इंडियन एस्प्रेसमधल्या जाहिराती पाहून पाहून कंटाळा आला राव. सारखं कतार की कातर, मस्कत की मुस्काट असल्या देशांच्या जाहिराती हो! असल्या भीषण नावांच्या देशांतही इंजिनियर वगैरे लागतात हे पाहून डोळे पाणावत. "मुसुनमानांचे देश ना रे हे? जळ्ळी मेली ती नोकरी! जाळीची टोपी घालून बकऱ्या चारायला इंजिनेर कशाला हवेत रे यांना? बरं बकऱ्याही काही दुधासाठी नाहीत, शेवटी खाटखुटच व्हायचं ना त्यांचं. तू बरीक इथेच बरा रे. छान वरणभात बरा आपला!" इति आमची प्रेमळ आत्या. मग काही जाहिराती कसलं तरी सर्कारी महानिगम, नाही तर सहकारी महासंघ असल्या खास, निविदा सूचना मागवल्याप्रमाणे. "सर्कारी नोकरीच बरी हो! एकदा चिकटलास की निवृत्तीकडे डोळे ठेवून कालक्रमणा करायची. एरवी घरात झोपा काढतोसच. त्या तिथे काढ." इति आमचे पोष्टात असेच ष्टाम्पासारखे चिकटलेले एक काका. पिताश्रींचे म्हणणे वेगळे होते. काही कर आणि स्वत:च्या पायावर उभा राहा म्हणजे मी सुटलो, एवढीच माफक अपेक्षा ते ठेवून असत. मातोश्रींच्या काळज्या वेगळ्या असत. त्यांना सरकारी नोकरी म्हणजे भ्रष्टाचार, खाजगी कंपनीत नोकरी म्हणजे गुलामगिरी आणि स्वत:चा उद्योग म्हणजे डोकेदुखी, ब्लडप्रेशरला आमंत्रण असे वाटे. त्यामुळे मी नक्की काय करावे याबद्दल ती संभ्रमात असे. पण मी "मार्गाला लागावे" यासाठी तिच्याकडून नवस बोलणे, उपवास करणे इत्यादि अत्यंत प्रभावी अशा उपाययोजना नियमित चालू असत. याशिवाय आत्याच्या यजमानांना सांगून जरा "शब्द" टाकायला सांगणे वगैरे उपाय चालूच होते. मी तसा काही रिकामा नव्हतो. संध्याकाळ ते रात्री दीड वाजेपर्यंत सदाशिव पेठ ते शिंदे आळी या प्रभागातील चार चार वेगवेगळे कट्टे सांभाळत होतो. जनसंपर्क प्रचंड होता. परंतु तो आमच्या मातोश्रींच्या मते "उडाणटप्पू" मंडळींचा होता. "काडीच्याही उपयोगाची नाहीत हो ही मंडळी! त्यांच्या संगती राहून तू मात्र वाया चालला आहेस!" असे ती म्हणे. मी म्हणत असे,"उपयोगी पडण्यासाठी केलेली मैत्री ही खरी मैत्रीच नव्हे." आणि वर कीर्तनकाराच्या थाटात "खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी" हे पद ताना घेऊन म्हणून दाखवत असे. त्यावर ती माऊली हातातील उलथने माझ्या दिशेने फेकून खरा लोभ कसा असतो ते दाखवत असे.
अशा रीतीने शांत जीवन जगत असताना, क्षितिजावर झुंजूमुंजू झाले. भवितव्य उज्वल असल्याचा संकेत देणारे शुभशकुन होऊ लागले. दिवाभीते गायब झाली, पक्षी मंजुळ शब्द करू लागले. गोठ्यात गायीला वासरू लुचू लागले. परसात कुक्कुटकोंब्याचे आगमन झाले, मुंगुसाने दर्शन दिले, शेजारच्यांची काळी मांजरी बाहेर पडत होती ती मला पाहून पुन्हा आत पळाली. बहुधा मीच तिला आडवा गेलो. हे असे शुभशकुन का होत आहेत याचा विचार करत असतानाच आमचा मध्यरात्रीच्या मंडईतील कट्ट्यावरील (हॉटेल प्यासानजीक) एक मित्र आला. त्यानेच शुभवर्तमान आणले. सदरहू मित्र, अन्या, कॉंग्रेसचा मध्यम धडाडीचा पण होतकरू असा कार्यकर्ता आहे. मध्यम धडाडीवरून "तरुण तडफदार नेते" इथवर प्रमोशन मिळण्यासाठी फक्त अजून एका दखलपात्र गुन्ह्याच्या नोंदीची आवश्यकता आहे. येत्या गणपतीत तो मानसही पूर्ण होईल याची त्याला खात्री आहे. पोलीसच आपल्या प्रगतीच्या आड येतात अशी त्याची तक्रार आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या हाणामारीत आमच्या या मित्राचा सक्रिय सहभाग होता. स्वत: हॉकी स्टिक परजत हा आघाडीवर होता. विरोधी पक्षाचे तीन चार कार्यकर्ते पुढे महिनाभर हॉस्पिटलमध्ये होते. या पराक्रमाच्या जोरावर या वर्षी नगरसेवकपदाची निवडणूक तरी लढवायला मिळेल अशी त्याला आशा होती. पण पक्षनेतृत्वाने सांगितले होते, गुन्ह्याची नोंद असल्याशिवाय बायोडेटातील हा प्रसंग ग्राह्य धरणार नाही. वास्तविक, विरोधी पक्षाने एफआयआर नोंदवायचा प्रयत्न केला होता पण पोलिसांनी तो दाखलच करून घेतला नाही. शेवटी आमचा हा मित्र पुरावा म्हणून फुटलेले डोके असलेले कार्यकर्ते घेऊन पक्षनेतृत्वाकडे गेला होता. पण दुर्दैवाने ते कार्यकर्तेही कॉंग्रेसचेच आहेत असे तिथे कळले. ते पक्षाच्याच आदेशावरून विरोधी पक्षाच्या जमावातून फिरत होते असे कळले. मायला, पोलिसांना माहीत होतं पण बोलले नाहीत. तरीच एफआयआर नोंदवून घेतला नाही. असो. थोडक्यात आमचा हा मित्र धडाडीचा असला तरी असा कमनशिबी आहे.
आम्ही दोघेही मग "प्यासा"त घुसलो. अनेक नेहमीचे होतकरू कार्यकर्ते आलेले दिसत होते. अन्याची वळख लई असल्याने प्रत्येक टेबलापाशी थांबून विचारपूस करण्यात थोडा वेळ गेला. साधारण संवाद,"बास का राव, आमच्याशिवाय बसले का तुमी. त्यावर पलीकडून,"न्हाय ओ सायेब, हे काय तुमचा गिलास पण एक एकष्ट्रा खाली ठेवला ना!" असा. आम्ही एक टेबल पकडलं. "युवराजसाहेब टीम काढताहेत!" अन्या म्हणाला. मी तंद्रीत होतो. चार पेगनंतर अशी तंद्री कुणालाही लागेल. मी म्हणालो,"म्हणजे? लोकसभेत बट्ट्याबोळ झाल्यावर आता आयपीएलमध्ये घुसणार का?" तर म्हणाला ,"अरे नाय! पक्षाला कसलीतरी बांधणी करायची आहे. कसलं तरी पुनरुज्जीवन करायचं आहे म्हणे. त्यासाठी उमेदवार हवे आहेत. काय असतील कुठे तरी गेस्ट हाऊस वगैरे बांधत. आपल्याला काय. स्वत: युवराज मुकादम होऊन देखरेख करणार आहेत. उद्या मुलाखती आहेत. तर तू यायचंस. नुसत्या घरात झोपाच काढतोस नाहीतरी." मी म्हणालो,"अरे पण मुलाखती घ्यायला तुमचे पोचलेले लोक असणार ना राव. आपण काय एवढे धडाडीचे नाय." तर अन्या म्हणाला, "अरे चिंताच सोड. स्वत: युवराज मुलाखती घेणार आहेत! काहीही विचारलं तर आपण "असहिष्णुता वाढत चाललेली आहे, दहशतवादी हल्ले वाढत चाललेले आहेत, महागाई वाढत चाललेली आहे, आरएसएसचा उद्दामपणा वाढत चालला आहे, आणि या सगळ्याला मोदी जबाबदार आहेत" एवढंच उत्तर द्यायचं." बघ पोपट खूष होतो की नाही ते. अगदीच जर पेटलेला असेल तर "महिला सशक्तीकरण, अर्णब गोस्वामी" एवढंच म्हणायचं. या दोन शब्दांनंतर युवराज पुढील तीन चार मिनिटं बधिर होतात असं ऐकलंय. मग आपणच घेऊ कागदावर त्यांचा अंगठा आपल्याला पास केल्याचा."

No comments:
Post a Comment