Thursday, February 19, 2015

ढवळ्या आन पवळ्या

जे आम्ही पैले छूटलाच म्हणालो होतो तेच झाले. मोदी आणि केजरीवाल यांनी बैलजोडीसारखे काम करावे असे आता खुद्द घनसंघिष्ट गोविंदाचार्यच म्हणाले आहेत. स्वत: गोविंदाचार्य जयप्रकाश नारायणांच्या मुशीतून तयार झालेले आहेत. "संपूर्ण क्रांती"च्या नाऱ्यात त्यांनी महत्वाचा बदल सुचवून त्याला "समग्र क्रांति" केले.  नुसताच भारत देश आणि हिंदुस्थान या दोहोंत जितका फरक आहे तेवढा फरक संपूर्ण आणि समग्र या दोन शब्दांत आहे. क्रांती म्हटलं की लोकांना क्रांती रेडकर आठवते, पण क्रांति म्हटलं की वासुदेव बळवंत फडके आठवतात. नुसत्या र्हस्व "ति" आणि दीर्घ "ती" मुळे एवढा फरक पडतो, तेव्हा "संपूर्ण क्रांती" चे "समग्र क्रांति" करणे ही छोटी गोष्ट नाही हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. इतके दिवस ते आरममध्ये उभे राहून परिस्थितीचे विश्लेषण करत होते. आम्हीही उभे राहून असेच विश्लेषण करत असतो. पण लोकांना ते बघवत नाही. तुम्ही नुसतीच बघेगिरी करता अशी आमच्यावर टीका होते. असो. विश्लेषण खूपच असह्य झाल्यावर ते दक्ष झाले आहेत आणि त्यांनी आज्ञा केली आहे. आता स्वयंसेवकाने ती केवळ पाळावयाची आहे. ती पाळली जाईलच यात शंका नाही. संघाची शिस्तच तशी आहे. आम्ही बोंबलून हेच सांगत होतो तर "स्वयंसेवकाने प्रथम आपला गणवेष, दंड आणि टोपी याकडे लक्ष दिले पाहिजे. तुझ्या चड्डीला पुरेशी खळ नाही, दंड कानापेक्षा उंच झाला आहे, टोपीचा कोन प्रजासमाजवादी झाला असून राष्ट्र सेवादलाकडे झुकला आहे. स्वयंसेवकाने संपत म्हटल्यावर संपत आणि विकीर म्हटल्यावर विकीर करावे, बौद्धिकाच्या वेळेस केवळ ऐकण्याचे काम करावे. " असे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार मग आम्ही चूप बसलो. दोन्ही बैलांकडे सध्या नुसते पाहतो आहोत. एक बैल सुलक्षणी असून त्याची चाल डौलदार आहे, डेरेदार वशिंड आहे, काठेवाडी वळणदार शिंगे आहेत, किनखापी झूल ल्यायली आहे, मुद्रा कनवाळू असून ओझे ओढायला वाघ आहे. दावणीतून मोकळा सोडला तरी तडक शेताशिवाय कुठेही जात नाही. नाव ढवळ्या ठेवले आहे. बैल असूनही रोज दहा शेर दूध देत असल्याची वदंता निर्माण झाली आहे. दुसरा अवखळ असून, प्रकृतीने अंमळ तोळामासा आहे, दावणीला अजिबात बांधून चालत नाही, तत्काळ भुईवर अंग लोटून देतो, पाय ताठ करतो, पाहणाऱ्यास वाटते आटोपला कारभार. पण सोडताक्षणी टुणकन उडी मारून उठतो आणि पळत सुटतो.  कामास बरा आहे, पण भारी तुडतुड्या. सरळ रेषेत काही नांगर चालत नाही. मुलाने भुईवर रेघोट्या माराव्यात तशी नांगरणी होते. पुन्हा कामास लावावे तर जोखड झुगारून पळत तडक गोठ्यात जाऊन उभा राहतो. जोरात हाकावे म्हणून शेपटी पिरगळावयास जावे तर जागेवर थांबून मूत्रविसर्जनाचे कार्य सुरू होते.

बैलांच्या अनेक जोड्या आपल्या भारतवर्षाने पाहिल्या आहेत. महाराष्ट्रातच गेली अनेक वर्षे खिल्लारी बैलांची जोडी होतीच. त्यातील एक बैल तर खास वंशाचा वारसा घेऊन आलेला. पूर्वीचे ते गायवासरू आठवा जरा. पक्षातील अनेक बैलांच्या धक्काबुक्कीने खंगलेली ती गाय, तिच्या आचळांना ढुशा देणारे ते वासरू. तेच मोठे झाले. खंगलेली गाय मरण केव्हाच पावली. मग पक्षाच्या इतर बैलांनी परदेशातून जर्सी गाय आयात केली म्हणून एका कावेबाज बैलाने तो गोठा सोडून त्याने स्वत:चा पिळवणूकीचा (पक्षी:पिळून दूध काढणे) धंदा सुरू केला. एव्हाना ते वासरू आता मोठे झाले होते, पंचक्रोशीत त्याच्या खुरांना आव्हान देणारे कुणी नव्हते. हा फुटून निघालेला बैल काही ताकदवान नव्हता, पण इतर बैलांना झुंजवत ठेवून आपल्याला हवी ती गाय आणि गवत मिळवणारा होता. साहजिकच दोघेही एकत्र येणे अटळ होते. धंदा एकच असल्याने ही जोडी जमली. शेजारी शेजारी चालत असताना शिंगे एकमेकांत अडकत, जखमा होत, पण तरीही एकाच ध्येयाच्या ध्यासाने ही जोडी बरीच वर्षे टिकली. पुढे अवर्षणाचा काळ आला. जोडी फुटली.

आणखी एक गोssssड जोडी महाराष्ट्राने पाहिली. पण ही जोडी सामान्य नव्हती. एक कमळा नावाची म्हैस आणि दुसरा चक्क चट्टेरी पट्टेरी वाघ! म्हैस अस्सल कोकणस्थ असल्यामुळे शिंगे आणि जीभ तीक्ष्ण होती. आणि वाघ डरकाळ्या फोडण्यात, प्रसंगी चावण्यात पटाईत होता. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा मोकाट वावर होता. पण म्हणतात ना देवाची करणी आणि नारळात पाणी. दोघांचं चक्क प्रेम जमलं. मग प्रेमात पडलेले पुरुष बुद्धी गहाण टाकतात तसंच काहीसं वाघाचं झालं. वाघानं धडपडत जाऊन शिकार करावी, म्हशीनं गोठ्यात बसून थंडपणे रवंथ करावा. असं पंचवीस वर्षं चाललं. वाघाची चाळीशी आली. म्हशीला चाळशी लागली. आयडेण्टिटी क्रायसिस निर्माण झाला. धुसफूस वाढली. वाघ म्हणाला,"मी आहे म्हणून तू आहेस. एक क्षण एकटी टिकायची नाहीस या जंगलात.". म्हैस फणकाऱ्यानं म्हणाली,"आहा! तोंड बघा! लग्नाला उभी राहिले तर पन्नास जण रांग लावतील." यानं डरकाळी फोडली, तिनं भ्यां केलं. त्यानं दात विचकले, हिनं शिंगं दाखवली. झालं, जोडी फुटली.

आता बरेच दिवसांनी आमच्या ढवळ्याला शोभेलसा पवळ्या सांगून आला आहे. उत्तम स्थळ आहे. गोविन्दाचार्यांनी दोघांच्या पत्रिका पाहिल्या आहेत. छत्तीस काही नाही, पण बरेचसे गुण जमताहेत. कामे खूप पडली होतीच. शेतात नांगरणी होती, भाजणी होती, मळणी होती. घरातही काही कामे कमी नव्हती. बागेला पाणी देण्यासाठी विहिरीला पोहरा लावला होता, तो ओढायचे काम होते, शिवाय नुकताच गोबरग्यासचा प्लांट टाकला होता, त्यात मोलाची "भर" टाकायची होती. पण चालले होते भलतेच. ढवळ्याने घरचीही कामे करावीत, शेतात नांगरायलाही जावे आणि पवळ्याने गावभर कोंडाळी धुंडाळत हिंडावे, रात्री वस्तीला गोठ्यात यावे असे चालले होते.म्हणूनच आम्ही म्हणत होतो. ढवळ्यास आपले शेतात काम करू द्या, या पवळ्याला घरच्या आवाठ्यात फिरू द्या. गोबरग्यासच्या टाकीला उत्तम शेण तरी देईल. निदान घरास फुकट ग्यासपुरवठा तरी होईल. शिवाय त्यावर  ओसरीतील दिवा तरी चालेल निदान वर्षभर. वीजबिल तेवढेच कमी. कसे? बरे झाले घरच्याच व्हेटरनरी डॉक्टरने सांगितले. न्हाव्याने काख भादरण्यास आणि व्हेटरनरी डॉक्टरने एनिमा देण्यास कचरू नये. डॉक्टरला पुढे चार दिवस जेवणे कठीण जाते पण बैलाचे तरी पोट साफ होते.

Tuesday, February 10, 2015

कहाणी मंगळवारची

आटपाट नगर होतं. तिथं नेहमीप्रमाणे एक राजा राहत असे. राजाला तीन सुना होत्या. दोन आवडत्या व एक नावडती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टे, नेसायला जाडेभरडे, राहायला कारा आणि हातात झाडूकाम दिलं. पुढे निवडणूकमास आला. पहिला सोमवार आला. ही रात्री गेली. नागकन्या, देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं बाई, बाई कुठे जाता? महादेवाच्या देवळी जातो, शिवामुठी वाहतो, कंठशोष करून आपापल्या भ्रताराचा प्रचार करतो. यानं काय होतं? भ्रताराची भक्ती होते, इच्छित कंत्राटे प्राप्त होतात, मुलंबाळं होतात, त्यांची पुढील सोय होते, नावडत्या माणसांवर चौकशी बसते, वडील माणसांपासून मुक्ती मिळते. मग त्यांनी विचारलं, तू कोणाची कोण? तशी म्हणाली, मी राजाची सून. तुमच्याबरोबर येते. त्यांच्याबरोबर देवळात गेली. नागकन्या, देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, कसला गं बायांनो, वसा वसता? आम्ही लोकशाहीचा वसा वसतो. मूठ चिमूट कार्यकर्ते घ्यावेत, बरी एवढी अनुदानं घ्यावीत, भरपूर सुपाऱ्या जवळ ठेवाव्यात, गंध-फूल घ्यावं, बेल पानं घ्यावीत. मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने "शाही शाही लोकशाही, ही माझी ठोकशाही ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदाजावा, विरोधी पक्षा, जनतेला नावडती आहे ती आवडती कर रे देवा." असे म्हणत तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा, उष्टंमाष्टं खाऊ नये. दिवसा निजू नये. उपास नाहीच निभावला तर दूध प्यावे. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल वहावा, कार्यकर्ते सोडवून आणावेत आणि मुकाट्याने (म्हणजे न बोलता. एरवी आपण मुकाट्यानेच जेवतो ते नाईलाजाने) जेवण करावं. हा वसा पाच वर्षे करावा. पहिल्या सोमवारी झाडू दिवस, दुसऱ्यास आंदोलन, तिसऱ्यास धरणे , चवथ्यास उपोषण आणि पाचवा आलाच तर प्राणांतिक उपोषण आणि पांथस्थाकडून एक थप्पड असं करत जावं. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य देवकन्या-नागकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी तिला स्वत:च स्वत: जुगाड कर असं सांगितलं. त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली, पांथस्थाकडून एक श्रीमुखात खाल्ली आणि सारा दिवस उपास केला. जावानणंदांनी उष्टंमाष्टं पान दिलं ते गाईला घातलं. साऱ्या एनजीओंची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. यावेळेस नावडतीनं अमेरिकेतून सामान मागून घेतलं. पुढे रानात जाऊन नागकन्या-देवकन्यांबरोबर पूजा केली आणि "शाही शाही लोकशाही, ही माझी ठोकशाही ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदाजावा, विरोधी पक्षा, जनतेला नावडती आहे ती आवडती कर रे देवा." असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. दूध पिऊन निजून राहिली. सासऱ्यानं संध्याकाळी विचारलं, तुझा देव कुठं आहे? नावडतीने सांगितले माझा देव फार लांब आहे, वाटा फार कठीण, काटेकुटे आहेत, साप आहेत, वाघ आहेत तिथं माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं, मफलर गुंडाळला, व्हिक्स गाठीशी ठेवलं, इवलं कफ सिरप बाटलीत काढून घेतलं, देवाला जाऊ लागली. घरची माणसं मागं चालली. नावडते, तुझा देव दाखव म्हणू लागली. आवडत्या सुना हसू लागल्या चेष्टा करू लागल्या. वाटेत काटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही. घरच्यांना नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या-देवकन्या यांसहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडित खांब झाले. हंड्या झुंबरं लागली. नावडती पूजा करू लागली. आवडत्या हसत चहा पिऊ लागल्या. नावडतीनं गंध फूल वाहिलं, नंतर हातात झाडू घेऊन ""शाही शाही लोकशाही, ही माझी ठोकशाही ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, नणंदाजावा, विरोधी पक्षा, जनतेला नावडती आहे ती आवडती कर रे देवा."असं म्हणून तो झाडू वाहिला. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम झालं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटे ठेऊन तळी पाहायला गेला. नावडतीची पूजा झाली, माणसं बाहेर गेली. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं. देवळाकडे आणायला गेला तो तेथे एक लहान देऊळ. पिंडी आहे, पूजा केलेली आहे असं दिसलं. जवळ खुंटीवर पागोटं आहे. सुनेला विचारलं हे असं कसं झालं? माझा गरीबाचा हाच देव. मी देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांस दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं. तिच्या हातातील झाडू काढून घेऊन आवडत्या सुनांच्या हातात दिला. नुसता चहा पीत बसू नये असं त्यांना सुनावलं. जसा देव तिला प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

(पुढे - बुधवारची कहाणी. नावडतीचं राजवाड्यात उपास तापास, उपोषण सुरू)

Friday, February 6, 2015

पुन्हा महाभारत!

अर्जुना! रे अर्जुना! कुंतीने तिसऱ्या वेळा साद घातली तरी अर्जुनाचा काही पत्ता नव्हता. माते! जरा द्रोणाचार्यांकडे जाऊन येतो, असं म्हणून खांद्याला शबनम लावून तो सकाळीच बाहेर पडला होता. "अरे थंडीचा एवढा बाहेर पडतो आहेस, मफलर तरी गुंडाळ कानावर" असं म्हणून कुंतीनं त्याला प्रेमानं मफलर गुंडाळायला लावला होता.आपल्या सहा मुलांत हाच असा कसा अशक्त निघाला याचं कुंतीला नेहमीच वाईट वाटत असे. मुलगा वडलांच्या वळणावर गेला आहे म्हणावं तर पांडूतात्या तसे अगदीच काही अशक्त नव्हते. नाही म्हटलं तरी पाच मुलं झालीच की. तेही ते स्वत: हजर नसताना. नको त्या ठिकाणी नको त्या वेळी पोचणं हे मात्र अगदी वडिलांचं घेतलंन हो बाकी असं तिच्या मनात आलं. तिनं घाईघाईनं स्टोव्ह पेटवून केलेला चहा केला होता. त्यालासुद्धा अर्जुन नको म्हणत होता. खोकल्याला बरा म्हणून कुंतीनं भाराभर गवती चहा घरात आणून ठेवला होता. त्याला समोर बसवून कुंतीनं तो चहा त्याला प्यायला लावला. तो पितानाही सगळं त्याचं बोलणंही द्रोणाचार्यांबद्दलच. द्रोणाचार्य पूर्वी सैन्यात होते. आता निवृत्त होऊन हस्तिनापुराचं आदर्श गाव कसं होईल याची ते चिंता करत असायचे. वाडी तेथे कचराकुंडी, सरकार तेथे असहकार, हातभट्टी तेथे आत्मिक उन्नती असे अनेक प्रकल्प द्रोणाचार्यांनी हाती घेतले होते. त्यांनी अर्जुनासारखी तरुण मुले हाताशी धरून पुढील पिढी या कामासाठी तयार करण्याचेही व्रत घेतले होते. अर्जुन हा त्यांचा पट्टशिष्य. त्यांच्या हातून शबनम पिशवी बक्षीस मिळण्याइतका. ही पिशवी धनुष्याप्रमाणे परिधान कर असे आचार्यांनी बजावून ती त्याच्या गळ्यात टाकली होती. त्या पिशवीत असहकारास्त्र, उपोषणास्त्र, अहंकारास्त्र, उपद्रवास्त्र, वादास्त्र, करवादास्त्र, ठणठणाटास्त्र, थयथयाटास्त्र, मानापमानास्त्र आणि समरप्रसंगी प्राण वाचवणारे शीघ्रपलायनास्त्र अशी अनेक अमोघ अस्त्रे सिद्ध करून दिली होती. अर्जुनाने सर्व अस्त्रांवर आपले प्रभुत्व दाखवले होते. हेकेखोर असला तरी अर्जुन स्वत: नि:स्वार्थी होता. द्रोणाचार्यांनी पोपटाचा डोळा फोडायला सांगितला तेव्हा बहुतांशी कौरवांनी त्यावर डोळा ठेवला आणि उर्वरित पांडवांनी काणाडोळा केला होता. अर्जुनाने मात्र पोपटाच्या डोळ्याला डोळा भिडवत त्याला नजरद्वंद्वाचे आव्हान दिले होते. वयाच्या सातव्या वर्षीच अर्जुनाला चष्मा लागला होता. त्या भिंगातून (उजवा मायनस ४, डावा मायनस ३) ते तेजस्वी डोळे एखाद्यावर रोखले जात तेव्हा त्या डोळ्यातील नि:स्वार्थी त्यागपूर्ण ब्रम्हतेजाने समोरचा दिपून जात असे. पोपट तरी त्याला अपवाद कसा असणार? परंतु हा पोपट भलताच माजोरडा निघाला. एव्हाना ही कौरव पांडव जनता येताना पाहून झाडावरील इतर पोपट केव्हाच उडून गेले होते. या पोपटाने पेरू, आंबे इत्यादि वस्तूंवर डोळा ठेवण्याऐवजी अर्जुनाच्या डोळ्याला डोळा लावला. पण ते ब्रह्मतेजच शेवटी! लघुशंकेचा ओघळ नदीत गेला तर तो काही संगम होत नाही. पोपटानेच दृष्टी गमावली. आंधळा होऊन लज्जित झालेला तो पोपट आत्मज्ञानाच्या शोधार्थ धडपडत कैलासाकडे निघून गेला. काही काही वेळा आंधळेपण आल्यावरच डोळे उघडतात. अर्जुनाने डोळा फोडला, पण दृष्टी दिली. पण भारतीय लोकच ते. नुसते अर्जुनाने पोपटाचा डोळा फोडल्याची हाकाटी करू लागले. आजही सर्वसामान्यांत तीच गोष्ट प्रचलित आहे. डोळा फोडून झाल्यावर अर्जुनाला लोककार्यात विशेष काहीतरी करण्याची इच्छा झाली. तशी हस्तिनापुरातील लोकांविषयी त्याला आत्मीयता होती. त्या शबनम पिशवीतील सगळी अस्त्रे वापरून त्याला लोकांचं कायमचं कल्याण करून ठेवायचं होतं. तशांत द्वारकेचा तो कृष्णमुरारी नुकताच हस्तिनापुरात वास्तव्यास आला होता. द्वारकेच्या समृद्धीच्या सुरस आणि रम्य कथा सांगून त्यानं द्रोणाचार्यांच्या सगळ्या शिष्यांना तोंडात बोटे घालायला लावली होती. दुर्योधनाची  त्यावर तत्काळ श्रद्धा बसली होती. परंतु अर्जुनाचा त्याच्यावर विश्वास बसला नव्हता. व्हेन इन डाऊट, ऑलवेज डाऊट असं त्याला द्रोणाचार्यांनीच शिकवलं होतं. द्रोण शिष्यवृत्तीतून मिळालेले द्रव्य वापरून उन्हाळ्याच्या सुट्टीत तो द्वारकेला जाऊनही आला. कृष्ण-गोपिकास्नान-वस्त्र-लंपास कथा खरी असावी असे त्याला आतून वाटत होते. त्यानुसार तो त्या डोहाकडे जाऊनही आला. परंतु आता तिथे प्रवेशशुल्क आकारत आहेत हे पाहून त्याचा भ्रमनिरास झाला होता. तरीही एका आंतरिक दुर्दम्य इच्छेने ते शुल्कही त्याने दिले होते. परंतु डोहाच्या आसपास गोपिका तर सोडाच, त्यांची वस्त्रेही दिसली नाहीत. नुसते गोपच इकडे तिकडे भटकत होते. ते पाहून त्याला आपण लुटले गेलो अशी भावना झाली होती. बनिये लेकाचे. परंतु डोहाच्या कडेला लागलेल्या गाड्यांत भेलिकापुरी नावाचे अप्रतिम खाद्य मिळत असल्याचे त्याला आढळले आणि प्रवेशशुल्क काही प्रमाणात वसूल झाले असे त्याला वाटले होते. भेलिकापुरीचे चार द्रोण  रिचवून झाल्यावर गुजर देशीचे लोक बनिये पण खाऊ उत्तम घालतात हे त्याने मान्य केले होते.

तूर्तास आमचा कथानायक द्रोणाचार्यांच्या मठात बसला होता. हस्तिनापुरास कृष्णाच्या तावडीतून कसे सोडवावे याचा विचारविमर्श करण्यासाठी तो आला होता. त्या देवकीनंदनापेक्षा त्याचा बंधू बलराम जास्त डेंजर आहे असे त्याला जाणवले होते. हातात नांगर घेऊन दिसेल त्या शहराचा विकासच विकास करून टाकू, विकासाच्या आड याल तर खबरदार, अशी धमकीवजा घोषणा बलरामाने केली होती. दरबार असो, प्रतिष्ठित लोकांची शांभवीपार्टी असो, बलराम सर्वत्र नांगर घेऊन फिरत असे. तो नांगर पाहून लोकच काय, बैलसुद्धा त्याच्यापासून चार हात दूर राहत होते. द्रोणाचार्यांनी दिलेली अस्त्रे निष्प्रभ ठरत होती. या नांगराचा फाळ आता हस्तिनापुराच्या भूमीत घुसणार होता. त्यात द्रोणाचार्य "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार" असं सांगून राजकारणापासून अलिप्त होऊन समोर बसले होते. अर्जुनानं मग आदरानं तुम्ही शस्त्रच काय कृपा करून काहीच धरू नका असे सांगितले होते. मग द्रोणाचार्य त्याच्यावर उखडले होते. द्रोणाचार्यांच्या स्वत:च्याच शबनम पिशवीतील सगळी अस्त्रे संपली आहेत हे त्याला जाणवले होते. मग तो तेथून बाहेर पडला. आणि एका विचित्र उर्मीत तडक त्या कृष्णाच्या महालाकडेच निघाला. महालाबाहेरच रक्षकांनी त्याला अडवले. कृष्ण महाराज विश्रांती घेत आहेत काय असे अर्जुनाने त्यांस विचारले. तेव्हा होय, काल रात्रौच त्यांचे गांधार देशातून येणे झाले असून, आज सायंकाळी पुन्हा मिस्र देशाच्या दौऱ्यावर निघणार आहेत असे रक्षकांनी सांगितले. असो, आम्ही ते जागृतावस्थेत येण्याची वाट पाहत त्यांच्या पायाशी बसतो असे अर्जुनाने रक्षकांस सांगितले. रक्षकाने चार पाच क्षण त्याकडे निरखून पाहिले. दमलेला दीन चेहरा, चष्म्यावर धूळ बसलेली, चेहऱ्याभोवती थंडीनिवारणासाठी गुंडाळलेले उपरणे, खांद्याला शबनम, असे एकूण ध्यान पाहून त्यांस काय वाटले न कळे, त्याने त्यास आत सोडले. पाहतो तर आत दुर्योधन आधीच येऊन श्रीकृष्णाच्या उशाशी बसला आहे असे दिसले. नाईलाजाने मग अर्जुनास पायापाशी बसावे लागले. कृष्णास हस्तिनापूर मानवले आहे असे दिसले. त्या वर खाली होत असलेल्या पोटाने छप्पन इंची छातीकडून प्रसरण पावण्याची प्रेरणा घेतली आहे असे त्यास वाटले. दुर्योधनाच्या चेहऱ्यावर छद्मी हसू होते. तो निवांत हस्तिनापुर टाईम्स वाचत बसला होता. झोपेतच महाराजांनी एक ढेकर दिली. शेजारी टेबलावर ठेपल्याचा स्टीलचा बसकट डबा होता. ठेपले चेपून त्यांनी निद्रा ग्रहण केल्याचे दिसत होते. आता हे लवकर उठण्याचे चिन्ह दिसत नाही असे अर्जुनाच्या मनात आले. आपणही तोवर एखादा ठेपला ग्रहण करावा काय असेही त्याच्या मनात येऊन गेले. पण सोसला नसता, म्हणून तो विचार त्याने सोडून दिला. शिवाय आपली माता स्वयंपाक करून ठेवून आपली वाट पाहत बसली असेल हेही त्याच्या ध्यानात होते. भीम घरी पोचायच्या आत आपण पोचले पाहिजे नाहीतर आपल्यासाठी काही शिल्लक राहणार नाही हेही त्याला माहीत होते. कृष्णमहाराज लवकर जागृतावस्थेत यावेत अशी प्रार्थना तो करत बसला. तेवढ्यात दुर्योधनाने उरलेले ठेपले फस्त केले आणि छान ढेकर दिली. त्या आवाजाने कृष्णाची निद्रा भंग पावली. "अरे कोन छे भई?" असे त्रासिक आवाजात त्याने विचारले. हस्तिनापुरात येऊन आता काही मास लोटले तरी मातृभाषेत बोलण्याची गोडी काही औरच. महाभारताच्या नियमाप्रमाणे आता कृष्णाची नजर प्रथम पायाशी बसलेल्या आपल्यावर जाईल असे अर्जुनाला वाटले आणि तो उत्साहाने बोलण्यास सज्ज झाला तोच "अरे, दुर्योधनभाय! केम छो? तमे क्यारे आव्या?" हे ऐकून अर्जुनाचा चेहरा पडला. असे कसे झाले बुवा? तोच त्याच्या लक्षात आले, छातीशी स्पर्धा करणारे पोट आड आले असावे. कुणालाच आपल्या पोटापलीकडे दिसत नसते. दुर्योधनाने त्याच्याकडे विजयी मुद्रेने पाहिले आणि कृष्णास म्हणाला,"झाला एक प्रहर येऊन. आपली साथ आमच्याबरोबर हवी महाराज!" यावर कृष्णाने समाधानाने मान डोलवत,"जरूर! का नाही? आम्ही सर्व भारतवर्षाचे आहोत." असे उद्गार काढले. असे म्हणत कृष्ण उठून बसला. तेव्हा कुठे पायाशी त्याला अर्जुन बसलेला दिसला. "अरे अर्जुन भाय, तमे केम आव्यो?" आयला! दुर्योधनाला तेवढा "कधी आलास" आणि आपल्याला मात्र "का आलास?" उठून निघूनच जावे असे असे त्याच्या मनात आले. पण प्रश्न हस्तिनापुराचा आहे हे लक्षात घेऊन त्याने स्वत:ला आवरले. तो म्हणाला,"महाराज, आपण तर माझ्याबरोबर येणार नाही हे उघड आहे. तेव्हा आता काय जे उरले असेल ते द्या." कृष्ण म्हणाला,"चोक्कस! अरे हे बग कालच द्वारकेवरून ठेपला आला ने. इथेच कुटे तरी होता. अरे! केम दुर्योधन भाय! सगळा साफ करून टाकला तू ? हे बरा नाय. हे अर्जुनभायला मी आता काय देल?" अर्जुन म्हणाला,"महाराज, माफ करा, मला उत्तर मिळाले. येतो मी." असे म्हणून तो उठला. कृष्णाने "अरे असा कसा जाऊ देल मी तुला. निदान मसालानी चाय तर पाजेलच तुला. तू कशाला घाबरते? हस्तिनापूरची जनता हाये ना तुज्या मागे!" असे म्हटले. परंतु त्याला नम्र नकार देऊन अर्जुन बाहेर पडला. तो अजिबात निराश झाला नव्हता. उलट मदत न मिळण्याने त्याला बरेच वाटले होते. आता युद्ध! शबनम पिशवीतील सर्व अस्त्रे काढून युद्ध! आणि कृष्णाने जे म्हटले ते बरोबरच आहे असे त्याला वाटले. होय, या युद्धात आपल्याला  हस्तिनापूरची जनताच साथ करेल.

अर्जुन घरी आला तेव्हा अपेक्षेप्रमाणे कुंती त्याची वाट पाहत बसली होती. माते! आता तू चिंता विसर! श्रीकृष्ण भलेही दुर्योधनाला मिळाला असेल, सगळ्या झेडप्या, बाजार समित्या घेऊन बसला असेल. पण आपल्या मागे आता ही हस्तिनापूरची जनताच आहे. त्या सैन्याच्या बळावर श्रीकृष्णाचाच पाडाव मी करणार आणि हस्तिनापुरावर राज्य करणार. कुंतीने अतीव कौतुकाने त्याकडे पाहिले. डोक्याभोवती उपरणे गुंडाळलेले, दिवसभराच्या वणवणीने म्लान झालेले त्याचे मुख तिने पाहिले आणि तिला भडभडून आले. होय रे पुत्रा, पाडाव करशील यात शंका नाही रे. पण पाडाव झाल्यावर पुढे काय? अर्जुनाने बावचळून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, "म्हणजे? मी समजलो नाही माते! पुढे काय म्हणजे राज्य करायचे." कुंतीने त्याच्याकडे करुणेने पाहिले,"माझ्या मुला, द्रोणाचार्यांनी तुला सर्व अस्त्रे दिली, ती तू आत्मसात केलीस. पण ती सर्व अस्त्रे युद्धात वापरायची आहेत रे! युद्ध संपल्यावर राज्य करताना ती अस्त्रे वापरून उपयोगी नाही. द्रोणाचार्यांनी त्याचे शिक्षण तुला दिले नाही. मला वाटते ते त्यांच्याकडेही नाही. नाही तर ते स्वत:च युद्ध जिंकून राज्य करत बसले नसते का?" अर्जुन कसनुसा होत म्हणाला,"मग माते आता? युद्ध तर नक्की जिंकणार मी. या शबनम पिशवीशिवाय माझ्याकडे काही नाही. आयला, हा भलताच घोळ होऊन बसला! कदाचित हा त्या कृष्णाचाच डाव नाही ना? इतक्या सहजासहजी राज्य देऊन जनतेलाच आपल्या बोकांडी बसवण्याचा?" आता त्याची भूक कमी झाली. राज्य करावे लागलेच तर काय करायचे, त्यातून बाहेर कसे पडायचे याचा विचार तो करू लागला.

Monday, February 2, 2015

सुंदरीचे कन्फेशन

(सर्वात प्रथम समस्त स्त्रीवर्गाची क्षमा मागतो आणि हे लिखाण केवळ नर्मविनोद खात्यात घालावं अशी विनंती करतो.  जग सुंदर आहे, स्त्रिया ते अधिक सुंदर करतात यावर माझा विश्वास आहे. चला, आता असलं तुफानी वाक्य टाकल्यावर पुढची वाक्यं मला देहांतशासन ठोठावणार नाहीत अशी आशा करतो. शिवाय, बायको माझं लिखाण वाचत नाही या ज्ञानाच्या बळावर हे धाडस झालं आहे.)

अलीकडेच एका सुप्रसिद्ध बाईंनी जब्बरदस्त स्टेटस टाकलं होतं. ते खालीलप्रमाणे (जसेच्या तसे दिले आहे. व्याकरण/शुद्धलेखन/टंकन चुका यांची संपूर्ण मालकी बाईंची) -
हे परमेश्वरा...
मला माझ्या वाढत्या वयाची जाणिव दे.बडबडण्याची माझी सवय कमी कर. आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य इच्छा कमी कर.
दुसर्‍यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व त्यांच्या खाजगी प्रश्नांची दखल घेउन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊन देऊ नकोस.
टाळता येणारा फाफटपसारा व जरुर नसलेल्या तपशिलाचा पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ मुद्यावर येण्याची माझ्यात सवय कर.
इतरांची दुःख व वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच पण त्यावेळी माझ तोंड शिवल्यासारखे बंद राहुंदे. अशा प्रसंगी माझ्याच निराशा, वैफल्यांचे रडगाणे ऐकवण्याची माझी सवय कमी कर.
केंव्हा तरी माझीही चूक होउ शकते, कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो, गैरसमजुत होऊ शकते ह्याची जाणीव माझ्यात ठेव.

पहिले तीनचार मुद्देच दिसत होते. मी थक्क झालो, थोडासा संशयही आला. वाटलं, छे, शक्य नाही. एका स्त्रीचं कन्फेशन? मुळात मला तसं वाटणंही चुकीचं आहे हे एकदम मान्य. पण थोडासा गोड आशावाद आपल्या प्रत्येकात असतोच ना? वाटलं या बाईंना आत्मज्ञान झालं! अगदी बोधिवृक्षाखाली बसलेल्या त्या गौतमाप्रमाणे. ही सगळी माया आहे हे या महामायेला समजलं. "केव्हा तरी माझीही चूक होऊ शकते" हे वाक्य एका बाईच्या तोंडून निघणं हे अंतिम ज्ञान झाल्याशिवाय केवळ अशक्य आहे! ते वाचून मला स्वत:लाच अंतिम ज्ञान होऊन आपल्याला अशक्य गोष्टी शक्य दिसू लागल्या तर नाहीत ना असं वाटू लागलं. कुंडलिनी जागृत होऊन मी जमिनीच्यावर सहा इंच तरंगत तर नाही ना अशी शंका येऊ लागली. मी खुर्चीतून उठलो खिडकीपाशी जाऊन बाहेर नजर टाकली. सर्वत्र शांत होते. झाडे मंद वाऱ्याने डुलत होती. त्यांच्या फांद्या पाने जिथल्या तिथेच होती. फूटपाथवरून एक मनुष्य आणि त्याचे कुत्रे निवांत चालले होते. तो इसम मोबाईलमध्ये पाहत होता, कुत्रे नाकाने पायाखालचे गवत पाहत होते. एक गाडी आवाज न करता आली आणि दृष्टीआड झाली. अपेक्षप्रमाणे सूर्य आकाशात जिथे असायला हवा साधारण तिथेच होता. अंतिम ज्ञान झाल्यावर दृष्टीत फरक पडतो की नाही कुणास ठाऊक. पण सर्व जग साकळल्याप्रमाणे स्तब्ध असे वाटू शकते अशी मी उगाच समजूत करून घेतली आहे. तेवढ्यात त्या कुत्र्याच्या नाकाला तो शोधत असलेला स्वीट स्पॉट सापडला असावा. त्याने आवश्यक ती पोझ घेतली आणि त्याच्या पोटाप्रमाणेच माझे साकळलेले जग मुक्त करून टाकले. बाकी प्रत्यक्षात कुत्रे कितीही भीतीदायक चेहऱ्याचे असो हे मुक्तासन करताना त्याच्या चेहऱ्यावर एक अपार करुण भाव दाटून येतो असे माझे स्वत:चे एक निरीक्षण आहे. त्याच्या त्या आसनाने माझे अंतिम ज्ञानाविषयी चिंतन संपून मी पुन्हा आपला नैसर्गिक अज्ञानात बागडू लागलो.

मग त्या अज्ञानाच्या अनिर्वचनीय आनंदात मी पुढे वाचू लागलो. बाईंचं स्टेट्स तिथंच संपलं नव्हतं. अजूनही बरंच काही लिहिलं होतं. आणि ते सुसूत्रही वाटत होतं. तिथेच खरं लक्षात यायला हवं होतं. असो. पुढं वाचत गेलो आणि उलगडा झाला. खाली मूळ लेखकाचं नाव दिलं होतं - पु. ल. देशपांडे! हात्त्याच्या! असंच का शेवटी? पु.लं., तुमचा प्रयत्न वाया गेला की हो. लेकी बोले सुने लागे या उक्तीप्रमाणे तुम्ही ही प्रार्थना स्वत:ची म्हणून लिहिलीत खरी, तुम्हाला वाटलं बाण लागायचा तिथे लागेल. पण सुनेला काही लागलंच नाही हो. उलट आमच्या सासूबाई कित्ती ग्रेट आहेत असं म्हणून तिनं आपल्या सगळ्या मैत्रिणींना तो किस्सा करून सांगितला. कदाचित आपल्या नवऱ्याला "बघा, इतर नवरे किती नम्र असतात, आपल्या स्वभावातील दोष कसे पटकन स्वीकारतात. नाही तर तुम्ही…" असं सांगण्याचा तो उपक्रम असावा. ते वाचणाऱ्या बायकाही अर्थातच महाचतुर. त्यांनीही "वा", "सुपर्ब!", "अप्रतिम विचार!" वगैरेंचा वर्षाव केला. पुलंचा पाडाव झाला. 

या सर्वातून मला पुढील ज्ञान झालं आहे - अंतिम ज्ञानापेक्षा पूर्ण ज्ञान डेंजरस आणि पूर्ण ज्ञानापेक्षा अर्धवट ज्ञान डेंजरस. पण जर अंतिम ज्ञान समाधान शांती आणि पूर्ण ज्ञान सुप्त आनंद देत असेल, तर अर्धवट ज्ञान निखळ निर्भेळ मज्जा देऊन जातं. आता हे लिहून झाल्यावर मला खरोखरच वाढत्या वयाची जाणीव देण्याची मागणी देवाकडे करावी असं वाटू लागलं आहे. असलं काही तरी लिहून हुतात्मा होणं केव्हाही धाडसाचं, पण जगण्याची इच्छाही काही वाईट नाही.

Sunday, February 1, 2015

शास्त्रीय रसिकता

"मैया मोरीsssss" बुवांनी तारसप्तकातील सूर लावला होता. मोरू आणि मी पहिल्याच रांगेत बसून ते ऐकत होतो. बुवांचा इतका वेळ वासलेला आ पाहून आम्हीही आ वासला. आकार इतका लांबला की हे गाणे आहे की रामदेवबाबांनी शिकवलेला प्राणायाम हे कळत नव्हते. आम्हीच कासावीस झालो. कार्डिअॅक अॅरेस्टप्रमाणे नरडीअॅक अॅरेस्टचाच हा प्रकार असावा. तेवढ्यात श्रोत्यांनीही बुवांचा अंत न पाहण्याचे ठरवले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या कडकडाटात ती मैया एकदाची मोरीतून बाहेर आली. मग तालमीतील पैलवान मुख्य मेहनत करून झाल्यावर जसा अंगावर आखाड्यातील माती घेऊन पडून राहतो तसे बुवांनी मैयाला माखन घुसळत ठेवले. बुवांचा चेहराही ते माखन चाखत असल्यासारखा झाला. तो तुपाळ सुखी चेहरा पाहून मी आणि मोरू जरा अस्वस्थ झालो. का कुणास ठाऊक, बुवांच्या चेहऱ्यात आणि बटाटेवड्यात कमालीचे साम्य दिसू लागले. आता काही काही गवयांच्या गाण्याच्या कार्यक्रमाला जाताना मध्यंतरातील बटाटेवडा हे केवळ आकर्षणच नव्हे तर दिलासाही असतो अशी माझी आणि मोरूची प्रामाणिक समजूत आहे. गाण्यात आम्हाला दोघांनाही फारसे गम्य नाही, पण  फुकट पासचे आकर्षण काही वेगळेच असते. आमच्या दोघांच्या कुटुंबांना तर गाण्यात मुळीच रस नाही. आमचे कुटुंब तर "जळ्ळं मेलं ते शास्त्रीय संगीत. इथं आयुष्यभर आम्ही भूपच ऐकतो आहोत. नेहमी मनी वर्ज्यच आमच्या नशिबात. तिथं आणखी येऊन कशाला ऐकायला हवा?" हे वाक्य रोज आम्हाला एकतालात ऐकवते. मागे एकदा केसरी वाड्यात गणपतीच्या कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकरांचे गाणे छान रंगात आले असताना हिने अचानक "अगं बाई, निघताना साबुदाणा भिजत टाकायला विसरले. मला घरी सोडा नाहीतर उद्या खिचडी नाही" असे सांगितले. चांगली रंगलेली "रसूलल्ला" चीज सोडून मी निमूटपणे हिला घरी सोडून यायला निघालो. "दयाघना" काय नेहमीच ऐकता येते. इथे साबुदाणा खिचडीचा सवाल होता. तेव्हा, आम्ही दोघे फुकट पास घेऊन आलो की आमची कुटुंबे झक्कपैकी शाॅपिंगचा बेत आखतात. "तुम्हां मित्रांचे एवढे गूळपीठ आहे तर तुम्ही दोघे जा हो, आम्ही बायकाबायका आपल्या बघतो काय करायचे ते." असे सांगितले जाते. मग आम्हीही "तुका म्हणे बरेंच झाले" असे म्हणून लगोलग सटकतो. 

गाण्याच्या हाॅलवर वेळेवर पोचणं हाही एक योगायोग असावा लागतो. वाटेत अडथळेच खूप. साधं खुन्या मुरलीधरापासून रमणबागेत पोचणं ते काय, पण वाटेतील बेडेकर मिसळ, प्रभा विश्रांतिगृह असले मोह आवरत वेळेवर पोचणं कर्मकठीण. मिसळीचा जहालपंथी रस्सा पोटात घेऊन पहिल्या रांगेत गाणं ऐकायला बसणं महाडेंजरस हे आम्ही अनुभवाने सांगतो. रश्शाला कट असं नाव उगाच पडलेलं नाही. एकदा मोरूने अशी काही डेरेदार ढेकर दिली होती की बुवांनी गाणे थांबवून मोरूला प्रतिदाद दिली. "आजवर माझ्या गाण्याला अशी तृप्तीची दाद मिळाली नव्हती. भरून पावलो." पुढे संपूर्ण कार्यक्रमभर प्रत्येक समेवर येताना बुवा मोरूकडे अपेक्षेने पाहत होते. मग मोरूलाही बळेच ढेकरा काढाव्या लागल्या. भैरवीपर्यंत आमच्या रांगेत फक्त मी आणि मोरू उरलो होतो. नंतर संयोजकांनी आम्हाला बाजूला घेऊन सुमारे पंधरा मिनिटे झापतालात झापले होते. मोरूवर अर्थातच त्याचा काही परिणाम नव्हता. "टोटली वर्थ इट" असे तो नंतर म्हणाला यातच सर्व आले. ते संयोजक आताशा आम्हाला पाहिले की "पहिल्या चार रांगा आरक्षित आहेत बरं का!" असं आवर्जून सांगतात. आम्हीही,"हो का? उत्तम केलेत! हल्ली काय कुणीही येऊन बसतं हो पुढे. मग आमच्यासारख्यांना उशीर झाला की मागे बसावं लागतं. धन्यवाद!" असं म्हणून पहिल्या रांगेत जाऊन बसतो. अलीकडेच ते "अत्यंत आगाऊ इसम आहे" असं माझ्याबद्दल कुणाला तरी सांगत होते असं ऐकलं. सांगूदेत. आपल्याला काय, दोन एक तास गाणं ऐकायला मिळालं म्हणजे झालं. नंतर शांत झोप लागते. गाढ झोपेतून उठून घरी जायचं बरेच वेळा जिवावर येतं. तरी बरं कुशनच्या खुर्च्या असतात हल्ली. पूर्वी कसोटी लागायची.  सतरंजीची बैठक. गवई अगदी पुढे चार फुटावर बसलेला. त्यातून ध्रुपद गायकी जोरावर होती. सा लावून झाला की गाडी अर्धा तास मंद्र सप्तकाच्या यार्डातच पुढे मागे करत राहायची. तबलजीही लेकाचा एक धिन वाजवून झाले की पुढचे धिन वाजवण्याआधी तबल्यावर छान पावडर बिवडर मारून घ्यायचा. तंबोरेवाल्यांचं बरं असायचं. तंबोऱ्यावर डोकं ठेवून झोपता येत असावं. आता तशी खूप प्रगती झाली आहे. एसी, कुशनच्या खुर्च्या, स्टेजवर लाईट, श्रोत्यांत अंधार इत्यादी गोष्टी आता पथ्यावर पडू लागल्या आहेत. नाही म्हणायला एकदा एका प्रसिद्ध गवयांनी फार पंचाईत केली होती. संयोजकांना प्रेक्षागारात लाईट चालू ठेवायला सांगितले. म्हणे श्रोत्यांशी संवाद साधायला बरं पडतं. झालं? त्या दिवशी जागरण झालं. पण असा प्रसंग विरळा. गाणं संपल्यावर मात्र गवयांना भेटून बिटून येणं माझ्या जिवावर येतं. मोरू मात्र आत जाऊन ,"वा! छान रंगली हां भैरवी" एवढंच म्हणून येतो. प्रसिद्ध गायकाशी बोलताना दडपण येणं वगैरे गोष्टी त्याला माहीत नाहीत. अगदी तबलेवाल्यालाही "जरा कमी लाऊड चाललं असतं" वगैरे बिनदिक्कत सांगतो. बाकी प्रत्येक तबलेवाल्याला आपला माईक कमी ठेवणे हा ऑडिओवाल्यांचा एक जागतिक कट आहे असं का वाटतं कुणास ठाऊक. संपूर्ण कार्यक्रमभर तबलेवाला ऑडिओ कंट्रोलरूम कडेपाहून आपल्या माईककडे हात करून "उचला उचला"चे इशारे करत राहतो आणि जगातील सर्व ऑडिओवाले त्याकडे दुर्लक्ष करत राहतात.
 
परवाच कुणी तरी कळवळून किंवा चिडून लिहिलं होतं, भारतात रसिकता संपत चालली आहे, शास्त्रीय संगीत कमी होत चाललं आहे. परदेशात मात्र अगदी जोरात कार्यक्रम होताहेत. हे असंच जर चालू राहिलं तर भविष्यात शास्त्रीय संगीत शोधायला परदेशातच जावं लागेल. गोष्ट खरी आहे हो. पूर्वी गाणं ऐकायला तरुण मंडळी खूप असायची. हल्ली ती संख्या कमी होत चालली आहे. मिका सिंग, हनी सिंग अशा नावाचे लोक गात आहेत, कार्यक्रम करत आहेत. त्यांच्या नावानेच त्यांना ती परवानगी दिली आहे. पण यांचे कार्यक्रम म्हणजे धुडगूस हो नुसता. जरा डोळा लागावा तर कुठल्या तरी नवीन गाण्याचा ठणठणाट सुरू व्हायचा. हल्लीच्या तरुण मुलांना जागरणं करायची फार हौस. त्यातून ते खिशात ते मोबाईल फोन. समोर तो गवई आतडी पिळून गातोय आणि यांचं इकडे स्टेटस अपडेट चालू "एन्जॉयिंग हिंदुस्थानी क्लासिकल कन्सर्ट. फीलिंग ब्लेस्ड विथ" कुणी तरी मसण्या. तो शेजारचा मसण्यापण हेच करण्यात गुंग. म्हंजे मला त्याचा त्रास नाही, पण त्या अंधारात फोनचा स्क्रीन एवढा प्रखर असतो हो. आपल्याला एवढ्या उजेडात झोप येत नाही. अशानं रसिकता कमी होणार नाही तर काय. मग ते बुवा चिडून म्हणाले ते काही खोटं नाही. उद्या खरंच शास्त्रीय संगीत फक्त परदेशात टिकून राहिलं तर आमच्यासारख्या रसिकांचं काय होणार? पुण्यातील समग्र रसिकता सॅन होजे या शहरात स्थलांतरित झाली आहे असे समजले. मग पुणे ते सॅन होजे तिकीट कितीला पडतं याची चौकशी करून आलो. काय भयंकर किमती आहेत हो! तरीही हे सगळे गायक लोक सारखे तिकडे कार्यक्रम कसे करतात? जाऊ दे. तितक्या किमतीत घरातच एसी बसवून होईल. शास्त्रीय रसिकतेला वाईट दिवस आले आहेत हेच खरं.