Monday, September 8, 2014

शंभर दिवसात शंभर रुपये

"आमच्या दिवसात महाराजा, काय मज्जा होती म्हणून सांगू! शंभर दिवसात शंभर कोटींचा गल्ला येत होता. जेवणाची फुरसत नाही की आंघोळीची. एकदा बायकोनं लैच कडकड केली म्हणून आंघोळ केली, त्यात अर्धा तास गेला, तेवढ्यात धा लाखांची लुसकानी झाली पार्टीची. संध्याकाळी फोनवरून आमची बिनपाण्यानं झाली ती वेगळीच. तेव्हापासनं कानाला खडा लावला आहे." बाबासाहेब सातारकर गतकाळच्या आठवणीत गुंतले होते. बोलताना अधूनमधून गळ्यातल्या ताईताला स्पर्श होत होता. नवसाचा ताईत तो. खास दिल्लीत जाऊन हजरत-ए-दस-जनपथच्या दर्ग्यात जाऊन स्वत:ला गालीचा बनवून दर्ग्यात पसरायचं आणि हजरते आला सोनिया बेगम यांनी सपाद (गरजूंनी योग्य तो अर्थ घ्यावा) तुडवले की त्या ठिकाणची धूळ तावीजात बंद करून ठेवायची. परवरदिगार म्याडम यांच्या परवानगीने मग त्यांचाच छोटासा गोड फोटू त्यावर लावायचा. मग तो तावीज बेगमसाहिबांच्या पायावर ठेवायचा. बेगमसाहिबांनी स्वहस्ते जर तो गळ्यात घातला तर मग काय, उन्मनी अवस्थेत जाऊन तत्काळ निर्विकल्प समाधी लागायची. अशा समाधीचा भंगही तत्काळ व्हायचा. पृष्ठभाग चोळत स्वगृही परतायचे. दिल्लीत धुंदी तर गल्लीत अंदाधुंदी असायची. गल्लीबोळांतून हल्ला करायला टपलेले, गळ्यात चमकणारा तावीज बघून मागे सरायचे. ती चमक टिकेपर्यंत मग चिंता नसायची. "मग फक्त एकच काम. म्याडमनी दिलेला कोटा पूर्ण करणे. शंभर दिवसात शंभर कोटीचे उद्धिष्ट म्हणजे काही खायचे काम नाही महाराजा! नवीन नवीन टेन्डरं काढणं, फायलींवर सह्या न करणं हे तर नेहमीचे मार्ग. पण आदर्श घरकुल योजना, सिंचन योजना, कोळसा खरेदी, मुळा-मुठा सुधार, पुणे बीआरटी असली घबाडं काही सारखी सापडत नाहीत. ती शोधावी लागतात, कधी कधी निर्माण करावी लागतात. पण बेगमसाहेबांना कोण सांगणार? त्यात आमच्या आमच्यात स्पर्धा इथं. आम्ही सह्या न करून काही गल्ला येतोय का बघायचं तर ज्यांच्या फायली, त्यांच्या शेपटावर पाय पडून ते केकाटणार आणि ते तडक दिल्लीला जाऊन तक्रार करणार. पण तरीसुद्धा आम्ही कधी गल्ला कमी होऊ दिला नाही." बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. "अरे ही असली घबाडं शोधून काढणारी संस्थाच बरखास्त करायची? नियोजन आयोगाची निर्मिती हा काही योगायोग नव्हता. मुळात ते कमिशन प्लानिंग आहे हे लक्षात घ्या. नावात जरा उलटापालट झालीय. कमिशनं कशी घ्यावीत, काढावीत, याचं नीट प्लानिंग केल्याशिवाय कमवायचं काय आणि कसं? महाकॉंक (पक्षी: महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटी) आता काय करणार?"

"तुम्हाला म्हणून सांगतो. शिंपी, डॉक्टर आणि पत्रकार यांच्यापासून काही लपवू नये म्हणतात. हे तिघेही आपल्याला कधीही नागवे करू शकतात. आमच्या सगळ्या नाड्या यांच्या ताब्यात. त्यांनी घट्ट धरून ठेवलेल्या  म्हणून आम्ही वाचतो. तेव्हा तुमच्यापासून काय लपवायचे? आत्ता काही महिन्यांपूर्वी सणसणीत कानफटीत खाल्लेल्या या नारबाला स्वत:ला लोकांशी कसा संपर्क करायचा हे ठाऊक नाही, आणि हा आता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतो आहे. प्रचारादरम्यान तलवारी, सुरे, कट्टा, घोडा वगैरे अंगावर ठेवू नका, हजाराच्या नोटा बाळगू नका, शंभरच्या ठेवा हे काय मार्गदर्शन झालं? मार्गदर्शनाची पुस्तिका काढली आहे म्हणे. म्हणजे पहिल्यांदा कार्यकर्त्यांचे प्रौढ साक्षरता वर्ग घ्यावे लागणार. तरी आम्ही सांगितलं होतं जोडाक्षरं फार ठेवू नका, र ट फ करण्यात निवडणुका उलटून जायच्या. एक बरं आहे, मार्गदर्शक पुस्तिकेत चित्रंसुद्धा आहेत. व्यंगचित्रं पाहून कार्यकर्ते उत्साहात येतील अशी आमची धारणा आहे. नारबांचे व्यंगचित्र म्हणजे "प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट" अशी परिस्थिती आहे. कधी ते प्रत्यक्षात व्यंगचित्र वाटतात तर कधी व्यंगचित्रात प्रत्यक्ष वाटतात. व्यंगचित्रकार आमच्या दोस्तीतले. त्यांना ब्ल्यूप्रिंटच्या नादानं जरा ग्रासलं होतं. एवढं की त्या छंदापायी त्यांनी स्टुडीओ विकला, रंग विकले, नुसते ब्रश राहिले होते. म्हटलं त्यांनाही जरा काम मिळेल. त्यामुळे आमचं चित्र जरा हलक्या ब्रशने काढा असं सांगितलं होतं त्यांना. तर त्यांनी एवढ्या हलक्या हाताने काढलंय की मागच्या पानावर काढलेल्या माणिकरावांच्या छबीची ठळक उंदीरछाप मिशी माझ्या नाकाखाली दिसते. पण माझे भरघोस केस माणिकरावांना मिळून माणिकराज चकरे हे नवीन व्यक्तिमत्व निर्माण झाल्याचा भास होतो. शेवटी, माझी मिशी तुमचे टक्कल अशीच तडजोड करून आमचा पक्ष सत्तेत राहिला आहे. असो. तर मुद्दा असा की कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी काही मुद्दाच राहिला नाही. मग कुणीतरी शंभर दिवसांचा मुद्दा सुचवला. प्रथम घाबरलोच. शंभर असा शब्द ऐकला की "दिवस सरले" किंवा "अपराध भरले" असलंच काही तरी डोक्यात येतं. लहानपणी कृष्णाच्या गोष्टी ऐकून ऐकून डोक्यावर फार परिणाम झाला आहे. त्या गोष्टी आता प्रत्यक्षात येताहेत असंच वाटायला लागलं आहे. गोष्टीतील कृष्ण तरी बरा. नेहमी मुरली वाजवून आयाबाया, गायीगुजी (दोन्ही शब्द केवळ योगायोगाने लागोपाठ सुचले, उगाच त्यात जास्त अर्थ शोधू नये ही विनंती) यांचे मनोरंजन करणारा, गवळणींच्या मडक्यातील लोणी लांबवून मुलांना मज्जा देणारा, असा तो गोवर्धनगिरीधारी. निरुपद्रवी असे त्याचे खेळ. अगदी स्नान करणाऱ्या गोपींची वस्त्रे लपवून ठेवली तरी थोरामोठ्यांना त्याचे कौतुकच वाटायचे (अर्रे लब्बाडांनो!). हा असला कन्हैय्या आम्हाला केव्हाही चालला असता. पण सध्याच्या या गुजरदेशीच्या कन्हैयाने गोपींची वस्त्रे तर राखलीच आहेत उलट आमचीच धोतरे पळवली आणि भलतेच विश्वरूपदर्शन जगाला घडवून आणले आहे."

"पण आम्हाला अगदी योग्य मुद्दा मिळाला आहे. शंभर दिवसात काही केले नाही. शंभर रुपयेसुद्धा आणले नाहीत. पस्तीस अब्ज डॉलर वगैरे नुसत्या गप्पा आहेत हो गप्पा! आम्ही काही ते पाहिले नाहीत आणि त्यांनीही दाखवले नाहीत. पस्तीस अब्ज डॉलरचं एवढं काय ते कौतुक! तेवढे तर एकट्या आमच्या स्विस…" बाबासाहेब इथे चपापून गप्प झाले. पलीकडे नारबा घसा खरवडून सांगत होते,"शंभर दिवसांत काळा पैसा परत भारतात आणणार अशा घोषणा यांनी केल्या! प्रत्यक्षात आणल्या काय? मग शंभर दिवस काय केले?" बाबामहाराजांनी त्यांना बाजूला खेचले आणि काहीतरी त्यांच्या कानात सांगितले. नारबा एकदम वरमून म्हणू लागले,"म्हंजे आमचा तसा काय्येक म्हणणां नाय हो. पैसो काय काळो किंवा गोरो असो काय नसतां. काय समाजल्यात? मी तर म्हणतंय पस्तीस अब्ज डॉलर हाडल्यात मां, ते स्विस ब्यांकेतच गुंतवन टाका असां मी म्हणां होतंय." नंतर रुमाल काढून पाच मिनिटं घाम पुसत उभे होते. आमची आणि त्यांची जरा घसटण. पण हल्ली मला पाहिल्यावर मालवणीत एक सणसणीत शिवी हाणत आणि विचारपूस करीत. आज त्यांना घाम पुसताना पकडलं त्यामुळे मला शिवी बसली नाही. पण, मालवणी भाषेत वाक्याची सुरुवातच शिवीने होते त्याला ते तरी काय करणार? "भैनीक xxx! कसो बरोबर येतंस नको त्या येळेस रे?" अशा नांदीने सुरुवात करून म्हणाले,"शंभर दिवसांत ह्यां एक काम करूक नाय या मोदीन, तां बरां झालां. पण दिल्लीतल्या आमच्या आवशीन आमका बोंब मारूक तर सांगल्यान. म्हणजे आमची बोंब करूक नाय म्हणान आमीच बोंब मारतलो अशी पंचाईत झालीहा. आमी आता शंभर दिवसांत कायेक करूक नाय म्हणान बोंब मारूची की काय्येक करूक नाय ही रवळनाथाची कृपा म्हणूची? श्या:! काय समाजना नाय. मी आपलो कणकवल्येक जातंय कसो. ओ बाबामहाराजानू, तुम्हीही जावा वांयच थोडे दिवस साताऱ्याक."

No comments:

Post a Comment