Friday, March 6, 2015

निर्भया डॉक्युमेंटरीच्या निमित्तानं

बीबीसीने केलेली निर्भया डॉक्युमेंटरी पाहिली. डोक्याचा भुगा झाला. शाळेत असताना शोले पाहिला होता. त्यात तो आंधळा इमाम झालेला ए के हंगल म्हणतो,"तुम्हे मालूम है दुनिया में सबसे बडा बोझ क्या है? बूढे बाप के कंधे पे बेटे का जनाजा." हे वाक्य मला "कितने आदमी थे" पेक्षा जास्त लक्षात राहिलं. या डॉक्युमेंटरीमध्ये जेव्हा तो बाप अश्रू आवरत म्हणाला,"जिस बेटी को हमने सीनेसे लगा के बडा किया, जब उस बेटी को अग्नी देना पडता है तब आवाजही नही निकल पाता." तेव्हा मला पुन्हा त्या इमामसाहेबांची आठवण आली. हृदय पिळवटलं. एकुलती एक मुलगी. हातातोंडाशी आलेली. घरच्या परिस्थितीची जाणीव असलेली. मेडिकलला जायला पैसे कुठून आणायचे असा प्रश्न पडल्यावर "माझ्या लग्नासाठी जे जमवले आहेत ते माझ्या शिक्षणावर खर्च करा" असं म्हणणारी. परिस्थिती माणसाला समजूतदार बनवते हे खरं असलं तरी हा समजूतदारपणा लहान वयात येणं कौतुकास्पदच. सिनेमा पाहायला बाहेर काय पडली ते परत न येण्यासाठी. कुठल्याही आईबापाच्या जिवाला घोर लागणारी ही गोष्ट असते. मुलं लहान असतात तेव्हा बरं असतं, सगळ्या ठिकाणी आपल्याबरोबर असतात. त्यांच्यावर आपलं लक्ष राहतं. पण तीच मोठी झाली, आपली आपली फिरू लागली की हा घोर चालू होतो. माझा मुलगा स्वत:ची स्वत: गाडी चालवायला लागून आता सहा वर्षं झाली, तरी आजही मी कितीही उशीर झाला तरी जागत बसलेला असतो. तो अत्यंत जबाबदार आहे, उशीर होणार असला तर तसं त्यानं सांगितलेलं असतं, तरीही काळजी संपत नाही. मुलीला तर मी सांगतोच, काय तुमचं ते प्रॉम वगैरे असेल ते असो, ड्रायव्हर होऊन गाडीत बसून राहीन पण तिथे येईन, हातात शॉटगन असेल. कॉलेजला कुठे दुसऱ्या गावात गेलीस तर कॉलेजच्या पार्किंगलॉट मध्ये आपली आरव्ही लागलेली असेल. त्या पार्किंग लॉटमध्येच माझं क्याम्पिंग चालू होईल. छानपैकी दोऱ्या वगैरे लावून चड्डीबनियन सुद्धा वाळत घालीन तिथे. माझी मुलगी हे ऐकून डोळे फिरवत मान हलवत म्हणते,"बाबा, त्यापेक्षा मी घरात राहून इथल्याच कॉलेजमध्ये जाईन. एम्बारेसिंग वाचेल तुमचं आणि माझं." तिला कसं सांगू तुझ्या सुरक्षिततेपेक्षा माझी एम्बारेसमेंट क्षुद्र आहे. 

सुरक्षित वातावरण निर्माण होणं हे कायदा आणि कायदा राबवणारे यांच्याबरोबरच जनतेवरही अवलंबून आहे. भारतामध्ये बरेचसे गुन्हे हे अनामिकतेच्या आवरणात होत असतात. शहरे मोठी झाली, जनसंख्या अफाट झाली. वाडे गेले, बंद दारं असलेल्या सदनिका आल्या. शेजारी कोण राहतं, त्या कुटुंबाचं नाव काय हेही माहीत नसतं. पूर्वी छोट्या गावांमध्ये सर्वांना सर्व माहीत असायचे. कुणी काही आगळीक केलीच तर ती करणारा घरी पोचेपर्यंत त्याच्या घरच्यांना ते कळलेलं असायचं. आता संपूर्ण अनामिकता आली. मुखवटे घातलेल्या या जगात अनामिकता मुखवट्याखालच्या विकृतीला बळ देते, काहीही केलं तरी चालेल हा विश्वास देते. पूर्वी कुठे तरी मी वाचलं होतं. जपानी लोक आत्मसन्मानाला उच्च स्थान देतात. इतकं की जर ते जाहीररीत्या बदनाम झाले तर हाराकिरी करणं पत्करतात आणि करतातही. "ब्रिज ऑन रिव्हर क्वाय" मध्ये ते दिसलं होतंच. ब्रिटीश कर्नलनं शिस्तीनं पूल बांधून दाखवला, ते आपल्याला करता आलं नाही म्हणून तो जपानी कर्नल हाराकिरीच्या मनस्थितीत असतो. तात्पर्य जपानी माणूस हा जाहीर मानहानीची प्रचंड भीती बाळगतो. परंतु तोच जपानी माणूस दुसऱ्या गावात गेला की नुसता सुटतो.  प्रचंड दारू पिणं, दंगा करणं, बाहेरख्यालीपणा करणं हे सगळं करतो. ही अनामिकता माणसाला एरवी असलेली सर्व सामाजिक बंधनं झुगारून द्यायला लावते. आणि हे सर्व सुशिक्षित असलेले लोक करतात. मग मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेल्या, अशिक्षित लोकांबद्दल काय बोलावे? इथे मी "मुळातच गुन्हेगारी प्रवृत्ती" हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे. शास्त्रीय दृष्ट्या आपला मेंदू हा दोन भागात बनलेला आहे.  मानवी मेंदू हा उत्क्रांतीपूर्व काळातील मेंदू (रेप्टीलियन ब्रेन) आणि त्यावर उत्क्रांतीमुळे बनलेला मेंदू अशा दोन भागात बनला आहे. उत्क्रांतीपूर्व मेंदूला फक्त तीन भावना कळतात - हिंसा, भय, मैथुन. वात्सल्य, प्रेम, समाजप्रियता या भावना सस्तन प्राण्यांत उत्क्रांतीमुळे निर्माण झाल्या. मानवी मन हे सदैव या दोन मेंदूंच्या परस्परविरोधी द्वंद्वात असतं. जेव्हा उत्क्रांत पावलेल्या मेंदूचा विजय होतो तेव्हा मनुष्य समाजप्रिय असतो, नीतीने वागणारा असतो, दुसऱ्यावर प्रेम करणारा असतो. जेव्हा रेप्टीलियन मेंदूचा विजय होतो तेव्हा तोच समाजकंटक बनतो, हिंस्त्र बनतो. "मुळात गुन्हेगार प्रवृत्ती" असणारे लोक हे या रेप्टीलियन मेंदूच्या प्रभावात असतात, तो मेंदू सतत जिंकत असतो. शिक्षण, सशक्त समाजव्यवस्था, अवतीभवती प्रेम करणारी कुटुंबव्यवस्था या गोष्टी माणसाला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे टाळू शकतात. अर्थात ते शंभर टक्के प्रूफ नाही, पण या गोष्टी नसण्याने मात्र माणूस गुन्हेगारीकडे शंभर टक्के वळू शकतो.  तेव्हा गुन्हे करणारे दोन प्रकारचे लोक. एक पांढरपेशे - जे अनामिकता सापडली तर गुन्हा करणारे, दुसरे पूर्ण गुन्हेगारी प्रवृत्तीचे. दोन्हीसाठी शिक्षण, सशक्त समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था अत्यंत जरूर आहेत. 

डॉक्युमेंटरीला भारतात बंदी घातली गेली. मला त्याचं कारण समजू शकलं नाही. आक्षेप काय? बाब कोर्टात आहे वगैरे गोष्टी झाल्या किरकोळ. भारतीय लोकांना व्हिलन दाखवलं आहे म्हणून? की आपण आरशात आपला चेहरा पाहायला घाबरतो आहोत म्हणून? त्या नराधमाचे विचार आपल्याला घाबरवतात म्हणून की आपणही सुप्तपणे त्या वकिलांप्रमाणे आहोत हे जाणवले म्हणून? अत्यंत विसंगतीत आपण जगतो आहोत हे दिसतं म्हणून? एका बाजूला दुर्गापूजा करायची, सरस्वती, लक्ष्मी या देवता मानायच्या, दुसरीकडे मात्र स्त्रीला अबला म्हणायचं, चूल आणि मूल ही तिची कार्यभूमी आहे म्हणायचं, "सातच्या आत घरात" ही अट मुलींना लागू करायची, मुलं मात्र रात्रभर आली नाहीत तरी सकाळी आल्यावर त्यांना पहिला ब्रेकफास्ट बनवून द्यायचा. इकडे म्हणायचं "बालिका बचाव", तिकडे तो मुल्ला मुलायमसिंग "बच्चे है, गलती करेंगेही" असं म्हणत बलात्कारी हरामखोरांना अभय देणार. अरे किती विसंगतीत जगणार आहोत आपण? डॉक्युमेंटरीच्या बंदीला पाठिंबा देणारे हे छुपे समाजकंटकच आहेत, त्यांना आपल्या मनात खोलवर आत काय खरं दडलं आहे याची भीती आहे. ही डॉक्युमेंटरी ते दाखवते याची त्यांना भीती आहे असंच मला वाटतं. विरोध करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने ही अंतर्मुख होऊन बदल घडवण्याची ही संधी आहे असं समजा. आपल्या स्त्रीविषयी, मुलींविषयी दृष्टीकोनात बदल करा. मुलींना निर्भयपणे जगू द्या, जगात वावरू द्या. निसर्गानं त्यांना पुरुषापेक्षा नाजूक बनवलं असेल, पण कर्तृत्वात कुठंही त्या कमी नाहीत. मी तर म्हणेन त्या कांकणभर सरसच आहेत. पुरुष किचकट काम मन लावून करू शकत नाहीत, पुरुषाची वेदना सहन करण्याची ताकद स्त्रीपेक्षा कमी असते, बिकट परिस्थितीत स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त तग धरू शकतात. परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करणारे पुरुषच असतात. ते सोपा मार्ग स्वीकारतात. मागे राहतात त्या त्यांच्या बायका, कर्जदारांना तोंड द्यायला, समाजाला तोंड द्यायला. अशा एकट्या स्त्रीला शिकार बनवायला लघळपणे जातात ते पुरुषच. बाई कुणा विधुर पुरुषापाशी जाऊन "इन गोरी गोरी कलाईयोंको काम करनेकी क्या जरूरत है?" असला प्रेम चोप्रा टाईप डायलॉग मारताना दिसत नाही. स्त्री ही मनाने शक्तीशाली आहे, पुरुषापेक्षा जास्त गुणवानही आहे. तिच्या शारीरिक बळाच्या अभावाचा फायदा घेणे हे केवळ नपुंसकपणाचे लक्षण आहे. 

ती निर्भया बिचारी गेली. तिच्या सर्व आशा, आकांक्षा, स्वप्नं काही नराधमांनी नष्ट केली. त्याची सजा ते भोगतील. परंतु ज्या परिस्थितीने हे घडण्यास हातभार लावला, किंवा निदान त्याला अटकाव तरी करू शकली नाही, त्या परिस्थितीची सामूहिक जबाबदारी आपली आहे, समाजाची आहे. डॉक्युमेंटरीला विरोध करण्यापेक्षा अंतर्मुख व्हा, आणि यातून सशक्त समाज कसा निर्माण होईल ते पहा. उद्या अशा निर्भया मुक्तपणे बागडतील तेव्हाच आपण काही प्रगती केली आहे असं समजूया. तोवर "बलशाली भारत", "एकविसाव्या शतकातील महासत्ता" या नुसत्या गप्पा आहेत गप्पा. 

2 comments:

  1. अतिशय वास्तववादी. वाचताना प्रत्येक संवेदनशील माणसाच्या अंगावर काटा आणणारं मनोगत. याला लेख कसं म्हणायचं?

    ReplyDelete
    Replies
    1. आता मुळातूनच या विषयावर समाजप्रबोधन घडण्याची वेळ आली आहे. बंदी घालून सांगाडे फडताळात लपवता येतील पण प्रश्न सुटणार नाही. त्याला सामोरे जाऊन, तरुण पिढीनेच यात बदल घडवायचा आहे.

      Delete