असेच आमचे एक मित्र विद्रोही साहित्यिक आहेत. कोकणातले आहेत. त्यामुळे मुंबईला जाऊन
चाकरमानीपणा करत विद्रोहीपणाचीही धुरा सांभाळत आहेत. एकदा असेच ते त्यांची विद्रोही
कविता वाचून दाखवत असताना त्यांच्या शरीरातील विद्रोही रक्त तापले होते आणि
त्यामुळे आवाज उंचावत चिरकत होता. तो चिरकलेला आवाज शिगेला पोचला असताना
त्यांच्या ऑफिसातून साहेबाचा फोन आला होता. साहित्यिकांनी खर्डेघाशी करताना
कुठल्या तरी ब्यालंस शीट मध्ये बराच विद्रोह दाखवला होता म्हणून साहेबांनी
त्यांच्या पगारात क्रांती होण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांनी
तत्काळ "हो साहेब, लगेच येतो" असे अ-विद्रोही विधान करीत कवितेचे भेंडोळे
गुंडाळले होते. ते अधूनमधून आम्हाला अशा विद्रोही कविता वाचायला देत असतात.
परवाच घेऊन आले होते संध्याकाळी संध्याकाळी. म्हणजे, त्यांची कविता. मी
आणि मोरू सुखदु:खाच्या गोष्टी करत बसलो होतो. दिवाळीच्या बोनसची चर्चा करीत
होतो. बोनस मिळाला की अष्टविनायक यात्रा करण्याचे योजत होतो. त्यात हे
आले. आमची चर्चा ऐकून त्यांनी "हं:! अष्टविनायक!" असा उद्गार काढला. "अहो,
जग कुठं चाललं आहे, आणि तुम्ही कुठं!" इति विद्रोही. मी आणि मोरूने
एकमेकाकडे पाहिले. आता जग आम्हाला सोडून आणि आम्हाला नकळत कुठे चालले होते
बरे? नाही म्हणायला पहिल्या मजल्यावरच्या जोगांचे वडील मागच्या महिन्यात जग
सोडून गेले होते, पण ते एकटेच गेले होते, जग आहे तसेच राहिले होते. मी तसे
म्हणाल्यावर विद्रोही उखडले,"करा, नेहमी चेष्टा करा. एकदा क्रांती सुरू
झाली म्हणजे मग कुठं जाल?" आम्हाला काही कळेना. मग मीच म्हटलं, "नवी कविता
केली आहे वाटतं?" तसे ते खूष झाले. पण आनंद दाखवणे हे विद्रोहात बसत
नसल्यामुळे मख्ख चेहऱ्याने ते म्हणाले,"कविता केली जात नाही. ती होत असते.
वेदना ती प्रसवते. निर्मितीची आदिवेदना काय आहे हे तुला कळणार नाही. प्रथम
सूक्ष्म जाणीव, मग अस्वस्थपणा, मग तो विस्फोटक कोंडमारा, ते अभिव्यक्तिचे
स्वातंत्र्य नसल्याने वेदना तशीच सहन करणे, आणि मग शेवटी असह्य होऊन कुणाची
पर्वा न करता शब्द भळभळा वाहत बाहेर येणे…" इथे विद्रोहींची नजर शून्यात
लागली. मोरू म्हणाला,"हे मला नेहमी सकाळी होते. आमच्या मजल्यावर पाच
बिऱ्हाडांत मिळून एक शौचकूप आहे. या सगळ्या अवस्थांतून मी रोज जातो." विद्रोही
खिन्नपणे म्हणाले,"जाऊद्या मोरोपंत, पांढरपेशी समाजात वावरणारे तुम्ही. तुम्ही बसा पाडगावकरांच्या कविता वाचत." मग भानावर येऊन म्हणाले,"बरं, ऐका माझी
नवीन कविता. लंच टाईममध्ये झाली. कवितेचे नाव आहे मढे!"
सरणावर ते जळते
मढे प्रथा परंपरांचे
इथे उभा मी निस्संग
मनात लाडू दहाव्याचे
वाटते आता मोडावेच
हे बंध पावित्र्याचे
फेकावे दूर साखळदंड
पायातील नात्यागोत्यांचे
धुमसत्या या राखेतून
फुटतील कोवळे कोंब
विद्रोहाचे खत त्याला
अन पाणी असंतोषाचे
आणि
ते अपेक्षेने आमच्याकडे पाहू लागले. तशी मोरू म्हणाला,"अरे तुला लाडूच
पाहिजेत तर दहाव्याच्या लाडवाची अभद्र आशा कशाला? वहिनी चांगले तुपावर
परतलेल्या रव्याचे करून नाही का देणार?" त्यावर विद्रोही भडकून
म्हणाले,"हेच! हेच ते साखळदंड! हेच ते पांढरपेशी मुळमुळीत जगणे. कसली
मूल्ये आणि कसली नीती? कसल्या भद्राभद्रतेच्या तुमच्या भटी संकल्पना! सगळं
मोडून तोडून टाकलं पाहिजे. सध्याच्या श्रद्धा मोडीत काढल्या पाहिजेत, आदर
वगैरे वाटत असलेल्या गोष्टी फेकून दिल्या पाहिजेत!" त्यावर मोरूने
निरागसतेने विचारले,"आणि त्यानंतर?" मग विद्रोही आणखी भडकून
म्हणाले,"त्यानंतर? म्हणजे काय? हे काय विचारणं झालं? त्यानंतर नवीन
व्यवस्था, नवीन आदराची स्थाने! अभिव्यक्ती स्वातंत्र्य! माणूस माणसाला
माणूस म्हणून भेटणार! त्यासाठी सर्व प्रस्थापित मूल्ये फेकून देणे आवश्यक
आहे!" पूर्वीच्याच त्या निरागसतेने मोरू म्हणाला,"सगळी म्हणजे सगळी
मूल्ये?" चेव चढून विद्रोही गरजले,"होय! सग्ग्ळी! संपूर्ण क्रांतीच आता
मानवतेला तारू शकेल. इन्किलाब झिंदाबाद!" तेवढ्यात आमच्या हिने चहा आणला.
चहा पाहून विद्रोहींनी इन्किलाब स्थगित केला आणि "वा! अगदी वेळेवर चहा!"
असं म्हणत डोळे बंद करून चहाचे फुरके मारू लागले. मोरूने विचारले,"काय रे
बुवा, या तुझ्या विद्रोही कल्पना वहिनींना ठाऊक आहेत काय?" त्यावर सटपटून
विद्रोही कवी म्हणाले,"बाबा रे मला अजून जगायचंय. माणसानं घरात प्रवेश
करताना आपल्या जाहीर भूमिका भिजलेली छत्री दाराबाहेर बादलीत उलटी करून
ठेवतो तशा बाहेर ठेवाव्यात. बरं केलंस आठवण केलीस. तुझ्या वहिनीनं ऑफिसातून
येताना नारळ आणायला सांगितले होते. नवरात्र बसतंय उद्या. बराय, चलतो.
वहिनी, ही विचारत होती हळदीकुंकवाचा कार्यक्रम कधी ठेवता आहात?" असे म्हणून
ती विद्रोही चळवळ स्वत:च्या घरी गेली. दोन मिनिटांत ते परत येताना दिसले.
म्हटलं पुन्हा कवितेची "कळ" आलेली दिसते. घरी पोहोचेपर्यंत दम धरवला नसता
म्हणून माझ्याकडे कागद मागायला आले असावेत. लहानपणापासून कागदावर "करायची"
त्यांची सवय गेलेली नव्हती. असा विचार करतो तो ते जवळ आले. मुद्रेवर खुदाई
खिन्नता होती. ते मोरोबांना म्हणाले,"मोऱ्या, आम्ही विद्रोही तर आहोतच, पण
पुरोगामी जास्त आहोत. तेव्हा आमच्या कलत्रासमोर आमचा उल्लेख पुरोगामी
साहित्यिक असा केलास तर बरे होईल. विद्रोह वगैरे शब्द तिला कळत नाहीत. उगाच
मी तिच्याशी द्रोह वगैरे करतो आहे अशी कल्पना होईल तिची. बराय चलतो.
आठच्या आत घरी पोचलं नाही तर कारणे दाखवा नोटीस मिळते."
तस्मात
त्या चाहुलीबिहुलीचे म्हणाल तर आम्हाला त्याचे फारसे कवतिक नाही. गाढवदेखील
पाऊस पडायचा असला की आडोसा शोधून उभे राहते. पण पावसामुळे आपले जगणे अशक्य
झाले आहे, जीव खुरात धरून जगतो आहोत अशा खिंकाळ्या ते मारीत नाही.
थोडक्यात पुरोगामी साहित्यिकांमुळे आमचा गाढवाप्रति असलेला आदर दुणावला
आहे. वाईटातून चांगले निघते ते असे.
Your style is pretty good. Looking forward to read more.
ReplyDeleteधन्यवाद श्री. रानडेकाका.
Deleteभन्नाट !
ReplyDeleteधन्यवाद त्रिविक्रम
Delete