Tuesday, March 3, 2015

गोहत्याबंदी आणि आम्ही

इतक्या वर्षांचा गाईंच्या संघर्षाला गोड फळ लागले म्हणायचे. ते रस्त्यात मध्येच बैठक मारून धरणे धरणे, कितीही हॉर्न मारले तरी मुळीच न हलणे, एकदम घोळक्याने रस्त्यात येऊन अख्ख्या ट्राफिकला आपल्या वेगाने जायला लावणे, वसुबारस असेल त्या दिवशी मात्र अजिबात न सापडणे हे सर्व उपयोगी पडले आहे. गाय दिसली की तिचे शेपूट उचलून डोळ्यांना लावणारे आम्ही. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने पार गहिवरलो आहोत. आता फडणवीस समोर आले तर त्यांचेसुद्धा शेपूट आम्ही डोळ्यांना लावायला तयार आहोत. अर्थातच त्यांना शेपूट नाही. असलेच तर निदान आजवर कुणी ते पाहिल्याचे ऐकिवात नाही. तसे राजकारणात सगळ्यांना शेपूट असतेच, नव्हे लागतेच. आता विरोधक त्यांना मोदींचे शेपूट म्हणतात ते केवळ प्रतीकात्मक बोलणे म्हणायचे. विरोधक काय, कशालाही विरोध करतात. विरोधकांनो, विरोध नीट करा असे म्हटले तर त्यालाही ते विरोध करतात. विरोधी बाकांवर बसा म्हटले तर त्यालाही विरोध. भुणभुण सहन न होऊन सत्तेत घेतले तर तिथेही सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका निभावणार. थोडक्यात तिथेही मारक्या गायीसारखेच वागणे. गोठ्यात बांधले तर दावे तोडायचे आणि रस्त्यात जाऊन धरणे धरायचे, सोडून दिले तर गोठ्याबाहेर उभे राहून करुण मुद्रेने हंबरत राहायचे, जणू काही या गोमातेला सारे उठले छळण्याला. वास्तविक या गोमातेने आपल्याच गवळ्याचे दिवाळे निघालेले पाहून पत्रकार परिषद बोलावून आनंदाने हम्माsss केले होते. आलेल्या पत्रकारांना स्वत: भाकड असल्याचे विसरून दूधच नव्हे तर खर्वसाचेसुद्धा आश्वासन दिले होते. पण गवळी कनवाळू निघाला. गाय मारकुटी असली म्हणून काय झालं, आपल्या संस्कृतीत ती गोमाताच असं म्हणून तिने टाकलेले शेण गोळा करून, तिच्या चारापाण्याची व्यवस्था करून चूप घरात जाऊन बसला. आम्ही फडणविसांना हळूच विचारलं, अहो ही गोहत्याबंदी वगैरे ठीक आहे, पण ही घरातील मारकुटी गाय, तिचं काय करणार आहात? तेव्हा ते म्हणाले,"अहो गाय भाकड झाली म्हणून कसायाकडे देणे ही झाली म्लेञ्छ संस्कृती. आपली संस्कृती तिने आजवर दिलेल्या दुधाला जागण्याची. तेव्हा, त्या दुधाला जागतो आहोत. पण कधी कधी ही गाय आहे की बैल अशी शंका येते."

या निर्णयाने आमची मात्र वैचारिक पंचाईत झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत. गाय हा एक उपयुक्त पशू आहे असं म्हणणारे सावरकर बरोबर की तिला संरक्षण देणारे हे धोतर सावर कर बरोबर? आम्ही हा प्रश्न घेऊन प्रंपूज्य साक्षी महाराजांच्या मठात गेलो. महाराज सरकारमान्य नसले तरी सरकार अमान्य तरी नाहीत. मठात सणावाराचे वातावरण होते. भव्य प्रवेशद्वारावर तोरण लावले होते. रांगोळ्या काढल्या होत्या. आत चौकात पताका लावल्या होत्या. चौक गोमातेच्या मयाने सारवलेला होता. आम्ही प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अंगावर गुलाबदाण्यांनी सुखद गार शिडकावा केला गेला. वा! असे म्हणून आम्ही बाही उंचावून त्याचा सुगंध अनुभवणार तेवढ्यात आमचे स्वागत करण्यास आलेली ब्रह्मवादिनी म्हणाली,"तुमची सर्व पापे धुवून काढणारे पवित्र गोमूत्र आहे ते. अभ्यागतास शुचिर्भूत करून घेतल्याखेरीज आम्ही मठात प्रवेशच करू देत नाही." आम्ही बाही खाली केली. तो पवित्र शिडकावा आपल्या मुखावरही झाला होता ही जाणीव अस्वस्थ करत होती त्याकडे दुर्लक्ष करून तसेच पुढे गेलो. आश्रमात गाई मुक्तपणे संचार करीत होत्या. नुकत्याच जाहीर झालेल्या गोहत्या बंदीचे वृत्त त्यांच्यापर्यंत पोचले असावे असे वाटले. कारण त्यांच्या मुखावर त्या ब्रम्हवादिनीपेक्षा अधिक आनंदाचे भाव होते. बैठकीच्या खोलीत आम्हाला बसवून ती ब्रम्हवादिनी म्हणाली,"महाराज थोड्याच वेळात दर्शन देतील. आत्ता त्यांची गोमाता उपलालनाची वेळ आहे." आम्ही चमकलोच. "कसली वेळ आहे म्हणालात?" ब्रम्हवादिनीने आमच्याकडे एक कठोर कटाक्ष टाकला आणि म्हणाली,"उपलालन कर्माची वेळ. उपलालन म्हणजे कुरवाळणे हे तुम्हांस माहीत नसावे याचे आश्चर्य वाटते. गायीचे वशिंड आणि मस्तक यांच्या मध्ये कुरवाळले असता त्यायोगे साधकास सिद्धी प्राप्त होते. गाय उत्तम दूध देते आणि साधकास बैलांपासून भय राहत नाही." आम्ही आश्रमात कसले कसले उपलालन चालते याचा विचार करू लागलो. तेवढ्यात महाराजांनी दालनात प्रवेश केला. आम्ही उठून उभे राहिलो. काहीशा आदराने आणि बऱ्याचशा भीतीने. आमची मागील भेट लक्षात होती. किमान चार बालके जन्मास घातल्याखेरीज पुन्हा तोंड दाखवू नकोस अशी आज्ञा घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो. मोठ्या उत्साहाने आम्ही ती आज्ञा आमच्या धर्मपत्नीच्या कानावर घातली होती. त्यावर तिने पत्नीचे पवित्र कर्तव्य पार पाडत आमचे बेसिक, महागाई भत्ता, टी ए, डी ए, कन्व्हेयन्स, बोनस अशी सगळी आकडेवारी विष्णुसहस्त्रनामाप्रमाणे म्हणून दाखवली होती. टीव्हीचे आठ हप्ते अजून बाकी आहेत हीपण  एक अनावश्यक आठवण करून दिली होती. प्रसंग हाताबाहेरच जात होता. मी वेळीच शांतिमंत्र आणि शांति आसन सिद्ध करून (पक्षी:निद्रा) ते आख्यान थांबवले होते. चार बालकांची भीक नको पण हे तेजोभंगाचे कुत्रे आवर अशी अवस्था झाली होती.

आम्ही भानावर आलो तेव्हा महाराज काहीशा त्रासिक पण भेदक दृष्टीने आमच्याकडे पाहत होते. "बोला!" पुढे कंसातील "आता काय आणि?" हे स्पष्ट ऐकू आले. "महाराज, गायीविषयी आपले विचार जाणून घेण्यासाठी आलो आहे. सावरकर आणि त्यांचा राष्ट्रवाद याविषयी अभ्यास करीत असताना उगाचच त्यांचे ते गायीविषयी तेवढे विधान लक्षात राहिले आहे. शेंगदाणे खाल्ल्यानंतर एखादा कण दातात अशक्य ठिकाणी अडकून जसा मानसिक त्रास देत राहतो तसे ते विधान आम्हाला सलते आहे. तुम्हीच आता मार्गदर्शन करा." स्वामीजी एकदम भडकून म्हणाले,"अरे तो काय सांगणार राष्ट्रवाद आणि गोमातेबद्दल?" मी सटपटलोच. सावरकरांना एकदम अरेतुरे? तेही "परिवारा"तीलच अशा महत्वाच्या व्यक्तीने करावे?

 "अरे सिनेमा नाटकांत कामं करून हिंदुराष्ट्रवादावर अधिकारवाणीने बोलता येत नाही! बाकी सूर्यास्त नाटकातला तो गायकवाडचा पार्ट मात्र झकास केला होतान हो त्यानं! पाहिलाय मी तो. सुटाबुटांत अगदी ओळखू येत नव्हता. तो आणि कधीपासून हिंदुराष्ट्रवादावर बोलू लागला? आणि गाय हा उपयुक्त पशु आहे असं म्हणायला जातंय काय त्याचं? जन्म मुंबईत गेला त्याचा. मुंबईकरांना गायींपेक्षा अंधेरीच्या गोठ्यांतील म्हशी जास्त पाहायला मिळतात. एरवी गाय फक्त कॉंग्रेसच्या जाहिरातीत दिसायची. नंतर तीही गेली."

मग माझ्या लक्षात आलं. मी नम्रपणे म्हणालो,"महाराज, ते जयंत सावरकर. ते बिचारे कुठले या विषयावर बोलणार? त्यांना प्रत्यक्षात सोडा, नाटका सिनेमात सुद्धा फार बोलू देत नाहीत. आम्ही विचारलं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी."

स्वामीजी स्तब्ध झाले. सावधगिरीने म्हणाले,"असं असं! ते सावरकर होय? काय तेजस्वी विचार होते त्यांचे! पोहायचेही उत्तम! उगाच नाही बोटीतून तडक खवळलेल्या दर्यात उडी मारून पोहत किनाऱ्याला लागले. जाज्वल्य देशप्रेम असल्याशिवाय हे होत नाही." आम्ही विचार करू लागलो.  मागे पोहायच्या क्लासला गेलो होतो.  सरांनी कमरेला डालड्याचा डबा बांधून अचानक पाण्यात ढकलले होते.  तेव्हा कसेबसे बाहेर पडून सरांच्या नावाने ठणाणा करत तडक घरी गेलो होतो. त्याऐवजी धीर धरून "ने मजसी ने परत" म्हटलं असतं तर आज पोहायला आलं असतं.

"परंतु स्वामीजी, ते गाय हा एक उपयुक्त पशु…"  एक हात वर करून त्यांनी मला चूप केले आणि ते कडाडले,"अरे मातेची उपयुक्तता पाहतोस? ज्या मातेने तुला जन्म दिला, तुझे पालनपोषण केले, जिच्या दुधावर तू वाढलास त्या मातेला असं म्हणशील?" माझ्या डोळ्यासमोर आमचा गावातला बाबा गवळी आणि त्याच्या मागून निमूटपणे चालणारी त्याची म्हैस आठवली. तिच्या दुधावर आम्हीच काय आमची अख्खी आळी वाढली होती. "स्वामीजी, तसं विचार करू गेलं तर, मी आयुष्यात एकदाच गाईचं दूध घेतलं होतं. तेही कावीळ झाली होती म्हणून  आयुर्वेदिक औषध घ्यायला सक्काळी उठून दादरला जात होतो तेव्हा. वैद्यबुवा ते औषध गाईच्या दुधाबरोबर घ्यायला लावायचे. एरवी हिंदुस्थानात गाईपेक्षा म्हशीच्या दुधावर वाढणारी जनता जास्त आहे. मग म्हशीला सुद्धा संरक्षण नको? म्हशीनं कुणाची गाय मारली आहे? खुद्द ज्ञानेश्वरांनीही वेद वदवून घेण्यासाठी रेड्याला प्रेफरन्स दिला होता. रेड्याचा आवाज गायबैलापेक्षा घनगंभीर असतो, मंत्र वगैरे ऐकायला छान वाटलं असणार. शिवाय आमच्या हफिसातला महंमद चपरासी म्हणतो, तुम्ही भटा बामणांनी अभक्ष्य भक्षण करायला सुरुवात केल्यापासून त्याला कुक्कुट किंवा अजापुत्राचे मांस परवडत नाही. त्याने कुठे जावे? " आम्ही धाडस करून विचारले.

आता महाराज आमच्याकडे मारक्या बैलाप्रमाणे पाहत होते. तेणेयोगे आमच्या ठायी भय उत्पन्न झाले आणि आम्ही तत्काळ तेथून बाहेर पडलो. ब्रह्मवादिनीचे बोलणे लक्षात ठेवून आम्ही आता एक मध्यम आकाराची गाय पाळून रोज उपलालन कर्म करावे असे ठरवले आहे.

No comments:

Post a Comment