Sunday, December 28, 2014

त्याच तिकिटावर तोच खेळ

अहाहा! या दिल्लीच्या २ डिग्रीमध्ये कसं अगदी उल्हसित वाटतं आहे. इतके दिवस जी मरगळ दाटली होती ती पार पळाली आहे. होय, याला कारणीभूत केवळ एक आणि एकच, आमचे सकलमुगुटमंडित निधर्मीप्रतिपालक कडकनियमेश्वर भ्रष्टाचारविध्वंसनिधान आपनृपति यांनी शेवटी युद्धघोषणा केली! सत्ता सोडून वर्ष व्हायला आलं. मुख्यमंत्रीपदाची पहिली पुण्यतिथी साजरी करण्याचा प्रस्ताव काही कार्यकर्त्यांनी मांडला होता. त्यानिमित्ताने निधी गोळा करता येईल असाही एक विचार त्यामागे होता. आणि तो योग्यही होता. नमोंच्या भाषणासाठी लोक पाच रुपये देऊ शकतात तर आपल्या बलिदानाच्या पुण्यतिथीला देऊ शकणार नाहीत? सहानुभूती म्हणून तरी? नक्कीच देतील. का नाही देणार? बुडत्याला हात देणे आपली संस्कृती आहे. अशी चर्चा झाली. मग किती लोक पैसे देऊन येतील याचा अंदाज घेतला गेला. आणि असं लक्षात आलं की हजेरी लावणारे बहुतेक आपलेच कार्यकर्ते असतील. मग आपल्याच लोकांना का नाडायचं असा विचार पुढं आला आणि पुण्यतिथीचा कार्यक्रमच बारगळला. नाहीतरी देशभरातून मोजून पंचवीस तीस कार्यकर्ते हजर राहतील असाच होरा होता. उगाच शेदोनशे रुपयांसाठी कशाला मरा? जागेचं भाडंच जास्त व्हायचं. तसं आम्ही आमचं श्रद्धांजलीवजा भाषण तयार ठेवलं होतंच. ते याप्रमाणे - "मित्रहो, आज आपण येथे जमलो आहोत ते दु:ख व्यक्त करण्यासाठी नाही तर एका अल्प पण तेजस्वी अशा जगण्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी. ज्याप्रमाणे कापूर भुरूभुरू जळतो, त्याचे ते जळणे अल्पजीवी असते, पण ज्योत प्रखर असते. जळून गेल्यावर त्याची नामोनिशाणीही राहत नाही. उगाच मागाहून दुसऱ्यांना केर काढावा लागत नाही. त्याचप्रमाणे ही कारकीर्द होती. उगाच बळंच एवढं एवढं तेल घालत ती टिकवून ठेवली नाही. जगावे तर स्वाभिमानाने नाही तर मरावे असा विचार करून सत्ता स्वीकारली गेली. पण आपल्याला कोंडीत पकडले गेले. इकडे पोलिस तर तिकडे लोकसभा निवडणुका अशा विचारद्वंद्वात स्वाभिमानाने मरावे आणि लोकसभेरूपी उरावे असा निर्णय घेतला गेला. पण मित्रहो, अशा देदीप्यमान मरण्याला जपानमध्ये हाराकिरी म्हणतात आणि ती अत्यंत मानाची मानली जाते. तेव्हा, त्याचा अभिमान बाळगा. पुन्हा जर अशी संधी मिळाली तर अशा पन्नास हाराकिऱ्या करायला आपण तयार आहोत ही खात्री बाळगा." अतिशय कौतुकाने मी माझे हे भाषण आमचे युद्धनीतीनिपुण सेनापती प्रशांत भूषण यांना दाखवले तर त्यांच्या पसंतीस आले नाही. "आम्ही बोंबलून सांगत होतो, राजीनामा देऊ नका. पण नाही. हाराकिरीची हौस त्यांचीच. उगाच त्यांना डोक्यावर चढवून ठेवू नका असल्या भाषणानं. सत्तेत येण्यापेक्षा राजीनामा देण्यात जास्त रस असतो त्यांना." असे ते म्हणाले. तरीही आम्ही हे भाषण आमच्या भ्रष्टाचारविरोधमार्तंडांना दाखवलेच. ते सद्गदित होऊन "तूच आम्हांला खरे ओळखलेस रे बाबा. टोपीत टोपी आपची आणि झिंगेत झिंग हौतात्म्याची. राजीनामा देऊन अकरा महिने उलटले पण उतरत नाही ती नशा. ते रस्त्यावर अंग लोटून देणे, त्रागा करणे, त्या टीव्हीवरच्या भारलेल्या मुलाखती, ते दीक्षितांच्या विरोधातील पुरावे, त्या रिक्षेवाल्याच्या थपडा, थपडेनंतर सुरू झालेला मदतीचा ओघ, स्वत: रात्र रात्र जागून निवडलेले उमेदवार, त्या गोल टोपी घालून केलेल्या इफ्तार पार्ट्या. सगळं कसं काल परवा घडल्यासारखं वाटते आहे. " त्या सर्व आठवणीत गढून ते उन्मनी अवस्थेत गेल्यासारखे दिसत होते. त्यांचे डोळे अर्धोन्मीलित होते. डोक्यावर गुंडाळलेला मफलर त्यांच्या मस्तकाभोवती एखाद्या प्रभावळीप्रमाणे शोभत होता. चेहऱ्यावर निद्रिस्त गौतम बुद्धाप्रमाणे एक शांत समाधानी मंद स्मित विलसत होते. जगीं सर्व सूखी असा कोण आहे या प्रश्नाचे उत्तर आमच्यासमोर खुरमांडी घालून अदृश्य सूत कातत बसले होते. सुताचा वापर कुणी कसा करावा त्यावर त्याचे यश अवलंबून असते असा एक विचार आमच्या मनात येऊन गेला. भाजपला सूत चांगले जमवता येते, कॉंग्रेसला ते काढता येते, तृणमूलला त्याची वात बनवता येते, माकपला त्याची वाट लावता येते, सेनेला सरळ असलेले वाकडे करता येते, मनसेला कुणी न विचारले तरी सरळ करता येते, आम्हाला नुसतेच कातता येते. लोकशाही लोकशाही ते यालाच म्हणतात काय? एक सूत सात जणांनी मिळून नष्ट करावे. गांधीजींनी उगाच चरख्याचा आटापिटा केला.

आम्ही पुण्यतिथी साजरा करण्याचा मानस आमच्या जगज्जेत्या (पक्षी: दिल्ली चतु:सीमा आणि हरियाणाचा काही दुर्लक्षित भाग) नेत्याच्या चरणी ठेवला आणि म्हणालो,"स्वामी! सैनिकांत मरगळ आली आहे. काही शिलेदारांनी आपली घोडी चौपाटीवर भाड्याने दिली आहेत, काहींनी तिथेच पाणीपुरी भेळेच्या गाड्या टाकल्या आहेत. काही जण सिक्युरिटी गार्ड झाले आहेत तर उरलेले होमगार्डमध्ये भरती झाले आहेत. आपले परदेशातील सांडणीस्वार हाकायला काही राहिले नाही म्हणून फावल्या वेळात खरोखरच्या शेळ्या हाकू लागले आहेत. आजही काही परमभक्त आपला स्काईपकॉल येईल म्हणून रोज लॉगिन करतात आणि दु:खी अंत:करणाने दिल्लीविजय पोथी वाचत बसतात. तो कॉल येतच नाही स्वामी! येतच नाही! हे सर्व आपणच बदलू शकाल. आपल्याला पुन: एकदा सोशलमीडिया प्रांती घोडदौड करताना पाहायचे आहे आम्हाला. पूर्वी आपण भाजपला लवलेटर पाठवावे काय इथपासून आता प्यांट बदलावी काय इथवरच्या सर्व प्रश्नी आमचे आणि जन्तेचे सल्ले घेत होतात. त्याने सैनिक भारावून जात असत. आपण नुसते एक ट्विट करायचा अवकाश आपले निष्ठावंत स्मार्टफोनधारी सैनिक टिवटीव (पक्षी:रीट्विट) करून एकच जल्लोष करत असत. रणांगणावर ऐन युद्धप्रसंगी आपल्याला प्यांट बदलता यावी म्हणून सर्व सैनिक कसे रोमन डिफेन्स फ़ॉर्ममध्ये आपल्याभोवती कोंडाळे करून आडोसा देत असत. मग त्यात आपण निर्धास्तपणे प्यांटच काय, काहीही बदलू शकत होतात. ते स्पिरीट पुन्हा आणा! तो युद्धाचा जोश परत आणा!" एवढे बोलून आम्ही थांबलो. दम लागला होता. भाषणाचीही सवय मोडली आहे. हे ऐकून माजी दिल्लीनृपतींच्या चेहऱ्यावर येशू ख्रिस्तासारखे करुणप्रेमळ भाव उमटले. "वत्सा! जा, सैनिकांत हे शुभ वर्तमान दे! दिल्लीवर पुन:श्च स्वारी करायची! होय. म्हणावे परजा तुमचे ते स्मार्ट फोन पुन्हा. समस्या त्याच आहेत, त्यामुळे आपली आश्वासने तीच आहेत, उपाय तेच आहेत. फक्त ते थप्पड वगैरेचं नाटक यावेळेला नको बुवा. नाहीतर बदल म्हणून यावेळी पृष्ठभागी लाथ वगैरे अॅरेंज करणार असाल तर यावेळी त्यासाठी पात्र वेगळे निवडा. त्यासाठी खूप गणंग आहेत पडलेले. आपल्या सुदैवाने भ्रष्टाचार काही संपत नाही. भाजप भ्रष्टाचारीच हे पुन: पुन: ओरडून सांगू. पुन: धुरळा उडवू. सत्तेत येऊ अथवा न येऊ. सत्तेत आल्यास पुन्हा आंदोलन करू आणि भव्यदिव्य पद्धतीने सत्ता सोडू. अर्थात, मागील निवडणुकीत आपण निवडून येऊ, मग खरंच काही करावं लागेल अशी चिंता आपल्याला सारखी कुरतडत होती. यावेळी तीही चिंता नाही. शिवाय गेल्या वेळी तिकीट दिलेल्या पस्तीस जणांना मी गाळले आहे. त्यात नऊ आमदार आहेत! आहे की नाही क्रांतिकारी हे सर्व?  पण चिंता करू नकोस. यावेळी प्रत्येकाला हुतात्मा होण्याची संधी मिळेल याची ग्वाही मी देतो. तो कुमार विश्वास आत्तापासूनच हौतात्म्यावर कविता करू लागला आहे. कविला सफल प्रेमापेक्षा प्रेमभंगच अधिक आवडतो हेच खरे. " हे वचन ऐकून उल्हसित व्हावे की नुसतेच हसित व्हावे असा विचार आम्ही करू लागलो. "मग, पुण्यतिथीचे काय? करायची ना साजरी?" आम्ही पुन: विचारले. एवढी मेहनत घेऊन लिहिलेले भाषण निदान पंधरावीस जणांसमोरतरी वाचायला मिळायला हवे एवढाच उद्देश. "म्हणजे काय? जरूर करायची! जुन्या आठवणींना उजाळा नक्कीच देता येईल. आमच्या फोटोला हारबिर घालू नका म्हणजे झालं. झाली एवढी हार पुरे."  नृपति हासत म्हणाले. ते म्हणजे फारच विनोदी बुवा. हार शब्दावरती पण कोटी करायची म्हणजे काय. पुण्यतिथीला फोटोला हार कसा घालू आम्ही? तो कार्यक्रम जयंतीला करू.

निवडणुकीचे चिंतन शिबीर ठरले.  धोरण काय असाच कार्यकर्त्यांचा प्रश्न होता. त्याचे सहजसुंदर निराकरण झाले. मुळात समस्या तीच, जन्ता तेच, शत्रू तेच तर मग धोरण बदलायचे कारण काय असा उलट प्रश्न नृपतींनी विचारला. ज्या धोरणावर आपण पूर्वी निवडून आलो तेच राबवायचे. मग कुणी तरी विचारले,"परदेशी धोरण, काश्मीर धोरण याबाबत काय करायचे?" त्यावर ते मिष्कीलपणे हसले आणि त्यांनी खिशातून गोल टोपी काढून दाखवली. ती फडकावत ते म्हणाले,"नेहमी खिशात ठेवा ही टोपी. कामाला येते. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रश्नाला 'भ्रष्टाचार!' एवढेच उत्तर द्या." मागेही त्यांनी आम्हाला हेच सांगितले होते. हे आम्हाला घरी महागात पडले होते. घरी यायला उशीर होतो म्हणून बायकोने झापले आणि विचारले होते,"रोज कसा काय हो उशीर होतो तुम्हाला? काय करत काय असता ऑफिसमध्ये?" आम्ही गाफील होतो. आमच्याकडून घोकंपट्टी केलेले उत्तर गेले,"भ्रष्टाचार!" पुढे समजावताना नाकी नव आले होते. त्यामुळे सर्वांवर भ्रष्टाचार हे उत्तर असू शकत नाही. हे एकदा आम्ही पक्षाच्या बैठकीत सांगितले तर दुसऱ्याच दिवशी "भ्रष्टाचारावरील तुमचा विश्वास उडत चाललेला आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. तेव्हा तुम्हांस पक्षातून काढून का टाकू नये?" अशी कारणे दाखवा नोटीस मिळाली. शेवटी आमच्या आळीतील "टुकार मारुती देवस्थान ट्रस्ट" विरुद्ध आंदोलन करून त्यांना त्यांचा वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर करायला लावला तेव्हा कुठे पुन्हा पक्षात स्थान मिळाले. ट्रस्टची वार्षिक उलाढाल नकद तीनशे साठ रुपये असून रंगकामावर रुपये दोनशेपन्नास खर्च दाखवण्यात आला होता. ट्रस्टपाशी केवळ दोनशेचाळीस रुपयांची पावती होती. दहा रुपये रंगाऱ्याच्या चहावर खर्च झाले हा ट्रस्टचा युक्तिवाद आम्ही मान्य केला नाही. शिवाय दर शनिवारी येणाऱ्या तीन ते पाच नारळांचा कुठेही उल्लेख दिसला नाही हेही आम्ही निदर्शनास आणून दिले. ट्रस्टने जाहीर माफी मागितली असून, यापुढील कारभारावर देखरेख करण्यासाठी अतिरिक्त सचिव म्हणून सध्या आमची नेमणूक केली आहे. असो. शिबीर संपल्यावर नृपतिंनी आम्हाला थांबवून घेतले आणि बोलले,"तुझे भाषण उत्तम आहे रे. जपून ठेव. पुढील पुण्यतिथीस उपयोगी पडेल." आम्ही ते केव्हाच ओळखले आहे.

No comments:

Post a Comment