. हे जे काही आहे ते टिकाऊ आहे का? भवतालच्या परिस्थितीत, पर्यावरणात, इतर जीवांच्या सान्निध्यात टिकू शकते का? टिकणे याचीसुद्धा एक सरळ व्याख्या करता येईल - अस्तित्व आणि गुणाकार. या दोन मूलभूत गोष्टींसाठी गुणसूत्रांत छोटे छोटे बदल करून एकाच जातीचे पण थोडेसे वेगळे दिसणारे, अथवा किंचित वेगळा गुणधर्म असलेल्या प्रजाती निर्माण झाल्या. म्हणजे ही प्रक्रियासुद्धा निरुद्धेशी (मुद्धाम एखादा उद्देश नसलेली). मग त्यातील एखादी प्रजाती टिकाव धरते, बाकीच्या आपोपाप नाश पावतात. थोडक्यात गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली असेच या प्रक्रियेचे वर्णन करता येईल. चला, विज्ञानाने नियम तर शोधून काढला. अश्म सापडले आहेत, त्यांचे कार्बन डेटिंग करून काल निश्चिती झाली आहे. ठीक आहे. सर्व पुरावे उपलब्ध आहेत.  उत्क्रांती झाली, त्यातून सर्व प्राणिमात्र जन्माला आले. इथपर्यंत विज्ञानाबरोबर राहता येते. पण या निरुद्धेशातही एक अर्थ असणारा उद्देश दिसतो. मुळात गुणसूत्रात बदल व्हायला काय कारणीभूत ठरले? प्राणिमात्राची जगण्याची आस, वंश सुरु राहावा यासाठीची धडपड, याची प्रेरणा कुठून आली? विज्ञानाने जीवाची व्याख्या जरूर केली, पण प्राण म्हणजे काय? मुळात पृथ्वीवर आदिमकाळात प्रथम जे सेंद्रिय द्रावण (ऑर्गानिक सूप) होते त्यात अशी कोणती ठिणगी पडली ज्याने त्यात पहिला प्राण "ओतला"? पृथ्वी ही पूर्ण लोखंडाचा गोळा होती. त्यावर हे पुढील प्राणिमात्रांचे मूळ ठरलेले ऑर्गानिक सूप आले कुठून? विज्ञान कारण शोधते, तत्वज्ञान मूळ शोधते. दुर्दैवाने तत्वज्ञान आता धर्माशी निगडित झाले आहे. धर्माचे खरे उद्दिष्ट जर सत्यशोधन असेल तर विज्ञान आणि धर्म हे दोन्ही परस्परपूरक व्हायला हवेत. तत्वज्ञान म्हणजे थिअरीचे पुस्तक, तर विज्ञान म्हणजे ते पडताळून पाहण्याची प्रयोगशाळा.

आता एक नवीन विचारधारा येत आहे, की एखाद्या अशनीपाताने हे सेंद्रिय द्रव्य पृथ्वीवर आले असावे. या विश्वाच्या पसाऱ्यात पृथ्वीसारख्या धुळीच्या कणाला नेम करून अशा सगळ्या घटना घडणे जरा कठीण आहे. मग अशा घटना विश्वात सामान्यपणे सर्वत्र होत असल्या पाहिजेत. म्हणजे धूमकेतू, अशनी ही अशा जीवपोषक द्रव्यांची वाहतूक करणारी साधने, त्यांची ऑर्बिट्स ग्रहांप्रमाणे सर्वसामान्य नसतात पण अतिस्वैरपण नसतात. थोडक्यात ते ग्रहमंडळातून का होईना स्वैरपणे संचार करायला मुक्त असतात. पृथ्वीसारखे ऊर्जास्त्रोतापासून सुरक्षित योग्य अंतरावर असलेले लाखो ग्रह नुसत्या आपल्या आकाशगंगेत आहेत. मग ही सगळी व्यवस्था अशी अनिश्चित तत्वावर चालली असेल? केवळ पृथ्वीवर अशी कृपा होत असेल असे धरून चालणार नाही. शक्याशक्यतेचा विचार केला तर अशी सर्व रचना सर्वत्र कार्य करीत असण्याचीच शक्यता जास्त आहे. जर असे असेल तर मग पुन्हा मोठा प्रश्न उभा राहतोच. का? या "का"चे उत्तर विज्ञान देत नाही. विस्कळीतपणात एकसूत्रता कोण आणतो आहे? मुळात आपण ज्याला "शास्त्रीय नियम" म्हणतो त्यांचे नुसते "असणे", त्यांचे अस्तित्वच काहीतरी सुसूत्रता आहे याचा पुरावा नाही काय? केपलरने सूर्याभोवती एक भ्रमण पूर्ण होण्याचा काल आणि ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर यांच्यातील गणित शोधून काढले. हे गणित सर्व ज्ञात विश्वालातरी लागू होते. पण मुळात हे सूत्र कोणी "रचले"?

इथे सर्व ठिकाणी मी "कोणी" किंवा मनुष्यरूप दर्शवणारा शब्दप्रयोग करतो आहे कारण मला दुसरे काही माहीत नाही. आपल्या कुणालाच माहीत नाही. आपले सर्व ज्ञान हे पृथ्वी आणि फारतर दृश्य अशा अवकाशापुरते मर्यादित आहे. अनेक गोष्टी केवळ आपल्या आकलनापलीकडे असतील नव्हे, असणारच. कार्ल सागानने आपली आकलनशक्ती कशी मर्यादित असू शकते त्याचे एक उत्तम उदाहरण दिले आहे. तो म्हणतो समजा विश्वात कुठेतरी एखादी द्विमितीमध्ये मर्यादित असलेले जीवमात्र आहेत. त्यांच्या जगात फक्त एक्स आणि वाय अशा दोनच मित्या आहेत. त्यांचे फिरणे, जगणे, वस्तू सर्व दोन मित्यांत सामावलेले आहे. त्यांचे जग त्रिमितीत सामावलेले जरी असले तरी त्यांना त्रिमितीची जाणीव नाही आणि ती होऊ शकेल अशी त्यांची रचनाही नाही. तर अशा जगामध्ये समजा एखादे यान "तिसऱ्या" मितीतून उतरले, तर त्यांना त्याचे पूर्ण आकलन होणे शक्यच नाही. किंम्बहुना ते यान उतरतानासुद्धा त्यांना दिसणार नाही. अचानक एक रेघ त्यांच्या जगात "अवतीर्ण" होईल. आपण कितीही प्रयत्न केला तरी त्यांना पूर्ण आकलन होऊच शकत नाही. हीच संकल्पना पुढे नेल्यास आपण त्रिमितिवालेसुद्धा किती मर्यादित असू शकतो याची कल्पना येते. परंतु आपल्याला सर्व कळू शकत नाही याची जाणीव होणे हेसुद्धा मोठे ज्ञानच म्हणावे लागेल.

असे जरी असले तरी मनुष्यप्राण्याला "गूढ, अनाकलनीय" या शब्दांची भीती आहे. अनाकलनीय म्हणजे भौतिक स्वरूपाने अथवा कार्यकारण स्वरूपाने ज्याचे आकलन होत नाही असे काही तरी. याचा दुसरा अर्थ "धोका, पर्यायाने मृत्यू", किंवा "अन्न, पर्यायाने जीवन" हे ठरवता येत नाही असे काही तरी. असे काही अनाकलनीय असणे आपल्याला अस्वस्थ करते. आपण आपल्या मर्यादित बुद्धीनुसार त्याचा अर्थ लावत राहतो. मग तो जेव्हा लागत नाही तेव्हा ते अनाकलनीय हे "अमानवी" होऊन जाते. हे जगड्व्याळ यंत्र नियमानुसार चालवणारे,  मानवी ताकदीच्या पलीकडील घटना घडवण्याची क्षमता असलेले असे ते "गूढ अनाकलनीय" मग ईश्वर बनून जाते.


 

Tuesday, April 29, 2014

कपालभांति आणि कपालआंठी

परमार्थाचा अत्युच्च बिंदू म्हणजे संपूर्ण ज्ञान, मोक्षप्राप्ती हा होय. परमार्थमार्गावर चालणाऱ्याला साधक असे म्हणतात. साधनेचे अनेक मार्ग आहेत. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे आणि इच्छेनुसार साधक मार्ग निवडत असतो. कर्म, भक्ति, ज्ञान आणि योग असे साधनेचे काही मार्ग आहेत. योगाभ्यासाने मोक्ष मिळतो असे म्हणतात. शरीराला अनेक ठिकाणी गाठी मारून त्या परत सोडवण्याने संपूर्ण ज्ञान कसे प्राप्त होते याचे ज्ञान आम्हाला नाही. परंतु कुणाचा तळिराम कसा गार होईल ते सांगता येत नाही. काही लोकांना आत्मक्लेशाची आवडच असते. मागे एकदा पर्वतीवर काही पेन्शनरांना सक्काळी सक्काळी व्याघ्रासनात आणि त्यानंतर जीभ बाहेर काढून भीषण नाद करीत सिंहासन करताना जेव्हा पाहिले तेव्हा आम्हाला अचानक दीर्घहास्यासनावस्था प्राप्त झाली होती. आमच्या त्या आसनाच्या आवाजाने त्या वृद्ध केसरींच्या क्रुद्ध माना आमच्या दिशेने वळल्या होत्या. यातीलच काही शुभ्रआयाळसिंह नंतर हॉटेल विश्वमध्ये उप्पीट खाताना आपापल्या सुनांच्या तक्रारी एकमेकांकडे करताना आढळले होते. त्यावरून व्याघ्र अथवा सिंहासनाने पूर्ण मोक्ष जरी मिळत नसला तरी निदान भूक तरी चांगली लागत असावी अशा निष्कर्षाप्रत आम्ही येऊन पोचलो होतो.

परमार्थप्राप्तीसाठी योग्य मार्ग हवा. योग्य मार्ग दाखवण्यासाठी मग गुरु हवा. गुरूच्या अनुग्रहाशिवाय काही प्राप्त होणार नाही असे गुरूंनीच सांगून ठेवले आहे. मग असा गुरु शोधत होतो. आपल्या राष्ट्रीय क्षितिजावर अनेक दिव्य तारे आहेत. त्यात सध्या दोन तारे ठळकपणे चमकत आहेत. पपू रामदेवबाबा आणि दुसरे पुण्यश्लोक आमदेवबाबा. हे दोन्ही सत्पुरुष थोर देशभक्तसुद्धा आहेत. आम्ही त्यांचे एकेक चमत्कार पाहिले आणि कोण थोर हे ठरवणे आम्हाला कठीण जाऊ लागले. एकदा वाटावे रामदेवबाबाना शरण जावे, तेवढ्यात आमदेवबाबांनी हठयोगाचे असे काही प्रदर्शन घडवावे की वाटले कुंडलिनी जागृत करावी ती फक्त त्यांनीच. कधी वाटावे आमदेवबाबांच्या खराट्यास हृदयी धरोन उजवी तर्जनी डाव्या नाकपुडीवर ठेवून कुंभक करावे, तो रामदेवबाबांनी चतुर मधुर वचन करीत अवघा देश गदगदा हलवून सोडावा, आपला शत्रु करून सोडावा. दोघेही "प्रौढत्वी निज शैशवास" जपणारे पण शालेय विचार वेगळे (पक्षी:स्कूल ऑफ थॉट) असलेले. आम्ही एकूणच मग दोन्ही बाबांचे त्यांच्या सर्व बाबींसहित (पक्षी:बाबतीत) निरीक्षण केले. त्या निरीक्षणाचे काही ठळक मुद्दे आणि तक्ता पुढीलप्रमाणे -

रामदेवबाबा विचार करण्यासाठी कोणत्या शाळेत गेले याची कल्पना नाही, पण साधे मांडी घालून बस असे सांगितल्यावर बाबांनी शरीराचे जे काही कडबोळे केले असेल ते पाहून शाळेने तरी नक्कीच विचार केला असेल. श्वासउच्छ्वास नियंत्रित करून शक्य असेल तिथून तिथून तो उत्सर्जित करणे आणि त्यायोगे परमानंदप्राप्ति हा रामदेवबाबांचा जगप्रसिद्ध कपालभांति योग. रामदेवबाबांच्या पोटात काही म्हणजे काही राहत नाही. कपालभांति करताना पोटाची जी हालचाल होते तिने कुठलेही गुपितच कशाला, जो काही घनद्रववायु संचय असेल त्यालाही ठेवले जात नाही. त्याने सुपडा नेहमी साफ राहून चित्तवृत्ती अत्यंत तरल राहतात. बाबांची योगधारणा एवढी प्रभावी आहे की दिवसेंदिवस त्यांचे वय कमीच होत चालले आहे. त्यांची वक्तव्ये निरागस होत चालली आहेत. बाल्यत्व गमावलेल्या निबर माणसांना त्या वक्तव्यांमागील भाबडा मूलस्वभाव कळत नाही. एखाद्या मुग्ध बालकाप्रमाणे बाबांचा हसरा आनंदी चेहरा येणेप्रमाणे आमच्यासमोर टीव्हीवर आला की उल्हसित वाटते. आम्ही भेटावयास गेलो तर आम्हांस पाहून बाबा पायाची निरगाठ सोडत एकदम टुणकन उठून उभे राहिले आणि प्रणाम करत म्हणाले,"संघ! विकीर!" आणि स्वत: खी खी करत पळूनच गेले. नंतर आले आणि म्हणाले "मला जर अग्रेसर करणार असशील तरच येईन मी शाखेत."  मी त्यांच्या या लोभस लीला पाहत राहिलो.

याउलट आमदेवबाबांना सदैव चिंता लागून राहिलेली असते. त्यांच्या नुसत्या दर्शनमात्रे नाक गच्च होते, पाय बहिष्कार टाकून धरणे धरतात, आजूबाजूची सर्व माणसे भ्रष्टाचारी वाटून आपण अंतर्बाह्य स्वच्छ झालो असे वाटू लागते. हा मार्ग आम्हांस बरा वाटतो. शिवाय शवासन हे एकच आसन आम्हांस जमते. आमदेवबाबांनी धरणीवर अंग टाकून केलेल्या शवासनाने भल्याभल्यांची झोप उडते. मोठे मोठे राष्ट्रीय प्रश्न बाबांनी नुसत्या शवासनाने सोडवले आहेत. आम्हाला हे बाबा जास्त जवळचे वाटले. अनेक सिद्धपुरुषांप्रमाणे कधी कोप होऊन बाबा आपल्या हातातील खराटा फेकून मारतील त्याची शाश्वती नसते. अर्थात त्यांच्या चरणी अमृतांजनाचा प्रसाद अर्पण करणारे भक्त अशा झाडूघाताला प्रसाद मानतात. बाबावाक्यं प्रमाणं असल्यामुळे किंवा "चाय से जादा किटली गरम" या न्यायाने म्हणा  असे भक्त साखळी तोडून बाबावाक्यं नप्रमाणं म्हणणाऱ्या नास्तिकाच्या मागे लागतात. विशेषत: काळी टोपी आणि अर्धी चड्डी असा वेष केला असल्यास धोका दुपटीने वाढतो असा अनुभव आहे. आमदेवबाबा आम्हास जवळचे वाटले म्हणून त्यांच्या जवळ गेलो तर आमची अर्धी चड्डी आणि खोचलेला पांढरा सदरा पाहून बाबा संतापले. त्यांनी तात्काळ धरणीवर पडून आत्मक्लेश सुरु केला. त्यांचे शिष्य चवताळून आमच्या दिशेने येऊ लागले. आश्रमात दंड काय करायचाय म्हणून सोबत आणला नव्हता. उगाच बेंबीत इंजेक्शने घ्यावी लागतील या भीतीने आम्ही तिथून सटकलो. काही म्हणा, पळताना अर्धी चड्डी फार सोयीची पडते. आता नागरिकांनी आश्रमाच्या बाहेर स्वखर्चाने "बाबा (सध्या) शांत आहेत, पण भक्तांपासून सावध राहा, आपले धोतर चड्डी सांभाळा" अशी पाटी लावली आहे.

"आमदेवबाबा की रामदेवबाबा" निरीक्षण निर्णयतक्ता:
विषय रामदेवबाबा आमदेवबाबा
१.वेषभूषा सर्व अवयवांस मोकळीक देणारे आखूड धोतर, दाढी, आंघोळ वगैरेची कोणतीही अट नाही  मफलर, टोपी, खराटा, अमृतांजन (व्हिक्स चालेल), आंघोळीची सक्ती नाही पण दाढी कोणत्याही सबबीवर चालणार नाही 
२.आवश्यक सामग्री धोतर, बसण्यासाठी सतरंजी मोबाईल, डाटा आणि फेसबुक अकाउण्ट अनिवार्य
३.मुख्य आसन कपालभांति कपालआंठी
४.घोषवाक्य आयुर्वृद्धी, पोटशुद्धी, विनोदबुद्धी यांतून देशभक्ती वायुवृद्धी, कफवृद्धी, तापवृद्धी, संतापवृद्धी यांतून भ्रष्टाचारमुक्ती
५.पुढील ५ वर्षातील उद्दिष्ट परदेशातील वाममार्गाने मिळवलेले धन देशात आणून रामकारणी लावणे परदेशातील काममार्गाने (पक्षी: कर्म, गैरसमज नसावा) मिळवलेले धन देशात आणून आमकारणी लावणे
६.पुढील १० वर्षातील उद्दिष्ट क्र.५ पाहावे.(शिवाय वर्षातून २०० शिबिरे असेही सांगण्यात आले) हा प्रश्न विचारल्यावर बाबांनी आम्हांस हाकलून लावले
७.मोक्षप्राप्ती ग्यारंटीड प्रथम वर्गणी भरा, मग पाहू असे आम्हांस सांगण्यात आले

अजूनही आम्ही निर्णय घेतलेला नाही. परंतु एक गोष्ट ध्यानी आली, रामदेवबाबांनी जर मौनव्रत घेऊन शवासन करण्यास सुरुवात केली तर त्यांचे शत्रु कमी होतील आणि आमदेवबाबांनी जर कपालभांति करण्यास सुरुवात केली तर त्यांचा कोठा साफ राहून चित्तवृत्ती आनंदी राहील. पण शेवटी "जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात" असे ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवले आहे. त्याचा "ज्या प्राण्याला जिथे जायचे असेल तिकडे जाऊदे" असा आम्ही शाळेत असताना काढलेला अर्थच बरा वाटतो.
 

Sunday, April 27, 2014

चहाच्या पेल्यातील त्सुनामी

इतके दिवस आम्ही चहाच्या पेल्यात वादळ होऊ शकते एवढ्याच समजुतीवर होतो. एकदा नुसते "चहा जरा फिक्कट झाला आहे" असे म्हणालो होतो तर त्यानंतर झालेल्या वादळाने आमच्या हातातील कप उडवून थेट सिंकमध्ये नेऊन टाकला होता.  पण एका चहाच्या पेल्याने त्सुनामी आणली हे ऐकून काही क्षण स्तब्ध झालो. आमच्या हातातील चहाच्या कपाकडे निरखून पाहिले. एका ठिकाणी कपाचा टवका उडाला होता आणि आमचे लठ्ठ बोट कपाच्या कानात बसत नाही अशा काही आधी न लक्षात आलेल्या गोष्टींव्यतिरिक्त काही दिसले नाही. ही रोखून माझ्याकडे पाहत आहे हे लक्षात आल्यावर,"नाही, चहा उत्तम झाला आहे" असा घाईघाईने खुलासा करून वादळ टाळले. वास्तविक चहात साखर कमी होती. पण आम्ही शक्यतो संघर्ष टाळतो.

आमचे नेहेमीचे मित्रांबरोबर चहा घ्यायचे ठिकाण म्हणजे नर्मदेश्वर भुवन. नर्मदेचे आणि चहाचे हे काय नाते आहे कळत नाही. पण नर्मदेश्वर भुवनात चहा मात्र अमृततुल्यच असतो. इतकी वर्षे झाली पण तेथील चहाने तलफ भागवण्यापलीकडे काही चमत्कार घडवून आणले नव्हते. मग आम्हीच विचारले काय हो, तो त्सुनामी चहा मिळेल का? परेसभाईनी-मालकांनी उत्तरादाखल उकळलेल्या चहातील पावडर कळकट फडक्यात घालून पिळून उरलासुरला चहा काढून घेतला आणि म्हणाले,"ते सद्या फक्त तिकडे गुजरातमदी भेटते. आपला भाव हाय ने तिकडे तेचा चायपत्ती सप्लाय करेचा दुकान हाय. आपला वार्ता होते तेच्यासंगती फोनवर. ते म्हणते आजकाल नरेनभाईचा सुगरफ्री चाय लय फेमस हाय. मोटा मोटा बीजनेसवाला लोक पेयला येते तेच्याकडे. मोटा लोगान्ला सुगर असते, तेनला सुगरफ्री चाय लागते म्हणून नरेनभाईने स्पेशल दुकान काढला ने. एकदम जोरात चालते. जसा ज्याला पाहिजे तसा बनवून देते. तुला पन भेटेल. पन तू काय बीजनेसवाला नाय, तुला लायनमदी उभा राह्यला लागेल. आता भाई काय सोता चाय नाय बनवते. धापाच नोकर ठेवला ने त्याने. आपण गल्ल्यावर बसते केश घेयला. नरेनभाई आधी सोता त्या दुकानमदीच नोकर होता. पन लक बग, आता ओरीजीनल मालकला घरी बसवून दुकान ताब्यात घेतला भाईने. पैला मालक होते ना ते बीजनेसवाला लोगसाटी काय पेशल चाय करत नव्हते, ते नरेनभाय ने बराबर ओळखला. मी सोता दोन वर्सखाली आमचे गावमदी जाऊन आला. पैले गुजरातमदी एक ष्टाण्डर्ड बीजनेस मोडेल होता. मागे घर पुढे दुकान. आता गेला तर सगळा दुकानच दिसते चकाचक. चायचा भांडी, ष्टो, भिंतीवर जैकिशन भगवानचा पिक्चर, सगळा बहु सरस. पाह्यला तर भांड्यात चायच नाय. इचारला तर बोलले, ते फकत शो साटी ठेवला आहे. चाय घरून बनवून येते. घर कुटे म्हणून विचारला तर बोलते घर आता बेसमेंटमदी नेला. घर आनी गोडाऊन बेसमेंटमदे. वरचा सगळा कचरा होते ना ते बेसमेंटमदी ढकलला. वर तर चकाचक दिसते. गिऱ्हायक दुकान किती चकाचक हाये ते बगते, गोडाऊनमदे किती कचरा ते नाय बगत. आनी कचरा काढायला कोनाला टायम हाये. भाईला दाढी करालापन टायम नाय भेटत. आपल्यासाटीपन चा आला. आपला भाव नरेनभायला सप्लाय करते ने, बीजनेस रिलेशन असते. चाय  एकदम कडक, दूध कमी घालते. दिसायला मग भगवा दिसते चाय. खरा सांगू, आमचा मसालानी चाय जास्त चांगला असते. पन तेचा दुकान एटला पॉश हाये ने, चायचा कोलिटी कोन बगते. काय बराबर ने?" आम्ही "चोक्कस" असे उत्तर दिले. या महानुभावाला का उगाच दुखवा?

मग आम्ही विचारले आमच्यासारख्या सामान्यांनी तो असामान्य चहा कसा मिळवायचा? परेसभाई उत्तरले,"तू काळजी नको करू. ते चाय सोताच येल तुज्याकडे. म्हणूनतर तेला त्सुनामी चाय बोलते लोक. तुला पायजे की नाय पायजे ते वार्ताच नको. काय काय लोक सोता बगायला जाते. तेला चाय नाय तर दुकान किती सरस ते बगायचा असते. तेला लायनमदे तर हुबा ऱ्हावे लागतेच, पन चाय भेटेल का नाय तेचा ग्यारंटी नाय. अरे ते वाराणसीचा मातीचा भांडयामदला एवढा सरस चाय, ते लोग पन बोलते नरेनभायचा चाय तो चाय. वारानसीचा चाय एकदम रबडी. सुगरवाले लोग नाय पिऊ शकत. आपण सांगतो तुला, आता ही त्सुनामी वाराणसीला जाएल मंग पूरा इंडियात फैलेल. ते मद्रासी लोग एवढा कॉफी कॉफी करते ना तेसुद्धा नरेनभायचा चाय पिएल. अरे एवढा इटालियन पास्ता फेमस, पण तेपण बोलून लागले मला, आपला धंदा एकदम बसला, अमे चायकी फ्रान्चाईज जोईने. तुझ्या भायला बोलून बग आतून कनेक्सन होते का आपला."

असो बापडी त्सुनामी. आम्हाला पोहता येत नाही. त्सुनामी सोडा आम्ही समुद्र शांत असतानाही घोटाभर पाण्याच्या आत जात नाही. आम्ही काही दिवस उंच ठिकाणी जाऊन राहायचे ठरवले आहे. बरोबर ट्रकची इनर आणि झाडू घेतला आहे. त्सुनामीचे पाणी आले की गावातील गटारे सर्व दडवलेली घाण बाहेर टाकत वाहतील. त्सुनामीचे पाणी ओसरले की, पाणी परत जाईल पण ही बाहेर आलेली घाण तशीच राहील. डास होतील, रोगराई वाढेल.  ती चिंता करत ब्याग भरत असताना सौ म्हणाली, काही कुठे जायची गरज नाही. वाणियाभाई नवीन दुकान टाकल्यावर कधी पैसे टाकून जाहिरात करत नाही, फक्त सेल लावतो आणि दुप्पट पैशाचे लेबल लावून दहा टक्के सूट देतो. मग लोकच फुकट जाहिरात करतात. आणि आलीच जर ही त्सुनामी तर फारतर चहा पेल्यातून बाहेर सांडेल, फडक्याने पुसून घेतलं म्हणजे झालं. आणि जळ्ळा मेला तो झाडू कशाला इथे? सांडलेला चहा पुसून घ्यायला झाडू काय करायचाय? परत मोरीत नेऊन ठेवा आधी! आम्ही झाडू निमूटपणे परत नेऊन जागच्या जागी ठेवला. वास्तवाचे भान माझ्यापेक्षा हिलाच जास्त आहे.

Saturday, April 26, 2014

लग्नाचे रसायनशास्त्र

लग्नाला जवळ जवळ दोन तपे उलटली. लग्न हवंच कशाला, ही सगळी मानवकृत ढोंगी नैतिक बंधने आहेत वगैरे तरुणाईतील बंडखोर विचार केव्हाच मागे पडले. त्यावेळी ढोंगी वाटणारं बंधन कधी घालून घेतलं ते कळलं नाही. मुहूर्तावर लागलेले लग्न ही एक घटना असली तरी ती एक दीर्घ अशी भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया आहे असं वाटतं. श्रेष्ठ, वडील लोकांच्या साक्षीनं एका विशिष्ट मुहूर्तावर चालू झालेली. प्रक्रियेत अनुभूत असलेल्या दोन्ही पदार्थांच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार आणि भवतालच्या परिस्थितीनुसार ही प्रक्रिया घडत जाते. सुरुवातीच्या काळात दोन्ही पदार्थ एकमेकातील भिन्न गुणधर्म पाहून आकर्षित होतात. दोन्ही पदार्थांची संयुजा अस्थिर असल्याने एकमेकांना स्वत:कडे असलेले विद्युतपरमाणु खुशीने देतात. कालांतराने दोघांची संयुजा स्थिर होते. मग रंग, रूप, चव इत्यादि बाह्य गुणधर्म यांचा तक्ता भरला जातो.

आता ज्ञानजिज्ञासा अंतर्गुणांकडे वळते. मग मोरचूदाची (कॉपर सल्फेट) पांढरी पूड पाणी घातल्यावर निळी होते अशा प्रकारच्या प्रक्रियांची ओळख होऊ लागते. कोणत्या विशिष्ट तापमानाला पदार्थ नेल्यास त्याचा रंग बदलतो अथवा अमुक अमुक रसायनाशी संपर्क आल्यास तत्काळ पेट घेतो हे ध्यानी येऊ लागते. काही फ़ॉस्फरस पेण्टॉक्साईड सारखे पदार्थ तर नुसत्या हवेच्या वा पाण्याच्या संपर्कात आले तरी पेटणारे असतात. त्यांना दुसऱ्या पदार्थाच्या असण्याचीपण गरज लागत नाही. अशा वेळी त्यांना सदैव रॉकेलमध्ये बुडवून ठेवण्यासारखे उपाय करून शांतता/स्थिरता प्राप्त करावी लागते. काही वेळा प्रक्रियेतील एक पदार्थ अरगॉन वायुसारखा रंगहीन, वासहीन आणि चवहीन असतो, राग, लोभ, मत्सर, प्रेम, द्वेष इत्यादि तमोगुणांपासून मुक्त असतो. कोणतीही प्रक्रिया घडूच शकत नाही मग. असे पदार्थ अगदी सल्फ्युरिक आम्लासोबतही आरामात राहू शकतात. थोड्याफार यशस्वी लग्नांपैकी हा एक प्रकार. काही पदार्थ स्वत:हून कोणतीही प्रक्रिया करण्यास उत्सुक नसतात. मग अशा प्रक्रियांना धक्कास्टार्ट करण्यासाठी मध्यस्थ (कॅटालिस्ट) लागतात. काही वेळा उष्माक्षेपी (एग्झोथर्मिक) प्रक्रियेत स्फोट होतो, उर्जा उत्सर्जित होते, आजुबाजूच्या परिसराची मोडतोड होते. अशा वेळी दुसऱ्याने सुरक्षित स्थळी आसरा घेऊन काही काळानंतरच तोंड बाहेर काढावे हे उत्तम नाही तर तीच प्रक्रिया पुन्हा व्हायची शक्यता असते. तर काही वेळा प्रक्रिया उष्माशोषी (एण्डोथर्मिक) असते. अबोला धरणे, माहेरी निघून जाणे, अश्रू ढाळणे ही त्याची काही उदाहरणे होत. उष्माशोषी प्रक्रियेवर योग्य वेळात नियंत्रण न केल्यास त्याचे उष्माक्षेपी प्रक्रियेत रूपांतर होण्याची शक्यता वाढते. अत्यंत अनुभवी शास्त्रज्ञच असे प्रयोग करू शकतात. तुम्ही आम्ही करू नयेत हा इशारा. काही वेळा पदार्थ नैसर्गिकपणे प्रतिकर्षित करणारे असतात. अशा पदार्थांत काही प्रक्रिया होऊ न देणे सयुक्तिक ठरते.

अनेक वर्षे या प्रक्रिया चालू राहतात. त्यातून तग धरलेले पदार्थ आता स्थिर झालेले असतात. स्फोट घडून गेलेले असतात, ज्वलन झालेले असते, द्रवीकरण झालेले असते, स्फटिकीकरण झालेले असते. एकमेकांच्या समग्र गुणधर्मांची माहिती झालेली असते. एक संपृक्त द्रावण तयार झालेले असते. ओलाव्याने आलेली निळाई असते. नियंत्रित केलेल्या ज्वलनाने आलेली ऊब असते. एकमेकांचे उकळते बिंदू माहीत झालेले असल्याने तपमान शीतल झालेले असते. अशा वेळी आपल्याकडे जे गुणधर्म नाहीत ते आपल्या जोडीदाराकडे आहेत हे लक्षात येते आणि त्याचा अभ्यास आपण आधी का केला नाही असे वाटते. संघर्ष, विरोध यातून सर्व गुणदोषांची भेट घडल्याशिवाय चांगले गुण दिसत नाहीत. ते आता दिसू लागतात. आणि हाच क्षण असतो पुन:श्च हरि ओम म्हणायचा. नव्याने आपल्या जोडीदाराकडे पहायचा, त्याच्या गुणांकडे पाहण्याचा, दोषांकडे दुर्लक्ष करण्याचा. शेवटी रसायन तयार व्हायला दोन्ही पदार्थ त्यांच्या गुणदोषांसकट आवश्यक असतात. नुसते रसायन नको तर स्थिर, संपृक्त, समृद्ध पण हवे! इत्यलम.

 

Thursday, April 24, 2014

गंगा आणि भगीरथ

नर्मदेच्या पात्रात कमरेएवढ्या पाण्यात भगीरथमहाराज प्रात:समयीचे पुरश्चरण करीत उभे होते. अजून तसे उजाडले नव्हते, पूर्वेकडे झुंजूमुंजू व्हायला लागले होते. दक्षिणेकडून खळ्ळखट्याकचे आवाज येत होते. उत्तरेकडून शिंकणे आणि खोकणे ऐकू येत होते. पश्चिमेकडे मात्र सर्व शांत, समृद्ध दिसत होते. फक्त किनाऱ्यावर सेवक कषायपेय उकळत होते त्याचा उथळ खळखळाट ऐकू येत होता. महाराजांचे कषायप्रेम सर्वज्ञात होते. पुरश्चरण झाल्या झाल्या त्यांना ते लागे. मग पुढील आन्हिके सुरु होत.

पूर्वजांची राख करणारा कपिलमुनींचा श्राप अद्याप धगधगत होता. तो श्राप फक्त गंगेच्या पाण्यानेच धुऊन निघणार होता. त्याला कित्येक वर्षे झाली. पिढ्या लोटल्या. पूर्वजांच्या पापाचा परिणाम राज्यावर दिसत होता, भूकंप, दंगलींसारखे दैवी कोप वाढले होते. ती पापे कशी धुवून काढायची हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला प्रश्न होता. आज्यापणजांनी खूप तपें केली, गंगामैया काही प्रसन्न झाली नव्हती. एखाद्या युवतिसाठी तन आणि धनच काय मनही अर्पण करावे, पण तिने ढुंकूनही पाहू नये अशी काहीशी अवस्था होती. भगीरथमहाराज स्वत: श्रेष्ठ तपस्वी तर होतेच, पण एक उत्तम शासकही होते. ध्यानधारणा, जपजाप्य यात प्रजेकडे दुर्लक्ष होऊ देत नसत. एक वेळ प्रजेला अन्न मिळाले नाही तरी चालेल, पण प्रत्येकाने "ओम नमो शिवाय" या सप्ताक्षरी मंत्राचा जप केल्याशिवाय दिवस पुरा करायचा नाही असा दंडक त्यांनी घालून दिला होता. शिवाय औद्योगिक क्रांतीवर त्यांचा विश्वास होता.  त्यांच्या साधनेमुळे गंगामैया जरी प्रसन्न झाली नसली तरी गेलाबाजार नर्मदामाई आणि तिच्या काठावरचे कारखानदार तरी पाच वर्षातच प्रसन्न झाले होते. विस्तीर्ण रस्ते, भव्य प्रासाद, उत्तुंग मनोरे, भवताली सर्वत्र दिसत होते. झालेल्या उन्नतीवर रोजगारी भाट दररोज नवीनवी काव्ये करीत. त्यांना भरपूर अनुदाने मिळत. त्यांचा चरितार्थ उत्तम चालला होता. कधीकधी शेजारच्या राज्यातील कुडमुडे राजेही भगीरथाच्या राज्यात प्रगती पहायला येत असत आणि वैषम्याने परत जात.भगीरथमहाराज स्वत: प्रजेला विचारत,"काय झाली आहे की नाही प्रगती?" विस्फारलेल्या डोळ्यांनी म्हणा किंवा घाबरलेल्या छातीने म्हणा, प्रजा मान डोलवत असे. महाराजांचे रूप जरब बसवणारे असले तरी हृदयात कणव आहे असे सर्व म्हणत.

असे सर्व असले तरी नर्मदेच्या पाण्याने पापे धुऊन निघणार नव्हती. आणि कारखानदारांचा नीती-पुण्याशी कधी संबंधच येत नसे. ते निस्संग असत. नर्मदेचे पाणी काय किंवा गंगेचे काय हात धुऊन घेता आले म्हणजे झाले. पण भगीरथमहाराजांना गंगेचे पाणी अगदी आवश्यकच होते. तिच्या पाण्याने सर्व पापे एकदम धुऊन निघून सर्वांग सोन्याचे होणार होते, पितरांची नरकातून स्वर्गात बदली होणार होती, कारखानदारांच्या गुंतवणुकीची परतफेड होणार होती. महाराजांच्या ऐहिक प्रगतीची परमावधी कधीच झाली होती, आता गरज होती परमार्थाची, पितरांच्या आत्म्याच्या मुक्तीची. परमार्थाची आस वगैरे ठेवणे हे त्यांच्या स्वभावाला धरून झाले नसते. फारच सामान्य झाले असते. भगीरथमहाराजांच्या शब्दकोषात विनंती, आस, करुणा कधीच नव्हते. ते कृती करून मोकळे होत.

पण पूर्वीसारखी स्थिती राहिली नव्हती. आता भगीरथमहाराजच नव्हे तर इतरही अनेकजण गंगामाईच्या मागे हात धुवून लागले होते. त्यात वर्षानुवर्षे राज्य केलेले राजे होते, औट घटकेचे राज्य केलेले राजेही होते. हौशे, नवशे, गवशे सर्व होते. सर्वांनाच झटपट पापमुक्ती हवी होती. गंगामैय्यासुद्धा किती जणांची पापे धुणार? भगीरथमहाराज काही कमी नव्हते. पूर्वीचे भाबडे लोक स्वत: तपश्चर्या करायचे आणि वर्षानुवर्षे घालवायचे. भगीरथमहाराजांनी प्रजेलाच तपश्चर्येच्या कामी लावले. गंगामाईला आणलेत तर रामराज्य येईल, कसलीही ददात उरणार नाही, परकीय आक्रमणे थांबतील, आपल्या आयाबहिणींवर होणारे अत्याचार थांबतील, एकही माणूस रिकामा बसणार नाही, सर्वांना काम आणि त्याचे योग्य दाम, आणि तुम्ही जर गंगामाईचे मन वळवले नाहीत तर…(महाराजांनी असे वाक्य अर्धवट सोडले की प्रजेच्या अंगावर शहारा येई)  इत्यादि घोषणा ऐकून प्रजा कामालाच लागली. भगीरथमहाराज एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी तडक गंगामाईलाच जरब दिली, आमच्यावर प्रसन्न झालात तर तुमचा विकास होईल, नाही झालात तर तुमचाच किनारा भकास होईल. तेव्हा तुम्ही आता आढेवेढे न घेता आमच्यावर प्रसन्न होण्याबाबत विचार करा.

महाराजांचे पुरश्चरण संपले. धूतवस्त्र परिधान करून महाराज कषायपेयाचा आस्वाद घेत असतानाच दूत हजर झाला. "महाराज, खबर अशी आली आहे की, वाराणसीनगरी गंगामैय्याने स्वत:च तपश्चर्या सुरु केली आहे! म्हणे भगीरथमहाराज प्रसन्न झाल्याशिवाय मी वाहायची नाही. त्यांनी स्वत: येथे येऊन आपल्या चरणकमळाने मला पावन करावं!" महाराज गूढ हसले. दूताला म्हणाले,"उत्तम खबर. आम्ही भाग्यवानच. स्वत: मातेने आम्हाला बोलावलं. आम्ही त्या आमंत्रणाचा अव्हेर कसा करू? म्हणावं निघालोच आम्ही. एवढं आमचं कषायपेय संपवतो."

Wednesday, April 23, 2014

आचार्य अरविंदांची वासरी (भाग तिसरा)

२० जानेवारी २०१४ - आम्हाला ज्याचा संशय (खरं तर खात्री) होता तेच घडले. छत्तीस रोगांवर बहात्तर गुणकारी असे आमचे लोकपाल बिल हे लोक मांडायलासुद्धा देत नाहीत! हाच तो एकनाथ महाराजांचा देश? जिथे एका पैशाच्या तुटीसाठी त्या महात्म्याने रात्र जागून काढली? आमचे कुटुंब आजसुद्धा ऑफिसमधून घरी गेलो की दिवसखर्चासाठी दिलेल्या पैशाचा हिशोब मागते. मागे एकदा ऑफिसमधून परत येताना उसाचा रस प्यालो होतो. आता रसवंतीगृहात कसली आली आहे पावती? पण त्या ५ रुपयांच्या तुटीवरून आम्हाला अनैच्छिक उपोषण घडले होते. पुढच्या वेळेस चरकातून काढलेला उसाचा चोथा पुरावा म्हणून घेऊन यायचा ठरवले आहे. झाडूचे हीर एक आठवड्यातच परत पार मोडले. तीन आठवड्यात हा तिसरा झाडू. उद्या नवीन आणला पाहिजे. टोप्या आणि झाडू यांच्यावरच जास्त खर्च होतो आहे. त्यात हे परदेशातील कार्यकर्ते देणग्या देतात आणि टोप्या फुकट मागतात. इथे आम्हाला एकच टोपी वापरावी लागते. निदर्शनात रस्त्यावर झोपणे भाग असते. त्यात ती मळते. मग घरी येऊन स्वत: धुऊन ठेवावी लागते. बऱ्याच वेळा सकाळी ती वाळलेली नसते. मग आमची ही पाणी तापवायच्या बंबावर ठेवून वाळवते. तरी दमट असते. आधीच सर्दी झालेली, त्यात ही ओली टोपी. लोकांना आमचे हे आम कष्ट दिसत नाहीत.

२२ जानेवारी २०१४ - अरे वा! लोकपालचा गळा हे खांग्रेसी आणि कमलदलदल आवळताहेत खरं पण लोकांची सहानुभूती आम्हाला मिळते आहे. आता वाटते या लोकांनी ते पाडावेच. कटकट नको. दररोज झाडू काखेत घेऊन फिरावं लागतं ते तरी बंद होईल. पण भूषण म्हणतो, पडूदे, आपण राजीनामा देऊ. परत निवडणुका होतील. लोक आपल्याला डोक्यावर घेतील, मग काय बहुमतच बहुमत. हा भूषण आहेच वकिली डोक्याचा. हे माझ्या लक्षात आले नव्हते. पण एक गोष्ट आता लक्षात आली की पूर्वीसारखे कोऱ्या लेटरहेडवर सही करून द्यायचे नाही याला. पूर्वीतरी कशाला घेत होता कुणास ठाऊक. माळावर बोंबलायला पाटलाची परवानगी कशाला हवी?

२२ जानेवारी २०१४ - आज आमच्या सरकारस्थापनेला एक अखंड महिना झाला. कार्यालयात गेलो तर सर्वत्र सामसूम दिसली. बाहेर कॉम्प्युटरशेजारी काला जामुनच्या रिकाम्या प्लेटापण दिसल्या नाहीत, म्हणजे सोमनाथ काल झोपायला ऑफिसमध्ये आला नव्हता. हा रात्री जागून कुणाला एवढ्या ईमेल्स पाठवत असतो देवाला माहीत. एकदा हळूच पाहिले तर इनबॉक्स मध्ये पाच ईमेल्स, सेंटमध्ये पाचहजार! गूढ आहे हा मनुष्य. मनात पाल चुकचुकली. माझा कात्रज करून ही मंडळी समोर खान्ग्रेस भवनातल्या कॅन्टीनमध्ये मिसळ चापायला तर नसतील ना गेली? तंद्रीत ऑफिसमध्ये शिरलो, टोपी काढून, माझ्या खुर्चीमागे भिंतीवर लटकावलेल्या झाडू आणि  प.पू.ह.भ.प. (सोमनाथ हभप म्हणजे हळूच भलतीकडे पाहणारे असं म्हणतो. त्याला कुणाबद्दल आदर म्हणून नाही) अण्णामहाराज गाळणसिद्धीकर यांच्या फोटोला नमस्कार करून मागे वळलो तर.. हे सगळे लोक पडद्यामागून बाहेर आले आणि खच्चून "सरप्राईज!" असं ओरडले. मी मटकन खुर्चीत बसलो. आमचे चिरंजीव अचानक मागून येऊन "नमो नमो" असं ओरडतात तेव्हाही एका सेकंदात माझ्या हृदयाचे ठोके ७० वरून २४०वर जातात. इथे तर अखंड सोमनाथ त्याच्या तसल्या त्या गटाण्या डोळ्यांनी माझ्या नाकापासून ६ इंचावर. प्रचारफेऱ्यांपासून ते शपथविधी आणि शपथविधी ते आज सकाळी उप्पीट खाल्ले होते तिथपर्यंतचा सगळा कालावधी क्षणात डोळ्यासमोरून येऊन गेला. वाटले, संपलं आता, लोकपालाच्या विसर्जनाआधी आपलंच आधी बहुधा. सुदैवाने स्मेलिंग सॉल्टची बाटली खिशात होती. हुंगल्यावर जरा बरे वाटले. यादवने त्याच्या घरच्या म्हशींच्या दुधाचं लोणी घालून केलेला केक आणला होता. टोपीच्या आकाराचा. त्यात प्लास्टिकचा झाडू तिरका खोवलेला. टोपी कापताना कसेसेच झाले.

८ फेब्रुवारी २०१४ - राजीनामा! राजीनामा! राजीनामा! हलके वाटते आहे. घरी जाऊन निवांत टॉम आणि जेरी पहात बसलो.

८ एप्रिल २०१४ - प्रत्यक्षात आयुष्य प्रचंड बिझी झालंय. राजीनाम्याच्या पुण्यसंचयावर लोकसभेची मोक्षप्राप्ती होईल का याचा अदमास घेण्यात बराच वेळ गेल्यावर शेवटी लढायचे ठरले. कमळाची एक पाकळी जरी तोडण्यात यशस्वी झालो तरी ते यशच. पण आजच्या घटनेने मन जरा साशंक झालंय. एवढा वाक्ताडनयोग असलेला मी, पण आज नशिबात ताडनयोग होता. आम्ही नेहेमीप्रमाणे चातुर्याचे वक्तव्य करीत असताना एका माथेफिरुने आमच्या मुद्द्यांचे गुद्द्यांनी व्यवस्थित खंडन केले. वर मुखशुद्धी म्हणून एक तडाखा कानशिलावर लगावला. इतके दिवस मी आमच्या दिवट्याला म्हणत असे, ऐकले नाहीस तर देईन एक ठेऊन, मला कल्पना नव्हती ठेऊन दिलेली एवढी लागते. पण एक झाले मात्र, जेवढ्या आमच्याकडून विस्मरणात गेलेल्या गोष्टी त्या सर्व एकदम खणखणीत आठवल्या. राजीनामा दिला ती चूकच झाली असे जरासे वाटू लागले आहे. आज रात्री झोपताना व्हिक्स बरोबर आयोडेक्स लावणे प्राप्त आहे.

९ एप्रिल २०१४ - आज नशिबात घबाडयोग होता. थोडा त्रास सहन करावा लागला. अजून कानातून गूं गूं असा बारीक आवाज येतो आहे. खाताना डाव्या जबड्यातून थोडी कळ येते आहे. पण शुद्ध खतापोटी फळे रसाळ गोमटी. आणि फळ गोमटी पाहिजे असतील तर खताचा वास सहन करावाच लागतो. इथे खतही "आम"चे, फळही "आम"चेच. असा विचार करून जरा बरे वाटते तोवर पण येथे कानशील मात्र खरोखरच आमचे होते हा विचार खिन्न करून गेला. भूषणला फोन करून समुपदेशन घ्यावे असा एक विचार मनात आला. त्याला याचा अनुभव आहे. पण तो वकील आहे, कानफटीत खाणे त्याला नवीन नसावे. तर त्याने अफलातून सल्ला दिला. म्हणाला ज्याने हाणली त्यालाच भेट द्या. टीव्हीवाल्यांना पाठवायची सोय मी करतो. त्याचे डावपेच मला खरंच काहीकाही वेळा कळत नाहीत. भेटीनंतर सहानुभूतीचा धबधबाच आमच्या अंगावर पडू लागला. तब्बल ८७ लाख रुपये पार्टीला मिळाले! ८७ वर पाच पूज्यं! निदान अर्ध्या खासदाराची सोय झाली! अर्ध्या खासदाराला एक थप्पड, सौदा तसा सस्त्यातच पडला. पण सारखा सारखा मी नाही खाणार बुवा. निदान उरलेल्या अर्ध्या खासदाराची सोय आता सोमनाथने करायला हवी. पार्टी काय फक्त माझीच आहे की काय? शिवाय मला आता दुसरीच शंका येते आहे. मला थप्पड देण्याची आयडिया ही या लोकांचीच तर नव्हती?

(क्रमश:)

Tuesday, April 22, 2014

धुळवड संपली

आज धुळवड संपणार ना राव. गेला म्हैनाभर आंघोळीला पन वेळ भेटत नव्हता. आमची मिशेस म्हनाली पन आहो दाढी तर करा. मी म्हणलं इथं वेळ कुणाला आहे.  तुला माझ्या दाढीबद्दल तक्रार करायला द्यायला पन वेळ नाही आपल्याला. आपल्या पार्टीला आपली गरज हे. दादांनी या येळेला डायरेक्ट सांगितलं होतं, लैच कुणी बोंबलाय लागलं तर उचला. या वेळेला आपली नेमणूक झाली ना राव या म्हत्वाच्या पोष्टवर. म्हणलं दादांच्या नदरेसमोर आसणार आपण. फुडं कुटं समितीबिमितीवर टाकायच्या वेळंला आपण नदरेत असलेलं बरं. ते नेमणुका अशाच करतात, जो कुणी फुडं दिसंल त्याची लॉटरी. आपल्याला पन ही शिपायची नोकरी अशीच भेटली. पाच वर्षाखाली दादांच्या प्रचाराला ट्रकमधून पुन्यात आलो. आपलं लकपन आसं, ष्टेजजवळच उभा होतो. दादा आल्यावर एवढ्या खच्चून घोष्णा दिल्या, शेवटी दादांनी विचारलं मी कोन म्हणून. फुडं मग पार्टीनं आपल्याला हुतात्मा भगतसिंग टेक्निकल इन्स्टिट्यूट आणि सखदेव सहकारी पतसंस्था मर्यादित, इथं शिपायाची नोकरी भेटवली. दोनीचं ऑफिस एकाच बिल्डींग मदे. दोन रूममदे क्लास, एका रूममदे कॉलेज आनी पतसंस्थेचं ऑफिस. संस्था मर्यादित आसली तरी चान्स अमर्याद. तसं दादांचं नाव डायरेक्टर बोर्डावर सोडा बिल्डींगभायेरच्या बोर्डावर पन नाही, पन दादा आले की ते खुर्चीवर आनि चेरमन उभे. मग म्हणलं आपनच एकटेच नाय काय अशे इथे लागलेलो. चेरमनला एकदा बोललो पन, सायेब तुमाला कोणत्या इलेक्शनमदी भेटली पोष्ट? धा ते पाच ड्यूटी नुसती नावाला. आपन कायमच ड्युटीवर आसतो. मोष्टली चेरमनसायबांबरोबर मुंबईला आमदार भवनात. सकाळी जायचं संध्याकाळी परत. चेरमन दादांच्या रूममदे, आपण कॅन्टीनमदे. आपन नुसते थांबायचं, चेरमनसायबांनी काय काम सांगितलं तर करायचं. जेवन बाकी लय भारी बर का आमदार भवनात. १५ रुपयात थाळी, फीष्टसकट. थाळीच्या भावानं पाह्यलं तर आमदार भवन दारिद्रय रेषेखाली आहे. बाहेर एका दिवसाला ३५ रुपये लागतात असं सरकारनंच डिक्लेर केलं आहे. खरं तर त्या सर्वांनी आमदार भवनात रोज येऊन ज्येवायला पाह्यजे. आपन दादांच्या कृपेनं मुंबईत आलो की हिथंच ज्येवतो.

ग्येला म्हैना लै बीजी ग्येला आपला. कॉलेजच्या डूटीसाठी टाईमच भेटला नाय. पार हिकडं बारामतीपासून कणकवलीपर्येंत नुसता खकाणा. आपल्याला प्रोमोशन भेटलं या इलेक्शनला. आपण आता घोष्णा देणारे नाय ऱ्हायलो. दादा बोलले लै म्हत्वाची डूटी हाय तुला. चेरमन बोलतील तुला. चेरमन बोलले सकाळी ये घरी. मी बोललो सकाळी कॉलेज उघडून देतो पोरान्ला आन तसाच येतो. मला म्हनले, ते सोड, ही प्राध्यापकं कशाला ठेवली मग आपन? चावी दे त्या शिव्हीलच्या कुलकर्णी कडे, तो उघडेल. त्याचंच लेक्चर आसतं सकाळच्याला. नाही तरी तो पोरान्ला डम्पी लेवल देऊन फिल्डमदे सोडतो आन स्वत:च्या बाहेरच्या क्लासची लेवल करत बसतो. मी तेंच्या घरी गेलो तर बोलले, बबन, या इलेक्शनला "बार" आन "कॅश" रजिस्टर तुज्याकडे. कोनाला बार आन कोनाला कॅश ते दादा बोलतील. पन या वेळेला ताई उभ्या आहेत इलेक्शनला. तेव्हा सगळीकडून टाईट फिल्डिंग लावा. पयले बार उडवा, त्याने काम नाय झालं तर कॅश सोडा, तरीपन काम नाय झालं तर मग उचला. पन आपन लोकशाहीवाले आहोत हे लक्शात ठेवा. लोकान्ला चॉइस द्या - बार घेयाचा, कॅश घेयाची का डायरेक्ट वरती बदली करून घेयाची. आपन चॉइस द्याचा, त्यांना ठरवू द्याचं. आपला आणभव असा की तिसऱ्या चॉइसपर्येंत सहसा कोनी जात नाय. पन दर इलेक्शनमदी एकतरी दीडशाना निघतोच.

पन या येळेला लैच धुळवड झाली. दादा लै भडाकले हायेत. जितं जातील थितं लय शाने लोक भेटले. आनि ते पन आमच्याच मतदारसंघात भेटावेत? आता ताई निवडून येनार ही काळ्या दगडावरची रेघ. ताईंना नसंन खात्री, पन आपल्याला आहे. पन लोक मुकाट्यानं खातील पितील, तरंगत मत द्याला जातील तर कसली! लैच बाराची. दादा स्वत: प्रचाराला आले, स्वत: मत मागताहेत याचा काही मान ठेवावा की नाही? उलटं त्यांनाच प्रश्न विचारू लागले, अमुक आश्वासन दिलं होतं आणि तमुक देतो म्हणाले होते. दादा म्हणले मायला आम्ही आमच्या घरीबी आसलं लै काय काय सांगत आसतो, आश्वासनं देत आसतो. आजसुद्धा सांजच्याला लवकर घरी येतो आसं सांगून बाहेर पडलोय. आता आजवर बाराच्या आत कदीतरी आमी घरी पोचलोय का? आमचं कुटुंब सकाळी विचारत न्हाई कुटं तोंड वर करून फिरत होता म्हणून. उलटं म्हणत्यात जावा कुटं पण, हितं बसून आमच्या डोक्याला ताप देऊ नका. तर हे भाद्दर ऐकच ना, तसाच प्रश्न विचारू लागला. मग म्हणलं चला, राबवा लोकशाही आता. उचलला त्याला. आता जरा विचारपूस करू, गडी निवाला तर पनवेलच्या बारला न्हेऊन आणू. न्हाय तर पनवेलला खाडीपन हायेच. माहीमपर्येंत जायला नको. शिवाय इलेक्शनच्या टायमाला माहीमच्या खाडीला लय गर्दी असते. इलेक्शनच्या आदी कॉंग्रेसवाल्यांची आनी इलेक्शननंतर शिवसेनावाल्यांची. सद्या आपली युती हाय म्हणा कॉंग्रेसवाल्यांशी. पन नकोच, फुडच्या इलेक्शनला युती नसली तर ते ह्या आमच्या भानगडीचा वापर करून घेणार आणि मग दादा आमच्यावर भडाकणार. 

Monday, April 21, 2014

ताप शरद चांदण्याचा

इतकी वर्षे समाजकारण केले, लोकांची सेवा केली तरी लोक कृतघ्नपणे त्याला माजासहित केलेले राजकारण असे म्हणतात त्याला आता काय म्हणायचे? तरीही आम्ही नेटाने कार्य करीत आहोत. कालपासून कंबर दुखते आहे, नवीन कवळी अजून नीट बसत नाहीये, लहानसहान गोष्टींचे विस्मरण होते आहे, डोळे परत तपासून घ्यायला हवेत. काल एका सभेत "आता आम्ही काही तरुण राहिलो नाही, आता आम्ही पिकले पान. तरुण पिढीने आमचा वारसा चालवायला हवा." असे गमतीने म्हणालो तर मागे कोपऱ्यातून "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा" असे कुणीतरी ओरडले. काय म्हणावे या वाह्यातपणाला? आमचे कार्यकर्ते हे असे करणार नाहीत. एक तर पनवेलच्या बार मध्ये असली गाणी लावत नाहीत, शिवाय आमचे कार्यकर्ते ऐकण्यापेक्षा कृतीवर भर देतात. कुणीतरी बाहेरचाच असणार. शिवांबूदादा परस्पर ओरडलेच,"कोण हाय रे तो? उचला त्याला!".  बाकी गाणे चांगले होते म्हणा! क्षणभर जुन्या आठवणी (जुन्या म्हणजे लैच जुन्या) जाग्या झाल्या. आम्हीही एके काळी आमच्या गावात आणि पंचक्रोशीत मैदान गाजवले होते. आताच्या दिसण्यावर जाऊ नका. आजही गावात आयामाया आठवण काढतात (खरं तर "आठवण" हा शब्द इथे नकोच आहे. काही प्रसंगी लोकांनी आम्हाला उद्देशून वापरलेले काही शब्द अविस्मरणीय होते, विसरायचं म्हटलं तरी विसरले जात नाहीत).

आम्ही खूप प्रयत्न केला सत्तेपासून दूर राहायचा. पण सत्ताच आम्हाला सोडत नाही. सत्ता मधुमेहासारखी असते. न सोडणारी आणि मज्जातंतू खराब करणारी. लोक म्हणतात आम्हाला गेंड्याची कातडी मिळाली आहे. पण प्रत्यक्षात ती एक मेडिकल कंडिशन आहे. चव्हाणसाहेब म्हणायचे सत्ता ग्रहण केलीस तर समाजकारणाचा व्यायाम हवाच, नाहीतर सत्ता रक्तातच राहते, समाजापर्यंत पोचत नाही. पण नुसतं समाजकारण करताच आलं नाही. गोड खाणं कुणाला टाळता येणार? संवेदन नसल्यामुळे काही धोके संभवतात पण निबर त्वचेचा उपयोगही खूप होतो हेही खरे. मागे असाच एकदा आमच्या गालावर डास बसला होता. चांगला मोठ्ठा डेंग्यूचा असावा. संवेदन नसल्यामुळे आम्हाला कळलंच नाही. सुदैवाने आमच्यावर अतीव श्रद्धा आणि प्रेम असणाऱ्या एकाला तो दिसला आणि त्याने तो झटक्यात मारला. एवढा जोरात मारलेला फटका आम्हांस मुळीच जाणवला नाही. पण त्या डासास नक्की जाणवला असेल. आता या घटनेत विशेष काही आहे का? पण आम्हाला राजकीय शत्रू काही कमी नाहीत. लगेच हूल उठवली, कुणी तरी आमच्या श्रीमुखात भडकावली म्हणून. लोक काय टीव्हीवर जे सांगतात ते ऐकतात. उघडा कान ऐका नीट म्हणायला टीव्हीवाल्यांचं काय जातंय.  इथे आमचे दोन दात सैल झाले हे खरे, पण डेंग्यूपासून वाचलो. आता एक सुळे दात आणि एक पटाशीचा अशा दोन दातांवर भिस्त आहे. तसे आम्ही पातळ डाएटवरच असतो हल्ली. पातळ म्हणजे दाट नसलेले याअर्थी. नाहीतर पुन्हा इथे विपर्यास करून टीव्हीवर बातमी यायची - उघडा डोळे आणि बघा लवकर! साहेब आता पातळाच्या डाएटवर!. सवंग झाली आहे मीडिया. म्हणून तर आम्ही पुण्यात एक अख्खे वृत्तपत्रच विकत घेऊन त्याचा आदर्श असा "मीडिया बिझनेस" करून टाकला. एकदम आदर्श! ते निदान आमच्या तरी असल्या बातम्या देत नाहीत. आणि हो, हा "तसला" आदर्श नाही बरं का, आपला त्या आदर्शशी काही संबंध नाही. हा नुसता साधा आदर्श. काही बोलायची सोय राहिली नाही हल्ली. मुद्दे कमी आणि खुलासेच जास्त.

आता ही कालची मुले आम्हांस उद्धटपणे बोलू लागली आहेत. अरे मी अजून रिटायरपण नाही झालो तर आधीच पुष्पगुच्छ, हार आणि आभाराचे भाषण? म्हणे आम्ही श्रीमंत भोगी! आम्ही स्वत:च्या दोन हातांनी हे सर्व चव्हाणांकडून मिळवले आहे. ते दिल्लीत बसले, आम्ही म्हटले महाराष्ट्राच्या शिंकाळ्यावर आम्ही लक्ष ठेवतो. डोळ्यात तेल घालून आम्ही त्यावर नजर ठेवली. कृतघ्न लोक म्हणाले "बोक्याप्रमाणे!". आता बोला. आमची दिवसाची चर्या आणि मावळतीनंतरची रात्रचर्या सोडली तर आमच्यात आणि बोक्याच्यात काहीही साम्य नाही. आम्हाला लहानपणापासून गोटीब्याटचे आकर्षण. गोट्यांचेसुद्धा होते. आमच्या गल्लीतील सर्वांच्या गोट्या, ब्याटा, स्टंपा आमच्या म्यानेजमेंटमध्ये. तर मग भारताचे ब्याटबॉल सांभाळावे असे वाटले तर काय चुकले? तर लोक म्हणाले तुम्हाला नुसती फिल्डिंग लावायची आहे. वास्तविक आम्हाला आमचे बिनलेसचे बूटसुद्धा आरशात बघून घालावे लागतात. आम्ही फिल्डिंग कशी काय करणार होतो? लोकांच्या बोलण्यावर काही नियंत्रण ठेवता येत नाही. आता या पोरांचे बाप आमच्या बरोबरचे. एका ग्लासातले. आमचे मित्र आम्हाला काहीही म्हणोत हो, ते चालायचंच. आता परमेश्वर कृपेने आम्ही जरा खाऊनपिऊन सुखी, मग एक मित्र म्हणायचे आम्हाला "मैद्याचे पोते". ते जरा मिष्किलच होते. आम्ही काही मनावर घेत नव्हतो. पण वडिलांचे ऐकून त्यांच्या मुलांनीही येऊन पोत्याला खालून दाभणाने भोक पाडावे? काही वयाचा मान तरी ठेवा! अवघड ठिकाणी फाटलेले जीर्ण पोते शिवणे या वयात कठीण असते. वडिलांच्या कर्तृत्वावर मुलांनी, पुतण्यांनी जगू नये. थांबा! या वाक्यात काही तरी चुकतंय. काय चुकतंय ते लक्षात येत नाहीये. असो. आता वयोमानानुसार असं होणारच. शिवाय आम्ही काय बोलतो ते टीव्हीवालेच जास्त लक्षात ठेवतात. तेव्हा संध्याकाळपर्यंत कळेलच. तेव्हा त्याचा इन्कारसुद्धा आत्ताच करून ठेवतो. देव न करो, हे फाटलेले पोते शिवून घेण्यासाठी या पोरांकडेच जावे लागेल. पण लोकसेवेचे व्रत एकदा घेतले की मानअपमान बाजूला ठेवणे आले. आमच्या दीर्घायुष्याचे तेच रहस्य आहे.

 

Sunday, April 20, 2014

पुरात्ची थलैवि

मूळचे मरहट्ट देशीचे असलो तरी आम्ही अम्मांचे खूप जुने भक्त. परिस्थितीमुळे आमचे पणजोबा येथे आले असे म्हणतात. ती परिस्थिती मरहट्ट देशी अजूनही तशीच असल्याचे आम्हांस वेळोवेळी कळत असते. असो. तर त्या आमच्या पुरात्ची थलैवि, आम्ही त्यांचे थंबी. त्या इडली तर आम्ही सांबार. त्या डोसा तर आम्ही चटणी (टोम्याटोची, अम्माना खोबऱ्याची आवडत नाही). त्यांनी नुसते पो असे म्हटले तरी आम्ही सांगितल्या ठिकाणी पोचणार, भो म्हटले तर भुभु:कार करणार. आमच्या देवघरात अम्मांची सालंकृत मूर्ती आहे. अठरा-वीस वर्षांपूर्वी अम्मांचे अवतारकार्य संपुष्टात आले असे वाटणाऱ्या घटना घडल्या होत्या. पण आमची श्रद्धा अढळ होती. त्या काळात अम्मा स्वत: आमच्या स्वप्नात आल्या आणि म्हणाल्या "थंबी, जिथे १०००० साड्या आणि १५००० मौल्यवान अशी पादत्राणे जेथे असतील अशा ठिकाणी सध्या माझे वास्तव्य आहे. दुर्दैवाने माझी मूर्ती या साड्या आणि पादत्राणे यांच्याखाली गाडली गेली आहे. तर ती तू बाहेर काढ आणि तुझ्या घरच्या देव्हाऱ्यात त्याची प्रतिष्ठापना कर, तुला कुठलाही अण्णा किंवा द्रविड कधीच ग्रासणार नाही, तुझे मुन्नेत्र एकदम कळघम होऊन जाईल." अम्मांच्या आज्ञेनुसार ती मूर्ती आज आमच्या घरच्या देव्हाऱ्यात विराजमान आहे. मूर्ती बहुत गोमटी आणि गुटगुटीत आहे. आम्हाला शंकराची दगडी पिंड, मारुती आणि रांगणारा बाळकृष्ण यांना छोट्या देव्हाऱ्यात शिफ्ट करावे लागले, पण मूर्ती फिट्ट बसली. मूर्तीची मुद्रा प्रसन्न आणि नजरेत प्रेमभाव ओथंबतो आहे. मूर्ती जागृत आहे याचा अनुभव आम्हांस लगेच आला. हापिसात गेलो तर एरवी माझे स्वागत कधी "ए आफिस मे आने का टैम है क्या" याशिवाय न करणारा आमचा साहेब यम्म बालसुब्रमण्यम शिवरामकृष्णन अय्यर प्रसन्न भस्ममंडित चेहऱ्याने समोर आला आणि मला गुड मॉर्निंग घालून गेला. येवढेच नव्हे तर आपल्या टिफ्फनमधून ब्रेकफाष्टसाठी आणलेली इडली "खातो काय रे" असं म्हणून देऊ करत होता. मनोमन अम्माना नमस्कार केला. पथ्ये आणि आन्हिके कडक आहेत. मूर्तीची दररोज सकाळी पूजा, अभ्यंगस्नान, अभिषेक करावा लागतो. नित्य नवीन वस्त्र आणि पादुका नेसवाव्या लागतात. संध्याकाळी आरती. शिवाय शुचिर्भूत होऊन सोवळ्याने घरच्या पाट्यावर रगडून केलेली चटणी आणि डोसा यांचा नैवेद्य. त्यात खंड पडला तर कोप होणार यात आम्हास तरी शंका नाही. आणि हे सर्व अग्निहोत्र आमच्या कुटुंबास करावे लागते. अम्मांचा दंडकच आहे तसा. हे दैवत  स्त्रीशक्तीप्रधान आहे. पुरुष फक्त आरतीसाठी.

काही अम्मानास्तिक सध्या भलत्याच उपद्व्यापात पडले आहेत. नर्मदेतील एक गुळगुळीत गोटा आणून त्याला भगवा शेंदूर फासून त्याचा जप करण्याचा उद्योग करताहेत, त्याला देवत्व देताहेत. अशा भ्रष्टाचाराने राज्यावर संकट येणार, रोगराई येणार, दुष्काळ येणार, अत्याचार वाढणार यात शंकाच नाही. नर्मदेचा गोटा तो काय लोकांचे रक्षण करणार? देशात प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूंचे प्रमाणच पहा. त्या गोट्याची जेथे उपासना होते तिथे हे प्रमाण लाखात १२२ आहे. श्रीअम्माकृपेने येथे ते केवळ ९० आहे! तेथे स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण ६५ प्रतिशत तर येथे वजा २९ प्रतिशत! (आम्हांस येथे थोडी गडबड वाटते. वजा २९ म्हणजे श्रीअम्माकृपेने स्त्रियांनीच पुरुषांवर अत्याचार केले असे ध्वनित होते आहे. त्रासलेल्या पुरुषांस कदाचित ते खरेही वाटेल पण आम्हांस तरी तसे वाटत नाही). तेथे साक्षरतेचे प्रमाण ८१ प्रतिशत, तर इथे तब्बल ८३!! तेथे सरासरी आयुर्मान केवळ ७० वर्षे तर श्रीअम्मा आशीर्वादाने येथे ७२ वर्षांचे प्रदीर्घायुष्य! येथे काही नास्तिक पुरुष स्त्रीशक्ती न पाहवून ७०व्या वर्षी समाधी घेतात, पण असे दुर्मुखमती विरळाच. तेथे केवळ ३२०० किमी रस्ते, येथे ४८००! एवढ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला किती मॉल्स उभे करता येतील! प्रगतीच प्रगती! येथे नुसते पुरुष पोलिस नाहीत तर महिला पोलीसही! वरकमाई फक्त पुरुषांनी करावी आणि स्त्रियांनी फक्त "वर"कमाई करून पाटारगडा सांभाळावा हा घोर अन्याय श्रीअम्मांनी दूर केला. नर्मदेकाठी महिला पोलिस तर सोडाच, नुसते पोलिस तरी आहेत की नाही याचा शोध घ्यावा लागेल. कारण पूर्वी आम्ही त्या ३२०० किमी रस्त्यांवरून प्रवास करून आलो, कुठेही ओम भवति भिक्षांदेही करत कुणी पुढे आले नाही (वाटेत मरहट्ट देशी मात्र दर १० किमीवर चवलीपावलीचे दान करावे लागले होते. आमचे पणजोबा परिस्थिती परिस्थिती म्हणत ती हीच बहुधा). त्याच वेळी आम्हाला खात्री पटली होती, येथे पोलिस नाहीतच. मग होणारच हिंसाचार. एका ठिकाणी आम्ही "वानरेंद्र!" असे चुकून मोठ्याने म्हणालो तर अकस्मात काही लोक उपस्थित होऊन आमच्या लुंगीची अब्रू धोक्यात आणणार असे म्हणू लागले होते. त्यांना आम्ही "वाह! नरेंद्र!" असे म्हटले होते असे सांगून कसेबसे सुटलो. एवढा प्रसंग होऊनही पोलिस आले नाहीतच. आमच्या येथे हिंसाचार होत नाही. होतो तो कोप. तोही श्रीअम्मा आशीर्वादानेच. तोही कुणी उतला मातला तरच. दैवताच्या कोपाला हिंसाचार म्हणत नाहीत. शिवाय अम्मांची कृपादृष्टी असेल तर भलेही जग तुम्हाला दानव, दहशतवादी ठरवो, तुमचा बालही बाका होणार नाही याची ग्यारंटी ही आमची देवी देते. तुमचा तो गोटा अशी ग्यारंटी देईल काय? काही तुलना तरी आहे का? कुठे जळजळवणारा तो उंधियु आणि कुठे आमचे हे सौम्य सात्विक सांबार!. कुठे झग्यासारखा दिसणारी ती मेड इन अंबानी भरताड पैरण आणि कुठे आमची ही द्रविडदेशी एअरकंडीशण्ड रेशमी लुंगी! नर्मदामाईने असे अनेक गोटे आजवर निर्माण केले आहेत, यापुढेही करेल. पण आमच्या पुण्यश्लोक अम्मा युगायुगातून एकदाच अवतार घेत असतात. त्यांना शरण जा, अवघ्या आयुष्याचे कळघम कळघम होऊन जाईल. जय हो पुरात्ची थलैवि!
 

Saturday, April 19, 2014

इतिहासाचे नागरिकशास्त्र

इभूना- एक असा शब्द जो शाळेत असताना चेहऱ्यावर "कुणी मला अभ्यासाला घेता का? अभ्यासाला?" अशी श्रीराम लागूंची अजीजी घेऊन वावरत असायचा. गरजूंनी लागूंचा चेहरा डोळ्यासमोर आणावा. गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र असल्या प्रभृतींच्या वाड्याबाहेर वळचणीला उभा असल्यासारखा. मग लोकही दानधर्माचे पुण्य पदरी पडत असल्याप्रमाणे परीक्षेच्या आधी एक दिवस अभ्यासाची भिक्षा घालत. "थे भुते नाचतात" असे त्याचे वात्रट नामकरणसुद्धा झाले होते. सद्य परिस्थितीत लोकशाहीच्या पाईकांचे जे काही नर्तन चालू आहे ते पाहिल्यास इभुना, हा शब्द योग्यच वाटतो. इतिहास आणि नागरिकशास्त्र यांच्या अभद्र युतीमध्ये मध्ये भीषण भुते नाचत आहेत. आणि आपला बिघडलेला भूगोल मात्र केविलवाणा असा कोपऱ्यात बसला आहे.

इतिहासाशी माझे वाकडे नव्हते, आजही नाही, फक्त मार्कांपुरती तडजोड होती. गुरुजनही या विषयाला धरून कधी आमच्या मागे लागल्याचे आठवत नाही. मला वाटते त्यांनाही त्यांच्या शालेय जीवनातील इतिहासातील लढाया, सन, कोण कुणाला कधी काय म्हणाले वगैरे प्रकार आठवून आमची दया येत असावी. पण हल्ली मात्र इतिहासाला चांगले दिवस आलेत. जो तो उठतो तो आईमाई काढल्यासारखा दुसऱ्याचा इतिहास काढतो. निवडणुका जवळ आल्या की मग कसा एक एक जण जणू काही इतिहासाचार्य वि. का. राजवाडेच. ज्याच्या इतिहासाचे ज्ञान शिवाजीमहाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला इथपासून सुरु होऊन पहिल्या बाजीरावाने मराठी झेंडा अटकेपार (म्हणजे नेमका कुठे हे माहीत नाही. गावाचे नाव की केवळ विशेषण?) नेला इथे संपते, तो आज निवडणूकज्वराने फणफणून इतरांच्या इतिहासाच्या ज्ञानाचे वाभाडे काढत आहे. दुसऱ्याला "फेकू" म्हणत आहे.  शाळेत शिकवलेला इतिहास आणि निवडणुकीत जिंकायला लागणारा इतिहास यात फरक असावा. पण राजकारणात स्मरण ठेवणे आणि विसरणे दोन्ही आवश्यक आहे असे दिसून आले आहे. मग आपण कोणती वचने दिली होती, काय काय फुकट देणार म्हणालो होतो हे विसरता येते. पण त्याच वेळा विरोधी उमेदवार कुठे, किती वाजता आणि काय म्हणाला याचे सूक्ष्म स्मरण ठेवता येते. असा इतिहास जर शाळेत शिकवला तर विद्यार्थी या बाबतीत कच्चे राहणार नाहीत. अभ्यासक्रमात अशा इतिहासाचा अंतर्भाव व्हायला हवा.

नवीन इतिहासाच्या भावी विद्यार्थ्यांसाठी काही भावी नमुना प्रश्न -
कोण कुणाला कधी म्हणाले ते लिहा  (कोणतेही ५)-
१. बडे बडे शहरो में ऐसी छोटी छोटी बाते होती रहती है.  (२ गुण)
२. आपल्या गावात मतदान करून झाल्यावर ती शाई पुसा आणि मुंबईला मतदान करा (२ गुण)
३. आता धरणात पाणी नाही तर आमी काय करायचं? xxयचं का त्यात? (२ गुण)
४. उचला रे त्याला! (२ गुण)
५. क्या? थप्पड मारा? एकही मारा?  (२ गुण)
६. अगर सरपे बंदूक रख दी जाये, तो नमोको सपोर्ट करेंगे. (२ गुण)
७. अरे तेलकट बटाटेवडा त्यांना खायला देता? कुठं फेडाल हे पाप? (२ गुण)

पर्याय - प्रश्न क्र. ४ अथवा ७ ची नाट्यछटा साभिनय सादर करा आणि तसे काही म्हणाले नसल्याचे सिद्ध करा (१० गुण)

इतिहास, भूगोल परवडला, पण नागरिकशास्त्र नावाचा जो रटाळरस प्यावा लागे त्याने इंन्स्टंट समाधी लागत असे. ज्यांना निद्रानाशाचा विकार जडला आहे अशा गरजूंनी जरूर प्रयोग करून पहावा. आमच्या पुस्तकात तर लोकसभा, राज्यसभा सदस्य संख्या दाखवणारे चित्रसुद्धा होते. त्यात बिनचेहऱ्याची झोपाळू दिसणारी टोपीरत्ने दाखवण्यात आली होती. संमोहनतज्ञ जसे एखादी वस्तू वापरून संमोहननिद्रेत टाकतात तसा या चित्राचा परिणाम माझ्यावर होत असे. पुढे लोकसभेत गाढ व शांत (इथे गाढ आणि व असे दोन वेगळे शब्द आहेत याची कृपया नोंद घ्यावी. धन्यवाद!) झोपलेले खरेखुरे सदस्य पाहून शिकवलेले सगळेच काही निरर्थक नसते असे वाटले. नागरिकशास्त्र दहावीपर्यंतच झाले. पण ते सत्याशी इतके जवळचे आहे हे पाहून वाटले पुढे नागरिकशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले असते तर लोकशाहीचे बारकावे शिकता आले असते. बेरजेचे राजकारण म्हणजे काय, जाहीरनाम्याचा पंचनामा, विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या चारित्र्याचे रसग्रहण, सभा आणि गर्दीचे समीकरण, आणि ते कसे सोडवावे हेसुद्धा, एकगठ्ठा मते आणि अल्पसंख्यांक,  मतदानकेंद्रे कशी चालवावीत, मतपेट्या हाताळणी, निकालानंतरच्या वाटाघाटी असे अनेक विषय लहानपणीच्या नागरिकशास्त्रात नव्हते. ते शिकता आले असते. नवीन नागरिकशास्त्रात याचा अभ्यास शाळेपासूनच लावला पाहिजे.

नवीन नागरिकशास्त्राच्या भावी विद्यार्थ्यासाठी भावी नमुना प्रश्न -
कोणतेही तीन प्रश्न सोडवा (१० गुण)
१. पक्ष १ कडे २८ जागा, पक्ष दोन कडे ३२, पक्ष ३ कडे ८ आणि फुटकळ पक्ष २. योग्य समीकरणे जुळवून सरकार बनवून दाखवा.
२. प्रश्न क्र १ मधील सरकार किती दिवसांत पडेल याचे समीकरण आकड्यात लिहून सिद्ध करा.
३. प्रश्न क्र १ मधील फुटकळ पक्षांचा समीकरणातील प्रभाव किती प्रतिशत असेल? (गृहित - एका सीट साठी २० खोका)
४. आपल्या राज्यात अभूतपूर्व प्रगती झाली आहे हे केवळ आकडे देऊन सिद्ध करा. (गृहित - प्रगती झाली आहे)
५. लोकशाही आणि गुन्हेगार उमेदवार यांच्यातील संबंध सोदाहरण स्पष्ट करा आणि दोन्ही एकमेकाला कसे पूरक आहेत ते सिद्ध करा. (स्थानिक उदाहरणे टाळा.)
६. प्रभाग क्र २ मधील मतदार मुख्यत्वे विरोधी पक्षाला मत करणार असे दिसून आले आहे. मतदाराला न दुखवता अथवा कळू देता मते कशी मिळवाल ते पर्याय स्पष्ट करा (गृहित - मतदार सुशिक्षित आहेत. आमिषाचा वापर चालणार नाही)

पर्याय - प्रश्न क्र १ आणि २ साठी १५ मिनिटांची एकांकिका लिहा. (३० गुण)

चालू शिक्षण (चालू हे विशेषण नाही ) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी असा नवीन अभ्यासक्रम आणणे आम्हांस आवश्यक वाटते. आमच्या या विचारसरणीवर शिक्षणमंडळ विचार करील काय? अभ्यासक्रम काहीही येवो. नमो, पप्पू, केजरीसर आदि महानुभाव भावी इतिहासाच्या पुस्तकात नक्की असणार आणि भावी विद्यार्थी त्यांच्या चित्रांना दाढीमिशाही नक्की काढणार. नमोंना त्याची सोय आधीच करून ठेवली आहे. चिंता पप्पू आणि केजरीसरांनी करावी.

Friday, April 18, 2014

ब्रम्हदेवाचा बाप

निवांत कमळावर बसलो होतो. विश्वनिर्मिती करून आत्ताच कुठे काही युगे उलटली होती. म्हटलं जरा डुलकी काढावी. म्हणून कमलदल जरा मिटून घ्यावं या विचारात तेवढ्यात हा नारद हजर! आला की समजावं डोकेदुखीची निश्चिंती. चहा घेऊन झाला तरी उठत नाही. झोपलो आहे असं दाखवावं तर लेकाचा त्रिकालज्ञानी. "गुरुदेव! पुरे झालं सोंग" असं म्हणायला कचरत नाही. परत सडाफटिंग. एक तंबोरा टाकला गळ्यात की निघाला. आधी फोन करेल, पत्र पाठवेल, काही नाही. शिवाय "नारायण! नारायण!" असे शब्द ऐकून सध्या आम्हास खिन्नता प्राप्त होते. सध्या भूतलावरतीसुद्धा असाच एक कळीचा नारायण कॅलिफोर्निया होऊ घातलेल्या कोकणाचं पुन्हा कोकण करतो आहे असे आमच्या डावीकडच्या मस्तकाने सांगितले. त्यावर आमच्या उजवीकडील मस्तकाने नि:श्वास टाकून नारूची लागण वाईटच असे उद्गार काढले. महाराष्ट्र सरकारने "पाणी गाळा नारू टाळा" च्या घोषणा करूनही काही उपयोग झाला नाही असे दिसते असे मी गमतीने म्हणालो. त्यावर "हे जीवजंतूही आपलीच कृपा." असे काहीसे लागट उद्गार नारदाने काढले आणि आमची तिन्ही तोंडे चूप केली. हा नारद म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. दुरुत्तर करून निरुत्तर करण्यात पटाईत.

"बोला का येणे केलेत?" अवेळी असे म्हणणे टाळले. नारद वेळ अवेळ यांच्या पलीकडे आहे. "पृथ्वीवरील बातमी आहे, हे जगतस्वामी." एवढी विश्वनिर्मिती केली, पण मालाबद्दल तक्रारी जेवढ्या भारतवर्षातून येतात तेवढ्या कुठूनच येत नाहीत. "आता काय झालं? दानव वगैरे तर त्रेतायुगातच संपले. आता काय?"

"ते दानव परवडले, कलियुगातील हे महानुभाव पाहिले तर दानव म्हणजे स्काऊटमधील परोपकारी मुले वाटतील. आता तर डायरेक्ट तुमच्या आसनाला धोका आहे देवाधिदेवा."

"अरे असा कोड्यात बोलू नकोस बुवा. काय ते नीट सांग. कोण आमच्या कमळाला पाण्यात पाहते आहे?" आम्ही जरा विनोद केला. "देवा, ही वेळ विनोदाची नाही. कृपया सिरीयस व्हा."

या नारदाने एक वेगळीच चिंता आज आणली खरी. आम्ही पाऊस पाडला, धरणे ओसंडवली, एवढंच काय आम्ही प्रत्यक्ष प्रगटलो तरी एका ग्रामात पाणी पोचणार नसल्याची खात्री एका नरपुंगवाने दिली आहे. ते ऐकून आमची तिन्ही तोंडे आश्चर्याने काही काळ मिटली नाहीत. लगेच भानावर येऊन अंतर्ज्ञान शोधू लागलो. लगेच सत्य जाणले. आमची चर्या थोडीशी मवाळ दिसत असणार. नारद म्हणाला,"देवा, तुम्हाला क्रोध आलेला दिसत नाही. माझी वारी फुकट जाणार की काय?" त्याला म्हणालो "हे मुनिश्रेष्ठ, हा नरश्रेष्ठ, आजवरचा सर्वोत्तम बंधु म्हणून गणला जाईल. हे त्याने केलेले वक्तव्य केवळ भगिनीप्रेमातून प्रकटले आहे. आजवर जेवढे बंधु झाले, त्यांनी स्वभगिनींचे संरक्षण करणे तर सोडाच, उलट भगिनींनाच त्यांचे संरक्षण करावे लागत होते. बालपणी आईबापांच्या क्रोधापासून तर मोठेपणी सर्वांच्या कोपापासून. पण हे बालक वेगळे निपजले. आपला राज्याभिषेक होणार नाही, भगिनीचा होणार हे माहीत असून सुद्धा तिच्या विजयासाठी रात्रंदिवस ते राबते आहे. हे म्हणजे एखाद्या एडक्याने आपल्यासाठी कसायास योग्य भाव मिळेल की नाही याची चिंता लागून, स्वत:च गिऱ्हाईक शिंगाने ढोसत आणल्यासारखे आहे. तेव्हा मुनिश्रेष्ठा, त्याच्या अंतरीचा भाव पाहा, बाजारातील भाव नको."

मुनिश्रेष्ठ म्हणाले,"देवा, मला त्या एडक्याची चिंता नाही. चिंता आहे ती ज्या गिऱ्हाइकाला हा एडका ढकलत आणतो आहे, त्याची. त्याचे द्रव्य तर जाईलच वर मांसही मिळणार नाही. हा एडका देवा, आपल्यालाच अर्पण केल्यासारखा गावातून खुरांनी माती उकरत, नाकातून फुस्कारत फिरत असतो. हा जिथून जात असेल तिथून देवा, लोक जाणेही टाळतात. कधीही ढुशी देऊन कुणालाही पाडतो, जायबंदी करतो. हे सारे त्याच्या जमीनदार मालकाच्या पथ्यावर पडते. या एडक्याच्या उपद्रवाला कंटाळून किंवा घाबरून जन ग्राम सोडून जातात आणि त्यांची घरे, जमिनी हा जमीनदार बळकावतो. असे हे सगळे दुष्टचक्र चालले आहे. आता तर हा एडका आपणास आव्हान देऊ लागला आहे. स्वत:स देवा, तुमचा बाप समजू लागला आहे. अर्थात त्याचे तुम्हाला आव्हान म्हणजे मूत्रविसर्जनाने धरण भरण्याचे आश्वासन देण्याइतकेच मूर्खपणाचे आहे. पण त्यात जो मद भरला आहे तो ध्यानी घ्या. त्याने प्रजा गांजून गेली आहे. तेव्हा आपण काही तरी करा. निर्मिती करून आता निद्रेत जाऊ नका. अवतार घ्या. तुम्हाला वेळ नसेल तर विष्णूदेवांना विनंती करा.  ते यदा यदा हि धर्मस्य वाले ना? ती ग्लानि भारतवर्षावर आली आहे म्हणावे. तेव्हा कसेही करा, या एडक्याला आवरा , त्याच्या मालकाला आवरा."

Thursday, April 17, 2014

एका पंक्चरलेल्या मारुतीचा प्रवास

जय साई! जय मंत्रालय! हे वेगळं मंत्रालय बरं काय. सद्या हे एकच गाव पावतंय म्हणा आमाला. आमचं कुठलं पण काम असलं तरी जय साईनं सुरवात करायचं असं पायंडा घालून घेतलं की हो. चालू रोजी आमचं साई आमाला पावत नसलं तरी त्यांचं लातसूध्धा पवित्र माणून घेतोय. ओम साई! ते कदी कृपा करंल कुणी सांगावं. चाळीस वर्षपूर्वी असंच कृपा केलं की हो. आमच्या हाटेलमदी असंच बसलो हुतो. दुपारच्याला गिऱ्हाईक जरा कमीच असतंय. टेबलावर माशा लई बसल्या आणि आमचं फडकंवालं पोरगं कुटं गायब झालं होतं काय की, म्हणून सोता उठून फडका फिरवत होतो तर एकदम गलका झालं. काय म्हणून बगितलं तर साक्षात परमेश्वरच उभं की हो दारात! साईssss असं मनात ओरडून साष्टांग नमस्कारच घातलं. साक्षात संजय गांधी की हो! काय छान फडकं फिरवतो रे म्हणून मला उटीवले आणि जवळ बशिवले. मग मी हात आन पाय दोनी जोडून विचारलं हितं कुटं वाट वाकडी केली सरकार? म्हणले काय हो तुमचं गाव. एवढं डेक्कन डेक्कन म्हणून प्रशिध्ध, पण एकदोन इराण्याचं दुकान सोडलं तर चा मिळत नाही कुटं. गाव पण आसं दोनपारच्याला इराणीबी दुकान बंद ठिवतोय. मग म्हणाले हे तुमचं तेवढं उघडं दिसलं. म्हंजे हॉटेल हो! खी खी खी! बोर्ड पण बरा वाटला - पूना कॉफी हाऊस. हे तुमचं हौस की हाऊस हो? मी हे हे हे करून हसलो. इनोदबुध्दीच फार सायबांना. सायबांनी भिंतीवर फोटो पाह्यला. आं? तुमी पन पायलट होते का? म्हनलो हां. एकदोन वर्स होतो, मग ढेरी फुडं इमानाच्या स्टेरिंगला चिटकायला लागल्यावर म्हटलं का उगाच नशिबाची परीक्षा घ्या, सोडून टाकलो आर्मी. म्हणले अरे वा वा! आमी पण कदी कदी उडवते. आरे पण तू इथे फडका काय मारते. आमच्या पक्षात येऊन जा. मनात म्हणलं, का? तिथं पन घान पुसायला फडके मारणारे लागतात म्हणून? पन म्हणलं आरे पहिले फडकं मारू, नंतर हात मारू. हाहाहाहा! हात मारू! नुसत्या कल्पनेनंच गुदगुल्या झाल्या. सायबांनी मग तिथल्या तिथं आपल्याला युथ कॉंग्रेसचा प्रेशिडेंटच करून टाकलं आणि आता निघतो म्हणाले. सायबांनी चपला बाहेर काडल्या होत्या त्या आणायला गेलो. सहज गेटाबाहेर नजर बाहेर गेली तर बारामतीचा बबलू बाहेर उभा राहून काय चाललंय बगत होता. माझी नजर गेल्यावर एकदम चालू पडला. हा बबलू पुन्यात जितं जितं मोक्याची जागा असंल थितं आपल्या शारदेचा विकास करतो. नजर ठेवली पायजे याच्यावर. लय कोम्पिटिशन करणार हा.

हाय कमांड म्हणले जा ऑलिम्पिक मेरेथॉन सिलेक्शन कमिटीवर. आता पळण्याचा आमाला लई आनभव. लहानपणी डोशाच्या पिठात हात बुडवले म्हणून आई उलथनं घेऊन मागे लागली की कधीच सापडायचो नाही. दिवाळीत लक्ष्मी सुतळी बॉम्बची वात लावून पळताना सगळ्यांच्या पुढं मी असायचो. हा आनभव हाय कमांडच्या नजरेत भरला आसणार. मंग नंतर आपन मागे वळून बगितलंच नाही. आन मग थितुन पुढं मी पुन्याचा विकासच विकास करून सोडला. आता गावाचा विकास झाला तर रहाणाऱ्याचा होणारच. आपला पन झाला त्याला मी काय करणार. लोक म्हणाले पेट्रोल पंप काय काडला, रीपेरीचं दुकान काय काडलं. पुण्यातले लोक पन आसे आहेत ना, आन्ना म्हटलं की पमचरचंच दुकान काडणार आसं वाटतं तेंना. आता आमच्या हितं पमचरपन काडून मिळतं म्हणा. पन लोक आपन गनपतीउत्शाव पन चालू केला, बगायला फॉरीनरं आणली एवढी आसं म्हणत नाहीत. आरे पूर्वी फक्त उत्सव होता, आता एवढा बीजणेस करून दिला तेचा काय? लोकमान्य टिळक मला शाबासकीच देल. पन लोकान्ला दूसऱ्याचा विकास पाहवत नाही. तसा मला पण पाहवत नाही दुसऱ्याचा म्हणा, पन तो मुध्धा वेगळा. लोक म्हणतात सगळं हितंच करतोय. पेट्रोल पंप, रिपेर शॉप. आपण तर हाटेलवाले. हाटेलच्या गल्ल्यावर बसून सगळीकडं नजर ठेवता येते.

सद्या दिवस वाईट आलेत. आपला कायपन दोष नसताना "आत" टाकलं मला. मी पन कदीतरी बगून घेईल त्या बबलूला. तेचाच काम हे. आरोप काय तर आपण स्कोरिंग मशीनमध्ये गडबड केला. आता उद्या म्हणाल पुण्यातल्या रिक्षांचा मीटर पन आपणच बशिवला. बाकी तिहारजेलचा म्यानेजमेंट एकदम बेकार हाये. एसी नाय, टीव्ही नाय, बेड नाय, सकाळी ब्रेकफास्ट बेडमदी तर नायच उलटा लाईनमदे हुबा ऱ्हायला सांगायचे. मी तेनला बोललो मला चालवायला द्या, आपल्याला हाटेलचा लय आणभव आहे. तर मला बोलले हे काय ऑलिम्पिकचा होटेल वाटला काय तुला, चल जा लायनमदी उभा ऱ्हा. पुन्ना हे शीबीआय वाले येऊन डोकं खायचे. मग आपण पण काय कमी नाय, बोलून चालून कॉंग्रेसवालेच. मी तेंना आपल्याला आता कायच आठवत नाय असं दाखवायचो. साईनी वाचवला मला. आता भायेर आलो आहे. पन तिहारच्या सवयी अजून जात नाहीत. रात्री झोपेत शेजारी कोणीतरी झोपलंय असं वाटलं तर झटका आल्यागत बेडमदून उठतो. बगतो तर आमचंच बायको असतं. सकाळी हातात मग घेऊन किचनमदे उभा राहतो. बायकोनं काफी घातली की मगच टेबलावर जाऊन बसतो. टॉवेल गुंडाळूनच आंघोळ करतो. आंघोळ करताना साबण खाली पडला तर अजाबात उचलायला जात नाही. तिहारमदे एकदा ती चूक केली होती…आठवणीनं अंगावर शहारा येतो. जाऊदे.

आज जरा जास्तच उदास हाये. कॉंग्रेसमदे सर्वेच चोरांची इज्जत होते. भुरट्या चोरांचीपन होते, इथे आपण तर "रेस २" मदल्या जॉन अब्राहमसारका. चोरी करेल पण ष्टाईलमदे, ते पन पार्टीसाटी, सोतासाठी थोडेच करेल. आपल्याला हाये ना इथे आपला हाटेल, पंप आणि रिपेर शॉप. आपल्या इमानाची कदर नाय. ते चव्हाण एवढा घपला केला आदर्शचा, तेला तिकीट! आनि आमी इथे गल्ल्यावर परत! खऱ्याची दुनियाच नाय ऱ्हायली. हाल्ली भाजपमदे पन आपल्यासारक्यांना लय डिमांड आहे असं ऐकतो. रेझ्यूमे पाठवावा काय? पन कॉंग्रेसमदे म्हंजे कसं सोताच्या घरी असल्यासारखं वाटतं. आपन पुन्यात जलमलो. (आमचं आप्पा म्हणतं पुन्यात, आई म्हणतं मद्रास, तेंनाच म्हायती काय ते) आपन पुण्याचं कर्ज फेडणार म्हणून हे एवढं करायचं. तर आता सद्यातरी पुन्ना गल्ल्यावर बसलो आहे. "नोकर पाहिजेत" अशी पाटी लावून चार दिवस झालेत, आजून एक पन आर्ज आला नाही. आज आता खुलासा लिहितो खाली - "सिलेक्शन कमिटीवर मी नाही!". बगूया मग तरी येतात का. ओम साई!

 

Wednesday, April 16, 2014

ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!

"कवा आलायसा? ऱ्हानाराय न्हवं?" या शब्द ज्या मातीतले, त्या मातीतील माझा जन्म. कोल्हापूर हे नाव लौकिकार्थानं. पण ते खरं आमचं कोल्लापुरच. अंबाबाईचं, ज्योतिबाचं कोल्लापूर. झणझणीत रश्शाचं, चमचमीत मिसळीचं कोल्लापूर. अंगावर लाल माती उडवून आखाड्यात पहुडलेल्या पैलवानांचं, आणि विद्यापीठात नाव काढलेल्याचंपण कोल्लापूर.  प्रेमळपणा आणि रांगडेपणा याचं हवंहवंसं वाटणारं दुर्मिळ मिश्रण असलेलं हे गाव.

सुट्टी लागली की कोल्लापुरचे वेध लागायचे. सगळी मामेभावंडं, मामा, माम्या भेटणार याचा आनंद डोक्यात मावत नसायचा. पाच सहा तासांचा येष्टीबसचा प्रवास म्हणजे त्यावेळी खूप वाटायचा. कोकणातील लाल माती, गर्द झाडी बसच्या खिडकीतून दिसत राहायची. मग अचानक ती लाल माती धूसर होऊ लागे. झाडी विरळ होऊन माळरानं सुरु होत. मधूनच डेरेदार आंब्याचं झाड, पण बहुतांशी बाभळीची झाडे, काळीभोर जमीन, उसाची शिवारे असं चित्र, एखाद्या चलतचित्रपटासारखं खिडकीतून सरकायला लागलं की ओळखायचं, घाट ओलांडून देशावर आलो. कोकणात त्यावेळी रिक्षा वगैरे प्रकार सुरु झाला नव्हता. पण कोल्हापूरच्या बसस्थानकावर उतरलं की समोर दोन रांगा दिसायच्या. एक रांग टांग्यांची, दुसरी रिक्षांची. मला टांग्यात बसायचं असे, तर भावाला रिक्षात. शेवटी लवकर पोचू म्हणून रिक्षेनं जायचं ठरायचं. स्थानकाबाहेर कितीही गजबज दिसली तरी एक प्रकारचा निवांतपणा वाटायचा. इथं कुणाला कसलीही घाई नाही असे वाटायचे. रिक्षेने घरी पोचलं की भावंडं गळ्यात पडायची, हातातल्या पिशव्या, सूटकेसेस घरात घेऊन जायची. पाया पडायला दबकत मामाच्या समोर जायचं. मग मामा खास कोल्हापुरी थाटात "केव्हा आलात  रे **विच्यानों?" अशी प्रेमळ विचारणा करत पोटाशी धरायचा. मग सुरु व्हायचा अखंड धिंगाणा, खेळणं. घरात शिरल्यावर प्रथम दर्शन व्हायचं ते ज्योतिबाच्या फोटोचं. भरघोस शुभ्र आकडी मिशा, भला मोठा कोल्हापुरी फेटा, कपाळावर गुलाबी भंडारा. आणि ते डोळे! डोळ्यात धाक आणि प्रेम दोन्ही. अगदी मामासारखं. मामा लोक पण कपाळाला तसेच उभे भंडाऱ्याचे बोट लावत. त्यामुळं त्या वयात ज्योतिबा म्हणजे आमच्या मामांपैकीच एक वाटायचा. किंचित कठोर दृष्टी, पण ती दृष्टी अनिष्टापासून संरक्षण करण्यासाठी कठोर केलेली. दृष्टी कठोर असली तरी, हृदयात असलेली कृतीतून जाणवणारी अशी ती अबोल अपार माया. आपल्याला दैवतं अनेक आहेत, पण असं घरातलंच एखादं जवळचं माणूस असावं असं वाटणारं दैवत एकच.

मग एके दिवशी ज्योतिबाचा डोंगर आणि मग पुढे पन्हाळा अशा सहलीची टूम निघायची. गावातील अरुंद रस्ते गल्ल्या मागे पडून एकदम शिवारं सुरु व्हायची. गुऱ्हाळांचे दिवस असायचे. कधी कधी दुरून खमंग गुळाचा वास येई. बैलगाड्यांचे जथे ऊस लादून कारखान्याकडे चाललेले. मागे ऊस ओढून पळवणारी वात्रट पोरे, त्यांना "च्या बायली!" असं म्हणत हाकलणारा गाडीवान अशी दृश्ये दिसत. थोड्याच वेळात दूर डोंगरावर कळस दिसायचा. केवळ पश्चिम महाराष्ट्रात सापडणाऱ्या काळ्याकुळकुळीत दगडातील बांधकाम. हेमाडपंथी शिखरं. वरती फडफडती ध्वजपताका. भल्या मोठ्या दिंडीतून प्रवेश करायचा. प्रवेशाची दिंडी सुद्धा ऐसपैस. दोहो बाजूला पैस ओसऱ्या. एखाद्या किल्ल्याचं प्रवेशद्वारच. पूर्वी पहारा देणारे वेसकरी ओसरीवर कांबळ्याची चुंबळ टाकून बसलेले आहेत. पेटलेली चूड खांबाला रोवली आहे. हवेत गारवा आहे. वेसकरी स्वत: भरगच्च मिशा, मुंडासं, पायात धनगरी कडं, गळयात आणि दंडावर ताईत, बिनहाताची पैरण आणि गुडघ्यापर्यंत मळकट धोतर अशा वेशात जरबेनं पाहतो आहे असं मला वाटायचं. भोवतीच्या काळ्या पत्थरासारखीच शरीरयष्टी. जसा देव तशीच त्याची लेकरं दिसायची. आजकाल दिसत नाहीत पण त्याकाळात दर्शनाला आलेले भाविकही थोड्याफार फरकाने असेच दिसायचे. दिंडीतून आत आलं की भव्य आवार. मधोमध मुख्य देऊळ. समोर दीपमाळ. अप्रतिम शिल्पकाम असलेले दगडी खांब. नजर टाकली की प्रथम नजरेत भरायची ती एक गोष्ट. सर्व परिसर गुलाबी भंडाऱ्यात माखलेला असायचा. संपूर्ण देऊळ ज्योतिबाच्या रंगात रंगलेलं वाटायचं. भाविकही भंडाऱ्यात न्हालेले. या भंडाऱ्याच्या कल्लोळातून प्रगट व्हायचा स्वत: ज्योतिबा. सदैव जागृत. युगानुयुगे उलटून गेली असणार. अनेक उलथापालथी झालेल्या पाहिलेल्या असणार. अनेक वादळं येऊन गेली, सुग्या पाहिल्या, दुष्काळ पाहिले. घरं मुलाबाळांनी भरून गेलेली पाहिली, रिती झालेलीही पाहिली. वाडे उभे राहिले, भग्नही पावले. परचक्रं येऊन गेली, आता स्वकीयांनी आणलेली दुष्टचक्रंही पाहतोय. त्या उंच डोंगरावरून ज्योतिबानं स्थिर नजरेनं हे सगळं पाहिलं असणार. निर्विकल्प, निराकार. तरीही "मी इथे उभा आहे, तुमच्यावर नजर ठेवतो आहे. धडपडलात तर हात द्यायला, उतलात मातलात तर जरबही द्यायला मी आहे." असा तो उभा आहे. माणसाला तरी काय हवं असतं? औंदा काय पावसकाळ खरा नाही बाबा, जित्राप चाऱ्यावाचून कसं जगंल, पोरीचं लगीन काडलया, ते कसं व्हावं, असल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या गोष्टी माणसानं कुठं करायच्या? ज्योतिबा असल्या सगळ्या चित्तरकथा ऐकून घेतो. म्हणत काहीच नाही. पण ज्योतिबाला त्या सांगितल्या आणि त्यानं त्या ऐकल्या या समाधानात मग माणूस परततो. श्रद्धा म्हणजे तरी आणखी काय असते? आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कुणीतरी आपल्याला बळ देईल ही खात्री हीच श्रद्धा ना? आणि असं बळ देणारा, तुमच्याआमच्यासारखा दिसणारा असला तर मग तो देव उरत नाही, जिवाभावाचा होतो. जसा मला तो माझ्या मामासारखा दिसतो तसा. त्याला आदरानं नमस्कार केला तरी उठवून पोटाशी धरणारा. चांगभलं! ज्योतिबाच्या नावानं चांगभलं!


 

Tuesday, April 15, 2014

हिरवा राघू

आमच्या गावी दर शनिवारी बाजार भरत असे. आजूबाजूंच्या खेड्यातून शेतकरी भाज्या, कणसे, ज्वारी, केळी, कलिंगडे असं काय काय विकायला घेऊन येत. पोरांसाठीपण अनेक गोष्टी असत. विजेवर चालणारा चक्री पाळणा, छर्रे उडवायच्या बंदुकीतून फुगे फोडण्याचा तंबू, असलं बरंच काही असायचं. कुडमुडे ज्योतिषीही असायचे. मांडी घालून बसलेले. शेजारी छोटासा लाल रंगाचा चौकोनी लाकडी पिंजरा. त्यात एक पोपट. दुसरा एखादा मागे ठेवलेला. हा ज्योतिषी नुसते भविष्य सांगायचा असे नाही, मध्येच पोपटांकडून खेळ पण करून घ्यायचा. ते पोपट बोलायचे, तारेवर चालून दाखवायचे. मग त्यानंतर त्यांना एक पेरूची फोड मिळत असे. मग ते परत आपापल्या पिंजऱ्यात जाऊन बसायचे. मला कधीच ते पोपट काय बोलताहेत ते कळले नव्हते. पण लोक टाळ्या वाजवायचे याचा अर्थ ते काही तरी समजेल असे बोलले असणार असे मी गृहीत धरायचो. बरेच लोक काही न देताच निघून जायचे. काही लोक चवलीपावली टाकायचे. काही लोक मग थांबून उकिडवे बसून हात दाखवत. एक रुपयात आपले लाखमोलाचे भविष्य ऐकत. भविष्यात आनंद आहे की आनंदीआनंद हे त्या पोपटाच्या हातात, आपलं, चोचीत असायचं. जो स्वत: पिंजऱ्यात आहे, पुढे मिळणाऱ्या पेरूच्या फोडीवर अथवा मिरचीच्या तुकड्यावर ज्याचे आयुष्य चालले आहे, ज्याला स्वत:च्याच भविष्याचा पत्ता नाही अशा त्या दुर्दैवी पक्ष्याकडून आपण आपल्या भविष्याचे पाकीट काढून घेत आहोत हे अशा लोकांच्या गावीही नसायचे. ज्योतिष्याच्या बेरकी चेहऱ्यावरचे भाव वाचता येत नसत. पोपटाच्या चेहऱ्यावर गंभीर ऋषीचा भाव असायचा. ऐकणारा मात्र आशेने नजर लावून बसलेला असायचा.

पण चूक पोपटाची नाही. गांधी टोपी घालून पांढरे कपडे परिधान करून, कपाळावर उभी गुलालाची रेघ काढून बसलेला करता करविता असा तो कुडमुड्या ज्योतिषी, तो जसे शिकवेल तसेच हा पोपट करणार आणि बोलणार. गंध लावून आलेल्या गिऱ्हाईकासमोर "राम राम!" आणि मुल्लासारखी टोपी घातलेल्यासमोर "वालेकुम अस्सलाम!" शेवटी दोघांकडून चवलीची अपेक्षा आहे. मुल्लासमोर राम राम घातला तर ती चवली कशी मिळणार? वास्तविक, आमच्या गावात गंधशेंडीवालेही हजरत अलींच्या दर्ग्याला जाऊन ऊद जाळतात, गुलाल टाकतात, चादर चढवतात, नवस बोलतात. आमच्या घरी नेहमी येणारा शिकलगार, गणपतीच्या देवळात नियमित जातो. त्याच्या अब्बूंनी त्याचे नावही गणेश रहिमान शिकलगार असे ठेवले आहे. धर्म आणि श्रद्धा ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. पण जेव्हा जमावाच्या धर्माची गोष्ट होते तेव्हा तिचे रूप बदलते. हे आमच्या त्या कुडमुड्या ज्योतिषालाही कळते आणि त्याचा तो उपयोग आपली वीतभर खळगी भरण्यास करतो. आणि पोपट तर बोलून चालून बोलका राघू. कुठे वन्दे मातरम म्हणायचे आणि कुठे दातखीळ बसवावी हे त्याच्या धन्याने शिकवावे आणि त्याने ते निमूटपणे करावे. अशा राघूंची चोच जरी भगवी असली तरी अंग हिरवे असते. आणि त्यांना फक्त बोलायचेच असते. करायचे कुठे काय असते? भविष्य ऐकून गेलेला मनुष्य कधी परत येऊन ते खोटे ठरले म्हणून मुंडी धरणार नाही याची खात्री असते. शिवाय आलाच जर असा कोणी संतापून परत, तर, "काय गरिबाला झोडता साहेब? पोट भरतोय साहेब." अशी केविलवाणी आळवणी करायची. चवलीच्या किमतीच्या भविष्याची ग्यारंटीही चवलीकिमतीची.

दुर्दैवाने अशा पोपटपंचीला आकाशवाणी समजून बसलेल्यांची संख्या वाढली आहे. ही पोपटपंची ऐकून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक, ती खरी व्हायच्या आधीच अशा पोपटांचे गुणगान करीत आहेत. संख्या अथवा पाठीराखे हेच गुणांचे प्रतीक अशी लौकिक व्याख्या असल्याने उन्माद वाढतो आहे. अर्थात हेच मुंगेरीलाल, स्वप्नभंग झाल्यावर पोपटाची पिसे काढणार आहेत. तूर्तास हे राघू काहीही बोलले अथवा लाचारीने चूप राहिले तरी ते गोड लागणार. स्वप्ने विकणे हा पूर्वापारपासून चालत आलेला धंदा आहे. असे राघू बोलत राहणार, दुर्दैवी लोक निर्बुद्ध श्रद्धेने डोळे मिटून त्यांच्यामागे जाणार. सुजाण लोक चवली टाकून ऐकत राहणार. गम्मत बघणार. पण आपले जवळचे कुणी आजारी असेल तर या पोपटांकडे जाऊन भविष्य बघण्यापेक्षा, डॉक्टरकडेच जाणार.

शेवटी शनिवारच्या बाजारात सर्व प्रकारचे लोक भेटणार. भाजीवाले, भविष्यवाले, अगदी खिसेकापूसुद्धा. आपण आपला पैसा भाजीभाकरीवर खर्च करायचा की पोट रिकामे ठेवून भविष्य ऐकून ते भरेल या आशेने कुडमुड्या पोपटाची धन करायची हे आपण ठरवायचे. शिवाय पोटापलीकडेही जगणे असते. त्याला स्वाभिमान, देशप्रेम, मातृभूमीप्रेम म्हणतात. स्वत:च्या आईला आई म्हणण्यास आणि तिला वंदन करण्यास आम्हास तरी लाज वाटत नाही. वन्दे मातरम!

Monday, April 14, 2014

माईंड इटटट!


पेप्रात बातमी दिसली. नमो गेले साऊथ(थ पूर्ण उच्चार) इंडियात (त पूर्ण उच्चार). सूssपरस्टार रजनीला भेटायला. छान इडली(ड पूर्ण उच्चार) चटणीसांबार खात होतो, चमच्यातील इडलीचा तुकडा एकदम खाली सांबाराच्या वाटीत पडला. आं? हा गृहस्थ कसा आणि कुठे उगवेल काही सांगता येत नाही. कालच्या कार्यकारिणीच्या बैठकीत नमोंच्या हालचालीवर लक्ष ठेवायला हवे अशी चर्चा झाली होती. जबाबदारी कोण घेणार असे केजरीसरांनी विचारले. बाकीच्यांनी चपळाईने काहीतरी करण्यास सुरुवात केली. बरेच जणांनी आपापल्या लॅपटॉपमध्ये डोके घातले, काही जण काही तरी लिहिण्याच्या बहाण्याने उगाच कागदावर गिरगटू लागले. नेमका मी गाफीलपणे शून्यात नजर लावून सरांच्या मागील भिंतीवर एक पाल किडा पकडत होती ते पाहत होतो आणि आयता सापडलो. सरांना वाटलं मी त्यांच्याकडेच पाहतोय. खूष होऊन मला म्हणाले, "छान! मग तूच घे ही जबाबदारी".  मी मान डोलावली आणि शेजारी आमचा मोरू बसला होता त्याला विचारलं,"कसली चर्चा चालली होती रे? आणि कसली जबाबदारी मला देताहेत?" मोरूने कागदावर झाडूचे चित्र काढले होते, त्यावर केजरीसर हॅरी पॉटरसारखे बसले होते. त्यांच्या गळ्यातील मफलर एखाद्या विजयपताकेप्रमाणे फडफडत होता. मला म्हणाला, आपण निवडणूक जिंकलो ना की हे चित्र मी सरांना भेट म्हणून देणार आहे. मोरू आमचा तसा सरळबुद्धी आहे पण लेकाचा चित्रे छान काढतो.  म्हणाला, सरांनी मला त्यांच्या आगामी "भ्रष्टाचारमुक्तीचे अठरा सोपान - अर्थात सुलभ मोक्षप्राप्ती" या पुस्तकाची स्वाक्षरीसहित प्रत द्यायचे वचन दिले आहे. मग फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी हे चित्र त्यांना देणार आहे. फक्त त्यांना आता प्रकाशक मिळायला हवा. जो कुणी प्रकाशक येतो त्यालाच सर अटी घालत सुटतात. अशाने कसे काय पुस्तक होणार? मी म्हणालो,"मोऱ्या, ते मरूदे. मला जबाबदारी कसली दिली आहे ते सांग. मी मान डोलावून बसलो आहे." तर मला म्हणतो,"कुणावर तरी कुणी तरी नजर ठेवायला हवी असे काहीसे म्हणत होते. मला वाटलं या सोमनाथबद्दल बोलताहेत. चहा सामोसे आणायला म्हणून जातो तो तासतास येत नाही. मागच्या वेळी बैठक चहाविना खोळंबली होती. शेवटी त्या मनीषला पाठवलं शोधायला. त्याला सामोसे आवडत नाहीत. लगेच पकडून घेऊन आला त्याला. पोरींच्या होस्टेलबाहेर सापडला म्हणे. दुर्बीण घेऊन उभा होता. सरांनी मग त्याला व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून भारतीय घटनेचे रसग्रहण कमीत कमी ५०० शब्दात लिहायला लावले. नंतरच्या दोन बैठकांना गैरहजर होता मग. गुरुनाथ नाईकांच्या 'गरुड' कथा वाचत असतो नेहमी."

या मोरूचा लेकाचा काही उपयोग नाही. नाईलाज होऊन मग सरांनाच विचारले. सरांनी ३० सेकंद माझ्याकडे रोखून पाहिले. त्या भेदक नजरेला कुणीच नजर देऊ शकत नाही. त्या नजरेत स्वच्छतेचे, पावित्र्याचे प्रखर तेज असते. मोरू म्हणतो तुला उगाच तसं वाटतं. त्याने म्हणे एकदा सरांना चष्मा काढून डोळे पुसताना पाहिले होते. आपल्यासारखेच दिसतात त्यांचे डोळे. चष्म्याने एवढा फरक पडेल? मला नाही वाटत तसं. भेदकच आहे नजर त्यांची. उगाच नाही भ्रष्टाचार दिसत सगळीकडे. पूर्वी आम्हाला दिसत नसायचा. सरांनी त्यांच्या दिव्य दृष्टीने आमचे डोळे उघडले. पूर्वी एकदा बैठकीत मी एक प्रश्न अज्ञानापोटी विचारला होता,"सर, भ्रष्टाचार आपला शत्रू ना? मग तुम्ही गुजरातची सहल का काढता आहात? जिथे भ्रष्टाचार हे टूरिस्ट आकर्षण आहे अशा बिहारला का नाही?" सरांनी एकदम पद्मासन घातले आणि दीर्घ श्वास घेऊन ध्यान लावले. त्यांनी असे केले की आम्ही हवालदिल होतो. ते असे काही करू लागले की समजावे, आता सत्याग्रह होणार, आत्मक्लेश करून घेऊन आत्मशुद्धी होणार. त्यांचीच नाही तर आमची सुद्धा होणार. आत्मशुद्धी म्हटली की माझे धाबे दणाणते. मागील आत्मशुद्धी ७ किलो वजन कमी करून गेली होती. कमरेच्या पट्ट्याचे सगळ्यात शेवटचे भोक वापरले तरी त्याने माझ्या लज्जेचा पाठिंबा काढून घेतला होता. महिनाभर लुंगी गुंडाळून होतो. असाच लुंगी नेसून नेहमीच्या मद्राशाच्या हॉटेलात गेलो तर,"सार, स्पेशल आप के लिये सार" असे म्हणून आदराने फिल्टर कॉफी समोर आली. कॉफीने मला बद्धकोष्ठ होते. असो. तर सांगायचा मुद्दा असा की, सरांनी साधारणपणे १० मिनिटे ध्यान केले. मग आपले चक्षु उघडून संथपणे म्हणाले,"दत्ता, तू आमच्याबरोबर बरेच दिवस आहेस. आपले कार्य मोठे आहे, कठीण आहे. आपल्या भारताचा इतिहास जवळजवळ पाच हजार वर्षांचा आहे. आसेतुहिमाचल असा आपला हा खंडप्राय देश. त्याची आपण लेकरे. आपल्या देशाला थोर साधूसंतांचा इतिहास लाभला आहे. आपल्या देशातून एके काळी सोन्याचा धूर निघत होता. सर्वत्र आबादीआबाद होते. आज आपली परिस्थिती काय आहे? आपली मातृभूमी आज आपल्या लेकरांकडून काही तरी मागते आहे. आपण आपल्या मातृभूमीचे ऋण फेडलेच पाहिजेत. आज ही मातृभूमी आपल्याकडे रुधिराभिषेक मागते आहे, तळहातावर शिर घेऊन लढण्याचा वसा मागते आहे, सर्वस्व अर्पण करण्याचा ध्यास मागते आहे. वेगात दौडले ते वीर मराठे सात या गाण्यातला आवेश मागते आहे. तर मंडळी काळरात्रीचा प्रहर संपत आला आहे, आता होणार तो "आम" चा उष:काल! मित्रहो, आप्तजनांच्या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या त्या अर्जुनाचे स्मरण करा आणि युद्धाला तयार व्हा." ते असे काही बोलू लागले की आमची तंद्री लागते. मोरू तर "अजि म्या ब्रम्ह पाहिले" अशा थाटात सरांकडे पाहत असतो. अशा वेळी आम्हाला सरांच्या मस्तकामागे (त्याला डोके कसे म्हणणार?) तेजाची प्रभावळ दिसते, सर्व प्रश्न संपून जातात, उरते ती फक्त निरपेक्ष भक्ती. मग आमच्या या विठू सावळ्याला डोळे भरून पाहणे आणि "कसे ते रूप साजिरे, चित्त माझे बावरे, विठ्ठला तुझियाचरणी" याचा अनुभव घेणे एवढेच उरते. सर मग असे अर्धा तास बोलत राहिले, आम्ही कान तृप्त करून घेत राहिलो. एक आवेश अंगी दाटला. लढणार, आम्ही लढणार! जो कुणी आडवा येईल त्याला आणखी आडवा करणार. आवेशात येऊन मोरूकडे पाहिले तर तो आता आमटोपीचे चित्र काढत होता. त्यावर त्याने देवकीनंदन गोपाळासारखे मोरपीसपण काढले होते. थोडक्यात मोरूने सगळे चिंतन देवळात गवारीच्या शेंगा मोडत कीर्तन ऐकणाऱ्या माझ्या आजीसारखे ऐकले होते.

का कुणास ठाऊक, मोरूने काढलेली मोरपीसवाली टोपी घातली तर मी शुक्रवारी नाचत येणाऱ्या वासुदेवासारखा दिसेन असे वाटले. आमचे रुपडेच तसे गोजिरे आहे. सरांना एक वेळ नाचरा वासुदेव चालेल पण गोवर्धन गिरिधारी "जै श्रीक्रिष्ण" चालणार नाही.

"रें?! पण बिहारचां काय? हो काय बोलतासां? आणि मित्रांविरुद्धच लढूचां? तेंका सांगूया नको?" रेग्या माझ्या कानाला लागून अस्सल सानुनासिक मालवणी तिरकेपणाने म्हणाला. या रेग्याला पोच म्हणून नाही, कुणाबद्दल आदर नाही. आणि स्वतःवर अजिबात ताबापण नाही. मागे एकदा रॅलीत आला आमच्याबरोबर. पोर्तुगीज चौकात धरणे धरायला रस्त्यात बसलो तर हा गायब. तासाभराने परत येऊन म्हणतो सॉरी हां, हयसर माजो एक गाववालो रवता. माका सारको म्हणां होतो, धरणां धरूक येयशीत तेव्हा वांयच येवन् जा. म्हणान गेललंय. आवशीन् तेच्या तिरफळां घालून बांगड्याचां कालवण केलल्यान्. माका म्हणा होतो थांबशीत तर रात्रीक वांयच नवटाक नवटाक मारूया. मी त्याका सांगान् इलंय, आज जमूचां नाय, पुढच्या येळेक बगूयां. सरांनी पांह्यलां तर वांदे होतले. आता तू माका सांग हो माजो मित्र मरे शाळेतलो. कमळाक मत दिल्यान म्हणून तो भ्रष्टाकारी झालो? माजो मित्र रवाक नाय? आमच्याबरोबर आयलो तरच मगे त्याची पापां माफ जातली? मगे जांवचा बंद करूचां की काय त्याच्याकडे? मी जातंलंयच. असं काय काय बडबडत राहतो. त्याला म्हणालो सर आज ना उद्या नक्की सांगतील. बरं, मला सांग, इथून मद्रासला जायचं तर व्हीटीवरून जावं लागेल की चर्चगेटावरून?

नमोनी बाशाला ढोकळा अर्पण केला असे ऐकण्यात आले. बाशाने "अय्योयो, येन्ना स्वामी, ये मिसाईल हम नही काता. कालीपिली केमिकल वॉरफेअर." असेही म्हटल्याचे ऐकले. मग नमोभाईंनी,"असा काय करते, आपण सोताच्या हाताने बनवला ये ढोकला. खाऊन तर बग ने" अशी विनवणी केल्यावर बाशाने "इसी लिये तो नै काने का. ना ऊर दडवे सुन्ना, नूरू दडवे सुन्ना माधीरी" असे म्हटल्याचेही ऐकतो. "अम एक(पुन्हा क पूर्ण) बार बोला तो वो सौ के बराबर ओता ऐ!".  मग मद्रासचे तिकीट क्यान्सल केले. तेवढेच पैसे वाचले. ढोकळा आणि इडली दोन्ही मुंबईत छान मिळतात.


(तळटीप - "कसे ते रूप साजिरे, चित्त माझे बावरे, विठ्ठला तुझियाचरणी" हा अभंग संतकवि छदामदास, मु. पो. कवठे बुद्रुक, यांच्या आमस्तुती या संग्रहातून साभार. - संपादक)

Sunday, April 13, 2014

मुल्ल्याची बांग

हमारा मोहल्लाच हरामी. सुब्बे सुब्बेकू हमारा म्हमद्या उठाने कू आया, बोला, अब्बा, देखो ये अखबारवाला क्या बोंब मार रहेला है. मैं बोला, गुरुवार है, सोने दे और. तबी बोला, आप मेरेकू हम्मेशा गाली देते ना? अब ये देखो पढो. मैं बोला तेरे कू गाली ऐसेही नै देता मैं. हम्मेशा कुच तो लफडा करके आता है  बाहर. लोगां आके मेरेकू गाली देते, गफूरने अपने बेटे को लाईनमें नई रख्खा. अख्खा मिरज शहर जानता है गफूर खाटीक कब्बी बेईमानीसे कुच काम नै किया, लेकिन अब ये म्हमद्याकी वजेसे सुनना पडता है. कितनी बार बोला मैं तेरेकू म्हमद्या, ये तेरे बिनकाम के दोस्त है ना, उनके साथ घूमना छोड दे. एक दिन भोत पडेगी. किसकी मुर्गी चुरा के आया आज बोल! उस दिन वो पवार बोंब मार रहा था,"गफूर, और कोई होईच नै सकता, तेरे बेटे और उसके दोस्त लोगही उठाके लेके गये है. अबतो मेरी मुर्गी बिर्यानीमें सो रही होंगी. कुच तो समझा अपने बेटे को. फुक्कट जा राहा वो." क्यू मेरे को शरम में डालता रे? उसको सौ रुपया देके और चार गाली और सुनके वापस आया मैं. उपरसे ये इमाम आके मेरेकू बोलता है,"गफूर, तू इतना मत चिड. ये लोग अपने कौमपे ऐसेच आरोप करते. लेकिन हमभी ऐसे नही सुनेंगे. हम को एक रेहना होगा." साला ये इमामकू कौमकी कुच पडी नै है. रोज शाम पाटीलसाब के बंगलेपे जाके उसके साथ पीता है. मुर्गी चुराने का मामला है इसमे कौम क्यू ला रहा ये? पाटीलसाब इलेक्शन लड रहा है, वो इसको पिला रहा है, और ये उसको बोल के आया होगा, तुम फिक्करच नक्को करू पाटीलसाब, ये मोहल्लेके सब वोट तुमको, ये मेरा वादा. मोहल्लेवाले मेरे शब्दके बाहर नै. हमको हमारी पेट की पडी है, और ये कौम कौम करते घूमरा है. हमारा मोहल्लाबी उसके पीचे जाताय.

और ये म्हमद्या अब मेरेको अखबार दिखारा है. मैं बोला तूईच पढ के बोल, मेरेको थोडेही पढने को आताय. अख्खा जिंदगी मुर्गी बकरी काटनेमे गया, मेरे अब्बाने कबी इस्कूल में जाने का चानसबी नै दिया. मेरेको बोलता था, अपना जिंदगी ऐसेच कटेगा. मैं थोडा अलग सोचा, सोचा साला अपना जिंदगी तो ऐसा जायेगा, लेकिन अपना बच्चा इस्कूल में जायगा, अच्चा कपडा पेनके ऑफिसमें जायगा. इसलिये ये म्हमद्याकू हम्मेशा बोलता, लफडे मे मत पड, पढाई कर. लेकिन मेरेकू अब लगताय अपने मोहल्लेवालोंको सुदरनाईच नै है. इलेक्शनके टायमपे जो कमाई होता है उसमेही खुश  रेहताय ये लोग. पाटीलसाब जैसा लोग है वो लोग बी येईच चाहते. अगर हमारा बच्चा लोग पढ के सुदर जायगा तो अपना दिमाग लगाके वोट देगा, फिर तो वोटबँक गयी. इसलिये हमारे बच्चे कुच बी गलत काम करे, कब्बी "अंदर" नै गये. अगर पकडके स्टेशन ले गये तो उधर पाटीलसाब का फोन आ जाताय, छोड दो अपने बच्चे है. फिर ये बच्चे चड जाके कुच बी करते रेहतेय. साला सिर्फ वोट के लिये. जिस दिन हमारी कौम पढलिख कर कुच बने, फिर तो कोई नै पूछेगा. साला कोई नै बोलता तुम इंडियन पेहेले है, बाद में मुसलमान. मेरे जैसे भोत लोग है जो पेले इंडियन है, लेकिन उनको हम जैसे लोग नै चाहिये.

लेकिन आज तो हद हो गई. म्हमद्या अखबार पडकर जो सुनाया, मेरी तो खोपडी सनक गई. ये साला मुलायम सिंग जो बक गया. साला किसी लडकी का रेप हो गया, और ये हरामी बोलता है जाने दो, बच्चे है, गलती तो करेंगे. ये जो मुलायम सिंग बोला ना, ये साला अपने मुल्लासे बी बदतर है. इसको वोट की पडी है. एक लडकी की जिंदगी बरबाद हो गई, और ये हरामी ऐसा बोलताय जैसा बच्चोने एक खिलौना क्या तोड दिया. कितना गिरेगा मुलायम तू वोट के लिये. तेरी बेटी होती तो ये बोलता तू? कुच बोल नै सकता, बोल बी सकताय, पालीटिक्सने तुजे बिलकुल हरामी बना दिया है. इसको लेडीज लोगोंकी इज्जत की कुच पडी नै, और हमारा मसीहा बन रहा है. तेरेकू इतनीईच पडी है हमारे कौम की, तो पेले ये वोटके लिये हमारी xx चाटना बंद कर. हमे इंडियन बनके एक इन्सान की जिंदगी जीने दे.

म्हमद्या मेरेकू बोलताय, और अब्बा तुम मेरेको एक मुर्गी चुराया तो इतना बोलताय. मै बोला चूप कर! एक लगाके दूंगा कान के नीचे. गुनाह गुनाह होताय. आजतक सबने हमारा वोटके लिये वापर किया. तुम तो सुदर जाव, इस्कूलमें जाव, बडा बनो, इंडियन बनो, इन्सान बनो. ये मुलायमसिंग जैसा गावठी मुल्ला है उनकी दुकान बंद करो, वोट के लिये ये बांग देरा है उसको बंद करदो.


 

Saturday, April 12, 2014

हमरा बापू भी बोलता है

बापू बोलता है
ये क्या हो रहा है
हे आम हे आम
हे आम मैं हैरान।

नल का पानी बिजली बत्ती
फोकट में देनी है
कह तो गये हम जोश में भाई
फट गई हमारी है।

लोकपाल तो लाना है
ये बड़ी बात क्या है
देखना है कि पास न होवे
लोकसभा आगे है।

पोलीटीशन बनना है तो
बड़ी बात क्या है
बेचों सपने फिर कह दो
हम मज़ाकिया तो है।

सबकुछ ईझी है ये कहना
कहनाही ईझी है
काम छोड़ कर गुम हो जाना
ये आयडिया अच्छा है।

शुरुआत में सब कहते है
हम तो दिलसे सच्चे है
जैसे चखते मजा कुर्सी का
कमलहाथ बन जाते है ।

गौर से देखो सीखो उनसे
कैसे चुपके खाते है
हम तो हाथ में झाडू लेकर
खुद कचरा बन जाते है ।

हे आम हे आम
हे आम मैं हैरान।

Friday, April 11, 2014

टवाळां आवडे विनोद

नुसत्या टिवल्याबावल्या करायला हव्यात, टवाळी हवी, जरा काहीतरी गंभीरपणे करायला शीक असे मातोश्रींकडून नेहमी सांगणे होई. त्यानंतर साधारणपणे अर्धा तास गांभीर्यात व्यतीत होई. हा अर्धा तास "तो अमुक तमुक बघ, किती अभ्यास करतो, किती केंद्रित आहे, पुढे काय करायचे आहे त्याचे पूर्ण भान ठेवून आहे, त्याच्याकडून शीक काहीतरी शहाणपण" इत्यादि वात्सल्यापोटी उद्भवलेली मातृवचने ऐकण्यात जात असे. थोडक्यात, जीवन ही शर्यत आहे, टवाळी करत वेळ काढला तर तुम्ही हरणार असे काहीसे बाळकडू लहानपणीच मिळते. मग अशी शर्यतीत उतरलेली बाळे फक्त अभ्यासच करतात, मोठी होतात, लौकिकार्थाने यशस्वीही होतात, पण आनंदाचा मोठा ठेवा लहानपणीच घालवून बसतात. कुतूहल हरवून बसतात. कुतूहलाने निरीक्षण करणे हा विसंगती ओळखण्यासाठी आवश्यक असलेला गुण आहे. विसंगती ओळखता येणे हेच शिक्षण असते. जी मुले लहानपणी टिंगलटवाळी करतात त्यांना विसंगती जाणवत असते. परंतु मोठी माणसे हा त्यांचा गुण दाबून टाकतात. अर्थात बालबुद्धीला अनुसरून त्यांच्याकडून (मुलांकडून!) वर्तन होते आणि बोलणी खाल्ली जातात हेही खरे.

ज्या समर्थांनी "टवाळां आवडे विनोद" असे म्हटले त्यांनीच मूर्खलक्षणेही लिहिली. दररोज हजार बैठका आणि हजार जोर यांच्या जोरावर ते ती मूर्खांसमोरच वाचूनही दाखवत. समर्थांसारख्या गंभीर प्रकृतीच्या संताने ही लक्षणे का लिहिली असतील असा मला प्रश्न पडतो. त्यांच्या अनेक शिष्यांपैकी कुणा टवाळस्वामीने, समर्थ ध्यानाला बसायच्या आधी हळूच जाऊन कुबडीवर खाजकुयली टाकली असण्याची शक्यता आहे. मग समर्थांनी दो बाहू, पर्यायाने काखा उंचावून "बुडाला औरंग्या पापी, म्लेञ्छसंहार जाहला" अशी आरोळी ठोकल्याचा उल्लेख आहे. शिष्यांपैकी कुणी गुन्हा कबूल न केल्याने हताश होऊन मग समर्थांनी मूर्खलक्षणे लिहून आपला क्षोभ शांत केला असावा. अर्थात येथे "औरंग्याला" का शिव्या असा प्रश्न कुणालाही पडेल. त्याचे उत्तर असे की, आकस्मित क्षोभ प्राप्त झाल्यास जे त्वरित गालिप्रदान केले जाते त्यात ज्याचा (किंवा जिचा) उल्लेख होतो त्याचा मूळ रागाच्या कारणाशी काहीही संबंध नसतो. गरजूंनी विचार करून आठवून पाहावे. जगातील सर्व प्रात:स्मरणीय मातांना (त्यांचे चरणी माझे वंदन) नेहमी निष्कारण उचक्या लागत असतात.

परंतु सर्वच विनोद टवाळी करणारा असतो? तसे असते तर पुलं , शंकर पाटील, दमा मिरासदार हे अस्सल देशी आणि पी. जी. वुडहाऊस सारथे विदेशी साहित्यिक झाले नसते, चार्ली चाप्लीनसारखा नटही झाला नसता. बोचरा विनोद फक्त तो करणाऱ्याला आनंद देऊन जातो. फक्त टवाळी करणारा हा विनोद करणाऱ्याला आनंद आणि ज्याच्यावर केला आहे त्याला चीड, दु:ख देऊन जातो. टवाळीत हीन दर्जाचे शब्द, विचित्र हावभाव वा अंगविक्षेप वापरले जातात. शिवाय या दोन्ही प्रकारातून काही निष्पन्न होत नाही, फक्त माणसे आणि मने दुरावतात. प्रहसन आणि उपहास मात्र वेगळ्या जातकुळीतील विनोद असतात. दोन्हीतून काहीतरी सांगायचे असते. प्रहसन आणि उपहास यातही फरक आहे. उपहास फारसा हसवत नाही, पण अनिष्ट गोष्टींबद्दल प्रक्षोभित जरूर करतो. शि. म. परांजपे यांचे लेखन त्या कुळीतील होते. पण त्याने कुणी दुखावल्याचे दिसत नाही. प्रहसन हे थोडेसे चिमटे काढत नर्म विनोदाबरोबर प्रक्षोभित न करता काहीतरी विचार देऊन जाते. काही वेळा थोडेसे खिन्न पण करून जाते. प्रहसनातून एखाद्या चांगल्या कार्याची हेटाळणी कधीच होत नाही. विसंगतीतून, वैशिष्ट्यपूर्ण मानवी आचारातून विनोद घडत असतो. सर्व लोक ते पाहत असतात, त्यांना ते उमगते पण. म्हणूनच जेव्हा प्रहसनातून विसंगतीचा पुन:प्रत्यय येतो तेव्हा त्याचा राग यायचे कारण नसते. अर्थात गुन्हेगारी वर्तन वा गुन्हा यांचे प्रहसन करता येत नाही, अथवा करूही नये. ज्या घटनांचे गांभीर्य टिकवायला हवे त्यावर विनोद करणे उचित नसते.  प्रहसनात वैयक्तिक टीकाही असू नये. कृती-कर्म, आचार-विचार यांच्यातील विसंगतीवर असावी. तर मंडळी, प्रहसनामागील विचार पाहा, त्याचबरोबर हसून आपले आयुष्यही वाढवा. काडेचिराईती चेहऱ्याने वावरू नका. कधीकधी स्मितहास्यपण करा.

Thursday, April 10, 2014

आचार्य अरविंदांची वासरी (भाग दुसरा)


२८ डिसेंबर २०१३ - आज महत्वाचा दिन. पण उठवत नव्हते. नेहमी पाचच्या ठोक्याला जाग येणारा मी आज सहापर्यंत लोळत होतो. शेवटी सौभाग्यवतींनी,"उठा आता, पुरे झाले लोळणे. शपथविधीला जायचं नाहीये का? तरी मी बजावत होते, जळ्ळ्या मेल्या लष्करच्या भाकऱ्या त्या!" असा गजर करून जाग आणली. सकाळी पाच वाजता नळाला पाणी येते त्यामुळे तिला उठावेच लागते. आज नाकधौती, कपालभातिला सुट्टी. आंघोळ करून तयार झालो. कपाटातून नवीन मफलर आणि इस्त्री केलेली आमटोपी काढली. ती परिधान करून आरशात स्वत:ला निरखत होतो तेवढ्यात परत सौ म्हणाली,"पुरे झालं आता स्वत:लाच बघणं. ट्रेनमधून जाणार आहात, पोचेपर्यंत टोपीची इस्त्री टिकली म्हणजे मिळवली. आणि तो पास विसरू नका. आपलं नशीब एवढं थोर की, पास घरी विसरायला आणि नेमका त्यादिवशी समोर टीसी यायला एकच गाठ पडायची. विदाऊटतिकीटच्या दंडानं कारकीर्दीची सुरवात नको व्हायला. मेलं आमचं काय.." पुढचं न ऐकता बाहेर पडलो. आम आदमीचं आयुष्य असंच का असावं? ट्रेनला नेहेमीप्रमाणे प्रचंड गर्दी. आत घुसायला देत नव्हते. अहो माझा शपथविधी आहे आज असे सांगून पाहिले तर एक उद्धट इसम,"हमकू क्या अलिबागसे आयेला समझा है क्या? हमारा तो ऑफिसमें रोज शपथविधी होता है बॉस के सामने" असे म्हणाला. शेवटी एकाला दया येऊन ट्रेन सुटता सुटता त्याने हात देऊन आत ओढले. ज्या हाताशी दोन हात करायचे त्याच्याच मदतीने दिवसाची सुरुवात व्हावी याचे वैषम्य वाटले. सुदैवाने डोक्यावर पंखा आला होता आणि तो चालूही होता. रामलीला मैदानावर पोचलो आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून भरते आले. तिथेही पोलिस आधी आत सोडत नव्हते. शेवटी कॉंग्रेसच्या एकाने येऊन ,"ए चुलबुल पांडे! चल छोड उसे अंदर! उसकाही शपथविधी है" असे त्याला झापले. एक गोष्ट मात्र खरी , या कॉंग्रेसवाल्यांना पोलिसांना कसे हाताळायचे हे चांगले कळते. तो पोलिस लेकाचा मला सॉरी पण म्हणाला नाही. बरोबर आहे, मी काही त्याची बदली करू शकणार नाही त्याला माहीत आहे. खरं तर आत सोडत नाहीत या बहाण्याने शपथविधी टाळता आला असता. पण हे कॉंग्रेसवाले चालू आहेत. म्हणून तर तिथे येऊन मला आत सोडायला लावले. यांना नुसती मजा पाहायची आहे असा संशय आहे मला. उगाच नाही विनाअट पाठिंबा दिला. जरा थांबा, हे लोकपाल आणतोच आता, मग पाहतो कोण मजा पाहते. पण शंकेची पाल मनात चुकचुकते आहे. जे विधेयक ज्या चोरांना चाप लावणार तेच चोर हे मंजूर करतील?

जवळजवळ लाख लोक शपथविधीला उपस्थित होते. कमीत कमी इतक्या लोकांना फुकट वीज द्यावी लागणार? हे आधी कोणी कसं बोललं नाही? फुकटेपणा हा आपल्याला मिळालेला शाप आहे असे मला मनापासून वाटते, पण खरं ते सांगून निवडणूक जिंकता येत नाही असे कार्यकर्त्यांचे मत पडले. काही काही वेळा आमचे कार्यकर्ते मला घोड्यावर बसवून स्वत: नामानिराळे राहतात असे वाटते. असो. पाहू. रामलीला मैदानावरून गाडीने ऑफिसमध्ये आलो. गाडी खूपच छोटी होती. चपळाई करून पुढे बसायला गेलो तर हा लेकाचा सोमनाथ आधीच जाऊन मख्ख चेहरा करून बसलेला. मेहरा आणि वालिया यांना हरवल्यापासून त्याला वाटतं आपणच पक्षाचा अर्ध्वयू. शेवटी मागच्या सीटवर मनीष आणि राखी बिर्ला यांच्यात अंग चोरून बसलो. काय भयानक अत्तरं लावतात हे लोक.

आज सलग सहा तास काम केले! प्रथम या नऊ चोरांच्या बदल्या करून टाकल्या. टेबलावर उभे राहून टारझनप्रमाणे छातीवर हात बडवून आरोळी ठोकावी असे मनात आले होते, पण बरे दिसले नसते. शिवाय मुख्यमंत्र्याला गंभीर दिसले पाहिजे. पण एंग्री यंग कॉमन म्यान लुकही हवा. मग कालापत्थर मधल्या अमिताभ बच्चन सारखा चेहरा करून काम केले. थकावट जाणवत आहे. आता उद्या काही ट्रेनने जाणार नाही. इतकेही काही आम नाही राहिलो आता.

३० डिसेंबर २०१३ -  परवा ज्यांच्या बदल्या केल्या होत्या त्यातले दोघे तिघे सकाळी नऊ वाजल्यापासून पासून येऊन बसले होते. गर्भित धमकी देत होते. म्हणाले "सरजी, आप तो सिर्फ तबादला किये है. निकाल तो नही दिये. अगर फिरसे बुलाते है तो आपके काम आयेंगे, नही तो आपकोभी प्रोब्लम हो सकती है." मी म्हणालो,"भई हम तो आम आदमी है. आम आदमी नंगा होता है. और नंगे से खुदा भी डरता है." असे म्हणून आळस द्यायला उभा राहिलो आणि हात वर ताणले तर त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, सगळे धडपडत उठले आणि त्वरेने दालनातून बाहेर पडले. जाता जाता "पता नही, उतार भी सकता था.." असे एकाचे काहीसे शब्द कानावर पडले. मग त्यावरून आठवले. लगेच जाऊन टंकलेखकाकडून राजीनामापत्र टाईप करून घेतले. खिशात ठेवून दिले. राजकुमारसारखे. बाथरूम मध्ये जाऊन आरशात पाहून "कलेक्ट्री तो हम शौक से करते है, रोजी रोटी के लिये नही. दिल्ली तक बात मशहूर है के राजपाल चौहान के हात में तंबाकू का पाईप रहता है और जेब में इस्तिफा!" असे म्हणूनपण पाहिले. पण टोपीमुळे तेवढे प्रभावी दिसले नाही. मग ओमप्रकाश स्टाईलने डुगडुगत्या मानेने म्हणून पाहिले "वाह वाह वाह.. अम..अमममहंहं.. बर्खुरदार, हम इस्तिफा.." ते जास्त बरे वाटले. पण आता राजकुमारचे डायलॉग पाठ करून ठेवले पाहिजेत. शिंचे नेमक्या वेळेला शब्द आठवत नाहीत. मग सगळा प्रभाव निघून जातो. नंतर आंघोळ करताना मात्र सगळे आठवतात.

विजेचे काहीतरी करायला हवे आता. ऑडिट करण्यासाठी लेटर्स ड्राफ्ट करायला हवीत. मायना काय असावा? "प्रिय" ने सुरुवात करावी की "महोदय" ने? प्रिय म्हणावे तर लाडात येऊन "जाऊ द्या ना गडे" म्हणतील, महोदय म्हणावे तर "उद्या या, बघू, आत्ता वेळ नाही" म्हणतील. आमची ही मोलकरीण लवकर उगवली की "नंतर ये गं बाई, अजून भांडी पडली नाहीत" म्हणते तसेच. प्रश्नच आहे. सोमनाथ म्हणतो पत्रे कसली पाठवता, तडक धाडच घालू. हा मनुष्य कालाजामुन खातो आणि उगाच हायपर होतो. आज सकाळी सुद्धा मीटिंगला दांडी मारून स्टेशनच्या बाहेर जलेबी आणि खडीचम्मच दूध चापत उभा होता. त्याला आवरले पाहिजे.

(क्रमश:)
 

Wednesday, April 9, 2014

धूर्तलक्षणे

ॐ नमोजी पंतप्रधाना
कृपा करावी भक्तजना
जो आशावंत आशाळभूत, सदैव।

श्रोते म्हणती कवण ग्रंथ
काय बोलिले आहे येथ
केलियाने श्रवण प्राप्त
काय होतसे ।

वंदून चरण स्वामींचे
करून पुण्य संघस्मरण
हा उत्कटपुच्छ स्वामीश्वान
धूर्तलक्षणे बोलिजेल ।

जन्मला जया पक्षी
करी कुरघोडी त्यावरी ।
राबवि क्रूरकठोरदृष्टी
ना मानी कुणाच्या बापासी ।
दर्शने निमित्तमात्रे
विरोधक मूर्च्छित ।
ऐकी जनाचे करी मनाचे
तो येक धूर्त ।

जन्मला थोर कुळी
सांगे पूर्वजांची कीर्ती
गोलगोमटी मूर्ती
शुभ्र वस्त्रांकित ।
विचारता प्रश्न
चर्या करे गहनचिंतित
आ वासे सदा सर्वदा
मुखी फुटतसे न शब्द
तो न धूर्त परंतु मूर्ख ।

कीर्ती जयाची अपार
सत्ता ग्रहण वारंवार ।
जेथ दिसे भूमी गोमटी
ठोकी आपुली राहुटी ।
सांगे स्वयं कृषीआधार
करी कन्या बंधुपुत्र उद्धार
खरा जाणता राजा ।
तो येक अतिधूर्त।

म्हणीतसे आपण सामान्य
करी जगा सर्वथा अमान्य ।
मीच म्हणे स्वच्छतेचा महामेरू
इतरजन पंककीटक मोरू ।
करी कंठशोष आमजनउद्धार
प्रत्यक्ष कृतीशून्य नटेश्वर।
स्वयं करी आरोप वृथा
आपुले स्वैर आचार सर्वथा ।
करी न सहन विरोधी टीका
वेठीस धरी तिहीं लोकां
झणी पावून कोप अंगावर
शिष्यगण सोडीतसे ।
तो येक धूर्त।

लक्षणे असती अपार
भारतवर्षी धूर्तच फार।
पुढील समास मूर्खलक्षण
खचित त्यात कपिल अन दिग्गीजन
श्रोतेहो हे वचन ।
तूर्त  येथ लेखनसीमा
क्षमा केली पाहिजे ।

इति द्विछदामदासबोधे गुरुशिष्य संवादे
धूर्तलक्षणनाम समास पहिला ।।




 

Tuesday, April 8, 2014

आचार्य अरविंदांची वासरी (भाग पहिला)

नोव्हेंबर - नेहेमीप्रमाणे प्रात:समयी ५ वा उठलो. नाकधौती, कपालभाति इत्यादिक आन्हिके उरकली. सौभाग्यवतींनी नेहेमीप्रमाणे "अहो, काय हे सकाळी सकाळी भयानक आवाज काढता आहात?" अशी तक्रार केली. तिला "नाक, तोंड आणि घसा ही आमची शस्त्रे. घासून पुसून तयार ठेवलीच पाहिजेत. योग्य त्यावेळी खोकला आणि नको त्यावेळी शिंकता येणे आवश्यक असते." असे सांगितले. "कराग्रे वसते लक्ष्मी" हा श्लोक म्हणत होतो तर सौ "तोंड बघा लक्ष्मी आणणाऱ्याचं" अशा आविर्भावात मान हलवत होती. पतीचा तेजोभंग करणे हा जणू पत्नीचा अधिकारच असावा. मी दुर्लक्ष केले. ७ वा कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती, शिंचे ८ वा उगवले. मग ७ ते ८ शवासन केले. परत कसले झोपता असे ही म्हणालीच. तिला बिचारीला काय कळणार, धरणे धरताना याच सिद्धीचा उपयोग होतो ते. बैठकीत निवडणुकीचा अजेंडा ठरला. वीज मोफत देण्यावर चर्चा झाली. फुकट कशी काय देणार असे एकाने विचारले. भाजपने आमच्या कार्यकर्त्यात काही जण घुसवले आहेत असा मला दाट संशय येतो आहे. वीज कंपन्या जास्त दर लावून कॉंग्रेस आणि भाजपची धन करतात. आपण त्यांच्यावर ऑडिट काढू आणि दर कमी करू असे सांगून त्याला चूप केले. वास्तविक ऑडिटचा उपयोग होऊन दर कमी होईल की नाही याची मलाही शंका आहे, परंतु सगळे ठीक होईल असे स्वत:ला बजावले.

१० नोव्हेंबर - कॉंग्रेसवाले सकाळपासून फोन करताहेत. मी उचललाच नाहीये अजून. करू देत थोडा वेळ. पण हे नक्की की भाजपपेक्षा काँग्रेसवाले परवडले. मान्य केलेले देतील तरी. पण भाजपवाले माझा फोन का उचलत नाहीयेत? भाजपला जास्त जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. त्यांच्याबरोबर सरकार बनवायला हरकत नाही, पण मग आपले वेगळेपण काय? असा एक विचार कार्यकर्त्यांमध्ये आहे. मी फेसबुकवर लोकांचे मत घ्या असे सांगितले आहे. पाहू. सध्यातरी आम्ही कोणालाच पाठिंबा देणार नाही, विरोधातच बसणार, असा पवित्रा घ्यावा. रात्री बारा वाजता परदेशी कार्यकर्ते/गुंतवणूकदारांबरोबर स्काईपकॉल आहे. दुपारी मला वेळ होता, तर म्हणाले आमच्या झोपेच्या वेळेला जमणार नाही आणि रविवारी कुणी सकाळी १० पर्यंत उठत नाही. काय करणार, निधी तर आवश्यक आहे. म्हटलंच आहे, अडला हरी..

१२ नोव्हेंबर - फेसबुकवर लोकांचा पाठिंबा वाढतो आहे. कार्यकर्त्यात उन्माद उत्साह वाढतो आहे. त्यांना समजावले पाहिजे. अजून दिल्ली दूर आहे. चिरंजीव विचारत होते, बाबा तुम्ही मुख्यमंत्री झालात तर मला एक्सबॉक्स घेऊन द्याल का? हो असे म्हणणे अगदी तोंडावर आले होते. पण तोंड आवरले. संयम दाखवणे जमले पाहिजे. मोठ्या बंगल्यात राहणे, विमानातून प्रवास करणे, आलिशान गाड्या वापरणे कुणाला नको असते? पण आपले वेगळेपण टिकवण्यासाठी "सोने नाणे आम्हा मृत्तिकेसमान" असेच दाखवले पाहिजे. मोह फार वाईट असतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे. तुकारामांचे बरे होते, धंद्याचे दिवाळे काढले होते, सोने नाणे येण्याची शक्यताच नव्हती, मग काय होते म्हणायास? सत्तेत आल्यास सरकारी बंगला, गाडी घ्यावी का? फेसबुकवर लोकांचे मत घ्यायला हवे. शिंचे नेमके नको म्हणतील.

१५ नोव्हेंबर - अजूनही भाजपवाले फोन उचलत नाहीयेत. कार्यकर्ते म्हणत होते, मरुदेत, आपण त्यांच्याबरोबर सरकार बनवणार नाही अशी भूमिका घ्यावी म्हणजे चट सरळ येतील. आता कॉंग्रेसवाले वेगळ्याच नंबरवरून फोन करताहेत. त्यांना काय वाटलं, आम्हाला कळणार नाही? काही वात्रट कार्यकर्त्यांनी मग त्या नंबरवर निनावी फोन करून "शीला है क्या? बर्थडे पार्टी के लिये डान्सर बुक करना है. मुन्नी बदनाम हुई डान्स चाहिये." असे विचारले. मी त्यांना वाईट झापले. असे केलेत तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक असे मी म्हणालो. आता कॉंग्रेसनेही आपले कार्यकर्ते आमच्यात घुसडले आहेत असा संशय येतो आहे.

१६ नोव्हेंबर - अमेरिकेतील कार्यकर्त्यांनी शेवटी अनुदान पाठवले. सर्वात प्रथम कार्यालयाचे थकलेले भाडे द्यायला हवे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावर नको. तो लेकाचा चहावालाही तगादा लावून आहे. हे सगळे चहावाले माझ्या राशीला का बसले आहेत? म्हणतो तुमचे कार्यकर्ते नुसते सामोसे आणि चहाबाज आहेत. आगाऊ लेकाचा! एका महिन्याचे बिल सात हजार रुपये? उडालोच! आता भाजप आणि कॉंग्रेस दोघांचे कार्यकर्ते आपल्यात आहेत हा संशय दृढ झाला. कोण कोण सामोसे खातो आहे त्यावर नजर ठेवण्यास सांगायला हवे. एक चांगली बातमी म्हणजे पक्षाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळण्याची चिन्हे आहेत असा सर्व्हे आला आहे. त्यावर अमेरिकेतील एक कार्यकर्ता म्हणाला, पण बहुमत मिळाले तर काय? या सगळ्या गडबडीत तसे झाले तर काय करायचे याचा विचारच झाला नव्हता. थोड्या जागा मिळवून विरोधात बसणे केव्हाही चांगले. विरोधकांकडून लोकांच्या अपेक्षा काही करण्याच्या नसतात, उलट काही घडू न देण्याच्या असतात. तेच बरं. काही तरी मार्ग काढला पाहिजे. बैठकीत ही शक्यता बोलून दाखवली तर सर्व स्तंभित होऊन एकमेकाच्या तोंडाकडे पाहत बसले. देव करो आणि तसं काही न होवो. सरकारी नोकरी सोडण्याची अवदसा का झाली असेही एकदा वाटून गेले.

८ डिसेंबर- शेवटी ज्याची भीती होती तेच घडले. पक्षाला २८ जागा मिळून अभूतपूर्व (पहिलीच निवडणूक होती म्हणा, पण शब्द भारदस्त दिसतो) यश मिळाले. कार्यकर्त्यानी जल्लोष केला. मी नको म्हणत होतो तरी गुलाल उधळला. मला धुळीचा त्रास होतो हे मी वारंवार सांगत होतो, पण ऐकले नाही. . सर्वात प्रथम कॉंग्रेसच्या कार्यालयासमोर विजयनृत्य झाले. पण आत सामसूम होती त्यामुळे अपेक्षित तसा आनंद मिळाला नाही.  कुणीतरी भाजपच्या कार्यालयासमोर जाऊन नाचण्याचा बूट काढला, पण असे कळले की भाजपला ३१ जागा मिळाल्या आहेत, मग तो बेत रद्द झाला. न जाणो आमच्या ब्यांडवाल्यांच्या बरोबर आमच्याच खर्चाने स्वत:चीही फुकटात मिरवणूक काढून घ्यायचे. खूप दगदग झाली. आता बेनाड्रिल लावून पडलो आहे. मफलर गुंडाळून, कानटोपीही घातली आहे. सौ आणि आमची दोन्ही कार्टी माझ्या अवताराकडे पाहून दात काढत आहेत. मी मात्र आता सरकार बनवावे लागणार की काय या चिंतेत आहे. 

(क्रमश:)

(आचार्यांची वासरी टप्प्या टप्प्याने प्रकाशित करण्यात येईल. वाचकांनी कृपया संयम बाळगावा. - संपादक)
 

Monday, April 7, 2014

मुदपाकखान्यातील कट

(खाबुराव सुरनाळकरांच्या आगामी "तेलकट बटाटेवडा आणि तैलबुद्धीचे गुप्तचर्य" या लघुरहस्यकथेतून घेतलेले एक प्रकर्ण. खऱ्या घटनांवर आधारित परंतु पात्रे कपोलकल्पित. साधर्म्य आढळलयास केवळ योगायोग समजावा.)

मुदपाकखान्यातून वर्दी आली, भोजन तयार आहे. शंभूराजे उठले, सेवकास शेला, सुरवार आणायास सांगितली आणि गवाक्षात उभे राहिले. समोर नगराचा विस्तार दिसत होता. प्रासाद नगरीबाहेर एका उंच डोंगरावर वसलेला होता. भोवती नीट निगा राखलेली दाट वृक्षराजी होती. पक्ष्यांचा आवाज वगळता शांतता असायची. नगरीतील कोलाहल इथे ऐकू येत नसे आणि प्रासादातील बुद्धी,नृत्य विलास नगरीपर्यंत पोचत नसे. आबासाहेबांनी उभे केलेले हे साम्राज्य. त्यांच्या काळात प्रासादात गजबज असायची. प्रजेला थेट प्रवेश असायचा. सेवकवर्गही निष्ठावंत आणि जिवाला जीव देणारा होता. आबासाहेबांच्या कारकीर्दीत नृत्यक्रीडा, छचोर गायन, विदूषकी नाट्यछटा यांना मज्जाव होता. आबासाहेबांना फक्त एकाच गोष्टीचा षौक होता. बटाटेवड्यांचा. दर रविवारी थेट कर्जतला खास दूत पाठवून मागवलेले बटाटेवडे आणि कषायपेय यांचा आस्वाद घेणे हा एक नेमच झाला होता. मोहिमेवर निघताना सुद्धा बाजारबुणग्यात खास बटाटेवडा बनवणाऱ्या खानसाम्याची तजवीज असायची. शंभूराजेंना बटाटेवडा पचत नसे. ते नेहमी दूध आणि मनुका खाऊन राहत. त्यांना आम्लपित्ताचाही त्रास होता. उन्हातानांत फिरून त्यांना पित्त होत असे, मग अशा वेळी खास जिरं लावलेलं कोकमसरबत पीत वाळ्याच्या पडद्याखाली ते पडून राहत. राज्य करणे म्हणजे एक पीडाच असे त्यांचे मत होते. आबासाहेबांनी नक्को ती पीडा आपल्या गळ्यात टाकली असे ते खासगीत धनाजीस बोलून दाखवीत. धनाजी हा त्यांचा अत्यंत विश्वासू कारभारी. किंबहुना तो हवे ते कारभार तर करायचाच पण नको तेही करायचा. धनाजीही मग त्यांना सांगे, शंभूराजे तुम्ही राज्याची काळजी सोडाच, पीडाच ती, ती मी माझ्या डोक्यावर घेतो. मग शंभूराजे निर्धास्त होऊन कोकमसरबताचा घुटका घेत वैद्य शतघ्नेबुवा यांचा "पित्त - कारण आणि निवारण" हा ग्रंथ उशाशी ठेवून बसून राहत. त्यांनी तो ग्रंथ एकदा वाचायचा प्रयत्न केला होता. पण "सर्वसाधारणपणे क्षीण प्रकृतीबुद्धीच्या मनुष्यांस पित्तप्रकोप नेहेमी प्राप्त झालेला असतो" असे पहिलेच वाक्य वाचल्यावर पुढे वाचण्याचा नाद सोडून दिला होता. सर्वसामान्यांत वैद्यबुवांच्या ज्ञानाविषयी दुमत होते, पण शंभूराजेंचा त्यांच्यावर विश्वास होता. "राजे.. " नम्र आवाजात सेवकाने आपण आल्याची जाणीव करून दिली. शंभूराजे मुदपाकखान्याकडे निघाले. सेवकाने पुन्हा हाक मारली,"राजे, शेला सुरवार आणली आहे, परिधान करून गेल्यास बरे होईल." "हा! तव मातरम! पुन्हा विसरलो का आम्ही?" असे अल्प गालिप्रदान करून राजेंनी वस्त्रे परिधान केली. दिवस असाच निवांत जाणार होता.

मुख्य प्रासादापासून थोडेसे दूर असा दुसरा प्रासाद होता. ही धाकटी पाती. इथे राजे इंद्रवदन उर्फ "काळापहाड" यांचे वास्तव्य होते. शंभूराजे त्यांना उंदीरवदन म्हणत ते त्यांना आवडत नसे. मग तेही शंभूराजांना शुंभराजे म्हणत. एक काळ असा होता की इंद्रवदनराजेंशिवाय आबासाहेबांचे पानही हलत नसे. चुलत असले तरी आबासाहेब त्यांच्यावर पुत्रवत प्रेम करायचे. आपल्या बटाटावड्यातील अर्धा त्यांना द्यायचे. परंतु पुढे शंभूराजे गादीवर बसणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर इंद्रवदनराजे बाहेर पडले आणि वेगळे राहू लागले. पण त्यांच्यातील "काळापहाड" त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. काहीतरी काळेबेरे आहे असे ते बहिर्जी उर्फ छोटूला म्हणाले होते. बहिर्जीने मग आपला एक विश्वासू हेर मोठ्या वाड्यात मोठ्या हुशारीने पेरला होता. तो बित्तंबातमी देत असे. आबासाहेबांच्या मोहिमेच्या खलबतांपासून ते शंभूराजेंच्या आबासाहेबांकडे केलेल्या नवीन कॅमेरा घेऊन देण्याच्या हट्टापर्यंत सर्व बातम्या "काळापहाड" पर्यंत पोचत. काळापहाड आणि छोटूच्या रात्री गुप्त बैठका होत. अशा वेळी काळापहाड आपला उन्हाचा काळा चष्मा लावून बसे. काळ्या चष्म्यामुळे राजे कुठे पाहत आहेत याची कल्पना छोटूला येत नसे. आजवर कित्येक वेळा आपला गुढघा खुर्चीवर आदळला आहे, असे असताना रात्रीच्या वेळी काळा चष्मा का लावता राजे? असे छोटूने एकदा त्यांना विचारलेही होते. त्यावर "सर्व श्रेष्ठ गुप्तहेर असा चष्मा लावतात" असे त्यास बजावण्यात आले होते. पूर्वी ते छोटूबरोबर वेषांतर करून प्रजेत मिसळत असत. पण अलीकडे एक दोन वेळा काही दुष्ट नगरजनांनी त्यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेऊन वर परत डोळे मिचकावत "काय, आहे की नाही बरोबर?" असे विचारून टाळीसाठी त्यांच्यासमोर हात पुढे केला होता. त्यांनाही मग नाईलाजाने चडफडत टाळी द्यावी लागली होती. तेव्हापासून वेषांतराची भानगड अजिबात नको असे त्यांनी छोटूला बजावले होते.

दोन महिन्यांपूर्वी अशीच एक गुप्त बैठक झाली होती.
काळापहाड:-"छोटू, बातमी खरी आहे?"
छोटू: होय सरकार, हेराने गळ्याला चिमटा काढून "आईशप्पत खरे" असे म्हटले होते.
काळापहाड : मग नक्कीच खरे.  नाही तर आमच्यासाठी कोण अशी मातोश्रींची शपथ घेईल? पण हे जर खरे असेल तर कट आणखीच गंभीर आहे.
छोटू: होय सरकार, हेर गेली महिनाभर कचराकुंडीवर नजर ठेवून आहे. दररोज न चुकता तेथे पडलेल्या चुरगाळलेल्या वृत्तपत्राचा बोळा उलगडून पाहतो. सरकार, तो बोळा तेलात माखलेला असतो! एका बैलगाडीचे वंगण होईल एवढे तेल त्या बोळ्यात असते!
काळापहाड: घात! अपघात नव्हे विश्वासघात! आबासाहेबांना वैद्यांनी तैलपदार्थ एकदम वर्ज्य असे सांगितले असताना हा कट?
छोटू: हेरानं असंही सांगितलं की बटाटेवडा आणायला जो दूत जातो त्याच्या कानाला लागून शंभूराजांनी काही गुप्त सूचनाही दिल्या.
काळापहाड: आं? शंभूराजे! कुठं फेडाल हे पाप? ते काही नाही! छोटू आता असं कर, अस्साच आपल्या मुदपाकात जा. म्हणावं आम्ही कुक्कुटकाढा तयार करण्यास सांगितला आहे. कोकणातून आपले नारो राणाजी खास स्वत: पकडलेले कुक्कुट पाठवतात. तो काढा घेऊन आपल्या हेराकरवी आबासाहेबांकडे पोचवा. आणि हो, मुदपाकात जरब दे, म्हणावं काढा चवीला अगदी बटाटेवड्यासारखाच हवा. आबासाहेबांना जरासुद्धा संशय येता नये. आणि हे पहा, शंभूराजांनी काय सूचना दिल्या होत्या याची माहिती काढा. योग्य वेळेला ती माहिती वापरता येईल. कट करता काय? पहाच हा काळापहाड काय करतो ते.
छोटू : होय राजे. तशा सूचना देतो.

आज छोटूने काही तरी महत्वाची बातमी आणल्याची वर्दी दिली होती. त्यामुळे इंद्रवदनराजेंचे आज कामकाजात लक्ष लागत नव्हते. कारभारी सांगत होते,"पुण्यनगरीहून खबर आहे, आपल्या मर्द जवानांनी रात्रीच गनिमी काव्याने हल्ला चढवून रस्त्यावर जिझिया कर वसूल करणारी ठाणी उध्वस्त केली आणि प्रतिहल्ला व्हायच्या आत पलायन केले. दोन लक्ष होनांची प्राप्ति झाली आहे राजे." इंद्रवदनराजे विचारात होते,"हं, हं.. दोन लक्ष होन काय? देऊन टाका. ती जमीन आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच!" मग भानावर येऊन म्हणाले,"बरं, बरं! छान! आता पुढील हल्ला कधी? पायात चपला वगैरे घाला रे बाबांनो. काचाबिचा पायात घुसतात. आम्ही आलो असतो, पण आज एकादशी. आम्ही स्वत: तोडफोड करणे योग्य नाही. शिवाय आज फराळास साबुदाण्याची खिचडी आहे अशी वर्दी आहे. या तुम्ही आता." त्यांनी इशाऱ्यानेच कारभाऱ्यांना निरोप दिला. तेवढ्यात बहिर्जी उर्फ छोटू सदरेत आल्याची वर्दी मिळाली. त्याला खलबतखान्यात पाठवा अशी आज्ञा करून राजे घाईघाईने आपल्या महालात गेले आणि काळा चष्मा चढवून तसेच खलबतखान्याकडे निघाले.

"हं, कुठे आहेस छोटू? काय खबर आहे?" चाचपडत खुर्चीचा अंदाज घेत, अंधारलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पाहत राजेंनी प्रश्न केला.
"राजे, मी इथे आहे तुमच्या समोरच. धक्कादायक अशीच खबर आहे."
"वा! शुंभराजे, कसे सापडलात आता! आबासाहेबांना तेलकट बटाटेवडे देऊन दगाफटका करण्याचा कट? कुठं जाल आता?"
"अं.. राजे, थांबा. शंभूराजेंना त्यातील काहीच माहिती नव्हती. "
"आं!!?"
"होय राजे. तेलकट बटाटेवड्यांचा आग्रह हा आबासाहेबांचा स्वत:चाच हट्ट होता! शंभूराजे पित्त होते म्हणून मुदपाकात जाऊन स्वत:साठी शेंदेलोण आणि हिंग घातलेले ताक बनवायास सांगत असत."
"अस्सं! आणि मग त्या दूताच्या कानाशी लागून काय सांगत असत?"
छोटू इथे शरमला आणि चूप राहिला.
"छोट्या! खरं सांग काय ते!"
"राजे, कसं सांगू! आबासाहेब त्या दूताला बटाटेवड्यांसाठी रोख रक्कम देत असत. शंभूराजे त्या दूताला उरलेली चिल्लर परस्पर आम्हाला आणून दे अशी ताकीद देत! आबासाहेबांनी त्यांचा तनखा बंद केला आहे म्हणे."
"अरेरे! आपली सगळी मेहनत पाण्यात. हा शंभ्या असाच शुंभ पहिल्यापासून. आणि आम्ही पाठवत होतो तो कुक्कुटकाढा? त्याचं काय? आबासाहेबांनी तो तरी घेतला की नाही?"
"राजे, तो काढा आबासाहेबांपर्यंत पोचतच नव्हता. मधल्यामध्ये धनाजीरावच तो पिऊन टाकत होते!"

इंद्रवदन राजे उर्फ काळापहाड खिन्नपणे खलबतखान्यात बसून राहिले. पण निदान रहस्याचा उलगडा केल्याचा माफक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होता.