Monday, January 19, 2015

राशोमान

केजरीवाल  - न्यायाधीश महोदय, मी गाडीतून नेहमीप्रमाणे धरणे धरायला चाललो होतो.  गाडी सिग्नलपाशी थांबली. एका भिकाऱ्याने काचेवर ठोठावले. मी काच खाली केली. भिकाऱ्याने विचारले "तुम्हीच का ते केजरीवाल?" मी हो म्हटले. भिकाऱ्याने झोळीतून पाच रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवले. म्हणाला, "ही माझ्याकडून थोडीशी मदत. आम्हा गरिबांना तुम्हीच वाली. तुमच्याकडूनच आता काही आशा आहे. देव करो, आपण जिंकून याल." मला अश्रू अनावर झाले. पुढे दोन दिवस मी ते पाच रुपये खिशात ठेवून फिरत होतो. जितक्या वेळा हात खिशात जात होता तितक्या वेळा त्या भिकाऱ्याची आठवण येत होती. त्या पाच रुपयांत त्याचे अमूल्य असे आशीर्वाद होते. त्या आशिर्वादांपुढे जगातील कोणतीही शक्ती केवळ कमी ठरेल.

भिकारी - नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता चौकातल्या आपल्या बीटवर होतो. शिंगलला एक नॅनो येऊन थांबली. हे पंटर ही असली गाडी घेण्याऐवजी सरळ चालत का जात नाहीत कुणास ठाऊक. ड्रायव्हर ओळखीचा वाटला. थंडी नसतानाही त्याने स्वतःला नखशिखांत लोकरीत गुंडाळून घेतले होते. मला पाहून त्याने नजर चुकवली. मी जणू काही अस्तित्वातच नसल्यासारखा समोर पाहू लागला. तेवढ्यात त्याला एक सणसणीत शिंक आली. आणि मला आठवलं. अरे हा तर तो फुकट वीजवाला! सी एम झाला, नंतर पुढे काय झालं कळलं नाही. पण रस्त्यावर आडवा पडल्याचे फोटो पेपरमध्ये दिसले होते. मग पुढे तिहारमध्ये गेला होता असं कानावर आलं होतं. मन कळवळलं. हे हरामखोर दिल्ली पोलिस, सामान्य माणसाला सुखानं आंदोलन पण करू देत नाहीत. त्याचा चेहरा ओढलेला वाटला. पोट खपाटीला गेलं होतं. अंगात तापही असावा. काही खाल्लं तरी असेल का यानं? काचेवर टकटक केली. त्यानं ह्यांडल फिरवून काच खाली केली. काच पूर्ण खाली जायला पूर्ण एक मिनिट लागले. पॉवर विंडोज ऑप्शन महाग पडत असावा. अमृतांजन आणि व्हिक्सचा संमिश्र दर्प दरवळला. मी खिशात हात घातला आणि जेवढे हाताला लागतील तेवढे बाहेर काढले. पाच रुपये निघाले! अजून भोनी पण झाली नव्हती. नसूदे. खाऊ दे निदान वडापाव तरी. सरळ त्याच्या हातावर ठेवले. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. बास! दिवस सार्थकी लागला. पुढे जितक्या जितक्या वेळा वडा पाव पाहिला तेव्हा त्या अश्रूंची आठवण झाली. 

पादचारी १ - दिल्लीतील उगाच रस्त्यावर फिरणाऱ्या असंख्य रिकामटेकड्यांतील मी एक. बरेचसे लाल दिव्याच्या गाडीतील रिकामटेकडे. माझ्याकडे फक्त ती गाडी नाही, म्हणून पायी फिरत होतो. रस्त्याच्या पलीकडे एक गाडी थांबली. भिकारऱ्यासारखा दिसणारा माणूस उतरला. खरा भिकारी नसावा. कारण चारपाच पावलं टाकल्यावर काहीतरी विसरल्यासारखा तो परत आला आणि त्यानं झोळीतून आयपॅड काढून आतल्या माणसाजवळ दिला. आणि मग तो सिग्नलपाशी जाऊन उभा राहिला. तो सिग्नलपाशी जाऊन उभा राहीपर्यंत ती गाडी मागेच थांबून राहिली होती. दिल्लीत असे गाडीतून हळूच उतरून पसार होणारे बरेच असतात. पण गाडीही लगेच पसार होत असते. ही अशी इथेच का थांबली याचे कुतूहल मला वाटले म्हणून मी खांबाच्या मागे लपून पाहू लागलो. तो भिकारी सिग्नलपाशी पोचल्यानंतर ही गाडी हळूहळू पुढे निघाली. सिग्नल ग्रीन होता. मग ती आणखी स्लो झाली. मग मात्र माझा संशय दाट झाला. बहुसंख्य गाड्या सिग्नल जिंकण्याच्या ईर्ष्येने पळत असतात, हिला ती घाई नव्हती. सिग्नल लाल झाला आणि ती पुढे निघाली. सिग्नलपाशी थांबली. त्या भिकाऱ्याने वळून गाडीकडे पाहिले आणि पावले टाकत गाडीपाशी आला. त्याने काचेवर टकटक केले. आतील चालकाने काच खाली केली असावी. भिकाऱ्याने थबकून इकडे तिकडे नजर टाकली आणि खिशातून एक नोट काढून त्या चालकाच्या हातात दिली. चालकाने ती नोट कपाळाला लावून वरच्या खिशात ठेवली असे वाटले. चालकाने मफलर गुंडाळला होता हेही मला दिसले. सिग्नल ग्रीन झाला. आता मात्र ती गाडी सुसाट निघून गेली. ताशी २० किमी प्रतितास म्हणजे न्यानोच्या मानाने सुसाटच. मी या सगळ्याचा विचार करत असतानाच दुसरी एक गाडी आली. बीएमडब्ल्यू असावी. आणि दुसऱ्याच क्षणी तो भिकारी आत होता. ही गाडी मात्र खरोखरची सुसाट निघून गेली. दिल्लीत काय घडत असतं  देवालाच ठाऊक.

पादचारी २ - मी सकाळी नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा होतो. हल्ली नुसती बस वेळेवर येण्याची प्रार्थना करून पुरत नाही. आधी नुसती येण्याची प्रार्थना करावी लागते. मग त्याप्रमाणे ती आलीच तर ती प्रायव्हेट नसावी अशी प्रार्थना करावी लागते. प्रायव्हेट असली तर ती "प्रासंगिक करार - बलात्कार स्पेशल" नसेल याची करुणा भाकावी लागते. बलात्कार स्पेशल बसेस हात केला तरी कधीच थांबत नाहीत. मी कधीच हात करत नाही. फुकट ऑफिसला उशीर. खुशाल मला नालायक नागरिक म्हणा. उगाच दिल्ली राजधानी नाही झाली. मी अशा अनेक प्रार्थना एकाच वेळी करत असताना, एक गाडी आली. आत दोन इसम होते. एक भिकाऱ्यासारखा प्याशिंजर तर ड्रायवर मफलर गुंडाळलेला. बिहारी असावा. चेहऱ्यावर दीन, कनवाळू भाव होते. जणू काही बटर टोस्ट विकायला निघालेला भय्याच. भिकाऱ्यासारखा दिसणारा इसम गयावया करून काही तरी सांगत होता. तो बाहेर पडायला धडपडत होता. ड्रायव्हरने हात पुढे करून काहीतरी देण्यास दरडावले असे वाटले. त्याचवेळी भिकाऱ्याने दार कसेतरी उघडले आणि तो धडपडत बाहेर आला. बटरटोस्ट भय्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले आणि तो अत्यंत करारी चेहरा करून काही तरी म्हणाला. "मैं इलेक्शन लडूंगाही लडूंगा" असे काही तरी शब्द माझ्या कानावर पडले. भिकारी थांबला. मागे परत आला आणि त्याच्या जवळच्या झोळीत हात घालून त्याने काही तरी बाहेर काढले आणि ते ड्रायव्हरकडे दिले. च्यायला! आयपॅड होता! मफलर वाल्याचे समाधान झाले असे दिसले नाही. भिकारी घाईघाईने पुढे गेला होता आणि रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नलची वाट पाहू लागला होता. ड्रायव्हरनेही पाठोपाठ गाडी पुढे नेली आणि काच खाली करून त्याला तो काही तरी सांगत होता. भिकारी असहाय्य दिसत होता. नाईलाजाने त्याने खिशात हात घालून एक नोट काढली आणि ड्रायव्हरला दिली. त्याच्या चेहऱ्यावरून तो आता पूर्ण कफल्लक झालेला दिसत होता. अचानक त्या ड्रायव्हरने गाडी पुढे दामटली आणि निघून गेला. काहीच क्षणात दुसरी एक गाडी वेगाने आली. त्यातून एक इसम उतरला आणि त्याने त्या भिकाऱ्याला अक्षरश: गाडीत कोंबले आणि ती गाडी तशीच भरधाव निघून गेली. माझ्या डोळ्यासमोर एका भिकाऱ्याला लुबाडण्यात आले होते आणि दुसऱ्याच मिनिटाला त्याचे अपहरणसुद्धा झाले होते. दिल्लीत हे घडावे याचे मला आश्चर्य वाटले. कारण दोन गुन्ह्यांत निदान दहा मिनिटाचे तरी अंतर असावे असा दिल्लीत एक अलिखित नियम आहे आणि तो गुन्हेगारांच्या जगतात पाळला जातो. कलियुग! दुसरे काय असा विचार करून मी आलेली बस पकडली. सुदैवाने ती "बलात्कार स्पेशल" नव्हती.

दिल्ली पोलिस कर्मचारी - हमने इसकी पूरी जांच की है. सिक्युरिटी कॅमेराच्या फूटेजचा वापर करून आम्ही या भिकाऱ्याच्या हालचालींचा मागोवा घेतला. अनेक ठिकाणी हिंडून हा इसम आपच्या कार्यालयात घुसताना दिसला. पुन्हा बाहेर येताना दिसला नाही. मग बाहेर येणाऱ्या कार्यकर्त्यांचे चेहरे तपासून पाहिले. त्यातल्या एकाचे त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्याशी साम्य दिसले. आम्ही त्याला चौकशीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्याघेतल्या त्याने रस्त्यावर आडवे पडून आंदोलन सुरू केले आहे. आमच्या प्रश्नांना त्याने आडवे पडूनच उत्तरे दिली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलनाचा एक भाग म्हणून त्याला हे काम देण्यात आले होते. "लोकांच्या समस्या त्यांच्यापैकीच एक होऊन अनुभवा असा असा आम्हाला सांगितले गेले. त्याचे हे प्रात्यक्षिक असे मला सांगण्यात आले होते, त्यानुसार मी हे काम केले. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी आहे. मी सध्या इंटर्न म्हणून यांच्याकडे काम करतो आहे. आमच्या स्कूलमध्ये आपमध्ये इंटर्नशिप मिळणे हे प्रेस्टीजियस मानले जाते. सध्या मी खरेखुरे आंदोलन कसे करावे हे स्वत: केजरीवाल यांच्याकडून वन-ऑन-वन शिकतो आहे. स्वत:चे स्क्रिप्टही ते स्वत:च लिहितात. मला खुशाल अटक करा. आतापर्यंत ही कहाणी ट्विटरवरून साऱ्या जगापर्यंत पोचली असेल. दिल्लीची निवडणूक आहे. आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. कारण आता जिंकणे केवळ कठीण झाले आहे." असे त्याने जबानीत सांगितले आहे. या सर्व कामात दोन गाड्या वापरण्यात आल्या. त्यातील नॅनो स्वत: केजरीवाल यांची असून दुसरी बीएमडब्ल्यू कुमार भूषण यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. हस्तांतरण केले गेलेले पाच रुपये हे केजरीवाल यांचेच निघाले. न्यायाधीश महाशय, ते दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून. कदाचित त्याचे सामोशात रूपांतर झाले असण्याची शक्यता आहे.

सत्य हे नेहमीच फसवे असते, पण आमचे सत्य तेच खरे सत्य हे मात्र सत्य!

(अकिरा कुरोसावा यांची माफी मागून)

No comments:

Post a Comment