Friday, September 5, 2014

शेतीची नवी पद्धत

"खरीप हंगामासाठी लागणारी औजारे दुरुस्त करून ठेवावीत. कुळव, पाभर कोळपी, खुरपी, फवारणी यंत्र अशी सगळी हत्यारे नीट चालताहेत ना ते तपासून ठेवावे. खरीप हंगामासाठी आवश्यक त्या बियाण्यासाठी खते, कीटकनाशके यांचा साठा करून ठेवावा. जमिनीचे मगदूर पाहून बाष्पीभवन, तापमान हे सगळे पाहून पाण्याची तरतूद करून ठेवावी. सांगली कोल्हापूर भागात ऊस फार, मग पाणीही तसेच हवे. उसाला कोल्हा लागला तर ऊस लाल पडतो हे लक्षात ठेवा. सुदैवाने कृष्णा, पंचगंगा यांचे मुबलक पाणी असल्यामुळे आणि बारामतीचे शेतकरी तिथे नसल्यामुळे बरे आहे. इतर भागात गव्हाचे काड, उसाचे पाचट, भाताचा पेंढा, लाकडाचा भुसा, पॉलिथिन इत्यादींचे थर देऊन जमिनीवर आच्छादन करावे. त्याने पाणी जमिनीत टिकते. जागोजागी कॉंग्रेसगवत, तण माजले आहे त्याचा प्रथम निकाल लावावा. त्यासाठी वारा शांत असताना पाच पर्सेंट डीडीटी धुरळावी. कोल्हापूर सांगली भागात माजलेले कॉंग्रेसगवत हल्ली डीडीटीलाही दाद देत नाही, त्यासाठी प्रभावी उपायाची आवश्यकता आहे. ज्या ढेकळांवर कॉंग्रेसगवत माजले आहे ती ढेकळेच  फोडून टाका आणि त्यावर कॉंग्रेसगवतापेक्षा चिवट अशी आपलीच तणलागवड करा. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण ऊस लावला असेल तर ज्वारी लावली आहे असे सांगा, मका लावला असेल तर कापूस असे सांगा, काहीच लावले नसेल तर भुईमूग पेरले आहे, शंभर दिवसांनी पहा असे सांगा. मग तुमचे शेजारी गाफील राहून तुमच्यावर टीका करण्यात मश्गुल राहतील. " अमितभाई शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करीत होते. अमितभाई हे प्रगतीशील शेतकरी म्हणून नुकतेच प्रसिद्धीस आले होते. त्यांनी स्वत:च्या शेतात ऊस, भुईमूग आणि बांधावर हंगामानुसार भाजीपाला अशी पारंपारिक पद्धत तर अवलंबलीच, पण त्यावर न थांबता आपल्या हिरव्या हिरव्या प्रगतीचे फोटो प्रतिस्पर्धी शेतकऱ्यांच्या बांधावर लावून त्यांना चिंतित करण्याची आधुनिक पद्धत शोधून काढली. ते फोटो पाहून काही शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी अमितभाईंना कसायला दिल्या आणि स्वत: हरिभजनात काळ व्यतीत करू लागले. उरलेले हे फोटो खोटे आहेत असे सांगून आपले सडके कांदेटमाटे लोकांना दाखवू लागले.

म्हाराष्ट्रातील शेती कशी फुलेल याचं मार्गदर्शण करून सोडा असा प्रचंड आग्रह होत असल्यामुळे हा दौरा निघाला होता. वांद्र्याचे एक प्रगतीशील शेतकरी बारमाही पीक घ्या म्हणत होते तर काही जण कमळाची शेती करू, लई मागणी आहे म्हणत होते. मेळाव्याला अनेक शेतकरी आले होते. काही पारंपारिक, काही नवशिके, काही प्रगतीशील. दोन तरणेबांड प्रसन्न चेहऱ्याचे वळू जोडलेल्या बैलगाडीवर अमितभाई सवार झाले होते. दोन्ही बैल पुढे जायला फुरफुरत होते. अमितभाईंनी एका बैलाच्या पुठ्ठ्यावर थाप मारली तर दुसऱ्याचे वशिंड कुरवाळले. पहिल्याची शेपटी थरथरली तर दुसऱ्याने अतिआनंदाने भ्यॉ केले. पहिला म्हणाला, "ठरलंच. औंदा शेतात औत ओढायचा मान माझाच." दुसरा म्हणाला,"छान विनोद करतोस. पाहिलं नाहीस माझं वशिंड कसं प्रेमानं कुरवाळलं ते? मीच फड मारणार." पहिला म्हणाला,"बेट्या, कोकणात जन्मलेला मी. चिवट, औत ओढायला माझ्याशिवाय कुणी नाही इथं. तुला बैलपोळ्याला वडाभात मिळतो तर मला पुरणपोळी. तू आपला संत्र्याबरोबर एरंडेल पी." दुसरा भडकला आणि म्हणाला,"होऱ्या! ठाऊक आहे मोठा आलाय पुरणपोळीवाला! तू ओढ औत. कारखान्यावर ऊस टाकायला मीच जातो की नाही बघ." पहिला त्यावर काही बोलणार तेवढ्यात दोघांच्या माना मागे खेचल्या गेल्या आणि "हैक, हुर्र, चक चक चक" असे आवाज ऐकू आले. दोघांच्या तोंडातून ,"फुर्र, फ्याश, ह्म्म्फफ्फ" असे काहीसे नाराजी, उत्साह आणि एकमेकांशी स्पर्धा करणारे आवाज आले आणि गाडी पुढे सरकू लागली. पहिला बैलगाडी वांद्र्याच्या दिशेने ओढू लागला तर दुसरा नरिमन पॉईंटच्या दिशेने. "हो हो! हैक हैक! काय बैलं ही! सुसाट पळत्यात. आवडली आपल्याला! फक्त एका दिशेने पळवली पायजेत. आरं आपल्याला वांद्र्याला जायाचं हाय." असं म्हणून अमितभाईनी कासरा वढला आणि बैलं काबूत आणली. अमितभाईना वाटलं होतं वांद्र्याला कुणी रांगडा, छपरी मिशावाला, औत ओढून हाताला घट्टे पडलेला शेतकरी भेटणार. पण ब्यांकेत टोकन घेऊन "पाचशेच्या चालतील का? नाही? च्यायला सगळ्यांना शंभरच्या कुठून आणायच्या?" असं म्हणत पिंजऱ्यात बसलेला असतो त्याछाप इसम पाहून ते जरा चमकले. मग कुणी तरी त्यांची ओळख करून दिली. हे नुसतेच शेतकरी नाहीत तर, उत्तम फोटोग्राफर, आर्किटेक्टसुद्धा आहेत. तब्येतीवर जाऊ नका, अक्ख्या म्हाराष्ट्राच्या सातबाराचा उतारा यांनी एका ब्ल्यूप्रिंटवर उतरवला आहे. उधोजींनी बरोबर दोन पुस्तके आणली होती. ती ते काखेत धरून उभे होते. त्यात त्यांनी काढलेले फोटो होते. ती पुस्तके अमितभाईंच्या हातात देऊन ते म्हणाले,"हेलिकॉप्टरमधून काढले आहेत हे फोटो! एका फोटोला तर पार पालथं पडावं लागलं होतं. पाऊसवाऱ्याला न जुमानता, लेन्सवर पाणी उडत असताना, चष्म्यावर वाफ धरली असताना, लेंग्यात वारं शिरून तो जहाजाच्या शिडाप्रमाणे फडफडत असताना, खिशातला मोबाईल सारखा वाजत असताना फोटो काढणं कठीण असतं म्हाराजा. "पहावा विठ्ठल" च्या वेळेला आमच्या हेलिकॉप्टरच्या आवाजाने खाली रिंगण घालणारा घोडा अचानक उधळला आणि सैरावैरा गर्दीत घुसला. तेव्हा त्यावर आरूढ असलेल्या पांडुरंगभक्ताने आणि ज्यांना घोड्याच्या लाथेचा प्रसाद मिळाला त्यांनी ज्या काही शब्दात आमचे नामस्मरण केले ते आम्हाला वर ऐकू आले. ते ऐकून आमच्या मस्तकात अनेक भावनांचा कल्लोळ उठला. पांडुरंग! पांडुरंग! असे स्वत:ला बजावून ते फोटो काढले आहेत. "येक तरी वारी अनुभवावी" असे आमचे मत आहे. बाsssर! आला आहात एवढं तर आमचा झुणका-भाकरी खाऊन जा." काचेच्या प्लेटमधून झुणकाभाकरी आणि कटग्लासमधून पाणी समोर आले. "हे काय? तुम्ही नाही घेणार?" अमितभाईंनी विचारले. तसे उधोजी म्हणाले,"नाही, आम्ही सकाळीच पावशेर मनुका आणि गाईचे दूध घेतले आहे. ते आम्हाला संध्याकाळपर्यंत पुरेल. फोटोग्राफरने कसे सडपातळ असावे. तुम्हीही जरा लक्ष द्या खाण्याकडे बरं! आरशात बघून बूट घालायला लागणे बरे नव्हे. मागे कोण हो तुमचे ते वडाभातवाले…नाव अगदी तोंडावर आहे. तर ते आले माझा फोटो काढा म्हणून. फोटोत मावतच नव्हते. शेवटी पॅनोरमिक सेटिंगवर काढावा लागला. चांगला आला नाही म्हणून तणतणत आमच्या चुलतबंधूंकडे गेले. त्यांनी फोटो कसला, व्यंगचित्रच काढलं त्यांचं. इथे आमच्या बांधाला लागूनच त्यांचं शेत आहे. चांगला ऊस लावायचा सोडून स्ट्रॉबेरी लावत बसले आमचे बंधू, आता ऊसही नाही आणि स्ट्रॉबेरीही नाही. कुक्कुट आणि शेळीपालन करणार असं म्हणताहेत आता." अमितभाईंनी उधोजींना आंब्याची झाडे लावायचा सल्ला दिला. सध्या रोख पीक आहे आंब्याचं.

तिथून बाहेर पडल्यावर अमितभाईंना कुणीतरी विचारलं,"अहो हे काय केलंत? आता हे सगळीकडे आंबे लावतील. रोख पीक घेतील. आणि आम्ही बसू ज्वारी बाजरी करत. नुकसानच नाही का आमचं?" अमितभाई म्हणाले,"हे बघा, तुमची शेती आधीच लहान. पारंपारिक शेतकऱ्याकडे जमीन भरपूर, अनुभव भरपूर. तेव्हा त्यांना काम करू द्या, पीक कापणीला आलं की तुम्ही आपले ट्र्याक्टर लावा कामाला. आणि एक सांगतो. बांधावर लावलेल्या आंब्याच्या झाडांचे आंबे नेहमी शेजाऱ्याच्याच आवारात पडतात. कळलं? द्या तर टाळी! लागा कामाला." चहूकडून "वाह! वाह!" असे उद्गार आले. एकाच्या तोंडून गाणे स्फुरले,"वाण्याचा पोर कसा अकली, बिन-बैलानं शेती कशी पिकली!".

No comments:

Post a Comment