Tuesday, September 2, 2014

गोष्ट मराठी बाण्याची

एक बाणा होता. मध्यमवर्गीय, सुशिक्षित बाणा. अभिमानानं सांगायचा, मी मराठी. "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी ती टरफले उचलणार नाही" असं स्वाभिमानानं सांगणारा मी, "जिथं फुलं वेचली तिथं गवऱ्या का वेचीन?" यातला भावनाशील मी अन, "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' यातला खुशालचेंडूही मीच. शिवाजी जन्माला यायला हवा, पण तो शेजारी ही उक्ती वापरात आणणारा तो मी , आणि खरंच शेजारी शिवाजी जन्माला आलाच तर स्वत: सूर्याजी पिसाळ बनणारा तोही मीच. मोडेन पण वाकणार नाही ही माझी व्याख्या, पण वेळ आल्यास लव्हाळे होऊन प्रपात सोसावा हा माझा खरा खाक्या. देवळात सत्राणे उड्डाणेला टिपेचा स्वर लावणारा मी, आणि आरतीची थाळी आली की नुसताच निरांजनावरून हात फिरवून दक्षिणा वाचवणारा मीच. जुन्या दिवसांच्या आठवणी काढून वाडे, चाळी होते तेव्हा कसे सगळे भाडेकरू एकत्र कुटुंब होते असं म्हणून टिपं गाळणारा मी, आणि अज्जिबात प्रायव्हसी नाही हो इथं असं म्हणून थंडगार भावनाशून्य फरशी बसवलेल्या सदैव बंद दार असलेल्या ब्लॉकमध्ये जाणाराही मीच. सदैव विरोधाभासात जगणं किती कठीण आहे, पण मराठी माणसानं ते सहज आत्मसात केलं आहे, नव्हे, जणू काही त्याची कलाच केली आहे. समाज मानसशास्त्र, गर्दीचे अथवा समूहाचे मानसशास्त्र असे विषय आहेत त्यात मराठी मानसशास्त्र हाही एक स्वतंत्र विषय व्हावा. कारण मराठी माणूस हा गर्दी असेल पण समूह नाही. गर्दीत उभा राहील, पण नाईलाजाने. डोक्यात "सगळे लेकाचे मरायला आजच इथे तडफडले आहेत" हे विचार. एरवी गर्दीत आनंदात उभा असेल तर ती डोंबाऱ्याने जमवलेली गर्दी किंवा जिथे प्रवेशासाठी दाम मोजावे लागत नाहीत असल्या सभा-भाषणांची असायची. असा मी मराठी बाणा, सचिन तेंडुलकरचा अभिमान बाळगणारा, पण आपण आऊट झालो की जळफळाट करून आपली ब्याटबॉल घेऊन घरी जाणारा.

मराठी माणसाला नेमकं काय हवं असतं? मुंबईतील भय्ये पुण्यात येऊ लागले तेव्हा नाराजी व्यक्त झाली. पण मराठी व्यावसायिकांनी हेच भय्ये कष्टाळू आणि कमी दरात काम करणारे म्हणून कामावर ठेवले. पानवाले, जे फायनल फ्रंटियर होते, मराठी माणसाने शेवटी तिथेही नांगी टाकली आणि ते व्यवसाय भय्यांना चालवायला दिले. गुजराती, मारवाडी धंदे करायला वस्ताद, गोड बोलतील आणि कसलाही माल गळ्यात मारतील अशी टीका होते, पण त्यांची दुकाने सतत उघडी असतात, ते अकरा ते चार वामकुक्षीसाठी दुकाने बंद ठेवत नाहीत, "घेणार असाल तर काढून दाखवतो" अशी बडबडही करत नाहीत. एकदा पुण्यात लक्ष्मी रस्त्यावरील एका प्रसिद्ध दुकानात प्लास्टिकच्या पिशवीसाठी पंचवीस पैसे सुट्टे नाहीत असे म्हटल्यावर माझ्या हातात ठेवलेला ब्रेड मालकांनी काढून घेतला होता. पदार्थ दुकानात येण्याआधी तो "संपल्या" ची पाटी तयार ठेवणारे गजाभाऊ आपण गुणवत्तेत तडजोड करीत नाही तर नियमात का करावी असा काहीसा विचार करीत. अलीकडेच गजाभाऊंचे देहावसान झाले. आता त्यांनीच घालून दिलेल्या तत्वानुसार "गजाभाऊ संपले" अशी पाटी दुकानाबाहेर लावली असेल का असा एक विचार माझ्या मनात येऊन गेला. फाळणी झाली, पाकिस्तानातून निर्वासितांचे लोंढे भारतात आले. त्यांना निर्वासित तरी का म्हणायचं? आपल्याच देशात परके होऊन स्थलांतर करायला लागण्याइतके दु:ख नाही. पण मराठी माणसांनी त्यावर फुंकर मारणे तर सोडा, त्यांना निर्वासित अशी छान पदवी दिली. पण हे निर्वासित कष्टाळू होते. त्यांनी या पदवीकडे दुर्लक्ष करून आपापले व्यवसाय उभे केले. डोक्यावर छप्पर नसलेल्या या लोकांनी आज बहुमजली इमारती उठवल्या आहेत, पण आजही "जा रे, जरा त्या निर्वाशिताच्या दुकानातून गूळ घेऊन ये पावशेर" असली वाक्ये ऐकू येणारी घरे मराठीच.

संकोच, लाज, भिडस्तपणा, दु:स्वास ही सर्व विशेषणे फक्त आपल्या बाण्याला लागू होतात. द्वेष फारसा कधी नसतो. द्वेष करायला जरा धाडस लागते. अंगावर आले तर शिंगावर घ्यायची तयारी लागते. तरीही यांच्या जोडीला जाज्वल्य अभिमान नावाचे विशेषणही कधीतरी उभे राहते ते केवळ प्रासंगिक. आपला गणपती, शाळा, कट्टा, खेळ यापासून हा अभिमान पार आपले आवडते भेळेचे दुकान इथवर पोचतो. खेळावरून आठवलं, आपल्या मरहट्ट बाण्याने खेळसुद्धा साजेसे काढले आहेत. कबड्डी, खो खो, आट्या-पाट्या. सर्वात एक गोष्ट सारखी - कुणाला पुढे जाऊ द्यायचं नाही. खो घालायचा, तंगडी ओढायची, अडवणूक करायची यासारखी मज्जा नाही. कुस्ती हा एक मर्दानी खेळ, पण सुशिक्षित मराठी बाणा त्यापासून लांब राहतो. पण कुस्तीतील काही डाव वापरण्यासारखे आहेत हे तो विसरलेला नाही. पट काढणे, खडाखडी करणे, अचानक धोबीपछाड घालणे असले काही अप्रतिम डाव आपल्या बाण्याने आत्मसात केले आहेत. अर्थात हे सगळं खरं असलं तरी मराठी मनुष्य सर्वांचा हेवा समप्रमाणात करतो, हाही त्याचा गुण समजायला हवा. आपली माणसे म्हणून काही कौतुक करणे, त्याला उत्तेजन देणे असला अप्पलपोटेपणा त्याच्याकडे नसतो. तंगडीत पाय घालून पाडताना मग तो मराठी आहे का दाक्षिणात्य अथवा पंजाबी असा दुजाभाव नसतो. केळीच्या सालीवरून पाय घसरून पडताना सगळेच विनोदी दिसतात.

प्रश्न असा पडतो की मराठी मध्यमवर्गीय सुशिक्षित बाण्याची गोष्ट अशी का झाली? बुद्धीची कमतरता नाही, कलेची कमी नाही. दिगंत कीर्तीचे शास्त्रज्ञ, खेळाडू, संगीतकार, गायक, नट आपल्यात होऊन गेले, अजून आहेत आणि पुढेही होतील. प्रत्येकाला स्वतंत्र ओळख असेल अशी गुणवत्ता आपल्यात असते. लहानपण काही हलाखीत वगैरे गेलेले नसते. उगाच रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास वगैरे करावा लागलेला नसतो. आईबापेही काही मुलांना वाऱ्यावर सोडून क्लबपार्ट्या वगैरे करत फिरलेले नसतात. रोज संध्याकाळी हातपाय धुवायला लावून, शुभंकरोति कल्याणं, पाढे, परवचा असे सगळे साग्रसंगीत झालेले असते. प्रभाते मनी राम चिंतून सायंकाळी मना सज्जना भक्तिपंथेचि जावे लागलेले असते. पण 'सदाचार हा थोर सांडू नये तो' हे म्हणताना 'सदाचार हा थोर सांडून ये तो' असे म्हटले गेले आणि इथे घोळ झाला. जो सदा चार ठिकाणी सांडून येतो तोच मानव जनी धन्य होतो. समर्थांचीच थेट आज्ञा ती. पाळणे भागच होते. त्यामुळे भक्तिपंथावर फिरतानाही पदोपदी अनेकांचे सांडलेले सदाचार दिसायचे. ज्ञानेश्वरांनी एवढे विश्वाचे गूढ उकलून दाखवले, पण संन्याशाला मुले होणे अलाऊड नाही या नियमावर बोट ठेवून तत्कालीन मराठी बाण्याने त्यांना तुमचे साहित्य आम्हांस दाखल करून घेता येत नाही असे सांगितले. संपादकाकडून परत आलेले साहित्य पाहून साहित्यिकाला किती वेदना होतात याची जाणीव आम्हांस आहे त्यामुळे ज्ञानेश्वरांचे अकाली समाधी घेणे समजण्यासारखे आहे. आम्हीही एकदा आमची एक कविता साभार परत आल्यावर स्वत:ला खोलीत कोंडून घेतले होते. नेमके त्याच दिवशी आमच्या हिला भरल्या वांग्याची भाजी करायचे सुचले. ज्ञानेश्वरांचे बरे होते, समाधीसाठी गुहा अशी करवून घेतली होती की मुक्ताबाईनी मांडे वगैरे केले असते तर त्याचा वास त्यांच्यापर्यंत पोचून मन विचलित झाले नसते. मुक्ताबाईंचे मांडे मनातच राहिले. तो योग आमच्या नशिबी नव्हता. भरल्या वांग्याचा घमघमाट आमच्या खोलीतच काय अख्ख्या चाळीत पसरला होता. मग समाधी काय कधीही घेता येईल असा विचार करून भरल्या वांग्याचा यथेच्छ समाचार घेतला. त्यानंतर जी झोप लागली ती समाधीसम होती. तिकडे एकनाथ महाराजांना एक पैशाच्या तुटीवरून लोकांनी फार छळले. त्यांनी रामायण लिहिले, भागवत पुराण लिहिले, भारुडे लिहिली, पदे लिहिली. या सर्व साहित्यनिर्मितीकडे पूर्ण दुर्लक्ष करून लोकांनी एक पैशावर बोट ठेवले. एकनाथ महाराजांना झोप लागेना, तळमळत दिवस जाऊ लागले. अशा अवस्थेत त्यांना साक्षात्कार झाला. गोदावरीच्या वाळवंटात त्यांना गाढवात ब्राम्हण दिसले. पण ब्राम्हणांस ते रुचले नाही. त्यांनी गाढवात आणि आमच्यात फरक कळत नाही होय रे असे म्हणून एकनाथांवर यथेच्छ लत्ताप्रहार केले. गाढवांनीही संप वगैरे करून कुंभार मंडळींची पंचाईत केली. गाढवांची समजूत काढता आली परंतु ब्राम्हण अडून बसले. मदत करणाऱ्याला लाथ मारण्याची प्रथा आजही मराठी बाण्यात रूढ आहे. असो. थोड्याअधिक फरकाने सर्व संत मंडळींस मराठी बाण्याचा झटका बसला. आपल्या स्वाभाविक संतप्रवृत्तीमुळे या संतांनी मराठी बाण्याला विरोध केला नाही. अपवाद फक्त रामदास स्वामी आणि तुकाराम यांचा. लोकांनी प्रथम या दोघांनाही त्रास देऊन पाहिला. समर्थांचा संयम फार काळ टिकला नाही. त्यांनी तत्काळ व्यायामाला सुरुवात करून विरोध संपवला. तुकारामांनी प्रथम फारच थंड घेतले आणि खूप त्रास सहन केला. पण लोकांनी त्यांची गाथाच पाण्यात टाकून त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. हे म्हणजे अतीच झाले. कितीही उर्मट संपादक असो, साहित्य निदान उलटटपाली परत पाठवतो. मग या दोघांनीही कासेला लंगोटी बांधली खरी, पण नाठाळ लोकांच्या माथी मारायला काठी आणि पाठीत हाणायला कुबडी हाताशी ठेवली. आज मराठी बाणा या दोघांचेही नाव आदराने घेतो. मनाचे श्लोक मनात का होईना म्हणतो तरी. तस्मात, मराठी बाण्याला उत्तरही मराठी बाण्याचेच लागते. इत्यलम.

No comments:

Post a Comment