Sunday, November 16, 2014

गुरू आणि त्याचे दोन शिष्य

कथा तशी पुरातन वाटली होती परंतु आता तसे वाटत नाही. रम्य असा आश्रम. एक ऋषिवर्य. होमहवन, यज्ञबिज्ञ चालायचे. वेदपठण व्हायचे. गुरू संथा द्यायचे, शिष्य घोकंपट्टी करायचे. आश्रमाला राक्षसांचा फार त्रास. त्याला कंटाळून ऋषिवर्यांनी दोन शिष्य हेरले. एक बुद्धिमान तर दुसरा शक्तिमान. दोन शिष्य अभ्यासात यथातथाच पण गुरुप्रति त्यांची अपार श्रद्धा. एवढी की त्यांची कामे करण्यात चढाओढ, मारामारी व्हावी. अखेरीस गुरुने हस्तक्षेप करावा, कामे वाटून द्यावीत असे नित्य घडावे. एकदा ऋषिवर्य आजारी पडले. सेवा करण्याची चढाओढ सुरू झाली. एक म्हणे पाय मीच चेपणार. दुसरा लगेच ओरडला, मुळीच नाही, पाय मीच चेपणार. शब्दाला शब्द वाढत गेला, वातावरण तापले, आरडाओरड्याचे रूपांतर तारस्वराने किंचाळण्यात झाले. गुरुदेवांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न करताच "तुम्ही गप पडा हो तिकडे!" असे दोघेही ओरडले. एकाने दुसऱ्याला अफजल खान म्हणावे तर दुसऱ्याने पहिल्याला डोंगरातील उंदीर म्हणावे. गुरुने कशीबशी समजूत काढून मार्ग काढला. एक पाय याने चेपावा तर दुसरा त्याने. काही काळ शांततेचे परंतु तणावपूर्ण वातावरण राहिले. गुरुही थकून निपचित पडला. तेवढ्यात पहिल्याने हळूच दुसऱ्याच्या वाट्याचा पाय चेपण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ते लपून राहिले नाही. दुसरा भडकून उठला. तुंबळ मारामारी सुरू झाली. गुरू असहाय्यपणे पहात राहिला. दुसरा मार खात होता. त्याची उलटवार करण्याची ताकद संपत आली. पहिल्याला ते जाणवून त्याला आणखी उन्माद चढला. दोन्ही पाय पहिल्याच्या ताब्यात जाणार हे पाहून दुसऱ्याच्या  रागाला पारावार उरला नाही. त्याने तिथेच पडलेला एक भलामोठा धोंडा उचलला आणि पहिल्याच्या वाट्याच्या पायावर घातला. गुरूच्या पायातून कळ सणाणली आणि त्याने गगनभेदी ठणाणा केला. आपल्या वाट्याच्या पायाचा चेंदामेंदा झालेला पाहून पहिल्याने तर डोके गमावलेच. जराही विचार न करता त्याने एक शिळा उचलली, आणि "हे उन्मत्त माणसा, तुझ्या वाट्याचा पाय जाग्यावर राहील असे तुला वाटले काय?" असे म्हणून ती शिळा उरलेल्या चांगल्या पायावर आदळली. गुरूवर्य वेदनेने बेशुद्ध पडले. शुद्ध आली तेव्हा त्यांचे पायातील संवेदन गेले होते. त्याही परिस्थितीत त्यांना ती इष्टापत्तीच वाटली. निदान वेदना तरी नाहीत. पण काही कालाने त्यांचे मस्तक जबर दुखू लागले. गुरुने काही क्षण विचार केला आणि त्याबद्दल शिष्यांना काही न सांगण्याचा निर्णय घेतला!

सध्या गुर्जी गुमान पडून आहेत. एका शिष्याने खूप मुत्सद्दी विचार करून त्यांना बरे करायचा पण केला आहे, तर लगेच दुसऱ्याने "कसा बरे करतोस तेच पाहतो" असा प्रतिपण केला आहे.

बोध - चूक ऋषिवर्यांची आहे. आश्रमात प्रवेश तर दिला, पण त्यांचे एकूण गुण पाहता त्या दोघांना घरी हाकलून द्यायला हवे होते. आश्रमावर राक्षसांचे आक्रमण अधूनमधून होत राहिले असते पण ऋषिवर्यांचे दोन्ही पाय तरी धोतरात राहिले असते. 

No comments:

Post a Comment