आटपाट नगर होतं. तिथं नेहमीप्रमाणे एक राजा राहत असे. राजाला तीन सुना होत्या. दोन आवडत्या व एक नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टे, नेसायला जाडेभरडे, राहायला कारा आणि हातात झाडूकाम दिलं. पुढे निवडणूकमास आला. पहिला सोमवार आला. ही रात्री गेली. नागकन्या, देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं बाई, बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामुठी वाहतो, कंठशोष करून आपापल्या भ्रताराचा प्रचार करतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कंत्राटे प्राप्त होतात, मुलंबाळं होतात, त्यांची पुढील सोय होते, नावडत्या माणसांवर चौकशी बसते, वडील माणसांपासून मुक्ती मिळते. मग त्यांनी विचारलं, तू कोणाची कोण? तशी म्हणाली, मी राजाची सून. तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या, देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, कसला गं बायांनो, वसा वसता? आम्ही लोकशाहीचा वसा वसतो. मूठ चिमूट कार्यकर्ते घ्यावेत, बरी एवढी अनुदानं घ्यावीत, भरपूर सुपाऱ्या जवळ ठेवाव्यात, गंध-फूल घ्यावं, बेल पानं घ्यावीत. मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने "शाही शाही लोकशाही, ही माझी ठोकशाही ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदाजावा, विरोधी पक्षा, जनतेला नावडती आहे ती आवडती कर रे देवा." असे म्हणत तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टंमाष्टं खाऊ नये. दिवसा निजू नये. उपास नाहीच निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा, कार्यकर्ते सोडवून आणावेत आणि मुकाट्याने (म्हणजे न बोलता. एरवी आपण मुकाट्यानेच जेवतो ते नाईलाजाने) जेवण करावं. हा वसा पाच वर्षे करावा. पहिल्या सोमवारी झाडू दिवस, दुसऱ्यास आंदोलन, तिसऱ्यास धरणे , चवथ्यास उपोषण आणि पाचवा आलाच तर प्राणांतिक उपोषण आणि पांथस्थाकडून एक थप्पड असं करत जावं. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देवकन्या-नागकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला स्वत:च स्वत: जुगाड कर असं सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, पांथस्थाकडून एक श्रीमुखात खाल्ली आणि सारा दिवस उपास केला. जावानणंदांनी उष्टंमाष्टं पान दिलं ते गाईला घातलं. साऱ्या एनजीओंची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. यावेळेस नावडतीनं अमेरिकेतून सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्या-देवकन्यांबरोबर पूजा केली आणि "शाही शाही लोकशाही, ही माझी ठोकशाही ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा
भावा, नणंदाजावा, विरोधी पक्षा, जनतेला नावडती आहे ती आवडती कर रे देवा." असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. दूध पिऊन निजून राहिली. सासऱ्यानं संध्याकाळी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीने सांगितले माझा देव फार लांब आहे, वाटा फार कठीण, काटेकुटे आहेत, साप आहेत, वाघ आहेत तिथं माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं, मफलर गुंडाळला, व्हिक्स गाठीशी ठेवलं, इवलं कफ सिरप बाटलीत काढून घेतलं, देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणू लागली. आवडत्या सुना हसू लागल्या चेष्टा करू लागल्या. वाटेत काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. घरच्यांना नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या-देवकन्या यांसहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडित खांब झाले. हंड्या झुंबरं लागली. नावडती पूजा करू लागली. आवडत्या हसत चहा पिऊ लागल्या. नावडतीनं गंध फूल वाहिलं, नंतर हातात झाडू घेऊन ""शाही शाही लोकशाही, ही माझी ठोकशाही ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा
भावा, नणंदाजावा, विरोधी पक्षा, जनतेला नावडती आहे ती आवडती कर रे देवा."असं म्हणून तो झाडू वाहिला. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम झालं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटे ठेऊन तळी पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली, माणसं बाहेर गेली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला तो तेथे एक लहान देऊळ. पिंडी आहे, पूजा केलेली आहे असं दिसलं. जवळ खुंटीवर पागोटं आहे. सुनेला विचारलं हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांस दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. तिच्या हातातील झाडू काढून घेऊन आवडत्या सुनांच्या हातात दिला. नुसता चहा पीत बसू नये असं त्यांना सुनावलं. जसा देव तिला प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
(पुढे - बुधवारची कहाणी. नावडतीचं राजवाड्यात उपास तापास, उपोषण सुरू)
(पुढे - बुधवारची कहाणी. नावडतीचं राजवाड्यात उपास तापास, उपोषण सुरू)
No comments:
Post a Comment