पुस्तकांचं वेड म्हणा व्यसन म्हणा लहानपणी ज्याला लागलं ते आयुष्यभर
राहिलं. जे समोर आलं ते कसलाही विचार न करता वाचून काढलं. विचार करण्याचं
वय तरी कुठं होतं म्हणा. अक्षरश: "डोळ्यांचे रोग" ते सावरकरांची "सोनेरी
पाने" अशी सगळी पुस्तकं समोर होती. ती एकाच निर्विकारतेने वाचली.
निर्विकारतेने अशा अर्थाने की पाटी कोरी होती. कुठल्याही पुस्तकाने अजून
संस्कार वा कुसंस्कार दिलेले नव्हते. कुठलेही विकार न जडता केली कृती
म्हणजे निर्विकारपणे म्हणायला हवी. घरी भरपूर पुस्तके, गावातील श्रीराम
वाचनमंदिरातून घरी आलेली पुस्तके असं सगळं वातावरण होतं. टीव्ही ही संकल्पनाच माहीत नसल्यामुळे अज्ञानात सुख होतं.
टीव्हीचा शोध जगात लागला असला तरी आमच्या गावात यायला अजून बक्कळ वर्षं
होती. साधा महाराष्ट्र टाईम्स दोन दिवस उशिरा येई तिथे तंत्रज्ञान वगैरे
लांबचीच गोष्ट. रामायण चित्रपटही आमच्या गावात लागेपर्यंत सीताहरण, रावणदहन
होऊन लवकुश चांगले गायला वगैरे लागले होते. रेडिओ फक्त सकाळी सातच्या
बातम्या ऐकण्यापुरता. रोज सकाळी "संप्रति वार्ता: श्रुयन्ताम, प्रवाचक:
बलदेवानंद सागर:" झाल्यानंतर तो बलदेवानंद दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत बातम्यांचे खिळे जुळवत "राम रामौ रामा:" करत बसतो असं मला वाटायचं. इंटरनेट नव्हतं, स्मार्ट फोन्स नव्हते. दिवसभर उनाडून केवळ नाईलाजाने घरी आल्यावर
मग जेवायचं आणि तडक झोपायचं अशी साधी सरळ दिनचर्या असे. पुस्तक वाचायला कधी
सुरुवात झाली ते आठवत नाही. पण जेवतानाही पुस्तक शेजारी यायला लागलं. आई
वैतागून म्हणायची,"ठेव ते बाजूला! जेवताना घास नाकात गेला तरी कळायचं
नाही!" तरीही मी हट्टानं पुस्तक घेऊनच बसायचो. त्यावेळेला वाटायचं, आयला या देवांचं बरं आहे चारचार आठआठ हात,
पुस्तक एका हातात धरायचं, दुसऱ्या हातानं पानं उलटायची, तिसऱ्या हातानं
जेवायचं, चौथ्यानं पाण्याचं भांडं तोंडाशी लावायचं. रावणबिवण तर त्या काळात मल्टीप्रोसेसर, मल्टी थ्रेडिंग, पॅरलल प्रोसेसिंग असलेला. एकाच वेळेला धा पुस्तकं वाचू शकला असता. असो. मुद्दा असा की पुस्तकं वाचायची गोडी लागली.
सगळ्यात प्रथम जर काही चांगलं, अर्थात त्या वयानुसार चांगलं, वाचलेलं आठवतं ते किशोर मासिक. अत्यंत सहज, सरळ कथा, त्याला जोड अप्रतिम चित्रांची. गोष्टी तर सुंदर असतच, पण कविताही अप्रतिम असत. एक कविता अजूनही आठवते. कवितेचं नाव "समंध"! संपूर्ण कविता आठवत नाही पण पहिल्या ओळी पक्क्या डोक्यात बसल्या आहेत. "कोण आले कोण आले, दार आपोआप हाले." शेजारी नागोबाचा टाय गळ्यात असलेल्या समंधाचं विनोदी चित्र होतं. किशोरच्या जोडीला नाव घेतलंच पाहिजे ते चांदोबाचं. चांदोबाच्या आठवणी मात्र आहेत त्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या. उन्हाळ्याची सुट्टी लागली की सांगलीच्या घराचे वेध लागायचे. आज्जी आजोबा तर असायचेच. त्याहीपेक्षा ओढ असायची ती आत्तेभावंडांची. एकत्र कुटुंब ते. आत्याचेही बिऱ्हाड आमच्याच वाड्यात होते. आत्त्याचे यजमान, दादा, हे कडक शिस्तीचे होते. सर्व कुटुंब त्यांच्या दराऱ्यात वावरायचे. सकाळी दहा वाजता जेवण करून साडेदहा वाजता ऑफिसला जाण्यासाठी ते बाहेर पडायचे. ते बाहेर पडले रे पडले की जणू कर्फ्यू उठायचा. आत्त्या मोकळेपणे बोलायची, तिची मुले दंगा करू लागायची. थोडक्यात आम्हाला रान मोकळे मिळायचे. या कडक दादांचे काही पैलू मात्र काहीसे स्वभावाला साजेसे नव्हते. एक म्हणजे त्यांना पत्ते खेळायला आवडत, तेही आम्हां मुलांबरोबर. दुसरा पैलू म्हणजे त्यांना "चांदोबा" चे व्यसन होते. होय व्यसनच. त्यामुळे चांदोबाचा रतीब घरात होता. पण एक आम्हा मुलांना काही चांदोबा लगेच मिळत नसे. कारण जसे दादांना चांदोबाचे व्यसन होते तसेच माझ्या आजोबांनाही होते. त्यामुळे नवीन अंक आला की मानाच्या गणपतीप्रमाणे पहिला मान आमच्या आजोबांचा.ते दोन तीन दिवस लावत. मग तो जायचा दादांच्या ताब्यात. ते चांगले तीनचार दिवस आमचा अंत पाहत. मग तो अंक ते आमच्या आत्त्याकडे "रीलीज" करत. मग काय, आम्ही सगळी भावंडे तुटून पडत असू. सगळ्यांनाच तो हवा असे. मग त्यातल्या त्यात दोन ग्रुप होत. पहिला ग्रुप सामूहिक वाचन करे. मग दुसरा ग्रुप वाचे. दुसरा ग्रुप अर्थातच प्रत्येकाच्या त्याच्याहून लहान भाऊ बहिणींचा असे. मग पुढे मी एक माझ्यापुरता तोडगा काढला होता. मी नवीन अंकाच्या मागे लागतच नसे. जुन्या अंकांची पेटी काढून त्यातील जुने अंक वाचत बसे. नवा अंक सगळ्यांनी वाचून झाला की तो अक्षरश: कुठे तरी बेवारशासारखा मिळे. मग तो मी सावकाश वाचत बसे.
त्या
काळात काय अशक्य साहित्य वाचलं गेलं, आज आठवलं की हसायला येतं. अर्थात,
हसणं साहित्याला नाही, पण माझ्या रुचिला किंवा त्याकाळी कसलीच रुचि
नसण्याला. आई वाचनालयातून कुमुदिनी रांगणेकर, बाबा कदम यांच्यासारख्या
लेखकांच्या कादंबऱ्या आणायची. बाबा कदमांच्या कादंबऱ्या म्हणजे कमीत कमी तीनशे पानाचा ठोकळा असे. त्यात संग्राम, दीनानाथ असल्या भरभक्कम नावाची मंडळी असत. बारा बोअरची बंदूक तर हवीच. सुरुवातीला मी उत्साहाने त्यांच्या कादंबऱ्या वाचत असे. नंतर असे लक्षात आहे की पहिली दोन पाने, नंतर साधारण शंभर ते एकशेदहा पाने आणि शेवटची दोन तीन पाने वाचली तरी चालतात. त्या साक्षात्कारानंतर कदमांची पुस्तके मी केवळ मटणाचा रस्सा, पांढरा रस्सा, कोल्हापुरी बाज यांच्यासाठी वाचली. तिकडे कुमुदिनी रांगणेकरांची एक खास शैली होती.
एखादी कॉलेजमध्ये जाणारी अल्लड, अवखळ, जराशी फाजील लाडिक मुलगी जसा संवाद साधेल
तशा त्या वाचकांशी संवाद साधत. इतक्या बायकी शैलीचं लिखाण मी पुन्हा पाहिलं नाही.
सगळ्या कादंबऱ्या नायिकाप्रधान पण नायकाभोवती फिरणाऱ्या. नायकाच्या उगाच फुरंगटून बोलण्याला उद्देशून "तो वतवतला", "तो फुतफुतला" वगैरे शब्द वाचले
की मी हसून गडबडा लोळायचो. आईला "आई कस्सली अशक्य पुस्तकं वाचतेस तू!" असं
म्हणून चिडवायचो. या बाईंनी "स्कार्लेट पिम्पर्नेल" नावाची एक इंग्लिश
कथेची अनुवाद असणारी कादंबरी लिहिली आहे. आमच्या मातोश्री एकदा ते अदभुत
रसायन वाचनालयातून घेऊन आल्या. म्हटलं अनुवाद आहे, फार काही लाजायला
मुरकायला फुतफुतायला वाव मिळणार नाही. म्हणून हातात घेतलं. पण नाही! राजा
विक्रमादित्यानं जसा आपला हट्ट सोडला नाही तसा कुमुदिनी बाईंनीही सोडला नव्हता. त्यांनी सर पर्सी या शूर नायकाचा उल्लेख लडिवाळपणे "असा कसा
बाई अचपळ मेला, प्रिय माझा स्कार्लेट पिम्पर्नेल्या" असल्या
देहांतशासनाच्या लायकीच्या काव्यओळीने केला आणि मी ते पुस्तक मिटले. झोरो,
बॅटमॅन यांच्या पंक्तीत बसू शकणारा तो मर्दानी पुरुष, त्याचा
"स्कार्लेट पिम्पर्नेल्या" अशा सलगीच्या उल्लेखाने कुमुदिनी बाईंनी त्याचा
एका क्षणात "टेकाडे भाऊजी" (होय तेच ते, मीनावहिनींच्या "प्रपंचा"त लुडबूड
करणारे ते आगाऊ भाऊजी) करून टाकला होता. पुढे हा स्कार्लेट पिम्पर्नेल्या
नायिकेला वाचवण्याऐवजी राजवाड्यात प्रवेश करून,"वैनी, चहा टाका बुवा पहिला!" असं
म्हणत असेल असं उगाच वाटत राहिलं.सगळ्यात प्रथम जर काही चांगलं, अर्थात त्या वयानुसार चांगलं, वाचलेलं आठवतं ते किशोर मासिक. अत्यंत सहज, सरळ कथा, त्याला जोड अप्रतिम चित्रांची. गोष्टी तर सुंदर असतच, पण कविताही अप्रतिम असत. एक कविता अजूनही आठवते. कवितेचं नाव "समंध"! संपूर्ण कविता आठवत नाही पण पहिल्या ओळी पक्क्या डोक्यात बसल्या आहेत. "कोण आले कोण आले, दार आपोआप हाले." शेजारी नागोबाचा टाय गळ्यात असलेल्या समंधाचं विनोदी चित्र होतं. किशोरच्या जोडीला नाव घेतलंच पाहिजे ते चांदोबाचं. चांदोबाच्या आठवणी मात्र आहेत त्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या. उन्हाळ्याची सुट्टी लागली की सांगलीच्या घराचे वेध लागायचे. आज्जी आजोबा तर असायचेच. त्याहीपेक्षा ओढ असायची ती आत्तेभावंडांची. एकत्र कुटुंब ते. आत्याचेही बिऱ्हाड आमच्याच वाड्यात होते. आत्त्याचे यजमान, दादा, हे कडक शिस्तीचे होते. सर्व कुटुंब त्यांच्या दराऱ्यात वावरायचे. सकाळी दहा वाजता जेवण करून साडेदहा वाजता ऑफिसला जाण्यासाठी ते बाहेर पडायचे. ते बाहेर पडले रे पडले की जणू कर्फ्यू उठायचा. आत्त्या मोकळेपणे बोलायची, तिची मुले दंगा करू लागायची. थोडक्यात आम्हाला रान मोकळे मिळायचे. या कडक दादांचे काही पैलू मात्र काहीसे स्वभावाला साजेसे नव्हते. एक म्हणजे त्यांना पत्ते खेळायला आवडत, तेही आम्हां मुलांबरोबर. दुसरा पैलू म्हणजे त्यांना "चांदोबा" चे व्यसन होते. होय व्यसनच. त्यामुळे चांदोबाचा रतीब घरात होता. पण एक आम्हा मुलांना काही चांदोबा लगेच मिळत नसे. कारण जसे दादांना चांदोबाचे व्यसन होते तसेच माझ्या आजोबांनाही होते. त्यामुळे नवीन अंक आला की मानाच्या गणपतीप्रमाणे पहिला मान आमच्या आजोबांचा.ते दोन तीन दिवस लावत. मग तो जायचा दादांच्या ताब्यात. ते चांगले तीनचार दिवस आमचा अंत पाहत. मग तो अंक ते आमच्या आत्त्याकडे "रीलीज" करत. मग काय, आम्ही सगळी भावंडे तुटून पडत असू. सगळ्यांनाच तो हवा असे. मग त्यातल्या त्यात दोन ग्रुप होत. पहिला ग्रुप सामूहिक वाचन करे. मग दुसरा ग्रुप वाचे. दुसरा ग्रुप अर्थातच प्रत्येकाच्या त्याच्याहून लहान भाऊ बहिणींचा असे. मग पुढे मी एक माझ्यापुरता तोडगा काढला होता. मी नवीन अंकाच्या मागे लागतच नसे. जुन्या अंकांची पेटी काढून त्यातील जुने अंक वाचत बसे. नवा अंक सगळ्यांनी वाचून झाला की तो अक्षरश: कुठे तरी बेवारशासारखा मिळे. मग तो मी सावकाश वाचत बसे.
पुढे वय वाढलं मग वाचनात बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, नारायण धारप आले. झुंजार कथा, गरुड कथा आल्या. त्या कथांचे प्लॉटस अत्यंत सुमार असत. पण त्यावेळी वाटायचं आयला ह्या झुंजार आणि तो बाकदार नाकवाला गरुड यांना अशक्य असं काहीच नाही. हळूहळू वाचनाचे विषय बदलले. वडिलांनी बाबासाहेब पुरंदऱ्यांचं राजा शिवछत्रपति आणून दिलं. आज कुणी काही म्हणो, शिवाजी महाराज हे शब्द ऐकल्यावर छाती दोन इंच फुगते, आपल्या कणखर राकट दगडांच्या देशाचा अभिमान वाटतो, त्याची छोटीशी ठिणगी या पुस्तकाने पाडली. मग पुढे मुंजीत प्रथेप्रमाणे "श्यामची आई" मिळालं. हे पुस्तक मला तेव्हाही भावलं नाही आजही भावत नाही. मुळूमुळू रडणारा श्याम मात्र आठवतो. पुढे सिनेमातला श्याम पाहिल्यावर तर शंकाच राहिली नाही. नाही, लहान मुलांना हे साहित्य देऊ नये. आईवडिलांवर प्रेम करा, खोटे बोलू नका हे शिकवायला आणखी अनेक उपाय आहेत. पुढे दर्जेदार साहित्य खूप वाचलं. पण ते दर्जेदार आहे कळण्यासाठी जी काही पहिली जडणघडण किंवा मोडतोड म्हणा, व्हायला आधीच्या या उनाड वाचनाचा हातभार आहे असं म्हणावं लागेल. साहित्य हे साहित्य असतं, बरं किंवा वाईट हे वाचणाऱ्यावर असतं. पुस्तकं ही वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून जग, समाज कसा दिसतो हे दाखवतात. बरेच लोक अमुक एखादं पुस्तक आपला दीपस्तंभ आहे वगैरे म्हणतात त्याचं मला आश्चर्य वाटतं. एखाद्याचं स्वत:चे अनुभव, स्वत:चं तत्वज्ञान हे त्याच्यापुरतं मर्यादित असतं. त्या दृष्टिकोनाचा आपल्याला उपयोग "असाही दृष्टीकोन असतो" असं ज्ञान होण्यापुरताच. आपण आपली स्वत:ची वाट चोखाळावी. भलेही मग ती न पडलेली पायवाट असो. ज्ञान हे आतूनच व्हावं लागतं. पुस्तकं आपल्याला शहरच्या वेशीपर्यंतच नेऊन पोचवतील. पुढील जंगलातील वाटचाल आपण एकट्यानेच चालायची आहे. टागोर उगाच नाही म्हणाले, एकला चालो रे!
चांदोबा बरोबर "अमृत "आणि "विचित्रविश्व " ही मराठीतली 'डायजेस्ट '
ReplyDeleteधन्यवाद त्रिविक्रम. खूप उल्लेख डोक्यात होते. त्यावर पुन्हा कधीतरी.
DeleteFarah sundar. Malahi majhe lahan paniche divas aathavale. Gavhale jatana ST stand var chandoba ghetlya shivay st madhe basayacho nahi. Those days r over now. Thanks for bringing those memories back.
ReplyDeleteधन्यवाद हेमंत
DeleteChan vachan pravas....jodeela Sawantwadeeche khas ullekh. Maja aalee
ReplyDeleteधन्यवाद मधू. होय ते दिवस मंतरलेले होते. श्रीराम वाचन मंदिराच्या खूप आठवणी आहेत.
Delete