Wednesday, September 3, 2014

मारा जापान ट्रावेल

एअर इंडियाचे विमान उतरले. आमचे प्रंपूज्य वडाप्रधान येणार म्हणून हातात हार घेऊन गेला तासभर उभे होतो. विमानाला जिना लावला गेला आणि द्वार उघडले. आतून "कोनिचिवा!" असा माफक भरड्या आवाजातील चिवचिवाट ऐकू आला आणि प्रथम पोट, मग दाढी आणि मग उरलेसुरले वडाप्रधान बाहेर आले. त्यावरून विमानाचा पृष्ठभाग गोल असतो असे अनुमान आम्ही काढले. चला, शाळेतील समुद्र-क्षितीज-जहाजशीड दृष्टांताचा उपयोग असा का होईना झाला. तसे मी मोरूला म्हणालो तर मला म्हणतो, दोन्ही वस्तू गोल असतील तर? हा मोऱ्या म्हणजे… मोरू आणि मी इयत्ता तिसरीपासूनचे मित्र. एकाच सायंशाखेत गेलो, प्रत्येक शिबिरात गेलो, प्रत्येक अभ्यासवर्गात मांडीला मांडी लावून बसलो. बौद्धिक ऐकून झोप आली की एकमेकांची पाठ वापरून बसल्याबसल्या झोपायचो. रात्रीच्या भोजनानंतर बौद्धिक का असा प्रश्न मला आजही पडतो. आठ वाजता भोजन, नऊ वाजता बौद्धिक आणि दहा वाजता दीपनिर्वाण. बहुतेकांचे निर्वाण सव्वानऊपर्यंत झालेले असायचे. त्यातून नंतर रक्षकाची डयुटी लागली असेल तर कल्याणच. अशा वेळी कुणी खोडी काढली की निर्वाणीची भाषा यायची. अगदी टगे म्हणून ओळखले गेलेलेही बौद्धिकाच्या वेळी 'जळाहूनही शीतळू' होऊन बापुडवाणे बसलेले असायचे. वक्त्याच्या तोंडतोफेतून 'समग्र हिंदुराष्ट्र', 'राष्ट्राला समर्पित जीवन', 'राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या व्यापक संदर्भात' असले भारी भारी गोळे सुटायचे आणि आम्ही बळेच उभे केलेले एकाग्रतेचे बुरूज ढासळायचे.  शिबिराच्या दुसऱ्या दिवशी बौद्धिकाच्या धाकाने रात्रीचे जेवण जायचे नाही. मला आणि मोरूला बौद्धिक घेणाऱ्याच्या डोळ्यांत आसुरी आनंद दिसल्याचा भास व्हायचा.

वडाप्रधान दारात निवांत उभे राहिले, त्यांनी अत्यंत समाधानाने पोटावरून हात फिरवत सर्वत्र दृष्टी फिरवली. त्यांच्या चेहऱ्यावरील ते समाधान पाहून आम्हाला वाटले आता टूथपिकने दात कोरत डोळे मिटून घेणार. कदाचित ढेकरसुद्धा देतील. पण  'मुझे पता है, क्या करना है, कब करना है और कैसे करना है' असे त्यांचे धोरण असल्याने जांभईसुद्धा देतील. कुणी सांगावं. त्यांच्या या धोरणामुळे बारामतीचे जाणते राजेसुद्धा हैराण झाले असल्याचे कळले. वास्तविक हे त्यांचे कुरण. पण कुणालाही कुठल्याही कुरणात फार काळ चरता येत नाही हेच खरे. तूर्तास वडाप्रधान विमानाच्या शिडीवरून खाली उतरले. उतरता उतरता मध्येच थबकले आणि त्यांनी मागे वळून पाहिले. "वाह! याला म्हणतात यशस्वी दौऱ्याचे सिंहावलोकन!" इति मोरू. तेवढ्यात त्यांनी स्वीय सहाय्यकाच्या कानात काहीतरी सांगितले. तो धावत परत वर गेला आणि काही मिनिटात परत आला. येताना त्याच्या हातात एक डायरी आणि पेन होते. त्याने ते वडाप्रधानांच्या हातात दिले. मग ते समाधानाने परत शिडी उतरू लागले. वडाप्रधानांचे कैसे ते चालणे, कैसे ते बोलणे. आम्हांस अगदी भरते येऊन हार आणि हात उंचावून आम्ही पुढे जाऊ लागलो तो मागून प्रचंड वेगात कुणीतरी आले आणि पुढे गेले. मी आणि मोरू दोघेही त्या वेगाने बाजूला धडपडलो. पाहतो तो एक सुबकठेंगणी साडी अवगुंठित मूर्ती वडाप्रधानांना बोका देत होती. फुलांचा. वडाप्रधानांनी स्मित हास्य केले आणि पटकन कमरेत झुकून "कोनीचिवा! हाजीमेमाश्ते! ओगेन्की देस-का?" असे उद्गार काढले. त्यावर "अरेवा! मी छान दिसते? हो! देसी म्हणून काय विचारता? अस्सल देसीच साडी हो!" असे सलज्ज उद्गार त्या मूर्तीने काढले. "अरे! या तर आमच्या मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स!" असे मी मोरूस म्हटले. मोरू म्हणाला, "होय. या आल्यापासून सगळ्यांची एक्सटर्नल अफेअर्स बंद झाली आहेत. आधी कितीतरी जण या पदासाठी धडपडत होते. त्यात त्या पर्रिकरांनी हे 'भायेल्ल्या भानगडीचो मंत्री" असे पद असल्याचे सांगितले. मग तर काय ते शशी थरूर आणि दिग्गीराजे धावत आले, मी मी करत. त्यांना कामाचे खरे स्वरूप कळल्यावर ते परत फिरकले नाहीत.

वडाप्रधान आता मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या कानाशी लागून काहीतरी विचारत होते. सवयीनुसार मी आणि मोरूने जवळ जाऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. पण "दादामुनी, भडकू, तब्येत, त्रागा" असे काही मोजके शब्द वगळले तर फारसे ऐकू आले नाही. वडाप्रधानांचे आमच्याकडे लक्ष गेले. आम्ही चपापून आमचे डोके मागे आणि हातातला हार पुढे केला. त्याकडे दुर्लक्ष करून ते निघाले. तेवढ्यात मोरूने धाडस करून त्यांना विचारलेच, "जपानवारी कशी झाली? काही सांगाल का?" वडाप्रधान थबकले,"चोक्कस! पैणत्रिस अबज डोलर घेऊन आला ने. आणि काय पायजे रे तुला?" "तुम्ही ढोल बडवत आहात असा फोटो आमी पाह्यला. त्याबद्दल सांगा ना. आपल्या संस्कृतीचेच ढोल ना?" मोरूला पोच म्हणून नाही. वडाप्रधान जरासे क्षुब्ध झालेले दिसले. तत्काळ आज्ञा दिली," संघ! दक्ष! अग्रेसर!" त्यासरशी, कुणीही न सांगता अमितभाई जाऊन त्यांच्यापुढे उभे राहिले. "संघ सम्यक!" अमितभाईंनी डावीकडे उजवीकडे पाहिले, कुणीच नव्हते. त्यांनीच आधीच्या जुन्या अग्रेसरांना रिटायर्ड करून टाकले होते आणि आता स्वत: एकटेच उभे होते. मग वडाप्रधानांनी आज्ञा दिली,"अग्रेसर, आरम!" अमितभाई पहिल्यापासून आरममध्येच होते, ते पाय पसरून आणखीच आराममध्ये गेले. वडाप्रधानांनी त्यांचा नाद सोडून मग "संघ! संपत!" अशी आज्ञा दिली. मग मी आणि मोरू पुढे जाऊन अमितभाईंच्या मागे उभे राहिलो. आता पुढचे काहीच दिसत नव्हते. सुदैवाने,"उपविश!" अशी आज्ञा मिळाली आणि आम्ही सर्व खाली बसलो. मी मोऱ्याला म्हणालो,"काही गरज होती का विचारायची? घे आता सगळ्यांना बौद्धिक मिळणार." मोरू चूप बसला.

वडाप्रधान बोलू लागले. "उपस्थित स्वयंसेवक, माननीय परराष्ट्र मंत्री, आदरणीय ध्वज, पूजनीय सरसंघचालक, आणि आसेतुहिमाचल असा खंडप्राय आपला देश, ज्याला पाच हजार वर्षांचा इतिहास लाभला आहे, अभिमानास्पद अशी परंपरा लाभली आहे, यांना मी वंदन करतो. आजवर या भूमीवर अनेक परकीय चक्रे आली, आक्रमणे झाली, घोड्यांच्या टापांनी धुळीचे लोट उठले त्यांनी अनेक वर्षे आपल्या देशाचे आकाश झाकोळून गेले. या टापांखाली हिंदुधर्म तुडवला गेला, सर्वांना सामावून घेणाऱ्या सहिष्णुतेचा अंत पाहिला गेला. परंतु या सर्वांना तोंड देत हा हिंदुधर्म टिकून राहिला, आपली परंपरा अबाधित राहिली. पण आपल्या या भारतमातेचे लचके तोडले गेले. मस्तकावरील जणू आभूषण असा गांधार, जिथून साक्षात गांधारीने जन्म घेतला, ते आभूषण हिसकावून घेतले गेले. आपल्या लेकरांना जणू कवेत घेणारा असा सक्षम उजवा स्कंध, तो तोडला गेला. तिथे अभद्र असे पापस्तान निर्माण झाले आहे. डाव्या काखेमध्ये त्याच पापस्तानाने खरूज निर्माण करून ठेवली आहे. हिमालय, काश्मीर हे आपले मस्तिष्क, ते छिन्न करणाऱ्या कारवाया आजही चालू आहेत. हे झाले परकीय आक्रमण आणि त्याचे परिणाम. याहीपेक्षा भयानक असे आक्रमण आवाज न करता आपल्यामध्येच गेली कित्येक वर्षे होते आहे, ते आक्रमण आपल्या मातेच्या हृदयाचेच लचके तोडत आहे. इंग्रजी सत्तेविरुद्ध असलेला लढा एका वळणावर येऊन पोचला होता. स्वातंत्र्य आधी की समाजप्रबोधन आधी? समाजप्रबोधन होण्याआधीच स्वातंत्र्य मिळाले तर ते पचवता येईल का? इंग्रजांनी नुसता देश जिंकला नव्हता, तर संस्कृतीही जितली होती. पराभूत संस्कृतीचा तेजोभंग करणे सोपे असते. इंग्रजांनी तो बरोबर केला आणि कारकुंड्यांची प्रजा निर्माण केली. या प्रजेकडून उठावाची भीती नव्हती, क्रांतीचीही नव्हती. तरीसुद्धा काही क्रांतिवीर निर्माण झाले, त्यांनी आपल्या प्राणाची आहुति देऊन स्वातंत्र्याची पहाट घडवून आणली. परंतु देशाला जोडून ठेवणारा एक धागा लागतो तो धागा आपल्याला अद्यपि सापडलेला नाही. वस्त्र एकसंध नसेल तर लज्जारक्षण कसे होईल? म्हणूनच प्रखर राष्ट्रप्रेम हेच ते सूत्र….".

मी बहुधा भाषणाच्या सुरुवातीला वासलेला आ मिटला नसावा. मध्येच त्यांचे माझ्याकडे लक्ष गेले आणि त्यांच्या वाणीचा ओघ थांबला. मी वरमून तोंड मिटले. वडाप्रधान अजूनही माझ्याकडे रोखून पाहत होते. मी अस्वस्थ झालो. तोंड तर मिटले, अजून काय उघडे राहिले आहे असा विचार करू लागलो. मग ते म्हणाले,"ते तुजा दोस्त बग, झोपा काढते, तेला उठव." मी दचकून मोऱ्याकडे पाहिले तर लेकाचा खाली मान घालून छान झोपला होता. त्याला ढोसून जागे केले. खडबडून जागे होत मला म्हणतो कसा,"आं! संपलं बौद्धिक?" मी शरमेने वडाप्र्धानांकडे पाहिले. ते हसत होते. ते म्हणाले,"तुला काय वाटते, बौद्धिकचा कायच उपयोग नाय होत? ते जपानचा वडाप्रधान आपल्याला चायपे चर्चाला बोलवते तर आपण काय फकत चायच पिऊन येल काय रे? आपणपन खास मसालावाली चाय घेऊन गेले तेच्यासाठी. तेंचा कसला तो चा. नुसता पानी. तेला बोललो हे बग अस्सल चाय. पिऊन सुपडा साफ होएल. तेंच्या सगळ्याला आपला उत्तर तयार होता. ते केंडो घेवन आला, तर आपण आपला संघाचा दंड दाखवला. सामुराईची तलवार काढला तर आपण खड्ग तयार ठेवला. बुद्धाची मूर्ती दाखवला तर आपण तेला लालूप्रसादचा फोटो दाखवला. बोललो, हे बग हा आयटम पण त्याच मातीतला आहे जिथे बुद्ध जन्माला आला. तुला सांगतो, लालूचा फोटो बगून रडला रे येवढा मोठा माणस. बोलला, बुद्धाने भारत सोडून लय नुकसान केला रे भारताचा. मग मी पुढले चाळीस मिनिट त्याचा बौद्धिक घेतला. एक्केचाळीसाव्या मिनिटाला जपानचा वडामिनिस्टर फुटला. बोलतो, कृपा करून थांब रे, आपण इन्वेस्टमेंटला तैय्यार हाय. पैणत्रिस अबज डोलरचा एमओयू साईन केला ताबडतोब." मी आणि मोरूने तत्काळ वडाप्रधानांना साष्टांग नमस्कार घातला. नमो! नमो!

No comments:

Post a Comment