जवळपास तीस वर्षांनी थोडासा इतिहास घडतो आहे. मित्रवर्य श्रीहरी दाते याचा माझा ऋणानुबंध शाळेपासूनचा. मनसोक्त हसणे, टिंगलटवाळी, भटकंती, सायकलवर रेलून घरामोरच तासंतास गप्पा मारणे या सर्वांतून त्याने मला अभाविपमध्ये कधी आणले कळले नाही. तीस वर्षांपूर्वी राष्ट्रभक्तीने भारलेली काही तरुण मंडळी सांगलीच्या टिळक स्मारक मंदिरात जमायची. त्यावेळी टिळक स्मारक मंदिर ही नुसती इमारत नव्हती, बापूराव गोऱ्यांच्या कडक शिस्तीत चालणारी, वागणारी ती एक चळवळ होती. अभाविपचे कार्यकर्ते असोत वा शाखेचे, बापूरावांच्या शिस्तीतून सुटका नसे. दररोज संध्याकाळी वॉर्डातून डॉक्टरांची फेरी असावी तशी ठीक पाच वाजता बापूरावांची फेरी व्हायची. जिन्यावर त्यांची पावले वाजली की आम्ही कार्यकर्ते गुणी बाळे असल्यासारखे सावरून मांडी घालून बसत असू. मग बापूरावांची नजर कार्यालयाचा इंचनइंच तपासे. "अरे? हा खिळा काल इथं भिंतीवर नव्हता, आज कसा आला?" इथवर तपासणी चाले. बहुतेक सर्व विद्यार्थी दशेतील, काही जण "पूर्ण वेळ", तर काही जण "प्रवासावर" असलेले "पूर्ण वेळ" असायचे. कधी सदाशिवराव देवधर प्रवासावर असायचे ते कार्यालयात यायचे. मृदूभाषी. अत्यंत नम्रपणे आमचे बोलणे ऐकायचे, नेमके शब्द वापरून बोलायचे. कधी कधी चंद्रकांतदादा यायचे. तेही अगदी शांतपणे आमचे बोलणे ऐकायचे. कधीकधी त्या चष्म्यामागे मिष्किलपणा डोकावतो आहे असे वाटायचे, पण तसे काही नसायचे. सगळे सतरा-अठरा वयोगटातील माझ्यासारखे तरुण त्यांच्याभोवती जमलेले असायचे. सदस्यता अभियान, संपर्क, महाविद्यालय निवडणुका, बौद्धिक, अभ्यासवर्ग, परिवार, राष्ट्रीय पुनर्निर्माण असे अनेक शब्द कानावर पडत राहायचे. उमेदीची वर्षे अर्पण केलेले वासंती लोंढे, धडाडीचा प्रसाद जोग, स्वच्छ सरळ विचारांचा प्रमोद कुलकर्णी, सौम्य पण ठामपणे आपले विचार मांडणारी संगीता गोडबोले असे पूर्णवेळ कार्यकर्ते आम्हाला लाभले होते. पूर्णवेळ नसून पूर्णवेळ असलेले बाळासाहेब गायकवाड सर हे तर माझे दैवत होते. त्यांच्यासारखा निर्मल आणि ममत्व असलेला कार्यकर्ता मी पाहिला नाही. समस्त कार्यकर्त्यांची चिंता डोक्यावर घेऊन ते वावरत. पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे तर ते अदृश्य पालकच होते. पदरचा पैसा खर्च करून त्यांची समाजसेवा चालू असे. कार्यक्रमांची आखणी करणं, त्यांच्या प्रचाराचे निरनिराळे मार्ग शोधणं, युवाशक्तीशी संपर्क वाढवण्याच्या कल्पना सुचवणं, हे तर चालायचंच, पण हे आपण कशासाठी करतो आहोत याचं भान ठेवायचं आणि आमच्यासारख्यांना ते भान आणून द्यायचं काम ही "पूर्णवेळ" मंडळी करायची. माझ्यासारख्याला राहून राहून आश्चर्यजन्य कुतूहल वाटायचं, ज्या मध्यमवर्गीय घरात "आपण श्रीमंत नाही, शिक्षण हेच ध्येय ठेवा, करिअरचं भान ठेवा" असे शब्द कानावर सतत पडत असतात, अशा घरांतून ही मंडळी पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कशी बाहेर पडली? ज्या कामाचा मोबदला नाही, कुठल्या गावात पाठवले जाईल त्याची कल्पना नाही, जेवणाची खात्री नाही, झोपण्यासाठी सोय होईल याची शाश्वती नाही या कशाचाच जराही न विचार करता बाहेर पडणं हे केवळ राष्ट्रप्रेमाचा ध्यास असल्याशिवाय होत नाही. राष्ट्रप्रेम, देशप्रेम, देशबांधव यासारखे शब्द गुळगुळीत वाटतात, पण हे असे कार्यकर्ते पाहिले की वाटतं असे शब्द नुसते शक्य नाहीत तर ते प्रत्यक्षात आले आहेत. संघानं ही वृत्ती निर्माण केली, परिवारात पसरवली. आज कोणी संघाला काही म्हणो, निरलस वृत्तीने काम करणारी माणसे निदान भारतात तरी कुठल्याही संस्थेत नाहीत.
याच काळात विनोद तावडेला पाहिलं. मला वाटतं तो मुंबईत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करत असावा. सांगलीला त्याचं येणंजाणं असायचं. रांगडा, थोडासा पैलवान बांधणीचाच होता तो. त्यावेळी त्याच्या विचाराने, बोलण्याने लक्षात आलं होतं, की हे काम वेगळं आहे. वैचारिकता होतीच पण त्यापेक्षा दंडशक्ती त्यात जास्त जाणवायची. दे धडक, मुसंडी मारून किल्ला सर करू अशा प्रकारचा जोश त्याच्या बोलण्यातून जाणवायचा. मी त्या वेळी काही काळापुरता मी थोडासा नैराश्यवादी विचारसरणीचा झालो होतो. अर्धवट वाचन, अर्धवट चिंतन, आणि त्याहूनही विनामार्गदर्शनाचे चिंतन यातून मी स्वत:च एक स्वत:चा "वाद" बनवला होता. मला वाटतं मी कोकणात घरी प्रवास करणार होतो, त्याचवेळी विनोदही कणकवलीला निघाला होता. चार तास आमची यष्टी खाचखळग्यातून मंथन करत चालली होती आणि मी विनोदशी कर्मयोग या विषयावर वाद घालत होतो. वरून खडबडीत, रांगड्या दिसणाऱ्या या इसमात एवढे तत्वज्ञान भरले असेल, एवढे वाचन असेल याची मला कल्पना नव्हती. माझ्या "वितंड" वादाचे त्याने शांतपणे खंडन चालवले होते. तो कणकवलीला उतरून गेला तेव्हा माझ्यातील नैराश्यवाद संपून एक उत्साह निर्माण झाला होता. विनोद आज मंत्री झाला असेल, पण त्याची प्रगल्भता, सामान्य कार्यकर्त्याचं ऐकून घेणं, एवढंच नव्हे तर त्याला उत्साहित करणं हे तेव्हासुद्धा त्याच्याकडे होतं. त्यानंतर रात्ररात्र जागून काहीना काही काम चाललेलं असायचं, पण कधी त्याचं ओझं वाटलं नाही. अगदी खळ लावून पोस्टर भिंतीला चिकटवण्याचं काम असो वा कोपरा सभे मध्ये विद्यार्थ्यांच्या समोर बोलणं असो तेवढयाच आत्मीयतेनं केलं. अर्थात एकट्या विनोदने माझ्यातला कार्यकर्ता घडवला असं नव्हे तर त्यावेळचे सर्व कार्यकर्ते कमीअधिक फरकाने तसेच होते. एका माणसाने संघकार्य होत नाही, सर्वांनी मिळून होते.
आज मागं वळून बघताना वाटतं त्या काळापासून आजवर केवळ पायाभरणी चालली होती. एक एक मजबूत दगड बसवला गेलाय. काळाच्या उदरात गेलेली आमची दैवतं, ज्यांनी आम्हाला त्यांच्या साधेपणानं, सच्चेपणानं अदृश्य अशा मनगट्या दिल्या त्यांचं महत्व आता लक्षात येतंय. ती दैवतं आमच्या पायाचे दगड झाली आहेत. त्यांच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेली विनोद आणि चंद्रकांतदादा यांच्यासारखी माणसं जे शिकलो त्याचा वापर करण्यासाठी सिद्ध झाली आहेत. पुनर्निर्माण, एकात्मता हे शब्द नुसते अभ्यासवर्गात ऐकले, पण आता ते प्रत्यक्षात येण्याचे दिवस सुरू झाले आहेत. राजकारण हे दलदल, त्यात दगड टाकणे म्हणजे स्वत:वर चिखल उडवून घेणे हा समज दूर होण्याची ही सुरुवात आहे. मोदींच्या रूपाने देशात सोनेरी किरणांचे झुंजूमुंजू झाले होतेच आता महाराष्ट्राची काळरात्र संपून उत्कर्षाचा उष:काल सुरू होतो आहे. जयतु! जयतु!

No comments:
Post a Comment