Monday, November 24, 2014

माडी

नाना गोखल्यांच्या घराण्यात आजवर कुणी कधी माडी चढले नव्हते. कचेरीतून घरी येण्याचा रस्ता त्या "तसल्या" मोहल्ल्यातूनच जायचा. बऱ्याच वेळा ऑफिसमधून निघायला उशीर झाला की दिवेलागण झालेली असायची. अशा वेळी मोहल्ला जागा झालेला असायचा. रगेल आणि रंगेल माणसांची वर्दळ सुरू झालेली असायची. कोपऱ्यावरच्या "देशी दारूचे सरकारमान्य दुकान" अशी स्वच्छ निसंदिग्ध पाटी लिहिलेल्या गुत्त्याबाहेर उकडलेली अंडी विकणारा, चना जोर गरम विकणारा असे बसलेले असायचे. गुत्त्याचा धंदा जोरात होता. दक्षिणेतून आलेला अण्णा, स्वत: कपाळभर भस्म लावून तिरुपतीच्या भल्यामोठ्या तसबिरीखाली गल्ल्यावर बसत असे. स्वत: दारूला स्पर्श न करणाऱ्या अण्णाने "अय्योयो, दारू आणि मी? स्पर्शेसूधा नाय हो केला कधी" असं म्हणत भरपूर माया गोळा केली होती. आपले दुकान सरकारमान्य असल्याचा त्याला रास्त अभिमानही होता. "आपल्यामूळे सरकारला पैसा मिळतं की हो. उगाच विरोध कशाला म्हणतो मी! कोण बापडं सोताच्या पैशानं पितंय तर तुमचा घसा का जळजळतं हो?" असं उत्तर त्याच्या गुत्त्याला नाकं मुरडणाऱ्या लोकांसाठी असायचं. येणारी गिऱ्हाईकं नेहमीची. अडखळणारे पाय घेऊन यायची आणि मिरचीबरोबर एक क्वार्टर पोटात उतरली की मग न लडखडता बाहेर पडायची. स्वत:बरोबर गुत्त्याचा दरवळ घेऊन बाहेर पडलेले असे लोक पाहून नानांच्या कपाळावर आठ्या पडत. कसली व्यसनं म्हणायची ही? रोजगार हातात पडला की इथे येऊन उडवायचा. पोराबाळांची फिकीर नाही, बायकोची पर्वा नाही. असं काहीसं पुटपुटत ते त्यांना चुकवून पुढे चालू लागायचे. माडीवरून सारंगीचे पिळवटून टाकणारे स्वर तरंगत यायचे. तबलेवाला ठाकठूक करत तबला लावत असायचा. रात्र जागवण्याची तयारी चालू असायची. नानांच्या मनात कुतूहलयुक्त भीती असायची. गाणे आवडायचे पण ते गाणारी… त्यांना अजिबात ते पसंत नव्हते. समाजाला लागलेली ही कीड आहे असे त्यांचे मत होते. इमारतीखाली जिन्यापाशी एक लुंगी गुंडाळलेला, तलवारकट मिशा राखलेला, दंडावर ताईत बांधलेला आडवातिडवा रांगडा इसम राखणीला उभा असायचा. तो नानांकडे पाहून हसत असे. नाना शरमून खाली पाहत आणि चालू लागत. तो इसम मग पचकन थुंकत असे आणि तिरस्काराने स्वत:शी म्हणे,"थू: तुमच्या! आवडत न्हाई व्हय? तुज्यावानी लै लोक हळूच येत्यात. म्हनं बाईंचं नाव लै ऐकलं. गानं ऐकायचं हाये. आर तिच्या! चंदाबाई गानं म्हनत नसली तरी तिच्या तोंडाकडं टुकटुक बघत बसत्यात." नाना तिरस्कार चेहऱ्यावर घेऊन पुढे जात. माझ्या हातात सत्ता दिलीत तर हा सगळा मोहल्ला साफ करून टाकीन असे ते खाजगीत बोलत. ते वीररसपूर्ण भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये वर्षाचे सर्व उपवास, प्रदोष वगैरे पाळणारी त्यांची पत्नी, "नानू, पहिलं तू तुझं बघ हो. क्लार्कचा हेडक्लार्क झालेला पाहिलं म्हणजे मी जायला मोकळी झाले. त्याची वाट पाहून पाहून हे वर गेले, निदान माझ्या तरी हयातीत बेसिक पाचशे झालेलं पाहूदे रे बाबा…" हे असलं बोलणारी आई आणि "नाना, तुम्ही मदत करून सोडवलेली गृहपाठाची सगळी गणितं चुकली. बाई म्हणत होत्या कुठल्या गाढवाची मदत घेतलीस रे माठ्या?  मी खरं ते सांगितलं तर त्या एकदम चूप झाल्या. पण गाढवांनो माफ करा असं पुटपुटलेलं मी ऐकलं. मला बाई मुळीच आवडत नाहीत. शिवाय तुमचे कान गाढवासारखे मुळीच नाहीयेत. नाना, शाळा बदला माझी." असं म्हणणारा सुपुत्र, हे असे असल्यामुळे ते भाषण फुकट जात असे. रोज घरी येताना चंदाबाई आणि तिची कुकर्मे याबद्दल आवाज उठवायचा असा ते निश्चय करत. घरी आल्यावर भाकरीचा खरपूस वास आणि भरल्या वांग्याची भाजी यांच्या संयुक्त परिणामामुळे "आज आता लगेच काही नको. पण उद्या मात्र नक्की काहीतरी ठोस पावले उचलायला हवीत." असे ठरवून तडक पानावर बसत. मग ते जेवण अंगावर येई. तरी दिसामाजि काही चिंतन करावे म्हणून भोजनानंतर ते आरामखुर्चीत बसून आढ्याकडे पहात चिंतन करीत. "अरे असं  शुंभासारखा बसू नये रे बिनकामाचं. लहान का आहेस आता? एक पोर आहे हो तूस! लहान नव्हे काही, चांगले धा वर्षाचे आहे. कधी रे बाबा तू शहाणा होणार आहेस ते त्या गजाननालाच ठाऊक!" या आईच्या वाक्याने चिंतन मध्येच तुटत असे.काही तरी करून हे कारकुनी जगणे बदलले पाहिजे हा विचार त्यांना कुरतडत राहायचा.

पण आता त्यांनी अगदी मनावरच घेतले होते. या चंदाबाईचे सगळे धंदे बंद करायचे. पण आपण पडलो शाकाहारी कुंजविहारी. धक्काबुक्की, दमदाटी आपल्याच्याने काही व्हायचे नाही. आणि छान टोपी वगैरे घालून आपण "श्रीकृपेकरून आमचे या मार्गावरून नेहमी जाणे येणे होते, तेव्हा कृपया आपले हे धंदे बंद करा" असे निमंत्रण करायला गेलो तर माडीखालचा तो लुंगीधारी त्याच श्रीकृपेकरून आमचे स्वत:च्या पायाने जाणे येणे कायमचे बंद करील याची खात्री. नानांचे डोके सुपीक होते. तैलबुद्धीच्या घराण्यात जन्म झाल्यामुळे ते जन्मजात सुपीकच असणार होते. "काट्यानेच काटा काढावा!" हे वाक्य त्यांच्या डोक्यात "युरेका!" प्रमाणे अवतरले. अण्णाशी युती करावी! हां! कसाही असला तरी आपल्याप्रमाणे सच्छील सनातन हिंदू आहे, दारू गाळतो म्हणून काय झाले, स्वत: तर पीत नाही. त्याला ही असली बाईबाजी अजिबात चालत नसणार. आता त्याच्या दुर्दैवाने गुत्त्याला हीच जागा सरकारने उपलब्ध करून दिली असेल त्याला तो बिचारा काय करील. ठरले! अण्णाला भेटायचे! पण सरळसरळ गुत्त्यात कसे शिरायचे? शिवाय अण्णा स्वत: कुणाला भेटायला जात नाही असे कळले होते. ऑफिसमधला शिपाई, गुलाब, लेकाचा म्हणे नेहमी तिथे जात असतो त्याने सांगितले. एवढंच काय, तो  अण्णाचा विश्वासू माणूस आहे आणि तो स्वत:ला अण्णाचा निष्ठावंत सैनिक समजतो असे कळल्यावर तर नाना गारच झाले. काही म्हणा, माणसाच्या दिसण्यावरून त्याचा धंदा ओळखता येत नाही हेच खरं. मग गुलाबची गोडीगुलाबी करून नानांनी अण्णाची भेट पक्की केली. गुत्त्याची पायरी चढताना आपली पितरं स्वर्गातून डोळे फाडून आपल्याकडे पाहत आहेत असे त्यांना वाटले. त्यातल्या बरेच जणांनी जानवे कानाला लावले असेल. नाही म्हणायला नानांचा काका दर्दी होता. लिव्हर खराब होऊन गेला बिचारा, नाहीतर निदान त्याला तरी नानांचा अभिमान वाटला असता. अण्णाने तोंड भरून स्वागत केले. "ये रे! ये रे! हे आमचं गुलाब, सांगून ठेवलं तू येणार म्हणून. न्हेमी पाहतो रे तुला रस्त्यातून जाताना. योग्य ठिकाणी आलास की रे बाबा तू! आपण न्हेमी पैल्या धारेची ठेवतो." असं म्हणून वेटरला,"एक थोडं ते मोसंबी आण रे बाबा!" असं सांगितलं. नाना भेदरले. ते गडबडीनं म्हणाले, "अहो नाही नाही. मी त्यासाठी नाही आलो." मग नानांनी आपला मुत्सद्दी फडणविशी बाण्याने अण्णाला समजावून सांगितले. चंदाबाई, तिचे धंदे, तो लुंगीवाला मवाली गुंड, हे सर्व कसे आपल्या गावाला लांच्छन आहे. त्यामुळे तुमच्या या नामांकित गुत्त्याला प्रतिष्ठा कशी प्राप्त होत नाही. "हे पहा अण्णासाहेब, तुमच्याकडे येतो तो सामान्य ग्राहक. मजूर. तो चवलीपावलीची नवटाक छटाक हातभट्टीची पितो. इथून तो तडक चंदाबाईकडे जातो. त्याच्याकडील उरलेल्या पावल्या ती काढून घेते. ही असली गिऱ्हाइकं किती दिवस पोसणार? चंदाबाईला हलवा. इथे बार काढा. आलिशान मोटारी येतील. चवलीपावलीच्या जागी शंभराच्या नोटा बाळगणारे येतील."आणि मग इथे त्यांच्या सुपीक डोक्याबरोबरच एका सुप्त इच्छेने डोके वर काढले. "जर हे सर्व तडीस नेले, तर तुम्ही तुमचा बार बघा, आमची एकच अट, मात्र बारची मालकी आमच्याकडे राहील." अण्णा डोळे बारीक करून काही वेळ त्यांच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला,"तुम्ही चंदाबाईला हाकला, मग बघू." अशा वाटाघाटी होत राहिल्या. बोलता बोलता नानांनी टेबलावर आलेले खारे शेंगदाणे तोंडात टाकले आणि गुत्त्यात गेलो पण प्यालो नाही या सात्विक समाधानात ते बाहेर पडले.

हे सर्व होत असताना, नाना घरी पोचायच्या आत या वाटाघाटीची बित्तंबातमी माडीवर चंदाबाईकडे पोचली. बाईंनी असे अनेक अण्णा आणि नाना "बघितले" होते, आणि त्यांना नेसत्या कपड्यानिशी घरी परत पाठवले होते.  बाईंना स्वत:ला नेसत्या कपड्याचे सोयरसुतक नव्हते. आपण धंदा करतो, संत सत्संग नाही असे बाईंचे स्वच्छ आणि प्रामाणिक मत होते.मग एकदा धंदा म्हटलं की दुकान उघडायला का लाजावे?

नाना नेहमीप्रमाणे मोहल्ल्यातून घरी चालले होते. आता त्यांच्या सच्छील डोक्यात मोहल्ल्याबद्दल घृणा कमी होऊन त्याची जागा महत्वाकांक्षेने घेतली होती. फक्त अण्णाने आपल्या डावात साथ द्यायला हवी असा विचार करत असतानाच ते थबकले. समोर तो चंदाबाईचा उन्मत्त राखणदार वाट अडवून उभा होता. नानांची क्षणभर तंतरली. उलटपावली पलायन करावे असा नैसर्गिक विचार त्यांच्या मनात डोकावला. पण धोतराची कनवट घट्ट धरून ते उभे राहिले. "बाईंनी बलावलंय वर!" अशी गुरगुर वजा विनंती त्यांच्या कानावर पडली. नानांना ब्रम्हांड आठवले. त्यांच्या बेचाळीस शेंडीधाऱ्या पिढ्यात कुणी बाईची माडी चढले नव्हते. संध्येला बसलेले आजोबा, सोवळ्यात स्वयंपाक करणारी आई, लाल आलवणातील आत्या, वाती वळणारी आजी, ताम्हन, पूजेची फुले, हातपाय धुवून आत येऊन परवचा म्हणणारी मुले, जानवे, त्याची रामगाठ, श्रावणी, पंचगव्य, उपासतापास करणारी त्यांची बाळबोध बायको असे सगळे त्यांच्या डोळ्यांसमोरून क्षणात येऊन गेले. सर्व पितर श्वास रोखून स्वर्गातून आपल्याकडे रोखून पाहत आहेत असा त्यांना भास झाला. घामाचा एक ओघळ कपाळावरून त्यांच्या नाकावर आला. हाताचे पंजे ओलसर वाटू लागले. "चलताय न्हवं?" या राठ रासवट आवाजाने ते भानावर आले. इथे त्यांच्या सुप्त महत्वाकांक्षेने पुन्हा एकदा सर्वांवर मात केली आणि गोखले कुलवृत्तांतात नोंद करून ठेवण्यासारखी घटना घडली. नाना प्रथमच माडीची पायरी चढले. उंबऱ्याशी ते पुन्हा थबकले, पण कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आत प्रवेश केला. समोर बिलोरी आरसा. शेजारी झुंबरासारखा लखलखणारा लोलकांचा पडदा. आतील दिव्यांचा प्रकाश त्या लोलकांमधून फाकत रंगीबेरंगी इंद्रधनुष्य होऊन नानांवर पडला होता. धूप आणि अत्तरमिश्रित सुगंध दरवळत होता. अजून षौकीन मंडळींची येजा सुरू झालेली नव्हती. सारंगिये आणि तबलजी आपापली हत्यारं लावत होते, त्याचे सूर ऐकू येत होते. पडदा बाजूला करताना तो किणकिणला. आत स्वच्छ शुभ्र गाद्या गिरद्या लोड लावून ठेवले होते. समोर पान, लवंगांचे तबक, गजऱ्यांचे तबक सजवून ठेवले होते. "थांबा हितंच" या लुंगीवाल्याच्या शब्दांनी नाना भानावर आले. सारंगिये मान खाली घालून तारा जुळवत होते. त्यांनी वर पाहिलेही नव्हते. तबलजीने मात्र मान झुकवून त्यांची दखल घेतली. त्याला उलट दखल द्यावी की नाही या संभ्रमात नाना असतानाच समोरच्या चिकाच्या पडद्यात हालचाल झाली आणि एक स्थूल वृद्ध बाई बाहेर आली. तोंडाचे जवळपास बोळके, वर्षानुवर्षे तंबाखू, पान खाल्ल्याच्या खुणा, डोळ्यांत सुरमा, नाकात मुसलमान धर्तीची चमकी, विरळ होत चाललेले केस, तरीही त्याला मेंदी लावलेली. वृद्धत्वाच्या उघड खुणा दिसत असल्या तरी डोळे कमालीचे बेरकी. नाना पाहत राहिले. त्यांचा थोडासा अपेक्षाभंगही झाला असावा. तो अपेक्षाभंग चंदाबाईच्याही लक्षात आला असावा. ती हसली. "नानाच म्हणत्यात न्हवं तुमाला? बसा. तुमी म्हनं आमच्या पोटावर उठलाय. खरं हाय का?" नाना गडबडून म्हणाले,"म्हंजे तसं काही नाही, पण स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षं झाली, सुधारणा व्हायला हव्यात. राष्ट्र बलवान व्हायला नको?" हे ऐकून चंदाबाईनं अतीव करुणेनं नानांकडे पाहिलं.  "असं कधीपासून होतंय हो तुमाला?" असलं काही तरी म्हणणार असं त्यांना वाटलं. आपण कैच्या कैच बोलून गेलो हे त्यांच्या ध्यानात आलं. शाखेत दंड, वेतचर्म, खड्ग शिकलो, पण असल्या प्रसंगांना तोंड द्यायला शिकवलं नाही गेलं कधी असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला.
"नाना, आमच्या धंद्यावर उठलायसा, पण तुमच्याबद्दल आमाला अजिबात राग न्हाई. आमाला तुमची खरी विच्छा ठाऊक आहे."
नाना सटपटले. आपण चोरून चिकाच्या पडद्याआत डोकावून पाहत होतो ते या बाईनं पाहिलं की काय? ही जागाच अशी आहे. आयुष्यात कधी मान वर करून परस्त्रीकडे पाहिलं नाही, पण इथं आल्यावर मन चळलं की काय आपलं? समोर राजा रविवर्मा स्टाईलचं ओलेत्याने उभ्या असलेल्या एका यौवनेचं पेंटिग लावलं होतं. त्याने नाना कासावीस झाले होते. त्यांनी डोळे बंद करून आपल्या देवघरात लावलेल्या बाळकृष्णाच्या तसबिरीचे स्मरण केले. त्यांनी "अहो नाही हो, तसला विचारसुद्धा करत नाही मी" असा प्रतिवाद करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यांना थांबवत चंदाबाई म्हणाली,"तुमी म्हत्वाकांक्षी आहात हे आमाला ठावं हाये. तुम्ही खरं तर त्या अण्णालाच हाकलून लावा. आणि थितं बार टाका. बारची सगळी मालकी तुमची करायची जबाबदारी आपली!" नाना सर्द झाले. बाउन्सर पडणार म्हणून ब्याटसमननं आधी खाली झुकावं तर बॉलरनं छान फुलटॉस द्यावा तसं त्यांचं झालं. मग सगळी मुत्सद्देगिरी एकवटून ते म्हणाले,"तसा करार करणार का?" चंदाबाई छानसं हसली. जवळपास बोळके झालेल्या तोंडात दोन दात चमकले. "नाना, करार? हितं काय आमी आमची शेती इकाया बसलोय व्हय? माळावर बोंबलाया पाटलाची परवानगी कशाला लागतीय? तुमी निर्धास्त ऱ्हावा. चंदाबाईचा शबूद हाय. तुमी गुत्त्यावर कबजा करा, अन्ना बोंबलाया लागला तर आपण त्याच्या मदतीला काई जात न्हाई याची ग्यारंटी. पन तुमी म्हनतच असाल तर कागद करायला चंदाबाईची ना न्हाई. करा कागूद." आणि मसाला घातलेला चहा नानांसमोर आला. तो पीत असताना, त्यांना घरचा आलं घातलेला चहा आठवला. पितळी भांड्यातून तो पिणारी त्यांची आई आठवली. अचानक त्यांना आपल्या मध्यमवर्गीय जगण्याचा आणि विचारसरणीचा कमालीचा तिरस्कार वाटला. चंदाबाईच्या पाठींब्यानं हे कळकट जीवन बदलून टाकण्याची संधी आली होती. नाना ती सोडणार नव्हते. ते म्हणाले,"अहो पण, असं कसं घालवणार त्या अण्णाला?" चंदाबाईनं नानांचे मुत्सद्दी प्रश्न आधीच ओळखले होते. "मला ठावंच होतं तूमी बामण असेच भोट असनार. एक गोष्ट सांगते ती ऐका. अन्नानं लावली आसंल पाटी सरकारमान्य म्हणून. पन अंदरकी बात सांगते. परमिट न्हाई अन्नाकडं! लावा दावा, आना बंदी. अन्ना सोताच्या भट्ट्याबी लावतोय. कुटं कुटं तेबी सांगते. नवसागर कुटून आनतो ह्ये पन आपल्याला ठावं हाये. दोन सालाखाली कंट्रीत कीटकनाशक घातल्यानं धावीस गिऱ्हाईकं खपली. अन्नानं पैका सोडला आन केस होऊ दिल्या न्हाईत. येवढं पुराण बास हाय का?" नाना उठले आणि दाराकडे वळले. एकदम काही लक्षात येऊन ते म्हणाले,"एक विनंती हाय, आपलं, आहे! मी इथं माडीवर आल्याचं कृपा करून कुणाला सांगू नका. आमच्या मातोश्रींस कळलं तर आजही हातात निखारा देऊन काशीयात्रेला पाठवतील मला. आणि आमचं कुटुंब वटसावित्रीचं व्रत बंद करील." चंदाबाई छद्मी हसली आणि म्हणाली,"निर्घोर जावा."

नानांनी आपले सर्व मुत्सद्दीपण पणास लावून अण्णावर केस केली. दाव्याच्या तारखा पडू लागल्या. नाना तहानभूक विसरले. अण्णाच्या सगळ्या जुन्या केसेस त्यांनी उकरून काढल्या, कोर्टात पुरावे दाखल केले. पदरची सगळी कमाई पणास लावली. हे सर्व होत असताना चंदाबाईच्या माडीचा झगमगाट तसाच चालू राहिला. मैफिली झडत राहिल्या. लोक तसेच माडी चढत राहिले, पहाटे तीन चार वाजता एकमेकांच्या आधाराने माडी उतरत राहिले. अण्णा तसाच गल्ल्यावर बसून गळ्यातील रुद्राक्षमाळा कुरवाळत बसून राहिला, पहिल्या धारेची माया जमवत राहिला. नानांचे आणि चंदाबाईचे संबंध याबद्दल येणाऱ्याजाणाऱ्याला सांगत राहिला. या गोष्टीची कुणकुण नानांच्या घरापर्यंतही गेली. मग नानांनी "तो मी नव्हेच" चा प्रवेश उत्तम वठवला आणि म्हातारीचे समाधान केले. म्हातारीचं समाधान झालं तरी त्यांच्या बायकोचे अजिबात झाले नाही. मग त्या माऊलीने "आजकाल सासूबाईंना रात्री सोबत लागते, वय झालंय त्यांचं. त्यांना काही हवं नको बघायला हवं" असं कारण देऊन आपली वळकटी माजघरात सासूबाईंच्या बिछान्याशेजारी लावली. आज ना उद्या तिला सत्य समजेल या आशेने नानांनी तिच्या नाकदुऱ्या काढल्या नाहीत. केस शेवटच्या टप्प्यात होती. आपल्या बाजूने निकाल लागणार याची पूर्ण खात्री त्यांना होती. आणि शेवटी निकाल लागला! असा निकाल कधीच लागला नव्हता. केस नानांच्या बाजूने निकाली झाली होती, नानांनी जागा आपल्याला मिळावी असा अर्ज केला होता तो मान्य झाला होता. पण कोर्टाने पुढे एक मेख मारून ठेवली होती. अवैध गुत्ता चालवला म्हणून गुत्ता बंद करण्याचा आदेश कोर्टाने दिला खरा, पण अण्णाचा वहिवाटीचा हक्कही मान्य केला होता. जागेची मालकी नानांची, पण ताबा अण्णाकडे असा तो निकाल होता. नाना हतबुद्धच झाले. ते तडक चंदाबाईकडे गेले. यावेळेस चंदाबाईचा आविर्भाव बदलला होता. अण्णाला तिथून हाकलायची जबाबदारी आपली नाही असे तिने स्वच्छ सांगून टाकले. मग नाना खवळले. त्यांनी आपला हुकमी एक्का काढला. "चंदाबाई, तुम्ही करार केला आहात आमच्याशी. तुमची सही आहे त्यावर." चंदाबाई थंडपणे म्हणाली,"नाना, सही तुमचीपण आहे त्याच्यावर. तुमचा माझ्या धंद्यात भाग आहे असा कागद आहे तो. मी बोलूनचालून धंदेवाली. तुमच्या इज्जतीचं तुम्ही बघा. हे पाप पचवायला किती श्रावण्या कराव्या लागतील?" नाना मुकाट्याने उठले आणि घरी गेले.

चंदाबाईची माडी आहे तशीच आहे. अण्णा साईड बिझनेस म्हणून वॉर्डाचा नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. भट्टी जोरात चालू आहे. आणि नाना! नाना सध्या ओव्हरटाईम करून अण्णाच्या जागेचा घरफाळा भरताहेत. घरफाळा थकल्याच्या नोटिसावर नोटिसा त्यांच्या घरच्या पत्त्यावर येत आहेत. 

No comments:

Post a Comment