Thursday, January 8, 2015

हम दो, हमे होने दो

फार पूर्वी म्हंजे इंदिराबाईंच्या काळात "एकच जादू, झपाटून काम" ही घोषणा प्रसिद्ध झाली होती. म्हणजे सरकारतर्फे प्रसिद्ध केली गेली होती, लोकांत मुळीच प्रसिद्ध झाली नव्हती. झपाटून काम म्हणजे ऑफिसमध्ये वेळेवर जाणे, टिवल्याबावल्या न करणे, दिवसातून केवळ दोनदा चहा प्यायला जाणे, खरोखर शीक पडल्यासच सिक लीव्ह टाकणे वगैरे गैरसमजुतीमुळे लोक नाराज झाले होते. त्याचा फटका इंदिराबाईंना निवडणुकीत बसायचा तो बसला. लोकांनी आपल्या बॉयकट ऐवजी राजनारायण यांचा फडकेमंडित श्मश्रुभूषित चेहरा आवडला याचे त्यांना आयुष्यभर वैषम्य वाटत राहिले. पुढे सरकारने लोकबंधू आणि फडकेबांधू राज नारायण यांचे पोष्टाचे तिकीटही काढले. ते पाहून मला नेहमी राजेंद्रनाथ या विनोदी नटाची आठवण येत असे. असो. तात्पर्य, झपाटून काम ही संकल्पना स्वीकारली गेली नाही. मग आम्ही परीक्षेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर आले नाही की जे करत असू तेच इंदिराबाईंनी केले. पुढचा प्रश्न हाती घेतला. लोकसंख्येचा. अशा वेळी परीक्षेत आमचे जे व्हायचे तेच इंदिराबाईंचे झाले असावे. आधीचा सोडलेला प्रश्न सोपा वाटू लागला. पण इंदिराबाई म्हणजे काही आम्ही नव्हे. प्रश्न ऑप्शनला टाकणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यातून सौतंत्र भारताचे कणखर व्यक्तिमत्व असल्यामुळे माघार घेणे त्यांना माहीत नव्हते. त्यांनी पुढली घोषणा केली. "हम दो हमारे दो". त्यांचा स्वत:चा त्यावर विश्वास होता. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वत: प्रथम तो नियम पाळला होता. त्यांचा भविष्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे मुले होण्याआधी त्यांनी कुठल्याही ज्योतिष्याचा सल्ला वगैरे घेतला नव्हता. घेतला असता तर पुढे आपल्या नशिबात कसले नातवंडसूख वाढून ठेवले आहे हे कळले असते. त्यांना भारताच्या भविष्याची चिंता नेहमीच असे. मुलेबिले होऊ दिली नसती. त्यांनी "हम दो हमारे दो" ही घोषणा दिली खरी. परंतु त्याकाळचे ते लोक. "हम दो, हमे होने दो" यावर विश्वास अधिक असायचा. पूर्वी म्युन्शिपालटीची गाडी दिसली की मोकाट कुत्र्यांची पळापळ व्हायची, आता त्यात मोकाट पुरुषांची भर पडली. मग नसबंदी करून घेणाऱ्यास "ट्रान्झिस्टर आणि शंभर रुपये" असली भरघोस मदत जाहीर करून झाली. नसबंदी करून घेतलेल्या पांडबा अथवा म्हादबाने ट्रान्झिस्टर गळ्यात घालून भप्पी लाहिरीची गाणी (गरजूंनी "जी ले ले  जी ले ले" हे देहांतशासनाच्या लायकीचे गाणे आठवून पाहावे) ऐकत अत्यानंदाने नाचावे अशी काहीशी सरकारची अपेक्षा होती. त्यावेळी काही ती पुरी झाली नाही, परंतु अलीकडेच रा. रा. अमीर खान (सत्यमेव जयते फेम) यांनी राजू हिरानी नावाच्या इसमाच्या सहाय्याने ती पूर्ण केली. चित्रपटाचे पोष्टर पाहिल्यावर प्रथम वाटले हा मनुष्य नुकताच नसबंदी चुकवून ट्रान्झिस्टर तेवढा लंपास करून पळून आला आहे. काही काही लोक दिसतातच असे की त्यांना पाहून नसबंदी हा मानवता टिकवण्याचा उपाय वाटू लागतो. हिरानी याने तो ट्रान्झिस्टर यूएसए मेड असल्याचे सांगितले. लोकांनी त्याचा साहजिक अर्थ उल्हासनगर सिंधी असोसिएशन असाच घेतला. यूएसए मेड प्रॉडक्ट ज्या लायकीचे असतात, फार काळ टिकत नाहीत, तसेच काहीसे या चित्रपटाचेही कदाचित होईल. पण काही म्हणा, ट्रान्झिस्टरला पुन्हा चांगले दिवस येऊ घातले आहेत. वाईटातून चांगलं निघतं ते असं. 

हम दो हमारे दो ही घोषणा ऐकून समाजाच्या विविध थरातून विविध प्रतिक्रिया आल्या. श्रीमंत लोक म्हणाले इथं एकाची मारामार, तुम्ही दोन सांगताय. मध्यमवर्गीय म्हणाले ते आम्हाला कळतं आहे, तुम्ही सांगायची गरज नाही. आम्हाला कळलं नाही तरी आमचा पगार आम्हाला तेच करायला लावील. ज्या लोकांच्या जमिनी-बिमिनी होत्या ते म्हणाले दिवसभर शेतात कष्ट करावेत, घरी यावं, कारभारनीनं दिलेला गुळाचा चा प्यावा, आन मग निवांत भावकीची भांडणं, शेताच्या बांधावरून झालेल्या हाणामाऱ्या, त्यावरून पडलेल्या तारखा, कागूद हे असं सगळं पाहत बसावं. कोर्टात साक्ष पायजे असेल तर ज्याची साक्ष असेल त्याचं चा-पानी बघणं असायचं. भाऊबंदकीची भांडणं भाऊ असल्याबिगर होत न्हाईत. आमच्या बापजाद्यांनी आमची ती सोय करून ठ्येवली, मंग आमी आमच्या पोरांची कराया नगं व्हंय? आता हम दो आणि हमारे फकस्त दो म्हनल्यावर भाऊबंदकी कशी करायची हो या दोगांत? किमान चारपाचची तरी परवाणगी द्या की. गरीब लोकांतून मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटली. श्रीमंत लोक घरी जातात तेव्हा त्यांना करमणुकीची साधने उपलब्ध असतात. क्लब्ज, पार्ट्या, गाड्या इत्यादी. मध्यमवर्गीय लोकांकडे ट्रान्झिस्टर, माजघरातील गप्पा, शेजारणीशी सासूनणंदांच्या उखाळ्यापाखाळ्या, पुरुष मंडळींना ब्रिज, पत्ते, कट्टे आणि ते झाल्यावर बायकोची विविधभारती. आमी गरीब लोकांनी काय करावं? आमचा येकमेव विरंगुळा ती आमची ही पोरं, तो बी काडून घ्येता व्हंय? आमी घरी गेल्यावर काय करावं म्हंता? सरकार आमाला फुकाट ऱ्हाऊ द्या सस्ती वीजबी देत न्हाई, अंधारात मग काय करावं आमी? अंधारात येवढी एकच विच्छा आसतीय तेवढी तरी पुरी करा आमची. असा सगळा धुरळा उडाला आणि हम दो हमारे दो अभियान सरकारी कागदोपत्री आणि सरकारी गाड्यांवरच्या  घोषणांच्या स्वरूपात उरलं. सुदैवानं हिंदू धर्मात एकच बायको करायला परवानगी होती आणि आहे. बहुतेकांना एकीला तोंड देता देता फेस यायचा. त्यामुळे पुरुषांना ते बंधन न वाटता दिलासा वाटायचा. नाही म्हणायला काही एकापेक्षा जास्त "ठेवणारे" महापुरुषही होते. परंतु त्यात विलासापेक्षा पराक्रमाचा भाग जास्त होता.

सध्या सरकारशी जवळीक असणाऱ्या काही मंडळींनी या दोन्ही योजना आणि त्यांचा उडालेला बोजवारा यांचा अभ्यास केला आहे. दोन्ही योजना चांगल्या होत्या, मग त्यांची अशी बोंब व्हायचं कारण काय असा प्रश्न घेऊन ही मंडळी कमंडलू आणि त्रिशूल घेऊन तपश्चर्या करायला बसली. कमंडलू या वस्तूविशेषाबद्दल आमच्या मनात बहुत कुतूहल आहे. आम्ही प्रत्यक्षात कधी कमंडलू पाहिला नव्हता. आमचे एक स्नेही अलीकडे नव्याने जळजळीत हिंदुअभिमानी झाले आहेत. त्यांनी कमंडलूचे रहस्य सांगितले. शाळाकॉलेजात असताना ते असे काही असतील अशी शंका आली नव्हती. कारण आमच्या बरोबरीने तेही आचमनसंध्येला बसत. ते बरोबर नसतील तर आम्ही मित्रही त्यांना अर्घ्य सोडल्याशिवाय आचमन करीत नसू. आम्ही सायंकाळी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणत फुले आणि पाखरे पाहण्यासाठी बाहेर पडत असू त्यावेळी अंधार पडायला आला असूनही हे गॉगल लावून बाहेर पडत असत. त्या गॉगलचे नेमके प्रयोजन आम्हालाही माहीत होते. हे एखाद्या पाखराकडे टक लावून पाहत ते त्या भोळ्या भाबड्या पाखराला कळत नसे. खरे तर कळले असते तरी त्या पाखराने याच्याकडे पाहिले असते की नाही याबद्दल आमच्या मित्रपरिवारात दुमत होते. काहींच्या मते पाखराने दयेने पाहिले असते तर बाकीच्यांच्या मते केवळ भूतदयेने पाहिले असते. तात्पर्य, हिंदुत्ववाद हा केवळ प्रात:शाखेपुरता मर्यादित होता. सकाळी दुधाच्या पिशव्या आणायला जायचंच असायचं. थोडासा हिंदुत्ववादाचा रतीब घालून होईपर्यंत चितळे "उघडायचे". त्या रतीबाचे बिल इतक्या वर्षांनी समोर येईल असे वाटले नव्हते. शिवाय शाखेत शिकवलेला हिंदुत्ववाद हा व्यापक होता. संकुचित नव्हता. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर यांची गाडी हिंदुत्ववादाच्या कोणत्या रिपेअर शॉप मध्ये गेली हे कळले नाही. पण गाडी रिपेअर होऊन बाहेर आली तेव्हापासून मिसफायरच जास्त करत होती. कॉलेजमध्ये "थट्टीफस"ला मित्रांत कुणाची टाकी जास्त कपॅसिटीची याची चढाओढ करणारे हे आता जाज्वल्य संस्कृतीचा अभिमान बाळगून सेलेब्रेशन तर लांबच, तुमच्या शुभेच्छाही नकोत म्हणू लागले. कॉलेजमध्ये "मंग काय राव, आपन जाऊन डायरेक नडलो न राव तिला" अशा फुशारक्या मारणारे आता व्हॅलेंटाईन डेला छापे मारून पोरापोरींना पकडू लागले. आम्ही या बाबतीत त्यांना विचारले असता तू साक्षी महाराजांकडे जा असा त्यांनी आम्हाला सल्ला दिला.

प्रंपूज्य साक्षी महाराजांनी या बाबतीत पूर्ण अभ्यास केला आहे असे आमच्या निदर्शनास आले. महाराजांशी आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी प्रथम "तुम्हांस बायका किती?" असे विचारले. त्यांच्यासमोर आम्ही खुरमांडी घालून बसलो होतो. स्वामी व्याघ्रासनावर बसले होते. आम्ही खाली मान घालून "एकच आहे महाराज. सध्या." असे उत्तर दिले. आम्ही "सध्या" हा शब्द उच्चारल्यावर त्यांनी तीव्र नजरेने आमच्याकडे कटाक्ष टाकला. त्या कटाक्षात आमचे भस्म करण्याइतपत दाह होता. त्यांनी मग विचारले,"तुम्हांस मुले किती?" आणि इथे तरी आम्हांस निराश करू नका अशा अविर्भावात ते आमच्याकडे पाहू लागले. आम्ही मान खाली घातलीच होती, ती तशीच ठेवून हळूच बोललो,"दोन, महाराज." त्याचक्षणी पावलाला कसलातरी चटका बसला. महाराजांनी नजरेची पॉवर वाढवली, आता आपले बहुधा भस्म होणार असे वाटत असतानाच पायापाशी ठेवलेला चहाचा कप दिसला. आश्रमातील ब्रम्हवादिनीने चहा आणून ठेवला होता. चटका त्याचा बसला होता. "फक्त दोन? का? परमेश्वराने काही तरी योजना करून हा मनुष्यदेह तुम्हाला दिला आहे ना? डोके बुद्धीसाठी, डोळे पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, तोंड खाण्यासाठी, हात काम करण्यासाठी…" आमचे ब्लडप्रेशर वाढत चालले. सुदैवाने ती मघाशी चहा आणून देणारी ब्रम्हवादिनी पुन्हा आत आली आणि महाराज "दोन हातांवर"च थांबले. आम्ही कपाळावरचा घाम पुसला. "पूर्वी याच योजना होत्या, पण त्या नीट राबवल्या गेल्या नाहीत." महाराज पुढे बोलू लागले. "आम्ही म्हणतो एकच जादू झपाटून काम ही योजना हम दो हमारे चार याला पूरकच आहे. झपाट्याने कामाला लागा आणि किमान चार मुले जन्माला घाला. चिंता करू नका. ज्याने दिली चोच तोच देईल चारा हे ध्यानात ठेवा. प्रत्येक हिंदूने आपल्या दिवसातील किमान एक तास या कार्यक्रमासाठी अर्पण केला पाहिजे. हे राष्ट्रकार्य आहे हे ध्यानात ठेवा. पंतप्रधानांनी स्वच्छता अभियान असं नुसतं म्हटलं तर सगळ्या देशाने झाडू हातात घेतला. आता या योजनेसाठी तुम्ही उत्साहाने… " ती ब्रम्हवादिनी रिकामे चहाचे कप घेऊन जाण्यासाठी पुन्हा आत आली. आम्ही केवळ कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिले आणि ती संधी साधून "महाराज, आम्ही येतो. राष्ट्रकार्याला लगेच सुरुवात करायची आहे." असे म्हटले. महाराजांच्या डोळ्यांतील प्रखरता कमी झाल्याचा भास झाला. "उत्तम! आता याल तेव्हा पेढे घेऊनच या. या कार्यात आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. उत्तिष्ठत! जागृत!" शेवटचे दोन शब्द उच्चारताना त्यांच्या डोळ्यात मिष्किल भाव दिसल्याचाही भास झाला. महाराजांनी आम्ही निघताना त्यांची "वैराग्य शतक" आणि "नीती शतक" ही दोन पुस्तके भेट दिली. त्यावर संदेशही लिहून दिला - "वैराग्य पत्करून नीतीने राष्ट्र बलवान करा. किमान चार मुले जन्माला घालून त्यांच्या मातेला, पर्यायाने भारतमातेला उपकृत करा." आता राष्ट्र बलवान होणे केवळ अटळ आहे. आता फक्त आमच्या हिला राष्ट्रप्रेमाची ही संकल्पना पटायला हवी.

No comments:

Post a Comment