Monday, November 10, 2014

कमल की आरजू

कोणतीही भाषा संपवायची असेल तर ती शासनाच्या अथवा बाल भारतीच्या ताब्यात द्यावी. "अर्हता", "निविदा सूचना", "यादृच्छक गति" वगैरे शासकीय मराठी वाचून कोणास अर्थबोध होत असेल तर त्यांस खुशाल सरकारी मान्यताप्राप्त विद्वान म्हणावे. बाल भारतीने नुसते मराठी शिकवायचा वसा घेतलेला नाही तर लहानपणापासून मुलांना सत्य माहीत असावे असा आग्रहसुद्धा धरला आहे. इयत्ता पहिलीच्या पुस्तकात समान अक्षर ओळखा सदरामध्ये छान रंगीत फुगे दाखवून त्यात शब्द लिहिले आहेत. त्यात गाय शब्दासमोर बाबा, गाढव शब्दासमोर आजोबा आणि आई शब्दासमोर तेवढा अभय असा शब्द दाखवला आहे. (गरजूंनी इयत्ता पहिलीचे पुस्तक पाहावे) मुलांना लहानपणीच सत्याची जाणीव करून दिली म्हणजे पुढे मोठेपणी सोपे जाते. आता तर मराठी शाळांतून उर्दू वर्ग सुरू होणार असल्याची वार्ता आहे. हे बरे झाले. इतके दिवस मराठी वाचवा, मराठी वाचवा असा धोशा लावला होता, आता काही वर्षांनी  "काय पण करो पण उर्दू बचाओ" अशा आर्त किंकाळ्या ऐकू येतील. पण काही झाले तरी उर्दू वर्ग सुरू होणार असे आमचे जळगावचे नवनिर्वाचित मंत्री एकनाथ यांनी खडसावून सांगितले आहे. म्हणजे आता अहमदला कमळ धरावे लागणार. इतके दिवस "शरद कमळ धर" असे शिकवून तरी कुठे उजेड पडला म्हणा? शरदने कमळ धरले पण मानगूट पकडावी तसे धरले. आता अहमदने कमळ धरले की शरदाची आपोआप सुंता होणार असा आडाखा दिसतो आहे.

वास्तविक आमचे कितीतरी मुसलमान मित्र उत्तम मराठी बोलतात. आजवर एकानेही आम्हाला उर्दू भाषा शिकायला हवी असा आग्रह धरला नाही. उलट कृपा करून आमच्याशी हिंदी बोलू नका असाच त्यांचा आग्रह असतो. तसा आमच्या घराण्याचा हिंदी उर्दूशी बराच घरोबा आहे. आमच्या आत्याने टिळक विद्यापीठाची "हिंदी प्रथमा" ची परीक्षा देऊन त्यात द्वितीय श्रेणी प्राप्त केली होती. त्या मिळवलेल्या प्राविण्यावर ती मुंबईतील दारावर भाजी विकायला येणारे, डोक्यावरून पत्र्याचा पेटारा घेऊन येणारे बिस्किटवाले भय्ये यांच्याशी अस्खलित हिंदीत घासाघीस करीत असे. एकदा मी तिला "देता हय तो देओ, नही तो जाओ तिकडे खड्ड्यात" अशा बाणेदारपणे भाजीवाल्याला ठणकावून त्यास नामोहरम केलेले पाहिले होते. त्या भाजीवाल्याने तिने मागितलेल्या भावाने बटाटे तर दिलेच, वर कोथिंबीरीची जुडीपण फुकट दिली. भाषा हे शस्त्र आहे हे मी त्यावेळीच ओळखले होते. हिंदी बोलायची असेल तर शब्दांपेक्षा आत्मविश्वास हवा अशी टिपही आत्याने आम्हाला दिली होती. आत्मविश्वास असल्यास शब्द आपले गुलाम असतात हे मात्र अगदी खरे, पण आत्मविश्वास कुठल्या संकटात टाकेल हे सांगता येणार नाही. अभियांत्रिकी शिकत असताना आमच्या एका मित्राचा आत्मविश्वास असाच दुर्दम्य होता. त्यास इंग्रजी बोलण्याची मोठी हौस. गणित झेपत नसल्याने आम्ही काही मित्र मास्तरांकडे शिकवणी घेता का असे विचारण्यास गेलो. मास्तर खडूस म्हणून प्रसिद्ध होते. ताडदिशी काय बोलतील कुणी सांगावे या भीतीने आम्ही चाचरत विचारणा केली. ते बहुधा चांगल्या मन:स्थितीत असावेत. त्यांनी तात्काळ होकार दिला. आम्ही आनंदाने माघारी वळणार एवढ्यात आमच्या या मित्राने निरागसपणे विचारले,"बट, सर, व्हॉट इज युवर रेट?" मास्तर लाह्या फुटाव्यात तसे तडतडत असताना आम्ही वेगाने बाहेर पडलो.

बाल भारतीने पहिलीच्या उर्दू पुस्तकाचे काम तातडीने हाती घेतले आहे असे ऐकतो. आमचे एक मित्र भाषा समितीत आहेत. आम्ही नेहमी हॉटेल अशोका -धी बार अँड रेस्टॉरंट या आमच्या अड्ड्यावर भेटतो. वर दिलेली समान अक्षर ओळखा सदराची संपूर्ण जुळणी आमच्यासमोर त्यांच्या स्कॉच आणि आमचा ओल्ड मंकचा ग्लास यामध्ये पडलेल्या टिश्यू पेपरवर झाली आहे. स्कॉच हा शब्द केवळ जोडाक्षर असल्यामुळे पहिलीच्या पुस्तकात त्यांना घालता आलेला नाही. परंतु आज आपला समाज ज्या पद्धतीने पुढे जातो आहे, गतिमान होतो आहे, त्याकडे पाहिले असता येत्या काही वर्षात स्कॉच, माल्ट, व्होडका, ऑन द रॉक्स, चिल्ड, आयटम इत्यादि शब्द पहिलीच्या पुस्तकात नक्की घालता येतील असा त्यांचा दृढ विश्वास आहे. कालच आम्ही भेटलो. पहिलीच्या उर्दू पुस्तकाचे काम त्यांच्याकडे आले आहे. जरा टेन्शनमध्येच होते. त्यांचे आयुष्य पुणे ३० परिसरात गेले असून, लकडी पूल ओलांडला की गावाबाहेर हवा गार असते असे सांगून ते गळ्याभोवती मफलर गुंडाळतात. उर्दू संस्कृतीशी त्यांचा जवळचा संबंध म्हणजे लकीमध्ये चोरून बिर्याणी खाण्यापुरता. फक्त रोजांच्या दिवसांत मोमीनपुरा या घनघोर उर्दू जंगलात जाणे होते. उर्दू सोडा, हिंदी भाषेत जरी बोलू लागले तरी समोरचा तंदूर मुर्गी विकणारा मुसलमान मराठीत बोलू लागतो असे हिंदी. मुसलमान असून मराठी किती उत्तम बोलतो या आनंदात आम्ही तंगडी झोडत असू. असो. आमचे मित्र चिंतेत होते हे आम्ही जाणले. कारण त्यांनी आज ग्लासात प्रथम सोडा ओतला मग व्हिस्की. हा फाऊल होता हे कोणीही जाणकार सांगेल. चित्तवृत्ती स्थिर नसल्यानेच असे होऊ शकते. त्यांनी खिशातून चुरगाळलेले काही कागद काढून टेबलावर ठेवले. मी ते पाहिले. त्यावर खाडाखोड करून वाक्ये लिहिली होती. ओमर आज जुम्मा हय, नहाने का हय. नारायण मुरगीके पीछे मत भाग. शरद नमाज पढ. अरविंद तकिया पहन. अजित सब खाना हजम मत कर. आम्ही त्यांस म्हटले, पारंपारिक हसन कुठे दिसत नाही यांत तो? तेव्हा ते म्हणाले, अहो काय सांगू, तसेच करणार होतो. काम सोपे झाले असते. पण ही नावे वरून आली आहेत, समजले ना? अगदी वरून. म्हणे हीच नावे हवीत. एकनाथांस हा उर्दूचा वृश्चिकदंश अचानक कुठून आणि कसा झाला ते कळत नाही. पण त्यांचे हे भारूड गाजणार हे नक्की. पण आम्हांस हे कळत नाही की महसूल खात्याचा बैल असा शिक्षणाच्या कुरणात कसा घुसला? तावडेंनी अजून कुंपण घालून  घेतलेले दिसत नाही.

1 comment: