Sunday, February 1, 2015

शास्त्रीय रसिकता

"मैया मोरीsssss" बुवांनी तारसप्तकातील सूर लावला होता. मोरू आणि मी पहिल्याच रांगेत बसून ते ऐकत होतो. बुवांचा इतका वेळ वासलेला आ पाहून आम्हीही आ वासला. आकार इतका लांबला की हे गाणे आहे की रामदेवबाबांनी शिकवलेला प्राणायाम हे कळत नव्हते. आम्हीच कासावीस झालो. कार्डिअॅक अॅरेस्टप्रमाणे नरडीअॅक अॅरेस्टचाच हा प्रकार असावा. तेवढ्यात श्रोत्यांनीही बुवांचा अंत न पाहण्याचे ठरवले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या कडकडाटात ती मैया एकदाची मोरीतून बाहेर आली. मग तालमीतील पैलवान मुख्य मेहनत करून झाल्यावर जसा अंगावर आखाड्यातील माती घेऊन पडून राहतो तसे बुवांनी मैयाला माखन घुसळत ठेवले. बुवांचा चेहराही ते माखन चाखत असल्यासारखा झाला. तो तुपाळ सुखी चेहरा पाहून मी आणि मोरू जरा अस्वस्थ झालो. का कुणास ठाऊक, बुवांच्या चेहऱ्यात आणि बटाटेवड्यात कमालीचे साम्य दिसू लागले. आता काही काही गवयांच्या गाण्याच्या कार्यक्रमाला जाताना मध्यंतरातील बटाटेवडा हे केवळ आकर्षणच नव्हे तर दिलासाही असतो अशी माझी आणि मोरूची प्रामाणिक समजूत आहे. गाण्यात आम्हाला दोघांनाही फारसे गम्य नाही, पण  फुकट पासचे आकर्षण काही वेगळेच असते. आमच्या दोघांच्या कुटुंबांना तर गाण्यात मुळीच रस नाही. आमचे कुटुंब तर "जळ्ळं मेलं ते शास्त्रीय संगीत. इथं आयुष्यभर आम्ही भूपच ऐकतो आहोत. नेहमी मनी वर्ज्यच आमच्या नशिबात. तिथं आणखी येऊन कशाला ऐकायला हवा?" हे वाक्य रोज आम्हाला एकतालात ऐकवते. मागे एकदा केसरी वाड्यात गणपतीच्या कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकरांचे गाणे छान रंगात आले असताना हिने अचानक "अगं बाई, निघताना साबुदाणा भिजत टाकायला विसरले. मला घरी सोडा नाहीतर उद्या खिचडी नाही" असे सांगितले. चांगली रंगलेली "रसूलल्ला" चीज सोडून मी निमूटपणे हिला घरी सोडून यायला निघालो. "दयाघना" काय नेहमीच ऐकता येते. इथे साबुदाणा खिचडीचा सवाल होता. तेव्हा, आम्ही दोघे फुकट पास घेऊन आलो की आमची कुटुंबे झक्कपैकी शाॅपिंगचा बेत आखतात. "तुम्हां मित्रांचे एवढे गूळपीठ आहे तर तुम्ही दोघे जा हो, आम्ही बायकाबायका आपल्या बघतो काय करायचे ते." असे सांगितले जाते. मग आम्हीही "तुका म्हणे बरेंच झाले" असे म्हणून लगोलग सटकतो. 

गाण्याच्या हाॅलवर वेळेवर पोचणं हाही एक योगायोग असावा लागतो. वाटेत अडथळेच खूप. साधं खुन्या मुरलीधरापासून रमणबागेत पोचणं ते काय, पण वाटेतील बेडेकर मिसळ, प्रभा विश्रांतिगृह असले मोह आवरत वेळेवर पोचणं कर्मकठीण. मिसळीचा जहालपंथी रस्सा पोटात घेऊन पहिल्या रांगेत गाणं ऐकायला बसणं महाडेंजरस हे आम्ही अनुभवाने सांगतो. रश्शाला कट असं नाव उगाच पडलेलं नाही. एकदा मोरूने अशी काही डेरेदार ढेकर दिली होती की बुवांनी गाणे थांबवून मोरूला प्रतिदाद दिली. "आजवर माझ्या गाण्याला अशी तृप्तीची दाद मिळाली नव्हती. भरून पावलो." पुढे संपूर्ण कार्यक्रमभर प्रत्येक समेवर येताना बुवा मोरूकडे अपेक्षेने पाहत होते. मग मोरूलाही बळेच ढेकरा काढाव्या लागल्या. भैरवीपर्यंत आमच्या रांगेत फक्त मी आणि मोरू उरलो होतो. नंतर संयोजकांनी आम्हाला बाजूला घेऊन सुमारे पंधरा मिनिटे झापतालात झापले होते. मोरूवर अर्थातच त्याचा काही परिणाम नव्हता. "टोटली वर्थ इट" असे तो नंतर म्हणाला यातच सर्व आले. ते संयोजक आताशा आम्हाला पाहिले की "पहिल्या चार रांगा आरक्षित आहेत बरं का!" असं आवर्जून सांगतात. आम्हीही,"हो का? उत्तम केलेत! हल्ली काय कुणीही येऊन बसतं हो पुढे. मग आमच्यासारख्यांना उशीर झाला की मागे बसावं लागतं. धन्यवाद!" असं म्हणून पहिल्या रांगेत जाऊन बसतो. अलीकडेच ते "अत्यंत आगाऊ इसम आहे" असं माझ्याबद्दल कुणाला तरी सांगत होते असं ऐकलं. सांगूदेत. आपल्याला काय, दोन एक तास गाणं ऐकायला मिळालं म्हणजे झालं. नंतर शांत झोप लागते. गाढ झोपेतून उठून घरी जायचं बरेच वेळा जिवावर येतं. तरी बरं कुशनच्या खुर्च्या असतात हल्ली. पूर्वी कसोटी लागायची.  सतरंजीची बैठक. गवई अगदी पुढे चार फुटावर बसलेला. त्यातून ध्रुपद गायकी जोरावर होती. सा लावून झाला की गाडी अर्धा तास मंद्र सप्तकाच्या यार्डातच पुढे मागे करत राहायची. तबलजीही लेकाचा एक धिन वाजवून झाले की पुढचे धिन वाजवण्याआधी तबल्यावर छान पावडर बिवडर मारून घ्यायचा. तंबोरेवाल्यांचं बरं असायचं. तंबोऱ्यावर डोकं ठेवून झोपता येत असावं. आता तशी खूप प्रगती झाली आहे. एसी, कुशनच्या खुर्च्या, स्टेजवर लाईट, श्रोत्यांत अंधार इत्यादी गोष्टी आता पथ्यावर पडू लागल्या आहेत. नाही म्हणायला एकदा एका प्रसिद्ध गवयांनी फार पंचाईत केली होती. संयोजकांना प्रेक्षागारात लाईट चालू ठेवायला सांगितले. म्हणे श्रोत्यांशी संवाद साधायला बरं पडतं. झालं? त्या दिवशी जागरण झालं. पण असा प्रसंग विरळा. गाणं संपल्यावर मात्र गवयांना भेटून बिटून येणं माझ्या जिवावर येतं. मोरू मात्र आत जाऊन ,"वा! छान रंगली हां भैरवी" एवढंच म्हणून येतो. प्रसिद्ध गायकाशी बोलताना दडपण येणं वगैरे गोष्टी त्याला माहीत नाहीत. अगदी तबलेवाल्यालाही "जरा कमी लाऊड चाललं असतं" वगैरे बिनदिक्कत सांगतो. बाकी प्रत्येक तबलेवाल्याला आपला माईक कमी ठेवणे हा ऑडिओवाल्यांचा एक जागतिक कट आहे असं का वाटतं कुणास ठाऊक. संपूर्ण कार्यक्रमभर तबलेवाला ऑडिओ कंट्रोलरूम कडेपाहून आपल्या माईककडे हात करून "उचला उचला"चे इशारे करत राहतो आणि जगातील सर्व ऑडिओवाले त्याकडे दुर्लक्ष करत राहतात.
 
परवाच कुणी तरी कळवळून किंवा चिडून लिहिलं होतं, भारतात रसिकता संपत चालली आहे, शास्त्रीय संगीत कमी होत चाललं आहे. परदेशात मात्र अगदी जोरात कार्यक्रम होताहेत. हे असंच जर चालू राहिलं तर भविष्यात शास्त्रीय संगीत शोधायला परदेशातच जावं लागेल. गोष्ट खरी आहे हो. पूर्वी गाणं ऐकायला तरुण मंडळी खूप असायची. हल्ली ती संख्या कमी होत चालली आहे. मिका सिंग, हनी सिंग अशा नावाचे लोक गात आहेत, कार्यक्रम करत आहेत. त्यांच्या नावानेच त्यांना ती परवानगी दिली आहे. पण यांचे कार्यक्रम म्हणजे धुडगूस हो नुसता. जरा डोळा लागावा तर कुठल्या तरी नवीन गाण्याचा ठणठणाट सुरू व्हायचा. हल्लीच्या तरुण मुलांना जागरणं करायची फार हौस. त्यातून ते खिशात ते मोबाईल फोन. समोर तो गवई आतडी पिळून गातोय आणि यांचं इकडे स्टेटस अपडेट चालू "एन्जॉयिंग हिंदुस्थानी क्लासिकल कन्सर्ट. फीलिंग ब्लेस्ड विथ" कुणी तरी मसण्या. तो शेजारचा मसण्यापण हेच करण्यात गुंग. म्हंजे मला त्याचा त्रास नाही, पण त्या अंधारात फोनचा स्क्रीन एवढा प्रखर असतो हो. आपल्याला एवढ्या उजेडात झोप येत नाही. अशानं रसिकता कमी होणार नाही तर काय. मग ते बुवा चिडून म्हणाले ते काही खोटं नाही. उद्या खरंच शास्त्रीय संगीत फक्त परदेशात टिकून राहिलं तर आमच्यासारख्या रसिकांचं काय होणार? पुण्यातील समग्र रसिकता सॅन होजे या शहरात स्थलांतरित झाली आहे असे समजले. मग पुणे ते सॅन होजे तिकीट कितीला पडतं याची चौकशी करून आलो. काय भयंकर किमती आहेत हो! तरीही हे सगळे गायक लोक सारखे तिकडे कार्यक्रम कसे करतात? जाऊ दे. तितक्या किमतीत घरातच एसी बसवून होईल. शास्त्रीय रसिकतेला वाईट दिवस आले आहेत हेच खरं.

No comments:

Post a Comment