Sunday, November 9, 2014

तहनामा

शुंभ महाराज घोड्यावरून पायउतार झाले. मागेपुढे फर्जंद होते. म्हादबा मोतद्दाराने घोड्याला मुजरा करून बरोबर आणलेला तोबरा राजांच्या मुखासमोर धरला. "कुठं पाहतो आहेस म्हादबा? ही हिंमत? घोडं आणि धनी यांतला फरक दिसेनासा झाला तुला?" म्हादबा सटपटला. "आर्रर्रर्र, घोटाळा झाला म्हाराज! माफी! माफी!". अदबीने झुकून कुर्निसात करत म्हादबा मागे झाला आणि घोड्याच्या दिशेने वळला. त्याला थांबवून शुंभराजे घाईघाईने म्हणाले,"अरे अरे थांब! आण तो तोबरा इकडे. बरेच दिवसात हरभरा चाखला नाही. बघू बरं जरा." असं म्हणून त्यांनी बचकभर हरभरा उचलला आणि बकाणा भरला. "ऑम, नॉम, च्युम च्युम नॉम नॉम!" असे सुखाचे हुंकार काढत डोळे मिटून त्यांनी रवंथ करायला सुरुवात केली. "वाहवा! हा च्युम च्युम तोबरा च्युम काय चविष्ट च्युम च्युम लागतो आहे." म्हादबा म्हणाला,"म्हाराज, वाईच हतं थांबा. घोड्याचं खोगिर काढून तेला चारापाणी करून येतो आन मग तुमास्नी म्हालात बांदतो." शुंभराजांचे तिकडे लक्ष नव्हते,"आं? हं हं, नॉम च्युम च्युम!" असे आवाज करून त्यांनी अश्वखाद्य महोत्सव चालू ठेवला. म्हादबा परत आला तेव्हा तोबरा संपला होता. शुंभराजांनी तिथलीच एक गवताची काडी पैदा केली होती आणि डोळे मिटून ते दात कोरत होते. मधूनच समाधानाने प्चक प्चक असे आवाज काढत होते. शुंभराजांचे काडीप्रेम म्हादबाला माहीत होते. कानात काडी घालणे, दातात काडी घालणे, या दोहोंपैकी काहीच उपलब्ध नसल्यास दिसेल तिथे काड्या घालणे हा त्यांचा छंद होता. तेही नसेल तर ते मोहिमेवर जात आणि यथेच्छ काड्या घालत. या त्यांच्या छंदाबाबत "यांतून तुम्हाला काय मिळते" असा प्रश्न त्यांचे स्नेही आणि हितचिंतक करीत. त्यांस ते "माफीचा साक्षीदार" मधल्या नाना पाटेकरसारखा चेहरा करीत, मागे छान रेलून पाय ताणत, दोन्ही हाताचे पंजे डोक्याखाली ठेवत ते समाधानाने "आनंद!" असे उत्तर देत. त्यांच्या बरोबरचे हशम एकमेकाकडे पाहून हसत, एक डोळा मिचकावून एकमेकांना हळूच टाळी देत. "म्हादबा, तोबरा अंमळ जून निबर होता बरे. पण चालेल.  मोहिमेवर असताना आम्हांस खाण्यापिण्याची शुद्ध राहिली नव्हती. खान आमच्या मागावर असेल असे वाटले होते पण कसले काय. शेवटी आमचा गनिमी कावा वापरावा लागला. आमच्या नुसत्या बोलांनी खान वठणीवर आला. त्याने आमच्याशी लढण्यास साफ नकार दिला. तरीही आम्ही आमचे तोपची गोळे डागणे चालू ठेवले. असा काही मारा केला आहे की यंव रे यंव! शेवटी खान दिल्लीस पळून गेला अशी खबर आमच्या या विश्वासू फर्जन्दांनी आणली आणि आम्ही मोहीम आवरली. शिवाय, आमचा शिधा संपला होता. रसद पुरवणारे सरदार बारामतीकर यांनी आयत्या वेळी आम्हांस दगा केला. शेवटचे चारपाच दिवस आम्ही चिंचेचा पाला आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा खाऊन काढले. आम्ही पाळलेला पोपट नेहमी का बोंबलत असतो याचा उलगडा होतो आहे. कुठल्याही आर्त बोंबलण्याला स्फोटक पण गंभीर पार्श्वभूमी असते याचे ज्ञान होते आहे. यापुढे त्याला हिरव्या मिरच्या खायला घालणे बंद करा अशी आज्ञा आम्ही दिली आहे.

इतके दिवस आम्ही समजून होतो की खान दिल्लीस पळून गेला. दोन दिवसांपूर्वी खबर आली की आम्हांस जुझांत गुंतवून ठेवून खानाने महाराष्ट्र गिळंकृत केला! आमचे हेर अत्यंत कुचकामी आहेत. खानाचे हेर आधी येऊन बातमी सांगून गेल्यावर आमचे हेर उगवले. या रयतेलाही आम्ही पाहून घेऊ. रयतेने आमची सोडून (पक्षी: साथ सोडून) खानास साथ दिली. आमचे शिलेदार शिधा मागावयास गावात जात तेव्हा लोक "अजून भांडी पडली नाहीत, पुढच्या दारी जा" असे सांगत. आमच्या हेरांनी अनेक घरांत चोरून डोकावून पाहिले असता खानाचे सैनिक छान पंगतीत जेवायला बसलेले दिसले. त्या वृत्ताने आमच्या मनास अत्यंत कष्ट जाहले. खानाच्या सैन्याला रयतेने आदराने पंगतीत बसवले याने आधीच मन:स्ताप झालेला, त्यात आमचे हेरही असे, त्यांस अजिबात पोच म्हणून नाही. आमच्या हेरखात्यात येण्याआधी बहुधा दैनिक सकाळचे वार्ताहर असावेत. प्रत्येक घरात कोणते पक्वान्न होते याचीही बित्तंबातमी द्यायचे. चिंचेचा पाला पानी आणि मिरच्यांचा ठेचा अपानी गुरगुरत असताना ते ऐकणे यासारखे दु:ख नाही. आता तर आमचे सैनिक खानाच्या सैन्याचा वेष धारण करून हळूच त्यांच्यात जेवायला बसू लागले आहेत. साधे सैनिक ते, आमच्यासारखा राजधर्म, क्षत्रियधर्म त्यांस कोठून कळणार? दयेच्या बिर्याणीपेक्षा स्वाभिमानाची पेज बरी. दोष आमच्या सैनिकांचा नाही, रयतेचा आहे. रयतेने आता आमचा इशारा ऐकावा. तुमच्या हितासाठी तुम्हालाच वेठीला धरावे लागले तरी बेहत्तर, आम्ही ते करणार. तुमच्या हितासाठी तुम्हाला खंडणी द्यावी लागणार. महाराष्ट्र एकसंध राहण्यासाठी त्याचे तुकडे पडले तरी बेहत्तर….नाही, थांबा, मला म्हणायचे होते, महाराष्ट्र एकसंध राहण्यासाठी रयतेचे तुकडे पडले तरी बेहत्तर, चुकले, खानाच्या आधिपत्याखाली एकसंध राहणे म्हणजे आमचे तुकडे पडणे, ते होणे नाही. पुन्हा चुकले, थांबा, आम्ही हे विधान उद्या दुरुस्त करू. या मोहिमेने आम्हांस पुरते थकवले आहे. दारूगोळा संपला आहे, आता नुसत्या सुर-वाती राहिल्या आहेत. अनेक दिवसांनी हा हरभरा पोटात गेल्यावर जरा पोट डब्ब वाटते आहे, पण रिकामे असण्यापेक्षा बरे. इतके दिवस आपल्यापेक्षा आपली घोडी चांगली खात होती याची जाणीव होऊन मन खिन्न झाले आहे. खावयास मिळाले नाही तर आपले हे सैन्य उद्या राहणार नाही हे आम्ही जाणतो. त्यात खानाने महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची घोषणा करून आमचे धंदापाणी बंद केल्याची खबर आली आहे. आता गनिमी कावाच हवा. खानास तह करावा असा निरोप धाडला आहे. तहनाम्याचे पहिलेच कलम आहे - "बऱ्याबोलाने शरण येऊन आम्हांस शिधा पुरवावा". आम्हांस खात्री आहे, खान पुरता कात्रीत सापडला आहे. आम्ही लढणार नाही, त्याला नुसत्या तहाच्या बोलणीत गुंतवणार, जेरीला आणणार, आणि शेवटी तहात लोळवणार! हां! याला म्हणतात गनिमी कावा! खानाचे फडणवीस स्वत:स मुत्सद्दी समजत असतील, आता करा म्हणावे या गनिमी काव्याचा प्रतिकार.

आमच्या हेरांनी (आता त्यांना हेरसुद्धा म्हणवत नाही, नुसतेच दूत म्हणतो) पुन्हा वाईट बातमी आणली आहे. हे दूत आमचा पगार खातात आणि खानासाठी काम करतात असा संशय येतो आहे.  या दूतांवर नजर ठेवायला दुसरे दूत ठेवले पाहिजेत. खानाकडून तहात पाच लक्षांचा मुलुख मागून घेतल्यावर पहिले ते काम करायचे. तर दूतांनी बातमी आणली, त्यांनासुद्धा तह करायचा आहे. त्यांच्या तहाचे पहिले कलम आहे आमच्या तहाचे पहिले कलम नाकारणे. आम्ही पाठवलेले पहिले कलम खोडून तिथे लिहिले होते, "शिधा मिळणार नाही, तरी धीर सोडू नये, रांगेत उभे राहावे. बारामतीकरसुद्धा उभे आहेत. त्यांनी काही मागितलेले नाही. आत्तापर्यंत जमवलेले शरीरमांद्य वापरून जगण्याचा त्यांचा निर्धार आहे. तुमची एकूण शरीरयष्टी पाहता तुम्हाला ते जरा कठीण जाईल, परंतु जिभेला कमी व्यायाम देऊन ऊर्जा टिकवल्यास तग धरू शकाल." अस्सं काय! ठीक आहे मग आमचा उलट तहनामा ऐकाच आता. कलम एकच - "आम्ही रांगेत उभे राहू, परंतु मग मुकाट्याने आम्हाला शिधादान करावे. त्यात तडजोड होणार नाही. आमच्या स्वाभिमानाची परीक्षा घेऊ नये." दूतांना हा तहनामा देऊन उलटपावली परत पाठवले. त्यांस आज्ञा केली, काही झाले तरी रांगेतून हलू नका. अगदी बहिर्दिशेसही जाऊ नका. भावना अगदीच अनावर झाल्यास रांगेत आमच्या नावाचा दगड ठेवूनच जा. दोन तीन प्रहरातच दूत परत आला. खानाने आमचा अपमान करायचे ठरवलेच आहे असे दिसते. उलट तहनाम्यातील एकमेव कलम असे - "आम्हांस रांगेतील दगड चालेल. त्यांस उलट अपमान न करता वाट पाहता येते. असेच दगड पाठवून देणे. आपण येण्याची तसदी न घेणे. युवराजांस तर मुळीच न धाडणे. त्यांनी मागील तहात बोलणी करावयास येऊन मेजावरील आमची लेखणी लंपास केली आहे. ते आम्हांस पुत्रासमान. त्यांचा राग काय म्हणोन करावा? त्यांस लिहावाचावयास येते काय? येत असल्यास लेखणीचा सदुपयोग करावा." ठीक आहे. आम्ही उलट तहनामा पाठवला आहे. शेवटचा म्हणजे शेवटचा.
कलम १ - आम्हाला नगराच्या बाहेर वेढा टाकण्याची परवानगी द्यावी. आमचे आपल्या हरएक हरकतीवर बारीक लक्ष असेल याचे भान ठेवावे.
कलम २ - शिधावाटप होणार असेल तर आम्ही रांगेत आहोत याचे भान आणि मान अनुक्रमे ठेवावा.
कलम ३ - आम्ही स्वाभिमानी आहोत हे मान्य केल्याचा दाखला स्वत: खानाने द्यावा.
कलम ३अ - खानास जमत नसेल तर निदान आपल्या फडणीसांच्या स्वाक्षरीने खलिता तरी पाठवावा
कलम ४ - ही भीक नव्हे, पण कलम २ खरोखरच आम्हांस आणि महाराष्ट्रास महत्वाचे आहे. ध्यानी असो द्यावे.

तहनाम्यावर स्वाक्षरी करून तो दूताकरवी रवाना केल्यावर शुंभमहाराज थकून गेल्यासारखे वाटले. त्यांनी म्हादबास हाक मारून सांगितले,"आण रे तो तोबरा परत. वेढा बराच काळ पडणार आहे." म्हादबाने हरभऱ्याचा वाडगा आणि शेंदेलोणाची बरणी आणून शुंभमहाराजांसमोर ठेवली आणि म्हणाला "म्हाराज, ही बरणी जास्त उपयोगी पडणार आहे." शुंभराजे प्रसन्न होत्साते विचारते झाले,"म्हादबा, तुझे कौतुक वाटते. आमच्या प्रकृतीची किती काळजी रे तुजला?" म्हादबा चाचरत उत्तरला,"म्हाराज, माफी असावी. ही माजी आक्कल नव्हं. खानाच्या दूतांसंगं तहनामा आन ही बरणीबी आलीया."

No comments:

Post a Comment