Friday, June 12, 2015

भ्रष्टाचारी कोण?

चला, आम आदमी खरंच आम आदमी निघाला. तो निघणारच होता. कायदेकानू, क्लिष्ट नियम, संहिता वगैरे लागू करून भ्रष्टाचार निपटता येईल असे जे भ्रामक स्वप्न केजरीवाल चमूने दिले होते ते स्वप्नच राहणार होते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. बहुतेक सरकारी बाबूंचे जग कायदे, नियम, जी. आर., सर्क्युलर्स , वेतनश्रेणी, कारवाई या शब्दांपलीकडे नसते. केजरीवालही याला अपवाद ठरले नाहीत. त्या शब्दांतून त्यांनी नव्या समाजाची उभारणी सुरू केली. अर्थात केजरीवाल जेव्हा या नियमांच्या पाट्या वाहत होते तेव्हा सामान्य जनता नव्या बिल्डींगची स्ल्याब पडते आहे अशा कुतूहलाने ते पाहत होती. परंतु तसं असलं तरी खऱ्या आम आदमीला त्याची भुरळ पडली, आणि सारासार विचारशक्ती गमावून या मृगजळामागे तो धावला. ज्या प्रत्येकाने हे स्वप्न पाहिले त्याची मानसिकता बहुधा भ्रष्टाचार हा आपण सोडून सर्व इतर करतात अशी असावी. बदलाची सुरुवात आपल्यापासून असते हे साधे सूत्र लक्षात आले असते तर आम आदमी पार्टीला हा फार्स करून सत्तेत यायला कारण मिळाले नसते. परंतु आपल्याला शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यायला हवा असतो, आपण नुसते झेंडे लावून जयंती साजरी करायची असते. नेमके हेच या भामट्याने हेरले. यात स्वत: केजरीवाल यांचे कदाचित पैसा मिळवणे हे ध्येय नसेल, पण अहंकारी मनुष्याला स्वत:चा अहंकार कुरवाळला जाणे याखेरीज कसलेही सुख मोठे वाटत नाही. आपल्याला कसलाही मोह नाही, आपण भ्रष्टाचाराच्या पलीकडे गेलो आहोत, जणू निर्वाणप्राप्तीच झाली आहे असे वाटणे हेही अहंकाराचेच दुसरे रूप. बरं, केजरीवाल असतील स्वत: निर्वाणाप्रत पोचलेले. पण त्यांच्याभोवतालच्या बाकीच्या गणंगांचं काय? असे धुतलेले तांदूळ कुठून येणार होते?

भ्रष्टाचार हा काही पैशापुरता नसतो. ती मानसिकता आहे. आपलं जगणं आहे त्यापेक्षा सुखकर करणं ही मूलभूत इच्छा केवळ माणूस या प्राण्याची असते. तशी कमी अधिक प्रमाणात इतर सस्तन प्राण्यात ती दिसून येते, पण ती गरज केवळ त्या क्षणापुरती असते. इतर प्राणी पुढील अन्न कधी मिळेल याची चिंता करत अन्नाचा साठा करून ठेवत नाहीत. सौ. सिंहिणबाईंनी श्रीयुत सिंहसाहेबांना अवेळी उठवून "कोवळे हरीण खावेसे वाटते" असे म्हटल्याचे ऐकिवात नाही, आणि असलेच तर सिंहसाहेबांना कधी तशी धावपळ करताना पाहिल्याचे ऐकण्यात नाही. प्राणी आहे तो क्षण जगतात. वेळ आली की मरून जातात. कालची हुरहूर नाही, उद्याची चिंता नाही. आहे ती आजची, आत्ताची धडपड. पण ते जगणेही कसे, पुरेपूर. उद्याच्या चिंतेने डिप्रेशन घेऊन बसायचे नाही. भय, मैथुन आणि निद्रा यातून बाहेर आला तो मनुष्यप्राणी. तेही केवळ योगायोगाने. आपले मूळ खरं तर चिचुंद्री या प्राण्यापर्यंत जाते. निरुपद्रवी. मेंदू एवढा छोटा की केवळ मूलभूत नैसर्गिक गरजा भागतील एवढीच त्याची क्षमता. कधी काळी झाडावर वास्तव्य करणारा हा प्राणी, डायनासोर नामशेष झाल्यानंतर या प्राण्याला जमिनीवर कुणी शत्रू उरला नाही. म्हणून हा खाली उतरला. पुरेसे अन्न, वातावरणात अचानक झालेली प्राणवायूची वाढ हे सगळं जुळून आलं आणि मेंदूची वाढ होऊ लागली. परंतु अन्न ही मूलभूत गरज मेंदूच्या एका कोपऱ्यात अत्यंत प्रबळ अशी ज्वलंत राहिली. मेंदूची शक्ती वाढली आणि ती स्वाभाविकपणे अन्नाच्या गरजेसाठी वापरली जाऊ लागली. ही सुरुवात. तिथून जे आपण निघालो ते आज आपला मेंदू केवळ त्याच गरजेसाठी पण विकृतीकडे झुकेल अशा हव्यासाने वापरू लागलो आहोत. खोटं बोलणं - जगण्याचा एक नेहमीचा भाग झाला आहे. आपण म्हणतो कधी खोटं बोलू नये. पण आता असं सिद्ध झालं आहे, की ही गोष्टही आपण उत्क्रांतीबरोबर घेऊन आलो आहोत. खोटं बोलणं, धोका देणं, विश्वासघात करणं "फायद्याचं" असतं असा आपला प्रवास झाला आहे. हीच मानसिकता पुढे भ्रष्टाचाराच्या रूपात आपल्यासमोर आली आहे. पण ही विकृती आहे असं ठरवणारे आपण कोण? आपणच नियम बनवायचे, आपणच सुसंस्कृत काय ते ठरवायचं. मेंदूच्या उत्क्रांती आणि परिस्थितीनुरूप झालेल्या बदलात बराचसा परस्परविरोधही आहे. खोटं बोलणं हे चांगलं नाही हे जाणवतं, पण वेळ आल्यास खोटं बोललं जातं, मुख्यत: फायद्यासाठी. भ्रष्टाचाराचं मूळ इथे आहे. आपल्यातच आहे, आपली ज्या पद्धतीने उत्क्रांती झाली त्यात आहे. आपण कधीच खोटं बोललो नाही अशी हमी कोण देऊ शकेल? जाहीररीत्या विचारलं आणि जाहीररीत्या उत्तर द्यायचं असेल तर सगळेच हरिश्चंद्राचे अवतार निघतील. आणि तेच हा मुद्दा सिद्ध करून जाईल.  
 
मी आपल्यात असलेल्या या परस्परविरोधाबद्दल नेहमीच लिहीत आलो आहे. या विसंगतीतून आणि त्याचबरोबर जी बुद्धिमत्ता आपल्याला प्राप्त झाली आहे त्यानेच आपल्यासमोर या समस्या निर्माण झाल्या आहेत. आपण हा विरोधाभास ओळखून जाणीवपूर्वक प्रयत्न परस्परविरोध कमी करायचे ठरवले तर बदल घडेल. प्रत्येकात तो बदल त्याच्यापुरता असेल, पण बहुतांशी लोकांनी आपल्यापुरते असे करायचे ठरवले तर समाजाची वृत्ती आतूनच बदलेल. शेवटी समाजसुधारणा म्हणजे तरी काय? कुणीतरी व्याख्यानं देऊन, प्रवचनं देऊन बदलायचं असतं तर आत्तापर्यंत केव्हाच बदललो असतो. गाडगेबाबांनी आयुष्य वेचलं हाती खराटा घेऊन. काय झालं? त्यांच्यावर पुस्तकं लिहिली गेली, कथा निर्माण झाल्या. ती वाचून झाल्यावर अत्यंत भक्तिभावानं आपण पुन्हा ग्यालरीतून कचरा खुशाल खाली टाकू लागलो. आजही आपल्याला गुड मॉर्निंग पथकं तयार करावी लागताहेत. गांधीजींनी भले सत्याग्रहाचा मंत्र दिला. आज आपण असत्याचा आग्रह धरून सत्याग्रह करतो आहोत, सगळेच खातात म्हणून आपण दुर्लक्ष करतो. थोडक्यात आपल्या देशात भले भले महात्मे होऊन गेले, आपली मानसिक प्रगती शून्य. कमळाच्या पानावरील पाण्याप्रमाणे या महात्म्यांचे सर्व तत्वज्ञान आपल्या अंगावरून ओघळून गेले. अंगाला एक थेंबही चिकटून राहिला नाही. याचा अर्थ कुणी सांगून बदल घडत नाही. त्यासाठी सर्वांनाच तसे वाटावे लागते. सर्वांना आपली नैसर्गिक उत्क्रांतीजन्य जडणघडण समजून घेऊन अंतर्गत विरोधाभासाला तोंड द्यावे लागेल. मोह, इच्छा, मत्सर इत्यादि भावना काही सुटणार नाहीत, पण त्या सुटणार नाहीत हे समजून किमान दुसऱ्याला आपल्याइतकाच जगण्याचा अधिकार आहे हे मान्य केले, दुसऱ्याला आपल्याइतकंच मानाने वागवले पाहिजे हे लक्षात आले तर नियम, कायदे आपोआपच पाळले जातील. शेवटी ते आहेत आपणच आपणासाठी केलेले. एखादे गाढव रस्त्यावरून जाताना  मध्येच अचानक थांबले तर आपण त्याने नियमाचा भंग केला असे म्हणत नाही. त्याच्याकडून ती अपेक्षा नाही. अपेक्षा माणसांनी ते करू नये अशी असते. आपण तेही करत नाही हा भाग वेगळा. असो, आजचं लेखन केजरीवालवरून सुरू होऊन गाढवावर थांबलं हा एक योगायोग असं मनात येत आहे. पण त्याने गाढवावर अन्याय होतो आहे असंही वाटतं आहे. मानवाच्या उत्क्रांतीत गाढवाचा काहीच हातभार नाही.

No comments:

Post a Comment