Friday, October 31, 2014

मागे वळून पाहताना

जवळपास तीस वर्षांनी थोडासा इतिहास घडतो आहे. मित्रवर्य श्रीहरी दाते याचा माझा ऋणानुबंध शाळेपासूनचा. मनसोक्त हसणे, टिंगलटवाळी, भटकंती, सायकलवर रेलून घरामोरच तासंतास गप्पा मारणे या सर्वांतून त्याने मला अभाविपमध्ये कधी आणले कळले नाही. तीस वर्षांपूर्वी राष्ट्रभक्तीने भारलेली काही तरुण मंडळी सांगलीच्या टिळक स्मारक मंदिरात जमायची. त्यावेळी टिळक स्मारक मंदिर ही नुसती इमारत नव्हती, बापूराव गोऱ्यांच्या कडक शिस्तीत चालणारी, वागणारी ती एक चळवळ होती. अभाविपचे कार्यकर्ते असोत वा शाखेचे, बापूरावांच्या शिस्तीतून सुटका नसे. दररोज संध्याकाळी वॉर्डातून डॉक्टरांची फेरी असावी तशी ठीक पाच वाजता बापूरावांची फेरी व्हायची. जिन्यावर त्यांची पावले वाजली की आम्ही कार्यकर्ते गुणी बाळे असल्यासारखे सावरून मांडी घालून बसत असू. मग बापूरावांची नजर कार्यालयाचा इंचनइंच तपासे. "अरे? हा खिळा काल इथं भिंतीवर नव्हता, आज कसा आला?" इथवर तपासणी चाले. बहुतेक सर्व विद्यार्थी दशेतील, काही जण "पूर्ण वेळ", तर काही जण "प्रवासावर" असलेले "पूर्ण वेळ" असायचे. कधी सदाशिवराव देवधर प्रवासावर असायचे ते कार्यालयात यायचे.  मृदूभाषी. अत्यंत नम्रपणे आमचे बोलणे ऐकायचे, नेमके शब्द वापरून बोलायचे. कधी कधी चंद्रकांतदादा यायचे. तेही अगदी शांतपणे आमचे बोलणे ऐकायचे. कधीकधी त्या चष्म्यामागे मिष्किलपणा डोकावतो आहे असे वाटायचे, पण तसे काही नसायचे. सगळे सतरा-अठरा वयोगटातील माझ्यासारखे तरुण त्यांच्याभोवती जमलेले असायचे. सदस्यता अभियान, संपर्क, महाविद्यालय निवडणुका, बौद्धिक, अभ्यासवर्ग, परिवार, राष्ट्रीय पुनर्निर्माण असे अनेक शब्द कानावर पडत राहायचे. उमेदीची वर्षे अर्पण केलेले वासंती लोंढे, धडाडीचा प्रसाद जोग, स्वच्छ सरळ विचारांचा प्रमोद कुलकर्णी, सौम्य पण ठामपणे आपले विचार मांडणारी संगीता गोडबोले असे पूर्णवेळ कार्यकर्ते आम्हाला लाभले होते. पूर्णवेळ नसून पूर्णवेळ असलेले बाळासाहेब गायकवाड सर हे तर माझे दैवत होते. त्यांच्यासारखा निर्मल आणि ममत्व असलेला कार्यकर्ता मी पाहिला नाही. समस्त कार्यकर्त्यांची चिंता डोक्यावर घेऊन ते वावरत. पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे तर ते अदृश्य पालकच होते. पदरचा पैसा खर्च करून त्यांची समाजसेवा चालू असे. कार्यक्रमांची आखणी करणं, त्यांच्या प्रचाराचे निरनिराळे मार्ग शोधणं,  युवाशक्तीशी संपर्क वाढवण्याच्या कल्पना सुचवणं, हे तर चालायचंच, पण हे आपण कशासाठी करतो आहोत याचं भान ठेवायचं आणि आमच्यासारख्यांना ते भान आणून द्यायचं काम ही "पूर्णवेळ" मंडळी करायची. माझ्यासारख्याला राहून राहून आश्चर्यजन्य कुतूहल वाटायचं, ज्या मध्यमवर्गीय घरात "आपण श्रीमंत नाही, शिक्षण हेच ध्येय ठेवा, करिअरचं भान ठेवा" असे शब्द कानावर सतत पडत असतात, अशा घरांतून ही मंडळी पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कशी बाहेर पडली? ज्या कामाचा मोबदला नाही, कुठल्या गावात पाठवले जाईल त्याची कल्पना नाही, जेवणाची खात्री नाही, झोपण्यासाठी सोय होईल याची शाश्वती नाही या कशाचाच जराही न विचार करता बाहेर पडणं हे केवळ राष्ट्रप्रेमाचा ध्यास असल्याशिवाय होत नाही. राष्ट्रप्रेम, देशप्रेम, देशबांधव यासारखे शब्द गुळगुळीत वाटतात, पण हे असे कार्यकर्ते पाहिले की वाटतं असे शब्द नुसते शक्य नाहीत तर ते प्रत्यक्षात आले आहेत. संघानं ही वृत्ती निर्माण केली, परिवारात पसरवली. आज कोणी संघाला काही म्हणो, निरलस वृत्तीने काम करणारी माणसे निदान भारतात तरी कुठल्याही संस्थेत नाहीत.

याच काळात विनोद तावडेला पाहिलं. मला वाटतं तो मुंबईत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करत असावा. सांगलीला त्याचं येणंजाणं असायचं. रांगडा, थोडासा पैलवान बांधणीचाच होता तो. त्यावेळी त्याच्या विचाराने, बोलण्याने लक्षात आलं होतं, की हे काम वेगळं आहे. वैचारिकता होतीच पण त्यापेक्षा दंडशक्ती त्यात जास्त जाणवायची. दे धडक, मुसंडी मारून किल्ला सर करू अशा प्रकारचा जोश त्याच्या बोलण्यातून जाणवायचा. मी त्या वेळी काही काळापुरता मी थोडासा नैराश्यवादी विचारसरणीचा झालो होतो. अर्धवट वाचन, अर्धवट चिंतन, आणि त्याहूनही विनामार्गदर्शनाचे चिंतन यातून मी स्वत:च एक स्वत:चा "वाद" बनवला होता. मला वाटतं मी कोकणात घरी प्रवास करणार होतो, त्याचवेळी विनोदही कणकवलीला निघाला होता. चार तास आमची यष्टी खाचखळग्यातून मंथन करत चालली होती आणि मी विनोदशी कर्मयोग या विषयावर वाद घालत होतो. वरून खडबडीत, रांगड्या दिसणाऱ्या या इसमात एवढे तत्वज्ञान भरले असेल, एवढे वाचन असेल याची मला कल्पना नव्हती. माझ्या "वितंड" वादाचे त्याने शांतपणे खंडन चालवले होते. तो कणकवलीला उतरून गेला तेव्हा माझ्यातील नैराश्यवाद संपून एक उत्साह निर्माण झाला होता. विनोद आज मंत्री झाला असेल, पण त्याची प्रगल्भता, सामान्य कार्यकर्त्याचं ऐकून घेणं, एवढंच नव्हे तर त्याला उत्साहित करणं हे तेव्हासुद्धा त्याच्याकडे होतं.  त्यानंतर रात्ररात्र जागून काहीना काही काम चाललेलं असायचं, पण कधी त्याचं ओझं वाटलं नाही. अगदी खळ लावून पोस्टर भिंतीला चिकटवण्याचं काम असो वा कोपरा सभे मध्ये विद्यार्थ्यांच्या समोर बोलणं असो तेवढयाच आत्मीयतेनं केलं. अर्थात एकट्या विनोदने माझ्यातला कार्यकर्ता घडवला असं नव्हे तर त्यावेळचे सर्व कार्यकर्ते कमीअधिक फरकाने तसेच होते. एका माणसाने संघकार्य होत नाही, सर्वांनी मिळून होते.

आज मागं वळून बघताना वाटतं त्या काळापासून आजवर केवळ पायाभरणी चालली होती. एक एक मजबूत दगड बसवला गेलाय. काळाच्या उदरात गेलेली आमची दैवतं, ज्यांनी आम्हाला त्यांच्या साधेपणानं, सच्चेपणानं अदृश्य अशा मनगट्या दिल्या त्यांचं महत्व आता लक्षात येतंय. ती दैवतं आमच्या पायाचे दगड झाली आहेत. त्यांच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेली विनोद आणि चंद्रकांतदादा यांच्यासारखी माणसं जे शिकलो त्याचा वापर करण्यासाठी सिद्ध झाली आहेत. पुनर्निर्माण, एकात्मता हे शब्द नुसते अभ्यासवर्गात ऐकले, पण आता ते प्रत्यक्षात येण्याचे दिवस सुरू झाले आहेत. राजकारण हे दलदल, त्यात दगड टाकणे म्हणजे स्वत:वर चिखल उडवून घेणे हा समज दूर होण्याची ही सुरुवात आहे. मोदींच्या रूपाने देशात सोनेरी किरणांचे झुंजूमुंजू झाले होतेच आता महाराष्ट्राची काळरात्र संपून उत्कर्षाचा उष:काल सुरू होतो आहे. जयतु! जयतु!

Wednesday, October 29, 2014

स्वाभिमान आणि सन्मान

त्यांना भले केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र मिळो, आम्हाला मात्र केंद्रात सुपारी आणि राज्यात नारळ मिळाल्याची भावना बळावत चालली आहे. पण आजून धीर सोडलेला नाही. सतत काहीतरी धरून ठेवणे हे आमच्या रक्तात आहे. तलवार उचलताना धोतराची कनवटी किंवा सोगा धरून ठेवायचा आणि धोतर सावरताना तलवारीचं म्यान धरून ठेवायचं हे आमच्या उण्यापुऱ्या बाविशीत आणि नऊदहा महिन्यांच्या भरघोस राजकीय अनुभवावरून शिकलो आहे. जेव्हा आमच्या डाडूने (म्हंजे डॅड हो माझे! मराठीत बापाला डॅड म्हणतात असं सेंट झेवियरमध्ये शिकवलं होतं) मला "जा, कमळाबाईला नडून ये!" असं सांगितलं तेव्हा कृष्णानं पांडवांच्या वतीनं शिष्टाई केली अगदी तस्सं  फीलिंग आलं होतं. बरोबर पेंद्या होताच. मीही कमालीचा बाणेदारपणा दाखवत "जागाच काय, सुईच्या अग्रावर राहील एवढीसुद्धा जमीन देणार नाही. अगदी जिथे आम्ही पारंपारिकरीत्या पडत आलो तीसुद्धा जागा मिळणार नाही. आम्हाला आमच्या परंपरांचा अभिमान आहे. स्वाभिमानाला धक्का लागेल असं आम्ही काही मान्य करणार नाही!" असं सांगून आलो होतो. फुगलेली छाती थोडी खाली आल्यावर विचित्र वाटलं. तेवढ्यात "रें, हो डायलॉक दुर्योधनाचो नाय?" असा सानुनासिक प्रश्न आमच्या कोकणातील एका कार्यकर्त्याने विचारलाच. त्याला "तुझा नारू करू काय रे?" असं विचारून झापलं. "शंका गाळा, नारू टाळा" ही नवीन घोषणा करायला हवी. डाडूला विचारतो आजच. वास्तविक मी डाडूला म्हणालो होतो, "फादर, तुम्ही मी जसा अभ्यास करतो तसं करा. जे आपल्याला जन्मात कळणार नाहीत ते टॉपिक मी सरळ ऑप्शनलाच टाकतो. उरलेल्यापैकी साठ टक्के हिट, चाळीस टक्के मिस असं धरतो. मला बरोबर पन्नास मार्क पडतात. आपण साधारण शंभर जागा लढवू." पण ऐकलं तर डाडू कसले. आत्मविश्वास गेला खड्डयात, स्वाभिमान महत्वाचा असं त्यांचं म्हणणं होतं. पण नारूचा झकास मोरू झाला बाकी. स्वाभिमान काय? ही:ही:ही:! वर्ल्ड कप मध्ये भारत हरला तरी चालतो, पण पापस्तान हरलं की सर्वात जास्त आनंद होतो तसं झालं आहे.

या सगळ्यात माझं इतिहासाचं ज्ञान मात्र उलटंपालटं होऊन बसलं आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडीचोळी देऊन रवानगी केली की शाहिस्तेखानाची? अफजलखानाचा कोथळा काढला की जिऊ महाल्याचा? दिल्लीहून भेटायला आले होते ते जयसिंग मिर्झा की दिया मिर्झा? आग्र्याहून सुटका कुणाची झाली होती? औरंगझेबाची की संभाजीराजांची? आग्र्याहून सुटका करून घेताना महाराज स्वत: कुठे होते? आमच्या स्वत:च्या डाडूंची दिल्लीहून सुटका कधी होणार? नजरकैदेत आम्ही आहोत की औरंगझेब? मुळात आम्ही राजे तरी आहोत की नाही? दिल्लीहून सुटका करून घेतली तर आम्ही पुन्हा दिल्लीकडे का धावतो आहोत? असे अनेक प्रश्न पडले आहेत. दस हजारी सरदारावरून पंच हजारी सरदार झालो. शिलेदारी गेली, बुडाखालचा घोडा गेला. बाजारबुणगे म्हणून पायदळात आलो. पूर्वी तलवार बाळगून होतो तिथे आता मुदपकातील भांडी वाहणे आले. पण म्हणून आम्ही आमचा सन्मान सोडणार नाही. जरूर मुदपाकातील खरकटी भांडी वाहायला सांगा, पण ज्यात मोतीचुराचे लाडू केले होते तीच कढई घासू, अळवाच्या फतफत्याचे भांडे मुळीच घासणार नाही. असा सांगावा घेऊन आमचे दोन विश्वासू सरदार दिल्लीस गेले होते. त्यांना तीन तास ताटकळत उभे राहायला लागले, पण "बघू" असा श्वास रोखणारे पण विश्वास वाढवणारे खात्रीलायक उत्तर घेऊनच ते परत आले. खरं तर आमच्या डाडूंना अळवाचे फतफते आवडते. त्यात असलेला पाचक मुळा, पित्तवर्धक शेंगदाणे आणि पोट साफ करणारा अळू हे सर्व त्यांच्या प्रकृतीला साजेसेच. पण अळूने घसा खवखवतो म्हणून खात नाहीत. घसा खवखवला की मग खूप ओरडत बसतात.

अजूनही दिल्लीहून उत्तर आलेले नाही. आमच्या सहनशीलतेच अंत पाहू नका म्हणावे. आमचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. घासण्यासाठी का होईना, मोतीचुराची कढई नसेल तर निदान साखरभाताची परात तरी हवी. गेलाबाजार मसालेभाताची तरी हवीच हवी. हो. मला वाटते ते सन्मानाचे होईल. या सैनिकाला आव्हान देऊ नका. आमचा अख्खा जन्म नाक्यावरच्या हॉटेल सन्मानमध्ये एक चाय पानी कम, एक गिलास पानी आणि माचिस या ऑर्डरवर गेला. ते सन्मान पण आपण अजून सोडलं नाही. आजही आपण तिथे गेलो की न सांगता पाणी आणि माचिस टेबलावर येते. आपण बिल न देता बाहेर पडलो तरी कुणी थांबवत नाही. "लिहून ठेव" असं आधीच फर्मावलेलं आहे. तर याला म्हणतात इज्जत. आत्ता काही नाही दिलंत तरी हरकत नाही पण सन्मानाने "लिहून" तरी ठेवा वहीत. जै महाराष्ट्र!

Tuesday, October 21, 2014

डरकाळी!

आमच्या जिंदगीची कहाणी येका शब्दात सांगायची झाली तर तो शब्द म्हंजे "स्वाभिमान!".  कद्दी कद्दी कुणासमोर झुकू नये असे बाळकडू आम्हांस ल्हानपणापासूनच मिळालेले. तोंडावर मुका मिळाला नाही तरी चालेल पण ढुंगणावर टोला पडता कामा नये अशी आम्हाला घरातून ताकीद होती. शाळेत बऱ्याच वेळा ओणवे उभे राहायची शिक्षा मिळायची पण आम्ही न्हेमी भिंतीकडे पृष्ठभाग ठेवूनच झुकायचो.  बऱ्याच वेळेला भिंतीचा चुना चड्डीला लागून ती पांढरी व्हायची, पण ती पिवळी झाली नाही याचा रास्त अभिमान वाटायचा. डरकाळी फोडणारा वाघ झाला नाहीस तरी हरकत नाही पण कुणाच्या ताटाखालचे मांजर होऊ नकोस असं आमचे पिताश्री म्हणायचे. स्वाभिमानाच्या बरोबर असावी लागते ती डरकाळी. मी एकदा त्यांना वाघासारखी डरकाळी फोडून दाखवली होती. ते क्षणभर स्तब्ध झाले होते आणि त्यानंतर त्यांनी ते विधान केले होते. वाघासारखी डरकाळी फोडायला डायरेक्ट पोटातून ताकद लावावी लागते याचा अनुभव मी घेतला होता. त्याचकाळी वर्गात न्यूटनचा तिसरा नियम शिकवत होते तोही या दुर्दैवी प्रात्यक्षिकातून अचानक समजला. मग मी स्वत: गपचूप चड्डी धुवून गच्चीवर वाळत घातली होती आणि तिथेच वाळत टाकलेला पंचा कमरेला गुंडाळून तापलेल्या सिमेंटवर शेक घेत बसून राहिलो होतो. पुढे मग काही वर्षे वाघाच्या पिंजऱ्यासमोर बसवून त्याची डरकाळी कशी, दिसणे कसे, चालणे कसे हे पाहण्याची तपश्चर्या करण्याची आज्ञा मिळाली. आमच्या घरात वाघाचा मोठा फोटो होता. तो मी न्हेमी पाहत असे, त्यामुळे वाघाची भीती वाटायचे कारण नाही असं मी स्वत:ला समजावत होतो. आता मुंबईत खरा वाघ कुठून आणणार? आम्ही मग भायखळ्याला राणीच्या बागेत गेलो. तिथे वाघ होता. पण तो आमच्यापेक्षा स्वाभिमानी निघाला. आम्ही दोन तास त्याला डरकाळी फोडायला लावण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले. सुरुवातीची काही मिनिटे त्याने कुतूहलाने आमच्याकडे पाहिले. आम्ही लांबून वेडीवाकडी तोंडे करणे, आवाज करणे, त्याला अपशब्द बोलणे इत्यादी चेष्टा केल्या. पण तो अमराठी वाघ असावा. आमच्या अस्सल मराठी शिव्या त्याला कळल्या नसाव्यात. त्याने एक भली मोठी जांभई दिली आणि आपले पुढचे पंजे चाटण्याचे महत्वाचे काम चालू ठेवले. मोठे झालो की उत्तरेतील पट्टेरी वाघ नकोत, आमच्या सह्याद्रितीलच हवेत अशी मागणी करायची याची मानसिक नोंद करून ठेवली. चूप बसणारा कसला आलाय वाघ? वाघाला कसं सारख्या डरकाळ्या फोडता आल्या पायजेत. दिवसा, रात्री कधीही तोंड तयार पायजे. शिमग्यातल्या वाघासारखं नको.

हळूहळू आमच्यातील वाघ जागा होतोय याची जाणीव आम्हाला वयाच्या पंधराव्या वर्षीच आली. इयत्ता तिसरीपासून आमच्याबरोबर एकत्र कॉपी, आपलं, अभ्यास करणारा आमचा परम मित्र व्यंकू, गुपचूप परस्पर २१ अपेक्षित आणून वाचतो आहे याची खबर आम्हांस लागली. आमच्यातील वाघ गप्प कसा बसणार? स्वाभिमान फुरफुरू लागला, चष्मा रागाने वाफाळला. चष्मा वाफाळला की आम्हाला पुढचे काही दिसत नाही. आणि चष्मा काढला की पाच फुटाच्या पलीकडले दिसत नाही. "व्यंक्या, समजतोस काय तू स्वत:ला?" अशी आम्ही डरकाळी फोडली. आवाज थोडासा चिरकला, पण हरकत नाही, भावना नक्कीच पोचल्या. सकाळी पाच वाजता उठून डरकाळीचा रियाज करायला हवा असे मनाशी ठरवले. आमचे चुलतबंधू पलीकडच्या खोलीत रियाज करत असायचे. पण त्यांच्या डरकाळ्या नसायच्या. ते खर्जात गुरगुरण्याचा अभ्यास करायचे. अधूनमधून लाकडावर काहीतरी खरवडल्याचाही आवाज यायचा. बहुधा आवाजाबरोबर नख्यांना धार लावायचा सराव करत असावेत. करूदे. आमची डरकाळी उद्या ऐकू आली की पाचावर धारण बसेल त्याची. मग दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजता उठून आम्ही डरकाळीचा तीव्र स्वर लावला तर आमचा कुत्रा बाहेर दिवाणखान्यात भुंकू लागला. आमच्याकडे पाच मांजरे आहेत. ती मानेवरील केस पिंजारून पाठीची कमान करून आमच्या अंगावर चाल करून येऊ लागली. पाळीव प्राणी ते. त्यांनी आयुष्यात कधी खरा वाघ बघितलेला नसल्याने त्याची भीती वाटत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही माफ केले. पण मातोश्री, पिताश्री दोघेही खोलीत आले आणि आमची हजेरी घेऊ लागले. मांसाहेबांना आमच्या प्रकृतीची फार चिंता. त्यामुळे आम्ही जेवल्यानंतर एक ढेकर जरी जास्त दिली तर दोन हवाबाण हरडे हातावर ठेवत असत. आमच्या अवेळी रियाजाच्या आवाजामुळे ते दोघे घाबरून गेले होते. त्यांना मी रियाजाचे कारण सांगितले. त्यांच्या नजरेत कौतुक होते की कीव ते समजले नाही. "ठीक आहे, करा रियाज. आवाज फुटायचे वयच आहे तुमचे. सध्या रेकण्यासारखे वाटत असले तरी हळूहळू होईल तयार. आपला बाणा आणि स्वाभिमान त्यातून व्यक्त झाला पाहिजे एवढे पहा." असे पिताश्री म्हणाले. मी त्यांच्याकडे पलीकडून गुरगुरण्याचा आवाज येतो त्याची तक्रार केली. त्याने माझे चित्त विचलित होते. तेव्हा ते म्हणाले,"इतरांच्या डरकाळ्यात, गुरगुरण्यात आपली डरकाळी उठून ऐकू आली पाहिजे. तेव्हा तक्रार न करता रियाज कर." मग मी हेडफोन लावून रियाज करू लागलो. इतरांनी कितीही बोंबलले तरी मला ऐकू येत नसे.

पिताश्रींचे एक मित्र आहेत. त्यांना शिकारीची आवड आहे. मलाही शिकारीला जायचं होतं. मी म्हणालो, आता मला डरकाळी छान फोडता येते. पूर्वी आमचा कुत्रा पण भीत नसे, आता तोही घाबरू लागला आहे. मी डरकाळी फोडली की दिवाणखान्यातून उठून चक्क बाहेर जाऊन बसतो. भित्रा लेकाचा. मला तुमच्याबरोबर शिकारीला यायचं आहे. त्यांनी मला सांगितले वाघ होऊन स्वत: शिकार करायची, डरकाळ्या फोडायच्या, जखमी झालं की स्वत:च्या जखमा चाटत बसायचं हे काही खरं नाही. त्यापेक्षा तरस व्हावं. वाघाला, सिंहाला शिकार करू द्यावी. मग आपण हळूच कडेकडेने तिरकं तिरकं चालत यायचं. आपलं एकूण खोकड ध्यान, दिसणारे सुळे असं  सगळं अमंगळ अभद्र दर्शन झालं की वाघ सिंहांसारखे प्राणीसुद्धा किळसयुक्त भीतीने बाजूला होतात. मग आपण हॅः हॅः हॅः असं निर्लज्ज हास्य करायचं आणि ती शिकार लांबवायची. इंटरेस्टिंग. पिताश्रींना हे कधीच पटलं नसतं. म्हणून त्यांना विचारायला गेलोच नाही. पण, इंटरेस्टिंग आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. पण मला ओरडायला, म्हंजे, मला म्हणायचं होतं डरकाळ्या फोडायला पण आवडतं. काकांना विचारलं तरस डरकाळ्या फोडतं का? तर म्हणाले, तरसाला आयती शिकार महत्वाची असते. आधीच डरकाळ्या फोडल्या तर गपचूप डल्ला कसा मारता येईल? ह्या:! पुचाट तरस! ते काही नाही, मला ओरडायला आवडतं आणि आयती शिकारपण आवडते. काकांना मी खूप आवडतो. ते म्हणाले काही हरकत नाही. तुला डरकाळ्या फोडायला आवडतं ना? खुशाल घसा साफ करून घे. सावज सापडलं की मी तरसासारखा बरोबर येतो तिथे. आपण दोघं शिकार वाटून घेऊ. इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. काका भारीच आहेत. मला खूप आवडतात ते. कित्ती ज्ञान आहे त्यांच्या डोक्यात. आमच्या पिताश्रींनी त्यांना इतके दिवस घरात का येऊ दिलं नाही बरं? 

Thursday, October 16, 2014

सही रे सही

हे मुख्यमंत्रीपद म्हंजे निस्ता वैताग झाला हाहे. तीन चार वर्षांपूर्वी सहीसाठी पेन उचललं की हात थरथरायला लागायला सुरुवात झाली. हातपाय थरथरणे तसे नवीन नव्हते. दिल्लीच्या हवेनं तसं होतं आम्हाला. मुंबईत आलो की गाडी येकदम पैल्या किकला ष्टार्ट. पन हे नवीन होतं. मुंबईतल्या मुंबईत हात थरथरला आन आमी चपापलो. च्या बायली, ह्ये काय आणि नवीन दुखणं? कधी कधी न्हेमीप्रमाणे निमूटपणे खुर्चीत चीप बसलो आसताना येकदम मानेवरचे केस हुबे ऱ्हातात. घाम फुटतो. आपल्याकडे कुणीतरी रोखून बघतं आहे आसं वाटू लागतं. आयला वास्तूत काय दोषबिष हाय का काय आसं वाटू लागलं. आमचे शेक्रेटरी साहेब म्हणू लागले, वास्तूतच बिघाड हाहे. त्यांनीच मग कोणी फेंगशुई एक्सपर्ट शोधून आणला. त्याने नीट पाहणी केली. आमच्या टेबलाखाली जाऊन पाहिले, खिडकीतून बाहेर काय काय दिसते ते पाहिले. खोलीतील फ्यानची आणि आमची उंची मोजली, टेबलावरील पाण्याच्या तांब्याभांड्याचे आमच्यापासूनचे अंतर, खुर्चीची आणि आमच्या तदनुषंगिक भूभागाची रुंदी इत्यादि असे सर्व मोजले. सगळे "वारा-पाणी" शास्त्रात फिट्ट बसत होते. तरीही तुमची "ची" खिडकीतून बाहेर वाहून जात आहे, टेबलावरचा तांब्याऐवजी त्यावर मोठा माठ ठेवा. पाणी "ची"ला धरून ठेवते. असं काहीबाही सांगून फुक्कट माझ्या खिशातून धाहजार रुपये काढून घेऊन गेला. त्याचीच काय, त्याच्या ह्याची आणि त्याची "ची" भायेर  काढावीशी वाटत होती. पुन्हा खुर्चीवर बसलो आणि विचार करू लागलो. फुड्यात फायली पडलेल्या. आपल्याला ओसीडी हाहे, त्यामुळे येकपण इकडची तिकडे झालेली चालत नाही आपल्याला. रामू शिपायालापण सांगून ठेवलं हाहे, येकदम हलक्या हातानं फडकं मारत जा म्हणून. रामू निर्विकारपणे काम करतो. खोलीत जे जे अचल म्हणून हाहे त्या सर्वांवर त्याचं फडकं सारख्याच प्रेमानं फिरतं. येकदा दोनदा तर मी टेबलावर डोकं ठेवून चिंतन करत बसलो होतो तर माझ्यावरनंपण फिरलं. मी डचकून उठलो तर मला म्हन्तो,"सायेब, माफ करा, काखेत कोळीष्टकं दिसली म्हणून फडकं मारलं. मधनं मधनं हालत चला, मंत्रालयातले कोळी मंत्र्यांपेक्षा जास्त काम करत्यात. जणू काही बिल्डरच. जरा जागा खाली पडलेली दिसली की घ्येतलाच ताबा. आपण सोच्चतेचे भोक्ते का काय आहात म्हनून म्हनतो." आगाऊ लेकाचा. असाच खिन्न बसलो होतो. धीर करून समोरच्या फायलींच्या ढिगावर नजर टाकली. हातातून बारीक कळ गेली. त्याकडे दुर्लक्ष करून वरची फाईल उचलली मात्र, मानेवरचे केस हुबे ऱ्हायले. घाम फुटला. तरी जोर करून फाईल उघडली. पांडुरंग हरी! वासुदेव हरी! पयल्याच पानावर हुंच बिल्डींगचं चित्र. आता आमी काय बिल्डिंगा पाह्यला न्हाईत का? याच बिल्डींगचं एवढं भ्या का वाटावं? उठून खुर्चीच्या मागल्या भिंतीवर आमच्या दैवताचे फोटो लावले होते त्यासमोर उदबत्ती लावली, नमस्कार केला. दैवत लई कडक. एक दिवस उदबत्ती लावली न्हाई तर दुसऱ्या दिवसाला त्याचा वाईट अनुभव येतो. दिवसभर कंबर धरल्यासारखं होतं, वाकून चालावं लागतं. त्यामुळं ठरवून टाकलं हाहे, प्रत्येक फायलीला एक उदबत्ती लावायची. उदबत्त्यासाठी सीलबंद निविदा सूचनाच मागवल्या मग. एकदम दोन टन घेऊन ठेवल्या आहेत. त्या टेंडरची फाईलपण इथंच पडली आहे. एखाद दिवस त्यावरही सही करावी म्हणतो.

तेवढ्यात रामू आत आला. मी चटशिरी उठलो. एक नजर त्याच्या हातातील फडक्यावर ठेवून हात पाय ताणून अंग मोकळं करू लागलो. रामू म्हणाला,"सायेब, येक सांगतो, आपल्या अदुगर ते चव्हाणसायेब होते. त्यांना आसला तुमच्यासारका त्रास होत न्हवता. ते सकाळी केबिनमध्ये गेल्या गेल्या सह्या करत सुटायचे. मदी एकदा मी टेबलावर फडका मारत हुतो तर फडक्यावरबी सही मारून टाकली. त्यांचा आदर्श आपन सर्व्यांनी ठेवला पायजे. साहेब, ते फडकं मी जपून ठेवलं आहे." मी म्हणालो,"राम्या लेका, चोरून ऐकतोस वाटतं आतली बोलणी! आणि तुझे सल्ले तुझ्याजवळ ठेव, आगाऊ कुठला!". तडकलोच होतो. पुन्ना नजर त्या फायलीवर पडली. कसली उच बिल्डींग बांधली हो या लोकांनी! जरा नियमबियम पाळले आस्ते तर काय बिघडत हुतं का? म्हटलं न्हेमीप्रमाणे येक कमिटी बसवावी. जरा धुरळा खाली बसला की कमिटी कुणाच्या लक्षात राहतीय. कमिटीतली मेंबरं पन जरा सरकारी भत्ते खाऊन निवांत बसतील. झालं उलटंच. मायला भलतीच काम करणारी कमिटी निघाली. अशोकाला शोक करायला लावणारा रिपोर्ट देऊन बसली. तरी मी तो रिपोर्ट नाकारला. भिंतीच्या भेगा बुजवायला गवंडी बोलवावा आन त्यानं भेगा तर बुजवणं लांबच, पण पायाच कसा बिघाडलेला हाये ते सांगायचं त्यातली गत झाली. आता भेगा बुजवायच्या का पाया खणायचा? दिल्लीहून मालकांचा फोन, म्हणले पायाच दुरुस्त करून घ्या. आता पाया दुरुस्त करायचा म्हणजे आक्खं घर उतरवावं लागणार. हे आसं चालू आसताना दुसरी फाईल उरावर पडली. त्यात आमच्या धरणवाल्यांचा फोटो. पयले वाटलं चुकून येरवड्याची फाईल चुकून आमच्याकडं आली का काय? काळा गॉगल, काळापांढरा आडव्या पट्ट्यांचा टीशर्ट घातलेला फोटो, जणू काय दरोड्याच्या तयारीत असलेला एखादा "बाळ्या पारधी"च. क्षणभर वळाखलंच नाही. मग रिपोर्टमध्ये घपल्याची रकम पाह्यली आन म्हटलं हे गरिबीनं गांजलेल्या साध्या दरोडेखोराचं काम न्हाई. आन वळाखच पटली. आमच्या अवतीभवतीचीच मंडळी ही! आला का तिडा? कारवाई करावी तर पार्श्वभाग चिकटलेले जुळे भाऊ आमी. त्यांना हितं थितं येकी करायची लई घान सवय. पन आमी पडलो सोच्चतेवाले. त्यांनी तंगडी वर केली की पानी वतायला आमी तांब्या घिऊन न्हेमी तयार. न्हाई तर हे फुडं जानार आणि आमी आमचा पाय त्यांच्या "संचितात" भरून घेणार. वर यांचे साहेब आमाला सांगणार, तुमाला कुणी सांगितलं पाणी वता म्हणून, तुमी पन मारा धार. तुमाला नसंल इच्छा तर आमी आमच्या "स्वबळा"वर कुटं पण धार मारू. म्हाराष्ट्रातल्या सगळ्या भिंती पडल्या आहेत त्यासाठी. फक्त ती पर्वाची गारपीट तेवढी नैसर्गिक होती, त्यात आमचा काही "हातभार" नव्हता. शिवाय किंगफिशर कृपेने आमी रेग्युलर किडनी ओवरहॉल करतो, आमाला "खड्याचा" त्रास न्हाई. सही करायला हात उचललेला खाली ठेवला. पुन्ना तो भास झाला. कुणीतरी मागून पाहतं आहे. मान वळवून पाह्यलं तर, भिंतीवर न्हेमीचे तीन गांधी लटकलेले होते. महात्मा गांधींच्या फोटोकडं पाह्यलं की सही करावीशी वाटायची. पन हात उचलला की म्याडम फोटोतून भायेर येताहेत आसा भास व्हायचा. मग खुर्चीवर चढून म्याडमच्या फोटोवरचे हार काढून महात्मा गांधींच्या फोटोवर चढवले. इतके की सगळा फोटोच झाकला गेला. येकदम जिवाला बरं वाटलं. उगाच सदसदविवेकबुद्धीचे अवेळी झटके आता बंद होतील असं वाटलं. तडक दोनी फायली उचलल्या आणि "विचाराधीन" असा शेरा मारून ढिगाऱ्याच्या तळाशी टाकून दिल्या. आजून दोन-तीनच दिवस ऱ्हायले आहेत आमचे हितं. साताऱ्याला फोन करून आमी एकोणीसलाच रात्री धाच्या यष्टीनं येतो आहोत, आमची खोली सोच्च करून ठेवा, असा निरोप दिला आहे. हो, आपल्याला सोच्चतेचं लैच वेड आहे. 

Wednesday, October 15, 2014

तोतया

आता सर्व विषयांचा अभ्यास करून त्यावर दिवे लावून झाले आहेत. काही जण इतिहासात नापास होणार आहेत, काही जण पीटी सारख्या विषयात काठावर पास होणार आहेत तर काही श्रीमंत बापांची नालायक पोरं कसलीच फिकीर नसल्यासारखी कॉलेजच्या आवारात धूर सोडत मोठा आवाज करत त्यांच्या विदेशी बनावटीच्या मोटारसायकली उडवणार आहेत. त्यांना आपण पास होऊ याची खात्री आहे. कॉपी करून, पेपर तपासणाऱ्याला पैसे देऊन, धमकावून ही श्रीमंत बापांची पोरे पास होणार आहेत. डॉक्टर होणार आहेत. स्वत:च्या चड्डीची नाडीही न बांधता येणारी ही पोरे, गोरगरिबांच्या नाड्या पाहणार आहेत. त्यांचे प्राण पणाला लावणार आहेत, त्यावर स्वत:च्या तुंबड्या भरणार आहेत. काही जण परीक्षेला न बसता, या सर्वांची मज्जा बघणार आहेत. याउलट, खेडेगावातून शहरात येऊन वार लावून जेवणारी पण कसोशीने अभ्यास करणारी काही मंडळी पास झालो तरी पुढे काय अशा विचारात चिंतातुर होऊन बसणार आहेत. इतिहासात नापास होणारी मंडळी स्वत:ला शिवाजीमहाराज समजत आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांना जसा इतिहास समजला किंवा असावा असा वाटतो तसा पेपरात लिहिला आहे. आणि तो तसाच बरोबर आहे असा आग्रह ते परीक्षकांपुढे धरणार आहेत.

"शिवाजीमहाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून…", "छत्रपतिंच्या महाराष्ट्रात आम्ही असा अत्याचार होऊ देणार नाही…" ही असली वाक्ये आता "अमुक तमुक यांच्या निधनामुळे देशाची न भरून येणारी हानी झाली आहे…" या टायपातल्या बुळबुळीतपणावर आणून ठेवण्याचे काम शिवसेनेने करून ठेवले आहे. सेनेच्याच ष्टाईलनं विचारायचं झालं तर, शिवाजीमहाराज हे तुमची जहागीर आहेत काय? आम्ही त्यांच्या थराला जाणार नाही. पण एवढे नक्की विचारू की, कोणते काम तुम्ही शिवाजीमहाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केले आहे? तुम्ही तेवढे छत्रपती, आणि बाकीचे काय छत्रीपती? ज्या लोकांना अफजलखान कोण आणि जिवाला जीव देणारे मावळे कोण हे समजत नाही त्यांना शिवाजीमहाराज काय कप्पाळ समजणार? हेलिकॉप्टरमध्ये बसून किल्ल्यांचे फोटो काढल्याने शिवाजीमहाराज कळत असतील तर किंगफिशर एअरलाईन्सचे वैमानिकसुद्धा शिवाजीमहाराज-क्वालिफाईड म्हणायचे. दंडशक्तिचे महत्व समजू शकते. दंडशक्ति आणि गुंडशक्ती यात खूप फरक असतो. महाराजांनी स्वत: स्वैर दंडशक्ति संघटित करून स्वराज्य स्थापनेचे त्या काळातील अशक्य कोटीतील कार्य केले. महाराजांनी अफजलखानाच्या कपटकुटिल कारस्थानावर वरचढ ठरून त्याचा खात्मा केला. परंतु अफजलखान कोण आणि बाजीप्रभू देशपांडे कोण हे ओळखण्याची सारासार बुद्धी महाराजांकडे होती. त्यांनी अफजलखान समजून बाजीप्रभूचा कोथळा काढला नाही अथवा अफजलखान गडाखाली आल्यावर तोफांचे बार काढले नाहीत. आणि त्या प्रसंगानंतर "ओ अफजलखान, लढाईकडे लक्ष द्या जरा. आम्ही तोफा करेपर्यंत खिंड सोडू नका. जरा आमच्या दृष्टीआड झाले की लागले चिलीम फुंकायला." असे उपहासाने आपल्याच सेनेतील कुणाला म्हटल्याचा इतिहास ज्ञात नाही. नात्यांचे पावित्र्य पाळणे हा तर महाराजांचा ऐतिहासिक गुण आहे. आपल्या सावत्र बंधूंना भेटायला, दिलजमाई करायला ते हजारो कोस दूर तंजावरला गेले होते. इथे महाराजांचे हे स्वयंघोषित बडवे भावाला भेटायला एक चौक ओलांडून बांद्रयापर्यंतही गेले नाहीत. पेशवाई शौर्य कमी भाऊबंदकीच जास्त. इतिहासात जितके महापुरुष आढळतात तितकेच तोतयेसुद्धा. सदाशिवरावभाऊ उत्तरेत मोहिमेवर गेले. अटकेपार मराठ्यांचे झेंडे लागले. मग झाली ती पानिपतची लढाई. त्यात भाऊंचे काय झाले हे इतिहासाला ज्ञात नाही. पण त्यानंतर सुरू झाले ते सदाशिवरावभाऊंच्या तोतयांचे येणे. हे तोतये अनेक गोष्टी खोटं बोलायचे, कहाण्या सांगायचे. त्यांना वाटायचं हा भावनिक विषय आहे, आपल्याला कुणी आव्हान देणार नाही. पण दिव्य करायची वेळ आली की लगोलग परागंदा व्हायचे. प्रजेच्या दृष्टीला दृष्ट देता यायची नाही त्यांना. आज असेच सदाशिवभाऊंचे तोतये भावनिक साद घालून पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करीत आहेत. पूर्वीचे तोतये जनतेच्या सात्विकतेला भ्यायले तरी होते. त्यांना थोडी तरी चाड असावी. आताचे तोतये त्याहूनही निलाजरे आहेत. ते "तुम्हीच खरी प्रजा नाही" असा आरोप करण्याइतपत घसरलेले आहेत. एकदा नैतिकतेचे अध:पतन झाले की त्यानंतर कितीही खाली गेले की लाज वाटत नाही. शिवाजीमहाराजांनी आपल्या फौजेला जरब दिली होती, प्रजेच्या पानातील एका दाण्यालाही ढका लागता कामा नये. इथे तोतयाच्या फौजेने प्रजेलाच दम दिला आहे. तोतया होऊन स्वत:ला लाज आणायची की आपण शिवाजीमहाराज नाही पण त्यांनी घालून दिलेल्या आदर्श तत्वांचा स्वीकार करायला हवा हे ओळखायचे? निदान स्वराज्याचे पाईक असलेले स्वाभिमानी देशप्रेमी मावळेतरी होऊ. शिवाजीमहाराज तरी अशा मावळ्यांपेक्षा वेगळे कुठे होते? ते काही शहाजीराजांचे आणि जिजाऊबाईसाहेबांचे पुत्र म्हणून आपोआप शिवाजीराजे झाले नाहीत. ते महालातील गाद्यागिरद्यापेक्षा आपल्या सवंगड्यांबरोबर भीमथडीच्या तट्टांवर मांड टाकून या राकट, कणखर देशात जास्त रमले. मावळ्यांबरोबर जातीने जुझं लढले, अंगावर जखमा घेतल्या, त्यावर तूप-मध आपल्या सवंगड्यासोबत लावले. तेव्हा ते सर्वांचे झाले, शिवाजीचे महाराज झाले. असाच आमच्यात रमणारा, आमच्यासारखा वागणारा, दिसणारा एक राजा आम्हाला अनेक वर्षांनी मिळाला आहे. कुणीही कितीही त्याला अफजलखान म्हटले तरी त्याचे कार्य लपत नाही किंवा संपतही नाही. ज्यांना प्रजेची भीती वाटते, आपण काही कार्य केले नाही याची खंत वाटते, आपल्यात काही कर्तृत्व नाही पण दुसऱ्यात ते आहे याची असूया वाटते त्यांनाच असला कर्मदरिद्रीपणा सुचतो. त्याने दुसऱ्याचे नुकसान होत नाही तर स्वत:चा कोतेपणा आणि मर्यादित कर्तृत्व दिसून येते.

Monday, October 13, 2014

संगीत शारदा

सूत्र: जवळ जवळ बोळके झालेले, पण "म्हातारा न इतुका न मी, अवघे पाऊणशे वयमान, लग्ना अजून लहान" असे लाजत लाजत सांगणारा भुजंगनाथ आणि त्याला बोहोल्यावर चढवण्याचा पण उचलणारा भद्रेश्वर हे एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी आलेले संगीत शारदा नाटक, अजिबात जुने झालेले नाही. आजही त्या शरदाचे भेसूर चांदणे महाराष्ट्रावर पडते आहे. तंबाखू खाऊन अर्धे बोळके गमावून बसलेला आणि दिल्लीपर्यंत सर्व खांब हुंगून आलेला हा भुजंग पुन्हा महाराष्ट्राच्या बोकांडी येऊन वेटोळे करून बसला आहे. कुणीही न मागवलेल्या निधर्मीपणाच्या निविदा सूचना या भुजंगनाथाने भरल्या आहेत आणि स्वत:लाच त्याचे कंत्राट दिले आहे. सेनेतून बाहेर पडून या भुजंगनाथाच्या वळचणीला बसून लोणी मटकावणारा छग्गूदादा भद्रेश्वराच्या भूमिकेत शोभतो आहे.

सूत्रधाराच्या भूमिकेत - स्वत: दिव्यमुखी भुजंगनाथ 
नटीच्या भूमिकेत - मर्दानी सौंदर्याचा आविष्कार जितेन्द्रम बुद्धिमतां आव्हाडम
भद्रेश्वर - छग्गूदादा बाहुबली

सूत्रधार: वाहवा! सुंदर चित्रविचित्र पुष्पांनी शोभणाऱ्या कुसुमवाटिकेप्रमाणे ही प्रसन्नमुख सभा पाहून आनंद होतो आहे. नाहीतर आमची ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याची सभा. एका मेंबराच्या तोंडावरची माशी हलत असेल तर शपथ. मळीच्या दारूचे डिव्हिडंड आणि टनाला भाव वाढवून द्या, मग बघा ती मेंबरं कशी धोतराच्या शिडात वारं शिरल्यासारखी भर्राटतात. पण पुण्यनगरीतील चोखंदळ जनता ही, या सभेचे कोणत्या नाटकाने रंजन करावे ते सुचत नाही. ही मंडळी "माझी लडाख भ्रमंती" पासून "शहरातून चिमण्या गायब का?" या विषयापर्यंत कुठल्याही सभेला एकाच उत्साहाने हजेरी लावतात. राजुबुवा ठाकले यांच्या मनप्रवचनाला जातील, त्यांची प्रसिद्ध "मी अच्चं करीन आणि तच्चं करीन, द्या एकवार मजला हा मुगुट" ही पदे मन लावून ऐकतील आणि त्यानंतर कोंढाळकर मस्तानी प्यायला जातील.
(गातो)
अभिरुची कोणा कमळाची कोणा तीरकमानीची
"हस्त"लाघव रुचे कोणा, कुणा सवय पाकीटमारीची
बंद घड्याळ ते, सर्वांचे जणु नावडते।।

(विचार करतो) या प्रसंगी माझ्या चतुर भार्येचा अभिप्राय घ्यावा हे उत्तम. (वळून पडद्याकडे पाहतो, तो भार्या उभी असते). अरे वा! आम्ही नुसतं स्मरण करावं तर तुझा चंद्राप्रमाणे तेजस-शीतल मुखडा माझ्या समोर! (खालच्या आवाजात, जित्या, तुला हजार वेळा सांगितलं, नाईट असेल तेव्हा कांदा खाऊ नकोस. च्यायला या अन्याला जरा डायरेक्शण कमी करायला सांगायला हवं. दिग्दर्शक लेकाचा! एवढ्या तोंडाजवळ कशाला यायला पाहिजे यानं?)
(प्रकट) प्रिये, एका महत्वाच्या कामात मला तुझा अभिप्राय हवा आहे.

नटी: ही सभा आणि आपली चर्या पाहून बहुतेक लक्षात आलंच आहे, पण आपल्या मुखातून ऐकलं म्हणजे बरं. अशा कोणत्या महत्वाच्या कामात माझा अभिप्राय हवा आहे बरे? माझ्याकडे आता शेजारच्या बायका यायच्या आहेत. अश्शा मेल्या वात्रट आहेत. पर्वा मी गाझा बचाव बचाव असं ओरडत होते तर कुण्णी आलं नाही. नंतर त्या भामिनीला विचारलं का आली नाहीस गं मदतीला? तर मेली म्हणते कशी, इश्श! मला वाटलं तुझ्या मालकांची हौस पुरवणं चालू असेल. तुमचे मालक काय बाई, निधर्मी पुरोगामी आहेत. कुठून कुठून काय शिकून येतात कुणास ठाऊक. जळ्ळ मेलं ते गाझा नि बिझा. यष्टी तरी जाते तिथं की नाही कुणास ठाऊक आणि आम्ही वाचवायला मात्र जायचं.

सूत्रधार (दुर्लक्ष करीत) :
परिचित जो या रसिकजना त्या कवि शरदे रचिले
शारदीय नवनाटक गानी निवडणुकी जे खचिले
मत्प्रिय सत्ते, रुचेल यांना का कांते?

नटी: तरी मी म्हटलंच! मेलं ध्यानी मनी सदा सर्वदा सत्ता सत्ता सत्ता!
पद्य: राग झिंजोटी, ताल - स्वत:चा
अजुनी खुळा हा नाद पुरा कैसा होईना
बोळके झाले मुखाचे, मुख्यपद का हो येईना
धोरणे बदली नवी नवी, कुणी तिकडे पाहीना
नाव बुडविले देशाचे, कीर्ती जगी माइना।।

सूत्रधार: प्रिये, तू म्हणतेस तशी आमची स्थिती झाली आहे खरे, पण तिचे कारण सत्ता नव्हे!

नटी: हे माझ्या तुंदिलतनु मैद्याच्या गोंडस पोत्या, तर मग कोणतं?
(गाते)
दूर धोरणाने केवळ ही स्थिती आम्हां आली,
दोष त्याचा वृथा ठेवीसी जनलोक भाली
कारण दुष्काळा ।। मानिल कोण तव कोकलण्याला ।।

सूत्रधार: (स्वगत: अरे माठनृपति, आज आपला स्त्री पार्ट आहेस ते विसरलास की काय? बाकी बृहन्नडेला अभिमान वाटेल अशा त्या मिशा बाकी शोभून दिसत आहेत. )
(प्रकट)वेडी रे वेडी! म्हटलं ते बरोबरच. तुझं शहाणपण ठाण्या, कळव्यापर्यंतच. हे गहन मुत्सद्दी देशकारण तुला  कसं कळावं ते ?

नटी (फणकाऱ्याने): कळत नाही तेच बरं! कार्य आणि कारण समजणारे शहाणेसुरते पुरुष काय दिवे लावताहेत ते दिसतंच आहे. त्या तासगावच्या चार्ली चाप्लीननं अगदी मर्दानी वक्तव्य केलं ते ऐकलं आम्ही. न्हाणीघरातला दांडीवरचा टॉवेल काढायला स्टुलावर उभं राहावं लागतं त्याला आणि सल्ले कसले देताहेत ते, तर बलात्कार कधी आणि कसा करावा! बाई बाई बाई, मोठा वाईट काळ आला आहे आपल्या पक्षातील लोकांना. साधा बलात्कार तो काय, शिवाय समूह सुद्धा नव्हता हो तो! आणि या लोकांकडून सल्ले घ्यायचे आम्ही आता.

सूत्रधार (खालच्या सुरात) : जित्या, रोलचं बेअरिंग विसरू नकोस. इथं स्त्रीपार्ट करतो आहेस तू. स्वत:च्या भूमिकेत जाऊ नकोस. एवढं नाटक होऊदेत, मग मुंब्र्या -कळव्यात काय गोंधळ घालायचा तो घाल.

नटी:
काय पुरुष चळले बाई, ताळ मुळी उरला नाही
धर्म नीती शास्त्रे पायी, तुडविती कसेही ।।
साठ अधिक वर्षे भरली, कन्येसही पोरे झाली
तरिहि मेल्या मुख्यपदाची, हौस कशी असे हो
घोड थेरड्यांना ऐसे, देती लोक मतही कैसे ।।

(पडद्यातून मुलांचा आवाज) : अहो भुजंगनाथ आजोबा! संन्यास घ्या संन्यास!
(भद्रेश्वर प्रवेश करतो)
भद्रेश्वर: अरे जा! साहेबांना संन्यास द्यायला ब्रह्मदेव आला पायजे, ब्रह्मदेव! अजून चार लग्नं सहज होतील असा उत्साह आहे त्यांच्यात. पुलोदच्या लग्नात, आठवतं ना, नवरदेव आयत्यावेळी अडून बसला. लगेच साहेब पुढे झाले. उतावीळपणे नाही, तर आत्मविश्वासाने.

सूत्रधार: भद्रेश्वरा, तुझी आमच्याप्रति निष्ठा कशी ती अढळ आहे रे! पण सगळं भोगून झालं, आता थकायला झालं आहे. शिवाय आपली तरुण पिढी काम करायला अगदी फुरफुरते आहे.

भद्रेश्वर: फुरफुरू दे! आपल्या सारखा मर्दानी सौंदर्याचा पुतळा उभ्या पश्चिम महाराष्ट्रात सापडणार नाही. आपल्यासारखी चवचाल (विंगेतून प्रॉम्प्टर : चव चाल! चव चाल! आयला छग्या, प्रत्येक प्रयोगाला ही चूक करतोस!) कुणाच्याच व्यक्तिमत्वात नाही. शिवाय आपला तो पुतण्या, भैरवनाथ, त्याला विसरू नका!

सूत्रधार: होय रे होय! ही आमची माकडसेना आमच्या भैरवनाथानंच आमच्या भोवती गोळा केली आहे. त्याच्या मनात, आता मी माझ्या संपत्तीचा वारस त्याला करीन असे आहे. पण म्हणावं, एक कपर्दिकही त्याच्या हाती लागायची नाही. त्यासाठी मी पुन्हा बोहोल्यावर उभा राहीन. पण खरं सांग, मी म्हातारा दिसतो?

भद्रेश्वर: अजिबात नाही! (गातो) पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…. पिकल्या पानाचा. अजूनही आपण स्वबळावर "सगळे" निभावून न्याल अशी मला खात्री आहे.

Thursday, October 9, 2014

फशिवसेनेचा भगवावाद

फशिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जरा कठीण झालं आहे. कमळाबाईनं ऐन वखताला त्यांना "friend-zoned" करून टाकलं आहे. लाडात येऊन डोळे बंद मुका घ्यायला पुढं जावं तर कमळाबाई ही बाई नसून चांगला धट्टाकट्टा बाप्या आहे, त्यानं शाखेची कडक खळ लावून इस्त्री केलेली चड्डी परिधान केली आहे, हातात दंडुका आहे, त्याला मिशा आहेत असं दिसावं आणि त्याच्या त्या भरघोस मर्दानी मिशा नाकात जाऊन शृंगार रसातून खडबडून बाहेर यावं असं त्यांचं झालं आहे. बाकी हे शिवसेनेचे अन्या-बाळ्या-पक्या-दिल्या(hereinafter referred as ABPD), मुलीला चांगलं प्रपोज करण्यापेक्षा "नडणारेच" जास्त. त्यांचे दोस्त लोक पण "लड बाप्पू, तू नड डायरेक, आपन हायेना फुल सपोर्टला." या टायपातले. कमळाबाई आणि फशिवसेना एकाच शाळेतले, पण हिंदुत्व या विषयावर अभ्यास करणे या एकाच समान हेतूने वह्यांची देवाणघेवाण करणे होत असे. सेनाबहाद्दर मुले  हिंदुत्वाच्या पेपरात सगळ्या प्रश्नांना "शिवाजी महाराज की जय!" एवढेच उत्तर देत असत. निदान महाराष्ट्रात तरी या उत्तराला शून्य मार्क द्यायची हिंमत कुठल्याच मास्तरात नाही हे त्यांना ठाऊक होते. वास्तविक, त्यांनी बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या "राजा शिवछत्रपति" पुस्तकातील "होता जिवा म्हणून वाचला शिवा" आणि "लाल महाल आणि शाहिस्तेखानाची बोटे" अशी दोनच प्रकरणे वाचली होती. त्या पुण्याईवर हिंदुत्वात पस्तीस मार्क मिळायला काहीच हरकत नव्हती. महाराज गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंस होते हे वाचल्यावर इतिहासात संस्कृत फार असते असे अनुमान त्यांनी काढले होते. पुरंदरे होते म्हणून महाराजांविषयी माहिती तरी कळली. चित्रे मात्र छान होती त्या पुस्तकात. बाकी सर्व विषयांत आनंदीआनंद होता. नाही म्हणायला पीटीचा तास आणि दरवर्षीचं शाळेचं स्नेहसंमेलन उर्फ "राडा" महोत्सव या दोन कार्यक्रमांत ही मंडळी अत्यंत उत्साहात वावरत. या महोत्सवात स्वयंसेवक मुलं "रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा" असली स्फूर्तीदायक गीते सादर करीत असत तेव्हा ही राडामहोत्सवी बालके फ्या फ्या करून हसत असत. ही कोण अरुणा आणि तिचा कसला अवतार असे ते विचारीत. त्यावर "मराठीच्या तासाला कधीतरी बसत चला, कळेल" असे उत्तर स्वयंसेवक देत असत. त्यावर एखादा पक्या "मायला, निदान या अरुणाला बघायला तरी वर्गात जायला पायजे भौ." असे म्हणत असे. शिवाय, असल्या गीतवादी स्फूर्तीवर त्यांचा विश्वास नसे. प्रत्येकाने आपापली स्फूर्ती आपल्या खिशात बाळगली पाहिजे यावर हे राडावादी ठाम असत. किमान दोन क्वार्टर्स (नीट) स्फूर्ती खिशात असली पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. दोन क्वार्टर्सवर चढलेला हिंदुत्ववाद सहजासहजी मोडून काढता येत नाही असा आमचा अनुभव आहे.

ऐन परीक्षेच्या टायमाला कमळाबाईनं तू तुझा तू अभ्यास कर असे सांगितल्यामुळे लैच प्रॉब्लेम झाला आहे. वर्षभरात पुस्तकं कुठं टाकली आहेत तेही लक्षात नव्हतं. आता खरंच अभ्यास करावा लागणार याचं टेन्शन तर होतंच. पण त्याहीपेक्षा, मिळालेल्या नकाराचं दु:ख जास्त होतं. ABPD लोकांचा चित्रपटांचा अभ्यास दांडगा असतो. मग प्रथम "ओय सेठ, अपुन तुम्हारे छोकरी का हाथ मांगा, कोई भीख नही, क्या?" असा मिथुन इष्टाईल थयथयाट करून झाल्यावर बच्चनसारखं लाल डोळे करून, एक डोळा चकणा करून "आज तक तुमने मेरी दोस्ती देखी है, अब दुश्मनी देखना."असा ड्वायलॉक टाकला गेला. आयला आपल्याला पटत न्हाई म्हंजे काय? दावतोच आता. आसल्या धा पोरी न्हाई पटवल्या तर नावाचा सैनिक नाही. मग चौकात जाऊन "जय भवानी, जय शिवाजी" अशा खच्चून घोष्णा दिल्या. पोरी तर पटल्या नाहीतच. उलट सगळे लोक घाईघाईने निघून गेले आणि दुकानांची शटरं खाली आली. "आरे या बंदच्या घोष्णा नाहीत. हा आमचा जाज्वल्य हिंदुत्ववाद आहे. त्या चड्डीवाल्यांसारखा फक्त दसऱ्याच्या संचलनाला दिसणारा नाही." असं समजावून सांगितलं तरी कुणी ऐकलं नाही.  मग कट्ट्यावर जमून ष्ट्रॅटेजी ठरवायचं ठरलं. अन्या हा त्यातल्या त्यात हुशार मानला जायचा कारण तो चष्मा लावायचा, जोडाक्षरं असलेले शब्द न अडखळता म्हणायचा. संध्याकाळी कट्ट्यावर बाकीचे सौंदर्यनिरीक्षणात मग्न असताना हा करारी चेहरा करून बसायचा. मनात आणलं तर लाथ मारीन तिथं पाणी काढीन असा त्याला आत्मविश्वास होता. पाण्याचं ठीक आहे, पण मुलींचं कठीण आहे हे त्याला मनातून माहीत होतं. मग हळूच चष्म्यातून चोरून बघायचा. पण आता ते करायला वेळ नव्हता. चड्डीवाल्यांपेक्षा आपण जास्त भगवे कसे दिसू याची चिंता लागून राहिली. राडा करणे, बंद घडवून आणणे, गणपतीच्या टायमाला न विचारता पावती फाडणे, त्यावर एखाद्याने तक्रार केलीच तर त्याचे कपडे फाडणे, प्रश्नावर लोकशाही पद्धतीने चर्चा करण्यापेक्षा आमच्या "सेना" ष्टाईलने उत्तर दिले जाईल असे म्हणणे हे सर्व हिंदुत्वात कसं बसवायचं? शिवाय शिवाजीमहाराजांच्या चरित्रात त्यांनी असं काही केलं आहे का याचा शोध घ्यावा का? असे प्रश्न उभे राहिले. शिवाजीमहाराजांचं चरित्र मुळात वाचून काढणे या कल्पनेला तत्काळ विरोध झाला. पक्या म्हणाला, अरे परवा काश्मीरमध्ये पुराने धुमशान घातले तेव्हा हे चड्डीवाले लेकाचे हिंदुत्व विसरून त्या गद्दारांना मदत करायला गेले. आपण आपल्या हिंदुत्वावर ठाम राहिलो, अजिबात गेलो नाही. तरीही लोक चड्डीवाल्यांचा एवढा आदर का करत आहेत?

महाराजांचं चरित्र मुळात वाचलं असतं तर पहिल्या काही पानांतच उत्तरे मिळाली असती. सर्वात प्रथम हे कळलं असतं की महाराज सर्वांना एकत्र जोडणारे व्यक्तिमत्व होते. स्वराज्य मिळवणारी दृष्टी त्यांची, मिळवणारे हात त्यांच्या सवंगड्यांचे होते. त्यांच्या जिवाला जीव देणारे सवंगडी त्यांनी जोडले होते. भवानी मातेनं तलवार मला  दिली आहे, तुम्हांला नाही, असे त्यांनी म्हटले नाही. संघशक्ति  आणि दंडशक्ति यांचा योग्य संगम झाला तर स्वराज्य तर मिळेलच पण ते सुराज्यही असेल. मुसलमानांना विरोध म्हणजे हिंदुत्व नाही. महाराजांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला कारण त्यावेळी मुघल माजले होते. धर्माच्या नावाखाली अत्याचार करीत होते, कर बसवत होते, आयाबहिणींची अब्रू लुटत होते. असल्या अधर्माच्या प्रतिकारासाठी हिंदुत्व आवश्यकच होते. शिवसेनेची फशिवसेना होण्यापूर्वी पंचवीस वर्षे संघशक्ति आणि दंडशक्ति एकत्र आल्याचे स्वप्न टिकून होते. शिवाजीमहाराजांचे नाव घेता घेता आपणच शिवाजी झालो असा भ्रम सेनेला झाला आणि ते स्वप्न भंगले. नुसतं आपण शिवाजी असा भासच नव्हे तर इतकी वर्षे ज्याच्या खांद्याला खांदा लावून जुझं लढली, तो अचानक अफजलखान असल्याचा अजब साक्षात्कारसुद्धा झाला. पण त्या वाटण्याचं इतकं काही वाटून घ्यायला नको. महाराष्ट्र ही नाटक या कलेची मातृभूमी आहे. इथे भूमिकेशी समरस होऊन त्यात घुसणारे नट-बोलट आहेत. त्यातलाच हा प्रकार. अंक संपला, तोंडावरचा रंग पुसला गेला की महाराजांचा पुन्हा आपला नेहमीचा "अन्या" होऊन जाईल. लहानपणी एकदा मी वडिलांबरोबर दशावतार पाहायला गेलो होतो. त्यात कर्णाची भूमिका करणारा नट अत्यंत तेजस्वी, बाणेदार, करारी, शूर असा दिसत होता. त्याची वेषभूषा, अभिनय पाहून मला वाटले खराखुरा कर्ण असला तर तो असाच असला पाहिजे. कोकणातील ते गाव. जेमतेम उघडा रंगमंच होता. अचानक धो धो पाऊस आला. सगळ्यांची त्रेधा उडाली. सर्व धावत पळत शेजारच्या इमारतीत शिरले. माझ्या शेजारी "हे वृषाली! आम्ही रणांगणावर जाताना अश्रू गाळणे हे असे वीरपत्नीचे लक्षण नाही. अभिमानाने औक्षण करून आम्हांस निरोप द्यावा!" असे वीररसपूर्ण उद्गार काढणारा कर्ण उभा होता. हेल्मेट काढावे तसे मस्तकावरील मुकुट काढून त्याने तो हातात घेतला होता. "श्या! शिरां पडली या पावसार ती. काल बांद्यात प्रयोग होतो तो असोच कॅन्सल झालो!" असे त्याने उद्गार काढले. त्याला वृषालीनेही पदर पिळत पिळत "काय गे बाये, यंदा पावसांचा काय खरां नाय." असा दुजोरा दिला. 

Tuesday, October 7, 2014

फेसबुक म्हणी

१. स्वामी तिन्ही जगाचा स्मार्टफोनविना भिकारी
२. स्वामी टुकार फोटोंचा लाईक्सविना भिकारी
३. उथळ स्टेटसला लाईक्स फार
४. सतत स्टेटस अपडेट करी त्यास कोण विचारी
५. डोक्यापेक्षा स्टेटस मोठे
६. रिकामा यूजर स्टेटसच्या तुंबड्या लावी
७. लाईक नको पण पेज इन्व्हाईट आवर
८. रिकामा बैल फार्मव्हिल वर औत ओढी
९. नावडत्याचे प्रोफाईल ब्लॉक
१०. अडला हरी फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्से्प्ट करी
११. इकडे फेसबुक तिकडे ट्विटर
१२. मित्र थोडे फ्रेंड्सच फार
१३. कॉमेंटस कमी लाईक्स फार
१४. उचलला फोन टाकली कॉमेंट
१५. भिंतीवर बोंबलायला गवंड्याची परवानगी कशाला?
१६. आपलीच भिंत, आपलेच शब्द
१७. करी जुन्या पोस्टवर कॉमेंट, जसा शिळ्या कढीला ऊत



Friday, October 3, 2014

आमची सौंदर्यदृष्टी

"भिंत पिवळी आहे" हे सौंदर्यवाचक विधान पुलंनी निरगांठ-उकल तंत्राने समजावून सांगितलं त्याला अनेक वर्षे लोटली. त्यानंतर महाराष्ट्राची सौंदर्यदृष्टी कुठे लोप पावली कुणास ठाऊक. ती सौंदर्यदृष्टी असलेला, व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे आणि पापुद्रे असलेला नानू सरंजामेसुद्धा गायब झाला. अवघा महाराष्ट्र कसा धोंडो भिकाजी जोशांसारख्या असाम्यांनी भरून गेला. सकाळी ऑफिसला जायचं, ऑफिसातून परत येताना कुटुंबोपयोगी वस्तू आणायच्या. पूर्वीचे धोंडोपंत मंडईतून मेथीची जुडी आणत असत, आताचे धोंडो भिकाजी हॉटेलमधून पार्सल बांधून आणतील एवढाच काय तो फरक. परंतु एकूण सौंदर्यदृष्टीचा ऱ्हासच होत चालला असावा. पूर्वी भिंत पिवळी तरी राहायची. तिच्याकडे टक लावून तिच्या एकूण व्यक्तिमत्वाचा अन्वयार्थ तरी लावणारे लोक होते. पुढे पुढे ती आस्था राहिली नाही. उलट छान रिकामी भिंत दिसली तर जाणारे येणारे लोक तिचा अन्वयार्थ लावत तिला युरिया, अमोनिया पुरवत उभे राहायचे आणि 'मोकळे' वाटले की बिनदिक्कत चालू लागायचे. कुणी उंचे लोग उंची पसंदवाले जाता जाता तिच्यावर 'माणिकचंद'चा सडा शिम्पायचे. फेसबुकचा जमाना अजून आलेला नव्हता. त्यामुळे कुणाचे कुणाशी लफडे आहे याचे पोस्ट्स असल्या खऱ्याखुऱ्या शिमिट-विटांच्या भिंतीवर व्हायचे, किंवा एखाद्याच्या त्याच्या शत्रूबद्दल असलेल्या प्रेमळ भावना व्यक्त व्हायच्या. कुणी येरू परगावहून आला असेल तर तो स्वत:चे नाव तारीख  लिहून टाकून आपली सहल अजरामर करायचा. थोडक्यात, आज जो माल सोशल मीडियावर असतो तो सर्व एका ठिकाणी मिळायचा. पण यातून लोक सौंदर्यदृष्टी गमावून बसले. भिंत पिवळी राहिली नाही. एकूणच कश्शाकश्शात आपल्याला सौंदर्यदृष्टी राहिली नाही. भिंतीचं राहोच, मुंबईत एवढे उड्डाणपूल बांधले गेले, त्यात कुठेही सौंदर्य दिसत नाही असं नुकतंच आमच्या लक्षात आलं आहे. म्हणजे तसं कळलं नसतंच, पण अवघा महाराष्ट्र सौंदर्यविषयक ग्लानीत झोकांड्या खात असताना, सौंदर्याची अफाट जाण असणारा एक युगपुरुष दादरच्या 'बालमोहन' मध्ये तयार होत होता याची इतके दिवस आम्हाला काहीच कल्पना नव्हती. इतर सर्वसामान्य बालकांसारखाच हा बालक दिसायचा. आमच्यासारखेच इयत्ता पाचवीपर्यंत धनुष्यबाण खेळायला आवडणारा, पुढे कोण व्हायचंय असं विचारलं तर बाणेदारपणे "रेल्वे इंजिनचा ड्रायव्हर" असे सांगणारा. चित्रंबित्रं ठीक काढायचा. आम्हाला खात्री होती की हा लेकाचा त्याच्या चित्रकार काकांकडून काढून घेतो. एकदा बहुधा काकांनी चित्र काढून दिले नसावे. याने मग स्वत:च काहीतरी काढले आणि मास्तरांना दाखवले. मास्तर ते पाहून लालबुंद झाले आणि त्याला ओणवे राहायची शिक्षा दिली. "अश्लील लेकाचा" असे काहीसे ते पुटपुटल्याचे आम्ही ऐकले. मास्तर मग बाहेर गेल्याचे निमित्त साधून आम्ही हळूच ते चित्र पाहिले आणि आम्हीही सटपटलो. पण त्याच्या या बिनधास्तपणाने आम्ही इम्प्रेस पण झालो होतो. मोरू त्याला म्हणालासुद्धा,"च्यायला, हिम्मत आहे रे तुझी! आमचं काही धाडस झालं नसतं बुवा!" त्यावर तो म्हणाला, "तुम्ही आणि मास्तर दोघेही दगड आहात दगड! तुम्हाला चित्रकलेतलं ओ की ठो कळत नाही! एवढं छान धनुष्यबाण काढलं आहे मी, त्यात काय वाईट आहे?" आम्ही कागद फिरवून पुन्हा नीट पाहिले आणि डोक्यात प्रकाश पडला! पण मास्तरांचंही काही चूक नव्हती, आडवे धनुष्य आणि बाणाचे टोक खाली हे सगळे प्रकरण जरा अश्लीलच दिसत होते. "अरे पण तू हे असं आडवं का काढलंयस? त्याने सगळा घोळ झालाय." त्यावर खुदाई खिन्नतेने तो म्हणाला, "तुम्ही असेच दूधभात करत राहा! सौंदर्याला अनेक कंगोरे असतात, ते व्यक्त करणाऱ्या रेषा सरळ उभ्या सरधोपट कधीच नसतात. धनुष्यबाण उभा, बाणाचं टोक उजव्या दिशेला असा काय नियम आहे? असलाच तर असले नियम तोडणे हे तीक्ष्ण बुद्धीच्या सौंदर्यवाचकाचं व्यवच्छेदक लक्षण आहे." त्याच वेळी आम्हाला लक्षात यायला हवं होतं. कॉलेजमध्ये त्याची ही सौंदर्यदृष्टी अजूनच तीक्ष्ण झाली. कॉलेजच्या व्हरांड्यामध्ये टीपी करताना एखादं छानसं मॉडेल दिसलं की आम्ही ते हॉटेलमधील "आजचे ताजे पदार्थ"चा बोर्ड वाचल्याप्रमाणे वरून खाली असं वाचत जात असू. त्यावेळी हा "हे सौंदर्य चिरंतन टिकणारे नाही. आज तिच्या हातात तुम्हाला वह्या दिसत आहेत. मला अजून पाचसहा वर्षांनी त्याच ठिकाणी किरकिरे पोर दिसते आहे. आज त्या बटा कपाळावर झुलताहेत, काही वर्षांनी त्या स्वयंपाक करताना डोळ्यावर येतात म्हणून घट्ट अंबाड्यात जातील. आज जो सलज्ज कटाक्ष तुम्हाला घायाळ करतो आहे, ज्यात तुम्ही येण्यासाठी धडपडता आहात, तोच उद्या कठोर लक्ष ठेवण्यात बदलणार आहे आणि तुम्ही त्यातून लपण्याचा प्रयत्न करीत असाल. तेव्हा मित्रांनो आत्ताच्या बटांत, कटाक्षात, ठुमक्यात, कोकिलध्वनीत सौंदर्य शोधू नका. नंतरच्या झिंज्यात, क्रुद्ध नजरेत, ठणक्यात आणि कोकलध्वनीत शोधा. तेच शाश्वत आणि चिरंतन आहे. तुम्ही हे जग सोडेपर्यंत तेच तुमच्या उशाशी दिसेल." असा सल्ला देत असायचा.

पुढे आमचे मार्ग वेगळे झाले. धनुष्यबाणवाल्या चित्रकाराचे जीवन पूर्वीही संपन्न होते. शाळाकॉलेज संपल्यावर तो त्याच संपन्न जीवनात निघून गेला आणि आम्ही जगण्याच्या धडपडीत हरवलो. तो पुढे काकांच्याच व्यवसायात पडला, आपली सौंदर्यदृष्टी तेथे वापरू लागला अशा बातम्या यायच्या. मी ड्राफ्टसमन झालो, मोरू कुठल्या तरी औषधाच्या कंपनीत सेल्समन म्हणून लागला. पण आमची मैत्री टिकून राहिली. आम्ही भेटत राहिलो. आमच्या बोलण्याचे विषय ठरलेले नसायचे. बहुतेक वेळा फार न बोलता आम्ही एखाद्या उडप्याच्या हॉटेलमध्ये जायचो. मी मसालादोसा घ्यायचो, मोरू इडलीवडा सांबार, चटणी एक्स्ट्रा मागवायचा. अशी खादी करून झाली की तो त्याच्या घराच्या दिशेने फुटायचा, मी माझ्या. मी रेषांच्या जगतातील चित्तरकथा सांगायचो, तो कुठले औषध अजिबात घेऊ नये हे सांगायचा. सौंदर्यदृष्टी वगैरे विषय कधी आमच्या नात्याला शिवला नाही. शिवाय उडप्याच्या हॉटेलात सौंदर्य हा शब्दही फाऊल ठरतो. "दोन नंबर टेबलपे दो दोसा देना, एक एक्स्ट्रा चटणी" हे असले संवाद, इडलीडोसा, सांबार आणि काउंटरवरील अण्णाने "मंत्रालया"च्या राघवेंद्रस्वामींसमोर नुकतीच लावलेली उदबत्ती यांच्या संमिश्र वासात कोणत्या सौंदर्याचे विचार डोक्यात येतील बरे? आलेच तर समोरच काळाकभिन्न अण्णा सगळ्यांकडे रोखून लक्ष ठेवून असायचा. त्याला पाहिले की "नौ बजे स्पॉट, नौ बजकर पाच मिनट पे मोमेंट आउर नौ बजकर पंधरा मिनटपे गेम होगा" हेच डायलॉग ऐकू आल्यासारखे वाटायचे. सौंदर्यवाचक विचार कुठल्या कुठे पळून जायचे. मोरू तर त्याला जाम घाबरून असतो. त्याच्या मते हे हॉटेल म्हणजे अण्णाचा नुसता दाखवायचा धंदा आहे. त्याचा खरा धंदा कार्नेटिक संगीतसमारंभात घटम वाजवायचा आहे असे तो म्हणतो. "एकदा अण्णाला मुंडू नेसून सकच्छ नेसलेल्या बायकांच्या घोळक्यातून षण्मुगानंदमधून बाहेर पडताना पाहिले होते. हातात घटम होता त्याच्या." इति मोरू. खरे खोटे देव जाणे. बाकी सदैव गल्ल्यात हात घालून चिल्लर खुळखुळवणाऱ्या अण्णाला घटम वाजवताना पाहणे म्हणजे केजरीवालना संघाच्या गणवेशात इफ्तार पार्टीत पाहिल्यासारखे आहे. लग्नाचं म्हणाल तर जी पहिली मुलगी सांगून आली ती सांगून आली हेच नशीब असे म्हणत पसंत करून दोनाचे चार हात झाले होते. पुढील एक दोन वर्षांत हिनेही तेच सांगून माझा अंदाज बरोबर ठरवला. "दिसण्यावर जाऊ नकोस, ते काय कुणाच्या हातात असतं? पण मुलगा सालस आहे. ठरवलंन तरी बाहेर काही भानगडी करू शकणार नाही." असं तिच्या बाबांनी तिला सांगितलं होतं म्हणे. मोरूनंही मुलीबद्दल काय अपेक्षा काय आहेत असं विचारल्यावर "मुलगी असावी आणि तिला कुळथाचं पिठलं करता यावं" एवढीच माफक अपेक्षा समोर ठेवली होती. कुळिथाच्या पिठल्याविषयी मोरू तडजोड करायला तयार नव्हता एवढंच काय ते त्याच्या जीवनातील छोटंसं नाट्य. तात्पर्य आमचे सौंदर्यविषयक ज्ञान आमच्या कपाळावरील रेषांमध्ये सीमित झाले होते.

अशात अचानक 'तो' भेटला. नेहमीप्रमाणे मी आणि मोरू अण्णाच्या हॉटेलात बसलो होतो आणि सचिंत मुद्रेने डोसा की इडलीवडा या विचारद्वंद्वात होतो. नेहमीप्रमाणे दोश्याचा विजय होणार असं वाटत होतं तेवढ्यात काहीसा गलका ऐकू आला. पाहतो तर अण्णा गल्ल्यामागून उठून बाहेर आला होता. त्याने चक्क प्यांट घातली होती. गल्ल्यामागे बसताना तो नुसता आकाशकंदील छाप चट्टेरीपट्टेरी पायजमा घालून बसतो असा मोरूचा अंदाज होता, तर मला तो मुंडू नेसून बसतो असे वाटायचे. आज कळले. असो. तर, पाहतो तर 'तो' समोर उभा. त्याच्यासमोर चेहऱ्यावर अत्यंत भक्तीभाव आणून अण्णा उभा होता. "सार, आपन सोता आमच्या हॉटेलमदी? आमचा नसीब फळला आमच्यावर आज. जय म्हाराष्ट्र! ए तंबी, स्पेशल फिल्टर कॉफी आन जल्दी." "ओळखलंस काय रे चिंतामणी?" मी आणि मोरूने झापड मिटली आणि "अरे हो हो, ओळखलं म्हणजे काय ओळखलंच! जय धनुष्यबाण! जय म्हाराष्ट्र!" असे वंदन केले. तसे हात वर करून मला थांबवत म्हणाला,"हां हां! धनुष्यबाण नाही आता. आता सुपरफास्ट रेल्वे इंजिन." तसे मी आणि मोरू राजकारणाच्या भानगडीत पडत नाही. "असं होय. आम्हाला वाटलं, ते आडवं धनुष्य तू उभं करून त्याला प्रत्यंचा जोडली असावीस. आणि काय रे, या तुझ्या इंजिनामागे एकही डबा दिसत नाही कसा तो? यार्डात चाललेलं इंजिन आहे की काय?" असं काहीसं मी म्हणालो. त्यावर तो म्हणाला,"मित्रा, तुझा दोष नाही. तुला सौंदर्यदृष्टी असती तर कळलं असतं. हा समोरचा उड्डाणपूल पहा. त्याच्याकडे पाहून तुला काय वाटतं?" मी आणि मोरू एकमेकांकडे बावचळून पाहू लागलो. मी म्हणालो,"पुलाकडे पाहून काही वाटायला काय ती माधुरी दीक्षित आहे? बरा आहे आपला. कधीमधी चालता चालता अचानक पाऊस आला तर पटकन त्याखाली उभं राहता येतं. हा पूल तसा समाजवादीही आहे. गोरगरीब रात्री त्याच्या आश्रयाला येतात. पावभाजी, अंडाभुर्जीच्या गाड्या लागतात." त्यावर तो एकदम भडकला. जोरात टेबलावर हात आपटून म्हणाला,"हेच! हेच आपलं दळिद्रीपण. अरे पूल बांधायचा म्हणजे काय फक्त त्यावरून गाड्या जातील आणि खाली भिकारी झोपतील यासाठी? अरे इंग्रजांच्या काळातील इमारती पहा, पूल पहा! काय एकेक दगड! आजही शाबूत आहेत. का? त्यांना तशी सौंदर्यदृष्टी होती. हे बघ." टिकाऊपणाचा आणि सौंदर्यदृष्टीचा काय संबंध असावा असा विचार मी करत होतो. माझ्या वडिलांनी तीस वर्षांपूर्वी घेतलेले पायपुसणे अजून जपून ठेवले आहे. त्यांना त्यातील सौंदर्य आवडले असावे की टिकाऊपणा? तसेच काहीसे असावे असा अन्वयार्थ मी लावत असताना त्याने पिशवीतून कागदाची गुंडाळी काढली. "ही आहे विकासाची ब्ल्यू प्रिंट. बिल्डर लोकांनी वाटेल तशी बांधकामं करून मुंबईची वाट लावली आहे. आपण पण बिल्डर आहे कबूल, पण आपण फक्त बंद पडलेल्या मिल्स घेतो. खरूज व्हावी तशा झोपडपट्ट्या, डोंगरावर अतिक्रमण करून बांधकामं चालू आहेत. हे मला थांबवायचं आहे. आज लोक म्हणतात वाघ बिबटे वस्त्यांत येऊन हल्ले करताहेत. अरे, ते तुमच्या घरात नाही आलेले, तुम्ही त्यांची घरं हिसकावून घेऊन ही कॉंक्रीटची जंगलं उभारता आहात. बघ, बघ ही ब्ल्यू प्रिंट!" असं म्हणून त्यानं माझ्यासमोर तो नकाशा ठेवला. आता आपल्याला त्याच्याएवढी सौंदर्यदृष्टी नाही हे कबूल, पण नकाशा एखाद्या चांगल्या ड्राफ्टसमनकडून तरी करून घ्यायचा. चांगला ए१ साईझचा पेपर वाया कशाला घालवायचा? नॉर्थ दाखवली नव्हती. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया वर की खाली ते कळत नव्हतं. अनेकठिकाणी पुलांच्या सांकेतिक खुणा होत्या. मी म्हणालो,"पण मला एक सांग, हे जे पूल घाणेरडे बांधले आहेत म्हणून तू म्हणतो आहेस, तेव्हा सत्तेत धनुष्यबाणाबरोबर तूही होतास ना? त्याचवेळी तुझी सौंदर्यदृष्टी लावून टाकली असतीस म्हणजे हा प्रश्न आला नसता. बाकी छानच आहे रे चित्र. तुला पहिल्यापासूनच ही दृष्टी आहे. एक सांगू? पुढच्या वेळी ड्रॉईंग काढून हवं असलं तर माझ्याकडे ये, मी उत्तम ड्राफ्टसमन आहे. फुकट ड्रॉईंग आणि प्रिंट देईन करून." त्याने आमच्याकडे अगदी शाळेत जशा नजरेने पहायचा तसेच पाहिले आणि म्हणाला,"खरंच, तुला सौंदर्य कशाशी खातात ते कळत नाही."

Thursday, October 2, 2014

खर्जातला षड्ज

परवा असंच कुठंतरी कुमार गंधर्वांची मुलाखत सापडली. त्यात ते तराण्याचं उदाहरण घेऊन गाण्यातील सौंदर्यस्थळांचं मर्म उकलून सांगत होते. तानेसरशी हातवारे होत होते, बोटे हलत होती. मध्येच थांबून ते म्हणाले,"हे बोट असं काय उगीच जात नाही. तिथं काही तरी सौंदर्य दिसलेलं असतं म्हणून ते आपोआप तसं जातं." कलाकाराचं हृद्गतच होतं ते. मनस्वी कलाकार असेच असावेत. एक धून सापडलेली असते त्यात सतत धुंद. गाणं जेव्हा अशा उंचीवर पोचतं तेव्हा मला वाटतं कलाकाराचा एकदम साधक होऊन जातो. त्या अज्ञात गूढतत्वाचा शोध घेणारा. गाणं गाणं राहत नाही. ते पंच तत्वांचाच एक भाग आहे हे जाणवू लागतं. विश्वाच्या उगमाचा ध्वनी म्हणजे ओंकार, तो ओंकार सतत गाण्यात जाणवत राहतो. मग अशा कलाकाराचं सर्वसामान्य जगणं हे या जगातील नसतं. माणसांमध्ये उठबस चालू असते, शरीरधर्म चालू असतात, लौकिकार्थानं जगणं चालू असतं. पण हे सगळं होत असताना मस्तकात तो अनाहत ध्वनी, चराचर सृष्टीचा मूल नाद जो ओंकार, तो अखंड चालू असतो असं मला वाटतं. अशा वेळी कुमार गंधर्व हे गायक वाटत नाहीत. ते गायनाच्या पलीकडे जाऊन गूढाचा शोध घेणारे तपस्वी वाटतात. साधकाची जशी समाधी लागते तशीच गायकाची लागू शकते. एकदा कुमार गंधर्वांच्याच संदर्भात एक गोष्ट ऐकली होती. ते म्हणाले होते, "शुद्ध सूर लागणे कठीण असते, पण जर तो लागला तर अंत:करणात झगझगीत पण शीतल असा प्रकाश पडतो. मी एकदा असा अनुभव घेतला आहे." निर्विकल्प समाधी लागणे आणि हा अनुभव एकच असावा. पण सौंदर्य "दिसणे" म्हणजे काय?

संगीतच काय, कोणतीही कला अशी हृदयाला कशी काय भिडते? त्यात आपण समाधी कशी काय अनुभवू शकतो? हे काय नाते आहे? संगीताच्या सूरमेळ्यात एखादा विसंवादी सूर लागला की आपल्या कपाळावर आठ्या कशा येतात? त्यात नेमके काय आवडलेले नसते? अमूर्त चित्रकलेतील जाणकारांना शब्दांपलीकडील काय दिसत असते? अनेक वर्षांपूर्वी, जुगलबंदीचा एक नवीन प्रयोग केला गेला होता. मला वाटतं दिवाळीचे दिवस असावेत. गाणे आणि चित्रकला यांचा एक अदभुत असा संगम केला गेला होता. दोन्ही क्षेत्रातील दिग्गज त्यात होते. पं. भीमसेन जोशी गात होते आणि त्या गाण्याशी संवाद साधत होते चित्रकार एम एफ हुसेन. गाण्याला रंग भरणे काय ते त्यादिवशी अनुभवले. अरे? खरंच, खर्जातला षड्ज लागला अन डोळ्यासमोर मंदिरच आले. गजबजलेले नव्हे. प्रात:काळचे. अजून येजा चालू न झालेले. भल्या पहाटे, स्नान करून ओलेत्याने शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा, गाभाऱ्यात फक्त गंभीर मंत्रोच्चाराचा आवाज घुमतो आहे, गाभारा पाण्याने भरला आहे. प्रदक्षिणा घालून कळसावर नजर टाकली तर तिथे भगवा फडकतो आहे, तसे. होय, या षड्जाचा रंग भगवाच. धीरगंभीर भगवा. पाहिलं तर तिथे कॅनव्हासवरही भगव्या रंगाचे फटकारे उमटले होते. मला वाटतं पुढे मग हुसेन यांच्या रंगांना प्रतिसाद म्हणूनही  भीमसेन जोशींच्या गळ्यातून सूर उमटत होते. गायक, चित्रकार आणि श्रोते/प्रेक्षक एक झाले होते. कोणत्या नाळेने या तिघांना एकत्र बांधून ठेवले होते? प्रसिद्ध रशियन चित्रपट दिग्दर्शक तारकोव्स्की याच्या "सॅक्रिफाईस" चित्रपटाची सुरुवात बाखच्या सुरावटीने (सेंट मॅथ्यूज पॅशन) होते. ते सूर आपल्याला पिळवटून सोडतात. कॅमेरा मग लिओनार्डो दा व्हिन्सीच्या "अडोरेशन ऑफ मॅगी" या पेंटिगवर येतो. आणि सुरु होते दृकश्राव्य मैफल. ते पेंटिंग आणि बाखचे सूर एकाच प्रकारचे आकृतिबंध मनात निर्माण करतात. हे नाते कुठून येते?

मानवी मन आकृतिबंध शोधण्यासाठी उत्क्रांत पावले आहे. एखाद्या गोष्टीचे आकलन होणे म्हणजे ज्ञात अशा आकृतिबंधाशी त्या गोष्टीचे साम्य आढळणे. जिथे असे साम्य आढळते तिथे आपला प्रतिसादसुद्धा आपोआप ठरलेला असतो. जिथे असा आकृतिबंध शोधता येत नाही तिथे आपण हे आपल्या आकलनापलीकडील आहे असे आपण म्हणतो. पण हे झाले जड विश्वाबद्दल. अमूर्त विश्वाबद्दल कसं ठरवायचं? जिथे सर्वसाधारण आकृतिबंध लागू पडत नाहीत अशा रंग/संगीत विश्वातील कोणते हे आकृतिबंध आहेत जे संस्कृती, भाषा, प्रांत अशा सर्व चौकटीच्या पलीकडे जाऊन आपल्याला अमूर्ताशी जोडतात? बाखच्या त्या सुरावटींनी हृदयात जसे गलबलून येते तसेच ठुमरी ऐकतानाही का होते? आपल्या कानाला मर्यादित आवाक्यातील स्वर ऐकू येतात, मर्यादित वर्णपटातील रंग दिसतात. तरीही या मर्यादित स्वररंगातून असे कोणते आकृतिबंध निर्माण होतात जे सर्वांशी एकाच प्रकारचे नाते जोडतात? आपण सर्व या विश्वाचे भाग आहोत, ज्या अणुरेणूंनी ही चराचर सृष्टी बनली आहे त्यांच अणुरेणूंची आपली शरीरे, ज्ञानेंद्रिये आहेत. संगीतात रममाण होताना आपण त्या विश्वाशी एकरूप होऊन जातो, ते अद्वैत अनुभवतो म्हणून आपल्याला तो अनुभव दिव्य, आनंददायक असा वाटत असावा. म्हणूनच पं. जसराजांचा खर्ज ऐकला की विश्वाच्या सुरुवातीची आदिपहाट अनुभवतो आहोत असे वाटते. आपल्या ज्ञानेंद्रियांना मर्यादा आहेत. विश्वाचे खरे स्वरूप कदाचित आपल्याला पूर्णपणे कधीच समजू शकणार नाही. पण काही अंशी का होईना, त्याचे स्वरूप कळू शकेल, त्याचे कारण समजू शकेल, त्याची अनुभूती देऊ शकेल असे माध्यमतरी आपल्यापाशी आहे हे काय कमी आहे?