Thursday, November 27, 2014

मोबाईल आणि वीजबिल

मोबाईलच काय कुठलेच बिल भरायला आम्हाला आवडत नाही. हॉटेलचे (आमचे नेहमीचे हॉटेल सन्मान, प्रोप्रा. नार्वेकर, जेवणाची नाष्ट्याची उत्तम सोय) बिलही तिथे भांडी घासायला लागू नयेत म्हणून नाईलाजाने द्यावे लागते. आमचा आख्खा जल्म रानडे रोड, मुंबई २८ परिसरात गेला, पण आमचा अभ्यास साऱ्या विश्वाचा. (महाराष्ट्र हेच आमचे विश्व. हो, त्यात विदर्भ सुद्धा आला. विश्वापासून वेगळ्या विदर्भाची मागणी आज होत आहे त्याला आमचा कडाडून विरोध राहील. ) आमचे वाचन थोर, लेखन घनघोर हे ध्यानात घ्या. लेखकाला कुणालाही सल्ला, इशारा देता येतो. अन्यायाला वाचा फोडणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. कोणत्याही प्रक्रियेत पारदर्शकता हवी असा आग्रह आम्ही बालपणापासूनच धरत आलो आहोत. शाळेत असताना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक हस्तलिखित आम्ही सुरू केले होते. त्याला "निवळशंख" असे नाव दिले होते. स्वच्छ पाण्याची प्रतिमा आणि ठणाणा करणारा शंख एकत्र आले तर क्रांती होईल असे आमचे त्याकाळी मत होते. आजही आहे. पण हल्ली आमच्याकडे पाणी सकाळी पाच वाजता येते आणि सात वाजता जाते. त्यामुळे ते सकाळचे दोन तास निवळ आणि उरलेले बावीस तास शंख अशी वाटणी झाली आहे. "निवळशंख"चा कारभार स्वीकारल्यानंतर पहिला प्रश्न हाती आला तो प्रश्नपत्रिकेचा. इयत्ता पाचवीपासून नववीपर्यंत आम्ही या प्रश्नाला बळी पडत आलो होतो. अनेक विद्यार्थ्यांशी बोलल्यावर मास्तरांच्या मर्जीतील चारपाच आगाऊ मंडळी सोडली तर बहुतांशी आपल्याप्रमाणेच या प्रश्नाचे बळी ठरताहेत हे ध्यानात आले. मग या प्रश्नाचा आम्ही सखोल अभ्यास केला. प्रश्नपत्रिका गुप्त ठेवण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे हे तर उघड झालेच पण उत्तरपत्रिकेच्या तपासणीतही अजिबात पारदर्शकता नाही हेही विदारक सत्य बाहेर आले. "निवळशंख" च्या पहिल्या अंकात आम्ही या व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवला. "मुख्याध्यापकांचे डोके ठिकाणावर आहे काय?" या आमच्या अग्रलेखाने खळबळ माजवली. तो वाचून क्षणभर मुख्याध्यापकांनीही टोपी नीट करण्याच्या बहाण्याने आपले डोके चाचपून पाहिल्याचे आमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नव्हते. वास्तविक त्यांनी कपाळाला हात लावला होता हे आमच्या समीक्षाकारांचे म्हणणे आम्हांस मान्य नाही. अग्रलेखात आम्ही परीक्षा ही एकूणच कशी मुस्कटदाबी करणारी व्यवस्था आहे याचे विवेचन करून त्यात आमूलाग्र बदल सुचवले होते. "माहितीचा अधिकार" ही संकल्पना त्याकाळी प्रथम आम्ही मांडली होती. आज त्याचे श्रेय काही सातवी पास मंडळी उकळताहेत, पण आम्ही श्रेयाच्या मागे कधीच नव्हतो. (या श्रेयाचा आमच्या वर्गातील श्रेया परांजपेशी काही संबंध नाही. आम्ही तिच्याही मागे नव्हतो. कधीच. तिने मागे वळून चप्पल दाखवली तेव्हाही.) आम्ही "निवळशंख" मध्ये सुचवलेल्या बदलात विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकाराखाली परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत हे जाणून घेता येणार होते. माहिती नाकारल्यास विद्यार्थ्यांस फी भरण्यास आणि परीक्षेस बसण्यास नकार देण्याचा हक्क होता. पाल्यास आपले पालक म्हणून स्वत:च सही करता यावी याचीही मागणी केली होती. वह्यापुस्तके आणणे सक्तीचे नसावे, शाळेच्या वेळा या विद्यार्थ्यांस सोयीच्या असाव्यात, अशा काही उपसुधारणाही त्यात होत्या. याचा परिणाम म्हणून मुख्याध्यापकांनी छडीची मागणी केली आणि आमच्या पृष्ठभागावर अनेक सुधारणा घडवून आणल्या. भगतसिंगांचे नाव घेऊन आम्ही त्या सुधारणा ब्रही न काढता सहन केल्या. पुढच्या पिढीचे जीवन सुसह्य व्हायचे असेल तर आधीच्या पिढीत हुतात्मा जन्मास यावेच लागतात. (या वाक्यात काहीतरी चुकले आहे असे वाटते, प्रूफ रीडिंगच्या वेळेस पुन्हा पाहू.) मुख्याध्यापकांनी आमच्या "निवळशंखा"चा बोळा करून केराच्या टोपलीत टाकला. अशी मुस्कटदाबी करून हे क्रांतिकारी विचार दबले जाणार नाहीत, एक अंक नष्ट केलात पण त्याच्या इतर कॉपींचे काय कराल? पण लक्षात आले आमच्या हस्तलिखिताची ती एकमेव कॉपी होती. सर तासावर गेले की तो बोळा हस्तगत करायचा असे ठरवले.

आजही आम्ही आमचा स्वाभिमान, सन्मान इत्यादी टिकवून आहोत. "निवळशंख"ची परंपरा आम्ही चालू ठेवली आहे. विश्वातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत हा एक ज्वलंत प्रश्न आहे. त्याचा आम्ही सखोल अभ्यास केला. सावकारी, ब्यान्कांची कर्जं, वेळेला न पडणारा पाऊस, गारपीट, कीड (रेग्युलर कीड, बारामती कीड नव्हे) इत्यादी नेहमीची कारणं तर आहेतच, पण आमच्या असेही लक्षात आले की विजेचा धक्का बसूनही शेतकरी मरण पावताहेत. पाण्यासाठी मोटर बसवायची. विजेचं कनेक्शन देणारा इलेक्ट्रिशियन गावातलाच. त्याचं क्वालिफिकेशन म्हणजे "गेली धा वर्षं हे करतोय, येक पन मोटर उडालेली न्हाई" हे. मग हे कनेक्शन कधीतरी "शॉर्ट" व्हायचं आणि मोटर सुरू करायला गेलेल्या म्हादबाचं आयुष्य शॉर्ट व्हायचं. मोटर तेवढी शाबूत. असे धक्कादायक मृत्यू वाढायला लागले. मग त्याची चौकशी करायला समिती आली. त्या समितीनं वीज हेच मृत्यूचं कारण असा अहवाल दिला आणि वीज तोडा, आपोआप मृत्यूचं प्रमाण कमी होईल अशी शिफारस केली. इथंच आमचा विरोध सुरू झाला. आम्ही स्वतंत्रपणे केलेल्या चौकशीत असं लक्षात आलं की जे विजेचा धक्का बसून मरत नव्हते ते विजेचं बिल पाहून प्राण सोडताहेत. वीज तोडल्यानं एका प्रकारचे मृत्यू कमी होतील पण बिलाचं काय? वीज तोडली तरी वीज मंडळ बिलं फाडतं आहेच. तेव्हा शेतकऱ्यांनो, अजिबात विजेचं बिल भरू नका असा इशारावजा सल्ला आम्ही आमच्या दैनिक "टोमणा"तून दिला. आमचा टोमणा खडसे मास्तरांना फार झोंबला. "मोबाईलचं बिल भरता, मग विजेचं भरायला काय धाड भरलीय?" असा उन्मत्त सवाल त्यांनी केला. ते ऐकून आम्ही क्षणभर ब्याटरी संपलेल्या मोबाईलप्रमाणे निपचीत पडलो. आमच्याशिवाय दुसऱ्या कुणी मस्तीची भाषा केलेली आम्हाला आवडत नाही. ते आमचे कुरण आहे. त्यात आम्ही चरणार. आमच्या "टोमण्या"ची सगळी सदरे त्यावर चालतात. आमच्या जाहिरातदारांनाही आम्ही "द्यायची असेल जाहिरात तर द्या नाहीतर फुटा इथून" असे जाम सडेतोड उत्तर देतो. पण खडसे मास्तरांनी सवालही असा केला होता की त्याचं खंडन करणं जरा कठीण होतं. खरंच, मोबाईलचं बिल आम्ही का भरतो? ते उत्तर मिळेपर्यंत आम्ही खडसे यांना खडसावलं,"ओ मास्तर, फार जोरात बोलू नका! तुमच्या आधीचे ते धरणवाले असंच काहीबाही बोलले होते. आता धरणातच काय, त्यांना रस्त्याच्या कडेला गाडी लावून गवतातसुद्धा निवांत धार मारता येत नाही. लांबचा प्रवास असेल तर हल्ली बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या गाडीत ठेवून फिरतात ते. तेव्हा, वीज बिल न भरणं आमचा हक्क आहे आणि आम्ही तो बजावणारच!" असे बजावून आम्ही खुशीत बसलो होतो. पण खडसे मास्तरांनी वडाची साल पिंपळाला लावलीच. म्हणे रानडे रोड, मुंबई २८ मध्ये बसून शेतकऱ्यांच्या समस्या तुम्हाला काय कळणार? भुईमूग कुठे उगवतो हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? कृषीमंत्री व्हायला शेतकरी असणे आवश्यक असेल तर, परिवहन मंत्री व्हायला किमान पाच वर्षांचा ट्रक (क्लास D) ड्रायवर असल्याचा किंवा सात वर्षांचा किन्नर (हा यक्ष किन्नर मधला किन्नर नव्हे)असल्याचा अनुभव आवश्यक असायला हवा. अवजड उद्योगमंत्रीपद स्वत: मुख्यमंत्र्यांनी किंवा गडकरींनी घ्यायला हवं. तेव्हा, हा प्रश्न कैच्या कैच. तसं आम्हाला भुईमूग कुठे उगवतं ते चांगलं माहीत आहे. लहानपणी डालड्याच्या डब्यात गाजर लावायचा प्रयोग आम्ही नेहमी करत असू. गाजर काय भुईमूग काय, डबा चांगला हवा, गळका नको. म्हणजे गळका असला तर गाजराला काही धोका नव्हता, पण पाणी गळलं की खालच्या मजल्यावरचे जोशी बोंब मारायचे. ग्यालरीत त्यांचा पायजमा वाळत टाकलेला असायचा.

मोबाईलचं बिल आम्ही का भरतो या प्रश्नानं आम्ही अस्वस्थ झालो होतो. त्या विचारातच आम्ही बाथरूममध्ये गेलो. आमच्या प्रतिभासाधन आणि विचारमंथनाची जागा ती. अनेक क्लिष्ट राजकीय सामाजिक प्रमेये आम्हाला इथेच सुटली आहेत. विचारात गर्क होतो. त्या विचारातच अंघोळीला सुरुवात केली. आपले शरीर ही विधानसभा आहे असे मानून खसाखसा साबण लावून नखशिखांत फेसात बुडलो होतो. तर अचानक शॉवरमधून पाणी यायचे बंद झाले. टाकीतले पाणी संपले वाटतं असे म्हणून चडफडत असताना बाथरूममधील लाईटही बंद झाला. "च्या मायला! विजेला काय झालं आता?" असं म्हणून आंधळी कोशिंबीर खेळत शॉवर मधून बाहेर आलो. टॉवेल, कपडे आणि माझ्यात वीजबिल वाट अडवून उभे आहे की काय? पर्यायाने खडसे मास्तरच माझ्यासमोर वीजबिल फडफडवत उभे राहिले आहेत असे वाटले. अरे खडश्या, माझ्या अब्रूवर असा घाला घालतोस काय? तेव्हा बेसिनच्या काऊंटरवर अचानक मोबाईल हाती लागला. युरेका! असे ओरडून मी त्यातली विजेरी लावली आणि सर्व सत्यावर झगझगीत प्रकाश पडला. मोबाईल नसता तर, वीज येईपर्यंत आत तपश्चर्या करत बसणे एवढेच हातात होते. दुसरे दिवशी मग "टोमण्या"त माझा प्रतिवाद छापायचं ठरवलं. शीर्षक दिलं,"मोबाईल विना…" खडसे साहेब, मोबाईल सर्वत्र चालतो. घरही नाही आणि दारही नाही अशा ठिकाणी, अत्यंत अवघड जागी, पार उघडे पडलेल्यालाही आधार मोबाईलचाच असतो. जिथे मदतीसाठी आरडाओरडा करता येत नाही आणि तरीही कुणी मदतीला आलेच तर मदत घेताही येत नाही अशा ठिकाणी आधार असतो तो मोबाईलचाच. एवढंच काय, भुईमूग कुठे उगवतात असं मी "सिरी"ला विचारलं तर तिनं भुईमुगाची माहिती तर दिलीच, वर त्यावर पडणाऱ्या रोगांचीही इत्तंभूत माहिती दिली. लगे हाथो "कमळाला होणारा भुंग्यांचा प्रादुर्भाव आणि त्याचे निवारण" यावरही माहिती घेतली. तेव्हा खडसे साहेब, भुईमूग कुठे उगवतात तर आम्हाला कळेलच, पण ते कुठे लपवतात याचीही माहिती हा मोबाईल देईल. भुईमुगात एक उपटसूळ नावाची जात असते, ती खाल्ली म्हणजे खूप पित्त होते. आपल्याला या जातीची माहिती आहे काय? असा सवाल करून आम्ही अग्रलेख संपवला. छापखान्यात पाठवून दिला.

सकाळी चहा घेताना, म्हटलं आमचा "टोमणा" प्रसिद्ध झालाय की नाही पाहावा. म्हणून दार उघडून पाहिलं तर अंक टाकला नव्हता. बाकीचे लेकाचे सगळे हजर होते. ठोकसत्ता, महाखाष्ट टाइम्स इत्यादि. आमचाच टोमणा लेकाचा गायब होता. छापखान्याला फोन लावला, तर आमचे दिव्य म्यानेजर सांगू लागले,"साहेब, काल रात्रीलाच वीज गेलीय. सगळी प्रुफं रेडी आहेत. कधीचा तुम्हाला फोन लावतोय तर "आऊट ऑफ नेटवर्क" असा संदेश ऐकू येतोय. वीज आली की छापतो साहेब. काही टाईम-सेन्सिटीव्ह बाईट छापायचा होता का?" खिन्न होऊन फोन ठेवला.

Monday, November 24, 2014

माडी

नाना गोखल्यांच्या घराण्यात आजवर कुणी कधी माडी चढले नव्हते. कचेरीतून घरी येण्याचा रस्ता त्या "तसल्या" मोहल्ल्यातूनच जायचा. बऱ्याच वेळा ऑफिसमधून निघायला उशीर झाला की दिवेलागण झालेली असायची. अशा वेळी मोहल्ला जागा झालेला असायचा. रगेल आणि रंगेल माणसांची वर्दळ सुरू झालेली असायची. कोपऱ्यावरच्या "देशी दारूचे सरकारमान्य दुकान" अशी स्वच्छ निसंदिग्ध पाटी लिहिलेल्या गुत्त्याबाहेर उकडलेली अंडी विकणारा, चना जोर गरम विकणारा असे बसलेले असायचे. गुत्त्याचा धंदा जोरात होता. दक्षिणेतून आलेला अण्णा, स्वत: कपाळभर भस्म लावून तिरुपतीच्या भल्यामोठ्या तसबिरीखाली गल्ल्यावर बसत असे. स्वत: दारूला स्पर्श न करणाऱ्या अण्णाने "अय्योयो, दारू आणि मी? स्पर्शेसूधा नाय हो केला कधी" असं म्हणत भरपूर माया गोळा केली होती. आपले दुकान सरकारमान्य असल्याचा त्याला रास्त अभिमानही होता. "आपल्यामूळे सरकारला पैसा मिळतं की हो. उगाच विरोध कशाला म्हणतो मी! कोण बापडं सोताच्या पैशानं पितंय तर तुमचा घसा का जळजळतं हो?" असं उत्तर त्याच्या गुत्त्याला नाकं मुरडणाऱ्या लोकांसाठी असायचं. येणारी गिऱ्हाईकं नेहमीची. अडखळणारे पाय घेऊन यायची आणि मिरचीबरोबर एक क्वार्टर पोटात उतरली की मग न लडखडता बाहेर पडायची. स्वत:बरोबर गुत्त्याचा दरवळ घेऊन बाहेर पडलेले असे लोक पाहून नानांच्या कपाळावर आठ्या पडत. कसली व्यसनं म्हणायची ही? रोजगार हातात पडला की इथे येऊन उडवायचा. पोराबाळांची फिकीर नाही, बायकोची पर्वा नाही. असं काहीसं पुटपुटत ते त्यांना चुकवून पुढे चालू लागायचे. माडीवरून सारंगीचे पिळवटून टाकणारे स्वर तरंगत यायचे. तबलेवाला ठाकठूक करत तबला लावत असायचा. रात्र जागवण्याची तयारी चालू असायची. नानांच्या मनात कुतूहलयुक्त भीती असायची. गाणे आवडायचे पण ते गाणारी… त्यांना अजिबात ते पसंत नव्हते. समाजाला लागलेली ही कीड आहे असे त्यांचे मत होते. इमारतीखाली जिन्यापाशी एक लुंगी गुंडाळलेला, तलवारकट मिशा राखलेला, दंडावर ताईत बांधलेला आडवातिडवा रांगडा इसम राखणीला उभा असायचा. तो नानांकडे पाहून हसत असे. नाना शरमून खाली पाहत आणि चालू लागत. तो इसम मग पचकन थुंकत असे आणि तिरस्काराने स्वत:शी म्हणे,"थू: तुमच्या! आवडत न्हाई व्हय? तुज्यावानी लै लोक हळूच येत्यात. म्हनं बाईंचं नाव लै ऐकलं. गानं ऐकायचं हाये. आर तिच्या! चंदाबाई गानं म्हनत नसली तरी तिच्या तोंडाकडं टुकटुक बघत बसत्यात." नाना तिरस्कार चेहऱ्यावर घेऊन पुढे जात. माझ्या हातात सत्ता दिलीत तर हा सगळा मोहल्ला साफ करून टाकीन असे ते खाजगीत बोलत. ते वीररसपूर्ण भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये वर्षाचे सर्व उपवास, प्रदोष वगैरे पाळणारी त्यांची पत्नी, "नानू, पहिलं तू तुझं बघ हो. क्लार्कचा हेडक्लार्क झालेला पाहिलं म्हणजे मी जायला मोकळी झाले. त्याची वाट पाहून पाहून हे वर गेले, निदान माझ्या तरी हयातीत बेसिक पाचशे झालेलं पाहूदे रे बाबा…" हे असलं बोलणारी आई आणि "नाना, तुम्ही मदत करून सोडवलेली गृहपाठाची सगळी गणितं चुकली. बाई म्हणत होत्या कुठल्या गाढवाची मदत घेतलीस रे माठ्या?  मी खरं ते सांगितलं तर त्या एकदम चूप झाल्या. पण गाढवांनो माफ करा असं पुटपुटलेलं मी ऐकलं. मला बाई मुळीच आवडत नाहीत. शिवाय तुमचे कान गाढवासारखे मुळीच नाहीयेत. नाना, शाळा बदला माझी." असं म्हणणारा सुपुत्र, हे असे असल्यामुळे ते भाषण फुकट जात असे. रोज घरी येताना चंदाबाई आणि तिची कुकर्मे याबद्दल आवाज उठवायचा असा ते निश्चय करत. घरी आल्यावर भाकरीचा खरपूस वास आणि भरल्या वांग्याची भाजी यांच्या संयुक्त परिणामामुळे "आज आता लगेच काही नको. पण उद्या मात्र नक्की काहीतरी ठोस पावले उचलायला हवीत." असे ठरवून तडक पानावर बसत. मग ते जेवण अंगावर येई. तरी दिसामाजि काही चिंतन करावे म्हणून भोजनानंतर ते आरामखुर्चीत बसून आढ्याकडे पहात चिंतन करीत. "अरे असं  शुंभासारखा बसू नये रे बिनकामाचं. लहान का आहेस आता? एक पोर आहे हो तूस! लहान नव्हे काही, चांगले धा वर्षाचे आहे. कधी रे बाबा तू शहाणा होणार आहेस ते त्या गजाननालाच ठाऊक!" या आईच्या वाक्याने चिंतन मध्येच तुटत असे.काही तरी करून हे कारकुनी जगणे बदलले पाहिजे हा विचार त्यांना कुरतडत राहायचा.

पण आता त्यांनी अगदी मनावरच घेतले होते. या चंदाबाईचे सगळे धंदे बंद करायचे. पण आपण पडलो शाकाहारी कुंजविहारी. धक्काबुक्की, दमदाटी आपल्याच्याने काही व्हायचे नाही. आणि छान टोपी वगैरे घालून आपण "श्रीकृपेकरून आमचे या मार्गावरून नेहमी जाणे येणे होते, तेव्हा कृपया आपले हे धंदे बंद करा" असे निमंत्रण करायला गेलो तर माडीखालचा तो लुंगीधारी त्याच श्रीकृपेकरून आमचे स्वत:च्या पायाने जाणे येणे कायमचे बंद करील याची खात्री. नानांचे डोके सुपीक होते. तैलबुद्धीच्या घराण्यात जन्म झाल्यामुळे ते जन्मजात सुपीकच असणार होते. "काट्यानेच काटा काढावा!" हे वाक्य त्यांच्या डोक्यात "युरेका!" प्रमाणे अवतरले. अण्णाशी युती करावी! हां! कसाही असला तरी आपल्याप्रमाणे सच्छील सनातन हिंदू आहे, दारू गाळतो म्हणून काय झाले, स्वत: तर पीत नाही. त्याला ही असली बाईबाजी अजिबात चालत नसणार. आता त्याच्या दुर्दैवाने गुत्त्याला हीच जागा सरकारने उपलब्ध करून दिली असेल त्याला तो बिचारा काय करील. ठरले! अण्णाला भेटायचे! पण सरळसरळ गुत्त्यात कसे शिरायचे? शिवाय अण्णा स्वत: कुणाला भेटायला जात नाही असे कळले होते. ऑफिसमधला शिपाई, गुलाब, लेकाचा म्हणे नेहमी तिथे जात असतो त्याने सांगितले. एवढंच काय, तो  अण्णाचा विश्वासू माणूस आहे आणि तो स्वत:ला अण्णाचा निष्ठावंत सैनिक समजतो असे कळल्यावर तर नाना गारच झाले. काही म्हणा, माणसाच्या दिसण्यावरून त्याचा धंदा ओळखता येत नाही हेच खरं. मग गुलाबची गोडीगुलाबी करून नानांनी अण्णाची भेट पक्की केली. गुत्त्याची पायरी चढताना आपली पितरं स्वर्गातून डोळे फाडून आपल्याकडे पाहत आहेत असे त्यांना वाटले. त्यातल्या बरेच जणांनी जानवे कानाला लावले असेल. नाही म्हणायला नानांचा काका दर्दी होता. लिव्हर खराब होऊन गेला बिचारा, नाहीतर निदान त्याला तरी नानांचा अभिमान वाटला असता. अण्णाने तोंड भरून स्वागत केले. "ये रे! ये रे! हे आमचं गुलाब, सांगून ठेवलं तू येणार म्हणून. न्हेमी पाहतो रे तुला रस्त्यातून जाताना. योग्य ठिकाणी आलास की रे बाबा तू! आपण न्हेमी पैल्या धारेची ठेवतो." असं म्हणून वेटरला,"एक थोडं ते मोसंबी आण रे बाबा!" असं सांगितलं. नाना भेदरले. ते गडबडीनं म्हणाले, "अहो नाही नाही. मी त्यासाठी नाही आलो." मग नानांनी आपला मुत्सद्दी फडणविशी बाण्याने अण्णाला समजावून सांगितले. चंदाबाई, तिचे धंदे, तो लुंगीवाला मवाली गुंड, हे सर्व कसे आपल्या गावाला लांच्छन आहे. त्यामुळे तुमच्या या नामांकित गुत्त्याला प्रतिष्ठा कशी प्राप्त होत नाही. "हे पहा अण्णासाहेब, तुमच्याकडे येतो तो सामान्य ग्राहक. मजूर. तो चवलीपावलीची नवटाक छटाक हातभट्टीची पितो. इथून तो तडक चंदाबाईकडे जातो. त्याच्याकडील उरलेल्या पावल्या ती काढून घेते. ही असली गिऱ्हाइकं किती दिवस पोसणार? चंदाबाईला हलवा. इथे बार काढा. आलिशान मोटारी येतील. चवलीपावलीच्या जागी शंभराच्या नोटा बाळगणारे येतील."आणि मग इथे त्यांच्या सुपीक डोक्याबरोबरच एका सुप्त इच्छेने डोके वर काढले. "जर हे सर्व तडीस नेले, तर तुम्ही तुमचा बार बघा, आमची एकच अट, मात्र बारची मालकी आमच्याकडे राहील." अण्णा डोळे बारीक करून काही वेळ त्यांच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला,"तुम्ही चंदाबाईला हाकला, मग बघू." अशा वाटाघाटी होत राहिल्या. बोलता बोलता नानांनी टेबलावर आलेले खारे शेंगदाणे तोंडात टाकले आणि गुत्त्यात गेलो पण प्यालो नाही या सात्विक समाधानात ते बाहेर पडले.

हे सर्व होत असताना, नाना घरी पोचायच्या आत या वाटाघाटीची बित्तंबातमी माडीवर चंदाबाईकडे पोचली. बाईंनी असे अनेक अण्णा आणि नाना "बघितले" होते, आणि त्यांना नेसत्या कपड्यानिशी घरी परत पाठवले होते.  बाईंना स्वत:ला नेसत्या कपड्याचे सोयरसुतक नव्हते. आपण धंदा करतो, संत सत्संग नाही असे बाईंचे स्वच्छ आणि प्रामाणिक मत होते.मग एकदा धंदा म्हटलं की दुकान उघडायला का लाजावे?

नाना नेहमीप्रमाणे मोहल्ल्यातून घरी चालले होते. आता त्यांच्या सच्छील डोक्यात मोहल्ल्याबद्दल घृणा कमी होऊन त्याची जागा महत्वाकांक्षेने घेतली होती. फक्त अण्णाने आपल्या डावात साथ द्यायला हवी असा विचार करत असतानाच ते थबकले. समोर तो चंदाबाईचा उन्मत्त राखणदार वाट अडवून उभा होता. नानांची क्षणभर तंतरली. उलटपावली पलायन करावे असा नैसर्गिक विचार त्यांच्या मनात डोकावला. पण धोतराची कनवट घट्ट धरून ते उभे राहिले. "बाईंनी बलावलंय वर!" अशी गुरगुर वजा विनंती त्यांच्या कानावर पडली. नानांना ब्रम्हांड आठवले. त्यांच्या बेचाळीस शेंडीधाऱ्या पिढ्यात कुणी बाईची माडी चढले नव्हते. संध्येला बसलेले आजोबा, सोवळ्यात स्वयंपाक करणारी आई, लाल आलवणातील आत्या, वाती वळणारी आजी, ताम्हन, पूजेची फुले, हातपाय धुवून आत येऊन परवचा म्हणणारी मुले, जानवे, त्याची रामगाठ, श्रावणी, पंचगव्य, उपासतापास करणारी त्यांची बाळबोध बायको असे सगळे त्यांच्या डोळ्यांसमोरून क्षणात येऊन गेले. सर्व पितर श्वास रोखून स्वर्गातून आपल्याकडे रोखून पाहत आहेत असा त्यांना भास झाला. घामाचा एक ओघळ कपाळावरून त्यांच्या नाकावर आला. हाताचे पंजे ओलसर वाटू लागले. "चलताय न्हवं?" या राठ रासवट आवाजाने ते भानावर आले. इथे त्यांच्या सुप्त महत्वाकांक्षेने पुन्हा एकदा सर्वांवर मात केली आणि गोखले कुलवृत्तांतात नोंद करून ठेवण्यासारखी घटना घडली. नाना प्रथमच माडीची पायरी चढले. उंबऱ्याशी ते पुन्हा थबकले, पण कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आत प्रवेश केला. समोर बिलोरी आरसा. शेजारी झुंबरासारखा लखलखणारा लोलकांचा पडदा. आतील दिव्यांचा प्रकाश त्या लोलकांमधून फाकत रंगीबेरंगी इंद्रधनुष्य होऊन नानांवर पडला होता. धूप आणि अत्तरमिश्रित सुगंध दरवळत होता. अजून षौकीन मंडळींची येजा सुरू झालेली नव्हती. सारंगिये आणि तबलजी आपापली हत्यारं लावत होते, त्याचे सूर ऐकू येत होते. पडदा बाजूला करताना तो किणकिणला. आत स्वच्छ शुभ्र गाद्या गिरद्या लोड लावून ठेवले होते. समोर पान, लवंगांचे तबक, गजऱ्यांचे तबक सजवून ठेवले होते. "थांबा हितंच" या लुंगीवाल्याच्या शब्दांनी नाना भानावर आले. सारंगिये मान खाली घालून तारा जुळवत होते. त्यांनी वर पाहिलेही नव्हते. तबलजीने मात्र मान झुकवून त्यांची दखल घेतली. त्याला उलट दखल द्यावी की नाही या संभ्रमात नाना असतानाच समोरच्या चिकाच्या पडद्यात हालचाल झाली आणि एक स्थूल वृद्ध बाई बाहेर आली. तोंडाचे जवळपास बोळके, वर्षानुवर्षे तंबाखू, पान खाल्ल्याच्या खुणा, डोळ्यांत सुरमा, नाकात मुसलमान धर्तीची चमकी, विरळ होत चाललेले केस, तरीही त्याला मेंदी लावलेली. वृद्धत्वाच्या उघड खुणा दिसत असल्या तरी डोळे कमालीचे बेरकी. नाना पाहत राहिले. त्यांचा थोडासा अपेक्षाभंगही झाला असावा. तो अपेक्षाभंग चंदाबाईच्याही लक्षात आला असावा. ती हसली. "नानाच म्हणत्यात न्हवं तुमाला? बसा. तुमी म्हनं आमच्या पोटावर उठलाय. खरं हाय का?" नाना गडबडून म्हणाले,"म्हंजे तसं काही नाही, पण स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षं झाली, सुधारणा व्हायला हव्यात. राष्ट्र बलवान व्हायला नको?" हे ऐकून चंदाबाईनं अतीव करुणेनं नानांकडे पाहिलं.  "असं कधीपासून होतंय हो तुमाला?" असलं काही तरी म्हणणार असं त्यांना वाटलं. आपण कैच्या कैच बोलून गेलो हे त्यांच्या ध्यानात आलं. शाखेत दंड, वेतचर्म, खड्ग शिकलो, पण असल्या प्रसंगांना तोंड द्यायला शिकवलं नाही गेलं कधी असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला.
"नाना, आमच्या धंद्यावर उठलायसा, पण तुमच्याबद्दल आमाला अजिबात राग न्हाई. आमाला तुमची खरी विच्छा ठाऊक आहे."
नाना सटपटले. आपण चोरून चिकाच्या पडद्याआत डोकावून पाहत होतो ते या बाईनं पाहिलं की काय? ही जागाच अशी आहे. आयुष्यात कधी मान वर करून परस्त्रीकडे पाहिलं नाही, पण इथं आल्यावर मन चळलं की काय आपलं? समोर राजा रविवर्मा स्टाईलचं ओलेत्याने उभ्या असलेल्या एका यौवनेचं पेंटिग लावलं होतं. त्याने नाना कासावीस झाले होते. त्यांनी डोळे बंद करून आपल्या देवघरात लावलेल्या बाळकृष्णाच्या तसबिरीचे स्मरण केले. त्यांनी "अहो नाही हो, तसला विचारसुद्धा करत नाही मी" असा प्रतिवाद करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यांना थांबवत चंदाबाई म्हणाली,"तुमी म्हत्वाकांक्षी आहात हे आमाला ठावं हाये. तुम्ही खरं तर त्या अण्णालाच हाकलून लावा. आणि थितं बार टाका. बारची सगळी मालकी तुमची करायची जबाबदारी आपली!" नाना सर्द झाले. बाउन्सर पडणार म्हणून ब्याटसमननं आधी खाली झुकावं तर बॉलरनं छान फुलटॉस द्यावा तसं त्यांचं झालं. मग सगळी मुत्सद्देगिरी एकवटून ते म्हणाले,"तसा करार करणार का?" चंदाबाई छानसं हसली. जवळपास बोळके झालेल्या तोंडात दोन दात चमकले. "नाना, करार? हितं काय आमी आमची शेती इकाया बसलोय व्हय? माळावर बोंबलाया पाटलाची परवानगी कशाला लागतीय? तुमी निर्धास्त ऱ्हावा. चंदाबाईचा शबूद हाय. तुमी गुत्त्यावर कबजा करा, अन्ना बोंबलाया लागला तर आपण त्याच्या मदतीला काई जात न्हाई याची ग्यारंटी. पन तुमी म्हनतच असाल तर कागद करायला चंदाबाईची ना न्हाई. करा कागूद." आणि मसाला घातलेला चहा नानांसमोर आला. तो पीत असताना, त्यांना घरचा आलं घातलेला चहा आठवला. पितळी भांड्यातून तो पिणारी त्यांची आई आठवली. अचानक त्यांना आपल्या मध्यमवर्गीय जगण्याचा आणि विचारसरणीचा कमालीचा तिरस्कार वाटला. चंदाबाईच्या पाठींब्यानं हे कळकट जीवन बदलून टाकण्याची संधी आली होती. नाना ती सोडणार नव्हते. ते म्हणाले,"अहो पण, असं कसं घालवणार त्या अण्णाला?" चंदाबाईनं नानांचे मुत्सद्दी प्रश्न आधीच ओळखले होते. "मला ठावंच होतं तूमी बामण असेच भोट असनार. एक गोष्ट सांगते ती ऐका. अन्नानं लावली आसंल पाटी सरकारमान्य म्हणून. पन अंदरकी बात सांगते. परमिट न्हाई अन्नाकडं! लावा दावा, आना बंदी. अन्ना सोताच्या भट्ट्याबी लावतोय. कुटं कुटं तेबी सांगते. नवसागर कुटून आनतो ह्ये पन आपल्याला ठावं हाये. दोन सालाखाली कंट्रीत कीटकनाशक घातल्यानं धावीस गिऱ्हाईकं खपली. अन्नानं पैका सोडला आन केस होऊ दिल्या न्हाईत. येवढं पुराण बास हाय का?" नाना उठले आणि दाराकडे वळले. एकदम काही लक्षात येऊन ते म्हणाले,"एक विनंती हाय, आपलं, आहे! मी इथं माडीवर आल्याचं कृपा करून कुणाला सांगू नका. आमच्या मातोश्रींस कळलं तर आजही हातात निखारा देऊन काशीयात्रेला पाठवतील मला. आणि आमचं कुटुंब वटसावित्रीचं व्रत बंद करील." चंदाबाई छद्मी हसली आणि म्हणाली,"निर्घोर जावा."

नानांनी आपले सर्व मुत्सद्दीपण पणास लावून अण्णावर केस केली. दाव्याच्या तारखा पडू लागल्या. नाना तहानभूक विसरले. अण्णाच्या सगळ्या जुन्या केसेस त्यांनी उकरून काढल्या, कोर्टात पुरावे दाखल केले. पदरची सगळी कमाई पणास लावली. हे सर्व होत असताना चंदाबाईच्या माडीचा झगमगाट तसाच चालू राहिला. मैफिली झडत राहिल्या. लोक तसेच माडी चढत राहिले, पहाटे तीन चार वाजता एकमेकांच्या आधाराने माडी उतरत राहिले. अण्णा तसाच गल्ल्यावर बसून गळ्यातील रुद्राक्षमाळा कुरवाळत बसून राहिला, पहिल्या धारेची माया जमवत राहिला. नानांचे आणि चंदाबाईचे संबंध याबद्दल येणाऱ्याजाणाऱ्याला सांगत राहिला. या गोष्टीची कुणकुण नानांच्या घरापर्यंतही गेली. मग नानांनी "तो मी नव्हेच" चा प्रवेश उत्तम वठवला आणि म्हातारीचे समाधान केले. म्हातारीचं समाधान झालं तरी त्यांच्या बायकोचे अजिबात झाले नाही. मग त्या माऊलीने "आजकाल सासूबाईंना रात्री सोबत लागते, वय झालंय त्यांचं. त्यांना काही हवं नको बघायला हवं" असं कारण देऊन आपली वळकटी माजघरात सासूबाईंच्या बिछान्याशेजारी लावली. आज ना उद्या तिला सत्य समजेल या आशेने नानांनी तिच्या नाकदुऱ्या काढल्या नाहीत. केस शेवटच्या टप्प्यात होती. आपल्या बाजूने निकाल लागणार याची पूर्ण खात्री त्यांना होती. आणि शेवटी निकाल लागला! असा निकाल कधीच लागला नव्हता. केस नानांच्या बाजूने निकाली झाली होती, नानांनी जागा आपल्याला मिळावी असा अर्ज केला होता तो मान्य झाला होता. पण कोर्टाने पुढे एक मेख मारून ठेवली होती. अवैध गुत्ता चालवला म्हणून गुत्ता बंद करण्याचा आदेश कोर्टाने दिला खरा, पण अण्णाचा वहिवाटीचा हक्कही मान्य केला होता. जागेची मालकी नानांची, पण ताबा अण्णाकडे असा तो निकाल होता. नाना हतबुद्धच झाले. ते तडक चंदाबाईकडे गेले. यावेळेस चंदाबाईचा आविर्भाव बदलला होता. अण्णाला तिथून हाकलायची जबाबदारी आपली नाही असे तिने स्वच्छ सांगून टाकले. मग नाना खवळले. त्यांनी आपला हुकमी एक्का काढला. "चंदाबाई, तुम्ही करार केला आहात आमच्याशी. तुमची सही आहे त्यावर." चंदाबाई थंडपणे म्हणाली,"नाना, सही तुमचीपण आहे त्याच्यावर. तुमचा माझ्या धंद्यात भाग आहे असा कागद आहे तो. मी बोलूनचालून धंदेवाली. तुमच्या इज्जतीचं तुम्ही बघा. हे पाप पचवायला किती श्रावण्या कराव्या लागतील?" नाना मुकाट्याने उठले आणि घरी गेले.

चंदाबाईची माडी आहे तशीच आहे. अण्णा साईड बिझनेस म्हणून वॉर्डाचा नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. भट्टी जोरात चालू आहे. आणि नाना! नाना सध्या ओव्हरटाईम करून अण्णाच्या जागेचा घरफाळा भरताहेत. घरफाळा थकल्याच्या नोटिसावर नोटिसा त्यांच्या घरच्या पत्त्यावर येत आहेत. 

Sunday, November 16, 2014

गुरू आणि त्याचे दोन शिष्य

कथा तशी पुरातन वाटली होती परंतु आता तसे वाटत नाही. रम्य असा आश्रम. एक ऋषिवर्य. होमहवन, यज्ञबिज्ञ चालायचे. वेदपठण व्हायचे. गुरू संथा द्यायचे, शिष्य घोकंपट्टी करायचे. आश्रमाला राक्षसांचा फार त्रास. त्याला कंटाळून ऋषिवर्यांनी दोन शिष्य हेरले. एक बुद्धिमान तर दुसरा शक्तिमान. दोन शिष्य अभ्यासात यथातथाच पण गुरुप्रति त्यांची अपार श्रद्धा. एवढी की त्यांची कामे करण्यात चढाओढ, मारामारी व्हावी. अखेरीस गुरुने हस्तक्षेप करावा, कामे वाटून द्यावीत असे नित्य घडावे. एकदा ऋषिवर्य आजारी पडले. सेवा करण्याची चढाओढ सुरू झाली. एक म्हणे पाय मीच चेपणार. दुसरा लगेच ओरडला, मुळीच नाही, पाय मीच चेपणार. शब्दाला शब्द वाढत गेला, वातावरण तापले, आरडाओरड्याचे रूपांतर तारस्वराने किंचाळण्यात झाले. गुरुदेवांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न करताच "तुम्ही गप पडा हो तिकडे!" असे दोघेही ओरडले. एकाने दुसऱ्याला अफजल खान म्हणावे तर दुसऱ्याने पहिल्याला डोंगरातील उंदीर म्हणावे. गुरुने कशीबशी समजूत काढून मार्ग काढला. एक पाय याने चेपावा तर दुसरा त्याने. काही काळ शांततेचे परंतु तणावपूर्ण वातावरण राहिले. गुरुही थकून निपचित पडला. तेवढ्यात पहिल्याने हळूच दुसऱ्याच्या वाट्याचा पाय चेपण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ते लपून राहिले नाही. दुसरा भडकून उठला. तुंबळ मारामारी सुरू झाली. गुरू असहाय्यपणे पहात राहिला. दुसरा मार खात होता. त्याची उलटवार करण्याची ताकद संपत आली. पहिल्याला ते जाणवून त्याला आणखी उन्माद चढला. दोन्ही पाय पहिल्याच्या ताब्यात जाणार हे पाहून दुसऱ्याच्या  रागाला पारावार उरला नाही. त्याने तिथेच पडलेला एक भलामोठा धोंडा उचलला आणि पहिल्याच्या वाट्याच्या पायावर घातला. गुरूच्या पायातून कळ सणाणली आणि त्याने गगनभेदी ठणाणा केला. आपल्या वाट्याच्या पायाचा चेंदामेंदा झालेला पाहून पहिल्याने तर डोके गमावलेच. जराही विचार न करता त्याने एक शिळा उचलली, आणि "हे उन्मत्त माणसा, तुझ्या वाट्याचा पाय जाग्यावर राहील असे तुला वाटले काय?" असे म्हणून ती शिळा उरलेल्या चांगल्या पायावर आदळली. गुरूवर्य वेदनेने बेशुद्ध पडले. शुद्ध आली तेव्हा त्यांचे पायातील संवेदन गेले होते. त्याही परिस्थितीत त्यांना ती इष्टापत्तीच वाटली. निदान वेदना तरी नाहीत. पण काही कालाने त्यांचे मस्तक जबर दुखू लागले. गुरुने काही क्षण विचार केला आणि त्याबद्दल शिष्यांना काही न सांगण्याचा निर्णय घेतला!

सध्या गुर्जी गुमान पडून आहेत. एका शिष्याने खूप मुत्सद्दी विचार करून त्यांना बरे करायचा पण केला आहे, तर लगेच दुसऱ्याने "कसा बरे करतोस तेच पाहतो" असा प्रतिपण केला आहे.

बोध - चूक ऋषिवर्यांची आहे. आश्रमात प्रवेश तर दिला, पण त्यांचे एकूण गुण पाहता त्या दोघांना घरी हाकलून द्यायला हवे होते. आश्रमावर राक्षसांचे आक्रमण अधूनमधून होत राहिले असते पण ऋषिवर्यांचे दोन्ही पाय तरी धोतरात राहिले असते. 

Thursday, November 13, 2014

हरीभौंची गाथा

जेव्हापासून बातमी फुटली की अध्यक्षपदाचे उमेदवार आमचे हरिभौ आहेत तेव्हापासून आम्ही हरीभौंच्या चेहऱ्याचे बारीक निरीक्षण करत होतो. धावीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्यक्षात बारावीची मार्कशीट हातात पडावी तसे ते गोंधळले होते. म्हणूनच कदाचित ते धावीनंतर शाळाकॉलेजसारख्या फुक्कट फालतू गोष्टींत अडकून पडले नसावेत. ते अजिजीनं मुत्सद्दी नानांना सांगत होते, आहो आसं करू नका, तिकीट घेताना आसलं काय ठरलं नव्हतं. आपन गरीब मानूस है. उगा कुठं नऊधा कोटीवाला मी. ऱ्हाऊ द्या मला स्थानिक पातळीचा आमदार. आमदार निधीतला येक रुपायापण नाही पायला अजून आन मी विधानसभेचा अध्यक्ष? म्हंजे आमचा आमदार निधी गेला का आता? नका नाना, नका गरीबाच्या पोटावर पाय आणू! नानांनी त्यांची समजूत काढली होती. "हरिभौ, तुम्ही आमचे बाजीप्रभू आहात असे समजा! गडाभोवती वेढा पडला आहे. आज आम्ही या वेढ्यातून निसटणार. शत्रू कोळसुंद्यांच्या टोळीप्रमाणे आमच्या मागे लागणार. तुम्ही खिंड लढवा. तासाभराने उगीचच तोफांचे बार करा. आम्ही इथंच कुठं तरी लपून राहू. वेढा घातलेले चौथी पाचवीच्या इतिहासापलीकडे काही शिकलेले नाहीत. तोफांचे बार ऐकून "आयला म्हाराज निसटून पोचलं वाटतं विशाळगडावर, आता बोंबलायला कशाला लढायचं हो फुक्काट" आसं म्हणून वेढा उठवून पुढच्या किल्ल्याला वेढा घालायला निघून जातील. आणि हरिभौ, आज तुम्ही इतिहासाचं एक पान लिहिणार आहात. मुत्सद्दी नानांचा चेहरा खुलला होता. हां! ह्याला म्हणतात मुत्सद्देगिरी! हरीभौंचा उतरलेला चेहरा पाहून ते घाईघाईने म्हणाले,"अहो, म्हंजे खरोखरचं एक पान लिहायचं नाही हो. नुसती एक प्रतिमा दिली, प्रसंगाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी. लिहायचं म्हटलं की अंगावर काटा येतो काहो? खिशाला छान दोन दोन पेनं लावून आलाय की हो!" इतिहासाचं पान लिहायचं वगैरे ऐकून हरीभौंचा उतरलेला चेहरा "अधोरेखित, प्रतिमा" असले मुत्सद्दी शब्द ऐकून आणखीच उतरला. हे असले जडजड शब्द कधी कानावर पडणार नाहीत या समजुतीनं या धंद्यात पडलो, आणि आता जोवर हा मसाले भात अन बटाट्याची भाजी खुर्चीवर आहे तोवर नुसत्या अलंकारिक उपमाच ऐकायच्या या कल्पनेने ते शहारले.

एरवी आम्ही हरीभौंना रस्त्यात पाहिलं असतं तर गडी पंढरपुरच्या वारीतून वाट चुकून मागंच राहिलाय असंच वाटलं असतं. ती छपरी मिशी, ती डोक्याच्या अक्षाशी पंधरा अंशाचा कोन करून ठेवलेली गांधी टोपी, तो घातलेला हातातला गंडा, गळ्यात न दिसणारी तुळशीची माळ, धावी पास पण इद्यापीठ रिटर्न छाप चष्मा. तोंड उघडलं तर फक्त "जै जै रामकृष्ण हारी"च भायेर पडणार असे यकदम ओरिजिणल अष्टसात्विक भाव चेहऱ्यावर. आजवर तसे भाव पैले तुकाराम,  त्यानंतर विष्णुपंत पागनीस आणि त्यानंतर थेट हरिभौ एवढ्यांच्याच चेहऱ्यावर पाहिले आहेत. विधानसभेचे शेत राखायला बसले आणि समाधी लागली. विरोधकांच्या आरोळ्यांनी समाधी भंग झाल्यावरच त्यांनी डोळे उघडले. मुत्सद्दी नानांचा डाव यशस्वी झाला हे त्यांच्या ध्यानात आले. पण विरोधक सोडत नव्हते. हरीभौंनी उत्तम मन:शांती दाखवली. विरोधक निघून गेल्यावर आम्हाला ते हळूच म्हणाले,"खरं म्हंजे त्यांनी पोल उशिरा मागितला. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावं,  हे वाक्य उच्चारताच त्यांनी पोल मागायला पाहिजे होता. तो त्यांनी मागितला नाही. माझं हे दिल्यानंतर, म्हणजे रूलिंग दिल्यांनतर, मी पुढचा विषय पुकारल्यावर त्यांनी पोलची मागणी केली." हे शब्द ऐकताना मला साक्षात प्रतितुकाराम विष्णुपंतांचीच आठवण आली. शेत राखायला गेले आणि नुसतेच "आधी बीज एकले" गाणे म्हणत बसले. त्याचा फायदा घेऊन मंबाजीने शेतात बैल घुसवले. समोर बैल शेताची नासाडी करत आहेत त्याकडे विष्णुपंतांचे लक्षच नाही. गाणे संपता संपता ज्ञानबा शेतकरी आला तेव्हाही हे कसा सम गाठून आला अशा कौतुकाने त्याच्याकडेच पाहत होते. ज्ञानबा संतापाने फुटला आणि त्यांना बोल लावू लागला. तेव्हाही हे त्याच्याकडे अतीव प्रेमानेच पाहत होते. हताश होऊन ज्ञानबा थांबला आणि खुलाशाची वाट पाहू लागला. तर विष्णुपंतांनी अत्यंत थंडपणे कोवळ्या नरम आवाजात,"इतकं संतापायला काय झालं ज्ञानबा?" एवढंच विचारलं. ज्ञानोबाला संतापानं झीट यायचंच बाकी राहिलं. "अरे संतापायला काय झालं म्हणून विचारतोस? बघ, बघ, निम्मं अधिक शेत खाऊन टाकलंय आणि उलट मलाच विचारतोस संतापायला काय झालं?" यावर विष्णुपंत "आरे आरे आरे! पांडुरंगा!" एवढं म्हणून पुन्हा प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागले. अगदी तस्सेच भाव आम्ही हरीभौंच्या प्रसन्न वदनी पाहिले. तेवढ्यात व्याघ्रवदन शुंभराजे तेथे आलेच आणि "बघा मी सांगितलं नव्हतं तुम्हाला? यांच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतलीत." असं म्हणून "हिंमत असल्यास पुन्हा बहुमत सिद्ध करा" अशा घोषणा देऊ लागले. पुन्हा एकदा हरीभौंनी उत्तम मानसिक समतोल दाखवला आणि "येकदा ठराव पारित झाल्यावर पुन्हा मागे जायची प्रथा नाही पांडुरंगा!" असे त्यांना सांगितले. पुढे शुंभराजे काही बोलणार तोच त्यांनी तावडेबुवांना "जरा काळी एक द्या" असे सांगून "खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी" हे पद सुरू केले. तावडेबुवांनी पट्टी तर लावून धरलीच वर "ना धरी, ना धरी" असे आळवून उत्तम साथ केली. हे कीर्तन चालू असताना मंबाजी छान बावनखणीत "माझ्याकडे बघून डोळा बारीक करून" ही लावणी ऐकत बसले होते.

या कथेचे खऱ्या तुकारामाशी साम्य इथेच संपते. पुढे या कथेतील तुकाराम मंबाजीच्या मांडीला मांडी लावून बसतो. त्याच्या काळ्या कर्तृत्वाला आध्यात्मिक संरक्षण देतो. मंबाजी स्वत:च त्याला मंदिरात नेऊन त्याची प्रतिष्ठापना करतो. वास्तविक तुकारामाने मंबाजीचे शंभर अपराध नोंदलेली गाथा लिहिली आहे. म्हणून जनांत त्याला आधार आहे. पण मंबाजीने दम दिला आहे,"तुक्या! बऱ्या बोलाने ती गाथा तूच बुडव नाही तर तुझ्या चिपळ्या आणि मुंडासं काही देवळात रहात नाही. आणि हे देऊळही रहात नाही." या तुकारामाला देवळातील छान गुळगुळीत फरशी बुडाला लागल्यावर गारेगार वाटले आहे. कित्येक वर्षांनी बूड असे स्थिर आणि गार झाले आहे. पुन्हा बाहेर उन्हांत बसायचे? नको नको! जनांस काय, उन्हातान्हाची सवे आहे. घेतील त्यांचे ते पाहून. अंमळ येथेच डेरा ठोकावा. फार तर काय होईल? तो गाभाऱ्यातील विठोबा कमरेवर हात ठेवून रागेजून पाहील. अगदीच चिडीस आला तर पायाखालील वीट हातात घेऊन आपल्यास फेकून मारील. रखुमाई जेवू घालणार नाही. मग आपण "तुझेच लेकरू गा मी" असे म्हणून पुन्हा त्यांच्या पायावर पडू. मग तो करुणानिधि आपल्याला पुन्हा आपलं म्हणेल. मग ती गाथा तुकाराम हळूच इंद्रायणीत बुडवतो. केवळ देऊळ शाबूत राहावे म्हणून हो! केवळ देऊळ शाबूत राहावे म्हणून! पांडुरंग, पांडुरंग!

Monday, November 10, 2014

कमल की आरजू

कोणतीही भाषा संपवायची असेल तर ती शासनाच्या अथवा बाल भारतीच्या ताब्यात द्यावी. "अर्हता", "निविदा सूचना", "यादृच्छक गति" वगैरे शासकीय मराठी वाचून कोणास अर्थबोध होत असेल तर त्यांस खुशाल सरकारी मान्यताप्राप्त विद्वान म्हणावे. बाल भारतीने नुसते मराठी शिकवायचा वसा घेतलेला नाही तर लहानपणापासून मुलांना सत्य माहीत असावे असा आग्रहसुद्धा धरला आहे. इयत्ता पहिलीच्या पुस्तकात समान अक्षर ओळखा सदरामध्ये छान रंगीत फुगे दाखवून त्यात शब्द लिहिले आहेत. त्यात गाय शब्दासमोर बाबा, गाढव शब्दासमोर आजोबा आणि आई शब्दासमोर तेवढा अभय असा शब्द दाखवला आहे. (गरजूंनी इयत्ता पहिलीचे पुस्तक पाहावे) मुलांना लहानपणीच सत्याची जाणीव करून दिली म्हणजे पुढे मोठेपणी सोपे जाते. आता तर मराठी शाळांतून उर्दू वर्ग सुरू होणार असल्याची वार्ता आहे. हे बरे झाले. इतके दिवस मराठी वाचवा, मराठी वाचवा असा धोशा लावला होता, आता काही वर्षांनी  "काय पण करो पण उर्दू बचाओ" अशा आर्त किंकाळ्या ऐकू येतील. पण काही झाले तरी उर्दू वर्ग सुरू होणार असे आमचे जळगावचे नवनिर्वाचित मंत्री एकनाथ यांनी खडसावून सांगितले आहे. म्हणजे आता अहमदला कमळ धरावे लागणार. इतके दिवस "शरद कमळ धर" असे शिकवून तरी कुठे उजेड पडला म्हणा? शरदने कमळ धरले पण मानगूट पकडावी तसे धरले. आता अहमदने कमळ धरले की शरदाची आपोआप सुंता होणार असा आडाखा दिसतो आहे.

वास्तविक आमचे कितीतरी मुसलमान मित्र उत्तम मराठी बोलतात. आजवर एकानेही आम्हाला उर्दू भाषा शिकायला हवी असा आग्रह धरला नाही. उलट कृपा करून आमच्याशी हिंदी बोलू नका असाच त्यांचा आग्रह असतो. तसा आमच्या घराण्याचा हिंदी उर्दूशी बराच घरोबा आहे. आमच्या आत्याने टिळक विद्यापीठाची "हिंदी प्रथमा" ची परीक्षा देऊन त्यात द्वितीय श्रेणी प्राप्त केली होती. त्या मिळवलेल्या प्राविण्यावर ती मुंबईतील दारावर भाजी विकायला येणारे, डोक्यावरून पत्र्याचा पेटारा घेऊन येणारे बिस्किटवाले भय्ये यांच्याशी अस्खलित हिंदीत घासाघीस करीत असे. एकदा मी तिला "देता हय तो देओ, नही तो जाओ तिकडे खड्ड्यात" अशा बाणेदारपणे भाजीवाल्याला ठणकावून त्यास नामोहरम केलेले पाहिले होते. त्या भाजीवाल्याने तिने मागितलेल्या भावाने बटाटे तर दिलेच, वर कोथिंबीरीची जुडीपण फुकट दिली. भाषा हे शस्त्र आहे हे मी त्यावेळीच ओळखले होते. हिंदी बोलायची असेल तर शब्दांपेक्षा आत्मविश्वास हवा अशी टिपही आत्याने आम्हाला दिली होती. आत्मविश्वास असल्यास शब्द आपले गुलाम असतात हे मात्र अगदी खरे, पण आत्मविश्वास कुठल्या संकटात टाकेल हे सांगता येणार नाही. अभियांत्रिकी शिकत असताना आमच्या एका मित्राचा आत्मविश्वास असाच दुर्दम्य होता. त्यास इंग्रजी बोलण्याची मोठी हौस. गणित झेपत नसल्याने आम्ही काही मित्र मास्तरांकडे शिकवणी घेता का असे विचारण्यास गेलो. मास्तर खडूस म्हणून प्रसिद्ध होते. ताडदिशी काय बोलतील कुणी सांगावे या भीतीने आम्ही चाचरत विचारणा केली. ते बहुधा चांगल्या मन:स्थितीत असावेत. त्यांनी तात्काळ होकार दिला. आम्ही आनंदाने माघारी वळणार एवढ्यात आमच्या या मित्राने निरागसपणे विचारले,"बट, सर, व्हॉट इज युवर रेट?" मास्तर लाह्या फुटाव्यात तसे तडतडत असताना आम्ही वेगाने बाहेर पडलो.

बाल भारतीने पहिलीच्या उर्दू पुस्तकाचे काम तातडीने हाती घेतले आहे असे ऐकतो. आमचे एक मित्र भाषा समितीत आहेत. आम्ही नेहमी हॉटेल अशोका -धी बार अँड रेस्टॉरंट या आमच्या अड्ड्यावर भेटतो. वर दिलेली समान अक्षर ओळखा सदराची संपूर्ण जुळणी आमच्यासमोर त्यांच्या स्कॉच आणि आमचा ओल्ड मंकचा ग्लास यामध्ये पडलेल्या टिश्यू पेपरवर झाली आहे. स्कॉच हा शब्द केवळ जोडाक्षर असल्यामुळे पहिलीच्या पुस्तकात त्यांना घालता आलेला नाही. परंतु आज आपला समाज ज्या पद्धतीने पुढे जातो आहे, गतिमान होतो आहे, त्याकडे पाहिले असता येत्या काही वर्षात स्कॉच, माल्ट, व्होडका, ऑन द रॉक्स, चिल्ड, आयटम इत्यादि शब्द पहिलीच्या पुस्तकात नक्की घालता येतील असा त्यांचा दृढ विश्वास आहे. कालच आम्ही भेटलो. पहिलीच्या उर्दू पुस्तकाचे काम त्यांच्याकडे आले आहे. जरा टेन्शनमध्येच होते. त्यांचे आयुष्य पुणे ३० परिसरात गेले असून, लकडी पूल ओलांडला की गावाबाहेर हवा गार असते असे सांगून ते गळ्याभोवती मफलर गुंडाळतात. उर्दू संस्कृतीशी त्यांचा जवळचा संबंध म्हणजे लकीमध्ये चोरून बिर्याणी खाण्यापुरता. फक्त रोजांच्या दिवसांत मोमीनपुरा या घनघोर उर्दू जंगलात जाणे होते. उर्दू सोडा, हिंदी भाषेत जरी बोलू लागले तरी समोरचा तंदूर मुर्गी विकणारा मुसलमान मराठीत बोलू लागतो असे हिंदी. मुसलमान असून मराठी किती उत्तम बोलतो या आनंदात आम्ही तंगडी झोडत असू. असो. आमचे मित्र चिंतेत होते हे आम्ही जाणले. कारण त्यांनी आज ग्लासात प्रथम सोडा ओतला मग व्हिस्की. हा फाऊल होता हे कोणीही जाणकार सांगेल. चित्तवृत्ती स्थिर नसल्यानेच असे होऊ शकते. त्यांनी खिशातून चुरगाळलेले काही कागद काढून टेबलावर ठेवले. मी ते पाहिले. त्यावर खाडाखोड करून वाक्ये लिहिली होती. ओमर आज जुम्मा हय, नहाने का हय. नारायण मुरगीके पीछे मत भाग. शरद नमाज पढ. अरविंद तकिया पहन. अजित सब खाना हजम मत कर. आम्ही त्यांस म्हटले, पारंपारिक हसन कुठे दिसत नाही यांत तो? तेव्हा ते म्हणाले, अहो काय सांगू, तसेच करणार होतो. काम सोपे झाले असते. पण ही नावे वरून आली आहेत, समजले ना? अगदी वरून. म्हणे हीच नावे हवीत. एकनाथांस हा उर्दूचा वृश्चिकदंश अचानक कुठून आणि कसा झाला ते कळत नाही. पण त्यांचे हे भारूड गाजणार हे नक्की. पण आम्हांस हे कळत नाही की महसूल खात्याचा बैल असा शिक्षणाच्या कुरणात कसा घुसला? तावडेंनी अजून कुंपण घालून  घेतलेले दिसत नाही.

Sunday, November 9, 2014

तहनामा

शुंभ महाराज घोड्यावरून पायउतार झाले. मागेपुढे फर्जंद होते. म्हादबा मोतद्दाराने घोड्याला मुजरा करून बरोबर आणलेला तोबरा राजांच्या मुखासमोर धरला. "कुठं पाहतो आहेस म्हादबा? ही हिंमत? घोडं आणि धनी यांतला फरक दिसेनासा झाला तुला?" म्हादबा सटपटला. "आर्रर्रर्र, घोटाळा झाला म्हाराज! माफी! माफी!". अदबीने झुकून कुर्निसात करत म्हादबा मागे झाला आणि घोड्याच्या दिशेने वळला. त्याला थांबवून शुंभराजे घाईघाईने म्हणाले,"अरे अरे थांब! आण तो तोबरा इकडे. बरेच दिवसात हरभरा चाखला नाही. बघू बरं जरा." असं म्हणून त्यांनी बचकभर हरभरा उचलला आणि बकाणा भरला. "ऑम, नॉम, च्युम च्युम नॉम नॉम!" असे सुखाचे हुंकार काढत डोळे मिटून त्यांनी रवंथ करायला सुरुवात केली. "वाहवा! हा च्युम च्युम तोबरा च्युम काय चविष्ट च्युम च्युम लागतो आहे." म्हादबा म्हणाला,"म्हाराज, वाईच हतं थांबा. घोड्याचं खोगिर काढून तेला चारापाणी करून येतो आन मग तुमास्नी म्हालात बांदतो." शुंभराजांचे तिकडे लक्ष नव्हते,"आं? हं हं, नॉम च्युम च्युम!" असे आवाज करून त्यांनी अश्वखाद्य महोत्सव चालू ठेवला. म्हादबा परत आला तेव्हा तोबरा संपला होता. शुंभराजांनी तिथलीच एक गवताची काडी पैदा केली होती आणि डोळे मिटून ते दात कोरत होते. मधूनच समाधानाने प्चक प्चक असे आवाज काढत होते. शुंभराजांचे काडीप्रेम म्हादबाला माहीत होते. कानात काडी घालणे, दातात काडी घालणे, या दोहोंपैकी काहीच उपलब्ध नसल्यास दिसेल तिथे काड्या घालणे हा त्यांचा छंद होता. तेही नसेल तर ते मोहिमेवर जात आणि यथेच्छ काड्या घालत. या त्यांच्या छंदाबाबत "यांतून तुम्हाला काय मिळते" असा प्रश्न त्यांचे स्नेही आणि हितचिंतक करीत. त्यांस ते "माफीचा साक्षीदार" मधल्या नाना पाटेकरसारखा चेहरा करीत, मागे छान रेलून पाय ताणत, दोन्ही हाताचे पंजे डोक्याखाली ठेवत ते समाधानाने "आनंद!" असे उत्तर देत. त्यांच्या बरोबरचे हशम एकमेकाकडे पाहून हसत, एक डोळा मिचकावून एकमेकांना हळूच टाळी देत. "म्हादबा, तोबरा अंमळ जून निबर होता बरे. पण चालेल.  मोहिमेवर असताना आम्हांस खाण्यापिण्याची शुद्ध राहिली नव्हती. खान आमच्या मागावर असेल असे वाटले होते पण कसले काय. शेवटी आमचा गनिमी कावा वापरावा लागला. आमच्या नुसत्या बोलांनी खान वठणीवर आला. त्याने आमच्याशी लढण्यास साफ नकार दिला. तरीही आम्ही आमचे तोपची गोळे डागणे चालू ठेवले. असा काही मारा केला आहे की यंव रे यंव! शेवटी खान दिल्लीस पळून गेला अशी खबर आमच्या या विश्वासू फर्जन्दांनी आणली आणि आम्ही मोहीम आवरली. शिवाय, आमचा शिधा संपला होता. रसद पुरवणारे सरदार बारामतीकर यांनी आयत्या वेळी आम्हांस दगा केला. शेवटचे चारपाच दिवस आम्ही चिंचेचा पाला आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा खाऊन काढले. आम्ही पाळलेला पोपट नेहमी का बोंबलत असतो याचा उलगडा होतो आहे. कुठल्याही आर्त बोंबलण्याला स्फोटक पण गंभीर पार्श्वभूमी असते याचे ज्ञान होते आहे. यापुढे त्याला हिरव्या मिरच्या खायला घालणे बंद करा अशी आज्ञा आम्ही दिली आहे.

इतके दिवस आम्ही समजून होतो की खान दिल्लीस पळून गेला. दोन दिवसांपूर्वी खबर आली की आम्हांस जुझांत गुंतवून ठेवून खानाने महाराष्ट्र गिळंकृत केला! आमचे हेर अत्यंत कुचकामी आहेत. खानाचे हेर आधी येऊन बातमी सांगून गेल्यावर आमचे हेर उगवले. या रयतेलाही आम्ही पाहून घेऊ. रयतेने आमची सोडून (पक्षी: साथ सोडून) खानास साथ दिली. आमचे शिलेदार शिधा मागावयास गावात जात तेव्हा लोक "अजून भांडी पडली नाहीत, पुढच्या दारी जा" असे सांगत. आमच्या हेरांनी अनेक घरांत चोरून डोकावून पाहिले असता खानाचे सैनिक छान पंगतीत जेवायला बसलेले दिसले. त्या वृत्ताने आमच्या मनास अत्यंत कष्ट जाहले. खानाच्या सैन्याला रयतेने आदराने पंगतीत बसवले याने आधीच मन:स्ताप झालेला, त्यात आमचे हेरही असे, त्यांस अजिबात पोच म्हणून नाही. आमच्या हेरखात्यात येण्याआधी बहुधा दैनिक सकाळचे वार्ताहर असावेत. प्रत्येक घरात कोणते पक्वान्न होते याचीही बित्तंबातमी द्यायचे. चिंचेचा पाला पानी आणि मिरच्यांचा ठेचा अपानी गुरगुरत असताना ते ऐकणे यासारखे दु:ख नाही. आता तर आमचे सैनिक खानाच्या सैन्याचा वेष धारण करून हळूच त्यांच्यात जेवायला बसू लागले आहेत. साधे सैनिक ते, आमच्यासारखा राजधर्म, क्षत्रियधर्म त्यांस कोठून कळणार? दयेच्या बिर्याणीपेक्षा स्वाभिमानाची पेज बरी. दोष आमच्या सैनिकांचा नाही, रयतेचा आहे. रयतेने आता आमचा इशारा ऐकावा. तुमच्या हितासाठी तुम्हालाच वेठीला धरावे लागले तरी बेहत्तर, आम्ही ते करणार. तुमच्या हितासाठी तुम्हाला खंडणी द्यावी लागणार. महाराष्ट्र एकसंध राहण्यासाठी त्याचे तुकडे पडले तरी बेहत्तर….नाही, थांबा, मला म्हणायचे होते, महाराष्ट्र एकसंध राहण्यासाठी रयतेचे तुकडे पडले तरी बेहत्तर, चुकले, खानाच्या आधिपत्याखाली एकसंध राहणे म्हणजे आमचे तुकडे पडणे, ते होणे नाही. पुन्हा चुकले, थांबा, आम्ही हे विधान उद्या दुरुस्त करू. या मोहिमेने आम्हांस पुरते थकवले आहे. दारूगोळा संपला आहे, आता नुसत्या सुर-वाती राहिल्या आहेत. अनेक दिवसांनी हा हरभरा पोटात गेल्यावर जरा पोट डब्ब वाटते आहे, पण रिकामे असण्यापेक्षा बरे. इतके दिवस आपल्यापेक्षा आपली घोडी चांगली खात होती याची जाणीव होऊन मन खिन्न झाले आहे. खावयास मिळाले नाही तर आपले हे सैन्य उद्या राहणार नाही हे आम्ही जाणतो. त्यात खानाने महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची घोषणा करून आमचे धंदापाणी बंद केल्याची खबर आली आहे. आता गनिमी कावाच हवा. खानास तह करावा असा निरोप धाडला आहे. तहनाम्याचे पहिलेच कलम आहे - "बऱ्याबोलाने शरण येऊन आम्हांस शिधा पुरवावा". आम्हांस खात्री आहे, खान पुरता कात्रीत सापडला आहे. आम्ही लढणार नाही, त्याला नुसत्या तहाच्या बोलणीत गुंतवणार, जेरीला आणणार, आणि शेवटी तहात लोळवणार! हां! याला म्हणतात गनिमी कावा! खानाचे फडणवीस स्वत:स मुत्सद्दी समजत असतील, आता करा म्हणावे या गनिमी काव्याचा प्रतिकार.

आमच्या हेरांनी (आता त्यांना हेरसुद्धा म्हणवत नाही, नुसतेच दूत म्हणतो) पुन्हा वाईट बातमी आणली आहे. हे दूत आमचा पगार खातात आणि खानासाठी काम करतात असा संशय येतो आहे.  या दूतांवर नजर ठेवायला दुसरे दूत ठेवले पाहिजेत. खानाकडून तहात पाच लक्षांचा मुलुख मागून घेतल्यावर पहिले ते काम करायचे. तर दूतांनी बातमी आणली, त्यांनासुद्धा तह करायचा आहे. त्यांच्या तहाचे पहिले कलम आहे आमच्या तहाचे पहिले कलम नाकारणे. आम्ही पाठवलेले पहिले कलम खोडून तिथे लिहिले होते, "शिधा मिळणार नाही, तरी धीर सोडू नये, रांगेत उभे राहावे. बारामतीकरसुद्धा उभे आहेत. त्यांनी काही मागितलेले नाही. आत्तापर्यंत जमवलेले शरीरमांद्य वापरून जगण्याचा त्यांचा निर्धार आहे. तुमची एकूण शरीरयष्टी पाहता तुम्हाला ते जरा कठीण जाईल, परंतु जिभेला कमी व्यायाम देऊन ऊर्जा टिकवल्यास तग धरू शकाल." अस्सं काय! ठीक आहे मग आमचा उलट तहनामा ऐकाच आता. कलम एकच - "आम्ही रांगेत उभे राहू, परंतु मग मुकाट्याने आम्हाला शिधादान करावे. त्यात तडजोड होणार नाही. आमच्या स्वाभिमानाची परीक्षा घेऊ नये." दूतांना हा तहनामा देऊन उलटपावली परत पाठवले. त्यांस आज्ञा केली, काही झाले तरी रांगेतून हलू नका. अगदी बहिर्दिशेसही जाऊ नका. भावना अगदीच अनावर झाल्यास रांगेत आमच्या नावाचा दगड ठेवूनच जा. दोन तीन प्रहरातच दूत परत आला. खानाने आमचा अपमान करायचे ठरवलेच आहे असे दिसते. उलट तहनाम्यातील एकमेव कलम असे - "आम्हांस रांगेतील दगड चालेल. त्यांस उलट अपमान न करता वाट पाहता येते. असेच दगड पाठवून देणे. आपण येण्याची तसदी न घेणे. युवराजांस तर मुळीच न धाडणे. त्यांनी मागील तहात बोलणी करावयास येऊन मेजावरील आमची लेखणी लंपास केली आहे. ते आम्हांस पुत्रासमान. त्यांचा राग काय म्हणोन करावा? त्यांस लिहावाचावयास येते काय? येत असल्यास लेखणीचा सदुपयोग करावा." ठीक आहे. आम्ही उलट तहनामा पाठवला आहे. शेवटचा म्हणजे शेवटचा.
कलम १ - आम्हाला नगराच्या बाहेर वेढा टाकण्याची परवानगी द्यावी. आमचे आपल्या हरएक हरकतीवर बारीक लक्ष असेल याचे भान ठेवावे.
कलम २ - शिधावाटप होणार असेल तर आम्ही रांगेत आहोत याचे भान आणि मान अनुक्रमे ठेवावा.
कलम ३ - आम्ही स्वाभिमानी आहोत हे मान्य केल्याचा दाखला स्वत: खानाने द्यावा.
कलम ३अ - खानास जमत नसेल तर निदान आपल्या फडणीसांच्या स्वाक्षरीने खलिता तरी पाठवावा
कलम ४ - ही भीक नव्हे, पण कलम २ खरोखरच आम्हांस आणि महाराष्ट्रास महत्वाचे आहे. ध्यानी असो द्यावे.

तहनाम्यावर स्वाक्षरी करून तो दूताकरवी रवाना केल्यावर शुंभमहाराज थकून गेल्यासारखे वाटले. त्यांनी म्हादबास हाक मारून सांगितले,"आण रे तो तोबरा परत. वेढा बराच काळ पडणार आहे." म्हादबाने हरभऱ्याचा वाडगा आणि शेंदेलोणाची बरणी आणून शुंभमहाराजांसमोर ठेवली आणि म्हणाला "म्हाराज, ही बरणी जास्त उपयोगी पडणार आहे." शुंभराजे प्रसन्न होत्साते विचारते झाले,"म्हादबा, तुझे कौतुक वाटते. आमच्या प्रकृतीची किती काळजी रे तुजला?" म्हादबा चाचरत उत्तरला,"म्हाराज, माफी असावी. ही माजी आक्कल नव्हं. खानाच्या दूतांसंगं तहनामा आन ही बरणीबी आलीया."

Tuesday, November 4, 2014

विलेक्षणीची मज्जा

नुकतंच अमेरिकेच्या फाॅरेनमधलं मतदान करून आलो. काहीच मजा नाही. मुळात इलेक्शन होती की नाही असं वाटावं असं वातावरण, म्हणजे मुळीच वातावरण नाही. टीव्हीवर फुटकळ जाहिराती आणि रस्त्यालगतच्या गवतात खोवलेल्या झेंडावजा जाहिराती. जाहिराती म्हणजे फक्त उमेदवाराचं नाव, बाकी काही नाही. आमचं नेतृत्व म्हणून वर अण्णा, दादा आणि तात्यांचे सत्तेने सुजलेले फोटो, खाली खच्चून सोन्याने मढलेला गेंडासदृश उमेदवार हे असलं काही नाही. सभा नाहीत, मोर्चे नाहीत, घोषणा नाहीत, उपोषणं नाहीत, मागण्या नाहीत, धमक्या नाहीत, पेपरमध्ये व्यंगचित्रं नाहीत, पक्षापक्षांमधलं जुगाड नाही, अण्णा तात्यांना भेटले, भाऊ तात्यांना भेटले, अण्णा भाऊंना भेटले, तात्या रुसले, दादा भडाकले असलं काही म्हणजे काही नाही. सामान्य माणसानं मत द्यावं तरी कुणाला आणि कशाच्या आधारावर? बरं चिन्ह शोधू लागलो तर ते कुठं दिसत नव्हतं. आयुष्यभर पाहिलेला अवलक्षणी "हात" आणि त्याची "ताई माई अक्का, विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का" ही घोषणा अजून कानात घुमते आहे. जनसंघाची पणती आली आणि गेली, तिच्या मागोमाग आमच्या घराण्याचं वळण कसं सरळ ते ठसवत कमळाबाई आली, दहा वाजल्याचं दाखवून गुपचूप सगळ्यांचे बारा वाजवणारे घड्याळ आले, इलेक्शनआधीच स्वैर बाण मारून सुटलेले बाण मागे घेता येत नाहीत हे लक्षात आल्यावर प्रतिस्पर्ध्यालाच दोष देणारे धनुष्यबाण आले, गाजावाजा करून उद्घाटन झालेले परंतु त्यानंतर यार्डातच गंजत पडलेले रेल्वे इंजिन आले, तसाच गाजावाजा करून उद्घाटन झालेला आणि तेवढाच गाजावाजा करून तातडीने कचऱ्याच्या डब्यात गेलेला खराटा आला. काही असलं तरी चिन्ह हे त्या त्या पक्षाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. चिन्ह पाहून मतदाराला पक्षाची एकूण मानसिकता कळते. तसा कुठलाच आधार इथे मिळत नाही. नाही म्हणायला डेमोक्रॅटिक म्हणजे गाढव आणि रिपब्लिकन म्हणजे हत्ती अशी चिन्हे आहेत पण ती मतदानपत्रिकेवर दिसत नाही, त्यामुळे डेमोक्रॅट असूनही गाढवपणावर शिक्का मारता येत नाही. 

आपल्याकडं कसा इलेक्शनचा शीजन असतो. शिशिर ऋतूत जशी झाडे रंग बदलतात तसे हे एरवी स्कोडाफिडातून फिरणारे आपला रंग बदलतात. कधीही न दिसलेले वॉर्डातले "कार्यकर्ते" रस्त्यावर दिसू लागले आणि आपल्याकडे पाहून आकंठ हस्तिदंती करू लागले की ओळखावं शीजन सुरू झाला. त्यांच्या ओठावर नाईलाजाचे हसू असले तरी आतून "मायला, सालं एका मतासाठी आता भाव खाणार" हे विचार असतात. हे भाव दिसू नयेत म्हणून ही सगळी कार्यावळ रेबॅनचे गॉगल परिधान करून असते. "शुभ्र कपडे + रेबॅन = अशक्य उन्मत्तपणा" हे समीकरण पूर्वीपासून आहे. मला पूर्वीपासून एक प्रश्न पडायचा की ही कार्यकर्ते मंडळी नक्की काय कार्य करतात? म्हणजे दिवसा नोकरी रात्री कार्य की दिवसा कार्य रात्री कर्ते? कुठलीही नोकरी न करणारे पण पक्षाचे कार्यकर्ते म्हणवणारे अनेकजण मी पाहिले आहेत. हे प्राणी सहजासहजी रस्त्यावर दिसत नाहीत. प्रतिष्ठित नेत्याच्या घरी अथवा कार्यालयात जावे, तेथे हे मोठ्या संख्येने आढळून येतात. या नेते मंडळींनाही लोकांना सहजासहजी भेटता येऊ नये म्हणून स्वत:भोवती असल्या प्राण्यांचा चक्रव्यूह लागत असावा. तिथली कार्यकर्त्यांची गर्दी पाहिली की मला नेहमी गुळाच्या खड्याला लागलेल्या मुंगळ्यांची आठवण येते. एरवी रस्त्यावर पान खाऊन पचापचा थुंकणारी ही जनता, तिथे मात्र शिस्तीचा रुबाब पाहून घ्यावा. एखाद्या देवळात गेल्याप्रमाणे चपला बाहेर काढा म्हणून सांगतील, कुणी खेड्यातून काही कैफियत घेऊन आलेला आलेला बापडा त्याला "अपाइण्टमेण्ट न्हाई व्हय? आन्ना आत्ता काय भ्येटनार न्हाईत, माघारून या सांजच्याला." असं परस्परच सांगतील. तोही बिचारा "आसं कसं दादा, लै लांबून आलोया, पघा काय तरी तोड निघतीया का" असं म्हणून त्याचा भाव वाढवणार. मग पुढं निवडणुकांचा धुरळा उडाला की मग काय विचारावं. रिक्षेतून कंठशोष करत जाणारे लाऊडस्पीकर्स काय,  उमेदवारांची लाईफसाईझ होर्डिंग्ज काय. होर्डिंग्ज आणि त्यावर त्यांचे अशक्य निर्बुद्ध स्मितहास्य असलेले फोटो तर काहींचे अगम्य अवकाशात पाहून हात उंचावणारे फोटो पाहणे हा माझा विरंगुळा होता, आजही आहे. जेवढा उमेदवार छोटा तेवढे त्याच्या होर्डिंगवर बाकीच्या नेत्यांचे फोटो अधिक. त्यावर आमचे राष्ट्रीय नेते, आमचे आधारस्थान, आमचे शक्ती/प्रेरणास्थान, आमचे युवा नेतृत्व अशी पहिल्या फळीतील मोठे फोटो झाले की त्या खाली स्थानिक बाजारसमिती अध्यक्ष, झेडपी अध्यक्ष, सहकारी पत संस्था अध्यक्ष यांचे थोड्या कमी साईझचे फोटो. अशा स्थानिक देवचारांना मान देऊन झाला की मग या उमेदवाराचा प्रसन्नोन्मत्त फोटो. आमच्या गावातील एका स्थानिक नेतृत्वाने सगळ्या ठिकाणी एकच फोटो वापरायचे ठरवले आहे. त्यामुळे होर्डिंगवर त्यांचा जो फोटो आहे तोच गावातील वळू संवर्धन केंद्रातही लावला आहे. दोन्हीकडे तेवढाच समाधानी दिसतो. वळू संवर्धन क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलं आहे त्यामुळे समस्त गाई त्यांना खास मान देतात असं ऐकून आहे. वळू काय मतदार काय, नीट हाकले म्हणजे वठणीवर येतात असं मत ते खाजगीत व्यक्त करतात.

होर्डिंग्जच्या पाठोपाठ मग सुरू होतो प्रचाराचा धुरळा. सभा लागतात. जिपा, टाटा ४०७, ट्रॅक्समधून कार्यकर्ते गावागावाकडे सुटतात. ऊसतोडणी कामगार, गावातील हातावर पोट असणारे कामकरी, पोटच्या पोराला अक्षरश: पोटावर बांधून हजेरी मिळवणाऱ्या बायका आणि क्वार्टर हाफवर कुठंही जाणारी गावातील रिकामटेकडी पोरं यांना ट्र्कात घालून शहरात सभेला घेऊन यायचं. त्यांनी सभेच्या ठिकाणी उन्हांतान्हात बसून राहायचं. हजेरी सभेनंतर मिळणार असते. पत्रकारांनी गर्दीचे फोटो काढल्यावर. क्वार्टरवाल्यांनी केव्हाच स्वत:चं जुगाड करून ब्रह्मानंदी टाळी लावून घेतेलेली असते. भाषण करणाऱ्या नेत्याने "आम्ही सगळे टोल नाके उध्वस्त करू" म्हटलं काय किंवा "परदेशातील काळा पैसा परत या देशात आणूच आणू" म्हटलं काय दोन्हीला टाळ्या वाजवायच्या असतात. "दांडगे पाटील साहेबांचा !" अशी घोषणा आल्यावर काही जण "विजय असो" म्हणतात काही जण नुसतंच "जय!" म्हणतात. पाटील दांडगे होत जातात. रोजावरचे कामकरी पुन्हा गावाकडे जाऊन उद्याच्या चिंतेला लागतात. प्रत्यक्ष निवडणुकांच्या दिवशी रणधुमाळी असते. आपलं नाव मतदार यादीत असेल की नाही याची धाकधूक घेऊन रांगेत उभं राहायचं. नाव असेल तर लॉटरी लागल्याचा आनंद घेऊन लोकशाही जिवंत ठेवल्याचा आनंद घेऊन परत यायचं. नाव नसेल तर पेपर चांगला जाऊनही नापास झाल्याचं दु:ख घेऊन रिपीटरसारखं परत यायचं. आपल्या नावावर कुणी "कार्यकर्त्यानं" मतदान केल्याची खात्री बाळगायची.  माझं स्वत:चं नाव रेल्वेच्या डब्यावर लावलेली रिझर्वेशनची लिस्ट आणि मतदारयादी या दोन ठिकाणी कधीही आलेलं नाही. पुण्याहून पंढरपूरला वारीत चालत जाऊन विठोबाचं दर्शन न करताच परत आल्यासारखं माझं होत आलं आहे.

या असल्या अस्सल भारतीय "विलेक्षणी"वर पोसलेला हा पिंड आज इथे अमेरिकेत मतदान करून बाहेर पडला तेव्हा अस्वस्थ झाला. कैच्या कैच. मतदान केंद्रावर गर्दी नव्हती, बाहेर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठलेलं नव्हतं. माझं नाव चक्क मतदार यादीत होतं. ते पाहून मला गहिवरून आलं. माझं नाव तपासणाऱ्या त्या बाईपुढे शोभा नको म्हणून मी माझ्या भावना आवरल्या. केंद्रावर गेल्यापासून मोजून पाचव्या मिनिटाला मतदान करून मी बाहेर आलो. काय लोकशाही म्हणायची का काय ही? या लोकांना इलेक्शन कशाशी खातात ते माहीत नसावं. मोदींनी आल्यासरशी त्यांच्या मेडिसनच्या भाषणात थोड्या टिप्स द्यायला हव्या होत्या. शेवटी आपल्या गावाकल्डीच इलेक्षण लै टेक्सास, असं वाटू लागलंय.