Thursday, January 28, 2016

विश्रब्ध शारदा


कोणे एके काळी पत्र येणे म्हणजे आनंदोत्सव असे. दारी पोस्टमन येणे म्हणजे दिवाळीदसराच. बहुतांशी पत्रे बाबांसाठी असत. त्यांचं जग हे विचारवंत, लेखक, नाटककार, संघ स्वयंसेवक, समाजसेवक अशा लोकांनी भरलेलं असायचं. बाबा कॉलेजमधून घरी आले की आईला पहिला प्रश्न असायचा, आज काही टपाल आलंय का? जर असेल आलेलं तर ते व्यवस्थित टेबलावर दिसेल अशा पद्धतीनं ठेवलेलं असायचं, पण ते विचारणं काही सुटलं नाही. मग बाबा तो गठ्ठा पुढ्यात घेऊन बसायचे. मग तोंडानं रनिंग कॉमेंटरी करत  एकेक पत्र चाळलं जायचं. चाळलं अशा अर्थानं की प्रथम पत्रं कुणाकुणाची आहेत आणि साधारण कशा संदर्भात आहेत हे पाहण्याचा तो कार्यक्रम असे. पोस्टकार्डे, निळी अंतर्देशीय, लाखेने सीलबंद केलेले लिफाफे, रंगीत लिफाफे असा सगळा तो गठ्ठा असे. निळी अंतर्देशीय पत्रे ही बहुतांशी जवळच्या नातेवाईकांची, पोस्टकार्डे साहित्यिक वर्तुळातील लोकांची, सीलबंद लिफाफे शैक्षणिक कामासंबंधीचे तर रंगीत लिफाफे हे दिवाळी, दसरा, संक्रांत शुभचिंतनाची कार्डे असलेली अशी सरळ वर्गवारी होती. ते संक्रांत अभीष्टचिंतनाचे लिफाफे तेवढे आम्ही मुलं ताब्यात घ्यायला अधीर असू. कारण त्यात कार्डाबरोबर चक्क रंगीबेरंगी तिळगूळ असे. काही काही वेळा आतील कार्डालाच एक छोटासा लिफाफा चिकटवलेला असे. त्यात तिळगूळ असत. खूप गंमत वाटे.

पोस्टऑफिस हे एक महाकळकट पण गूढरम्य प्रकरण होते. आमच्या शाळेच्या रस्त्यावरच ते होते. तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेली काही निवडक ठिकाणे गावात होती त्यातले हे एक तीर्थस्थान. या एकाच ठिकाणी निळसरपांढरी खळ, तिने छानपैकी बरबटलेली त्यातील लाकडी कांडी, काही वर्षांपूर्वीच शाई संपलेले पेन (काही वेळा बोरूही असायचा) ताडपत्रीच्या गोण्यातील टपाल, तिथले कर्मचारी किंवा ग्राहक यांना अजिबात प्रसन्न वाटू नये याची संपूर्ण काळजी घेऊन लावलेला तो भयाण काळपट हिरवा रंग, तुरुंगाचा आभास देणाऱ्या त्या जाळ्या आणि त्यामागचे ते कर्मचारी तर दुसऱ्या एका खोलीत ते कट्ट कडकट्ट करणारे तारयंत्र, अदभुत जादूचा वाटणारा तो काळा फोन असे सगळे नांदत असे. आशा, निराशा, आनंद, दु:ख, संस्थांचे "टू हूमसोएव्हर इट मे कन्सर्न" छापाचे रुक्ष अहवाल, बिलं, पावत्या, प्रेमपत्र, प्रेमळपत्र, मळमळपत्र, तळमळपत्र अशा सगळ्या भावना, अ-भावना त्या ताडपत्रीच्या गोणीत एकत्र पडलेल्या असत. खाकी कपडे घातलेले पोस्टमन ते सॉर्ट करताना आम्ही पाहत उभे असू. मग तो सॉर्ट केलेली ती शारदा खाकी रंगाच्याच ताडपत्रीच्या पिशवीत जायची. एरवी फोटोत शारदेला छान तंबोरा घेऊन, श्वेतवर्णी साडी परिधान केलेली पाहत असू पण इथे पोष्टात दयामाया नव्हती, मळखाऊ खाकी हाच एकमेव रंग. पोस्टमन लोकांना सायकली वगैरे चैन नव्हती. सगळा कारभार पायीच असे. गाव छोटे असल्यामुळे पोस्टमन लोकांना गावकऱ्यांचे चेहरेच काय चेहऱ्यामागील इतिहासही ठाऊक असायचा. कधी शाळेतून परत जात असताना पोस्टमन दिसला की "आमचं आहे का हो पत्र?" अशी चौकशी करायची. तोही बापडा असेल पत्र तर तंगडतोड वाचवायला आमच्याकडे पत्रं द्यायचा. आम्ही मुलं आमचीच काय एरियातल्या सगळ्यांचीच पत्रे मग ताब्यात घ्यायचो. आणि मग पोस्टमनच्या रुबाबात घराघरात पोचवायचो. एकूणच उत्कंठा, उत्सुकता, काहीशी भीती असं सगळं एकाच वेळी वाटायला लावणारी अशी ही पत्रपरंपरा.

तार येणं मात्र अजिबात नको. तार आणि वाईट बातमी हे जवळजवळ ठरलेलं अद्वैत होतं. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मी साधारण अकरा बारा वर्षांचा असताना 'तारायण' घडलं. तेही अत्यंत महत्वाची आंतरगल्ली क्रिकेट मॅच चालू असताना. संकटं येतात तेव्हा एकटी येत नाहीत म्हणतात. माझी बॅटिंग आलेली. स्टंप माझे असल्याने मला दोन जीवदानं अलाउड होती. अजून एकही बाॅल खेळला नसल्याने दोन्ही जीवदानं शाबूत होती. अशात कधी नाही ती आमच्या आळीत रिक्षा आली. गावात रिक्षा दोन, त्यातील एक आमच्या आळीत पाहिल्यावर मनात पहिली पाल चुकचुकली. रिक्षेत आमच्या बाबांना पाहिल्यावर तर काहीतरी नक्की घडले आहे याची खात्री पटली. कारण बाबा आणि शारीरिक आरामाची कोणतीही साधने हे समीकरण जुळणारे नव्हते. रिक्षेत बसले तरी श्रीरामाच्या आदेशासरशी उड्डाणाच्या तयारीत बसलेल्या हनुमानासारखे बसत. सीटच्या अगदी टोकाशी. हातांनी पुढचे बार धरून. बाबांनी रिक्षेतूनच सांगितले, ताबडतोब घरी ये! बॅटिंग सोडून मी घरी आलो. बाबा आईला सांगत होते. तार आलीय, मामांची (आईचे वडील) तब्येत खराब आहे, आपल्याला जायला हवं. पण आईला कळून चुकलं होतं की तार आलीय म्हणजे काही खरं नाही. तार या प्रकाराची मी जरा धास्तीच घेतली होती. पण ती येण्याची धास्ती. तार करायची असेल तर मी उड्या मारत जात असे. कारण त्या त्यातला मजकूर माहीत असे. पुढे बाबा मला तार करायला पोस्टात पाठवत. त्या फक्त नंबरवाल्या तारा असत. २ नंबर, १० नंबर किंवा तत्सम. अभिनंदन, किंवा रीचड सेफली टायपातल्या.

पत्र स्वत:च्या पत्त्यावर स्वीकारणे वगैरे व्हायला कॉलेजचे दिवस उजाडायला लागले. कॉलेजजीवनातील पत्रे काही अभिमानाने सांगण्यासारखी नाहीत. कारण ती रोमॅंटिक वगैरे मुळीच नव्हती. बहुतेक पत्रे "आपल्या चिरंजीवांची प्रेझेंटी समाधानकारक नाही. आपण पाल्यास योग्य ती समज द्यावी. सुधारणा न झालेस कारवाई करणेत येईल." किंवा अप्पर सत्र न्यायालय "दिनांक १५ मार्च रोजी वाहतुकीचा नियम मोडल्याच्या आरोपाची सुनवाई आहे. तरी कोर्टात समक्ष हजर राहावे. अन्यथा आरोप मान्य आहे असे समजून खटला एकतर्फी निकालात काढला जाईल. " अशा आशयाची जास्त असत. का कुणास ठाऊक, त्या काळात वर्गात तासाला बसणे, लायसन काढणे, तांबडा दिवा लागला असल्यास वाहन थांबवावे लागणे या असल्या गोष्टी मला अंधश्रद्धा वाटत. या अंधश्रद्धांच्या विरोधाचे बिल या पत्रांच्या रूपात घरी येत असे. सुदैवाने आईबाबा कोकणात आणि आम्ही बंधुद्वय शिक्षणासाठी सांगलीस राहत होतो. कॉलेजमध्ये आणि इतर "संवेदनशील" संस्थांना मी सांगलीच्या घरचा पत्ता देत होतो. त्यामुळे अशा पत्रांची विल्हेवाट लावणे सोपे जात होते. यात आईवडिलांना त्रास होऊ नये हा एकमेव उदात्त हेतू मी बाळगला होता. पण पुढे हे उघडकीस आल्यावर माझा युक्तिवाद कोणीही मान्य केला नाही याबद्दल अजूनही खंत आहे. कोर्टाने मला तब्बल पंचेचाळीस रुपयांचा दंड केला होता. माझ्या महिना तीनशे रुपयांच्या बजेटला पंधरा टक्के नुकसान प्रचंड होते. हा दंड भरून काढण्यासाठी मी पुढील तीन महिने सायकल वापरत होतो. त्या दंडाच्या रकमेत माझा उदात्त हेतू केव्हाच दिसेनासा झाला होता.

याच काळात विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो, आणि पत्र लिहिणे सुरू झाले. साध्या भेटून बोलण्याला ज्या संघटनेत "बैठक घेऊ, बसून विषय करू" म्हटले जाते तिथे पत्र लिहिणे असं साधं कसं म्हटलं जाईल. तो पत्रव्यवहार होता! पण संपर्क कसा करावा, फापटपसारा न लावता, नेमक्या शब्दांत संवाद कसा साधावा याचं सहजसुंदर शिक्षण विद्यार्थी परिषदेत मिळालं. तेही अत्यंत सुबक सुवाच्य अक्षरात. आजवर परिषदेतील किंवा संघातील स्वयंसेवकाचं गिचमीड अक्षरातील पत्र मी पाहिलं नाहीय. या बाबतील मी प्रमोद कुलकर्णीला गुरू मानलं होतं. प्रमोद अत्यंत सुरेख हस्ताक्षरात, सरळ ओळीत एकटाक लिहीत असे. आजवर अनेक सुरेख अक्षरं पाहिली. काही तर अगदी छापल्यासारखीही पाहिली. पण प्रमोदचं अक्षर वेगळंच. त्यात छापीलपणा अजिबात नसे, उलट ते थेट हृदयातून आल्यासारखं वाटे.  पंधरा पैशाच्या पोस्टकार्डावर तो दोन्ही बाजू पूर्ण वापरून लिही. प्रत्येक ओळीत ठराविक शब्द असत. "आदरणीय" ने सुरुवात करून शेवटी "कळावे, लोभ आहेच वृद्धी व्हावी" या वाक्यानं तो पत्र संपवत असे. दूरदूरवरून आलेले कार्यकर्ते त्याच्याशी तेवढ्याच लोभाने बोलत. आज इतक्या वर्षांनीसुद्धा मी जर पत्र लिहिलं तर आपोआप हाच मायना आणि शेवट लिहिला जातो. श्रेय प्रमोदला. लोक कृपाभिलाषी वगैरे लिहितात ते कसंसंच वाटतं. मला अभिलाषा हा शब्दच तसा लुब्रा, लोचट वाटत आला आहे.

पुढे शिक्षण संपलं. संपवलंच. गाव सोडून कुठेही जाणार नाही! सरकारी नोकरी तर अजिबात करणार नाही अशा घनघोर प्रतिज्ञा करून झाल्या होत्या. यातली पहिली प्रतिज्ञा साधारणपणे दोन दिवस टिकली. मुंबईच्या आत्याचे यजमान, श्री. माधवराव वझे हे माझं आदराचं स्थान होतं. तेही माझ्याच कॉलेजचे विद्यार्थी होते. अत्यंत हुषार, न चिडता तर्कनिष्ठ विचारांनी आपली बाजू मांडणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. लहानपणी आम्हां सगळ्या मुलांना ते गणिती, भौमितीय, पदार्थविज्ञानाची कोडी घालत आणि आमच्याबरोबर संवाद करत ते स्वत:ही सोडवत असत. म्हणजे कोडं घालून गंमत बघत बसणे असं ते करत नसत. त्यामुळे आम्हीही चेवाचेवाने ती कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत असू. आजही काम करताना क्लिष्ट असा एखादा प्रॉब्लेम असेल तर मी अगदी उत्साहाने तो सोडवायला घेतो. त्याचं मूळ कदाचित या कोड्यांत असेल. असो. मी प्रतिज्ञा करून शक्तिमानसारखा कमरेवर हात ठेवून छाती पुढे करून दोन दिवस फिरत होतो. तिसऱ्या दिवशी माधवरावांचा फोन आला. तुला मुंबईला यायचं आहे, ब्याग भर एवढंच ते म्हणाले. शक्तिमानाने कमरेवर हात होते ते खाली सोडले आणि हळू आवाजात हो असं सांगितलं.

मुंबईला गेल्यावर आयुष्य पार पालटून गेलं. या नंबरची बस, त्या वेळेची गाडी यापलीकडे मुंबईत आयुष्य नाही असं वाटायचं. उगाचच घरौंदामधल्या त्या अमोल पालेकरसारखा चेहरा करून फिरायचो. मित्र, भरपूर आत्तेमामेभाऊ, बहिणी, आज्जी आजोबा, मामा, काका असल्या अस्सल देशस्थी गराड्यात राहिलेला मी, मुंबईत अस्वस्थ झालो. फक्त आत्तेभाऊ, बहीण होते तेवढाच आधार. या अवस्थेतून आईबाबांना उद्देशून पत्रं लिहायला सुरुवात झाली. मला आठवतं ती पत्रं मी फार भावूकपणे लिहिली होती. जे जे मनात असेल ते कागदावर उमटवायचं एवढंच ते होतं. पुढे मी सिंगापूरला गेलो. एकटाच गेलो होतो पुढे. पहिले सहा महिने मनाने भारतात शरीराने तिथे असे काढले. कधी कधी होमसिकनेस एवढा व्हायचा की मी चक्क पुण्याचा नकाशा हाताने रेखाटत बसत असे. प्रत्येक रस्ता, खूण, त्या नकाशावर येत असे. जणू मी प्रत्यक्ष त्या रस्त्यांवरून फिरत होतो. मग सुरू झाली पत्रं. तीन तीन चार चार फुलस्केप पानं पाठपोट भरतील एवढं एकेक पत्र असायचं. ही पत्रंही आईबाबांनाच. कधी घरी गेलो की बाबा ती जुनी पत्रं दाखवतात, हसू येतं पण डोळ्यात पाणीही येतं. बाबांनीही अशीच पत्रं मला धाडली होती. त्यात उभारी देणारे शब्द असत, आईने दिलेल्या सूचना असत. ती मी कित्येक वर्षं जपून ठेवली होती. पण आयुष्याच्या वणवणीत इतक्या ठिकाणी भरकटत गेलो की सगळं संचित थोडं थोडं सांडत गेलं. वाऱ्यावर वाळू भुरभुरत पसरून दृष्टीआड व्हावी तसे हे आठवणींचे कागदावर उमटलेले क्षण निसटून गेले. स्वहस्ताक्षरात मनीचे गूज लिहावे आणि सुहृदांस ते भावावे यासारखे सुख नाही.

पत्र लिहिणं कधी थांबलं कळलंच नाही. तंत्रज्ञान विकसित झालं ते प्रथम संपर्कक्षेत्रात. सॅम पित्रोदानं पहिली क्रांती आणली. एसटीडी पीसीओ सुरू झाले, मनात आणलं की बोलणं होऊ लागलं. माझ्या मते इथेच स्वहस्ताक्षरातील पत्रलेखनाला उतरती कळा लागली. पत्रातील आठवड्यापूर्वीची जुनी खुशाली कोण वाचणार? आजच तर सकाळी फोनवर बोललो. पुढे ईमेल्स सुरू झाल्या. मग तर पत्र लिहिणं पूर्ण थांबलंच. नात्यातल्या नात्यात ईमेल लिहिताना प्रियचं डियर झालं, आदरणीयचं रिस्पेक्टेड सर झालं, तीर्थरूप शि.सा.न.वि.वि. तर गायब झालेल्या जानव्यासारखे लुप्त झाले. "आपला" किंवा "तुमचा" ची जवळीक युअर्स फेथफुलीत नाही. तंत्रज्ञानानं फायदे खूप आणले. जग जवळ आणलं, वादच नाही. अनेक दिवसात संपर्क होऊ शकायचा नाही, त्यामुळे जी घालमेल, काळजी वाटायची ती आता जवळजवळ नाहीच. पण कधी तरी कुठं तरी जाणवत राहतं, पत्रांतला तो जिव्हाळा आठवत राहतो. काळाच्या पडद्याआड गेलेले जिव्हाळ्याचे लोक त्या पत्रांतून दिसत राहतात. विश्रब्ध शारदेचा तो तंबोरा मनात सूर धरून राहतो.

पक्षीमित्र संमेलनाच्या निमित्ताने

मलबार ट्रोगॉन - संमेलनाच्या बोधचिन्हावर विराजमान
(छायाचित्र - पक्षीमित्र प्रा. धीरेंद्र जाधव-होळीकर,  सावंतवाडी)
(नुकतेच सावंतवाडी येथे पक्षीमित्र संमेलन पार पडले. संमेलनाच्या स्मरणिकेसाठी लिहिलेला लेख)

प्रथम एक विधान करतो. ते थोडंसं धक्कादायक आहे आणि कदाचित तुम्हाला आवडणारही नाही. ते म्हणजे पक्षी आपले मित्र नाहीत, आणि आपणही पक्ष्यांचे मित्र नाही. तसे पाहायला गेले तर माणसाळलेले एक दोन प्राणी सोडले तर कुठलेही प्राणी आपले मित्र नाहीत. या माझ्या विधानाचा तुम्ही थोडासा विचार केलात तर अर्थ लक्षात येईल आणि मग पटेलही. प्राणीमात्रांत मित्रत्व तसे नसते, असलेच तर ते असते साहचर्य. साहचर्यासाठी लागते "घ्या आणि द्या" या प्रकारचे नाते. निसर्गात हे साहचर्य अनेक ठिकाणी दिसेल. मोठ्या माशांच्या अंगावर चिकटून असणारे पायलट फिश, एका झडपेत हाडांचा चुरा करणारा पाणघोड्याचा अथवा मगरीचा जबडा. तो उघडा असताना त्यात अडकलेले अन्नकण खाणारे पक्षी, गवा रेड्याच्या डोक्यावर बसून कानामागे, डोक्यावर असलेले किडे खाणारे पक्षी अशी अनेक साहचर्याची उदाहरणे देता येतील. प्राणी साहचर्यामुळे उत्क्रांत पावल्याचेही एक उदाहरण आहे. ते म्हणजे कुत्रा. आदिम काळात मनुष्य आणि इतर प्राणी एकमेकांपासून सारखाच धोका असलेले. जरी मानवाने थोडीफार शस्त्रे तयार करायला सुरूवात केली असली तरी त्याला सिंह, लांडगा, वाघ यांच्यापासून धोका फारसा कमी झालेला नव्हता. त्या काळात कधी तरी एखाद्याने जवळ गुरगुरणाऱ्या लांडग्याला एखादे हाडूक भिरकावले. ते हाडूक तो लांडगा चघळत बसला आणि त्याने हल्ला केला नाही. मग मानवाला लक्षात आले की असे हाडूक किंवा एखादा मांसाचा तुकडा टाकला तर लांडगे हल्ला करीत नाहीत, लांडगेही शिकले की हल्ला न करता खायला मिळू शकते, त्यासाठी शक्ती वाया घालवावी लागत नाही. अशा प्रकारे लांडगे आणि मनुष्य यांच्यात साहचर्य निर्माण झाले. त्यातून आज आपल्याला कुत्रा हा प्राणी मिळाला आहे. हा झाला साहचर्यातून उत्क्रांतीचा भाग. पण अशी उदाहरणे फारशी दिसत नाहीत. कदाचित शस्त्राच्या आणि इतर आधुनिक शोधामुळे, मेंदूच्या जबरदस्त प्रगतीमुळे मनुष्य प्राण्याला पुढे साहचर्याची गरज वाटली नसावी. शस्त्राच्या आणि अकलेच्या जोरावर जगण्याच्या स्पर्धेत आपण टिकलो, नुसते टिकलोच नाही तर पूर्ण सजीव सृष्टीत वर्चस्व प्राप्त करून बसलो.  

मग असं असताना, पक्षीमित्र किंवा प्राणिमित्र ही संकल्पना का आली? शस्त्र आणि अक्कल यांचा वापर करून वर्चस्व प्राप्त करण्यात काही हजार वर्षे गेली. पूर्ण वर्चस्व प्राप्त झाल्यानंतर, मग मानव थोडेसे डोळे उघडून इकडे तिकडे पाहायला लागला. केवळ सावज आणि शत्रू टिपण्यासाठी तयार झालेली नजर आणि मेंदू आता जरा वेगळ्या नजरेने पाहू लागले. कुतूहल वाढू लागले. आपल्या पूर्वजांना आपल्यापेक्षा जास्त गोष्टी माहीत होत्या. एखादा प्राणी कसा वागतो, त्याच्या काय सवयी असतात, तो काय खातो इथपासून वनस्पती, झाडे त्यांचे औषधी उपयोग, किंवा विषारीपणा या सर्व गोष्टी ज्ञात असायच्या, पण त्यांचा वापर जगण्याच्या धडपडीत टिकून राहण्यासाठी व्हायचा. आता आतून ज्ञान व्हावं असं वाटू लागलं. या विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यात ज्ञात असलेली जीवसृष्टी ही केवळ आपल्याच ग्रहावर हे लक्षात आलं. आपण विशेष आहोत. इथलं जीवन हे विशेष आहे. त्याचा अभ्यास करावा असं वाटू लागलं. आता जे जीवन दिसतं आहे ते उत्क्रांत पावत, अनेक संहार, पुनरुज्जीवन यांच्या चक्रांतून इथवर आलं आहे हे दिसू लागलं. मग ते सगळं कसं झालं याबद्दल कुतूहल निर्माण झालं. मग लक्षात आलं की यांत सुसूत्रता आहे, एक प्रकारचा समतोल आहे. शिकार आणि शिकारी यांत अत्यंत नाजूक असा समतोल आहे. शिकार आवश्यक आहे तसेच शिकारीही आवश्यक आहेत. जे प्राणी अथवा पक्षी शिकारी नाहीत ते आजूबाजूच्या वातावरणावर, झाडाझुडपांवर अवलंबून आहेत. जर ते पर्यावरण नष्ट झाले तर दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर तो प्राणी अथवा पक्षी स्थलांतरित होऊन नवीन वातावरणाशी जुळवून घेतो आणि टिकतो किंवा आहे तिथे राहून नामशेष होतो. हे सर्व निरीक्षण करणारा, टिपणारा, त्याबद्दल अभ्यास करणारा एक वर्ग तयार झाला. त्यातीलच एक शाखा म्हणजे पक्षी निरीक्षण करणारी. अनेक जातींचे पक्षी आहेत. प्रत्येकाच्या सवयी, खाणे, पर्यावरण, पुनरुत्पादनाच्या सवयी आणि नियम हा एक प्रचंड विषय आहे. जे पक्षी निरीक्षक आहेत त्यांना हा विषय काही वेगळा सांगायला नको आणि या लेखाचं ते प्रयोजनही नाही. जे पक्षी निरीक्षक म्हणून आपल्याला आत कुठं तरी काही तरी जाणवलेलं आहे, आपली नाळ ही निसर्गाशी जुळली आहे त्याचं भान आलं आहे, म्हणून आपण हे कार्य करता आहात. पण हे का करायचं, यातून पक्ष्यांची सूची निर्माण करणं, त्यांच्या सवयी लिहून ठेवणं, त्यांच्या पर्यावरणाची नोंद ठेवणं आणि फार फार तर संमेलन भरवून लोकांच्यात जागृती निर्माण करणं एवढ्यापुरतंच याचं स्वरूप आपण ठेवणार आहोत का? ते हेतू तर असायलाच हवेत पण याच्या थोडंसं पुढेही जायला हवं असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने हा लिहिण्याचा प्रपंच. मी काही कुणी आपल्यासारखा तज्ज्ञ नव्हे, त्यामुळे अधिक उणे लिहिले गेले असल्यास क्षमा असावी.

सर्वसामान्यांत निसर्गाविषयी एक समज आहे. तो म्हणजे, जे जे हिरवे दिसते तो निसर्ग. त्यात डोंगर दऱ्या, झाडे पाने वेली, झरे, नद्या इत्यादी आले. निसर्गात राहतात ते प्राणिमात्र. कुणालाही विचारलं,"पर्यावरण टिकवायचं म्हणजे काय करायचं रे भाऊ?" तर बहुतेक भाऊ उत्तर देतील,"झाडे लावा, झाडे जगवा." वरकरणी, आपण ज्या पर्यावरणात राहतो त्यापुरतं ते खरंही आहे. पण निसर्ग म्हणजे झाडे, पाने, वेली हे अल्पज्ञान झालं. इको सिस्टीम ही संकल्पना आपल्यासारखे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांना माहीत आहे. इको सिस्टीम ही काही हिरव्यापुरती मर्यादित संकल्पना नाही. एका मर्यादित क्षेत्रापुरता असलेला पंचमहाभूतांचा त्यातील सजीव आणि निर्जीव वस्तूंसकट असलेला समतोल म्हणजे इको सिस्टीम. हा समतोल नाजूक असतो हे आपल्याला माहीतच आहे. मनुष्याच्या प्रगतीच्या संकल्पनेत दुर्दैवाने हा समतोल आजवर खिजगणतीत धरला गेलेला नाही हे सत्य आहे. त्याचे परिणाम आपण पाहतोच आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट, त्यामुळे एकूणच वाढलेले तापमान, वाढलेल्या तापमानामुळे वितळलेले हिमनग, त्यातून वाढलेली समुद्राची पातळी, हे आजही लोक मान्य करायला तयार नाहीत. ऋतूंत झालेले बदल, वेळी अवेळी येणारा पाऊस, त्याचे प्रमाण, उन्हाळ्यात वाढलेले तापमान हे सगळे आपल्या डोळ्यासमोर आहे. हव्यासापोटी, नफेखोरीपोटी शहरांची झालेली अनधिकृत वाढ, त्यामुळे बंद झालेले पाण्याचे नैसर्गिक निचरा मार्ग, मग शहरात पूर्वी कधीही न आलेल्या ठिकाणी पुराचे पाणी येणे हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे आपण पर्यावरण टिकवा म्हणून ओरडत असताना, या सर्व गोष्टी पर्यावरणात येतात हेही लक्षात घेतले पाहिजे. आणखी एक मुद्दा मांडावासा वाटतो तो म्हणजे पर्यावरण आणि त्यापासून रोजगार निर्माण करणे यांची सांगड घालणे. आपल्याकडे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी अनेक प्राणी, पक्षी, कीटक आहेत. अशी ठिकाणे अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर स्थानिक लोकांना त्यापासून रोजगार मिळावा ही साहजिक अपेक्षा असते. तशी अपेक्षा असणे नैसर्गिक आहे. पण म्हणून ती योग्यच असेल असे नाही. उदाहरणार्थ, धरण बांधल्यानंतर गावे पाण्याखाली जातात. त्या गावातील लोकांचे पुनर्वसन दुसरीकडे केले जाते. मुद्दा कठोर असतो, पण आवश्यक असतो. तसेच अभयारण्याच्या बाबतीत व्हायला हवे. अभय त्या पर्यावरणाला आहे, त्यातील प्राण्यांना पक्ष्यांना कीटकांना आहे, याचे भान राहत नाही. कितीही योग्य पद्धतीने विकास करतो म्हटलं तरी आपण रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यात बदल करणार, समतोल बिघडवणार. आतापर्यंत आपण अशी ढवळाढवळ करीत आलो म्हणून तर आज पृथ्वी धोक्यात आहे हे आपण विसरतो. ही ढवळाढवळ कमीतकमी होण्यासाठी कशी जीवनशैली असावी हे आपण शोधून काढले पाहिजे. अर्थात हा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नसून, स्थानिक अर्थसंबंध त्यात गुंतले असल्यामुळे हा विचार वादग्रस्त होईल यात शंका नाही. पण तो मांडणे आणि त्यावर विचार करणे हे आपल्या सारख्या संवेदनशील लोकांचे कर्तव्य आहे असे मी समजतो.

एक पक्षी निरीक्षक म्हणून आपण त्या दृष्टीने संवेदनशील आहात, आपल्याला याची जाणीव झाली आहे, म्हणून आपल्याला हे सांगण्याचा खटाटोप. पक्षी, प्राणी, एकूणच पृथ्वीवरील चराचर जीवन हे एकाच समान धाग्याने गुंफले गेले आहेत. त्यामुळे पक्षी आणि पर्यावरण हे काही वेगळे नाही. पक्ष्यांचा अभ्यास करणे, त्यांची सूची तयार करणे हे महत्वाचेच, पण तसेच त्याबरोबर आपली नजरही विस्तारू द्या. मनुष्य प्राणी म्हणून आपण चुकीच्या रस्त्याने खूप पुढे आलो आहोत.  पण आपण चुकीच्या रस्त्याने आलो आहोत याची जाणीव होणे हेही कमी महत्वाचे नाही. तेव्हा समाजप्रबोधनाची धुरा तुमच्या खांद्यावर आली आहे असे समजा. पक्षी निरीक्षक म्हणून काम करूया, समग्र पृथ्वी ही एक इको सिस्टीम आहे, त्याचा अभ्यास करूया, त्यात समतोल कसा राखला जाईल याचा विचार करूया आणि त्याचा प्रचारही करूया. 

Sunday, January 17, 2016

आज हे काय बरं?

आज प.पू. नाथनंगे महाराज पुण्यतिथी. 
कौटुंबिक मतभेद होतील, समाजात तुमच्या कार्याचे कौतुक होईल.
काॅम्प्युटरचे डोळ्यांवरील दुष्परिणाम - सततच्या पडणाऱ्या प्रकाशामुळे आकुंचन पावणाऱ्या डोळ्यांच्या बाहुल्या..
नृत्यातून होणारे व्यायाम - बेडूकउड्या, डोळ्यांची बुब्बुळे वर-खाली, उजवीकडे डावीकडे , गोलाकार फिरवणे
डाळवांगे पाककृती - तेलाच्या फोडणीमध्ये कढीपत्ता, कोथिंबीर आणि नारळाचा खव घालून वांग्याच्या फोडी वाफवून घ्याव्या...
विवाहास उपयुक्त दिवस - दु. २० (१०:४५ नंतर केव्हाही) किंवा ३० (१७.०० पर्यंत) असा मौलिक सल्ला. त्याखालीच (बहुधा स्ट्रॅटेजिकली लोकेटेड ) शरीराच्या कुठल्याही भागावर सूज आली असल्यास आणि तिथे दुखत असेल तर कढीपत्ता , हळद आणि मीठ एकत्र करून त्याचा शेक द्यावा असा अजून महत्वाचा सल्ला.
कोरफड - एक काटेरी दवाखाना. 
भुसावळ - संकष्टी चतुर्थी चंद्रोदय २०.३८ वा.
शब्द हे शस्त्र आहे हे विसरू नका, भाऊबंदांकडून त्रास संभवतो. चैनीच्या खर्चाला कात्री लावावी लागेल.
अमीबा नावाचा जीव आपल्या पोटात केंद्रक बाळगतो आणि बाळंत होताना केंद्रकासकट स्वत:चे दोन भाग करून नवीन पिढी तयार करतो.
तैत्तिरीय हिरण्यकेशी श्रावणी. शुक्ल पक्ष. यजुर्वेदी श्रावणी. छायाकल्प चंद्रग्रहण आहे. (हे भारतातून दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळू नयेत. अमेरिकास्थित भारतीयांनी जरूर पाळावेत)
सूर्याचा पूर्वा नक्षत्र प्रवेश - वाहन गाढव. वाहनविषयक समस्या दूर होतील. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण असू द्या. 
श्री शालिवाहन शके १९३८, दुर्मुखनाम संवत्सर. 
दिल्ली सराई -रोहिल्ला गरीबनाथ एस्प्रेस दर मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी आणि रविवारी जाते. 
"हे माझ्या बाबतीत घडले असते तर?" या प्रश्नातून व्यक्तिमत्वात उंची खोली आणि उदार व्यापकता येते. सहानुभूती वा अनुकंपेचा जन्म होतो. 
फळांचा राजा आंबा असला तरी इतर प्यादीही महत्वाची. सर्व फळांचे गुणधर्म वेगळे असतात. फलाहाराने सुदृढ आयुष्य लाभते. 
१७ जून हा दिवस खूप महत्वाचा आहे. १७ जूनला गोपाळ गणेश आगरकर पुण्यतिथी तर आहेच परंतु प्रदोष आणि वटसावित्री व्रतारंभही होतो आहे. तसेच याच दिवशी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची तारखेप्रमाणे तर धर्मवीर संभाजीराजे भोसले यांची जयंती तिथीप्रमाणे येते आहे. या दिवशी निद्रासेवन वर्ज्य. कारण दुसऱ्याच दिवशी १८ जूनला शिवराज्याभिषेक दिन येतो आहे!
अध्यात्माचा एक चौकट म्हणून विचार करणे योग्य नाही. विश्वातील प्रत्येक घटक, वस्तू, अणू, रेणू, परमाणु म्हणजे आधिभौतिक आविष्कार, आधिदैविक संघटना आणि आध्यात्मिक अधिष्ठान. अध्यात्म समजून घ्यायचे असेल तर आधी आधिभौतिक आधिदैविक सकट समजून घ्यावे लागेल. अष्टांग योगातील अहिंसा, सत्य अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह हे यम आणि शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रबिधान हे नियम खरे म्हटले तर मानसिक साधना आहेत.
… 
 … 
… . . 
… 
…. 
…. 
…. 
 … 
… 
… 
काही नाही, मी ठीक आहे. कालनिर्णय वाचतोय. कालच मिळालंय.

Thursday, January 14, 2016

संक्रांतीचं पसायदान

गुलाबी थंडी म्हणजे काय ते न कळणारं वय होतं ते. कोकणातली थंडी ही तशी नरम मुलायमच म्हणायची. काटा येतोय असं म्हणायचं पण तो हवीहवीशी शिरशिरी आणणारा काटा. बराचसा तिळगुळावर आलेल्या काट्यासारखा. मऊशार रजईतून बाहेर न येता तसंच त्या उबेत राहून कानोसा घेत रहायचं. खिडकीतून अगदी अंधुकसा उजेड आत झिरपत असे. फुलाच्या पाकळीवर कळत न कळत नाजूक दंव जमल्यासारखा तो उजेड अर्धमिटल्या पापण्यातून जाणवत राही. अजून पांखरांचीही चाहूल नसायची. तीही पिसांत माना खुपसून बसलेली असायची. डोंगरात धुकं संथपणे तरंगत असायचं. डोळे मिटलेले असले तरी ते धुकं मनात उतरायचं, दिसायचं. असं ते धुकं उतरलं की रजईत आणखी मुरून आत आत शिरायला व्हायचं. डोळे मिटून घेतले तरी आपण त्या निळ्याशार डोंगरात धुक्याच्या वर तरंगतो आहोत असा भास व्हायचा. अगदी माथ्यावर. खाली ढग. नाही, ढग नाही, धुकंच ते. म्हटलं तर तिथं आहे, या क्षणी आहे, पापणी लवते न लवते तो विरघळून वाफेसारखा दिसेनासं होतं आहे. स्वप्नासारखं. स्वप्नात आठवायचं स्वत:ला बजावूनही जाग आल्यावर काहीच आठवू नये तसा. डोळे मिटून स्वत:शी म्हणायचं, बघ, हे असं धुक्यासारखं आयुष्य हवं. हवंहवंसं वाटेपर्यंत विरघळून जाणारं. सुख, आनंद धुक्यासारखाच असतो नाही का? असं काहीबाही विचार करत पडून असावं. 

हळुवारपणे आईनं हलवून जागं करावं. "ऊठ, आज संक्रांत आहे." हूं म्हणून पाय पोटाशी घेऊन मग रजई डोक्यावरून. पण मग उठावं, पांघरूण बाजूला केल्यावर थंडी थाडदिशी अंगावर आदळायची. हाताची घट्ट घडी घालून थेट मागील दारी अंगणात यायचं. बंब पेटलेला असे त्याच्याभवताली डेरा टाकायचा. आईला बजावायचं, शाळेत तिळगूळ घेऊन जायचाय हं. त्या माऊलीनं आधीच तिळगुळाचे डबे तयार करून ठेवलेले असायचे. एक माझ्यासाठी, एक भावासाठी. मग डबे उघडून कुठल्या कुठल्या रंगाचे आहेत ते पहायचं. पांढरे, गुलाबी, पिवळे, कधी निळेसुद्धा. त्या रंगांनी हरखून जायला व्हायचं. रंग मला नेहमीच वेडावत आलेत. हे तर गोड रंग. रंगीबेरंगी तिळगुळासारखी मोहक वस्तू नसेल. त्यावेळी मी माझ्या आवडत्या रंगाचे तिळगूळ मी वेगळे ठेवत असे. ते फक्त माझ्या आवडत्या व्यक्तींसाठी असायचे. न कळत्या वयात हे असलं आवडतं नावडतं बरंच असायचं. पण ज्यांच्याशी फार काही बरं नसायचं त्यांनाही खूप आनंदात तिळगूळ दिला जायचा. याएका दिवशी सगळे हेवेदावे, मत्सर, चीड काही काही नसायचं. रंगाला गोडपणा देत देत एकमेकांत गोडवा आणणारा हा सण. ऋतू संक्रमण हे निमित्त,एकमेकांना परिपक्वतेकडे नेणारं संक्रमण हे. सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होणार, दिवस जास्त वेळ प्रकाशमान होणार, आपणा सर्वांचं आयुष्यही असंच प्रकाशमान होवो, अंतरी तो ज्ञानदीप उजळो हेच मागणं.

Monday, January 11, 2016

वळूचा सल

वळूंनी आता कुणाच्या तोंडाकडे पहायचं? गुबगुबीत वशिंड, फुरफुरणारे कान, वटारलेले डोळे, माती उकरणारे खूर, उष्ण नि:श्वास सोडणाऱ्या फेंदारलेल्या नाकपुड्या हे वर्णन जरी एखाद्या राष्ट्रवादी किंवा कॉंग्रेसच्या (आणि काही निवडक भाजपच्याही) कार्यकर्त्याचे वाटले तरी प्रत्यक्षात ते एका केविलवाण्या वळूचे आहे हो. आणि या वळूला नुकतेच सरकारने पुन्हा वाऱ्यावर सोडले आहे. गायीला रक्षण आणि वळूचे मात्र ताडन. गाईचे ते गोमय आणि वळूचे ते मात्र शेण? गाईला छान गोठ्यात ठेवून तिच्यापुढे चारा टाकणार आणि वळूला मात्र शर्यतीच्या गाड्याला जुंपणार? वळू हा आपला राष्ट्रीय पशू जरी नसला तरी त्याचे सर्व आविष्कार आपण दैनंदिन व्यवहारात पाहत असतो. निमूटपणाने काम करणाऱ्याला, सांगितलेले ऐकणाऱ्याला बैलोबा तर अंगावर आलं तर शिंगावर घेणाऱ्याला वळू,  मठ्ठ दांडगटाला सांड तर गळ्यात मंजुळ घंटा बांधून शेतात नांगरणाऱ्याला छानपैकी वृषभ. नाही, विनोदी नाही लिहिता येत यावर. आणि मी लिहिणारही नाही. मुक्या प्राण्यांना शर्यतीसारख्या केवळ अघोरी प्रकाराला जुंपावं हे पटत नाही. त्याचं कसलंही समर्थन करता येत नाही. हा कसला आनंद म्हणायचा? ही तर विकृती. आपल्या विकृत आनंदासाठी प्राण्यांचा अघोरी छळ करणे हा गुन्हाच ठरायला हवा. अरब लोक लहान मुलांना उंटांवर बांधून शर्यती लावतात. पार कळवळा आणून आपण रडत असतो. आखाती प्रदेश आणि तिथले लोक हे अश्मयुगीन आहेत, त्यांच्याकडून बुद्धी, कणव, सहिष्णुता, भूतदया असल्या शब्दांचीही अपेक्षा करता येत नाही. आपण भारतीय तर स्वत:ला उत्क्रांत पावलेले, थोर वैचारिक, भूतदयावादी मानतो ना? मग इथे कुठे गेली ती अक्कल? मानव एक गोष्ट विसरतो. आपण जे कुणी आज आहोत ते केवळ योगायोगाने. कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीप्रक्रियेत योगायोगाने घडलेली एक घटना. ज्या घटनेने डायनासोर क्षणार्धात संपले, ती घटना पुन्हा केव्हाही घडू शकते. केवळ योगायोगाने प्राप्त झालेल्या बौद्धिक श्रेष्ठत्वाचा इतका माज आपण करू नये. प्रत्येक जिवाला जगण्याचा हक्क आहे. त्यांना तो बजावता येत नाही इतकंच.

केवळ राजकीय फायदा आणि हेतू डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे हे उघड आहे. मोदी सरकारने विरोध पत्करून गाईला संरक्षण दिले पण इकडे हा असला अनाकलनीय निर्णय घेतला. सगळेच जीव "माता" का नाही मानत? हिंदु धर्मात जीवहत्या हे पाप आहे ना? मग अनन्वित छळ करणारे हे खेळ सरकारमान्य का करता? त्यासाठी भाजपच्या बैलाला होssss! त्रिवार निषेध! अर्थात राजकारण, सरकार वगैरेंना दोषी ठरवणं सोपं आहे. इथे दोष आहे आपल्यातीलच या मनोविकृतीचा. शर्यतीसारखा अघोरी प्रकार खेळ मानण्याच्या आपल्या मनोवृत्तीचा. प्राण्याला वेदना चेहऱ्यावर दाखवता येत नाही, भावना व्यक्त करता येत नाहीत. म्हणून बैलांच्या वतीने मीच त्या व्यक्त करायचं ठरवलं आहे. मला बैल म्हटलंत तरी चालेल. मुर्दाड, बेमुर्वतखोर, क्रूर मानवापेक्षा बैल बरा. 

शेतात राबलो मी
गोठ्यात रवंथलो मी
कधी पाहून सुबक शेपटी
अंगांग थरारलो मी

चौखूर उधळावे वनी
भरून वाऱ्यास दो कानी
वदावे सर्व जनी
हा वळू किती गुणी

थबकले खूर माझे
आता त्या घरापाशी
टेकले गुडघे धडधडे अंतरी
करतो वंदन मान्नीय पशूमंत्री

पाहता तो मंत्री वदनी
सूख जाहले हो साजणी
मुख मजसम, तशीच वाणी
माझेच रूप भासले त्या क्षणी

थबकला मंत्री भिडली दिठी
स्मित ओळखीचे झळकले ओठी
हंबरूनी म्हणे कृपा झाली मोठी
मिळाला वळू आयता शर्यतीसाठी

जळो जिणे हे लाजिरवाणे 
ऊर फुटी पळणे अन् आसूड खाणे
ईश्वरे योजिले सर्व जीव जगणे
ईश्वरच गहाण कसले जिणे अन् मरणे… 

Thursday, January 7, 2016

टीम राहुल

इंडियन एस्प्रेसमधल्या जाहिराती पाहून पाहून कंटाळा आला राव. सारखं कतार की कातर, मस्कत की मुस्काट असल्या देशांच्या जाहिराती हो! असल्या भीषण नावांच्या देशांतही इंजिनियर वगैरे लागतात हे पाहून डोळे पाणावत. "मुसुनमानांचे देश ना रे हे? जळ्ळी मेली ती नोकरी! जाळीची टोपी घालून बकऱ्या चारायला इंजिनेर कशाला हवेत रे यांना? बरं बकऱ्याही काही दुधासाठी नाहीत, शेवटी खाटखुटच व्हायचं ना त्यांचं. तू बरीक इथेच बरा रे. छान वरणभात बरा आपला!" इति आमची प्रेमळ आत्या. मग काही जाहिराती कसलं तरी सर्कारी महानिगम, नाही तर सहकारी महासंघ असल्या खास, निविदा सूचना मागवल्याप्रमाणे. "सर्कारी नोकरीच बरी हो! एकदा चिकटलास की निवृत्तीकडे डोळे ठेवून कालक्रमणा करायची. एरवी घरात झोपा काढतोसच. त्या तिथे काढ." इति आमचे पोष्टात असेच ष्टाम्पासारखे चिकटलेले एक काका. पिताश्रींचे म्हणणे वेगळे होते. काही कर आणि स्वत:च्या पायावर उभा राहा म्हणजे मी सुटलो, एवढीच माफक अपेक्षा ते ठेवून असत. मातोश्रींच्या काळज्या वेगळ्या असत. त्यांना सरकारी नोकरी म्हणजे भ्रष्टाचार, खाजगी कंपनीत नोकरी म्हणजे गुलामगिरी आणि स्वत:चा उद्योग म्हणजे डोकेदुखी, ब्लडप्रेशरला आमंत्रण असे वाटे. त्यामुळे मी नक्की काय करावे याबद्दल ती संभ्रमात असे. पण मी "मार्गाला लागावे" यासाठी तिच्याकडून नवस बोलणे, उपवास करणे इत्यादि अत्यंत प्रभावी अशा उपाययोजना नियमित चालू असत. याशिवाय आत्याच्या यजमानांना सांगून जरा "शब्द" टाकायला सांगणे वगैरे उपाय चालूच होते. मी तसा काही रिकामा नव्हतो. संध्याकाळ ते रात्री दीड वाजेपर्यंत सदाशिव पेठ ते शिंदे आळी या प्रभागातील चार चार वेगवेगळे कट्टे सांभाळत होतो. जनसंपर्क प्रचंड होता. परंतु तो आमच्या मातोश्रींच्या मते "उडाणटप्पू" मंडळींचा होता. "काडीच्याही उपयोगाची नाहीत हो ही मंडळी! त्यांच्या संगती राहून तू मात्र वाया चालला आहेस!" असे ती म्हणे. मी म्हणत असे,"उपयोगी पडण्यासाठी केलेली मैत्री ही खरी मैत्रीच नव्हे." आणि वर कीर्तनकाराच्या थाटात "खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी" हे पद ताना घेऊन म्हणून दाखवत असे. त्यावर ती माऊली हातातील उलथने माझ्या दिशेने फेकून खरा लोभ कसा असतो ते दाखवत असे.

अशा रीतीने शांत जीवन जगत असताना, क्षितिजावर झुंजूमुंजू झाले. भवितव्य उज्वल असल्याचा संकेत देणारे शुभशकुन होऊ लागले. दिवाभीते गायब झाली, पक्षी मंजुळ शब्द करू लागले. गोठ्यात गायीला वासरू लुचू लागले. परसात कुक्कुटकोंब्याचे आगमन झाले, मुंगुसाने दर्शन दिले, शेजारच्यांची काळी मांजरी बाहेर पडत होती ती मला पाहून पुन्हा आत पळाली. बहुधा मीच तिला आडवा गेलो. हे असे शुभशकुन का होत आहेत याचा विचार करत असतानाच आमचा मध्यरात्रीच्या मंडईतील कट्ट्यावरील (हॉटेल प्यासानजीक) एक मित्र आला. त्यानेच शुभवर्तमान आणले. सदरहू मित्र, अन्या, कॉंग्रेसचा मध्यम धडाडीचा पण होतकरू असा कार्यकर्ता आहे. मध्यम धडाडीवरून "तरुण तडफदार नेते" इथवर प्रमोशन मिळण्यासाठी फक्त अजून एका दखलपात्र गुन्ह्याच्या नोंदीची आवश्यकता आहे. येत्या गणपतीत तो मानसही पूर्ण होईल याची त्याला खात्री आहे. पोलीसच आपल्या प्रगतीच्या आड येतात अशी त्याची तक्रार आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या हाणामारीत आमच्या या मित्राचा सक्रिय सहभाग होता. स्वत: हॉकी स्टिक परजत हा आघाडीवर होता. विरोधी पक्षाचे तीन चार कार्यकर्ते पुढे महिनाभर हॉस्पिटलमध्ये होते. या पराक्रमाच्या जोरावर या वर्षी नगरसेवकपदाची निवडणूक तरी लढवायला मिळेल अशी त्याला आशा होती. पण पक्षनेतृत्वाने सांगितले होते, गुन्ह्याची नोंद असल्याशिवाय बायोडेटातील हा प्रसंग ग्राह्य धरणार नाही. वास्तविक, विरोधी पक्षाने एफआयआर नोंदवायचा प्रयत्न केला होता पण पोलिसांनी तो दाखलच करून घेतला नाही. शेवटी आमचा हा मित्र पुरावा म्हणून फुटलेले डोके असलेले कार्यकर्ते घेऊन पक्षनेतृत्वाकडे गेला होता. पण दुर्दैवाने ते कार्यकर्तेही कॉंग्रेसचेच आहेत असे तिथे कळले. ते पक्षाच्याच आदेशावरून विरोधी पक्षाच्या जमावातून फिरत होते असे कळले. मायला, पोलिसांना माहीत होतं पण बोलले नाहीत. तरीच एफआयआर नोंदवून घेतला नाही. असो. थोडक्यात आमचा हा मित्र धडाडीचा असला तरी असा कमनशिबी आहे.

आम्ही दोघेही मग "प्यासा"त घुसलो. अनेक नेहमीचे होतकरू कार्यकर्ते आलेले दिसत होते. अन्याची वळख लई असल्याने प्रत्येक टेबलापाशी थांबून विचारपूस करण्यात थोडा वेळ गेला. साधारण संवाद,"बास का राव, आमच्याशिवाय बसले का तुमी. त्यावर पलीकडून,"न्हाय ओ सायेब, हे काय तुमचा गिलास पण एक एकष्ट्रा खाली ठेवला ना!" असा. आम्ही एक टेबल पकडलं. "युवराजसाहेब टीम काढताहेत!" अन्या म्हणाला. मी तंद्रीत होतो. चार पेगनंतर अशी तंद्री कुणालाही लागेल. मी म्हणालो,"म्हणजे? लोकसभेत बट्ट्याबोळ झाल्यावर आता आयपीएलमध्ये घुसणार का?" तर म्हणाला ,"अरे नाय! पक्षाला कसलीतरी बांधणी करायची आहे. कसलं तरी पुनरुज्जीवन करायचं आहे म्हणे. त्यासाठी उमेदवार हवे आहेत. काय असतील कुठे तरी गेस्ट हाऊस वगैरे बांधत. आपल्याला काय. स्वत: युवराज मुकादम होऊन देखरेख करणार आहेत. उद्या मुलाखती आहेत. तर तू यायचंस. नुसत्या घरात झोपाच काढतोस नाहीतरी." मी म्हणालो,"अरे पण मुलाखती घ्यायला तुमचे पोचलेले लोक असणार ना राव. आपण काय एवढे धडाडीचे नाय." तर अन्या म्हणाला, "अरे चिंताच सोड. स्वत: युवराज मुलाखती घेणार आहेत! काहीही विचारलं तर आपण "असहिष्णुता वाढत चाललेली आहे, दहशतवादी हल्ले वाढत चाललेले आहेत, महागाई वाढत चाललेली आहे, आरएसएसचा उद्दामपणा वाढत चालला आहे, आणि या सगळ्याला मोदी जबाबदार आहेत" एवढंच उत्तर द्यायचं." बघ पोपट खूष होतो की नाही ते. अगदीच जर पेटलेला असेल तर "महिला सशक्तीकरण, अर्णब गोस्वामी" एवढंच म्हणायचं. या दोन शब्दांनंतर युवराज पुढील तीन चार मिनिटं बधिर होतात असं ऐकलंय. मग आपणच घेऊ कागदावर त्यांचा अंगठा आपल्याला पास केल्याचा."