Tuesday, June 23, 2015

नमन नटवरा

दादा मडकईकरांसोबत
कारभारी - म्हाराज! म्हाराज! आपला कोतवाल म्येला की हो!
म्हाराज - आं!? आन त्यो कसा रं?
कारभारी - पालथा पडून!
म्हाराज - आरं तसं न्हवं! म्हंजे तेला काय झालं हुतं?
कारभारी - आता गतसाली येक कारटं जालं हुतं. दोन वर्साखाली येक आनखी पोरगं जाल्यालं हुतं. औंदा काय ऐकण्यात न्हवतं!
म्हाराज - आरं तुज्या! आरं तसं न्हवं! म्हंजे तेला रोग काय जाला हुता म्हंतो मी!

असा संवाद स्टेजवर चालू होता. प्रेक्षकांत हंशा पिकत होता. प्रेक्षकांत मी आईबरोबर बसलो असेन. वय साधारण ९-१० वर्षे. संवादातील विनोद फारसा कळत नसला तरी मीही जोरजोरात हसत होतो. पण मला आठवतं, त्या वयातही एक दडपण आलं होतं. त्याला कारणही तसंच होतं. हा जो नाट्यप्रयोग चालला होता त्यात कारभाऱ्याचं काम करत होते ते माझे बाबा. सावंतवाडी हे गाव छोटं असलं तरी परंतु नाटक, संगीत, चित्रकला, साहित्य या बाबतीत अत्यंत जागृत. या ठिकाणी "जागृत" हाच शब्द डोक्यात उस्फूर्तपणे आला आणि लक्षात आलं खरंच, एखादं देवस्थान जसं जागृत असतं तसंच या गावाचं आहे. दुसरा शब्द समर्पक ठरलाच नसता. नाट्यदर्शन ही संस्था आमचे सर दिनकर धारणकर यांनी समानव्यसनी नादिष्टांना घेऊन सुरू केली तेव्हा माझं काही कळण्याचं वय नव्हतं. पण नाटकांच्या तालमी सुरू झाल्या आणि बाबांबरोबर तालमींना जायला मिळायला लागलं. आमच्या वि. स. खांडेकर विद्यालयातच त्या तालमी होत. शाळेचं नाट्यगृहही या संस्थेला मिळायचं. त्यामुळे जागा ओळखीचीच असायची. आबा नेवगी, दादा मडकईकर, स्वत: दिनकर सर, चिटणीस सर, पी.डी. नाईक, नाटककार ल. मो. बांदेकर असे अनेक जण त्या निमित्ताने मी जवळून पहिले, त्यांचं काम त्या वयात जेवढं कळायचं तेवढं पाहिलं. आबा नेवगी आणि दादा मडकईकर हे भयंकर मिष्किल, खरं तर व्रात्यच म्हणायचं. चेष्टा, मस्करी अतोनात. पण ती कधी लागट, जिव्हारी लागणारी नसे. ज्याची मस्करी असे तोही दिलखुलास हसत असे. अशा मस्कऱ्या स्वभावाचे दादा मडकईकर मला माहीत असल्यामुळे ते कवी आहेत याचा शोध मला खूप नंतर लागला. परवाच कुणीतरी दादांची "मी पाव्स तू पाव्स" कविता उद्धृत केली होती. एवढं तरल आणि हळुवार मन असणारा हा कवी. अनेक क्षेत्रांतील लोक नाटकाच्या ओढीमुळे तिथे एकत्र आलेले दिसायचे. तालमी चालायच्या, भरपूर गप्पा व्हायच्या. मी फक्त त्या गप्प राहून पाहायचो. नाटक का करायचं, आणि लोकांना ते पाहायला का आवडतं असे प्रश्नही मला पडायचे. अनेक शब्द कानावर पडायचे. संहिता, अंक, प्रॉम्प्टर, कपडेपट, पिट, विंग, पहिली घंटा, कॅरेक्टर. सगळ्यात मला आश्चर्य वाटायचं ते म्हणजे एवढ्या प्रेक्षकांसमोर "भाषण" न अडखळता म्हणून दाखवायचं, म्हणजे पाठांतर जबरदस्त हवं. मध्येच बाबा विसरले तर? नाटक किंवा कंटाळवाणे भाषण पाडायला लोक टाळ्या वाजवतात ही मला तिथंच समजलेली गोष्ट. आयत्यावेळी कशा चुका होतात याचे किस्सेही बाबा सांगायचे. त्यामुळे लोकांनी खरोखर टाळ्या वाजवल्या तरी मी नर्व्हस होऊन स्टेजवरच्या नटमंडळींचं काय चुकलं असेल ह्याचा विचार करायचो. त्यामुळे आताही हे वगनाट्य चालू असताना मला दडपण त्याचं होतं. पण तसा काही अनवस्था प्रसंग आला नाही. राजा, परधान दोघेही टाळ्या आणि हशे वसूल करत होते. वग गाजला. नाट्यदर्शन जोमाने वाटचाल करू लागलं. पुढे मग नाटकं बघायला मिळू लागली. पुढे मग "साक्षीदार" बसले. त्यात प्रा. चिटणीस हे सरकारी वकील, प्रा. आर. एस. कुलकर्णी हे आरोपी, धारणकर सर आरोपीचे वकील, प्राचार्य घ.न.आरणके हे जज्, अशी पात्ररचना असलेली आठवते. बाबांनी त्यात "मामा"चे काम केले होते. धारणकर सर हे दिग्दर्शक आणि नाट्यदर्शनचे सर्वेसर्वा व्यक्तिमत्व. अनेकदा घरी येत. नाटकांवर चर्चा होत असे. नवीन नाटक बसवायला घेतलेलं असायचं. मला फारसं काही कळत नसे, पण कानावर पडत असे. नाट्यदर्शनमुळे १९७८ मध्ये एकोणसाठावे नाट्यसंमेलन हे सावंतवाडीत झाले. भालबा केळकर त्याचे अध्यक्ष होते. प्रिन्सिपॉल कोपरकरांबरोबर भालबा आमच्या घरी आलेले आठवते. नाट्यसंमेलनानिमित्त स्मरणिकेचे काम बाबांकडे आले होते. कित्येक महिने स्मरणिका हाच विषय घरात. एखाद्या विषयाला हात घातला की अक्षरश: तहानभूक विसरून त्यात समरस व्हायची वृत्ती. अजूनही ती तशीच आहे. एक गमतीची गोष्ट आठवते, या सगळ्या चर्चांमध्ये आमचे धाकटे बंधुराज, वय साधारण सात ते आठ पण अगदी हिरीरीने भाग घेत असत. अर्थात, नाटकच कशाला, समोर आलेल्या सर्व विषयांवर आपल्याहून वयाने साधारण तीस पस्तीस वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसांशी बरोबरीने साधकबाधक चर्चा करणे, मत व्यक्त करणे हे त्याच्या रक्तातच होते. मला वाटतं आज तो नाटकं दिग्दर्शित करतो, त्यांत कामं करतो, हा काही योगायोग नाही. त्याची समजच मोठी असावी. माझं स्वत:चं नाटकात काम करणं फारसं पुढे गेलं नाही. एकदा एका नाटकात दूधवाल्या भय्याचं काम - तेही दाराबाहेरूनच "बाई, दोsssध!" असं ओरडण्याचं. प्रवेशालाच टाळी पडायची पण ती माझ्या चेहऱ्यापेक्षा मोठ्या अशा भरघोस मिशांना असायची. आणखी एका नाटकात राजाचं. त्यातही राजा कमी आणि राजकन्येचा बाप जास्त अशी भूमिका होती. दोन तास हा नृपती  सिंहासनावर बसून राजकन्येच्या हट्टापुढे शरण आल्याच्या वेगवेगळ्या पोझेस घ्यायचा. एकदा मध्येच कधीतरी "कोण आहे रे तिकडे?" म्हणायचा. अभिनयाची कारकीर्द इथेच संपली.

बाबांना सिनेमाला जाण्याचा नाद नव्हता, किंबहुना तो आवडतच नसावा असं वाटे. सिनेमाला चला असं कधी त्यांच्याकडून म्हटलं गेल्याचं मला आठवत नाही. पण नाटक पाहायला जायला ते नाही म्हणायचे नाहीत. गोविंद चित्रमंदिर हे "सीझनल" नाट्यगृह. स्टेज नावाचा चौथरा, त्याभोवती झावळ्या लावून केलेलं प्रशस्त प्रेक्षागार. कोकणातील पाऊस असा की या झावळ्या कुजून जात आणि दरवर्षी मग सीझन आला की नवीन झावळ्या लावायला लागायच्या. नाटकाच्या आधीचं ते उत्साहाने भरलेलं वातावरण मला अजून आठवतं. बाहेर झावळ्या लावून, बाकडी ठेवून केलेलं जुजबी दुकान असे. तिथं सोडावॉटरच्या बाटल्या ठेवलेल्या असत. काचेच्या त्या बाटल्या, त्यांच्या गळ्यात असलेली ती निळी गोटी. उघडून देताना कुकरच्या शिट्टीसारखा आवाज होई आणि तो फसफसणारा सोडा पाहूनच तहान भागल्यासारखी वाटे. त्या सोड्याचेही दोन प्रकार. एक साधा, दुसरा लेमन. मी कधी प्यायल्याचं आठवत नाही. मागितला तर बाबा देणार नाहीत हेही माहीत होतं. बाहेरचं काही खाऊपिऊ नये, हे संस्कार असण्याचा काळ होता तो. त्या फसफसणाऱ्या सोड्यासारखीच माणसांची लगबग चालू असे. आत फोल्डिंगच्या लाकडी खुर्च्या असायच्या. धूप फिरवलेला असायचा त्याचा वास दरवळत असे. आपल्या खुर्चीवर बसलं की मग पहिल्या घंटेची प्रतीक्षा सुरू व्हायची. पण आधी सुरू व्हायच्या कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांच्या नावाच्या अनाउन्समेंटस. मग एकदा ती पहिली घंटा डावीकडून उजवीकडे, आणि उजवीकडून परत डावीकडे असं कुणीतरी वाजवत जायचं. मला आत जी गडबड चाललेली असायची त्याचं भयंकर उत्सुकतावजा आकर्षण होतं. घंटा वाजवून नाटक चालू करायला परवानगी देणारा इसम तर मला अत्यंत पॉवरफुल वाटायचा. पुढे कधीतरी आपणही हे काम करायचं असं मी मनाशी ठरवून ठेवलं होतं. मग पुढे एकदोन तास कसे जायचे कळायचं नाही. बाबांमुळेच दशावतार ही एक कोकणातील खास लोककला पाहायची संधी अनेकवेळा मिळायची. गणेशस्तवन, वेद पळवून नेणारा शंकासुर आणि मग विष्णूचे त्याचे ते युद्ध, मग विष्णूचे अवतार असा तो ठरलेला बंध. वालावलकर, मोचेमाडकर अशी गाजलेली दशावतार मंडळी गावात येत असत.तासनतास ते प्रयोग चालत.

एकूण नाटक हा जिव्हाळ्याचा विषय होता. पण मला वाटतं एखाद्याला डीफाईन करणारी व्यक्तिरेखा म्हणतात ती बाबांच्या बाबतीतली व्यक्तिरेखा म्हणजे "भाऊबंदकी" नाटकातील रामशास्त्री प्रभुण्यांची. बाबांच्या बाबतीत ती व्यक्तिरेखा केवळ त्या नाटकापुरती राहिली नाही, किंबहुना ती तेवढ्यापुरती सीमित कधी नसावीच.  त्यांचा मूळ स्वभावही त्याला साजेसाच होता. खोटं न बोलणं ही गोष्ट बरेचजण प्रयत्नपूर्वक साधू शकतात. पण त्याही पुढे जाऊन असत्याला आणि अन्यायाला विरोध करणारी मंडळी फार कमी असतात. वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होईल याची पर्वा न करता अन्यायाला विरोध करणे काय असते हे मी पाहिले आहे. माझ्या विद्यार्थी दशेत तशी फक्त दोन माणसे त्यावेळी माझ्यासमोर होती. ती म्हणजे प्राध्यापक रमेश चिटणीस आणि दुसरे बाबा. आणिबाणीच्या काळात, काही अप्रिय स्थानिक संघर्षात या दोघांनीही दाखवलेला कणखरपणा, मोडेन पण वाकणार नाही ही वृत्ती सहजासहजी येणारी नाही. सारासार विचार करता येणारी, विद्वान म्हणता येईल एवढ्या बुद्धिमत्तेची भलीभली माणसे जेव्हा सत्तेपुढे शरण जात होती तेव्हा केवळ या दोन व्यक्ती एखाद्या पहाडाप्रमाणे उभ्या होत्या. भाऊबंदकी नाटकातील ते रामशास्त्री प्रभुण्यांचं पात्र असो किंवा साक्षीदार नाटकातील तडफदार सरकारी वकिलाचं पात्र असो, ते नाटकापुरतं नव्हतं. प्रत्यक्ष जगण्यातही तेच पात्र वठलं गेलं. नाटक हे एकदोन घटकांचं, पण रामशास्त्री बाणा कायमचा.

Wednesday, June 17, 2015

नमो अॅप

तुम्ही गाडी चालवत असाल, ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, कुठे असाल, एक गोष्ट तुम्हाला सारखी चिंतित करत असेल, माझे नमो आत्ता काय करीत असतील? कुठल्या देशात वणवण फिरत असतील? शुद्ध शाकाहारी माणूस तो, जपानसारख्या देशात जेवणाचे काय करीत असेल? मेक अप, सॉरी, मेक इन इंडिया कुठवर आलंय? ते स्विस ब्यांकवाले अजून अडून बसले आहेत का? साधं कोपऱ्यावरच्या स्टेट ब्यांकेत पेन्शन घ्यायला गेलं तर जिवंत असल्याचा दाखला मागतात, एक नवा पैसा देत नाहीत, ही तर स्विस ब्यांक आहे. फ़ॉरेनच्या सगळ्याच गोष्टी भारी असतात. पण नमोनी त्यांनासुद्धा झापलं. बऱ्या बोलाने कुणाची कुणाची खाती आहेत ते सांगा असं नुसतं म्हटलं, स्विस ब्यांकांनी घाबरून सगळ्यांची फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दिली म्हणे. मग पुढे नमोंनी त्यांचं काय केलं? एकेकाला उभा आडवा झोडपून सगळा काळा पैसा वसूल केला असणार याची खात्री आहे. होय ना नमो? अरेच्या? उत्तर द्यायचं सोडून विमानात बसून कुठे गेले एकदम? विमानात नीट सीट मिळाली की नाही, ब्यागा वजनात बसल्या की नाही, स्पेशल रिक्वेस्ट म्हणून शाकाहारी जेवण सांगितले होते ते मिळाले की नाही या प्रवासातल्या चिंता आपल्याला तशा नमोंनाही असणार. नेहमी शेजारी असणारे अमितभाई साईझचे लोक विमानातसुद्धा शेजारी आले तर आपला चेंगरून दहीवडा होणार त्याबद्दल चिंता नमोंनाही असणार. या सगळ्याबद्दल चिंता (काही जणांना कुतूहल) आपल्याला वाटत असते. आपण या माहितीसाठी धडपडत असतो आणि इथे मीडिया नमोंबद्दल काहीच छापत नाही, टीव्हीवर दाखवत नाहीत. नमो तर पडले प्रसिद्धीपरांग्मुख. आपणहून काही सांगायचे नाहीत आपल्याबद्दल छापायला. लोकसभेत एवढा प्रचार करावा लागला, पण प्रसिद्धीमाध्यमांकडे काही गेले नाहीत. असं सगळं असल्यामुळे लोकांना काहीच माहिती मिळत नव्हती. लोकांची काळजी, आत्मीयता, कळकळ दिवसेंदिवस वाढत चालली होती.  सर्व स्तरातून विविध अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

"वी कान्ट गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी!" - सर्वसामान्य जनता
"वी मस्ट गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी!" - राष्ट्रवादी
"मस्ट वी गेट इनफ ऑफ मिस्टर मोदी?" - शिवसेना
"गेट ऑफ वी, मिस्टर मोदी!" - गांधी परिवार
"इनफ! वी मस्ट गेट मिस्टर मोदी!" - कॉंग्रेस
"आय डोंट गेट मिस्टर मोदी…:-(" - पप्पू

अशा मागण्या वाढत चालल्या होत्या. म्हणून मग नमो अॅप बाजारात आले आहे. आता हे अॅप डाऊनलोड करा आणि नुसत्या आपल्या टिचकीसरशी नमो तुमच्या मोबाईलमध्ये अवतरतील. नव्हे, ते नेहमी तुमच्या मोबाईलमध्येच असतील, आणि "केम छो भाय" असं म्हणत स्क्रीनवर येतील आणि स्वत: आपल्याबद्दल माहिती सांगतील. आम्ही त्याचे बेटा व्हर्शन डाऊनलोड करून पहायचे ठरवले. नमनालाच ठेच लागली. अॅप फ्री नव्हते. पाचशे रुपये लागणार होते. मरू द्या म्हणून अॅपस्टोअर क्लोज करायला गेलो तर "वेट! बाय नाऊ अॅण्ड गेट फ्री गेम!" अशी जाहिरात आली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून क्लोज करायला गेलो तर क्लोजच होत नव्हते. आणि फोनचे दुसरे कुठलेही अॅप ओपन होत नव्हते. मग चडफडत शेवटी विकत घेतले. फ्री गेम काय मिळतो आहे बघूया तरी असे म्हणून पाहिले तर "क्लिक हिअर फ़ॉर युअर फ्री गेम" असे बटन आले. तिथे क्लिक केलं तर थेट "आप"ची वेबसाईट ओपन होत होती. तिथे "पंच युअर लेफ्टनंट गवर्नर" असा गेम सुरू होता. फ्रीमध्ये वाटेल तेवढे पंच करा. नंतर निवांत खेळू म्हणून तो बंद करून परत नमो अॅपमध्ये आलो. होमस्क्रीनवर साहजिकच नमोंची साजिरी गोजिरी छबी होती. पण तीच तीच बघून कंटाळा येणार हे ओळखून वेगवेगळ्या छब्या निवडायची सोय होती. चेहरा तोच, फक्त डोक्यावर पगडी वेगळी. पुणेरी, पंजाबी, एक गुजराती "श्रीनाथजी" स्टाईलची, राजस्थानी,  काठियावाडी, एक छान मोत्याचा तुरा असलेली राजेशाही, मेक्सिकन सोम्ब्रेरो असे अनेक चॉइसेस होते. संघाची काळी टोपीपण होती. पण ती क्लिक केली तर ती अॅडव्हान्स्ड लेव्हल यूजरसाठी आहे असे कळले. किमान सहा महिने अॅप वापरल्याशिवाय ती लेव्हल अनलॉक होणार नाही असा मेसेज आला. मग मी आसामी किंवा नागालॅंडची दिसणारी टोपी निवडली. तिला हॉर्नबिल, मराठीत ज्याला धनेश म्हणतात त्या पक्षाची अख्खी चोचच होती. हा पक्षी ओरडू लागला म्हणजे जंगलातील सर्व प्राणी स्वत:चे ओरडणे थांबवून स्वस्थ बसतात. नमोंच्या डोक्यावर ही चोच शोभून दिसत होती. छबी अॅनिमेटेड होती! सेट केल्यावर ती चोच उघडून धनेश पक्ष्याची गगनभेदी आरोळी ऐकू आली, पाठोपाठ नमोंच्या छबीने,"मैं प्रधान मंत्री नही हुं, प्रधान सेवक हुं" हे वाक्य तर्जनी माझ्याकडे रोखत एक डोळा मारत म्हटलेले दिसले.


टोपी सिलेक्ट करण्यात जवळजवळ अर्धा तास गेला. तीनशेच्या वर टोप्या असलेली लायब्ररी होती ती! प्रत्येक स्वदेश, परदेश दौऱ्यानंतर लायब्ररी अपडेट होऊन त्यात आणखी टोप्या येतील असे कळले. शिवाय आपला फोटो अपलोड करून आपल्याला हव्या त्या टोपीतील नमोंच्या छबीबरोबर आपला फोटो फोटोशॉप करून देण्याचीही सोय होती. माझ्या दृष्टीने हे अॅप इथेच यशस्वी झाले होते. पाचशे रुपये देताना आपण एवढे काचकूच का करत होतो असे वाटले. मग इतर काय सोयी आहेत ते पाहू लागलो. "इंटरअॅक्ट विथ पीएम" ! वाह! स्वत: नमोंशी बातचीत? घाई घाईने "नमस्कार माननीय प्रधानमंत्री!" असे टाइप केले. लगेच उत्तर आले! "नमश्कार! ये प्रधान सेवक आपकी क्या सेवा कर सकता है?" उगाच एवढ्या महत्वाच्या व्यक्तीचा वेळ का घालवा, मुद्द्यालाच हात घातला. "सरजी, वो स्विस ब्यांकवाले मान तो गये, आगेका क्रियाकर्म कब होगा?". तर "महोदय, क्रिप्या प्रतीक्षा करें, आप कतार में हैं. प्रतीक्षा का समय लगभग चार घंटे और पैन्तालीस मिनट." असा मेसेज आला. बरोबर आहे. एकटा माणूस तरी किती जणांशी एकाच वेळी बोलेल? सगळेच लेकाचे हाच प्रश्न विचारत असतील. "प्रतीक्षा करते करते प्रधानमंत्रीजीके चुने हुए भाषण सुने" असा मेसेज मिळाला. आणि हो नाहीची वाट न पाहताच तडक नमोंचे एक भाषण लागले. ही म्हणजे पर्वणीच! खजिनाच सापडला म्हणायचा! काय ते अप्रतिम वक्तृत्व, ती ओघवती शैली! विरोधकांच्या मर्मावर वार करून त्यांना भुईसपाट करण्याची ती हातोटी हे तर त्यातून दिसून येत होतेच, पण त्याचबरोबर सर्वसमावेशक राजकारण करण्याचे वचन देऊन, कॉंग्रेसमधील भ्रष्टाचाराचे आरोप सहन करून करून थकल्या भागलेल्यांना सामावून घेण्याची त्यांची दिलदार वृत्तीही दिसून येत होती. एकापेक्षा एक सरस अशी ती भाषणे ऐकता ऐकता कधी झोप लागली ते कळले नाही. जाग आली तेव्हा फोनची बॅटरी मृत्यूपंथाला लागली होती. तरी चटकन आपल्या त्या विचारलेल्या प्रश्नाचं काय झालं ते पाहावं म्हणून परत "इंटरअॅक्ट" मध्ये घुसलो तर स्क्रीन ब्ल्यांक झाला होता. नो इंटरनेट कनेक्शन म्हणे. पाच सहा तासात या अॅपने माझा ५ गिगाबाईटचा डेटा फस्त केला होता. पण पर्वा नाही. पुन्हा विकत घेतला डेटा पॅक. आपण भाषणं काय चुकवणार नाही बुवा. 

Tuesday, June 16, 2015

सच्चा इमानी

मी एक सच्चा मुस्लिम आहे हे वचन साक्षी महाराजांच्या मुखातून आले आणि प्रवचनाला जमलेल्या सर्व भक्त मंडळींच्या मुखातून "साधु! साधु!" असे उद्गार बाहेर पडले. काही मंडळींनी तिथेच फात्या पढायला सुरुवात केली. आणि अहो आश्चर्यम, जरी ते फात्या पढत होते तरी आमच्या कानी मात्र "जय जय राम क्रिष्ण हारी" असेच शब्द येत होते. रंध्रारंध्रात सर्वधर्मसमभाव भिनलेला असणे म्हणतात ते हेच काय? या असल्या गोष्टी भिनण्यासाठी बरोबर रंध्रं कशी शोधतात कुणास ठाऊक. महाराजांचा मी काही मर्जीतला भक्त नव्हे, परंतु आमचा परममित्र मोरू उर्फ मोरेश्वर मात्र आहे.  गेली अनेक वर्षे तो महाराजांच्या मठात नियमित जात असतो. मंगळवारी प्रसादाला मिळणारा शेंगदाण्याचा लाडू, बुधवारी छान केळी घालून केलेला शिरा, गुरुवारी साबुदाण्याची खिचडी, शुक्रवारी मुगाची खिचडी, शनिवारची सात्विक लापशी, रविवारी महाप्रसादाचा शुद्ध तुपातील मोतीचुराचा लाडू अशा आध्यात्मिक अनुभवांना मोरू अजिबात सोडत नाही. नाही म्हणायला दर सोमवारी आत्मशुद्धी म्हणून मठात शिवांबूप्राशन असते तो दिवस मात्र कटाक्षाने टाळतो. महाराजांच्या तीक्ष्ण नजरेतून ही बाब सुटलेली नाही. मोरोबा, आपली आत्मशुद्धी अशी साचवून ठेवतो आहेस हे चांगले नाही अशा शब्दांत त्यांनी त्याची कानउघाडणीही केली आहे. आजही गुरुवार म्हणून तो माझ्याबरोबर आला होता. सर्वधर्मसमभावाचा प्राथमिक उन्माद (नॉन इंडियन रेसिडंटस साठी मराठीत भाषांतर - "रश") ओसरल्यावर मंडळी डोळे उघडून विचार करू लागली. "आधी कसं काही जाणवलं नाही?" असेही एक जण म्हणाला. इतके दिवस आपण नमाज पढत होतो की प्रणाम करीत होतो? वदनी कवळ घेत होतो की बिस्मिल्ला करत होतो? मीरा, माखन आणि कन्हैयामध्ये असे एकदम चांद, इश्क आणि शराब कसे आले? आपण सर्वधर्मसमभावी वगैरे आहोत आणि इतके दिवस आपल्याला त्याची अजिबात जाणीव नव्हती की काय अशी शंका येऊन काही जण अस्वस्थही झाले. मीही अस्वस्थ झालो. रोज आंघोळ कर असं आई कानीकपाळी ओरडून सांगत असे तरी आठवड्यातून कधीतरी आंघोळ करणे हेही त्याचाच एक भाग आहे की काय? अर्थात आंघोळ करून काही दिव्य प्रभावळ वगैरे प्राप्त होत नव्हतीच. "गळ्यात आंघोळ केली आहे अशी पाटी लावत जा" असंही आई म्हणायची. पण "जनहितार्थ जारी" म्हणून आंघोळ करणं भाग होतं. महाराजांच्या त्या सगुण मूर्तीकडे नेहमीच पाहिले जायचे पण कीर्तन चालू असताना देवळात वर तुळईला टांगलेल्या रंगीत हंडीवर जशी शून्यात नजर लावून बसणे होते तसेच पाहिले जायचे. पण आज महाराजांच्या त्या घोषणेनंतर त्यांना निरखून पाहिले. आंघोळीच्या बाबतीत आम्ही महाराजांचे पाईक नसून महाराजच आमचे अनुयायी आहेत असे वाटू लागले.

महाराज पुढे बोलू लागले,"हिंदू धर्मात काहीही करण्याची मुभा आहे. हिंदू लोक अल्लाचे नाव घेऊ शकतात, पण मुसलमान रामाचे नाव घेतील काय?" पाइण्ट बिनतोड होता. आमच्या गावात अनेक मुसलमान गणपतीच्या देवळात जातात, काहींनी आपल्या मुलाचे नावही गणेश वगैरे ठेवले आहे, पण एकही लेकाचा रामाच्या देवळात जाताना दिसत नाही. "इमान!" महाराज गरजले. आता हे काय मध्येच असा विचार आमच्या मनात येतो आहे तोच ते पुन्हा गरजले. "इमान! म्हणजे सच्चेपणा, सचोटी! ज्याच्या कडे इमान तो खरा मुसलमान!" आणि विजयी मुद्रेने आमच्याकडे पाहू लागले. तो आनंद घोषणेचा होता की यमक जुळून आले त्याचा होता हे कळत नव्हते. तेवढ्यात मोरू ओरडला,"जय जवान!" त्यासरशी काही त्याच्यासारख्याच गाफील लोकांनी "जय किसान!" अशी साथ दिली. महाराज दचकले आणि मग चिडून मोरूकडे पाहू लागले. मीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तर खांदे उडवून थंडपणे मला म्हणतो,"काय? यमक जुळलं म्हणून म्हटलं. घोषणाच करायची होती ना?" मग मी त्याला "कळत नाही तर चूप बस" असे झापले. मोरू निर्विकार होता. "ते इमान माझ्यात आहे. इमानात मी आहे. मी म्हणजे इमान, इमान म्हणजे मी. असे आमचे अद्वैत आहे. म्हणूनच सच्चा मुसलमान मीच. तुम्ही मला नमाज पढायला काय सांगता? मी तो घालीनच. पण तुम्ही सूर्यनमस्कार घालाल काय?" मला काही कळेना, आज महाराज असे का बडबडत आहेत. आमच्यापैकी तरी कुणी नमाजबिमाज पढून दाखवा असे काही त्यांना सांगितले नव्हते. त्यांनी सूर्यनमस्कार हा शब्द उच्चारलेला ऐकला आणि मी सावध झालो. मोरूला हळूच म्हणालो,"मोऱ्या, आज चिन्हं वेगळी दिसताहेत रे बाबा. सूर्यनमस्कार घालायला लावणार बहुधा आज. चल, सटकूया." तशी मला म्हणतो,"खुळा की काय? आज गुरुवार आहे. त्रास सोस जरा." तिकडे महाराज सुरू होते. "सच्चा हिंदू हा मनाने सहिष्णु असतो. त्याला नमाज घालायला सांगितला तर तो नमाज घालील. गुरुद्वारात प्रवेश करताना शीख बांधवांच्या नियमानुसार मस्तक आच्छादित ठेवील. चर्चमध्ये गेला तर वेदीवर गुढघे टेकून प्रभू येशूच्या मूर्तीसमोर नतमस्तक होईल. हे तुम्हीसुद्धा करता. हो की नाही?" त्यांनी प्रश्न विचारला आणि माझ्याकडे पाहून उत्तराची वाट पाहू लागले. आम्ही भक्त एकमेकांकडे पाहू लागलो. मी म्हणालो,"महाराज, चर्च, मशीद आतून कसे दिसतात हे मी अमर अकबर अॅंथनी पिक्चरमध्ये पाहिले होते." मोरू म्हणाला,"मीही सुवर्णमंदिरात एकदा गेलो होतो. काश्मीरला जाताना अमृतसरवरूनच जावे लागते. तिथल्यासारखा प्रसादाचा शिरा कुठेच खाल्ला नाहीय मी. हातात वाढला तर बोटांमधून तूप अक्षरश: ओघळत होते." मोऱ्या अगदी यूसलेस आहे. महाराज स्तब्ध झाले,"मोरोबा, किती शरीराचे चोचले पुरवशील? अरे सुवर्णमंदिरात तुला सहिष्णुतेने गहिवरून आले नाही? पिक्चरमध्ये पाहून का होईना मशिदीतील ते धीर गंभीर वातावरण पाहून तुम्हाला सर्वधर्मसमभावाचे रोमांच फुटत नाहीत? जर सच्चे इमानी असाल तर हे सर्व एकसमयावच्छेदेकरून व्हायला हवे."

आज गुरुवार, छान साबुदाण्याची खिचडी मिळणार अशा स्वप्नात मोरू बसला होता तोच महाराजांनी घोषणा केली,"भक्तजनहो, कोणत्याही गोष्टीची शरीराला सवय होणे वाईटच. आत्मपीडन हा आत्ममुक्तीचा मार्ग आहे. शरीराला सुखाची सवय करणे म्हणजे या आत्म्याला या शरीररूपी पिंजऱ्याची चटक लावणे. म्हणजेच या मायेच्या कर्दमात त्याला लोळत ठेवणे. शरीराला सुखाने बसू देऊ नका. सवयीचा गुलाम बनवून ठेवू नका. मी तर म्हणतो आजपासूनच त्याची सुरुवात करा. आज तुमचे शरीर तुमच्याकडे काय मागते आहे? मोरोबा? असे तंद्रीत आहात म्हणून तुम्हांसच विचारतो." मोरू गडबडून उत्तरला,"साबुदाण्याची खिचडी!" महाराजांनी त्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाले,"अस्सं. दोष तुझा नाही मोरोबा. आजवरच्या सवयीचा आहे. ठीक आहे. आज सोमवार आहे असे समज आणि आत्मशुद्धी कर." असे म्हणून त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका आश्रमसेवकास "मोरोबांसाठी शिवांबूची व्यवस्था करा" असे सांगितले. त्या नतद्रष्टानेही जाताना मोरोबाकडे पाहून डोळे मिचकावत,"काळजी करू नका, पहिल्या धारेची आणतो" असे सांगितले. महानालायक इसम.

Friday, June 12, 2015

भ्रष्टाचारी कोण?

चला, आम आदमी खरंच आम आदमी निघाला. तो निघणारच होता. कायदेकानू, क्लिष्ट नियम, संहिता वगैरे लागू करून भ्रष्टाचार निपटता येईल असे जे भ्रामक स्वप्न केजरीवाल चमूने दिले होते ते स्वप्नच राहणार होते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. बहुतेक सरकारी बाबूंचे जग कायदे, नियम, जी. आर., सर्क्युलर्स , वेतनश्रेणी, कारवाई या शब्दांपलीकडे नसते. केजरीवालही याला अपवाद ठरले नाहीत. त्या शब्दांतून त्यांनी नव्या समाजाची उभारणी सुरू केली. अर्थात केजरीवाल जेव्हा या नियमांच्या पाट्या वाहत होते तेव्हा सामान्य जनता नव्या बिल्डींगची स्ल्याब पडते आहे अशा कुतूहलाने ते पाहत होती. परंतु तसं असलं तरी खऱ्या आम आदमीला त्याची भुरळ पडली, आणि सारासार विचारशक्ती गमावून या मृगजळामागे तो धावला. ज्या प्रत्येकाने हे स्वप्न पाहिले त्याची मानसिकता बहुधा भ्रष्टाचार हा आपण सोडून सर्व इतर करतात अशी असावी. बदलाची सुरुवात आपल्यापासून असते हे साधे सूत्र लक्षात आले असते तर आम आदमी पार्टीला हा फार्स करून सत्तेत यायला कारण मिळाले नसते. परंतु आपल्याला शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यायला हवा असतो, आपण नुसते झेंडे लावून जयंती साजरी करायची असते. नेमके हेच या भामट्याने हेरले. यात स्वत: केजरीवाल यांचे कदाचित पैसा मिळवणे हे ध्येय नसेल, पण अहंकारी मनुष्याला स्वत:चा अहंकार कुरवाळला जाणे याखेरीज कसलेही सुख मोठे वाटत नाही. आपल्याला कसलाही मोह नाही, आपण भ्रष्टाचाराच्या पलीकडे गेलो आहोत, जणू निर्वाणप्राप्तीच झाली आहे असे वाटणे हेही अहंकाराचेच दुसरे रूप. बरं, केजरीवाल असतील स्वत: निर्वाणाप्रत पोचलेले. पण त्यांच्याभोवतालच्या बाकीच्या गणंगांचं काय? असे धुतलेले तांदूळ कुठून येणार होते?

भ्रष्टाचार हा काही पैशापुरता नसतो. ती मानसिकता आहे. आपलं जगणं आहे त्यापेक्षा सुखकर करणं ही मूलभूत इच्छा केवळ माणूस या प्राण्याची असते. तशी कमी अधिक प्रमाणात इतर सस्तन प्राण्यात ती दिसून येते, पण ती गरज केवळ त्या क्षणापुरती असते. इतर प्राणी पुढील अन्न कधी मिळेल याची चिंता करत अन्नाचा साठा करून ठेवत नाहीत. सौ. सिंहिणबाईंनी श्रीयुत सिंहसाहेबांना अवेळी उठवून "कोवळे हरीण खावेसे वाटते" असे म्हटल्याचे ऐकिवात नाही, आणि असलेच तर सिंहसाहेबांना कधी तशी धावपळ करताना पाहिल्याचे ऐकण्यात नाही. प्राणी आहे तो क्षण जगतात. वेळ आली की मरून जातात. कालची हुरहूर नाही, उद्याची चिंता नाही. आहे ती आजची, आत्ताची धडपड. पण ते जगणेही कसे, पुरेपूर. उद्याच्या चिंतेने डिप्रेशन घेऊन बसायचे नाही. भय, मैथुन आणि निद्रा यातून बाहेर आला तो मनुष्यप्राणी. तेही केवळ योगायोगाने. आपले मूळ खरं तर चिचुंद्री या प्राण्यापर्यंत जाते. निरुपद्रवी. मेंदू एवढा छोटा की केवळ मूलभूत नैसर्गिक गरजा भागतील एवढीच त्याची क्षमता. कधी काळी झाडावर वास्तव्य करणारा हा प्राणी, डायनासोर नामशेष झाल्यानंतर या प्राण्याला जमिनीवर कुणी शत्रू उरला नाही. म्हणून हा खाली उतरला. पुरेसे अन्न, वातावरणात अचानक झालेली प्राणवायूची वाढ हे सगळं जुळून आलं आणि मेंदूची वाढ होऊ लागली. परंतु अन्न ही मूलभूत गरज मेंदूच्या एका कोपऱ्यात अत्यंत प्रबळ अशी ज्वलंत राहिली. मेंदूची शक्ती वाढली आणि ती स्वाभाविकपणे अन्नाच्या गरजेसाठी वापरली जाऊ लागली. ही सुरुवात. तिथून जे आपण निघालो ते आज आपला मेंदू केवळ त्याच गरजेसाठी पण विकृतीकडे झुकेल अशा हव्यासाने वापरू लागलो आहोत. खोटं बोलणं - जगण्याचा एक नेहमीचा भाग झाला आहे. आपण म्हणतो कधी खोटं बोलू नये. पण आता असं सिद्ध झालं आहे, की ही गोष्टही आपण उत्क्रांतीबरोबर घेऊन आलो आहोत. खोटं बोलणं, धोका देणं, विश्वासघात करणं "फायद्याचं" असतं असा आपला प्रवास झाला आहे. हीच मानसिकता पुढे भ्रष्टाचाराच्या रूपात आपल्यासमोर आली आहे. पण ही विकृती आहे असं ठरवणारे आपण कोण? आपणच नियम बनवायचे, आपणच सुसंस्कृत काय ते ठरवायचं. मेंदूच्या उत्क्रांती आणि परिस्थितीनुरूप झालेल्या बदलात बराचसा परस्परविरोधही आहे. खोटं बोलणं हे चांगलं नाही हे जाणवतं, पण वेळ आल्यास खोटं बोललं जातं, मुख्यत: फायद्यासाठी. भ्रष्टाचाराचं मूळ इथे आहे. आपल्यातच आहे, आपली ज्या पद्धतीने उत्क्रांती झाली त्यात आहे. आपण कधीच खोटं बोललो नाही अशी हमी कोण देऊ शकेल? जाहीररीत्या विचारलं आणि जाहीररीत्या उत्तर द्यायचं असेल तर सगळेच हरिश्चंद्राचे अवतार निघतील. आणि तेच हा मुद्दा सिद्ध करून जाईल.  
 
मी आपल्यात असलेल्या या परस्परविरोधाबद्दल नेहमीच लिहीत आलो आहे. या विसंगतीतून आणि त्याचबरोबर जी बुद्धिमत्ता आपल्याला प्राप्त झाली आहे त्यानेच आपल्यासमोर या समस्या निर्माण झाल्या आहेत. आपण हा विरोधाभास ओळखून जाणीवपूर्वक प्रयत्न परस्परविरोध कमी करायचे ठरवले तर बदल घडेल. प्रत्येकात तो बदल त्याच्यापुरता असेल, पण बहुतांशी लोकांनी आपल्यापुरते असे करायचे ठरवले तर समाजाची वृत्ती आतूनच बदलेल. शेवटी समाजसुधारणा म्हणजे तरी काय? कुणीतरी व्याख्यानं देऊन, प्रवचनं देऊन बदलायचं असतं तर आत्तापर्यंत केव्हाच बदललो असतो. गाडगेबाबांनी आयुष्य वेचलं हाती खराटा घेऊन. काय झालं? त्यांच्यावर पुस्तकं लिहिली गेली, कथा निर्माण झाल्या. ती वाचून झाल्यावर अत्यंत भक्तिभावानं आपण पुन्हा ग्यालरीतून कचरा खुशाल खाली टाकू लागलो. आजही आपल्याला गुड मॉर्निंग पथकं तयार करावी लागताहेत. गांधीजींनी भले सत्याग्रहाचा मंत्र दिला. आज आपण असत्याचा आग्रह धरून सत्याग्रह करतो आहोत, सगळेच खातात म्हणून आपण दुर्लक्ष करतो. थोडक्यात आपल्या देशात भले भले महात्मे होऊन गेले, आपली मानसिक प्रगती शून्य. कमळाच्या पानावरील पाण्याप्रमाणे या महात्म्यांचे सर्व तत्वज्ञान आपल्या अंगावरून ओघळून गेले. अंगाला एक थेंबही चिकटून राहिला नाही. याचा अर्थ कुणी सांगून बदल घडत नाही. त्यासाठी सर्वांनाच तसे वाटावे लागते. सर्वांना आपली नैसर्गिक उत्क्रांतीजन्य जडणघडण समजून घेऊन अंतर्गत विरोधाभासाला तोंड द्यावे लागेल. मोह, इच्छा, मत्सर इत्यादि भावना काही सुटणार नाहीत, पण त्या सुटणार नाहीत हे समजून किमान दुसऱ्याला आपल्याइतकाच जगण्याचा अधिकार आहे हे मान्य केले, दुसऱ्याला आपल्याइतकंच मानाने वागवले पाहिजे हे लक्षात आले तर नियम, कायदे आपोआपच पाळले जातील. शेवटी ते आहेत आपणच आपणासाठी केलेले. एखादे गाढव रस्त्यावरून जाताना  मध्येच अचानक थांबले तर आपण त्याने नियमाचा भंग केला असे म्हणत नाही. त्याच्याकडून ती अपेक्षा नाही. अपेक्षा माणसांनी ते करू नये अशी असते. आपण तेही करत नाही हा भाग वेगळा. असो, आजचं लेखन केजरीवालवरून सुरू होऊन गाढवावर थांबलं हा एक योगायोग असं मनात येत आहे. पण त्याने गाढवावर अन्याय होतो आहे असंही वाटतं आहे. मानवाच्या उत्क्रांतीत गाढवाचा काहीच हातभार नाही.