Wednesday, September 10, 2014

सीडी प्लेअर

जुन्या वस्तूंच्या बाजारात कधी काय मिळेल सांगता येत नाही. असाच एक टेपरेकॉर्डर आम्हाला नुकताच आढळून आला. प्ले, स्टॉप, रीवाइंड, इजेक्ट, रेकॉर्ड एवंगुणविशिष्ट सुविधांनी युक्त अशी त्याची जाहिरात करण्यात आली होती. दर बुधवारी हा बाजार भरतो. मी आणि मोरू उगाचच असल्या बाजारात फिरतो. नशीब असेल तर कोहिनूर हिरासुद्धा सापडेल अशी दोन खात्रीलायक ठिकाणे आहेत. एक बुधवारी भरणारा हा चोरबाजार किंवा आमच्या हिची पर्स. मी आणि मोरू चोरबाजारात लीलया संचार करतो, पण आपापल्या बायकांची पर्स या भूभागापासून आम्ही लांब राहतो. एकदा माझ्या बायकोने घर शाकारणीला काढावे तसे आपली पर्स उलटीपालटी करून आतला खजिना सार्वजनिक प्रदर्शनासाठी खुला केला होता. "अशी कशी मिळत नाहीत? अगदी परवाच तर काढली होती." अशा प्रास्तविकाने सुरुवात झाली की ओळखायचं, हरवलं म्हणून मला दोष देण्यासारखी वस्तू नाहीये. त्याने जरा अंगी बळ देऊन मी विचारलं,"अच्छा, काय नेमकं मिळत नाहीय?" "इअररिंग्ज. अगदी पर्वाच सुमीच्या लग्नात घातले होते मी." मी चाचरत म्हणालो,"अगं, परवा? आठवड्यापूर्वी सुमी बाळंतीण झाली ना? तेव्हा डिंकाचे लाडू घेऊन तूच तर गेली होतीस बाळाला बघायला!" तर त्यावर,"उगाच कटकट करू नका हो! इथं शोधायच्या कामी उपयोग शून्य आणि नको त्या गोष्टी लक्षात ठेवून मला सांगता." असे उत्तर मिळाले. आणि एकदम,"अय्या!" असा आनंद आणि आश्चर्यमिश्रित असा चीत्कार ऐकू आला. मला वाटलं मिळाल्या इअररिंग्ज. पण हा आनंद कुठली तरी जुनी परंतु बहुमूल्य अशी हेअरपिन मिळाल्याचा असल्याचे निदर्शनास आले. असेच उत्खनन चालू ठेव, मोहेंजोदारो हडप्पा संस्कृतीचा शोध असाच लागला होता असे मी तिला प्रामाणिकपणे सांगितले तर तिने नेहमीप्रमाणे त्याचा उलटाच अर्थ घेतला आणि मला खोलीबाहेर हाकलले. पण गोष्ट सत्य आहे. तिथे उत्खननात सापडलेले बहुतांशी पुरावशेष हे बायकांचे दागिने आहेत. यावरून त्याकाळीही पुरुषांच्या वस्तूंना किमत नव्हती असे दिसते. बायकांच्या या दागिन्यांच्या सोसापायी एक महान संस्कृती लय पावली असे माझे नम्र मत आहे. इतिहासातून शिकण्यासारखे खूप असते.

मी आणि मोरूने बारकाईने त्या टेपरेकॉर्डरचे निरीक्षण केले. तो जुनाट तर दिसत होताच. त्यात कॅसेट आणि सीडी दोन्ही वाजवायची सोय दिसत होती. कॅसेटप्लेअर विभागातील प्ले, रीवाइंड आणि पॉज् ही तीन बटने अपार झिजून त्यावरची संकेतचित्रे धूसर झाली होती. सीडी प्लेअर भाग मात्र वापरलेला दिसत नव्हता. एकूण बांधणी अगदीच कचकड्याची, एकदम चायनामेड दिसत होती. आम्ही विकणाऱ्या इसमास विचारले,"काय हो, कुठल्या कंपनीचं म्हणायचं हे यंत्र?" आता चोरबाजारात वस्तूचे मूळ आणि कूळ दोन्ही विचारणे हा फाऊल आहे. त्या इसमाने तिरसटपणे आमच्याकडे पाहिले आणि म्हणाला,"ओ भाऊ! घ्यायचा तर घ्या नाय तर चालू पडा! खालीपिली भोनीच्या टायमाला वेळ नका खाऊ!" मोरूने चष्मा काढला होता आणि कमरेत नव्वद अंशात वाकून तो टेपरेकॉर्डरचे साधारण सहा इंचावरून निरीक्षण करत होता. "चिंत्या! इथे काही तरी लिहिले आहे रे! साला किती जुना आहे हा ऐवज कुणास ठाऊक. ब्रँडसुद्धा धूसर संदिग्ध!" मग पूर्ण एकाग्रतेने काही क्षण पाहिल्यावर मोरू म्हणाला,"च्यायला! अपानासोनिक? हे कसलं नाव रे?" मी बारकाईने पाहिले आणि म्हणालो,"मला पहिली तीन अक्षरे लागताहेत ए ए पी. खी:खी:खी:! मोऱ्या, अपान काय रे? जपान असेल." मोरू म्हणाला," नाही रे, क्यापिटल ए, क्यापिटल ए , क्यापिटल पी, आणि पुढे ए, एन, ए, एस, ओ, एन, आय, सी. अपानासोनिकच. आणि योग्यच नाव आहे रे! हे बघ. पुढून क्यासेट लावायची, पण स्पीकर मागे. आवाज मागून येणार. क्यासेट अथवा सीडी पडता पानीं  येई आवाज अपानी!" त्या यंत्राचे खालून वरून निरीक्षण करत मोरू म्हणाला,"अरे, बहुतेक मला हा ब्रँड माहीत आहे. ही कंपनी काही फार जुनी नाही. एक दोन वर्षापूर्वी निघालेली. दिल्लीतल्या पहाडगंजबिंज भागातील उत्पादने जशी असायची तसेच हेही उत्पादन. जास्तीतजास्त वर्षभर टिकायचे, मग भंगारवाल्याकडे जमा करायचे. हे बघ! त्या मर्फीच्या बाळाप्रमाणे या कंपनीनेही एक गोंडस चेहरा आपला लोगो म्हणून टाकला होता, तोही अंधुक दिसतो आहे." मोरूने बोटाने धूळ साफ करत मला दाखवले. गांधी टोपी घालून त्यावरून पोचवायला जाताना जशी टापशी गुंडाळतात त्याप्रमाणे गुंडाळलेला मफलर घातलेला चेहरा अंधुक दिसत होता. मर्फीचे बाळ गोंडस दिसायचे, पण हे बाळ खोंडस दिसत होते. कधीही चावेल असा भाव त्यावर होता. "काय हो, हे यंत्र चालू करून बघता येईल का?" मोरूने पुन्हा त्या इसमास विचारले. तो इसम विचारात पडला. "काय म्हाईत नाही, बघा बटन दाबून, झाला तर झाला. हे काय शोरूम नाही. सक्काळी दुकान लावत होतो तर एक जण अंधारातून बाहेर आला. मला म्हणाला, लै गरज आहे, काय दोन पाचशे मिळाले तर उपकार होतील. मी म्हणलो, माल तर दाखव अदुगर. तर पोत्यातून हे अठराशे सत्तावनच्या बंडातलं डबडं काढून माझ्या हातात ठेवलं. मी म्हणलो काय चेष्टा करता काय राव? आपलं दुकान चोरबाजारातलं आहे कबूल, पण भंगारवाल्याचं नाही. मला म्हणतो, शपथ घेतली होती, आयुष्यात कधी चोरबाजारात येणार नाही, तिथे काही विकणार नाही, काही घेणार नाही. पण नाईलाज झाला. दिसण्यावरून जाऊ नका. कंपनीनं एकमेव बनवलेला पीस आहे हा. व्हिण्टेज पीस. एके काळी दिल्ली गाजवलीय या पीसनं. कुणी जाणकारानं पाहिला तर तुमची किंमत वसूल होईल. त्याच्या चेहऱ्यावर अजीजी दिसत होती. आपण चोरीच्या वस्तू इकतो, पण आपल्यालापण माणुसकी आहे. दिले थोडेफार पैसे त्याला. वस्तू चालू आहे की नाही ते पण पाहिलं नाही."

मोरू खटपट करून टेपरेकॉर्डर चालू होतो आहे का ते पाहत होताच. मध्येच तो उद्गारला,"अरे! यात सेलच नाहीत. आणि विजेची केबलही नाही म्हणजे फक्त सेलवर चालणारा दिसतो." हे ऐकल्यावर आमचा तो कनवाळू दुकानदार म्हणाला,"अरे हां! विसरलोच. त्या गूढ इसमाने एक पिशवीपण दिली आहे. त्यात सेल आहेत बहुधा. " त्याने ती काढून पाहिली तो काय, खरेच त्यात सेल होते. तेही दिल्लीतील कुठल्या तरी गूढ ठिकाणी बनवलेले दिसत होते. नाव मात्र अगदी मॉडर्न होते. सोनिया छाप सेल. ते सेल घातल्यावर, कॅसेटप्लेअर आपोआप चालू झाला. आणि वर्णन करता येणार नाही अशा आवाजातील खरखर सुरू झाली. बोलणाऱ्याला बहुधा डांग्या खोकल्याचा विकार असावा. "साथियो, आप सब लोगोंकी जानकारी के लिए बता दें, की अभी अभी हम, तीनसो सत्तर पेज का, सबूत, पुलिस थानेमें बाबा रामदेवजी के नेतृत्वमें देके आ रहे हैं, कॉमनवेल्थ खेलोंके भ्रष्टाचार के खिलाफ, पुलिसमें हम रिपोर्ट दर्ज कराके आ रहे हैं…" दचकून मोरूने आणि मी एकमेकाकडे पाहिले. वाटले, महत्वाचा पुरावा आपल्या हाती लागला आहे. हा टेपरेकॉर्डर दुसऱ्यातिसऱ्या कुणाचा नसून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गुप्तहेर, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, राजकीय स्टिंग ऑपरेशनचे जनक, आ.आ. पा. (आपणच आपल्याला पाडू) प्रायव्हेट लिमिटेडचे मालक, श्री केजरी मस्तवाल (तिहार रिटर्न) यांचाच आहे अशी आमची खात्री पटली. आणि त्या डांग्या खोकल्याची खूणही पटली. आता काय जबरदस्त पुरावा मिळतो याची उत्सुकता लागून आम्ही ध्यान देऊन ऐकू लागलो. "साथियो, आप सब लोगोंकी जानकारी के लिए बता दें, की अभी अभी हम, तीनसो सत्तर पेज का, सबूत, पुलिस थानेमें बाबा रामदेवजी के नेतृत्वमें देके आ रहे हैं, कॉमनवेल्थ खेलोंके भ्रष्टाचार के खिलाफ, पुलिसमें हम रिपोर्ट दर्ज कराके आ रहे हैं…" अरेच्या? पुन्हा तेच? मोरूने टेप थोडी फ़ॉरवर्ड केली. "…कॉमनवेल्थ खेलोंके भ्रष्टाचार के खिलाफ, पुलिसमें हम रिपोर्ट दर्ज कराके आ रहे हैं…" मोरूने पुन्हा फ़ॉरवर्ड केली. यावेळेला पुन्हा तो डांग्या खोकला ऐकू आला. बदल म्हणून जरा बरेच वाटले. पण पुन्हा "…की अभी अभी हम, तीनसो सत्तर पेज का, सबूत, पुलिस थानेमें बाबा रामदेवजी के नेतृत्वमें देके आ रहे हैं, कॉमनवेल्थ खेलोंके भ्रष्टाचार के खिलाफ…" हेच ऐकू आले. मग कंटाळून मोरू म्हणाला,"चिंत्या, च्यायला सगळ्या कॅसेटभर तेच आहे असं दिसतंय." आमचे चेहऱ्यावरील भाव पाहून दुकानदार चिंतेत पडला असावा. आधीचा मगरूर भाव लोपून त्याठिकाणी थोडी अजिजी आली,"साहेब, काही पण द्या. भोनीला नुसकानी नको." मोरू म्हणाला, "काही म्हण चिंत्या, नग व्हिंटेज मात्र आहे. चालला नाही तरी, या लोगोसाठी कुणी म्युझिअम नक्कीच विकत घेईल." असं म्हणून त्यानं लोगोवरची धूळ पुन्हा पुसली. त्या दुकानदाराची दृष्टी त्या लोगोवर पडली. चमकून तो म्हणाला,"साहेब, हेच ते ध्यान, मला चुना लावून गेलं सक्काळी सक्काळी. मी दुकान काढलं पण माझ्याशीच सौदा करून गेला हा. मानलं याला. चोरबाजार कमिटीवर घेतला पाहिजे. साहेब, तुम्ही काही देऊ नका, मीच तुम्हाला देतो, पण हे डबडं घेऊन जा इथून." पण माझं आणि मोरूचं चोरबाजारातून हिंडायचं पण काही घ्यायचं नाही असं तत्व आहे.

No comments:

Post a Comment