Monday, February 2, 2015

सुंदरीचे कन्फेशन

(सर्वात प्रथम समस्त स्त्रीवर्गाची क्षमा मागतो आणि हे लिखाण केवळ नर्मविनोद खात्यात घालावं अशी विनंती करतो.  जग सुंदर आहे, स्त्रिया ते अधिक सुंदर करतात यावर माझा विश्वास आहे. चला, आता असलं तुफानी वाक्य टाकल्यावर पुढची वाक्यं मला देहांतशासन ठोठावणार नाहीत अशी आशा करतो. शिवाय, बायको माझं लिखाण वाचत नाही या ज्ञानाच्या बळावर हे धाडस झालं आहे.)

अलीकडेच एका सुप्रसिद्ध बाईंनी जब्बरदस्त स्टेटस टाकलं होतं. ते खालीलप्रमाणे (जसेच्या तसे दिले आहे. व्याकरण/शुद्धलेखन/टंकन चुका यांची संपूर्ण मालकी बाईंची) -
हे परमेश्वरा...
मला माझ्या वाढत्या वयाची जाणिव दे.बडबडण्याची माझी सवय कमी कर. आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य इच्छा कमी कर.
दुसर्‍यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व त्यांच्या खाजगी प्रश्नांची दखल घेउन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊन देऊ नकोस.
टाळता येणारा फाफटपसारा व जरुर नसलेल्या तपशिलाचा पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ मुद्यावर येण्याची माझ्यात सवय कर.
इतरांची दुःख व वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच पण त्यावेळी माझ तोंड शिवल्यासारखे बंद राहुंदे. अशा प्रसंगी माझ्याच निराशा, वैफल्यांचे रडगाणे ऐकवण्याची माझी सवय कमी कर.
केंव्हा तरी माझीही चूक होउ शकते, कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो, गैरसमजुत होऊ शकते ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

पहिले तीनचार मुद्देच दिसत होते. मी थक्क झालो, थोडासा संशयही आला. वाटलं, छे, शक्य नाही. एका स्त्रीचं कन्फेशन? मुळात मला तसं वाटणंही चुकीचं आहे हे एकदम मान्य. पण थोडासा गोड आशावाद आपल्या प्रत्येकात असतोच ना? वाटलं या बाईंना आत्मज्ञान झालं! अगदी बोधिवृक्षाखाली बसलेल्या त्या गौतमाप्रमाणे. ही सगळी माया आहे हे या महामायेला समजलं. "केव्हा तरी माझीही चूक होऊ शकते" हे वाक्य एका बाईच्या तोंडून निघणं हे अंतिम ज्ञान झाल्याशिवाय केवळ अशक्य आहे! ते वाचून मला स्वत:लाच अंतिम ज्ञान होऊन आपल्याला अशक्य गोष्टी शक्य दिसू लागल्या तर नाहीत ना असं वाटू लागलं. कुंडलिनी जागृत होऊन मी जमिनीच्यावर सहा इंच तरंगत तर नाही ना अशी शंका येऊ लागली. मी खुर्चीतून उठलो खिडकीपाशी जाऊन बाहेर नजर टाकली. सर्वत्र शांत होते. झाडे मंद वाऱ्याने डुलत होती. त्यांच्या फांद्या पाने जिथल्या तिथेच होती. फूटपाथवरून एक मनुष्य आणि त्याचे कुत्रे निवांत चालले होते. तो इसम मोबाईलमध्ये पाहत होता, कुत्रे नाकाने पायाखालचे गवत पाहत होते. एक गाडी आवाज न करता आली आणि दृष्टीआड झाली. अपेक्षप्रमाणे सूर्य आकाशात जिथे असायला हवा साधारण तिथेच होता. अंतिम ज्ञान झाल्यावर दृष्टीत फरक पडतो की नाही कुणास ठाऊक. पण सर्व जग साकळल्याप्रमाणे स्तब्ध असे वाटू शकते अशी मी उगाच समजूत करून घेतली आहे. तेवढ्यात त्या कुत्र्याच्या नाकाला तो शोधत असलेला स्वीट स्पॉट सापडला असावा. त्याने आवश्यक ती पोझ घेतली आणि त्याच्या पोटाप्रमाणेच माझे साकळलेले जग मुक्त करून टाकले. बाकी प्रत्यक्षात कुत्रे कितीही भीतीदायक चेहऱ्याचे असो हे मुक्तासन करताना त्याच्या चेहऱ्यावर एक अपार करुण भाव दाटून येतो असे माझे स्वत:चे एक निरीक्षण आहे. त्याच्या त्या आसनाने माझे अंतिम ज्ञानाविषयी चिंतन संपून मी पुन्हा आपला नैसर्गिक अज्ञानात बागडू लागलो.

मग त्या अज्ञानाच्या अनिर्वचनीय आनंदात मी पुढे वाचू लागलो. बाईंचं स्टेट्स तिथंच संपलं नव्हतं. अजूनही बरंच काही लिहिलं होतं. आणि ते सुसूत्रही वाटत होतं. तिथेच खरं लक्षात यायला हवं होतं. असो. पुढं वाचत गेलो आणि उलगडा झाला. खाली मूळ लेखकाचं नाव दिलं होतं - पु. ल. देशपांडे! हात्त्याच्या! असंच का शेवटी? पु.लं., तुमचा प्रयत्न वाया गेला की हो. लेकी बोले सुने लागे या उक्तीप्रमाणे तुम्ही ही प्रार्थना स्वत:ची म्हणून लिहिलीत खरी, तुम्हाला वाटलं बाण लागायचा तिथे लागेल. पण सुनेला काही लागलंच नाही हो. उलट आमच्या सासूबाई कित्ती ग्रेट आहेत असं म्हणून तिनं आपल्या सगळ्या मैत्रिणींना तो किस्सा करून सांगितला. कदाचित आपल्या नवऱ्याला "बघा, इतर नवरे किती नम्र असतात, आपल्या स्वभावातील दोष कसे पटकन स्वीकारतात. नाही तर तुम्ही…" असं सांगण्याचा तो उपक्रम असावा. ते वाचणाऱ्या बायकाही अर्थातच महाचतुर. त्यांनीही "वा", "सुपर्ब!", "अप्रतिम विचार!" वगैरेंचा वर्षाव केला. पुलंचा पाडाव झाला. 

या सर्वातून मला पुढील ज्ञान झालं आहे - अंतिम ज्ञानापेक्षा पूर्ण ज्ञान डेंजरस आणि पूर्ण ज्ञानापेक्षा अर्धवट ज्ञान डेंजरस. पण जर अंतिम ज्ञान समाधान शांती आणि पूर्ण ज्ञान सुप्त आनंद देत असेल, तर अर्धवट ज्ञान निखळ निर्भेळ मज्जा देऊन जातं. आता हे लिहून झाल्यावर मला खरोखरच वाढत्या वयाची जाणीव देण्याची मागणी देवाकडे करावी असं वाटू लागलं आहे. असलं काही तरी लिहून हुतात्मा होणं केव्हाही धाडसाचं, पण जगण्याची इच्छाही काही वाईट नाही.

No comments:

Post a Comment