Monday, January 5, 2015

पायथाकळसचा सिद्धांत

पायथागोरस हा मूळचा भारतीयच असावा. पायथा आणि गोरस हे दोन्ही जाज्वल्य हिंदु अभिमानाचे शब्द आम्ही ओळखायला कसे चुकलो बरे? आम्ही संस्कृत-मराठी व्याकरण, शब्दव्युत्पत्तीशास्त्रातील थोर अधिकारी आणि आमचे मित्र प्राध्यापक गुंथर म्युल्लर (मूळ राहणार जर्मनी, सध्या वास्तव्य फर्ग्युसन रोड, पुणे) यांच्याकडे गेलो. त्यांच्या मते त्याचे मूळ नाव पायथाकळस असे असावे. कळस या शब्दात "ळ" असल्यामुळे त्याचा मुघलांनी "र" केला. मग पुढे जाऊन दक्षिणेतील लोकांनी उरलेल्या "क" चा "ग" केला. शेवटचा खिळा मरहट्ट देशी ठोकला गेला. मरहट्ट देश हा पूर्वीपासून हट्टी लोकांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे तो यामुळेच. जे काही सांगितले ते जसेच्या तसे न स्वीकारणे हे या देशीच्या लोकांचे वैशिष्ट्य होते. आजही आहे. पण त्याला आता स्वतंत्र बाणा उर्फ स्वयंभू वर्तन असे अभिमानाने म्हटले जाते. पायथागरस हे नाव जेव्हा मरहट्ट देशी आले तेव्हा प्रथम लोकांनी कैच्या कैच नाव म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. पुण्यनगरीतील लोकांनी तर तेही केले नाही. रानडे, गाडगीळ, दांडेकर, पेंडसे अशा नावाची त्यांना सवय. त्यांनी त्याला ज्यू समजून थेट लाल देवळचा रस्ता दाखवला. पुढे मग मराठीत ग चा गो झाला आणि पायथागरसचा पायथागोरस झाला. ही सवयही जुनी. पुढे ध चा मा केल्यामुळे तर पेशवाई घसरणीला लागली. मग कुणाला तरी पायथागोरस हा थोर लेखकु असल्याचा शोध लागला. आजही कुणी उदोउदो केल्याशिवाय लेखक उदयास येत नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम इत्यादि बहुजनप्रिय लेखक जन्माला यायला अजून बराच काळ बाकी होता. परंतु पुण्यनगरीत समीक्षक लोकांची वाण नव्हती. कुणी लेखनच करत नसल्यामुळे समीक्षक लोक उगाच कुठे वेदच वाच, मेघदूतावर टीका लिही, कालिदास हा हवामान खात्यात नोकरीला असल्यामुळे त्याला मेघ वगैरे प्रभृतींचे चांगले ज्ञान होते, त्यात कल्पनाशक्ती वगैरे काही नाही, निरीक्षणतक्त्याचे रूपांतर काव्यात झाले आहे, शाकुंतल हे नाटक यू ग्रेडचे नसून त्याला ए ग्रेड लावली पाहिजे, दुष्यंताचे पात्र कसे उथळ झाले आहे, त्याला टोक कसे आले पाहिजे, भुंग्याचे काम करणारा पार्टी कमळापेक्षा लठ्ठ असल्यामुळे कमलदलभृंग प्रवेशाचा  रसभंग कसा होतो इत्यादी इत्यादी लिहिण्याच्या कामात गुंग होते. सदरहू पायथागरस गृहस्थ हे अभियांत्रिकी क्षेत्रातील असून त्यांनी उत्तरेतील देवळे बांधण्याच्या कामात बहुमूल्य असे योगदान दिले आहे अशी वदंता पसरली. पुण्यात नेहमी वदंता पसरते. आजही पुण्यात खात्रीनं माहीत असलं तरी,"असं ऐकलं बुवा! खरं खोटं देव जाणे!" असं म्हणण्याची पद्धत रूढ आहे. शेवटी पायथागोरस यांनी स्वत: सदाशिव पेठेत जाऊन आपले लिखाण दाखवले. त्यात देऊळ बांधण्यासाठी काय करावे याचे शास्त्रीय विवेचन होते. एखाद्याला भलत्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध करावयाचे ही खोड तेव्हाही होती. त्यांच्या पुस्तकातील "पायथा म्हणे आधी पाय मग कळस" हे निखालस शास्त्रीय म्हणून लिहिलेले वाक्य अभंग म्हणून सकाळमध्ये छापले गेले. झाले. सकाळमध्ये लिखाण छापून आले म्हणजे सर्व लेखकुंचा दिसु गोडु होतो. पूना बेकरीचे प्याटीस खाता खाता लोकांनी ते वाचले. मग आधी पाया मग कळस हे वचन लोकांत प्रिय झाले. लोकांना वाटले असेल आणखी एखादा विठ्ठलाचा अभंग, हल्ली काय जो येतो तो अभंग करत सुटतो. पण हे वचन सर्वांना उपयोगी पडू लागले. वारकरी पंढरपूरला जात आणि देवळाचा कळस पाहत. म्हणत अरे त्या पायथागोरसने म्हटल्याप्रमाणे आहे हो बाकी. खाली पायथा, वर कळस. कुणालाही सल्ला द्यायचा झाला की वक्ते भाषणातून सर्रास हे वाक्य वापरू लागले. उद्घाटन वगैरे समारंभाच्या ठिकाणी तर अगदी हमखास हे वाक्य ऐकू येऊ लागले. एका वक्त्यांनी तर सार्वजनिक विहिरीसाठी कुदळ मारण्याच्या समारंभाच्या भाषणात हे वाक्य टाकून टाळ्या मिळवल्या. तुम्ही बाकी कळसच केलात हो, ही दादही त्यांना तिथल्या तिथे मिळाली.

तत्पूर्वी पायथागोरसने आपल्या विधानामागे असलेला भौमितिक सिद्धांत सांगायचा निष्फळ प्रयत्न केला होता. पण त्याचा आवाज "जै जै रामक्रिष्ण हारी" च्या आवाजात बुडून गेला. सिद्धांत मागेच राहिला. निराश झालेल्या पायथाकळसने मग पुढे दोरखंड आणून झाडाची फांदी ते झाडाचे खोड असा बांधला. त्याची लांबी मोजून प्रमेय सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते लोकांच्या डोक्यावरून गेल्याने मग चौरसाचे क्षेत्रफळ पद्धती वापरून तेच सिद्ध करायचा प्रयत्न केला. पण त्याकाळी चौरस हे फक्त सकस आहाराचे माप होते आणि क्षेत्रफळ म्हणजे तीर्थस्थानाला जाऊन आल्याचे फळ. त्यामुळे तेही कुणाला कळले नाही. अतिनिराश झालेल्या पायथाकळसने मग त्याच दोरखंडाला स्वत:ला टांगून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांना डोंबाऱ्याचा खेळ पाहत उभे राहण्याची सवय असल्याने सुदैवाने त्याला टांगून घ्यायला मदत करायलाही कुणी गेले नाही. ते बरेच झाले म्हणा. त्यामुळे त्याला स्वत:चे स्वत: टांगूनही घेता आले नाही. ब्रम्हहत्या टळली. काही असो. शास्त्रज्ञ अथवा गणिती म्हणून मान्यता प्राप्त व्हायच्या ऐवजी उत्तम अभंगकार म्हणून तरी प्रसिद्धी मिळाली. लोक सभांना प्रमुख वक्ते म्हणून बोलावू लागले. वसंत व्याख्यानमालेत "मी अनुभवलेला कर्ण" किंवा "पायथ्याचा दगड" अशा विषयांवर भाषणे होऊ लागली. पुढे मग त्याने "शून्यवत मी" हा शून्य या संकल्पनेवर आधारित आत्मचरित्रात्मक ग्रंथ लिहिला. त्याच्या प्रतीही शून्य खपल्या. पण त्यामुळे तत्कालीन साहित्यिक वर्तुळात चर्चा झाली. साहित्य वर्तुळात प्रवेश झाल्यानंतर पायथागोरसला स्वत:ची प्रसिद्धी स्वत: करण्याची गरज उरली नाही. कंपूतील इतर साहित्यिकच ते काम करू लागले. कुणी तरी मग त्याचे "सुलभ काटकोन" नावाचे पुस्तक तडक बीएससी च्या अभ्यासक्रमात लावले. पुढे पायथागोरसचा त्रिकोण एवढा पॉप्युलर झाला की तत्कालीन भारत सरकारने कुटुंबनियोजनासाठीही त्याचा उपयोग केला. त्रिकोण पॉप्युलर झाला पण योजना काही पॉप्युलर झाली नाही. कितीही प्रयत्न केला तरी त्रिकोणाचा चौकोन, प्रसंगी पंचकोन षट्कोन होऊ लागला आणि ती योजना बंद करावी लागली.  (गरजूंनी आपल्या पूर्वीच्या पिढ्या तपासाव्यात. नात्यात किमान चार काका आणि दोन पाच आत्या नक्की आढळतील)

उदरनिर्वाहाची चिंता टळली पण मूळचा गणिती पिंड काही स्वस्थ बसू देईना. आढ्याकडे पहात बसून राहू लागले. साहित्यिक वर्तुळातील बैठकी नीरस वाटू लागल्या. बऱ्याच वेळा अशा बैठकीत हातात गिलास घेऊन नुसतेच बसून राहत. बाकीच्यांचे चार चार पेग झाले तरी यांचा एक संपलेला नसे. अशाच एका बैठकीत एक डॉ. असलेल्या प्रतिष्ठित साहित्यिक मित्राच्या ते लक्षात आले. स्वत: उन्मनी अवस्थेत असल्यामुळे साहजिकच त्यांना एकूणच विश्वाबद्दल सहानुभूती वाटू लागलेली होती. इथे तर प्रश्न मित्र पायथागोरसचा. "मित्रा, कसली चिंता लागून राहिली आहे तुला?" त्यांनी आपल्या ओल्ड मंकसारख्या स्मूथ आवाजात विचारले. "अरे चिंता करतो काटकोनाची!" असे पायथागोरसने खरे ते सांगितले. "इये स्वयंभू क्षेत्री सर्वच स्वयंभू. आमचे कोण ऐकणार?" हे ऐकल्यावर साहित्यिक गंभीर झाले. "होय मित्रा. ते मात्र खरे. वास्तविक मला खरीखुरी पिठाची गिरणी काढायची होती. पण प्रत्यक्षात विद्यापीठात विद्येचे पीठ दळतो आहे. नियमसुद्धा पिठाच्या गिरणीसारखे. केमिस्ट्रीवर फिजिक्सचे पीठ लावता येत नाही. तुला एक सल्ला देतो. तू विलायतेला जा. तेथे तुझ्या सिद्धांताचे गणित जमेल. तिथले गणित जमले की इथले समीकरण बदलेल." हा सल्ला मानून पायथागोरसने दुसऱ्याच दिवशी जहाजाचे तिकीट काढले. त्याला निरोपसमारंभ झाला. "आतला वशिला लागला", "अहो याला सहा महिन्यात तिथून हाकलतील हो!", "अहो कसली विलायत ती? भ्रष्टाकार आहे सगळा तिथे. म्हणजे असं आमच्या साडूंच्या ऑफिसातील कलीगचा मेव्हणा जाऊन आला तो सांगत होता. पुरुषाच्या बरोबरीने बायका काम करतात म्हणे तिथे. शिव शिव!", "त्यात काय एवढं? मनात आणलं असतं तर आम्ही पन्नास वेळा गेलो असतो. पण मातृभूमि म्हणजे मातृभूमि! स्वर्गादपि का काय म्हणतात ना त्यातली!" इत्यादी चर्चा झाल्या. अशा प्रकारे पूर्ण भारतीय असा सिद्धांत विलायतेला गेला. विलायतेने खूप प्रगती केली. विमाने आणली, रेल्वे आणल्या, अग्निबाण निर्माण केले. सिद्धांत कुणीही मांडले असोत, त्याचा वापर करून उपयोगी साधने बनवली. पण तो पायथागोरस मूळचा आमचाच हो खरा! केवळ साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्यामुळे आम्ही ऐषोआरामाची साधने बनवली नाहीत. पण मनात आणलं तर आम्हाला काही अशक्य नाही. फक्त मनात आणणं अशक्य वाटतं. कितीही कोन झाले तरी आम्ही आपले लंबकर्ण राहू हा पायथाकळसचा फारसा प्रचलित नसलेला सिद्धांत मात्र त्रिकालाबाधित असेल असे वाटते.

No comments:

Post a Comment