Tuesday, January 27, 2015

खोक्याबाहेरचा विचार

निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी नुकतेच एक विधान केले - कतरिना कैफ हिला राष्ट्रपती करावे. ते ऐकून आम्हांस अगदी भरते आले. जिवाशिवाची भेट झाल्यासारखे वाटले. इतके दिवस आम्ही म्हणतच होतो राष्ट्रपती हे पद नाही तरी तसे काय कामाचे? बिन अधिकारी, फुल पगारी, घर सरकारी, कधीकधी परदेशवारी, क्वचित उद्घाटन करी, एरवी माश्या मारी असे त्या पदाचे एकूण स्वरूप. नाही म्हणायला २६ जानेवारीला गार्ड ऑफ ऑनरच्या वेळी तेवढा हात उचलायला परवानगी. टेबलावर फुलदाणी जर ठेवायचीच असेल तर मग त्यात जरा चांगली फुले ठेवणे काय वाईट? तसे काटजू हे पराकोटीचे दयाळू सरकारमान्य (लायसन क्र. २३४५, चू.भू.दे.घे.) महात्मे आहेत. तेवढेच सरकारमान्य थोर देशभक्त संजय दत्त (कैदी नं. ४२०, उमर पंचावन, धंदा पिच्चरमदी हिरोगिरी भायेर भाईगिरी, राहणार वांद्रे पश्चिम, सध्या मुक्काम येरवडा जेल) यांच्यावर शिक्षेच्या बाबतीत जो घोर अन्याय झाला त्याला वाचा फोडून धीर देणारे हेच ते. काटजू यांना असे विधान करावेसे का वाटले असावे? परदेशात छान छान माणसे (बायका असं म्हटलं तर फेमिनिस्ट लोक हाणतील, अग्निशिखा वाल्या बायका मोर्चा काढतील) अध्यक्ष वगैरे होतात हे पाहून काटजू व्यथित झाले तर नवल नाही.

निवृत्त न्यायाधीश काटजू  (निवृत्त हा शब्द वापरताना खूप बरे वाटते आहे. पण सोयीसाठी पुढे त्यांना आम्ही निन्या म्हणणार आहोत) हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. सरकारी नोकरीत आयुष्य गेल्यामुळे ते अत्यंत काटेकोर आहेत. कोणते व्यक्तिमत्व कधी बाहेर काढायचे याच्या वेळा त्यांनी ठरवून घेतल्या आहेत. त्यानुसार ते चालतात. सकाळी आन्हिके उरकल्यानंतर सात ते नऊ ते समीक्षक असतात. निन्या असले तरी अजूनही त्यांच्या घरी फुकट वृत्तपत्रांचा रतीब आहे. साधारण सात ते नऊ या वेळेत वर्तमानपत्रे चाळून झाल्यावर ते महत्वाच्या बातम्यांवर आपली परखड मते व्यक्त करतात. ते न्या चे निन्या होण्यापूर्वी ती मते ऐकण्यासाठी त्यांचा कोर्टातील पट्टेवाला जातीने हजर असे. ती परखड मते ऐकून ऐकून त्याला सायबांचा स्वभाव अंतर्बाह्य माहीत झाला होता. इतका की कधी कधी खुद्द बाईसाहेब सायबांपुढे काहीतरी मागणी करण्यास जाण्याआधी त्याचा सल्ला घेत असत अशी वदंता आहे. परखडपणात निन्यांचा हात धरणारा कोणी नाही. निन्यांनी खुद्द सलमान रश्दी यांना भिकार लिखाणाबद्दल धारेवर धरले होते. मिडनाईट चिल्ड्रन ही एक अत्यंत सुमार दर्जाची कादंबरी लिहिण्याऐवजी त्याच मिडनाईटचा सदुपयोग केला असतात तर प्रत्यक्षात पाच धा चिल्ड्रन पोटी जन्माला आली असती, त्यांचे डायपर बदलण्यात असले  टुकार उद्योग करायला वेळ मिळाला नसता असे त्यांचे मत होते. या बाबतीत मात्र आमचे एकमत आहे. पुरस्कार वगैरे मिळालेले साहित्य भिकार असते असे आमचेही ठाम मत आहे. पुरस्कार मिळवण्यासाठी कुठे वशिला लावावा लागतो हे निन्यांप्रमाणेच आम्हालाही अद्याप माहीत झालेले नाही. सकाळी सकाळी असे परखडपणाचे बोलून झाले की मग पुढे संध्याकाळपर्यंत परखडपणा शक्यतो बंद असा त्यांचा नियम आहे. मग आंघोळ वगैरे करून दुपारच्या जेवणाची वेळ होईपर्यंत मिष्किलपणा करण्याचा नियम ते पाळतात.

कतरिना कैफ बाबतचे ते विधान अशाच काहीशा वेळेत झाले. म्याडमशी काही तरी लाडात बोलायला गेले आणि स्वत:च घाबरून ओरडले. म्याडम फेसप्याक लावून डोळ्यांवर काकडीच्या चकत्या लावून बसल्या होत्या म्हणे. ते पाहून निन्यांचेच डोळे निवले. मग त्यावर विनोदाने काहीतरी सौंदर्यवाचक विधान करायला गेले आणि मामला आणखी बिघडला. म्याडमनी तिथून हाकलून लावले.  मग निन्या खिन्न होऊन टीव्हीसमोर बसले.  तर तिथे क्रोएशिया या माहीतसुद्धा नसलेल्या देशात नुकत्याच निवडून आलेल्या अध्यक्षांबद्दल काही तरी बातमी चालू होती. निन्या आ वासून पाहतच राहिले. क्रोएशिया या देशाबद्दल त्यांना अचानक कुतूहल प्राप्त झाले. कारणच तसे होते. क्रोएशियातील लोकांनी सौंदर्यवाचक विधान करून सौंदर्यवाचक अध्यक्ष निवडून दिला होता. लोकशाही किती सुंदर असू शकते! तेवढ्यात म्याडमनी येऊन ते पाहिले आणि बरसल्या,"झालं! तरी म्हटलं तोंड उघडं ठेऊन एवढं काय पाहता आहात!" असं म्हणून त्यांनी च्यानेलच बदललं. आणि लावावं तरी कुठलं तर डीडी. हल्ली डीडी बघतो तरी कोण? काही तरी कार्यक्रम चालू होता आणि क्लोजअप गेला प्रणव मुखर्जींच्या चेहऱ्यावर. दूरदर्शन अस्तित्वात आल्यापासून नोकरीत असलेली ती प्रसिद्ध माशीही तिथेच घोंघावत होती. एवढी सिनीयॉरीटी पदरी असून असून तिचेही त्या चेहऱ्यावर बसण्याचे धाडस होत नव्हते. चेहऱ्याजवळ येऊन ती परत लांब जात होती. च्यानेल बदलल्यामुळे खिन्न झालेले निन्या प्रणव मुखर्जींचा शोकमग्न चेहरा पाहून आणखीच खिन्न झाले. केवढी दरी ही क्रोएशियासारख्या टीचभर आणि भारतासारख्या खंडप्राय देशात! क्रोएशियाला ती कोलिंदा नावाची गोड शिरापुरी आणि आमच्या नशिबी तेवढी शिळी बंगाली माछेर करी? तेवढ्यात कार्यक्रमाला कुठेही आणि केव्हाही कंट्रोलब्रेक करायचे या सरकारी नियमानुसार एकदम जाहिराती सुरू झाल्या. पहिलीच जाहिरात लक्स फ्रेश स्प्लॅशची. निन्या एकदम धडपडत उठून सावरून बसले. कतरिना कैफ निळ्या सॅटिनचा जब्बरी गाऊन घालून अंघोळमहोत्सव साजरा करायला निघाली होती. जनता तो अद्भुत स्नानसोहळा पाहण्यास तिच्या मागे उत्सुक अशी नाचत होती, आ वासून पाहत होती. मध्येच कतरिनाने हळुवार फुंकर घालून ते साबणमिश्रित पाणी जनतेच्या दिशेने फवारले. मागे उभे असलेल्या एका इसमाने गलीमध्ये फिल्डिंग करणाऱ्या जॉन्टी ऱ्होडसच्या चपळाईने ते झेलले. वाह ! निन्या टाळ्या वाजवत उभे राहिले. व्हॉट अ ब्रिलीयंट शॉट आणि  इक्वली वेल फिल्डेड अशी कॉमेंटरी त्यांच्या तोंडून निघून गेली. इंदिराबाईंच्या नंतर (सोनियाबाईंचा माफक अपवाद वगळता) जनतेला अशी आपल्या तालावर नाचवणारी स्त्री त्यांनी पाहिली नव्हती. आम्हीही असा फवारायुक्त स्नानसोहळा पाहिला नव्हता. म्हणजे तसा, आमच्या गावात पटवर्धन सरकारांनी सुंदर नावाचा हत्ती पाळला होता, त्याची आंघोळ साधारण अशीच असायची. तोही असाच छान फवारे उडवायचा. पण ती अंघोळ पाहायला आमच्याप्रमाणे इतर दहाबारा उनाड मुले वगळली तर जनतेचे एवढे ब्याकिंग कधीच मिळाले नाही. निन्या खूप प्रभावित झाले. ठरले. कतरिना कैफला निदान, किमान, राष्ट्रपती व्हायलाच हवे. गार्ड ऑफ ऑनर देताना फक्त स्क्वॉड्रन लीडरच काय, सगळी बटालियन उजवीकडे मान वळवून सल्युट द्यायला उत्सुक झाली पाहिजे.

आता माणसाची विचारशृंखला कुठून कशी कुठे वाहवत जाईल यावर त्याचा स्वत:चा काही ताबा नसतो. लोकांनी निन्यांना फारच धारेवर धरलं. माफी मागायला लावलं. अशानं खोक्याच्या बाहेर (पक्षी:आऊट ऑफ द बॉक्स हो. बिल्डर, राजकारणी आणि खंडणीबहाद्दर विचार करतात ते हे खोके नव्हे) विचार करणारी माणसंच राहणार नाहीत. आम्हीही असेच आऊट ऑफ द बॉक्स वाले आहोत अशी आमची प्रामाणिक समजूत आहे. लहानपणी आम्ही असंच आऊट ऑफ बॉक्सवालं वागत असू. त्यावेळी आम्हाला पाठिंबा असायचा फक्त आमच्या मातोश्रींचा. तोही अगदी पाठ लाल होईतोवर. एकदा नात्यातल्या कुणाकडे तरी "विशेष" आहे असं मातोश्री वडिलांना सांगत होत्या. साहजिकच आनंद होऊन मी निरागसपणे (आईच्या मते आगाऊपणे. आमचे मतभेद होते हे उघड आहे. त्या वयात मला "विशेष" या शब्दाचा विशेष अर्थ माहीत होता ही बाबही चिंत्य आहे) विचारलं,"मग, आपल्याला आता खरवस खायला मिळणार?" आता यात टेक्निकली काय चूक आहे? आमच्या गवळ्यानं त्याची एखादी म्हैस गाभण आहे असं सांगितलं की आई लगेच चिकाचं बुकिंग करायची. तर "मेल्या, म्हशीत आणि बायकांत काहीच फरक वाटत नाही का तुला? तोंडाला काही हाड?" असं म्हणून माझ्या पाठीवर सणसणीत पाठिंबा व्यक्त झाला. फरक नक्कीच आहे हे मला त्याकाळीही कळत होतं. पुढे वयानुरूप आणि अनुभवानुरूप शंका उत्पन्न होऊ लागल्या तो भाग वेगळा. पण त्याबद्दल कधीतरी स्वतंत्र लिहीन. तूर्तास मुद्दा खोक्याबाहेर विचार करण्याचा आहे. त्यामुळे आमच्यासारख्याच बॉक्सवाल्यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्यच आहे असं आम्ही समजतो. निन्यांची विचार करण्याची पद्धत आमच्यासारखीच आहे. मुद्देसूद विचार करून तर्कशुद्ध निष्कर्षापर्यंत काय कुणीही येरू येईल. पण असंबद्धतेतून मोठे अर्थ लागतात, अपघातानं शोध लागतात हा जगाचा इतिहास आहे. झाडाखाली झोपा काढत बसलेल्या न्यूटनची सफरचंद टकलावर पडल्यामुळे झोपमोड झाली आणि गुरुत्वाकर्षणाबद्दल जगाला कळलं. हा शोध लागण्याआधी कुणी मोरू जिन्यावरून पाय घसरून पडला तर काळ्या मांजराला दोष दिला जायचा. काळी मांजरं तरी सुटली. आईनं पावसात जाऊ नकोस असं बाळ बेंजामिनला बजावलं असतानाही उनाडपणे पतंग उडवायला गेल्यामुळे विजेचा शोध लागला. या शोधामुळं रात्री काय करायचं हा प्रश्न सुटला आणि अकारण लोकसंख्या वाढू लागली होती ती कमी झाली. राजकारणात पडू नका असा सल्ला अण्णांनी दिला असला तरी पडल्यामुळे भारताला केजरीमल छाप डांग्या खोकला मिळाला. "हसत खेळत चिडत रुसत खोकत शिंकत भ्रष्टाचार विरोध" हे नवीन तंत्र लोकशाहीला मिळाले. असे हे सगळे खोक्याबाहेरचे लोक. त्यांना मुक्तपणे खोक्याबाहेर बागडू द्या. त्यांच्या मुक्त चिंतनाने राष्ट्राचे कल्याण जरी नाही झाले तरी धारावी तरी नक्की होणार नाही. तरीच आमच्या मातोश्री आम्हाला "डोकं आहे का खोकं तुझं" असं विचारायच्या. 

Monday, January 26, 2015

यू सेड इट!

आर के लक्ष्मण गेले. व्यंगचित्रकारितेतील अत्यंत सभ्य तरीही प्रभावी व्यक्तिमत्व गेले. चित्र हजार शब्दासम असते अशी म्हण आहे, आर के लक्ष्मणांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर त्यांचे चित्र लक्ष शब्दासम असायचे. १९५१ पासून अगदी अलीकडे पक्षाघाताने नाईलाज होईपर्यंत त्यांच्या कुंचल्याचे फटकारे समर्थपणे राजकीय सामाजिक टीकाटिप्पणी करत राहिले. त्यांचा तो कॉमन मॅन कॉमन कधीच नसायचा, तो असाधारणच असायचा. कळायला लागलेल्या वयापासून आजवर कॉमन मॅनचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असायची. शंभर टक्के वेळा त्याने प्रत्यक्षातील कॉमन मॅनची नस बरोबर पकडलेली असायची. तो चेक्सचा कोट, ते धोतर, क्वचित कधीतरी त्यावर ठिगळ लावलेले, विना मोज्याचे ते पंपशू, डोक्याचा अर्धचंद्र झालेला, तळ्याच्या किनाऱ्यालगत गवत उगवावे तसे राहिलेले केस, गांधीजी छाप चष्मा, उंदराने कुरतडावी तशी मिशी असे ते ध्यान आपल्या जवळपासचे वाटायचे.  माझ्या आजोबांकडे त्यांचे काही मित्र नेहमी येत त्यापैकीच एखादा हा कॉमन मॅन असावा असे मला वाटायचे. आमच्या घरी मटा येत असे. त्या काळी कोकणात पेपर काही रोजचा रोज मिळत नसे. मुंबईला प्रसिद्ध झाल्यावर त्याचे बंडल यष्टीत पडायचे. आमच्या गावापर्यंत ती यष्टी पोचायला दहाबारा तास लागायचे. दुसऱ्या दिवशी दुपारी कधीतरी ते बंडल पोस्टात येऊन पडायचे. मग डिलिव्हरीला बाहेर त्याच्या दुसऱ्या दिवशी. असे रमतगमत दोन दिवसांनी पोस्टमन आमच्या घरी आणून ते टाकायचा. इंटरनेटचा जमाना नव्हता, टीव्ही यायला अजून अनेक वर्षे होती. तार येणे अथवा ट्रंक कॉल येणे याचा अर्थ वाईट बातमी असण्याचा तो काळ होता. बातम्या जुन्या असल्या तरी आमच्यासाठी त्या नवीनच असायच्या. अर्थात बातम्या समजण्याचं वयही नव्हतं. पण एक गोष्ट अगदी ठळकपणे आठवते ती म्हणजे पहिल्या पानावर उजव्या हाताला असलेलं "काय म्हणालात?" हे आर के लक्ष्मण यांचं व्यंगचित्र सदर. पेपर हातात पडल्यावर प्रथम हा कॉमन मॅन काय म्हणतो आहे ते पहायचं आणि मगच उर्वरित बातम्या पाहिल्या जायच्या. राजकारण समजण्याचा तो काळ नव्हता, तरीही सुरुवात तिथून झाली असं म्हणायला हरकत नसावी. व्यंगातून वैयक्तिक टीका, शारीरिक व्यंग असलं काहीही नसायचं. अभिजात, निखळ, निर्व्याज असं फटकळ हसू असायचं. त्यातून हास्यनिर्मिती तर व्हायचीच, पण नेमकी विसंगतीही दाखवली जायची. इंदिरा बाईंच्या चित्रातून त्यांचं कणखर व्यक्तिमत्व तर दिसायचंच परंतु त्यांचा हेकेखोर हटवादीपणाही योग्य प्रमाणात दिसायचा. त्यांच्या धोरणातील विसंगती एखाद्या कसलेल्या पत्रकाराप्रमाणे दाखवून दिलेली असायची. ती सुद्धा अत्यंत आदराने. बरेच वेळा तो कॉमन मॅन व्यंगचित्रात अलिप्तपणे कुठे तरी उभा असताना दिसायचा. चेहऱ्यावर कधी गोंधळलेले, कधी आश्चर्याचे तर कधी उद्विग्नतेचे भाव असायचे. त्या त्या घटनेच्या अनुषंगाने कोटी भारतीयांचेच ते प्रातिनिधित्व करणारे ते भाव असायचे. खऱ्या अर्थाने तो मॅन कॉमन असायचा. हे असं सदैव कॉमन मनाचं प्रातिनिधित्व करणंच अनकॉमन प्रतिभेचं लक्षण आहे.

आरके लक्ष्मणांच्या जाण्यानं आपण काय काय गमावलं? ती प्रतिभा गमावली, सभ्यता गमावली, संवाद साधण्याची कला जोपासणारं, त्याची तपश्चर्या करणारं ऋषित्व गमावलं. नुकत्याच चार्ली हेब्दोवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आरके लक्ष्मण याचं संयत, कुणालाही क्षुब्ध न करणारं कार्य उठून दिसतं. हिंदू मुसलमान या भट्टीत अनेक राजकीय पक्षांनी आपली पोळी भाजून घेतली आहेच, तशीच ती पीत पत्रकारितेनेही घेतली आहे. प्रसिद्धी कसलीही असो, चांगली अथवा वाईट, ती प्रसिद्धी असते हे मानून काम करणारे अनेक आहेत. व्यंगचित्रकारिताही त्यातून सुटलेली नाही. तद्दन पाचकळ ते प्रक्षोभित करणारा असा व्यापक वर्णपट लाभलेली आपली भारतीय पत्रकारिता, त्यात मानानं घेता येण्यासारखी व्यंगचित्रकारांची नावं अगदी मोजकीच. बाळासाहेब ठाकरे हे एक त्यातलं उत्तुंग नाव. त्यात आरके यांचं स्थानसुद्धा नक्कीच. धगधगीत वास्तव समर्पकपणे दाखवणारी, कोपरखळ्या देणारी किती तरी व्यंगचित्रे डोळ्यासमोर येताहेत. एक आठवतंय. चंद्रावर मानव प्रकल्पासाठी कॉमन मॅनला इस्रोच्या नियंत्रण कक्षात आणण्यात आलं आहे, आणणारा बहुधा इस्रोचा कुणी अधिकारी असावा, तो उत्साहात सांगतो आहे,"सापडला! हा मनुष्य अन्न, वस्त्र, निवारा, प्रकाश, हवा याशिवाय जगू शकतो!" हे व्यंगचित्र म्हणजे सरकारला तर सणसणीत चपराक तर होतीच, पण त्यात संदेशही होता - कृपया या मूलभूत गरजांतून आपण (पक्षी: आपला देश) बाहेर आलो नाही, चंद्रावर मानवाच्या गप्पा कसल्या करता? प्रथम भारत राहण्याजोगता करा. मला वाटतं आजही तो संदेश लागू पडतो आहे. शेतकरी आत्महत्या करताहेत, पण निदान आपले मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोचले, आपल्याला आता कडक मंगळ तरी राहणार नाही याच्या समाधानात आत्महत्या करताहेत असे म्हणायचे. व्यंगचित्रांनी क्रांती बहुधा होत नाही, परंतु उत्क्रांती तरी होते. दुसरं एक आठवतं म्हणजे अनेक वेळा त्यांच्या व्यंगचित्रांतून फुटपाथवर राहणारे गरीब दिसायचे. ते भिकारी असायचे, पण त्यांच्यात एक उद्विग्नता, असहाय्यता, उपरोध यांचे मिश्रण असायचे. लोकसंख्या मोजणीच्या काळात एक व्यंगचित्र आले होते. त्यात जनगणना अधिकारी फूटपाथवरील भिकाऱ्याला नागरिकत्वाचा पुरावा मागत आहेत असं दृश्य होतं. त्यावर तो फाटके ठिगळ लावलेले कपडे घातलेला भिकारी म्हणतो आहे, "जरा पहा आमच्या कडे, हे आमचं दारिद्रय हा पुरावा आमचं भारतीयत्व सिद्ध करायला पुरेसा नाही काय?" अशा व्यंगचित्रांनी हास्य उत्पन्न होत नाही. गांभीर्य नक्की उत्पन्न होते. विषण्ण व्हायला होतं. शंकराच्या जटेतून मुक्त होऊन स्वातंत्र्यगंगा पृथ्वीवर आली, ते पवित्र जल आमच्यापर्यंत पोचायच्या आतच स्वार्थी लोकांनी कालवे काढून ते पाणी दुसरीकडे वळवलं. आमच्यापर्यंत पाट काय त्याची एवढासा ओघळही आला नाही ही व्यथा त्यांच्या अशा या व्यंगचित्रातून जाणवत असे. अंतर्मुख करत असे. या सर्व व्यंगचित्रांतून आर के लक्ष्मण यांची मानसिक जडणघडण दिसून येते. त्यांचा मूळ पिंड सामान्य मध्यमवर्गीय नागरिकाचाच. मध्यमवर्गीयांची कोंडी, धडपड, असहाय्यता हे ते नेमके पकडत. एका व्यंगचित्रात ते म्हणतात,"अर्थमंत्री हे खरोखर जादूगार आहेत. पेनच्या एका फटकाऱ्यात आमचं आयुष्य ऐषारामी करून टाकलं आहे त्यांनी. आम्ही ज्या ज्या गोष्टी रोज वापरतो त्या सर्वांना त्यांनी लक्झरी करून टाकलं आहे!" अनेक राजकीय, धार्मिक, सामाजिक, आंतरराष्ट्रीय घटनांवर त्यांनी व्यंगचित्रे काढली पण एकही व्यंगचित्र वादग्रस्त झालं नाही. त्यावरून गदारोळ झाले नाहीत, की धार्मिक भावना दुखावल्या म्हणून मोर्चे निघाले नाहीत. आयुष्यभर व्यंगचित्रांत राहून इतका अव्यंग राहिलेला माणूस शोधून सापडणार नाही. उणीपुरी साठ वर्षे आर केनी व्यंगचित्रे निर्माण केली. केवळ व्यवसाय म्हणून त्यांनी ते केलं असेल असं वाटत नाही. सर्व विषय आणि त्यांच्या प्रतिक्रिया या पोटतिडिकेतून आलेल्या वाटायच्या. जर राजकारण्यांनी त्यांच्या व्यंगचित्रांकडे गांभीर्याने पाहून योजना बनवल्या असत्या तर देशाचं कल्याण झालं असतं. तसं झालं नाही. म्हणून मग म्हणावंसं वाटतं, आरके, यू सेड इट, बट वी नेव्हर गॉट इट!

Tuesday, January 20, 2015

ढाण्या कविचे कवित्व

निळा बिबळ्या निकला घरसे फोडके भयंकर डरकाळी
निळा बिबळ्या निकला घरसे फोडके भयंकर डरकाळी
भगवे वाघकी भगवी चड्डी सुनके हो गई पिवळी

वाट बघ बघ के मंत्रीपद की मैं खाता रहा केले
वाट बघ बघ के मंत्रीपद की मैं खाता रहा केले
तुम्हारे बॅनरको मैंनेच रंगवाया था ये तो जरा आठव ले

भगवे वाघसे मेरे बिबळ्याकी कुस्ती में
तुमने दिया चड्डीको वोट
भगवे वाघसे मेरे बिबळ्याकी कुस्ती में
तुमने दिया चड्डीको वोट
आता ये ढाण्या वाघ घेगा तुम्हारे नरडी का घोट

मेरे दाढीको हात लावलावके दादा बाबा करते थे
मेरे दाढीको हात लावलावके दादा बाबा करते थे
इलेक्शन होतेही उसमें उवा है बोलने लगे
-आपका कवि

मत करो कोई मेरी नक्कल
खोल दूंगा मेरे पट्टे का बक्कल
मेरी पॅंट खाली पडी तोभी पर्वा नही
घालूंगा तुम्हारे डोके में, मैं थोडी अक्कल

आठवलेंका आठवावे रूप
आठवलेंका आठवावे भाषण
आठवलेंका आठवावा ढाण्या वाघ
अगर नही आठव्या तोभी मैं बनूंगा डेप्युटी शीएम
और बजा दूंगा एक एक का गेम
-आपका कवि

क्रांती करणे कू जपून जपून क्यू वावरणेका
उत्साहके भर में हमारा लेंगा टरका
दोन्ही हात से पकडके भाषण ठोका
सबने डोळे बंद किये थे टळ गया धोका
-आपका कवि

सक्काळी सक्काळी बाथरूमसे बाहेर आया मैं लेके बाथ
मेरा डोका सटका क्यूंकी बायकोने निकाले दात
देखा तो मैं था बाहर और मेरा पंचा रह गया था आत

भरारी पथकने कल रात उचल ली मेरी मोटरसायकल
भरारी पथकने कल रात उचल ली मेरी मोटरसायकल
आज ढाण्या वाघ की उडी बस से ऑफिस जायेगी

जंगलपे हुवा अतिक्रमण बिबळ्या वाघ को आया गुस्सा
बिबळ्याने आठवलेकू फोन लगाया बोला ये ऐसा कैसा?
आठवले बोला इतने दिवस मेरे कू ओळख भी नही दिया
अब घर में रॉकेल खतम हुआ तो मेरा रेशनकार्ड आठव आया?
-आपका कवि

मुझे वाटा मैंने पोरगीको पटवले
मैंने उसे बोला क्यूं ना आपण शिणमाको चले
उसने बोला हां लेकिन मेरे बापको पूछ ले
कमीनीने मुझे मां बाप के बीच बसवले
पिक्चरभर ढेकूणसे जादा उसके मां बाप चावले
रातभर उसके बापके मिशीके केस आठवले

शिळी भाकरी और पिठले
डोळे मिटके मैं ओरपले
खाके पोट मेरा तडसले
तब मुझे हवाबाण हरडे आठवले
दोन गोळ्या खाके मैंने सब पचवले
-आपका ढाण्या कवि

अगर पुढल्या वर्ष तक नाव लिया तिळगूळका
तो तुम्हारे पुठ्ठेपर लगाऊंगा एक सटका
फिर आठवेगा नाव तुम्हारा और तुम्हारे आज्जीका
-आज्जीका नाव आठवलेले कवि

संक्रांतपर मोदींनी तिळगूळ बाटले
सबकू बुलाया पण मुझे विसरले
सिद्धा फोन लगाके सरळ विचारले
उन्होने मुझे एक तास होल्डपर ठेवले
शेवटी कुणी तरी गुजरातीमें बोलले
आ लाईन व्यस्त छे एवढंच मैने ऐकले

हम बरोबर थे म्हणून मोदी आले निवडके
हरेक भाषणमें बोंबललो तरी हातमें आये चिंचोके
काल हम उनके आॅफिसकडे सहजच फिरके
म्हटलं दो शब्द सुनाऊंगा उनके कान उपटके
गार्डने बाहेरच रोका, म्हणे आठवले आत नाॅट ओके
तरीही मैंने दरवाजेके अंदर डाले डोके
दृश्य अंदरका देखके बढ गये ह्रदय के ठोके
मोदी बैठे थे, मंत्री सामने उभे वहीपेन लेके
म्हटलं बरं हुआ चिंचोके तर चिंचोके
वहीपेनसे मेरा छत्तीस का आकडा चौथीसे लेके
कसाबसा सही करता हूं आठव आठवके
मेरा ध्येय एकदम लख्ख हुआ वो देखके
क्रांती घडवूंगा इस देशमें केवळ काव्यमें बोलबोलके
-आपका ढाण्या कवि

तुमने तिळगूळ लाडू मेरे हातमें ठेवले
गोड बोला ऐसे कानमें खच्चून ओरडले
मैंने वो दातसे फोडने के खूप प्रयत्न केले
लाडू तर नहीच फुटले वर दात हुए खिळखिळे
शेवटी हातोडीसे तोडके तुकडे तुकडे केले
सावधानीसे चाव चाव के पोटमें ढकलले
कुछ उपयोग नही हुआ ऐसा जाणवले
च्यायला या लाडूच्या ऐसे शब्द निकले
क्यूंकी मैं हूं आठवले, नही हूं गोडबोले
-आपका ढाण्या कवि

अहो कलच हुई भोगी
आणि आज तुमने बनवली म्यागी?
मैनेपण बायकोको विचारले आज क्या बनाओगी
तर मुझे म्हणाली खाओ वहीच शिळी वांगी
-आपका ढाण्या कवि

आठवले नामस्मरण सप्ताह संपन्न हुआ
तुमने नही तो नही हमने तर बहुत एंजाॅय केलं बुवा
हप्ते में क्रांतीच क्रांती हुई है ये लक्षात ठेवा
आता फिरसे मुझे जो डिवचेगा उसे चावेगा कौआ
-आपका ढाण्या कवि

(आठवले सप्ताहात फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या वात्रटिका)

Monday, January 19, 2015

राशोमान

केजरीवाल  - न्यायाधीश महोदय, मी गाडीतून नेहमीप्रमाणे धरणे धरायला चाललो होतो.  गाडी सिग्नलपाशी थांबली. एका भिकाऱ्याने काचेवर ठोठावले. मी काच खाली केली. भिकाऱ्याने विचारले "तुम्हीच का ते केजरीवाल?" मी हो म्हटले. भिकाऱ्याने झोळीतून पाच रुपये काढले आणि माझ्या हातावर ठेवले. म्हणाला, "ही माझ्याकडून थोडीशी मदत. आम्हा गरिबांना तुम्हीच वाली. तुमच्याकडूनच आता काही आशा आहे. देव करो, आपण जिंकून याल." मला अश्रू अनावर झाले. पुढे दोन दिवस मी ते पाच रुपये खिशात ठेवून फिरत होतो. जितक्या वेळा हात खिशात जात होता तितक्या वेळा त्या भिकाऱ्याची आठवण येत होती. त्या पाच रुपयांत त्याचे अमूल्य असे आशीर्वाद होते. त्या आशिर्वादांपुढे जगातील कोणतीही शक्ती केवळ कमी ठरेल.

भिकारी - नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता चौकातल्या आपल्या बीटवर होतो. शिंगलला एक नॅनो येऊन थांबली. हे पंटर ही असली गाडी घेण्याऐवजी सरळ चालत का जात नाहीत कुणास ठाऊक. ड्रायव्हर ओळखीचा वाटला. थंडी नसतानाही त्याने स्वतःला नखशिखांत लोकरीत गुंडाळून घेतले होते. मला पाहून त्याने नजर चुकवली. मी जणू काही अस्तित्वातच नसल्यासारखा समोर पाहू लागला. तेवढ्यात त्याला एक सणसणीत शिंक आली. आणि मला आठवलं. अरे हा तर तो फुकट वीजवाला! सी एम झाला, नंतर पुढे काय झालं कळलं नाही. पण रस्त्यावर आडवा पडल्याचे फोटो पेपरमध्ये दिसले होते. मग पुढे तिहारमध्ये गेला होता असं कानावर आलं होतं. मन कळवळलं. हे हरामखोर दिल्ली पोलिस, सामान्य माणसाला सुखानं आंदोलन पण करू देत नाहीत. त्याचा चेहरा ओढलेला वाटला. पोट खपाटीला गेलं होतं. अंगात तापही असावा. काही खाल्लं तरी असेल का यानं? काचेवर टकटक केली. त्यानं ह्यांडल फिरवून काच खाली केली. काच पूर्ण खाली जायला पूर्ण एक मिनिट लागले. पॉवर विंडोज ऑप्शन महाग पडत असावा. अमृतांजन आणि व्हिक्सचा संमिश्र दर्प दरवळला. मी खिशात हात घातला आणि जेवढे हाताला लागतील तेवढे बाहेर काढले. पाच रुपये निघाले! अजून भोनी पण झाली नव्हती. नसूदे. खाऊ दे निदान वडापाव तरी. सरळ त्याच्या हातावर ठेवले. त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. बास! दिवस सार्थकी लागला. पुढे जितक्या जितक्या वेळा वडा पाव पाहिला तेव्हा त्या अश्रूंची आठवण झाली. 

पादचारी १ - दिल्लीतील उगाच रस्त्यावर फिरणाऱ्या असंख्य रिकामटेकड्यांतील मी एक. बरेचसे लाल दिव्याच्या गाडीतील रिकामटेकडे. माझ्याकडे फक्त ती गाडी नाही, म्हणून पायी फिरत होतो. रस्त्याच्या पलीकडे एक गाडी थांबली. भिकारऱ्यासारखा दिसणारा माणूस उतरला. खरा भिकारी नसावा. कारण चारपाच पावलं टाकल्यावर काहीतरी विसरल्यासारखा तो परत आला आणि त्यानं झोळीतून आयपॅड काढून आतल्या माणसाजवळ दिला. आणि मग तो सिग्नलपाशी जाऊन उभा राहिला. तो सिग्नलपाशी जाऊन उभा राहीपर्यंत ती गाडी मागेच थांबून राहिली होती. दिल्लीत असे गाडीतून हळूच उतरून पसार होणारे बरेच असतात. पण गाडीही लगेच पसार होत असते. ही अशी इथेच का थांबली याचे कुतूहल मला वाटले म्हणून मी खांबाच्या मागे लपून पाहू लागलो. तो भिकारी सिग्नलपाशी पोचल्यानंतर ही गाडी हळूहळू पुढे निघाली. सिग्नल ग्रीन होता. मग ती आणखी स्लो झाली. मग मात्र माझा संशय दाट झाला. बहुसंख्य गाड्या सिग्नल जिंकण्याच्या ईर्ष्येने पळत असतात, हिला ती घाई नव्हती. सिग्नल लाल झाला आणि ती पुढे निघाली. सिग्नलपाशी थांबली. त्या भिकाऱ्याने वळून गाडीकडे पाहिले आणि पावले टाकत गाडीपाशी आला. त्याने काचेवर टकटक केले. आतील चालकाने काच खाली केली असावी. भिकाऱ्याने थबकून इकडे तिकडे नजर टाकली आणि खिशातून एक नोट काढून त्या चालकाच्या हातात दिली. चालकाने ती नोट कपाळाला लावून वरच्या खिशात ठेवली असे वाटले. चालकाने मफलर गुंडाळला होता हेही मला दिसले. सिग्नल ग्रीन झाला. आता मात्र ती गाडी सुसाट निघून गेली. ताशी २० किमी प्रतितास म्हणजे न्यानोच्या मानाने सुसाटच. मी या सगळ्याचा विचार करत असतानाच दुसरी एक गाडी आली. बीएमडब्ल्यू असावी. आणि दुसऱ्याच क्षणी तो भिकारी आत होता. ही गाडी मात्र खरोखरची सुसाट निघून गेली. दिल्लीत काय घडत असतं  देवालाच ठाऊक.

पादचारी २ - मी सकाळी नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा होतो. हल्ली नुसती बस वेळेवर येण्याची प्रार्थना करून पुरत नाही. आधी नुसती येण्याची प्रार्थना करावी लागते. मग त्याप्रमाणे ती आलीच तर ती प्रायव्हेट नसावी अशी प्रार्थना करावी लागते. प्रायव्हेट असली तर ती "प्रासंगिक करार - बलात्कार स्पेशल" नसेल याची करुणा भाकावी लागते. बलात्कार स्पेशल बसेस हात केला तरी कधीच थांबत नाहीत. मी कधीच हात करत नाही. फुकट ऑफिसला उशीर. खुशाल मला नालायक नागरिक म्हणा. उगाच दिल्ली राजधानी नाही झाली. मी अशा अनेक प्रार्थना एकाच वेळी करत असताना, एक गाडी आली. आत दोन इसम होते. एक भिकाऱ्यासारखा प्याशिंजर तर ड्रायवर मफलर गुंडाळलेला. बिहारी असावा. चेहऱ्यावर दीन, कनवाळू भाव होते. जणू काही बटर टोस्ट विकायला निघालेला भय्याच. भिकाऱ्यासारखा दिसणारा इसम गयावया करून काही तरी सांगत होता. तो बाहेर पडायला धडपडत होता. ड्रायव्हरने हात पुढे करून काहीतरी देण्यास दरडावले असे वाटले. त्याचवेळी भिकाऱ्याने दार कसेतरी उघडले आणि तो धडपडत बाहेर आला. बटरटोस्ट भय्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले आणि तो अत्यंत करारी चेहरा करून काही तरी म्हणाला. "मैं इलेक्शन लडूंगाही लडूंगा" असे काही तरी शब्द माझ्या कानावर पडले. भिकारी थांबला. मागे परत आला आणि त्याच्या जवळच्या झोळीत हात घालून त्याने काही तरी बाहेर काढले आणि ते ड्रायव्हरकडे दिले. च्यायला! आयपॅड होता! मफलर वाल्याचे समाधान झाले असे दिसले नाही. भिकारी घाईघाईने पुढे गेला होता आणि रस्ता क्रॉस करण्यासाठी सिग्नलची वाट पाहू लागला होता. ड्रायव्हरनेही पाठोपाठ गाडी पुढे नेली आणि काच खाली करून त्याला तो काही तरी सांगत होता. भिकारी असहाय्य दिसत होता. नाईलाजाने त्याने खिशात हात घालून एक नोट काढली आणि ड्रायव्हरला दिली. त्याच्या चेहऱ्यावरून तो आता पूर्ण कफल्लक झालेला दिसत होता. अचानक त्या ड्रायव्हरने गाडी पुढे दामटली आणि निघून गेला. काहीच क्षणात दुसरी एक गाडी वेगाने आली. त्यातून एक इसम उतरला आणि त्याने त्या भिकाऱ्याला अक्षरश: गाडीत कोंबले आणि ती गाडी तशीच भरधाव निघून गेली. माझ्या डोळ्यासमोर एका भिकाऱ्याला लुबाडण्यात आले होते आणि दुसऱ्याच मिनिटाला त्याचे अपहरणसुद्धा झाले होते. दिल्लीत हे घडावे याचे मला आश्चर्य वाटले. कारण दोन गुन्ह्यांत निदान दहा मिनिटाचे तरी अंतर असावे असा दिल्लीत एक अलिखित नियम आहे आणि तो गुन्हेगारांच्या जगतात पाळला जातो. कलियुग! दुसरे काय असा विचार करून मी आलेली बस पकडली. सुदैवाने ती "बलात्कार स्पेशल" नव्हती.

दिल्ली पोलिस कर्मचारी - हमने इसकी पूरी जांच की है. सिक्युरिटी कॅमेराच्या फूटेजचा वापर करून आम्ही या भिकाऱ्याच्या हालचालींचा मागोवा घेतला. अनेक ठिकाणी हिंडून हा इसम आपच्या कार्यालयात घुसताना दिसला. पुन्हा बाहेर येताना दिसला नाही. मग बाहेर येणाऱ्या कार्यकर्त्यांचे चेहरे तपासून पाहिले. त्यातल्या एकाचे त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्याशी साम्य दिसले. आम्ही त्याला चौकशीला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्याघेतल्या त्याने रस्त्यावर आडवे पडून आंदोलन सुरू केले आहे. आमच्या प्रश्नांना त्याने आडवे पडूनच उत्तरे दिली. त्याच्या म्हणण्याप्रमाणे आंदोलनाचा एक भाग म्हणून त्याला हे काम देण्यात आले होते. "लोकांच्या समस्या त्यांच्यापैकीच एक होऊन अनुभवा असा असा आम्हाला सांगितले गेले. त्याचे हे प्रात्यक्षिक असे मला सांगण्यात आले होते, त्यानुसार मी हे काम केले. मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी आहे. मी सध्या इंटर्न म्हणून यांच्याकडे काम करतो आहे. आमच्या स्कूलमध्ये आपमध्ये इंटर्नशिप मिळणे हे प्रेस्टीजियस मानले जाते. सध्या मी खरेखुरे आंदोलन कसे करावे हे स्वत: केजरीवाल यांच्याकडून वन-ऑन-वन शिकतो आहे. स्वत:चे स्क्रिप्टही ते स्वत:च लिहितात. मला खुशाल अटक करा. आतापर्यंत ही कहाणी ट्विटरवरून साऱ्या जगापर्यंत पोचली असेल. दिल्लीची निवडणूक आहे. आम्ही कोणताही धोका पत्करणार नाही. कारण आता जिंकणे केवळ कठीण झाले आहे." असे त्याने जबानीत सांगितले आहे. या सर्व कामात दोन गाड्या वापरण्यात आल्या. त्यातील नॅनो स्वत: केजरीवाल यांची असून दुसरी बीएमडब्ल्यू कुमार भूषण यांची असल्याचे निष्पन्न झाले आहे. हस्तांतरण केले गेलेले पाच रुपये हे केजरीवाल यांचेच निघाले. न्यायाधीश महाशय, ते दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले असून. कदाचित त्याचे सामोशात रूपांतर झाले असण्याची शक्यता आहे.

सत्य हे नेहमीच फसवे असते, पण आमचे सत्य तेच खरे सत्य हे मात्र सत्य!

(अकिरा कुरोसावा यांची माफी मागून)

Friday, January 16, 2015

चार्ली हेब्दोच्या निमित्तानं

मुद्दे संपतात तिथे गुद्दे चालू होतात. पण गुद्द्यांनी तरी कुठे विषय संपतो? संपतो तो सारासार विचार. पॅरिसच्या चार्ली हेब्दो वरील भ्याड हल्ला हे अलीकडील उदाहरण. जे आमच्या विचारांशी, श्रद्धांशी सहमत नाहीत ते आमच्या विरोधात आहेत असलं हेकेखोर तर्कट केवळ मूर्ख लोकच करू शकतात. अर्थात हे असलंच तर्कट  "लोकशाही" पसरवण्याची एजन्सी घेतलेल्यांनीही केलं आहेच म्हणा. भूमिका कोणतीही असो टोकाची असेल तर ती दहशतवादातच मोडते. अनेक ठिकाणी बोर्ड "Zero tolerance policy" बोर्ड असतात. त्याचा अर्थ "आम्ही या बाबतीत कोणताही संवाद करणार नाही" असाच होतो. हाही एक सौम्य दहशतवादच म्हणावा लागेल. याचा अर्थ ते धोरण ज्या समस्येबद्दल आहे तिचे मी समर्थन करतो आहे असा मुळीच नाही. जी समस्या आहे त्याचे मूळ शोधून त्यावर उपाय करणे ही पॉलिसी असायला हवी. हे थोडंसं अॅलोपथी आणि आयुर्वेद यासारखं आहे. आयुर्वेदात रोगाचं मूळ शोधून काढणं, अचूक निदान करणं यावर भर दिला जातो. म्हणजे मग औषधयोजना करता येते. अर्थात, इतके दिवस मी यावर श्रद्धा ठेवून होतो. पण का कुणास ठाऊक, ती श्रद्धा हळूहळू कमी होते आहे असं वाटू लागलंय. पॅरिसच्या दहशतवादी हल्ल्यामागे तोच तो मूर्ख तर्कटवाद आहे, वेगळं काही नाही. पण हे विष उतरणारं नाही, रोग बरा होणारा नाही असं वाटू लागलं आहे. मॅटर आणि अँटिमॅटर इतका फरक झाला आहे. दोन्ही एकत्र आले तर नष्टच होणार.  ज्या धर्माला दुसऱ्या जीवाचं अस्तित्वच मान्य नाही तो धर्म तरी कसा म्हणायचा? ईश्वर एकच आहे. ठीक आहे. इथवर सगळं छान आहे. मामला इथवर थांबत नाही. ईश्वर एकच हे तर झालंच, पण आमचाच ईश्वर खरा, बाकीचे तुम्ही सगळे मरा हे तर्कशास्त्र अनाकलनीय आहे. हे तर्कट विचारसरणी म्हणावं याही लायकीचं नाही.

इतरांच्या धर्माची कल्पना काय आहे किंवा त्यांचे धर्माशी निगडित असण्याचे मुळात प्रयोजन काय आहे यावर मी भाष्य करणार नाही अथवा करूही नये. त्याचबरोबर मग मीही अशी अपेक्षा करेन की तुमचा धर्म तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा. त्याचा उपसर्ग दुसऱ्याला होऊ देऊ नका. तुमचा धर्म पसरवूही नका. परंतु इतिहास काय सांगतो? इस्लामचा इतिहास केवळ रक्तरंजित असाच म्हणता येईल. धर्मप्रसार करण्यासाठी देश उध्वस्त केले. बाकीच्या देशांबद्दल कशाला, भारतीय इतिहास काय आहे? मुघल आले, देश तुडवला, स्त्रियांवर बलात्कार केले, मुलांच्या हत्या केल्या, कर लावले, स्थानिक संस्कृती संपवली. जर हे सर्व धर्मप्रसारासाठी असेल तर त्या धर्मावर चर्चा का नको? धर्मप्रसार करायचा असेल तर त्यावर विचारलेले प्रश्न सहन करता आले पाहिजेत, त्याचं खंडन करता आलं पाहिजे, परस्परविरोधी संकल्पना असतील तर त्याचं निराकरण करता आलं पाहिजे. परस्परविरोध, विसंगती हा मनुष्यस्वभाव आहे. विसंगती हेरणे, त्यावर चर्चा करून ती दूर करणे किंवा निदान तिचे निराकरण करणे हे प्रगतीशील समाजाचे लक्षण आहे. जो समाज प्रयोगशील आहे, क्षमाशील आहे, तोच प्रगती करू शकतो. ज्याच्यात ही कुवत नाही तो समाज दगडांनी ठेचणे, जाहीर शिरच्छेद करणे, कोणत्याही चर्चेला बंदी करणे, फतवे काढणे या गोष्टीमध्ये खितपत पडतो. अशा समाजाचे काम हे फक्त आपल्या धर्माभोवती गस्त घालणे एवढेच उरते. धर्म हा मुक्त करणारा असावा, चिरंतन सत्य शोधण्याच्या कार्यात मदत करणारा असावा. मुळात हे सत्य शोधणे या कार्यासाठीच धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली. सत्यशोधन तर लांबच, उलट धर्माचे जड लोखंडी साखळदंड पायात पाडून घेतले गेले. जो धर्म सत्यशोधनात मदत करतो, तो मानवाला हिंसेपासून लांब नेईल की हिंसेला उत्तेजन देईल? सत्यशोधनासाठी हिंसा आवश्यक आहे का? सजीव सृष्टी हे परमेश्वराची परमोच्च, किमान ज्ञात सर्वश्रेष्ठ अशी निर्मिती आहे असे मानले जाते. परमेश्वराचे सत्य स्वरूप जाणून घेण्यासाठी त्याची परमोच्च अशी निर्मिती प्रथम नष्ट करावी लागत असेल असे वाटत नाही. जर ते आवश्यक असेल तर सत्य शोधण्याची गरज उरत नाही, कारण मग मुळात सजीव सृष्टी असण्याचीही गरज उरत नाही.

प्रश्न न पडणे एकवेळ समजू शकतो. पण ज्याला प्रश्न पडत नाही तो एक तर पशू असतो अथवा निर्जीव पदार्थ. प्रश्न पडणे हेच तर मानवाचे सर्वात मोठे बळ आहे. लाखो वर्षांपूर्वी,  हाती लागलेले हाड दुसऱ्या वस्तूवर जोरात आपटल्यावर काय होते हा प्रश्न आदिमानवाला पडला आणि पहिल्या शस्त्राचा शोध लागला. खरं तर ही पहिली ज्ञानाची ठिणगी. मग पुढे कुतूहल म्हणून गारगोट्या एकमेकांवर आपटून पाहिल्या आणि आगीचा शोध लागला.  प्रश्न आहे तो प्रश्न कसला पडतो त्याचा. तो कुवतीचा भाग झाला. कुणाची कुवत किती असावी यावर काही सरकारी नियम नाही, सामाजिक बंधन नाही अथवा धार्मिक अट्टाहास नाही. लाखो वर्षांपूर्वीच्या मेंदूची कुवत जशी होती तिच्याप्रमाणे प्रश्नही तसेच पडले होते. पुढे मेंदूची कुवत वाढली, प्रश्नांची क्लिष्टता वाढली. क्लिष्टता जशी वाढेल तसा मेंदूही उत्क्रांत पावत गेला. ज्या प्राथमिक मेंदूला केवळ पुढील अन्न कसे मिळेल हा प्रश्न पडत होता, तो मेंदू आता प्राथमिक राहिला नाही. त्याला पुढचे अस्तित्वाविषयी प्रश्न पडू लागले. हे सर्व का, कशासाठी निर्माण झाले आहे हा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा त्या प्राथमिक मेंदूपासून आपण खूप पुढे आलो होतो. या विश्वाच्या पसाऱ्यात आपण एकटे आहोत ही भावना अतिशय प्रबळ आणि प्रभावशाली आहे. तशीच त्या प्रश्नाचे उत्तर न मिळणेही अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. विज्ञानाचा अभाव असण्याच्या त्या काळात मग तत्वज्ञान हा एक मार्ग मिळाला. तत्वज्ञान हे तर्कावर आधारित होते. तर्कज्ञान मानवी मनाच्या कुवतीवर अवलंबून होते. मुख्य प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सिद्ध केलेली तत्वज्ञानावर आधारित प्रणाली म्हणजे धर्म असे मला वाटते. प्रणाली म्हणजे काही सत्य नव्हे. अंतिम सत्यापर्यंत पोचण्यासाठी तयार केलेले ते एक वाहन. आणि तेही असे की ते वाहन सत्यापर्यंत घेऊन जाईलच असे नाही. शेवटी सत्य म्हणजे काय? ते  कुणीच अनुभवले नसल्याने, पाहिलेले नसल्याने ते वाहन जिथे घेऊन जाईल तेच अंतिम सत्य असेल याची हमी काय? काहीच नाही. पण शोध थांबवणे हे मानवी मनास मान्य नाही. एखादी गोष्ट समजत नाही हे आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आणि हेच तर आपल्याला जगण्यासाठी भाग पाडते. ज्याला कसलाच प्रश्न पडत नाही, कुतूहल वाटत नाही त्याला स्थितप्रज्ञ असे नाव आहे. त्या अवस्थेला पोचलेले लोक ज्ञानी मानले जातात. कारण त्यांना अंतिम सत्य समजलेले असते. त्यांचे सोडा. बाकीचे आपण तसे नाही. म्हणूनच ज्या धर्मात आधीच सत्य सांगितले आहे, तर मग त्याचे अनुयायी हे सर्वज्ञानी असायला हवेत. त्यांना अंतिम ज्ञान झालेले असले पाहिजे. मग असे अंतिम ज्ञान जर झाले असेल तर कुणी चार्ली हेब्दो असो किंवा आणि कुणी, त्याने काढलेल्या चित्राबद्दल काही वाटता कामा नये. कारण अंतिम ज्ञान झालेल्याला असल्या ऐहिक, नश्वर, किरकोळ  गोष्टींनी कसलाच फरक पडणार नाही. शिवाय कुणी काय म्हणते यावर अंतिम ज्ञान थोडेच अवलंबून असणार?  ते व्यंगचित्रांनी बदलणार नाही किंवा लेखांनी. आणि जसे ते व्यंगचित्रांनी बदलणार नाही तसेच ते हत्या करून, बंदुकांनी गोळ्या झाडूनही बदलणार नाही. आपला धर्म कशासाठी आहे, त्याचे ध्येय काय आहे याचा विचार व्हावा. पूर्वी धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणत, आता ते बदलून बंदुकीची गोळीने तिची जागा घेतली आहे असं दिसू लागलं आहे. अंतिम सत्याजवळ जाण्याच्या आपल्या प्रवासात ही प्रगती आहे की अधोगती हे प्रत्येकानं स्वत:चं स्वत: ठरवावं. इत्यलम. 

Thursday, January 15, 2015

डोळे हे जुल्मी इल्मी

आम्ही हे भविष्य पूर्वीच वर्तवले होते. ते वर्तवताना समोर केवळ आमचा परममित्र मोरू होता. आताही तो समोर बसला होता. मोरू आमच्या भविष्याबद्दल फारसा उत्सुक नसतो. शिवाय त्याच्यासमोर नुकतीच इडली सांबाराची पहिलीच प्लेट येत होती. तिच्या भविष्याबद्दल तो जास्त उत्सुक होता. अण्णा नेहमी इडलीवर चेरी ठेवल्याप्रमाणे दुधी भोपळ्याची फोड ठेवतो. प्लेट टेबलावर येईपर्यंत ती भोवतालच्या सांबाराच्या तळ्यात पडते की तिचे इडलीवरील स्थान अढळ राहते याबद्दल आमची पैज लागत असे. आज ती फोड इडलीवरच राहणार असे भाकित मोरूने वर्तवले होते तर तिचे अध:पतन होऊन सांबाररूपी भवसागरात बुडून जाणार असे माझे भविष्य होते. ऑर्डर देऊन मी शांतपणे दैनिक शंखनाद हातात घेतला होता. मोरू ऑर्डर येऊन तिचा फडशा पाडल्याखेरीज पेपर वाचत नाही. तो अस्वस्थ होऊन भोपळ्याच्या फोडीची चिंता करीत बसला होता. आमच्या शेजारच्या टेबलावर एक मुंडू नेसलेला मद्राशी आणि त्याचे सकच्छ नेसलेले कपाळावर भस्म लावलेले कलत्र बसले होते. तो छान फुर्र फुर्र आवाज करत काssssफी पीत होता. तर कलत्राने समोरच्या इडली चटणीचा अक्षरश: खून करून त्यावर सांबार ओतले होते आणि सूख जाले हो साजणी असे अनिर्वचनीय आनंदी भाव घेऊन आपली पाची बोटे त्यात घातली होती. ती इडली आक्रोश करते आहे असे वाटत होते. पुढच्याच क्षणी तो आक्रोश संपला आणि तिचा चटणी, सांबारयुक्त असा लाडू वळला गेला आणि हां हां म्हणेपर्यंत तो गायबही झाला. प्लेटमध्ये आता शांत शांत होते. खून केल्यावर खुन्याने थंड डोक्याने रक्त साफ करावे तशी ती आता उरलेले सांबार साफ करत होती. इडलीचा असा खून मला असह्य होतो. आधी छान इडलीपात्रात घालून तिला गोल तबकडी करायचे आणि प्लेटमध्ये समोर आल्यावर चिंध्या चिंध्या करून सोडायचे ही असुरवृत्ती केवळ दक्षिणेतच. त्या इडलीवधाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत मी शंखनाद वाचू लागलो. मोदींची भारतवारी निश्चित, पेट्रोलची भाव वाढ निश्चित, भारतीय संघाची हार निश्चित, कतरिना कैफचा विवाह निश्चित, शिवसेनेचा सत्तेत सहभाग निश्चित अशा अनेक निश्चित्या नजरेखालून घालत असतानाच "अरेच्या!! हे काय?" असे उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले. मी बहुधा जरा जोरातच ओरडलो असणार. शेजारच्या मद्राशाची फिल्टर कॉफी त्याच्या अंगावर सांडली आणि तो खास द्राविडी संतप्त भस्मभेसूर चर्येने माझ्याकडे पाहू लागला. ती इडलीमर्दिनी मात्र थंड होती. तिने माझ्याकडे झाडाखाली रवंथ करत बसलेल्या गाईच्या मुद्रेने पाहिले आणि कानाने माशी हाकलावी तशी मान हलवून पुन्हा रवंथ करती झाली. मोरूने प्रश्नार्थक मुद्रा करून माझ्याकडे पाहिले. "अरे बातमीच तशी आहे! अरे ही लाजिया फिल्मी आली हो भाजपमध्ये! इतके दिवस चाललं होतं, लाजते, पुढे सरते, दोन दिवस थांबा, लगेच काडीमोड घेते. नवऱ्याचं आणि तिचं पटत नव्हतं म्हणे. अजिबात ऐकत नव्हता म्हणे नवरा तिचं. कुठल्या बाईला आपलं कुणी ऐकत नाही हे चालेल? त्यातून या त्यांच्या पार्टीमध्ये पांडवांसारखे पाच पाच नवरे. एकपण ऐकत नव्हता म्हणे. हिचंच नव्हे तर एकमेकांचं पण. रोज म्हणे घरी तमाशा. पांडव झाले तरीसुद्धा काय, अर्जुनाचीच दादागिरी जास्त. नकुल सहदेवाला पागेतच झोपायला लावायचा तो. शेवटी घेतलंन घटस्फोट असं दिसतंय." मोरू रोखून शंखनाद पाहत होता. त्याच्या त्या एकाग्र मुद्रेकडे पाहून त्याला लाजीया फिल्मीच्या घटस्फोटाचा धक्का बसला आहे की आनंद झाला आहे ते कळायला मार्ग नव्हता. तिचे फोटो कानपूरच्या काला जामूनसारखे गोड असतात असं एकदा तो मला म्हणाला होता. "अरे, उ नं सुरू होणारा आणि भ ने संपणारा पाच अक्षरी शब्द कोणता रे?" मोरूने विचारले. "आं?" मी. "अरे हे मागल्या पानावरचं शब्दकोडं बघतोय मी." इति मोरू. म्हणजे मी इथं एवढं बोललो ते त्यानं ऐकलंही नव्हतं.

"अरे मोरू, तुझी आवडती बया ना रे ही?" मी म्हणालो. मोरू म्हणाला,"हो रे. तेवढ्यासाठी तर स्टार न्यूज बघायचो मी. अल्पसंख्यांक हा शब्द मला तिथेच कळला. आधी मला वाटायचं अल्पसंख्यांक म्हणजे कमी मार्क पडणं. पण अल्पसंख्यांक असलं म्हणजे प्रत्यक्षात सगळीकडे ग्रेस मार्क मिळतात हे लाजियामुळे कळलं. छान समजावून सांगायची. अल्पसंख्यांकांच्या दारूण अवस्थेच्या दर्दभऱ्या कहाण्या सांगताना ते मोकळे केस छान दिसायचे रे तिचे. त्यांच्या हक्कांबद्दल सांगताना ते सुरमा घातलेले डोळे कसे पेटून उठायचे. त्यांच्यावरचे अत्याचार दाखवताना कसे ते मेकप सांभाळून भरून यायचे. डिट्टो शबाना आझमी रे. चिंतू, आपण का नाही रे आलो अल्पसंख्यांक आईबापांच्या पोटी जन्माला?" मोरूच्या डोळ्यात खुदाई खिन्नता दिसली.  "पण आता ही भाजपमध्ये आली ना रे? आपलं उपेक्षित बहुसंख्याकांचं अंतरंग कळेल का रे तिला?" मोरू. "अरे नुसती आली नाही, पेटून आली आहे. प्रस्थापितांविरुद्ध लढणारी आता प्रस्थापितांविरुद्ध रडणार आहे. बहुसंख्यांकांचं जगणं म्हणजे स्वर्ग नाही हे अल्पसंख्यान्कांपर्यंत पोचवणार आहे. मग बहुसंख्यांक आणि अल्पसंख्यांक दोघे मिळून रडतील. लोकशाहीचा हा परमोच्च बिंदूच नव्हे का? भाजप म्हणजे मूळची गंगा, तीत येडीयुरप्पा, रेड्डी असली भ्रष्ट जनावरे वाहत आल्यामुळे तिची गटारगंगा झाली होती. आता तीत हे खुद्द आपनृपतिंनी अप्रूव्ह केलेले पवित्र अल्पसंख्यांक तीर्थ येऊन मिळाले. आता गंगा पावन झाली म्हणायची बरे." मी म्हणालो. "होय रे होय. इतके दिवस टीव्हीवर ही साध्वी, ती फायर ब्रॅंड महामाया उमा भारती, सासूची आठवण करून देणारी इराणी यांना बघावं लागत होतं रे. फार त्रास व्हायचा. भाजपमध्ये सर्वात देखणं कोण असं विचारलं तर रामदेवबाबा असं म्हणायचे लोक. आता ऐकणं मरू दे, भाजपच्या बातम्या निदान बघायला तरी बरं वाटेल." मोरू त्याचं उथळ नश्वर ऐहिक जग सोडायला तयार नव्हता. "अरे मोरू, ही बया नुसती भाजपमध्ये येत नाहीये. आपनृपति केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूकसुद्धा  लढवणार आहे म्हणे ही. एक बरं आहे, दोघांनाही सणसणीत हरण्याचा अनुभव आहे. हरण्याची कारणमीमांसा करण्यात दोघेही पटाईत आहेत. लाजिया हरली, तर चुकून तिनं भाजपच्या हीन पातळीवरील क्लुप्त्या असं म्हणू नये एवढंच भान तिला बाळगावं लागणार आहे. केजरीवाल जिंकले तर त्यांनीही चुकून, आपण का हरलो या विषयावर भाषण देऊ नये. मोरू, हे बघ काय इथं म्हटलं आहे - काही असलं तरी कचरा, घाण, दलदल, भ्रष्टाचार वगैरे निर्मूलनाचा अनुभव लक्षात घेऊन तिला  गंगेच्या स्वच्छता अभियानाची प्रमुख केलं आहे. कोटी कोटी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली गंगा, तिच्या स्वच्छतेचे कंत्राट लाजियाला देऊन भाजपला धर्मांध म्हणणाऱ्या लोकांना चूप बसवले गेले आहे. श्रीमती लाजिया यांनी आयुष्यात प्रथम गंगेची पाहणी केली. त्यांची पहिली प्रतिक्रिया "ईssssss!" अशी होती. बरोबरचे पत्रकार आणि कार्यकर्ते यांना ती प्रतिक्रिया फारच मोहक आणि गोड वाटली. तो चीत्कार ऐकून गंगेत डुबकी घेणारे साधू आणि गंगादर्शनाला येणाऱ्यांना लुटणारे संधीसाधू असे सगळे थबकले. कुणीही न विचारता साधूंनी "आपका काम हो जायेगा बिटिया!" असा अनाहूत आशीर्वाद दिला. "'आप'का नाम मत लो महाराज! आशीर्वादही देना है तो 'आप'का काम तमाम हो जायेगा ऐसा दे दो" असा लडिवाळ आग्रह लाजीयांनी धरला. आयला एरवी हेच साधू आम्हाला "भला सोच बच्चा!" असं दरडावतात. गंगेच्या पात्राच्या बॅकग्राउंडवर फोटोसेशन झाल्यावर वाराणशीची फेमस रबडी आणि जलेबी यांचा समाचार घेऊन त्या दिल्लीला रवाना झाल्या. वा! भाजपच्या भगव्या पगडीवर हा हिरवागार पाचूचा तुरा शोभून दिसणार तर!"

"युरेका!" मोरू ओरडला. इथे तो मद्राशी आणि त्याचं कुटुंब दोन्ही दचकले. आता मात्र ते उठले आणि पलीकडील टेबलावर जाऊन बसले. तिनं इडलीची दुसरी ऑर्डर दिली होती. "उपटसुंभ!" मोरू परत ओरडला. "शब्द सुटला रे चिंत्या! उपटसुंभ बसतोय बरोबर इथे!" त्याच्या चेहऱ्यावर मध्यमवर्गीय समाधान पसरले होते.

Thursday, January 8, 2015

हम दो, हमे होने दो

फार पूर्वी म्हंजे इंदिराबाईंच्या काळात "एकच जादू, झपाटून काम" ही घोषणा प्रसिद्ध झाली होती. म्हणजे सरकारतर्फे प्रसिद्ध केली गेली होती, लोकांत मुळीच प्रसिद्ध झाली नव्हती. झपाटून काम म्हणजे ऑफिसमध्ये वेळेवर जाणे, टिवल्याबावल्या न करणे, दिवसातून केवळ दोनदा चहा प्यायला जाणे, खरोखर शीक पडल्यासच सिक लीव्ह टाकणे वगैरे गैरसमजुतीमुळे लोक नाराज झाले होते. त्याचा फटका इंदिराबाईंना निवडणुकीत बसायचा तो बसला. लोकांनी आपल्या बॉयकट ऐवजी राजनारायण यांचा फडकेमंडित श्मश्रुभूषित चेहरा आवडला याचे त्यांना आयुष्यभर वैषम्य वाटत राहिले. पुढे सरकारने लोकबंधू आणि फडकेबांधू राज नारायण यांचे पोष्टाचे तिकीटही काढले. ते पाहून मला नेहमी राजेंद्रनाथ या विनोदी नटाची आठवण येत असे. असो. तात्पर्य, झपाटून काम ही संकल्पना स्वीकारली गेली नाही. मग आम्ही परीक्षेत एखाद्या प्रश्नाचे उत्तर आले नाही की जे करत असू तेच इंदिराबाईंनी केले. पुढचा प्रश्न हाती घेतला. लोकसंख्येचा. अशा वेळी परीक्षेत आमचे जे व्हायचे तेच इंदिराबाईंचे झाले असावे. आधीचा सोडलेला प्रश्न सोपा वाटू लागला. पण इंदिराबाई म्हणजे काही आम्ही नव्हे. प्रश्न ऑप्शनला टाकणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यातून सौतंत्र भारताचे कणखर व्यक्तिमत्व असल्यामुळे माघार घेणे त्यांना माहीत नव्हते. त्यांनी पुढली घोषणा केली. "हम दो हमारे दो". त्यांचा स्वत:चा त्यावर विश्वास होता. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे त्यांनी स्वत: प्रथम तो नियम पाळला होता. त्यांचा भविष्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे मुले होण्याआधी त्यांनी कुठल्याही ज्योतिष्याचा सल्ला वगैरे घेतला नव्हता. घेतला असता तर पुढे आपल्या नशिबात कसले नातवंडसूख वाढून ठेवले आहे हे कळले असते. त्यांना भारताच्या भविष्याची चिंता नेहमीच असे. मुलेबिले होऊ दिली नसती. त्यांनी "हम दो हमारे दो" ही घोषणा दिली खरी. परंतु त्याकाळचे ते लोक. "हम दो, हमे होने दो" यावर विश्वास अधिक असायचा. पूर्वी म्युन्शिपालटीची गाडी दिसली की मोकाट कुत्र्यांची पळापळ व्हायची, आता त्यात मोकाट पुरुषांची भर पडली. मग नसबंदी करून घेणाऱ्यास "ट्रान्झिस्टर आणि शंभर रुपये" असली भरघोस मदत जाहीर करून झाली. नसबंदी करून घेतलेल्या पांडबा अथवा म्हादबाने ट्रान्झिस्टर गळ्यात घालून भप्पी लाहिरीची गाणी (गरजूंनी "जी ले ले  जी ले ले" हे देहांतशासनाच्या लायकीचे गाणे आठवून पाहावे) ऐकत अत्यानंदाने नाचावे अशी काहीशी सरकारची अपेक्षा होती. त्यावेळी काही ती पुरी झाली नाही, परंतु अलीकडेच रा. रा. अमीर खान (सत्यमेव जयते फेम) यांनी राजू हिरानी नावाच्या इसमाच्या सहाय्याने ती पूर्ण केली. चित्रपटाचे पोष्टर पाहिल्यावर प्रथम वाटले हा मनुष्य नुकताच नसबंदी चुकवून ट्रान्झिस्टर तेवढा लंपास करून पळून आला आहे. काही काही लोक दिसतातच असे की त्यांना पाहून नसबंदी हा मानवता टिकवण्याचा उपाय वाटू लागतो. हिरानी याने तो ट्रान्झिस्टर यूएसए मेड असल्याचे सांगितले. लोकांनी त्याचा साहजिक अर्थ उल्हासनगर सिंधी असोसिएशन असाच घेतला. यूएसए मेड प्रॉडक्ट ज्या लायकीचे असतात, फार काळ टिकत नाहीत, तसेच काहीसे या चित्रपटाचेही कदाचित होईल. पण काही म्हणा, ट्रान्झिस्टरला पुन्हा चांगले दिवस येऊ घातले आहेत. वाईटातून चांगलं निघतं ते असं. 

हम दो हमारे दो ही घोषणा ऐकून समाजाच्या विविध थरातून विविध प्रतिक्रिया आल्या. श्रीमंत लोक म्हणाले इथं एकाची मारामार, तुम्ही दोन सांगताय. मध्यमवर्गीय म्हणाले ते आम्हाला कळतं आहे, तुम्ही सांगायची गरज नाही. आम्हाला कळलं नाही तरी आमचा पगार आम्हाला तेच करायला लावील. ज्या लोकांच्या जमिनी-बिमिनी होत्या ते म्हणाले दिवसभर शेतात कष्ट करावेत, घरी यावं, कारभारनीनं दिलेला गुळाचा चा प्यावा, आन मग निवांत भावकीची भांडणं, शेताच्या बांधावरून झालेल्या हाणामाऱ्या, त्यावरून पडलेल्या तारखा, कागूद हे असं सगळं पाहत बसावं. कोर्टात साक्ष पायजे असेल तर ज्याची साक्ष असेल त्याचं चा-पानी बघणं असायचं. भाऊबंदकीची भांडणं भाऊ असल्याबिगर होत न्हाईत. आमच्या बापजाद्यांनी आमची ती सोय करून ठ्येवली, मंग आमी आमच्या पोरांची कराया नगं व्हंय? आता हम दो आणि हमारे फकस्त दो म्हनल्यावर भाऊबंदकी कशी करायची हो या दोगांत? किमान चारपाचची तरी परवाणगी द्या की. गरीब लोकांतून मात्र तीव्र प्रतिक्रिया उमटली. श्रीमंत लोक घरी जातात तेव्हा त्यांना करमणुकीची साधने उपलब्ध असतात. क्लब्ज, पार्ट्या, गाड्या इत्यादी. मध्यमवर्गीय लोकांकडे ट्रान्झिस्टर, माजघरातील गप्पा, शेजारणीशी सासूनणंदांच्या उखाळ्यापाखाळ्या, पुरुष मंडळींना ब्रिज, पत्ते, कट्टे आणि ते झाल्यावर बायकोची विविधभारती. आमी गरीब लोकांनी काय करावं? आमचा येकमेव विरंगुळा ती आमची ही पोरं, तो बी काडून घ्येता व्हंय? आमी घरी गेल्यावर काय करावं म्हंता? सरकार आमाला फुकाट ऱ्हाऊ द्या सस्ती वीजबी देत न्हाई, अंधारात मग काय करावं आमी? अंधारात येवढी एकच विच्छा आसतीय तेवढी तरी पुरी करा आमची. असा सगळा धुरळा उडाला आणि हम दो हमारे दो अभियान सरकारी कागदोपत्री आणि सरकारी गाड्यांवरच्या  घोषणांच्या स्वरूपात उरलं. सुदैवानं हिंदू धर्मात एकच बायको करायला परवानगी होती आणि आहे. बहुतेकांना एकीला तोंड देता देता फेस यायचा. त्यामुळे पुरुषांना ते बंधन न वाटता दिलासा वाटायचा. नाही म्हणायला काही एकापेक्षा जास्त "ठेवणारे" महापुरुषही होते. परंतु त्यात विलासापेक्षा पराक्रमाचा भाग जास्त होता.

सध्या सरकारशी जवळीक असणाऱ्या काही मंडळींनी या दोन्ही योजना आणि त्यांचा उडालेला बोजवारा यांचा अभ्यास केला आहे. दोन्ही योजना चांगल्या होत्या, मग त्यांची अशी बोंब व्हायचं कारण काय असा प्रश्न घेऊन ही मंडळी कमंडलू आणि त्रिशूल घेऊन तपश्चर्या करायला बसली. कमंडलू या वस्तूविशेषाबद्दल आमच्या मनात बहुत कुतूहल आहे. आम्ही प्रत्यक्षात कधी कमंडलू पाहिला नव्हता. आमचे एक स्नेही अलीकडे नव्याने जळजळीत हिंदुअभिमानी झाले आहेत. त्यांनी कमंडलूचे रहस्य सांगितले. शाळाकॉलेजात असताना ते असे काही असतील अशी शंका आली नव्हती. कारण आमच्या बरोबरीने तेही आचमनसंध्येला बसत. ते बरोबर नसतील तर आम्ही मित्रही त्यांना अर्घ्य सोडल्याशिवाय आचमन करीत नसू. आम्ही सायंकाळी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे म्हणत फुले आणि पाखरे पाहण्यासाठी बाहेर पडत असू त्यावेळी अंधार पडायला आला असूनही हे गॉगल लावून बाहेर पडत असत. त्या गॉगलचे नेमके प्रयोजन आम्हालाही माहीत होते. हे एखाद्या पाखराकडे टक लावून पाहत ते त्या भोळ्या भाबड्या पाखराला कळत नसे. खरे तर कळले असते तरी त्या पाखराने याच्याकडे पाहिले असते की नाही याबद्दल आमच्या मित्रपरिवारात दुमत होते. काहींच्या मते पाखराने दयेने पाहिले असते तर बाकीच्यांच्या मते केवळ भूतदयेने पाहिले असते. तात्पर्य, हिंदुत्ववाद हा केवळ प्रात:शाखेपुरता मर्यादित होता. सकाळी दुधाच्या पिशव्या आणायला जायचंच असायचं. थोडासा हिंदुत्ववादाचा रतीब घालून होईपर्यंत चितळे "उघडायचे". त्या रतीबाचे बिल इतक्या वर्षांनी समोर येईल असे वाटले नव्हते. शिवाय शाखेत शिकवलेला हिंदुत्ववाद हा व्यापक होता. संकुचित नव्हता. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर यांची गाडी हिंदुत्ववादाच्या कोणत्या रिपेअर शॉप मध्ये गेली हे कळले नाही. पण गाडी रिपेअर होऊन बाहेर आली तेव्हापासून मिसफायरच जास्त करत होती. कॉलेजमध्ये "थट्टीफस"ला मित्रांत कुणाची टाकी जास्त कपॅसिटीची याची चढाओढ करणारे हे आता जाज्वल्य संस्कृतीचा अभिमान बाळगून सेलेब्रेशन तर लांबच, तुमच्या शुभेच्छाही नकोत म्हणू लागले. कॉलेजमध्ये "मंग काय राव, आपन जाऊन डायरेक नडलो न राव तिला" अशा फुशारक्या मारणारे आता व्हॅलेंटाईन डेला छापे मारून पोरापोरींना पकडू लागले. आम्ही या बाबतीत त्यांना विचारले असता तू साक्षी महाराजांकडे जा असा त्यांनी आम्हाला सल्ला दिला.

प्रंपूज्य साक्षी महाराजांनी या बाबतीत पूर्ण अभ्यास केला आहे असे आमच्या निदर्शनास आले. महाराजांशी आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी प्रथम "तुम्हांस बायका किती?" असे विचारले. त्यांच्यासमोर आम्ही खुरमांडी घालून बसलो होतो. स्वामी व्याघ्रासनावर बसले होते. आम्ही खाली मान घालून "एकच आहे महाराज. सध्या." असे उत्तर दिले. आम्ही "सध्या" हा शब्द उच्चारल्यावर त्यांनी तीव्र नजरेने आमच्याकडे कटाक्ष टाकला. त्या कटाक्षात आमचे भस्म करण्याइतपत दाह होता. त्यांनी मग विचारले,"तुम्हांस मुले किती?" आणि इथे तरी आम्हांस निराश करू नका अशा अविर्भावात ते आमच्याकडे पाहू लागले. आम्ही मान खाली घातलीच होती, ती तशीच ठेवून हळूच बोललो,"दोन, महाराज." त्याचक्षणी पावलाला कसलातरी चटका बसला. महाराजांनी नजरेची पॉवर वाढवली, आता आपले बहुधा भस्म होणार असे वाटत असतानाच पायापाशी ठेवलेला चहाचा कप दिसला. आश्रमातील ब्रम्हवादिनीने चहा आणून ठेवला होता. चटका त्याचा बसला होता. "फक्त दोन? का? परमेश्वराने काही तरी योजना करून हा मनुष्यदेह तुम्हाला दिला आहे ना? डोके बुद्धीसाठी, डोळे पाहण्यासाठी, कान ऐकण्यासाठी, तोंड खाण्यासाठी, हात काम करण्यासाठी…" आमचे ब्लडप्रेशर वाढत चालले. सुदैवाने ती मघाशी चहा आणून देणारी ब्रम्हवादिनी पुन्हा आत आली आणि महाराज "दोन हातांवर"च थांबले. आम्ही कपाळावरचा घाम पुसला. "पूर्वी याच योजना होत्या, पण त्या नीट राबवल्या गेल्या नाहीत." महाराज पुढे बोलू लागले. "आम्ही म्हणतो एकच जादू झपाटून काम ही योजना हम दो हमारे चार याला पूरकच आहे. झपाट्याने कामाला लागा आणि किमान चार मुले जन्माला घाला. चिंता करू नका. ज्याने दिली चोच तोच देईल चारा हे ध्यानात ठेवा. प्रत्येक हिंदूने आपल्या दिवसातील किमान एक तास या कार्यक्रमासाठी अर्पण केला पाहिजे. हे राष्ट्रकार्य आहे हे ध्यानात ठेवा. पंतप्रधानांनी स्वच्छता अभियान असं नुसतं म्हटलं तर सगळ्या देशाने झाडू हातात घेतला. आता या योजनेसाठी तुम्ही उत्साहाने… " ती ब्रम्हवादिनी रिकामे चहाचे कप घेऊन जाण्यासाठी पुन्हा आत आली. आम्ही केवळ कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिले आणि ती संधी साधून "महाराज, आम्ही येतो. राष्ट्रकार्याला लगेच सुरुवात करायची आहे." असे म्हटले. महाराजांच्या डोळ्यांतील प्रखरता कमी झाल्याचा भास झाला. "उत्तम! आता याल तेव्हा पेढे घेऊनच या. या कार्यात आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे. उत्तिष्ठत! जागृत!" शेवटचे दोन शब्द उच्चारताना त्यांच्या डोळ्यात मिष्किल भाव दिसल्याचाही भास झाला. महाराजांनी आम्ही निघताना त्यांची "वैराग्य शतक" आणि "नीती शतक" ही दोन पुस्तके भेट दिली. त्यावर संदेशही लिहून दिला - "वैराग्य पत्करून नीतीने राष्ट्र बलवान करा. किमान चार मुले जन्माला घालून त्यांच्या मातेला, पर्यायाने भारतमातेला उपकृत करा." आता राष्ट्र बलवान होणे केवळ अटळ आहे. आता फक्त आमच्या हिला राष्ट्रप्रेमाची ही संकल्पना पटायला हवी.

Monday, January 5, 2015

पायथाकळसचा सिद्धांत

पायथागोरस हा मूळचा भारतीयच असावा. पायथा आणि गोरस हे दोन्ही जाज्वल्य हिंदु अभिमानाचे शब्द आम्ही ओळखायला कसे चुकलो बरे? आम्ही संस्कृत-मराठी व्याकरण, शब्दव्युत्पत्तीशास्त्रातील थोर अधिकारी आणि आमचे मित्र प्राध्यापक गुंथर म्युल्लर (मूळ राहणार जर्मनी, सध्या वास्तव्य फर्ग्युसन रोड, पुणे) यांच्याकडे गेलो. त्यांच्या मते त्याचे मूळ नाव पायथाकळस असे असावे. कळस या शब्दात "ळ" असल्यामुळे त्याचा मुघलांनी "र" केला. मग पुढे जाऊन दक्षिणेतील लोकांनी उरलेल्या "क" चा "ग" केला. शेवटचा खिळा मरहट्ट देशी ठोकला गेला. मरहट्ट देश हा पूर्वीपासून हट्टी लोकांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे तो यामुळेच. जे काही सांगितले ते जसेच्या तसे न स्वीकारणे हे या देशीच्या लोकांचे वैशिष्ट्य होते. आजही आहे. पण त्याला आता स्वतंत्र बाणा उर्फ स्वयंभू वर्तन असे अभिमानाने म्हटले जाते. पायथागरस हे नाव जेव्हा मरहट्ट देशी आले तेव्हा प्रथम लोकांनी कैच्या कैच नाव म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. पुण्यनगरीतील लोकांनी तर तेही केले नाही. रानडे, गाडगीळ, दांडेकर, पेंडसे अशा नावाची त्यांना सवय. त्यांनी त्याला ज्यू समजून थेट लाल देवळचा रस्ता दाखवला. पुढे मग मराठीत ग चा गो झाला आणि पायथागरसचा पायथागोरस झाला. ही सवयही जुनी. पुढे ध चा मा केल्यामुळे तर पेशवाई घसरणीला लागली. मग कुणाला तरी पायथागोरस हा थोर लेखकु असल्याचा शोध लागला. आजही कुणी उदोउदो केल्याशिवाय लेखक उदयास येत नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम इत्यादि बहुजनप्रिय लेखक जन्माला यायला अजून बराच काळ बाकी होता. परंतु पुण्यनगरीत समीक्षक लोकांची वाण नव्हती. कुणी लेखनच करत नसल्यामुळे समीक्षक लोक उगाच कुठे वेदच वाच, मेघदूतावर टीका लिही, कालिदास हा हवामान खात्यात नोकरीला असल्यामुळे त्याला मेघ वगैरे प्रभृतींचे चांगले ज्ञान होते, त्यात कल्पनाशक्ती वगैरे काही नाही, निरीक्षणतक्त्याचे रूपांतर काव्यात झाले आहे, शाकुंतल हे नाटक यू ग्रेडचे नसून त्याला ए ग्रेड लावली पाहिजे, दुष्यंताचे पात्र कसे उथळ झाले आहे, त्याला टोक कसे आले पाहिजे, भुंग्याचे काम करणारा पार्टी कमळापेक्षा लठ्ठ असल्यामुळे कमलदलभृंग प्रवेशाचा  रसभंग कसा होतो इत्यादी इत्यादी लिहिण्याच्या कामात गुंग होते. सदरहू पायथागरस गृहस्थ हे अभियांत्रिकी क्षेत्रातील असून त्यांनी उत्तरेतील देवळे बांधण्याच्या कामात बहुमूल्य असे योगदान दिले आहे अशी वदंता पसरली. पुण्यात नेहमी वदंता पसरते. आजही पुण्यात खात्रीनं माहीत असलं तरी,"असं ऐकलं बुवा! खरं खोटं देव जाणे!" असं म्हणण्याची पद्धत रूढ आहे. शेवटी पायथागोरस यांनी स्वत: सदाशिव पेठेत जाऊन आपले लिखाण दाखवले. त्यात देऊळ बांधण्यासाठी काय करावे याचे शास्त्रीय विवेचन होते. एखाद्याला भलत्याच गोष्टीसाठी प्रसिद्ध करावयाचे ही खोड तेव्हाही होती. त्यांच्या पुस्तकातील "पायथा म्हणे आधी पाय मग कळस" हे निखालस शास्त्रीय म्हणून लिहिलेले वाक्य अभंग म्हणून सकाळमध्ये छापले गेले. झाले. सकाळमध्ये लिखाण छापून आले म्हणजे सर्व लेखकुंचा दिसु गोडु होतो. पूना बेकरीचे प्याटीस खाता खाता लोकांनी ते वाचले. मग आधी पाया मग कळस हे वचन लोकांत प्रिय झाले. लोकांना वाटले असेल आणखी एखादा विठ्ठलाचा अभंग, हल्ली काय जो येतो तो अभंग करत सुटतो. पण हे वचन सर्वांना उपयोगी पडू लागले. वारकरी पंढरपूरला जात आणि देवळाचा कळस पाहत. म्हणत अरे त्या पायथागोरसने म्हटल्याप्रमाणे आहे हो बाकी. खाली पायथा, वर कळस. कुणालाही सल्ला द्यायचा झाला की वक्ते भाषणातून सर्रास हे वाक्य वापरू लागले. उद्घाटन वगैरे समारंभाच्या ठिकाणी तर अगदी हमखास हे वाक्य ऐकू येऊ लागले. एका वक्त्यांनी तर सार्वजनिक विहिरीसाठी कुदळ मारण्याच्या समारंभाच्या भाषणात हे वाक्य टाकून टाळ्या मिळवल्या. तुम्ही बाकी कळसच केलात हो, ही दादही त्यांना तिथल्या तिथे मिळाली.

तत्पूर्वी पायथागोरसने आपल्या विधानामागे असलेला भौमितिक सिद्धांत सांगायचा निष्फळ प्रयत्न केला होता. पण त्याचा आवाज "जै जै रामक्रिष्ण हारी" च्या आवाजात बुडून गेला. सिद्धांत मागेच राहिला. निराश झालेल्या पायथाकळसने मग पुढे दोरखंड आणून झाडाची फांदी ते झाडाचे खोड असा बांधला. त्याची लांबी मोजून प्रमेय सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते लोकांच्या डोक्यावरून गेल्याने मग चौरसाचे क्षेत्रफळ पद्धती वापरून तेच सिद्ध करायचा प्रयत्न केला. पण त्याकाळी चौरस हे फक्त सकस आहाराचे माप होते आणि क्षेत्रफळ म्हणजे तीर्थस्थानाला जाऊन आल्याचे फळ. त्यामुळे तेही कुणाला कळले नाही. अतिनिराश झालेल्या पायथाकळसने मग त्याच दोरखंडाला स्वत:ला टांगून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांना डोंबाऱ्याचा खेळ पाहत उभे राहण्याची सवय असल्याने सुदैवाने त्याला टांगून घ्यायला मदत करायलाही कुणी गेले नाही. ते बरेच झाले म्हणा. त्यामुळे त्याला स्वत:चे स्वत: टांगूनही घेता आले नाही. ब्रम्हहत्या टळली. काही असो. शास्त्रज्ञ अथवा गणिती म्हणून मान्यता प्राप्त व्हायच्या ऐवजी उत्तम अभंगकार म्हणून तरी प्रसिद्धी मिळाली. लोक सभांना प्रमुख वक्ते म्हणून बोलावू लागले. वसंत व्याख्यानमालेत "मी अनुभवलेला कर्ण" किंवा "पायथ्याचा दगड" अशा विषयांवर भाषणे होऊ लागली. पुढे मग त्याने "शून्यवत मी" हा शून्य या संकल्पनेवर आधारित आत्मचरित्रात्मक ग्रंथ लिहिला. त्याच्या प्रतीही शून्य खपल्या. पण त्यामुळे तत्कालीन साहित्यिक वर्तुळात चर्चा झाली. साहित्य वर्तुळात प्रवेश झाल्यानंतर पायथागोरसला स्वत:ची प्रसिद्धी स्वत: करण्याची गरज उरली नाही. कंपूतील इतर साहित्यिकच ते काम करू लागले. कुणी तरी मग त्याचे "सुलभ काटकोन" नावाचे पुस्तक तडक बीएससी च्या अभ्यासक्रमात लावले. पुढे पायथागोरसचा त्रिकोण एवढा पॉप्युलर झाला की तत्कालीन भारत सरकारने कुटुंबनियोजनासाठीही त्याचा उपयोग केला. त्रिकोण पॉप्युलर झाला पण योजना काही पॉप्युलर झाली नाही. कितीही प्रयत्न केला तरी त्रिकोणाचा चौकोन, प्रसंगी पंचकोन षट्कोन होऊ लागला आणि ती योजना बंद करावी लागली.  (गरजूंनी आपल्या पूर्वीच्या पिढ्या तपासाव्यात. नात्यात किमान चार काका आणि दोन पाच आत्या नक्की आढळतील)

उदरनिर्वाहाची चिंता टळली पण मूळचा गणिती पिंड काही स्वस्थ बसू देईना. आढ्याकडे पहात बसून राहू लागले. साहित्यिक वर्तुळातील बैठकी नीरस वाटू लागल्या. बऱ्याच वेळा अशा बैठकीत हातात गिलास घेऊन नुसतेच बसून राहत. बाकीच्यांचे चार चार पेग झाले तरी यांचा एक संपलेला नसे. अशाच एका बैठकीत एक डॉ. असलेल्या प्रतिष्ठित साहित्यिक मित्राच्या ते लक्षात आले. स्वत: उन्मनी अवस्थेत असल्यामुळे साहजिकच त्यांना एकूणच विश्वाबद्दल सहानुभूती वाटू लागलेली होती. इथे तर प्रश्न मित्र पायथागोरसचा. "मित्रा, कसली चिंता लागून राहिली आहे तुला?" त्यांनी आपल्या ओल्ड मंकसारख्या स्मूथ आवाजात विचारले. "अरे चिंता करतो काटकोनाची!" असे पायथागोरसने खरे ते सांगितले. "इये स्वयंभू क्षेत्री सर्वच स्वयंभू. आमचे कोण ऐकणार?" हे ऐकल्यावर साहित्यिक गंभीर झाले. "होय मित्रा. ते मात्र खरे. वास्तविक मला खरीखुरी पिठाची गिरणी काढायची होती. पण प्रत्यक्षात विद्यापीठात विद्येचे पीठ दळतो आहे. नियमसुद्धा पिठाच्या गिरणीसारखे. केमिस्ट्रीवर फिजिक्सचे पीठ लावता येत नाही. तुला एक सल्ला देतो. तू विलायतेला जा. तेथे तुझ्या सिद्धांताचे गणित जमेल. तिथले गणित जमले की इथले समीकरण बदलेल." हा सल्ला मानून पायथागोरसने दुसऱ्याच दिवशी जहाजाचे तिकीट काढले. त्याला निरोपसमारंभ झाला. "आतला वशिला लागला", "अहो याला सहा महिन्यात तिथून हाकलतील हो!", "अहो कसली विलायत ती? भ्रष्टाकार आहे सगळा तिथे. म्हणजे असं आमच्या साडूंच्या ऑफिसातील कलीगचा मेव्हणा जाऊन आला तो सांगत होता. पुरुषाच्या बरोबरीने बायका काम करतात म्हणे तिथे. शिव शिव!", "त्यात काय एवढं? मनात आणलं असतं तर आम्ही पन्नास वेळा गेलो असतो. पण मातृभूमि म्हणजे मातृभूमि! स्वर्गादपि का काय म्हणतात ना त्यातली!" इत्यादी चर्चा झाल्या. अशा प्रकारे पूर्ण भारतीय असा सिद्धांत विलायतेला गेला. विलायतेने खूप प्रगती केली. विमाने आणली, रेल्वे आणल्या, अग्निबाण निर्माण केले. सिद्धांत कुणीही मांडले असोत, त्याचा वापर करून उपयोगी साधने बनवली. पण तो पायथागोरस मूळचा आमचाच हो खरा! केवळ साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असल्यामुळे आम्ही ऐषोआरामाची साधने बनवली नाहीत. पण मनात आणलं तर आम्हाला काही अशक्य नाही. फक्त मनात आणणं अशक्य वाटतं. कितीही कोन झाले तरी आम्ही आपले लंबकर्ण राहू हा पायथाकळसचा फारसा प्रचलित नसलेला सिद्धांत मात्र त्रिकालाबाधित असेल असे वाटते.

Thursday, January 1, 2015

तंतरलेले दिवस

स्थळ- पूर्ण प्राथमिक शाळा, शिवाजी पार्क, दादर
वेळ - भीषण, निकाल लागल्यानंतरची
पात्रे - हेडमास्तरांच्या प्रमुख भूमिकेत सोता हेडमास्तर, विद्यार्थी - सध्या शाळेत असलेले, दुसऱ्या शाळेतून ट्रान्स्फर घेतलेले, काही मुर्दाडपणे टिकलेले तर काही नाईलाज म्हणून अडकलेले.

हेडमास्तर : पोरानहो, आपल्या शाळेची लई शाळा होऊन ऱ्हायली आहे. हे आमाला आजाबात पसंद न्हाई. आत्ताच्या परीक्षेत आपला निक्काल पन्नास टक्केबी लागला न्हाई. णवीन शासकीय नियमाप्रमाणे पन्नास टक्के निकाल लागल्याशिवाय अनुदान भेटणार न्हाई. अनुदान न्हाई म्हंजे आमचा पगार बोंबलला का? वास्तविक तुमचा शाळेची माण्यता काढून का घेन्यात येऊ नये असा जी आर शाळेला भेटला आहे. त्यामुळे आमच्या स्वाभिमाणाला डायरेक ढका पोचला आहे. जरी आम्ही "तो जीआर तुमच्या जीत घाला" आसा उलट रिप्लाय पाटवला आसला तरी आपला प्रॉब्लेम आमी आमच्या धेणात घेटला आहे. म्हनून आमी आता आमची फोटूग्राफीची हौस बाजूला ठीऊन शाळेच्या हितासाठी सोताला झोकून देणार हाहोत.
विद्यार्थी १ - मास्तर, आमाला पन झोकायला आवडेल. माजा बा रोज झोकून येतो आनि लय भारीच्या श्या देतो. शुद्धीत आसला की माय बोलून बोलून त्याचं भुस्काट पाडती, पन झोकून आला की गुमान जेवायला देती. 
विद्यार्थी २ - मास्तर, आमचा बा कदी कदी झोकांड्या खात येतो तवा माय लई धुरळा उठवती. म्हंती आला तुमचा बा झोकून. हितं दातावर मारायला आमास्नी कवडी न्हाई आन ह्यो म्हाराज येक मुसुम्बी लावली की छत्रपती झाल्यागत तरंगत येतोय. मी पन मोठ्ठा झालो की छत्रपती होयाचं ठरवलं हाये. निदान शाखाप्रमुख तरी नक्कीच होणार है. 
विद्यार्थी ३ - अरं जा रं! मोठा व्हतोय शाखापरमुख. धा वर्स माजा बा सैनिक म्हनून ऱ्हायला. समद्या चा टपऱ्या, भेळ वडापाव, भाजीपाला गाड्याच्या वसुलीचं काम हुतं त्याकडं. आन ह्ये फक्त दिवसाचं काम. रातच्याला कुटं डूटी लागत व्हती ते आमच्या मायलाबी ठावं नसायचं. इक्ती वर्सं काम ठेपशीर क्येल्यावर कुटं आता शीनीयर सैणिक झाला हाये. हाताखाली चार ज्युनिअर सैणिक आले हायेत. आता फक्त स्कूटरवर जाऊन नाक्यावर हुबा ऱ्हातो. हाताखालचे सैनिक वसुली आणून देतात. पूर्वी ती शिवाजीपार्कच्या मेण ऑफिसमदी जाऊन देयाला लागत हुती आता बांद्रयापत्तूर जावं लागतंया.
विद्यार्थी २ (हळूच) - आपलं मास्तर तरी कुटं शिकून काम करून हेडमास्तर झालंय?
हेडमास्तर - चूप! हेच आमाला बदलायचं हाहे. तुमाला झोकून देन्याचा येकच आर्थ म्हाईत असावा हा आमच्या शाळेचा पराभव आहे आसं मानणाऱ्यापैकी मी एक हाहे. आपल्या शाळेला धापाच रुपायांची वसुली करणारे सैणिक निर्मान करायचे न्हाईत. आपलं ध्येय कसं उच आसलं पायजे. आपली नदर नाक्यागल्ली परेंत ठीवणारे नकोत, पार दिल्लीपरेंत आपले सैणिक जायाला हवेत. आपल्या शाळेनं आसे तीन सैणिक आदुगरच दिल्याले हैत. आसं आसताना आपला निक्काल आसा कसा लागतो? तीन सैणिक हुच्चपदावर जावेत आन बाकीचे झेडपीत पट्टेवाले व्हावेत?
विद्यार्थी २ - गुर्जी, हुच्च म्हंजे काय? माझी माय मला न्हेमी हुच्च हुडगा म्हणती.
विद्यार्थी १ (कुजबुजत) - ए गप ए. आधीच ढापण कावली हाये. न्हाई ते प्रश्न इचारू नगंस. उगाच नाऱ्या हुईल तुजा.
हुशार विद्यार्थी - सर, माझी एक सूचना आहे. मी दर वर्षी निकालानंतर सूचना करतो. त्यावर कधीच गांभीर्याने विचार होत नाही.
हे. मा. - बोला, तुम्ही आमच्या शाळेचे सिनियर विद्यार्थी. आधीचे हेडमास्तर रिटायर झाले तरी तुम्ही अजून इथंच. बोला.
हु. वि. - मी मधून मधून इतर शाळांना भेट देऊन येतो. माझ्या असं लक्षात आलं आहे की, आपल्या शाळेत आणि इतर शाळेत फारसा काहीच फरक नाही. फक्त एकच किरकोळ उणीव जाणवली. आपल्या शाळेत तुम्ही एकच गुर्जी. तुम्हीच हेडमास्तर. तुम्हीच शिपाई. तुम्ही नेहमी बिझी असता, मग तास घ्यायला कुणीच नाही. तेव्हा एकांदा जास्तीचा शिक्षक नेमावा.
हे. मा. (काही क्षण त्याच्याकडे पाहत राहतात)- कदी कदी आसं वाटतं तुलाच मास्तर म्हून नेमावा.  कदम, राऊत, जरा शिका. कुठं गेले?
हु. वि. -  कदम चौपाटीवर गेला आहे. ओरडून ओरडून भाषणाची प्रॅक्टिस करायला चौपाटी बरी पडते त्याला. भाषणात १९९३ च्या दंगलीचा उल्लेख करायचा असल्यामुळे चौपाटीच चांगली. सक्काळी धावणारे कानाला हेडफोन लावून धावत असतात. कुणाच्या अध्यात न मध्यात. बरं पडतं. आणि मास्तर, राऊत हजर नाही. तो वर्गात कधीच बसत नाही. तो तुम्ही नसताना तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या खुर्चीवर बसतो. आणि समोर टेबलावर तंगड्या ठेवतो. कितीदा सांगितलं तरी ऐकत नाही. तुमची परमिशन आहे म्हणतो.
हे. मा. - असू द्या असू द्या. स्पेशल कोट्यातला इद्यार्थी हाये तो. परीक्षेला बसवायचा इद्यार्थी न्हाई. मुद्धा लक्षात घ्या. पन्नास टक्केपेक्षा कमी निकाल. त्यातले पाच जणांना काठावर स्कॉलरशिप भेटली. बाकीचे नुसतेच पास. मार्केट बदलत चाललं. दिल्ली अभ्यासकर्म लागला. आता वसुलीचे जॉब कमी होनार. आपल्या शाळेचा उज्वळ इतिहास आसलेला येकमेव इषय म्हंजे कुस्ती, हानामारी. तो क्लास बंद आता करावा लागनार. पूर्वी हानामारीचे पाच टक्के जास्त भेटत होते. दिल्ली प्याटर्णमदी ते आता बसनार न्हाईत. शिवाय ते शिकवणाऱ्या मास्तरांनी राजीनामा देऊन सोताचीच शाळा काडली. ती बुडीत ग्येली ती गोष्ट येगळी. आन म्हनूनच मी आता येक घोष्णा करनार हाये. जे विध्यार्थी हुबे आसतील त्यांनी खाली बसून घ्यावं. ज्यांच्या चड्ड्या नाडीच्या हायेत त्यांणी दोनी हातानी चड्डी धरुण ठेवावी. व्हय, घोष्णाच तशी हाये.
हु.वि. - गुर्जी, धोतारवाल्यांनी काय करायचं?
हे. मा. - कासोटा घट्ट धरून ठेवायचा.
विद्यार्थी २ - म्हंजे तुमी धरुण ठेवल्यालं हाय तसं?
हे. मा. (दुर्लक्ष करत) - पोरानहो, आजपासून मी तुमच्या परत्येकाचं प्रगतीपुस्तक ठेवनार हाये.

(पाच मिनिटं प्रचंड गोंधळ, आरडाओरडा)

हे. मा. - आरे आरे गपा! गपा म्हन्तो ना! तर हां! प्रगतीपुस्तक! (खूष होत) खूप इचार क्येला. घरी इचार करता येत न्हवता म्हणून मग महाबळेश्वरला गेलो. तिथली थंड हवा डोक्याला लागल्यावर मंग आसल्या कल्पणेच्या आयडिया सुचायला लागल्या. आमचं युवराज म्हंजे हेडमास्तर-इन-ट्रेनिंग हायेत. त्येंना बोललो, युवराज, हे आसं डायरेक्षण करावं लागतं. युवराज म्हणाले, फादर, तुम्ही फोटो बिटो कसं काय काढता हो? मंग आमाला आमचं शालेय जीवण आठवलं. धावीचं प्रगतीपुस्तक पघून वडील मनात ढासळले होते. त्या टायमाला हॉटशॉटचा क्यामेरा लय फेमस होता. त्यानं दिसेल त्याचे फोटू काडत फिरत होतो. वडील म्हनले, बारं, फोटूग्राफी तर फोटूग्राफी. आन येकदम ट्यूबच पेटली. त्या प्रगतीपुस्तकानं वडलांना येकदम आमचा वकूब कळला तर आमाला पण तुमचा कळंलच की. ठरलं थितंच मग, आपल्या शाळेतबी ह्यो कार्यक्रम लावायचा. प्रत्येक इद्यार्थ्याचं प्रगतीपुस्तक ठेवायचं.

(पुन्हा पाच मिनिटं गोंधळ)

विद्यार्थी १ - प्रगतीपुस्तकात काय लिवणार मास्तर?
विद्यार्थी २ - आमाला प्रगतीपुस्तक वाचायला लागनार का? जोडाक्षरं वाचनं अजून सुदारलेलं न्हाई. म्हंजे आमी आदीच नापास हुणार का?
विद्यार्थी ३ - आजी सैणिकाचा पाल्य म्हनून मला सवलत घावंल का?
विद्यार्थी १,२ आणि ३ (एकसुरात) - आनि आमच्या सोताच्या पर्सणल प्रगतीचं आमी काय करावं?
विद्यार्थी ३ - ही प्रगतीपुस्तक बिस्तक भांजगड आसेल तर मी शाळा सोडनार.
हु. वि. - मास्तर, एक प्रश्न विचारायचा आहे.
हे. मा. - तरीच म्हनलं तुमी कसं काय बोलला न्हाई आजून? हं बोला! काय शंका हाये?
हु.वि. - प्रगतीपुस्तकात कशाची प्रगती लिहिणार? आम्हाला विषयसुद्धा माहीत नाहीत.
हे. मा. - शाबास! ही शंका आल्याबद्दल बक्शिश म्हनून तुला पाच मार्क जास्त भेटतील. पन आमी इषय देनार हाहोत. शाळेच्या इकासाची ब्ल्यू प्रिंट छापायला धाडली आहे. ती आली की लगेच इद्यार्थ्यांनी कामाला लागायचं.
हु. वि. - अजून एक प्रश्न.
हे. मा. (कपाळावर आठ्या घालत) - इचार. पन आता या शंकेबद्दल मार्क बिर्क काय भेटनार न्हाईत.
हु. वि. - तुमचं पण प्रगतीपुस्तक ठेवणार का? ठेवलं तर ते तपासायला दिल्लीला पाठवणार का?
हे. मा. (काही क्षण स्तब्ध राहून) - तुला आदीच्या शंकेबद्दल दिलेले पाच मार्क कट!