Friday, October 3, 2014

आमची सौंदर्यदृष्टी

"भिंत पिवळी आहे" हे सौंदर्यवाचक विधान पुलंनी निरगांठ-उकल तंत्राने समजावून सांगितलं त्याला अनेक वर्षे लोटली. त्यानंतर महाराष्ट्राची सौंदर्यदृष्टी कुठे लोप पावली कुणास ठाऊक. ती सौंदर्यदृष्टी असलेला, व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे आणि पापुद्रे असलेला नानू सरंजामेसुद्धा गायब झाला. अवघा महाराष्ट्र कसा धोंडो भिकाजी जोशांसारख्या असाम्यांनी भरून गेला. सकाळी ऑफिसला जायचं, ऑफिसातून परत येताना कुटुंबोपयोगी वस्तू आणायच्या. पूर्वीचे धोंडोपंत मंडईतून मेथीची जुडी आणत असत, आताचे धोंडो भिकाजी हॉटेलमधून पार्सल बांधून आणतील एवढाच काय तो फरक. परंतु एकूण सौंदर्यदृष्टीचा ऱ्हासच होत चालला असावा. पूर्वी भिंत पिवळी तरी राहायची. तिच्याकडे टक लावून तिच्या एकूण व्यक्तिमत्वाचा अन्वयार्थ तरी लावणारे लोक होते. पुढे पुढे ती आस्था राहिली नाही. उलट छान रिकामी भिंत दिसली तर जाणारे येणारे लोक तिचा अन्वयार्थ लावत तिला युरिया, अमोनिया पुरवत उभे राहायचे आणि 'मोकळे' वाटले की बिनदिक्कत चालू लागायचे. कुणी उंचे लोग उंची पसंदवाले जाता जाता तिच्यावर 'माणिकचंद'चा सडा शिम्पायचे. फेसबुकचा जमाना अजून आलेला नव्हता. त्यामुळे कुणाचे कुणाशी लफडे आहे याचे पोस्ट्स असल्या खऱ्याखुऱ्या शिमिट-विटांच्या भिंतीवर व्हायचे, किंवा एखाद्याच्या त्याच्या शत्रूबद्दल असलेल्या प्रेमळ भावना व्यक्त व्हायच्या. कुणी येरू परगावहून आला असेल तर तो स्वत:चे नाव तारीख  लिहून टाकून आपली सहल अजरामर करायचा. थोडक्यात, आज जो माल सोशल मीडियावर असतो तो सर्व एका ठिकाणी मिळायचा. पण यातून लोक सौंदर्यदृष्टी गमावून बसले. भिंत पिवळी राहिली नाही. एकूणच कश्शाकश्शात आपल्याला सौंदर्यदृष्टी राहिली नाही. भिंतीचं राहोच, मुंबईत एवढे उड्डाणपूल बांधले गेले, त्यात कुठेही सौंदर्य दिसत नाही असं नुकतंच आमच्या लक्षात आलं आहे. म्हणजे तसं कळलं नसतंच, पण अवघा महाराष्ट्र सौंदर्यविषयक ग्लानीत झोकांड्या खात असताना, सौंदर्याची अफाट जाण असणारा एक युगपुरुष दादरच्या 'बालमोहन' मध्ये तयार होत होता याची इतके दिवस आम्हाला काहीच कल्पना नव्हती. इतर सर्वसामान्य बालकांसारखाच हा बालक दिसायचा. आमच्यासारखेच इयत्ता पाचवीपर्यंत धनुष्यबाण खेळायला आवडणारा, पुढे कोण व्हायचंय असं विचारलं तर बाणेदारपणे "रेल्वे इंजिनचा ड्रायव्हर" असे सांगणारा. चित्रंबित्रं ठीक काढायचा. आम्हाला खात्री होती की हा लेकाचा त्याच्या चित्रकार काकांकडून काढून घेतो. एकदा बहुधा काकांनी चित्र काढून दिले नसावे. याने मग स्वत:च काहीतरी काढले आणि मास्तरांना दाखवले. मास्तर ते पाहून लालबुंद झाले आणि त्याला ओणवे राहायची शिक्षा दिली. "अश्लील लेकाचा" असे काहीसे ते पुटपुटल्याचे आम्ही ऐकले. मास्तर मग बाहेर गेल्याचे निमित्त साधून आम्ही हळूच ते चित्र पाहिले आणि आम्हीही सटपटलो. पण त्याच्या या बिनधास्तपणाने आम्ही इम्प्रेस पण झालो होतो. मोरू त्याला म्हणालासुद्धा,"च्यायला, हिम्मत आहे रे तुझी! आमचं काही धाडस झालं नसतं बुवा!" त्यावर तो म्हणाला, "तुम्ही आणि मास्तर दोघेही दगड आहात दगड! तुम्हाला चित्रकलेतलं ओ की ठो कळत नाही! एवढं छान धनुष्यबाण काढलं आहे मी, त्यात काय वाईट आहे?" आम्ही कागद फिरवून पुन्हा नीट पाहिले आणि डोक्यात प्रकाश पडला! पण मास्तरांचंही काही चूक नव्हती, आडवे धनुष्य आणि बाणाचे टोक खाली हे सगळे प्रकरण जरा अश्लीलच दिसत होते. "अरे पण तू हे असं आडवं का काढलंयस? त्याने सगळा घोळ झालाय." त्यावर खुदाई खिन्नतेने तो म्हणाला, "तुम्ही असेच दूधभात करत राहा! सौंदर्याला अनेक कंगोरे असतात, ते व्यक्त करणाऱ्या रेषा सरळ उभ्या सरधोपट कधीच नसतात. धनुष्यबाण उभा, बाणाचं टोक उजव्या दिशेला असा काय नियम आहे? असलाच तर असले नियम तोडणे हे तीक्ष्ण बुद्धीच्या सौंदर्यवाचकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे." त्याच वेळी आम्हाला लक्षात यायला हवं होतं. कॉलेजमध्ये त्याची ही सौंदर्यदृष्टी अजूनच तीक्ष्ण झाली. कॉलेजच्या व्हरांड्यामध्ये टीपी करताना एखादं छानसं मॉडेल दिसलं की आम्ही ते हॉटेलमधील "आजचे ताजे पदार्थ"चा बोर्ड वाचल्याप्रमाणे वरून खाली असं वाचत जात असू. त्यावेळी हा "हे सौंदर्य चिरंतन टिकणारे नाही. आज तिच्या हातात तुम्हाला वह्या दिसत आहेत. मला अजून पाचसहा वर्षांनी त्याच ठिकाणी किरकिरे पोर दिसते आहे. आज त्या बटा कपाळावर झुलताहेत, काही वर्षांनी त्या स्वयंपाक करताना डोळ्यावर येतात म्हणून घट्ट अंबाड्यात जातील. आज जो सलज्ज कटाक्ष तुम्हाला घायाळ करतो आहे, ज्यात तुम्ही येण्यासाठी धडपडता आहात, तोच उद्या कठोर लक्ष ठेवण्यात बदलणार आहे आणि तुम्ही त्यातून लपण्याचा प्रयत्न करीत असाल. तेव्हा मित्रांनो आत्ताच्या बटांत, कटाक्षात, ठुमक्यात, कोकिलध्वनीत सौंदर्य शोधू नका. नंतरच्या झिंज्यात, क्रुद्ध नजरेत, ठणक्यात आणि कोकलध्वनीत शोधा. तेच शाश्वत आणि चिरंतन आहे. तुम्ही हे जग सोडेपर्यंत तेच तुमच्या उशाशी दिसेल." असा सल्ला देत असायचा.

पुढे आमचे मार्ग वेगळे झाले. धनुष्यबाणवाल्या चित्रकाराचे जीवन पूर्वीही संपन्न होते. शाळाकॉलेज संपल्यावर तो त्याच संपन्न जीवनात निघून गेला आणि आम्ही जगण्याच्या धडपडीत हरवलो. तो पुढे काकांच्याच व्यवसायात पडला, आपली सौंदर्यदृष्टी तेथे वापरू लागला अशा बातम्या यायच्या. मी ड्राफ्टसमन झालो, मोरू कुठल्या तरी औषधाच्या कंपनीत सेल्समन म्हणून लागला. पण आमची मैत्री टिकून राहिली. आम्ही भेटत राहिलो. आमच्या बोलण्याचे विषय ठरलेले नसायचे. बहुतेक वेळा फार न बोलता आम्ही एखाद्या उडप्याच्या हॉटेलमध्ये जायचो. मी मसालादोसा घ्यायचो, मोरू इडलीवडा सांबार, चटणी एक्स्ट्रा मागवायचा. अशी खादी करून झाली की तो त्याच्या घराच्या दिशेने फुटायचा, मी माझ्या. मी रेषांच्या जगतातील चित्तरकथा सांगायचो, तो कुठले औषध अजिबात घेऊ नये हे सांगायचा. सौंदर्यदृष्टी वगैरे विषय कधी आमच्या नात्याला शिवला नाही. शिवाय उडप्याच्या हॉटेलात सौंदर्य हा शब्दही फाऊल ठरतो. "दोन नंबर टेबलपे दो दोसा देना, एक एक्स्ट्रा चटणी" हे असले संवाद, इडलीडोसा, सांबार आणि काउंटरवरील अण्णाने "मंत्रालया"च्या राघवेंद्रस्वामींसमोर नुकतीच लावलेली उदबत्ती यांच्या संमिश्र वासात कोणत्या सौंदर्याचे विचार डोक्यात येतील बरे? आलेच तर समोरच काळाकभिन्न अण्णा सगळ्यांकडे रोखून लक्ष ठेवून असायचा. त्याला पाहिले की "नौ बजे स्पॉट, नौ बजकर पाच मिनट पे मोमेंट आउर नौ बजकर पंधरा मिनटपे गेम होगा" हेच डायलॉग ऐकू आल्यासारखे वाटायचे. सौंदर्यवाचक विचार कुठल्या कुठे पळून जायचे. मोरू तर त्याला जाम घाबरून असतो. त्याच्या मते हे हॉटेल म्हणजे अण्णाचा नुसता दाखवायचा धंदा आहे. त्याचा खरा धंदा कार्नेटिक संगीतसमारंभात घटम वाजवायचा आहे असे तो म्हणतो. "एकदा अण्णाला मुंडू नेसून सकच्छ नेसलेल्या बायकांच्या घोळक्यातून षण्मुगानंदमधून बाहेर पडताना पाहिले होते. हातात घटम होता त्याच्या." इति मोरू. खरे खोटे देव जाणे. बाकी सदैव गल्ल्यात हात घालून चिल्लर खुळखुळवणाऱ्या अण्णाला घटम वाजवताना पाहणे म्हणजे केजरीवालना संघाच्या गणवेशात इफ्तार पार्टीत पाहिल्यासारखे आहे. लग्नाचं म्हणाल तर जी पहिली मुलगी सांगून आली ती सांगून आली हेच नशीब असे म्हणत पसंत करून दोनाचे चार हात झाले होते. पुढील एक दोन वर्षांत हिनेही तेच सांगून माझा अंदाज बरोबर ठरवला. "दिसण्यावर जाऊ नकोस, ते काय कुणाच्या हातात असतं? पण मुलगा सालस आहे. ठरवलंन तरी बाहेर काही भानगडी करू शकणार नाही." असं तिच्या बाबांनी तिला सांगितलं होतं म्हणे. मोरूनंही मुलीबद्दल काय अपेक्षा काय आहेत असं विचारल्यावर "मुलगी असावी आणि तिला कुळथाचं पिठलं करता यावं" एवढीच माफक अपेक्षा समोर ठेवली होती. कुळिथाच्या पिठल्याविषयी मोरू तडजोड करायला तयार नव्हता एवढंच काय ते त्याच्या जीवनातील छोटंसं नाट्य. तात्पर्य आमचे सौंदर्यविषयक ज्ञान आमच्या कपाळावरील रेषांमध्ये सीमित झाले होते.

अशात अचानक 'तो' भेटला. नेहमीप्रमाणे मी आणि मोरू अण्णाच्या हॉटेलात बसलो होतो आणि सचिंत मुद्रेने डोसा की इडलीवडा या विचारद्वंद्वात होतो. नेहमीप्रमाणे दोश्याचा विजय होणार असं वाटत होतं तेवढ्यात काहीसा गलका ऐकू आला. पाहतो तर अण्णा गल्ल्यामागून उठून बाहेर आला होता. त्याने चक्क प्यांट घातली होती. गल्ल्यामागे बसताना तो नुसता आकाशकंदील छाप चट्टेरीपट्टेरी पायजमा घालून बसतो असा मोरूचा अंदाज होता, तर मला तो मुंडू नेसून बसतो असे वाटायचे. आज कळले. असो. तर, पाहतो तर 'तो' समोर उभा. त्याच्यासमोर चेहऱ्यावर अत्यंत भक्तीभाव आणून अण्णा उभा होता. "सार, आपन सोता आमच्या हॉटेलमदी? आमचा नसीब फळला आमच्यावर आज. जय म्हाराष्ट्र! ए तंबी, स्पेशल फिल्टर कॉफी आन जल्दी." "ओळखलंस काय रे चिंतामणी?" मी आणि मोरूने झापड मिटली आणि "अरे हो हो, ओळखलं म्हणजे काय ओळखलंच! जय धनुष्यबाण! जय म्हाराष्ट्र!" असे वंदन केले. तसे हात वर करून मला थांबवत म्हणाला,"हां हां! धनुष्यबाण नाही आता. आता सुपरफास्ट रेल्वे इंजिन." तसे मी आणि मोरू राजकारणाच्या भानगडीत पडत नाही. "असं होय. आम्हाला वाटलं, ते आडवं धनुष्य तू उभं करून त्याला प्रत्यंचा जोडली असावीस. आणि काय रे, या तुझ्या इंजिनामागे एकही डबा दिसत नाही कसा तो? यार्डात चाललेलं इंजिन आहे की काय?" असं काहीसं मी म्हणालो. त्यावर तो म्हणाला,"मित्रा, तुझा दोष नाही. तुला सौंदर्यदृष्टी असती तर कळलं असतं. हा समोरचा उड्डाणपूल पहा. त्याच्याकडे पाहून तुला काय वाटतं?" मी आणि मोरू एकमेकांकडे बावचळून पाहू लागलो. मी म्हणालो,"पुलाकडे पाहून काही वाटायला काय ती माधुरी दीक्षित आहे? बरा आहे आपला. कधीमधी चालता चालता अचानक पाऊस आला तर पटकन त्याखाली उभं राहता येतं. हा पूल तसा समाजवादीही आहे. गोरगरीब रात्री त्याच्या आश्रयाला येतात. पावभाजी, अंडाभुर्जीच्या गाड्या लागतात." त्यावर तो एकदम भडकला. जोरात टेबलावर हात आपटून म्हणाला,"हेच! हेच आपलं दळिद्रीपण. अरे पूल बांधायचा म्हणजे काय फक्त त्यावरून गाड्या जातील आणि खाली भिकारी झोपतील यासाठी? अरे इंग्रजांच्या काळातील इमारती पहा, पूल पहा! काय एकेक दगड! आजही शाबूत आहेत. का? त्यांना तशी सौंदर्यदृष्टी होती. हे बघ." टिकाऊपणाचा आणि सौंदर्यदृष्टीचा काय संबंध असावा असा विचार मी करत होतो. माझ्या वडिलांनी तीस वर्षांपूर्वी घेतलेले पायपुसणे अजून जपून ठेवले आहे. त्यांना त्यातील सौंदर्य आवडले असावे की टिकाऊपणा? तसेच काहीसे असावे असा अन्वयार्थ मी लावत असताना त्याने पिशवीतून कागदाची गुंडाळी काढली. "ही आहे विकासाची ब्ल्यू प्रिंट. बिल्डर लोकांनी वाटेल तशी बांधकामं करून मुंबईची वाट लावली आहे. आपण पण बिल्डर आहे कबूल, पण आपण फक्त बंद पडलेल्या मिल्स घेतो. खरूज व्हावी तशा झोपडपट्ट्या, डोंगरावर अतिक्रमण करून बांधकामं चालू आहेत. हे मला थांबवायचं आहे. आज लोक म्हणतात वाघ बिबटे वस्त्यांत येऊन हल्ले करताहेत. अरे, ते तुमच्या घरात नाही आलेले, तुम्ही त्यांची घरं हिसकावून घेऊन ही कॉंक्रीटची जंगलं उभारता आहात. बघ, बघ ही ब्ल्यू प्रिंट!" असं म्हणून त्यानं माझ्यासमोर तो नकाशा ठेवला. आता आपल्याला त्याच्याएवढी सौंदर्यदृष्टी नाही हे कबूल, पण नकाशा एखाद्या चांगल्या ड्राफ्टसमनकडून तरी करून घ्यायचा. चांगला ए१ साईझचा पेपर वाया कशाला घालवायचा? नॉर्थ दाखवली नव्हती. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया वर की खाली ते कळत नव्हतं. अनेकठिकाणी पुलांच्या सांकेतिक खुणा होत्या. मी म्हणालो,"पण मला एक सांग, हे जे पूल घाणेरडे बांधले आहेत म्हणून तू म्हणतो आहेस, तेव्हा सत्तेत धनुष्यबाणाबरोबर तूही होतास ना? त्याचवेळी तुझी सौंदर्यदृष्टी लावून टाकली असतीस म्हणजे हा प्रश्न आला नसता. बाकी छानच आहे रे चित्र. तुला पहिल्यापासूनच ही दृष्टी आहे. एक सांगू? पुढच्या वेळी ड्रॉईंग काढून हवं असलं तर माझ्याकडे ये, मी उत्तम ड्राफ्टसमन आहे. फुकट ड्रॉईंग आणि प्रिंट देईन करून." त्याने आमच्याकडे अगदी शाळेत जशा नजरेने पहायचा तसेच पाहिले आणि म्हणाला,"खरंच, तुला सौंदर्य कशाशी खातात ते कळत नाही."

No comments:

Post a Comment