Friday, February 6, 2015

पुन्हा महाभारत!

अर्जुना! रे अर्जुना! कुंतीने तिसऱ्या वेळा साद घातली तरी अर्जुनाचा काही पत्ता नव्हता. माते! जरा द्रोणाचार्यांकडे जाऊन येतो, असं म्हणून खांद्याला शबनम लावून तो सकाळीच बाहेर पडला होता. "अरे थंडीचा एवढा बाहेर पडतो आहेस, मफलर तरी गुंडाळ कानावर" असं म्हणून कुंतीनं त्याला प्रेमानं मफलर गुंडाळायला लावला होता.आपल्या सहा मुलांत हाच असा कसा अशक्त निघाला याचं कुंतीला नेहमीच वाईट वाटत असे. मुलगा वडलांच्या वळणावर गेला आहे म्हणावं तर पांडूतात्या तसे अगदीच काही अशक्त नव्हते. नाही म्हटलं तरी पाच मुलं झालीच की. तेही ते स्वत: हजर नसताना. नको त्या ठिकाणी नको त्या वेळी पोचणं हे मात्र अगदी वडिलांचं घेतलंन हो बाकी असं तिच्या मनात आलं. तिनं घाईघाईनं स्टोव्ह पेटवून केलेला चहा केला होता. त्यालासुद्धा अर्जुन नको म्हणत होता. खोकल्याला बरा म्हणून कुंतीनं भाराभर गवती चहा घरात आणून ठेवला होता. त्याला समोर बसवून कुंतीनं तो चहा त्याला प्यायला लावला. तो पितानाही सगळं त्याचं बोलणंही द्रोणाचार्यांबद्दलच. द्रोणाचार्य पूर्वी सैन्यात होते. आता निवृत्त होऊन हस्तिनापुराचं आदर्श गाव कसं होईल याची ते चिंता करत असायचे. वाडी तेथे कचराकुंडी, सरकार तेथे असहकार, हातभट्टी तेथे आत्मिक उन्नती असे अनेक प्रकल्प द्रोणाचार्यांनी हाती घेतले होते. त्यांनी अर्जुनासारखी तरुण मुले हाताशी धरून पुढील पिढी या कामासाठी तयार करण्याचेही व्रत घेतले होते. अर्जुन हा त्यांचा पट्टशिष्य. त्यांच्या हातून शबनम पिशवी बक्षीस मिळण्याइतका. ही पिशवी धनुष्याप्रमाणे परिधान कर असे आचार्यांनी बजावून ती त्याच्या गळ्यात टाकली होती. त्या पिशवीत असहकारास्त्र, उपोषणास्त्र, अहंकारास्त्र, उपद्रवास्त्र, वादास्त्र, करवादास्त्र, ठणठणाटास्त्र, थयथयाटास्त्र, मानापमानास्त्र आणि समरप्रसंगी प्राण वाचवणारे शीघ्रपलायनास्त्र अशी अनेक अमोघ अस्त्रे सिद्ध करून दिली होती. अर्जुनाने सर्व अस्त्रांवर आपले प्रभुत्व दाखवले होते. हेकेखोर असला तरी अर्जुन स्वत: नि:स्वार्थी होता. द्रोणाचार्यांनी पोपटाचा डोळा फोडायला सांगितला तेव्हा बहुतांशी कौरवांनी त्यावर डोळा ठेवला आणि उर्वरित पांडवांनी काणाडोळा केला होता. अर्जुनाने मात्र पोपटाच्या डोळ्याला डोळा भिडवत त्याला नजरद्वंद्वाचे आव्हान दिले होते. वयाच्या सातव्या वर्षीच अर्जुनाला चष्मा लागला होता. त्या भिंगातून (उजवा मायनस ४, डावा मायनस ३) ते तेजस्वी डोळे एखाद्यावर रोखले जात तेव्हा त्या डोळ्यातील नि:स्वार्थी त्यागपूर्ण ब्रम्हतेजाने समोरचा दिपून जात असे. पोपट तरी त्याला अपवाद कसा असणार? परंतु हा पोपट भलताच माजोरडा निघाला. एव्हाना ही कौरव पांडव जनता येताना पाहून झाडावरील इतर पोपट केव्हाच उडून गेले होते. या पोपटाने पेरू, आंबे इत्यादि वस्तूंवर डोळा ठेवण्याऐवजी अर्जुनाच्या डोळ्याला डोळा लावला. पण ते ब्रह्मतेजच शेवटी! लघुशंकेचा ओघळ नदीत गेला तर तो काही संगम होत नाही. पोपटानेच दृष्टी गमावली. आंधळा होऊन लज्जित झालेला तो पोपट आत्मज्ञानाच्या शोधार्थ धडपडत कैलासाकडे निघून गेला. काही काही वेळा आंधळेपण आल्यावरच डोळे उघडतात. अर्जुनाने डोळा फोडला, पण दृष्टी दिली. पण भारतीय लोकच ते. नुसते अर्जुनाने पोपटाचा डोळा फोडल्याची हाकाटी करू लागले. आजही सर्वसामान्यांत तीच गोष्ट प्रचलित आहे. डोळा फोडून झाल्यावर अर्जुनाला लोककार्यात विशेष काहीतरी करण्याची इच्छा झाली. तशी हस्तिनापुरातील लोकांविषयी त्याला आत्मीयता होती. त्या शबनम पिशवीतील सगळी अस्त्रे वापरून त्याला लोकांचं कायमचं कल्याण करून ठेवायचं होतं. तशांत द्वारकेचा तो कृष्णमुरारी नुकताच हस्तिनापुरात वास्तव्यास आला होता. द्वारकेच्या समृद्धीच्या सुरस आणि रम्य कथा सांगून त्यानं द्रोणाचार्यांच्या सगळ्या शिष्यांना तोंडात बोटे घालायला लावली होती. दुर्योधनाची  त्यावर तत्काळ श्रद्धा बसली होती. परंतु अर्जुनाचा त्याच्यावर विश्वास बसला नव्हता. व्हेन इन डाऊट, ऑलवेज डाऊट असं त्याला द्रोणाचार्यांनीच शिकवलं होतं. द्रोण शिष्यवृत्तीतून मिळालेले द्रव्य वापरून उन्हाळ्याच्या सुट्टीत तो द्वारकेला जाऊनही आला. कृष्ण-गोपिकास्नान-वस्त्र-लंपास कथा खरी असावी असे त्याला आतून वाटत होते. त्यानुसार तो त्या डोहाकडे जाऊनही आला. परंतु आता तिथे प्रवेशशुल्क आकारत आहेत हे पाहून त्याचा भ्रमनिरास झाला होता. तरीही एका आंतरिक दुर्दम्य इच्छेने ते शुल्कही त्याने दिले होते. परंतु डोहाच्या आसपास गोपिका तर सोडाच, त्यांची वस्त्रेही दिसली नाहीत. नुसते गोपच इकडे तिकडे भटकत होते. ते पाहून त्याला आपण लुटले गेलो अशी भावना झाली होती. बनिये लेकाचे. परंतु डोहाच्या कडेला लागलेल्या गाड्यांत भेलिकापुरी नावाचे अप्रतिम खाद्य मिळत असल्याचे त्याला आढळले आणि प्रवेशशुल्क काही प्रमाणात वसूल झाले असे त्याला वाटले होते. भेलिकापुरीचे चार द्रोण  रिचवून झाल्यावर गुजर देशीचे लोक बनिये पण खाऊ उत्तम घालतात हे त्याने मान्य केले होते.

तूर्तास आमचा कथानायक द्रोणाचार्यांच्या मठात बसला होता. हस्तिनापुरास कृष्णाच्या तावडीतून कसे सोडवावे याचा विचारविमर्श करण्यासाठी तो आला होता. त्या देवकीनंदनापेक्षा त्याचा बंधू बलराम जास्त डेंजर आहे असे त्याला जाणवले होते. हातात नांगर घेऊन दिसेल त्या शहराचा विकासच विकास करून टाकू, विकासाच्या आड याल तर खबरदार, अशी धमकीवजा घोषणा बलरामाने केली होती. दरबार असो, प्रतिष्ठित लोकांची शांभवीपार्टी असो, बलराम सर्वत्र नांगर घेऊन फिरत असे. तो नांगर पाहून लोकच काय, बैलसुद्धा त्याच्यापासून चार हात दूर राहत होते. द्रोणाचार्यांनी दिलेली अस्त्रे निष्प्रभ ठरत होती. या नांगराचा फाळ आता हस्तिनापुराच्या भूमीत घुसणार होता. त्यात द्रोणाचार्य "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" असं सांगून राजकारणापासून अलिप्त होऊन समोर बसले होते. अर्जुनानं मग आदरानं तुम्ही शस्त्रच काय कृपा करून काहीच धरू नका असे सांगितले होते. मग द्रोणाचार्य त्याच्यावर उखडले होते. द्रोणाचार्यांच्या स्वत:च्याच शबनम पिशवीतील सगळी अस्त्रे संपली आहेत हे त्याला जाणवले होते. मग तो तेथून बाहेर पडला. आणि एका विचित्र उर्मीत तडक त्या कृष्णाच्या महालाकडेच निघाला. महालाबाहेरच रक्षकांनी त्याला अडवले. कृष्ण महाराज विश्रांती घेत आहेत काय असे अर्जुनाने त्यांस विचारले. तेव्हा होय, काल रात्रौच त्यांचे गांधार देशातून येणे झाले असून, आज सायंकाळी पुन्हा मिस्र देशाच्या दौऱ्यावर निघणार आहेत असे रक्षकांनी सांगितले. असो, आम्ही ते जागृतावस्थेत येण्याची वाट पाहत त्यांच्या पायाशी बसतो असे अर्जुनाने रक्षकांस सांगितले. रक्षकाने चार पाच क्षण त्याकडे निरखून पाहिले. दमलेला दीन चेहरा, चष्म्यावर धूळ बसलेली, चेहऱ्याभोवती थंडीनिवारणासाठी गुंडाळलेले उपरणे, खांद्याला शबनम, असे एकूण ध्यान पाहून त्यांस काय वाटले न कळे, त्याने त्यास आत सोडले. पाहतो तर आत दुर्योधन आधीच येऊन श्रीकृष्णाच्या उशाशी बसला आहे असे दिसले. नाईलाजाने मग अर्जुनास पायापाशी बसावे लागले. कृष्णास हस्तिनापूर मानवले आहे असे दिसले. त्या वर खाली होत असलेल्या पोटाने छप्पन इंची छातीकडून प्रसरण पावण्याची प्रेरणा घेतली आहे असे त्यास वाटले. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर छद्मी हसू होते. तो निवांत हस्तिनापुर टाईम्स वाचत बसला होता. झोपेतच महाराजांनी एक ढेकर दिली. शेजारी टेबलावर ठेपल्याचा स्टीलचा बसकट डबा होता. ठेपले चेपून त्यांनी निद्रा ग्रहण केल्याचे दिसत होते. आता हे लवकर उठण्याचे चिन्ह दिसत नाही असे अर्जुनाच्या मनात आले. आपणही तोवर एखादा ठेपला ग्रहण करावा काय असेही त्याच्या मनात येऊन गेले. पण सोसला नसता, म्हणून तो विचार त्याने सोडून दिला. शिवाय आपली माता स्वयंपाक करून ठेवून आपली वाट पाहत बसली असेल हेही त्याच्या ध्यानात होते. भीम घरी पोचायच्या आत आपण पोचले पाहिजे नाहीतर आपल्यासाठी काही शिल्लक राहणार नाही हेही त्याला माहीत होते. कृष्णमहाराज लवकर जागृतावस्थेत यावेत अशी प्रार्थना तो करत बसला. तेवढ्यात दुर्योधनाने उरलेले ठेपले फस्त केले आणि छान ढेकर दिली. त्या आवाजाने कृष्णाची निद्रा भंग पावली. "अरे कोन छे भई?" असे त्रासिक आवाजात त्याने विचारले. हस्तिनापुरात येऊन आता काही मास लोटले तरी मातृभाषेत बोलण्याची गोडी काही औरच. महाभारताच्या नियमाप्रमाणे आता कृष्णाची नजर प्रथम पायाशी बसलेल्या आपल्यावर जाईल असे अर्जुनाला वाटले आणि तो उत्साहाने बोलण्यास सज्ज झाला तोच "अरे, दुर्योधनभाय! केम छो? तमे क्यारे आव्या?" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा पडला. असे कसे झाले बुवा? तोच त्याच्या लक्षात आले, छातीशी स्पर्धा करणारे पोट आड आले असावे. कुणालाच आपल्या पोटापलीकडे दिसत नसते. दुर्योधनाने त्याच्याकडे विजयी मुद्रेने पाहिले आणि कृष्णास म्हणाला,"झाला एक प्रहर येऊन. आपली साथ आमच्याबरोबर हवी महाराज!" यावर कृष्णाने समाधानाने मान डोलवत,"जरूर! का नाही? आम्ही सर्व भारतवर्षाचे आहोत." असे उद्गार काढले. असे म्हणत कृष्ण उठून बसला. तेव्हा कुठे पायाशी त्याला अर्जुन बसलेला दिसला. "अरे अर्जुन भाय, तमे केम आव्यो?" आयला! दुर्योधनाला तेवढा "कधी आलास" आणि आपल्याला मात्र "का आलास?" उठून निघूनच जावे असे असे त्याच्या मनात आले. पण प्रश्न हस्तिनापुराचा आहे हे लक्षात घेऊन त्याने स्वत:ला आवरले. तो म्हणाला,"महाराज, आपण तर माझ्याबरोबर येणार नाही हे उघड आहे. तेव्हा आता काय जे उरले असेल ते द्या." कृष्ण म्हणाला,"चोक्कस! अरे हे बग कालच द्वारकेवरून ठेपला आला ने. इथेच कुटे तरी होता. अरे! केम दुर्योधन भाय! सगळा साफ करून टाकला तू ? हे बरा नाय. हे अर्जुनभायला मी आता काय देल?" अर्जुन म्हणाला,"महाराज, माफ करा, मला उत्तर मिळाले. येतो मी." असे म्हणून तो उठला. कृष्णाने "अरे असा कसा जाऊ देल मी तुला. निदान मसालानी चाय तर पाजेलच तुला. तू कशाला घाबरते? हस्तिनापूरची जनता हाये ना तुज्या मागे!" असे म्हटले. परंतु त्याला नम्र नकार देऊन अर्जुन बाहेर पडला. तो अजिबात निराश झाला नव्हता. उलट मदत न मिळण्याने त्याला बरेच वाटले होते. आता युद्ध! शबनम पिशवीतील सर्व अस्त्रे काढून युद्ध! आणि कृष्णाने जे म्हटले ते बरोबरच आहे असे त्याला वाटले. होय, या युद्धात आपल्याला  हस्तिनापूरची जनताच साथ करेल.

अर्जुन घरी आला तेव्हा अपेक्षेप्रमाणे कुंती त्याची वाट पाहत बसली होती. माते! आता तू चिंता विसर! श्रीकृष्ण भलेही दुर्योधनाला मिळाला असेल, सगळ्या झेडप्या, बाजार समित्या घेऊन बसला असेल. पण आपल्या मागे आता ही हस्तिनापूरची जनताच आहे. त्या सैन्याच्या बळावर श्रीकृष्णाचाच पाडाव मी करणार आणि हस्तिनापुरावर राज्य करणार. कुंतीने अतीव कौतुकाने त्याकडे पाहिले. डोक्याभोवती उपरणे गुंडाळलेले, दिवसभराच्या वणवणीने म्लान झालेले त्याचे मुख तिने पाहिले आणि तिला भडभडून आले. होय रे पुत्रा, पाडाव करशील यात शंका नाही रे. पण पाडाव झाल्यावर पुढे काय? अर्जुनाने बावचळून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, "म्हणजे? मी समजलो नाही माते! पुढे काय म्हणजे राज्य करायचे." कुंतीने त्याच्याकडे करुणेने पाहिले,"माझ्या मुला, द्रोणाचार्यांनी तुला सर्व अस्त्रे दिली, ती तू आत्मसात केलीस. पण ती सर्व अस्त्रे युद्धात वापरायची आहेत रे! युद्ध संपल्यावर राज्य करताना ती अस्त्रे वापरून उपयोगी नाही. द्रोणाचार्यांनी त्याचे शिक्षण तुला दिले नाही. मला वाटते ते त्यांच्याकडेही नाही. नाही तर ते स्वत:च युद्ध जिंकून राज्य करत बसले नसते का?" अर्जुन कसनुसा होत म्हणाला,"मग माते आता? युद्ध तर नक्की जिंकणार मी. या शबनम पिशवीशिवाय माझ्याकडे काही नाही. आयला, हा भलताच घोळ होऊन बसला! कदाचित हा त्या कृष्णाचाच डाव नाही ना? इतक्या सहजासहजी राज्य देऊन जनतेलाच आपल्या बोकांडी बसवण्याचा?" आता त्याची भूक कमी झाली. राज्य करावे लागलेच तर काय करायचे, त्यातून बाहेर कसे पडायचे याचा विचार तो करू लागला.

No comments:

Post a Comment