कोकणाबद्दल विचार करू लागलो की मला "डान्सेस विथ वुल्व्हज" या केविन कोस्टनरच्या सिनेमाची आठवण येते. तसंच काहीसं माझ्या वडिलांचं झालं असावं. कृष्णेकाठच्या अस्सल लोण्यासारख्या मऊ काळ्याभोर मातीत जन्मलेला देह,
माई घाटावर हुंदडायचं, पुरात आयर्विन पुलावरून त्या लालभडक खवळलेल्या
पाण्यात बिनधास्त उडी टाकायची आणि तडक हरिपुराच्या काठावर निघायचं. त्या
पाण्यात काय काय असायचं. बाभळीचे काटेवाल्या फांद्याफांदोट्या, काही वेळा
चक्क अक्खी झाडं, घाबरलेले आणि म्हणूनच अत्यंत बिथरलेले नाग त्यावर चढून
बसलेले असं सगळं विश्व वाहत आलेलं, मध्येच वळणावर निर्माण झालेले क्षणात
तळाशी घेऊन जाणारे भोवरे. अशा सगळ्यांशी टक्कर देत पाण्याशी झुंजत
जाण्यासाठी जी एक बेभान वृत्ती लागते ते कृष्णेच्या पाण्यानं पुरेपूर
दिलेली. सकस काळ्या मातीनं प्रदेशाला सुपीकता दिलेली. दूध दुभतं भरपूर.
दिवसभर शेतांतून, उसाच्या वावरातून फिरावं, सूर पारंब्या खेळाव्यात, भूक लागली की तिथल्याच शेतातील उसाचं कांडकं उपसून चोखावं, हातावर
जोंधळ्याची कणसं चुरावीत, तशीच कच्ची हाणावीत आणि पुन्हा उनाडावं असा
दिवसभराचा कार्यक्रम असावा. कृष्णेकाठची गावं भावुक आणि भाविकही, त्यातून राजाश्रय
लाभलेली. नदीवर उत्तम घाट बांधलेले, काठावर ताशीव काळ्या दगडात बांधलेली
मजबूत पण कमालीची कलाकुसर केलेली देवळं. देवळाभोवती डेरेदार वृक्ष.
उन्हातान्हात पांथस्थानं यावं आणि त्यांच्या गार सावलीखाली घटकाभर बसावं.
देवाचा सहवास, दर्शनाला येणाऱ्याजाणाऱ्यांची संथ येजा सगळंच कसं निवांत.
कुणालाच घाई नसे. दिवसभर मग असं उनाडून झालं की मग घरी यावं, हातपाय धुवून
शुभंकरोति म्हणावी, संध्या आचमनं करावीत, वडलांच्या करारी नजरेखाली जेवावं
आणि गुडूप झोपून जावं ते दुसऱ्या दिवशी पहाटे उठून पुन्हा हे सगळं नव्यानं
अनुभवण्यासाठी. पुढं मग थोडंसं मोठं झाल्यावर शाखेत जाणं सुरू झालं असावं.
शाखेत घडलेले संस्कार, तिथं घडलेला विद्वान माणसांचा सहवास, यांनी कदाचित
मग डोळे उघडून दिसत असलेल्या क्षितिजापलीकडे काय असेल याचा विचार सुरू झाला असेल. गावकूस ओलांडून जाणं म्हणजे सीमोल्लंघन म्हणण्याचा काळ तो. आईवडिलांनाही आपली मुलेबाळे आपल्याचबरोबर रहावीत अशीच अपेक्षा असायची. बहुतांशी मुले गाव सोडून जात नसतही. परंतु शाखेमध्ये नव्या विचारांचा वारा आला असावा. त्याने जग विस्तारले असावे. आणि मग तो लेफ्टनंट जॉन डनबार जसा वेस्टर्न फ्रंटवर जायला निघाला तसेच माझे वडीलही कोकणात जायला निघाले असावेत.
कोकणात स्वभाव निराळे, पद्धती वेगळ्या. घाटावरचा अघळपघळपणा कोकणात नाही. सगळे कसे नीट नेटके, सुबक, स्वच्छ. याचा अर्थ अप्पलपोटेपणा नव्हे तर ती स्वयंपूर्णतेकडे झुकणारी वृत्ती म्हणायची. घरात साखर संपली म्हणून कोकणी माणूस आपली कुपाटी ओलांडून शेजाऱ्याच्या खळ्यात उभा राहायचा नाही. डोक्यावर इरले घेऊन तडक पाच दहा मैल चालत तालुक्याच्या बाजारात जाईल. अर्थात ही सर्व कल्पित गोष्ट. नेटकेपणामध्ये अचानक घरातील साखर संपली हे संभवत नाही. कोकणी माणूस तसा कुणाला चटकन मिठी मारणार नाही. ते सगळं घाटावर. तिकडे "वाईच तंबाकू काड की रं मर्दा" असं म्हणून चावडीवर अथवा पारावर बसलेल्या मंडळींशी संवाद करता येतो. मग तंबाकूवरून सुरू झालेली गप्पांची गाडी पुढं "पावणं, पैल्यांदाच आलाय न्हवं आमच्या गावात, आता काय ज्येवन केल्याशिवाय आमी काय सोडत न्हाई तुमाला" इथवर येते. अशा वातावरणातून कोकणात आल्यावर,"खंयसून आयल्यात? बदली होवन की काय? तरी म्हणा होतो शाळेतलो मास्तर दिसा नाय हल्ली. बरे हल्ली सगळे मास्तर घाटावरसून येतंत ते? काय समाजना नाय. आमचे लोक चलले हुम्बयक. मगे मास्तर भायेरसून हाडूक लागात नाय तर काय!" असे शब्द कानावर पडले असण्याची शक्यता बरीच आहे. ते ऐकून नवीन नवीन कोकणात पाऊल टाकलेल्या माझ्या वडिलांना थोडंसं दडपणही आलं असणार. इथं घरंही कशी एकमेकांपासून अंतर राखून असल्यासारखी. धुक्यात ध्यानस्थ बसलेला तो नरेंद्र डोंगर. त्याला कधी निळसर छटा यायची तर कधी करडी. सकाळी धुकं. चोहोबाजूनं डोंगर असल्यानं सूर्याचं दर्शनही उशिरा व्हायचं. कुक्कुटकोम्ब्याचे होल्यांचे हुंकार, डोंगरात फाटी आणायला गेलेल्यांचे कुकारे, सुरंगीचा मंद वास, त्यात बोंडूंचा वास मिसळलेला. पाऊसही असा पडायचा की बस. डोंगरात गाज सुरू झाली की दोन मिनिटात ताज्या दमाच्या शिलेदारांची पलटण शत्रूवर तुटून पडावी असा बरसत यायचा. कौलारू घरं ती. तो तडतड ताशा कौलावर सुरू झाला की ऐकत राहावंसं वाटायचं. रात्री त्या ताशातच कधी झोप लागली ते कळायचं नाही. सकाळी उठून बाहेर यावं तर त्या पावसानं दम घेतलेला असायचा. सगळीकडे कसं लख्ख असायचं. पायाला चिखल म्हणून कधी लागायचा नाही. घाटावर पावसात बाहेर पडणं म्हणजे धोतरा प्यांटीवर मागून चिखलाची नक्षी काढून घेणं. इथं अगदी अनवाणी सगळीकडे फिरावं, तळपाय श्रीकृष्णाच्या त्या लालबुंद नितळ अंगठ्यासारखा राहायचा. हे सगळं वातावरण नवीन होतं. देऊळ म्हटलं की नदीच्या घाटाची सवय. इथे देवळंही शांत, निर्विकार साधूसारखी. युगानुयुगे समाधिस्थ दिसणारी. वडिलांना हे वेस्टर्न फ्रंटिअर गूढरम्यच वाटलं असेल. सभोवती अपरंपार सृष्टीसौंदर्य पण तिथे राहणाऱ्या माणसाच्या स्वभावाचा थांग न लागणे अशा मन:स्थितीत तो जॉन डनबार पडला होता तसेच त्यांचेही झाले असेल. मनाचा हिय्या करून त्यांनी तळ ठोकला असेल. आता या भूमीशी आपले नाते, हीच आपली कर्मभूमी, हीच आपली माणसे काय वाटेल ते होवो असेच त्यांनी मनाशी ठरवले असेल.
भूमी अपरिचित जरी असली, हळूहळू परिचित होऊ लागली. अवखळ पाऊलवाटा अवगत होऊ लागल्या. घाटावरच्या सरळसोट वाटेची सवय असलेली पावले आता चढाव उताराला सरावली. अंधारात सहजगत्या वावरू लागली. प्रथम प्रथम कानाला विचित्र वाटलेले मालवणी हेल आता कळू लागले. चेहरा अत्यंत निरागस ठेवून सानुनासिक स्वरात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चेष्टामस्करी कळू लागल्या. सांगलीकोल्हापूर भागात भाषेवर कानडी आघात भरपूर. शुद्ध मराठी बोलायचा प्रयत्न जरी केला तरी तो बाज काही लपत नाही. कोकणात प्रथमच हा बाज ऐकू आल्यावर त्याची थोडी थट्टाही झाली असेल. ती मस्करी खेळकरपणे सहन करून त्यांच्याबरोबर वडीलही खळखळून हसले असतील, नुसते हसलेच नसतील तर स्वत:च घाटावरच्या भाषेच्या गमतीजमती त्यांना ऐकवल्या असतील. आणि तिथेच सूर जुळले असतील. मला अजून लहानपणीच्या काही गमती आठवतात. बाबा अस्सल घाटी गावरान भाषेत इंग्लिश बोलून दाखवत. "रामा वोक अप इन द मॉर्निंग अँड वेंट टू द फिल्ड. वर्क्ड देअर फ़ॉर होल डे अँड केम ब्याक. ऑन द वे, ही सॉ पांडा. ही कॉल्ड पांडा,"ए पांडा, कम हिअर. शिट. ड्रॉ सम टोब्याको. लाईम इज? नो? ह्यांड टू युअर मदर लेका!" असला नकलाखोर गमती स्वभाव असल्यावर मित्रमंडळी जुळायला वेळ लागत नाही. इंग्रजीमध्ये "ब्रेकिंग द आईस" ज्याला म्हणतात त्यासाठी ते पुरेसे होते. जॉन डनबारनेही "सू (Sioux)" रेड इंडियन टोळीशी साखर आणि कॉफी देऊन ते "आईस ब्रेकिंग" केले होते. मने जुळायला कोणतीही एक समान आवड पुरेशी असते. पण हा एक भाग झाला. ही नुसती सुरुवात होती. कोकणी माणूस कलाकार, रसिक, अभिजात शास्त्रीय संगीताची आवड असलेला निघाला. म्हणजे हेही धागे लगेच जुळून आले. नाटक, दशावतार, घरी होणाऱ्या खाजगी मैफिली हे सगळं कोकणच्या प्रेमात पाडणारं ठरलं. भरीला भवतांलची पाचूसारखी हिरवीगार माया. त्या हिरव्या मखमलीमध्ये हरवून जायला व्हायचं. कोकणातले ऋतू आपलेसे झाले. ग्रीष्म ऋतूचा वणवा दमट हवेमुळे फारसा जाणवायचा नाही. पण डोंगर रंग बदलायचे. त्यांची हिरवीकंच काया क्षीण करडी हिरवट व्हायची. मस्तकावर अग्निशिखा घेऊन पांगारा फुलायचा. मोहाच्या फुलांचा गंध आसमंतात भरून राहायचा. सागाच्या झाडाची पाने जाळीदार व्हायची. डोंगरात आदल्या वर्षीच्या पावसाच्या पाण्याने छोटे डोह निर्माण झालेले असायचे ते पार खडखडीत होऊन जायचे. कधी एकदा पाऊस येऊन ही यक्षभूमी ग्रीष्माच्या शापातून मुक्त करतो असे व्हायचे. आणि मग जूनमध्ये तो जो यायचा तो पुढे चार महिने निळं आकाश काही दिसू द्यायचा नाही. थंडी फारशी यायची नाहीच. उगाच डिसेंबरचे काही दिवस मात्र सकाळी अंगावर शिरशिरी आणणारे असायचे. पाण्यावर वाफ दिसायची, नरेंद्र डोंगर धुक्यात न्हाऊन गेलेला दिसायचा. अशी सुरुवातीची काही वर्षे कोकणच्या सौंदर्यावर भाळून ते आधाशीपणे पिऊन घेण्यात गेली असावी.
मग पुढे कोकण नजरेतून श्वासातून हळूहळू शरीरात उतरू लागलं, भिनू लागलं. संस्कृती आपली वाटू लागली. माणसे आपली वाटू लागली. सणप्रसंगी देवळात जाणं नवीन नव्हतं, पण आता गुरवाचं गाऱ्हाणं घालताना आईकताना तोंडातून आपोआप "व्हय म्हाराजा" येऊ लागलं. दशावतार बघताना संकासुराचं युद्ध पाहताना वर्षानुवर्षं चालत आलेली ती परंपरा आपल्या पूर्वजांनी चालवली तशीच आपण चालवत आहोत असं वाटू लागलं. हा बदल आतून तर घडलाच. त्याहूनही भंवतालच्या माणसांनी तो विश्वास दिला, आपण कुठून घाटावरून आलो याचा केव्हाच विसर पडला. मग पुढली नैसर्गिक पायरी म्हणजे आपल्या माणसांच्या कथा आणि व्यथा दिसू लागतात तशा कोकणातील दु:खं दिसू लागली. इतका कष्टाळू स्वभाव असलेली, अंगात कलागुण असलेली, परंपरा टिकवून ठेवण्याचं भान असलेली माणसं लाभलेली ही भूमी, भूमिपुत्रांच्या वाट्याला सुबत्ता कशी नाही हे जाणवू लागलं. शेतकऱ्यांच्या वाटेला अतोनात कष्ट पण त्यामानाने त्याचा परतावा मात्र तितकासा नाही हे सत्य. मग पोटासाठी जो उठतो तो मुंबईला पळतो, चाकरमानी होतो, वर्षातून फक्त गौरी-गणपतीला त्याला आपलं कोकण आठवतं. नाही, खरं तर मनानं चाकरमानी कोकणातच असतो. मनात येईल तसं त्याला येता फक्त येत नाही. चाकरमानीपणाचा तो शापच होय. अशी ही भूमी यक्षानं शाप दिल्यासारखी का? असं वारंवार वाटत राहिलं. मग त्या अस्वस्थपणाला वाचा फोडण्याचा एक मार्ग म्हणजे पूर्णपणे या भूमीशी समरस होऊन तिथलेच होऊन जावं. इथेच काम करावं, माणसं जोडावीत, त्यांना एकत्र आणून काहीतरी कार्यक्रम करावेत, इथल्या व्यथा आपल्या साहित्यातून लिखाणातून मांडाव्यात, सांस्कृतिक चळवळ उभी करून मूळच्या कलागुणांना जोपासावं असं कल्प कल्प मनी येत राहिलं असावं. इच्छा असली म्हणजे सगळं होतंच. मग त्यानुसार समान व्यसनेषु अशी मंडळी भेटली. प्राध्यापकीचं काम सांभाळून वाचन मंदिर, नाटक संस्था, समाजवादी चळवळीच्या विचारवंतांशी तात्त्विक चर्चा वाद, त्या अनुषंगानं काही सार्वजनिक कामं, लिखाण हे असं सर्व सुरू झालं. वडिलांचा पिंड संघाचा असला तरी मला वाटतं वृत्ती समाजवादी असावी. कुणी काही म्हणो समाजवादी विचारसरणीमध्ये दुबळ्याबद्दल कणव आहे, अन्यायाचा तिटकारा आहे. तो मला वडिलांच्यात त्या लहान वयातही जाणवायचा. त्याचे घनिष्ठ मित्र प्रा. रमेश चिटणीस यांच्याशी त्यांचे तात्त्विक वाद होत असत, पण मला वाटतं त्या दोघांमध्ये माणुसकी आणि अन्यायाची चीड हा समान दुवा होता. चिटणीस सर हे जास्त तर्कनिष्ठ तर वडील थोडेसे भावनाप्रधान. दोघांनीही मिळून जे कार्य केले ते स्थानिक हितासाठीच.
आणि पाहता पाहता वर्षे निघून गेली, कॉलेजमधून निवृत्त होण्याचे दिवस जवळ आले. केवळ नोकरीसाठी म्हणून कोकणात आलो, आता ती तर संपली. म्हणजे आता इथून उठून परत आपल्या गावी जायचे? हा विचारसुद्धा वडिलांना सहन झाला नव्हता हे मला आठवते. गावी परत जायचे म्हणजे काय? कोकण, इथली ही माणसे हीच माझी माती आणि माझे आपले. हेच कोकणाचे वैशिष्ट्य. इथली माणसे, त्याच्याशी जुळलेलं नातं हेच तर कमावलेलं वैभव. असा माझ्या वडिलांचा लेफ्टनंट जॉन डनबार झालेला मला आठवतो. तो ब्रिटीश सोल्जर म्हणून केव्हाच संपला होता, उरला होता तो अस्सल सू (Sioux) जमातीतीलच एक. पण डान्सेस विथ वूल्व्ह्ज ही कथा जॉन डनबारची नाही, ती कथा आहे त्या भूमीची, त्या संस्कृतीची. तसेच हीसुद्धा कथा आमच्या वडिलांची नाही, तर ती आहे कोकणाची. त्या मायेच्या भूमीची, जिने आपल्यावर प्रेम करणाऱ्याला भरभरून दिले, द्यायला शिकवले, कणखर चिवटपणा शिकवला, फणस बाहेरून काटेरी असला तरी आतून मधुर रसाचा गरा देणारा असतो हे शिकवले. कोकणी माणसाचे तिरके बोलणे हे लागट नसते, तो एक बाज असतो, तो प्रेमाचाच असतो. मांयxx, बाxx हे सर्व शब्द केवळ वाक्य सुरू करण्याचे साधन म्हणून वापरले जातात, प्रत्यक्षात त्याचा आपल्या मातापितरांशीशी सुतराम संबंध नसतो, असे सर्व काही शिकवले. कोकणी माणूस औपचारिक बोलायचे असेल तर शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो, पण प्रेमाच्या माणसाला खास उपर्निर्दिष्ट शब्दांचा वापर करूनच संबोधतो हे सत्य आहे. गेली कित्येक वर्षे आमच्या कोकणाचा कॅलिफोर्निया कसा होईल याची चर्चा होत आली आहे, त्यावर व्याख्याने उठली आहेत. ते सर्व कॅलिफोर्निया प्रत्यक्ष न पाहताच. सांगोवांगीच सगळे. प्रत्यक्ष कॅलिफोर्निया पाहिल्यावर वाटले अरे, कशाक होयो तो कॅलिफोर्निया आमका? पैसो मिळात, चकचकीत रस्ते होईत, पण आमचां कोकणीपण जाईत त्याचा काय? कोकण नेहमीच श्रीमंत होतं, आहे आणि राहील. डोळे उघडून ती श्रीमंती आपण पहायची आहे, जपायची आहे, तिचा विकास आणि पर्यायाने तिच्या मुलांचा विकास आपोआपच होईल.

मंदार, किती दिवसांनी तुझा सुंदर लेख वाचला. मज्जा आली. कोकण आणि त्याच्या परिसरांत फिरवून आणलस. नव्या मुलुखांत जावून तिथल्या मातीत मिसळून जाण हे काय असत, ते तू किती सहजतेने आणि अतिशय हळुवार सांगितले आहेस!
ReplyDeleteएकदा वाचायला सुरुवात केल्या नंतर थांबू नयेस अस वाटत होत. तुझ्या वडिलांच्या जीवनाचे पैलू आणि त्यांचा अनोळखी प्रदेशांत एकरूप होण्याची जिद्द
या बद्दल वाचून देखील छान वाटल.
अगदी मस्त!!
विद्याताई, तुम्ही केलेले कौतुक शिरोधार्य! तुम्हीही या विषयावर लिहिले आहे ते मला अत्यंत भावले होते. कोकण आहेच तसे. कोकणी माणसेही तशीच जीव लावणारी.
DeleteToo good:)
ReplyDeleteMandar, this is awesome, very well written. Being from konkan but away from it for so many years now, you really brought it in front of my eyes through this lekh. apratim!
ReplyDeleteसाहेबराव ....कमाल....👍❤️❤️
ReplyDelete