आम्ही हे भविष्य पूर्वीच वर्तवले होते. ते वर्तवताना समोर केवळ आमचा परममित्र मोरू होता. आताही तो समोर बसला होता. मोरू आमच्या भविष्याबद्दल फारसा उत्सुक नसतो. शिवाय त्याच्यासमोर नुकतीच इडली सांबाराची पहिलीच प्लेट येत होती. तिच्या भविष्याबद्दल तो जास्त उत्सुक होता. अण्णा नेहमी इडलीवर चेरी ठेवल्याप्रमाणे दुधी भोपळ्याची फोड ठेवतो. प्लेट टेबलावर येईपर्यंत ती भोवतालच्या सांबाराच्या तळ्यात पडते की तिचे इडलीवरील स्थान अढळ राहते याबद्दल आमची पैज लागत असे. आज ती फोड इडलीवरच राहणार असे भाकित मोरूने वर्तवले होते तर तिचे अध:पतन होऊन सांबाररूपी भवसागरात बुडून जाणार असे माझे भविष्य होते. ऑर्डर देऊन मी शांतपणे दैनिक शंखनाद हातात घेतला होता. मोरू ऑर्डर येऊन तिचा फडशा पाडल्याखेरीज पेपर वाचत नाही. तो अस्वस्थ होऊन भोपळ्याच्या फोडीची चिंता करीत बसला होता. आमच्या शेजारच्या टेबलावर एक मुंडू नेसलेला मद्राशी आणि त्याचे सकच्छ नेसलेले कपाळावर भस्म लावलेले कलत्र बसले होते. तो छान फुर्र फुर्र आवाज करत काssssफी पीत होता. तर कलत्राने समोरच्या इडली चटणीचा अक्षरश: खून करून त्यावर सांबार ओतले होते आणि सूख जाले हो साजणी असे अनिर्वचनीय आनंदी भाव घेऊन आपली पाची बोटे त्यात घातली होती. ती इडली आक्रोश करते आहे असे वाटत होते. पुढच्याच क्षणी तो आक्रोश संपला आणि तिचा चटणी, सांबारयुक्त असा लाडू वळला गेला आणि हां हां म्हणेपर्यंत तो गायबही झाला. प्लेटमध्ये आता शांत शांत होते. खून केल्यावर खुन्याने थंड डोक्याने रक्त साफ करावे तशी ती आता उरलेले सांबार साफ करत होती. इडलीचा असा खून मला असह्य होतो. आधी छान इडलीपात्रात घालून तिला गोल तबकडी करायचे आणि प्लेटमध्ये समोर आल्यावर चिंध्या चिंध्या करून सोडायचे ही असुरवृत्ती केवळ दक्षिणेतच. त्या इडलीवधाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत मी शंखनाद वाचू लागलो. मोदींची भारतवारी निश्चित, पेट्रोलची भाव वाढ निश्चित, भारतीय संघाची हार निश्चित, कतरिना कैफचा विवाह निश्चित, शिवसेनेचा सत्तेत सहभाग निश्चित अशा अनेक निश्चित्या नजरेखालून घालत असतानाच "अरेच्या!! हे काय?" असे उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले. मी बहुधा जरा जोरातच ओरडलो असणार. शेजारच्या मद्राशाची फिल्टर कॉफी त्याच्या अंगावर सांडली आणि तो खास द्राविडी संतप्त भस्मभेसूर चर्येने माझ्याकडे पाहू लागला. ती इडलीमर्दिनी मात्र थंड होती. तिने माझ्याकडे झाडाखाली रवंथ करत बसलेल्या गाईच्या मुद्रेने पाहिले आणि कानाने माशी हाकलावी तशी मान हलवून पुन्हा रवंथ करती झाली. मोरूने प्रश्नार्थक मुद्रा करून माझ्याकडे पाहिले. "अरे बातमीच तशी आहे! अरे ही लाजिया फिल्मी आली हो भाजपमध्ये! इतके दिवस चाललं होतं, लाजते, पुढे सरते, दोन दिवस थांबा, लगेच काडीमोड घेते. नवऱ्याचं आणि तिचं पटत नव्हतं म्हणे. अजिबात ऐकत नव्हता म्हणे नवरा तिचं. कुठल्या बाईला आपलं कुणी ऐकत नाही हे चालेल? त्यातून या त्यांच्या पार्टीमध्ये पांडवांसारखे पाच पाच नवरे. एकपण ऐकत नव्हता म्हणे. हिचंच नव्हे तर एकमेकांचं पण. रोज म्हणे घरी तमाशा. पांडव झाले तरीसुद्धा काय, अर्जुनाचीच दादागिरी जास्त. नकुल सहदेवाला पागेतच झोपायला लावायचा तो. शेवटी घेतलंन घटस्फोट असं दिसतंय." मोरू रोखून शंखनाद पाहत होता. त्याच्या त्या एकाग्र मुद्रेकडे पाहून त्याला लाजीया फिल्मीच्या घटस्फोटाचा धक्का बसला आहे की आनंद झाला आहे ते कळायला मार्ग नव्हता. तिचे फोटो कानपूरच्या काला जामूनसारखे गोड असतात असं एकदा तो मला म्हणाला होता. "अरे, उ नं सुरू होणारा आणि भ ने संपणारा पाच अक्षरी शब्द कोणता रे?" मोरूने विचारले. "आं?" मी. "अरे हे मागल्या पानावरचं शब्दकोडं बघतोय मी." इति मोरू. म्हणजे मी इथं एवढं बोललो ते त्यानं ऐकलंही नव्हतं.
"अरे मोरू, तुझी आवडती बया ना रे ही?" मी म्हणालो. मोरू म्हणाला,"हो रे. तेवढ्यासाठी तर स्टार न्यूज बघायचो मी. अल्पसंख्यांक हा शब्द मला तिथेच कळला. आधी मला वाटायचं अल्पसंख्यांक म्हणजे कमी मार्क पडणं. पण अल्पसंख्यांक असलं म्हणजे प्रत्यक्षात सगळीकडे ग्रेस मार्क मिळतात हे लाजियामुळे कळलं. छान समजावून सांगायची. अल्पसंख्यांकांच्या दारूण अवस्थेच्या दर्दभऱ्या कहाण्या सांगताना ते मोकळे केस छान दिसायचे रे तिचे. त्यांच्या हक्कांबद्दल सांगताना ते सुरमा घातलेले डोळे कसे पेटून उठायचे. त्यांच्यावरचे अत्याचार दाखवताना कसे ते मेकप सांभाळून भरून यायचे. डिट्टो शबाना आझमी रे. चिंतू, आपण का नाही रे आलो अल्पसंख्यांक आईबापांच्या पोटी जन्माला?" मोरूच्या डोळ्यात खुदाई खिन्नता दिसली. "पण आता ही भाजपमध्ये आली ना रे? आपलं उपेक्षित बहुसंख्याकांचं अंतरंग कळेल का रे तिला?" मोरू. "अरे नुसती आली नाही, पेटून आली आहे. प्रस्थापितांविरुद्ध लढणारी आता प्रस्थापितांविरुद्ध रडणार आहे. बहुसंख्यांकांचं जगणं म्हणजे स्वर्ग नाही हे अल्पसंख्यान्कांपर्यंत पोचवणार आहे. मग बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक दोघे मिळून रडतील. लोकशाहीचा हा परमोच्च बिंदूच नव्हे का? भाजप म्हणजे मूळची गंगा, तीत येडीयुरप्पा, रेड्डी असली भ्रष्ट जनावरे वाहत आल्यामुळे तिची गटारगंगा झाली होती. आता तीत हे खुद्द आपनृपतिंनी अप्रूव्ह केलेले पवित्र अल्पसंख्यांक तीर्थ येऊन मिळाले. आता गंगा पावन झाली म्हणायची बरे." मी म्हणालो. "होय रे होय. इतके दिवस टीव्हीवर ही साध्वी, ती फायर ब्रॅंड महामाया उमा भारती, सासूची आठवण करून देणारी इराणी यांना बघावं लागत होतं रे. फार त्रास व्हायचा. भाजपमध्ये सर्वात देखणं कोण असं विचारलं तर रामदेवबाबा असं म्हणायचे लोक. आता ऐकणं मरू दे, भाजपच्या बातम्या निदान बघायला तरी बरं वाटेल." मोरू त्याचं उथळ नश्वर ऐहिक जग सोडायला तयार नव्हता. "अरे मोरू, ही बया नुसती भाजपमध्ये येत नाहीये. आपनृपति केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूकसुद्धा लढवणार आहे म्हणे ही. एक बरं आहे, दोघांनाही सणसणीत हरण्याचा अनुभव आहे. हरण्याची कारणमीमांसा करण्यात दोघेही पटाईत आहेत. लाजिया हरली, तर चुकून तिनं भाजपच्या हीन पातळीवरील क्लुप्त्या असं म्हणू नये एवढंच भान तिला बाळगावं लागणार आहे. केजरीवाल जिंकले तर त्यांनीही चुकून, आपण का हरलो या विषयावर भाषण देऊ नये. मोरू, हे बघ काय इथं म्हटलं आहे - काही असलं तरी कचरा, घाण, दलदल, भ्रष्टाचार वगैरे निर्मूलनाचा अनुभव लक्षात घेऊन तिला गंगेच्या स्वच्छता अभियानाची प्रमुख केलं आहे. कोटी कोटी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली गंगा, तिच्या स्वच्छतेचे कंत्राट लाजियाला देऊन भाजपला धर्मांध म्हणणाऱ्या लोकांना चूप बसवले गेले आहे. श्रीमती लाजिया यांनी आयुष्यात प्रथम गंगेची पाहणी केली. त्यांची पहिली प्रतिक्रिया "ईssssss!" अशी होती. बरोबरचे पत्रकार आणि कार्यकर्ते यांना ती प्रतिक्रिया फारच मोहक आणि गोड वाटली. तो चीत्कार ऐकून गंगेत डुबकी घेणारे साधू आणि गंगादर्शनाला येणाऱ्यांना लुटणारे संधीसाधू असे सगळे थबकले. कुणीही न विचारता साधूंनी "आपका काम हो जायेगा बिटिया!" असा अनाहूत आशीर्वाद दिला. "'आप'का नाम मत लो महाराज! आशीर्वादही देना है तो 'आप'का काम तमाम हो जायेगा ऐसा दे दो" असा लडिवाळ आग्रह लाजीयांनी धरला. आयला एरवी हेच साधू आम्हाला "भला सोच बच्चा!" असं दरडावतात. गंगेच्या पात्राच्या बॅकग्राउंडवर फोटोसेशन झाल्यावर वाराणशीची फेमस रबडी आणि जलेबी यांचा समाचार घेऊन त्या दिल्लीला रवाना झाल्या. वा! भाजपच्या भगव्या पगडीवर हा हिरवागार पाचूचा तुरा शोभून दिसणार तर!"
"युरेका!" मोरू ओरडला. इथे तो मद्राशी आणि त्याचं कुटुंब दोन्ही दचकले. आता मात्र ते उठले आणि पलीकडील टेबलावर जाऊन बसले. तिनं इडलीची दुसरी ऑर्डर दिली होती. "उपटसुंभ!" मोरू परत ओरडला. "शब्द सुटला रे चिंत्या! उपटसुंभ बसतोय बरोबर इथे!" त्याच्या चेहऱ्यावर मध्यमवर्गीय समाधान पसरले होते.

No comments:
Post a Comment