Monday, January 26, 2015

यू सेड इट!

आर के लक्ष्मण गेले. व्यंगचित्रकारितेतील अत्यंत सभ्य तरीही प्रभावी व्यक्तिमत्व गेले. चित्र हजार शब्दासम असते अशी म्हण आहे, आर के लक्ष्मणांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर त्यांचे चित्र लक्ष शब्दासम असायचे. १९५१ पासून अगदी अलीकडे पक्षाघाताने नाईलाज होईपर्यंत त्यांच्या कुंचल्याचे फटकारे समर्थपणे राजकीय सामाजिक टीकाटिप्पणी करत राहिले. त्यांचा तो कॉमन मॅन कॉमन कधीच नसायचा, तो असाधारणच असायचा. कळायला लागलेल्या वयापासून आजवर कॉमन मॅनचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असायची. शंभर टक्के वेळा त्याने प्रत्यक्षातील कॉमन मॅनची नस बरोबर पकडलेली असायची. तो चेक्सचा कोट, ते धोतर, क्वचित कधीतरी त्यावर ठिगळ लावलेले, विना मोज्याचे ते पंपशू, डोक्याचा अर्धचंद्र झालेला, तळ्याच्या किनाऱ्यालगत गवत उगवावे तसे राहिलेले केस, गांधीजी छाप चष्मा, उंदराने कुरतडावी तशी मिशी असे ते ध्यान आपल्या जवळपासचे वाटायचे.  माझ्या आजोबांकडे त्यांचे काही मित्र नेहमी येत त्यापैकीच एखादा हा कॉमन मॅन असावा असे मला वाटायचे. आमच्या घरी मटा येत असे. त्या काळी कोकणात पेपर काही रोजचा रोज मिळत नसे. मुंबईला प्रसिद्ध झाल्यावर त्याचे बंडल यष्टीत पडायचे. आमच्या गावापर्यंत ती यष्टी पोचायला दहाबारा तास लागायचे. दुसऱ्या दिवशी दुपारी कधीतरी ते बंडल पोस्टात येऊन पडायचे. मग डिलिव्हरीला बाहेर त्याच्या दुसऱ्या दिवशी. असे रमतगमत दोन दिवसांनी पोस्टमन आमच्या घरी आणून ते टाकायचा. इंटरनेटचा जमाना नव्हता, टीव्ही यायला अजून अनेक वर्षे होती. तार येणे अथवा ट्रंक कॉल येणे याचा अर्थ वाईट बातमी असण्याचा तो काळ होता. बातम्या जुन्या असल्या तरी आमच्यासाठी त्या नवीनच असायच्या. अर्थात बातम्या समजण्याचं वयही नव्हतं. पण एक गोष्ट अगदी ठळकपणे आठवते ती म्हणजे पहिल्या पानावर उजव्या हाताला असलेलं "काय म्हणालात?" हे आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र सदर. पेपर हातात पडल्यावर प्रथम हा कॉमन मॅन काय म्हणतो आहे ते पहायचं आणि मगच उर्वरित बातम्या पाहिल्या जायच्या. राजकारण समजण्याचा तो काळ नव्हता, तरीही सुरुवात तिथून झाली असं म्हणायला हरकत नसावी. व्यंगातून वैयक्तिक टीका, शारीरिक व्यंग असलं काहीही नसायचं. अभिजात, निखळ, निर्व्याज असं फटकळ हसू असायचं. त्यातून हास्यनिर्मिती तर व्हायचीच, पण नेमकी विसंगतीही दाखवली जायची. इंदिरा बाईंच्या चित्रातून त्यांचं कणखर व्यक्तिमत्व तर दिसायचंच परंतु त्यांचा हेकेखोर हटवादीपणाही योग्य प्रमाणात दिसायचा. त्यांच्या धोरणातील विसंगती एखाद्या कसलेल्या पत्रकाराप्रमाणे दाखवून दिलेली असायची. ती सुद्धा अत्यंत आदराने. बरेच वेळा तो कॉमन मॅन व्यंगचित्रात अलिप्तपणे कुठे तरी उभा असताना दिसायचा. चेहऱ्यावर कधी गोंधळलेले, कधी आश्चर्याचे तर कधी उद्विग्नतेचे भाव असायचे. त्या त्या घटनेच्या अनुषंगाने कोटी भारतीयांचेच ते प्रातिनिधित्व करणारे ते भाव असायचे. खऱ्या अर्थाने तो मॅन कॉमन असायचा. हे असं सदैव कॉमन मनाचं प्रातिनिधित्व करणंच अनकॉमन प्रतिभेचं लक्षण आहे.

आरके लक्ष्मणांच्या जाण्यानं आपण काय काय गमावलं? ती प्रतिभा गमावली, सभ्यता गमावली, संवाद साधण्याची कला जोपासणारं, त्याची तपश्चर्या करणारं ऋषित्व गमावलं. नुकत्याच चार्ली हेब्दोवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आरके लक्ष्मण याचं संयत, कुणालाही क्षुब्ध न करणारं कार्य उठून दिसतं. हिंदू मुसलमान या भट्टीत अनेक राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून घेतली आहेच, तशीच ती पीत पत्रकारितेनेही घेतली आहे. प्रसिद्धी कसलीही असो, चांगली अथवा वाईट, ती प्रसिद्धी असते हे मानून काम करणारे अनेक आहेत. व्यंगचित्रकारिताही त्यातून सुटलेली नाही. तद्दन पाचकळ ते प्रक्षोभित करणारा असा व्यापक वर्णपट लाभलेली आपली भारतीय पत्रकारिता, त्यात मानानं घेता येण्यासारखी व्यंगचित्रकारांची नावं अगदी मोजकीच. बाळासाहेब ठाकरे हे एक त्यातलं उत्तुंग नाव. त्यात आरके यांचं स्थानसुद्धा नक्कीच. धगधगीत वास्तव समर्पकपणे दाखवणारी, कोपरखळ्या देणारी किती तरी व्यंगचित्रे डोळ्यासमोर येताहेत. एक आठवतंय. चंद्रावर मानव प्रकल्पासाठी कॉमन मॅनला इस्रोच्या नियंत्रण कक्षात आणण्यात आलं आहे, आणणारा बहुधा इस्रोचा कुणी अधिकारी असावा, तो उत्साहात सांगतो आहे,"सापडला! हा मनुष्य अन्न, वस्त्र, निवारा, प्रकाश, हवा याशिवाय जगू शकतो!" हे व्यंगचित्र म्हणजे सरकारला तर सणसणीत चपराक तर होतीच, पण त्यात संदेशही होता - कृपया या मूलभूत गरजांतून आपण (पक्षी: आपला देश) बाहेर आलो नाही, चंद्रावर मानवाच्या गप्पा कसल्या करता? प्रथम भारत राहण्याजोगता करा. मला वाटतं आजही तो संदेश लागू पडतो आहे. शेतकरी आत्महत्या करताहेत, पण निदान आपले मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोचले, आपल्याला आता कडक मंगळ तरी राहणार नाही याच्या समाधानात आत्महत्या करताहेत असे म्हणायचे. व्यंगचित्रांनी क्रांती बहुधा होत नाही, परंतु उत्क्रांती तरी होते. दुसरं एक आठवतं म्हणजे अनेक वेळा त्यांच्या व्यंगचित्रांतून फुटपाथवर राहणारे गरीब दिसायचे. ते भिकारी असायचे, पण त्यांच्यात एक उद्विग्नता, असहाय्यता, उपरोध यांचे मिश्रण असायचे. लोकसंख्या मोजणीच्या काळात एक व्यंगचित्र आले होते. त्यात जनगणना अधिकारी फूटपाथवरील भिकाऱ्याला नागरिकत्वाचा पुरावा मागत आहेत असं दृश्य होतं. त्यावर तो फाटके ठिगळ लावलेले कपडे घातलेला भिकारी म्हणतो आहे, "जरा पहा आमच्या कडे, हे आमचं दारिद्रय हा पुरावा आमचं भारतीयत्व सिद्ध करायला पुरेसा नाही काय?" अशा व्यंगचित्रांनी हास्य उत्पन्न होत नाही. गांभीर्य नक्की उत्पन्न होते. विषण्ण व्हायला होतं. शंकराच्या जटेतून मुक्त होऊन स्वातंत्र्यगंगा पृथ्वीवर आली, ते पवित्र जल आमच्यापर्यंत पोचायच्या आतच स्वार्थी लोकांनी कालवे काढून ते पाणी दुसरीकडे वळवलं. आमच्यापर्यंत पाट काय त्याची एवढासा ओघळही आला नाही ही व्यथा त्यांच्या अशा या व्यंगचित्रातून जाणवत असे. अंतर्मुख करत असे. या सर्व व्यंगचित्रांतून आर के लक्ष्मण यांची मानसिक जडणघडण दिसून येते. त्यांचा मूळ पिंड सामान्य मध्यमवर्गीय नागरिकाचाच. मध्यमवर्गीयांची कोंडी, धडपड, असहाय्यता हे ते नेमके पकडत. एका व्यंगचित्रात ते म्हणतात,"अर्थमंत्री हे खरोखर जादूगार आहेत. पेनच्या एका फटकाऱ्यात आमचं आयुष्य ऐषारामी करून टाकलं आहे त्यांनी. आम्ही ज्या ज्या गोष्टी रोज वापरतो त्या सर्वांना त्यांनी लक्झरी करून टाकलं आहे!" अनेक राजकीय, धार्मिक, सामाजिक, आंतरराष्ट्रीय घटनांवर त्यांनी व्यंगचित्रे काढली पण एकही व्यंगचित्र वादग्रस्त झालं नाही. त्यावरून गदारोळ झाले नाहीत, की धार्मिक भावना दुखावल्या म्हणून मोर्चे निघाले नाहीत. आयुष्यभर व्यंगचित्रांत राहून इतका अव्यंग राहिलेला माणूस शोधून सापडणार नाही. उणीपुरी साठ वर्षे आर केनी व्यंगचित्रे निर्माण केली. केवळ व्यवसाय म्हणून त्यांनी ते केलं असेल असं वाटत नाही. सर्व विषय आणि त्यांच्या प्रतिक्रिया या पोटतिडिकेतून आलेल्या वाटायच्या. जर राजकारण्यांनी त्यांच्या व्यंगचित्रांकडे गांभीर्याने पाहून योजना बनवल्या असत्या तर देशाचं कल्याण झालं असतं. तसं झालं नाही. म्हणून मग म्हणावंसं वाटतं, आरके, यू सेड इट, बट वी नेव्हर गॉट इट!

No comments:

Post a Comment