फना चित्रपट आणि पीके यात काय फरक आहे? म्हटलं तर काहीच नाही म्हटलं
तर खूप काही. एकात दहशतवादाचे उदात्तीकरण तर दुसऱ्यात जे उदात्त आहे त्याचे
दहशतीकरण. मनोरंजन सुद्धा दहशत माजवते. उदाहरणार्थ झी टीव्ही च्या सासू
सून मालिका. त्यांनी तर "कौटुंबिक भयपट" हे नवीन दालन उघडले आहे. खानाच्या
दहशतीतून आपण बाहेर पडायला तयार नाही बुवा. काही दिवसांपूर्वीच अफझलखानाने
फौज पाठवून म्हाराष्ट्र काबीज केला. वास्तविक फौजेचा पाडावच व्हायचा, पण
आयत्या वेळी म्हाराजांना वाघनखं काय घावली न्हाईत. फुडल्या वेळेला पघू असं
म्हाराज म्हणाले आहेत. तो धुरळा खाली बसतोय न बसतोय तंवर या दुसऱ्या खानानं
स्वारी केली. काय हे सगळे खान भारताच्या राशीला लागले आहेत कळत नाही. एक
ककक क्किरन वाला खान, दुसरा चचच चश्मिष किरन वाला खान, तिसरा हिटअँडरन
वाला खान. पहिल्याचा माथेफिरू प्रेमी बघून घाबरलो होतो, दुसऱ्याचं
विदयुतमूत्रपरस्परसंबंध विषयक धक्कादायक ज्ञान पाहून काही दिवस बाथरूममधला
दिवा लावणं टाळलं होतं, तर तिसऱ्याच्या अफाट मैत्रिणीसंग्रहाबद्दल ऐकून
काहीसं थक्क आणि बरंचसं खिन्न होत होतो. कक्ककिरन खान सोडून द्या. म्हणजे देवाला बकरा सोडतात तसा आम्ही त्याला पापस्तानसाठी सोडला आहे. असे सोडलेले बकरे बहुतांशी जे करत गावभर फिरतात तेच हा पण करतो. याला ढुशी दे त्याला पाड. विशेषत: वानखेडे स्टेडीयम दिसले की याचे डोके फिरते. शेवटी कंटाळून स्टेडीयमच्या अधिकाऱ्यांनी म्हणे शिवसेनेच्या वाघाचे चित्र गेटवर लावले आहे असे ऐकतो. दृष्ट लागू नये म्हणून मिरचीलिंबू टांगावे तसे. एका दगडात दोन पक्षी. स्वत:च गेटवर पाहरा देत असल्याने पीच खणता येत नाही, आणि चित्र बघून हा बकरा तिकडे फिरकत नाही. सल्लूमियां तेवढे हुशार निघाले. दर गणपतीला लालबागच्या राजाचे दर्शन घेतात असे ऐकले. असं काही ऐकलं की आम्हां सहिष्णू हिंदू भोट मंडळींचे डोळे कसे भरून येतात. "तुम्ही काही म्हणा, सर्व धर्म सारखे हो. नमाज पढा, मोतमावलीला चर्चात जा किंवा किंवा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पाच तास रांगेत उभे राहा, चपला सगळीकडेच चोरीला जातात." असे आमचे मित्रवर्य श्री मोरेश्वर उर्फ मोरू याचे मत आहे. निधर्मीवादाचे याहून निष्पाप रूप आम्हांस माहीत नाही. त्यामुळे आम्ही यापैकी कुठेही गेलो तरी चपला पिशवीत घालून पिशवी पोटाशी धरून असतो. बाकी आमच्या निधर्मीवादाची आणखीही काही रूपे आहेत. त्यांचा उपयोग रोजांच्या दिवसांत शीरखुर्मा, बिर्याणी, तंदुरी, डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या पार्टीचे बोलावणे मिळवणे इत्यादी ऐहिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी होतो. आमचा स्वभाव एवंगुणविशिष्ट असल्याने आम्ही या खान मंडळींत आणि इतर हिंदू नटबोल्टांच्या चित्रपटात कधी फरक केला नाही. चित्रपट कुणाचाही असो, मध्यंतरात चहा आणि बटाटेवडा गरमागरम मिळाला की आमची फारशी तक्रार नसते. मोरू तर तीन बाहेर खातो आणि एक थेटरात घेऊन येऊन खातो. त्याला किती वेळा सांगितलं, अरे बाबा, तिथे ती हिरवीण छान मोहक, मादक दिसत हिरोच्या नाकापासून केवळ अर्ध्या इंचावर लाडात येऊन बोलते आहे, अशा वेळी लसूण घातलेल्या बटाटेवड्याचा खमंग वास नाकात घुसला की रसभंग होतो. आम्ही तुझ्या बटाटेवड्याकडे कौतुकाने पहायचं की पडद्याकडे? क्षणभर त्या नटाचंही चित्त विचलित होऊन तो म्हणायचा,"जरा थांब गो, हंयसर वड्याचो वास सुटलो आसा, मी पयलो भायेर जांवन वडो खातंय, मगे तुज्या गजाली ऐकतंय." माझ्या मनातील हिरो वैतागला की मालवणीत घुसतो. भद्रकाली प्रॉडक्शनची कृपा. तात्यांनू मापी करा.
मला हे असलं निधर्मी करण्यात हिंदी चित्रपटांनी भरपूर हातभार लावला आहे. मनमोहन देसाई या इसमानं तर माझंच काय माझ्या पिढीतल्या सर्वांचं बालपण संस्कारित केलं आहे. जत्रेत हरवणारी ती अश्राप भावंडं, निरुपा रॉय सारखी डीलक्स प्रेम करणारी (डीलक्सच. आमच्या मातोश्रींचं प्रेमळ बोलणं म्हणजे, हं ढोसा एवढं आणि उधळा गावभर! इथवर थांबायचं) त्यांची ती आई, घरात लक्ष न देता आपल्या काळे धंदे करणाऱ्या बॉसकडे जास्त लक्ष देणारा निष्ठावंत बाप. मग पुढं ही पोरं रीतसर हरवल्यानंतर आणि नियमाप्रमाणे आई आंधळीलंगडी झाल्यावर निधर्मीपणाला ऊत यायचा. एक श्रद्धाळू हिंदू घरात, दुसरं जाळीचा बनियन घालून कोंबड्या बकऱ्यांच्या गर्दीत मोहल्लेगिरी करणारं, तिसरं कुणीच नाही म्हणून चर्चच्या फादरकडे अशी सर्वधर्मसमभावी वाटणी व्हायची. या जत्रेत हरवायचा आम्ही एवढा धसका घेतला होता की कोकणातल्या आमच्या घरापासून अर्ध्या किलोमीटरवरती भरणाऱ्या जत्रेत मी आणि माझा भाऊ कधी एकत्र गेलो नाही. गावातील यच्चयावत जनता एकमेकाला ओळखत असतानासुद्धा आम्ही ही खबरदारी वयाच्या दहाव्या वर्षी घेत होतो हे मनमोहन देसाई यांचं कथालेखक-दिग्दर्शक म्हणून यशच म्हणावं लागेल. आज वाटतं गेलो असतो तर कदाचित आज आमचे बंधुराज एखाद्या धनाढ्य हिंदू कारखानदाराचे चिरंजीव आणि मी फादर ब्रॅगांझा यांच्या अनेक असल्या पाळलेल्या मुलांपैकी एक झालो असतो. मी शिकलो नसतो पण एक उत्तम गावगुंड म्हणून नाव कमावलं असतं. शर्टाची वरची दोन बटणं उघडी टाकून सेठी टेक्स्टाईल्स, सेठी एक्स्पोर्टस, सेठी बिल्डर्स, सेठी टाईल्स, सबकुच्च सेठी असल्या सगळ्या पाट्या एकाच गेट वर लावलेल्या बिल्डींगमध्ये भावाला भेटायला गेलो असतो. तिथं "ये मायकल किसीके लिये काम नै करता और जीझस छोडके किसीके सामने नै झुकता साब" टाईप डायलॉग मारले असते. मग पुढं यथावकाश एखादी झीनत अमान… जाऊ द्या, नशीब म्हणायचं. वाटायचं, कसलं आपण दररोज "भीमरूपी महारुद्रा" म्हणणारे भोट. चर्चात जायला हवं, तिथं म्हणे मासनंतर वाईन देतात. आपल्याकडे प्रसादाची वाट बघत अर्धा अर्धा तास आरत्या सहन करायच्या आणि शेवटी मिळणार काय तर फुटाणे किंवा शेंगदाणे. त्यातून शेवटचा तो एक कुजका शेंगदाणा. नको, नको! ती आठवण नको. पुढं मग ती आंधळी झालेली आई कैदेत ठेवलेल्या नवऱ्याला वाचवायला नेमकी शहरापासून दहा पंधरा किलोमीटर वर असलेल्या पडक्या किल्ल्यात येणं हाही एक दैवी चमत्कार असायचा. इथे साधं स्वारगेटवरून सदाशिवपेठेत जायला आढावसेनेच्या मनधरण्या कराव्या लागतात आणि इथं ही आंधळी लंगडी बाई, बस जात नाही रिक्षा जात नाही अशा आडवळणी जागेवर वेळेला हजर! दैवी चमत्कारच. मग आल्यासरशी काही तरी काम दिलं पाहिजेच. मग छानपैकी छातीत गोळीच लागायची. बाप वाचायचा. एवढी महान आई, पत्नी वाचवायचं काम आता भगवान, अल्ला आणि जीझस यांच्यावर येऊन पडायचं. मग देवळाचे कळस, मशिदीचे मिनार, चर्चची घंटा किंवा पियानो असे आळीपाळीने दाखवून आणि वाजवून झाले की या धर्मात आपसात कामाची वाटणी व्हायची. हिंदू धर्माकडे म्हातारीला मरू न देण्याचे, अल्लाकडे तिची दृष्टी परत आणण्याचे आणि जीझस कडे तिला स्वत:च्या पायावर पुन्हा उभे करण्याचे काम यायचं. कूलीमध्ये तर बच्चननं दर्ग्यातील चादर अंगावर येऊन पडल्यानंतर कित्येक गोळ्या छातीवर झेलल्या होत्या. त्याआधी तो ब्रीचकँडीमध्ये अॅडमिट झाला होता तो आणभवही कामाला आला म्हणा. हे असं सगळं असल्यामुळे का बरं आम्ही निधर्मी होणार नाही?
ही सगळी मजा या खान मंडळींनी हल्ली घालवून टाकली आहे. एक पन्नाशी ओलांडली तरी स्वत:ला एकविशीचा समजतो, स्वत:चं नाव राहुल असलं आणि हात फैलावून "मितवाsssss" केलं की सगळया लग्न झालेल्या न झालेल्या हिरवीणी येऊन गळ्यात पडतात असं त्याला वाटतं. किरणराव खाननं तर अलीकडे लोकांना खूप अपराधी वाटवण्याचं ठरवलं आहे. तारे जमीन पे मध्ये तो आईबापांना झापतो, एकूण समाजाला झापतो. ते पटलंही होतं. तसंच थ्री इडीयटसमध्ये आपल्या पोरांना कायपण करूद्या असा महत्वाचा संदेश दिला होता. त्यातील जीवघेणी स्पर्धा आणि काही ज्ञान मिळवण्यापेक्षा स्पर्धेत जिंकण्याची घाई या मुद्द्यांवर दिलेला भर पटला होता. या दोन्ही शिणमांत साहेब आपन सोता मातर लई हुशार पार्टी झाले होते. असं जनतेला डोस देऊन वर लै पैका मिळतो असं लक्षात आल्यावर मग रीतसर तो धंदाच करायचं ठरवलं. स्टार नेटवर्कमध्ये गाळा घेऊन टाकला. दुकानाचं नाव कसं आकर्षक पाहिजे, धंद्याला साजेसं. वर्षानुवर्षे भारतात चाललेलं, प्रत्यक्षात काही किंमत नसलेलं पण जाहीर चर्चेत मात्र सोन्याहून किमती असं वाक्य आयतंच मिळालं. सत्यमेव जयते! सदुसष्ट वर्षांत बिनमालाचं पूर्ण नफ्यात चाललेलं हे एकमेव जयते. पण खरं तर कच्चा माल भरपूर आहे. कर्मकांडाचं अवडंबर आहे, लोकांच्या दु:खाचं भांडवल करणारे बुवा आहेत, कुडमुडे ज्योतिषी आहेत. हिंदू सहिष्णुता पैशाला पासरी आहे. ती उत्प्रेरक म्हणून काम करेलच. आत्मनिंदा करण्यात हिंदू लोकांचा हात धरणारे कुणी नाही. इतर धर्मांत धर्माची टिंगलटवाळी क्षोभ उत्पन्न करते. हिंदू धर्मात तीच टिंगलटवाळी हास्य उत्पन्न करते. लोक पैसे टाकून ती टवाळी पाहतात. टवाळी करणाऱ्यांचा धीटपणा वाढतो. त्याला विरोध करणारे सनातनी ठरतात. विरोध करणारे काही धर्ममार्तंड नसतात. तो विरोध असतो टिंगलटवाळीला. धर्म ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. हिंदू धर्म सहिष्णु आहे म्हणजे काय तर ही वैयक्तिकता त्याने मान्य केली आहे एवढाच त्याचा अर्थ. सहिष्णुतेचा अर्थ म्हणजे तुम्ही तुम्हाला जी श्रद्धा असेल त्याची उपासना करा, मी माझ्या श्रद्धेची करतो. माझ्या श्रद्धेची टिंगलटवाळी करण्याची ती परवानगी नव्हे. बुवाबाजी, कर्मकांड हे टिंगलटवाळीचे विषय करून लोकप्रबोधन करायचे असेल तर ते ज्या ज्या धर्मात असेल त्याचे करा. हिंदू धर्माने सहिष्णुतेची धर्मशाळा उघडली आहे. त्यात कुणीही यावे, राहावे, पाहिजे तिथे शरीरधर्म करावा आणि निघून जावे अशी परिस्थिती झाली आहे. हाच प्रकार मशिदीत, मदरशांत करून पहा, तुमचा शीग कबाब होईल यांत शंका नाही. अंगाला नुसता स्पर्श केल्यानंतर पोलिओ झालेला चालू लागतो, मरणासन्न व्यक्ती बरी होते, असले ख्रिस्ती बुवाबाजीचे प्रकार सर्रास चालू आहेत त्याची टवाळी करा. हे सगळे थोतांड आहे ही "शुभ वार्ता" त्यांना द्या पाहू. टवाळीच करायची तर सर्व धर्मातील थोतांडावर करा. मग मानू आम्ही तुम्हाला निधर्मी. दु:खाची गोष्ट म्हणजे हिंदू लोकांतच ही स्वत:ची टवाळी करण्याचा प्रघात पडला आहे. घरचेच भेदी असले तर बाहेरचे तर फायदा घेणारच.
म्हणूनच आम्ही ठरवले आहे, स्वत:चे पैसे घालून आपलीच टिंगलटवाळी कशायला पहायची? त्यापेक्षा सनी देवलचे चित्रपट पाहू. लेकाचा बेंबीच्या देठापासून ओरडतो खच्चून, पण आपण थोर समाजसेवक असल्याचा आव तरी आणत नाही. व्हिसाबिसा नसला तरी पापस्तानात जाऊन तिथेही ओरडायची ताकद आहे त्यात. शिवाय हिंदू नाही, मुसलमान नाही, किरीस्तांव पण नाही. आपला शूरवीर शीख सरदार आहे. अमीरला म्हणावं कर टवाळी त्यांच्या पगडीची, रणछोडदास तर होईलच, वर दोन्ही तंगडूचं वांगडू नक्की होईल.
मंदार, तुझं बरसणं योग्य आहे. पण मला असं वाटतं आमिरखानला कटघरात उभं करून तू राजू हिरानीला मोकाट सोडतो आहेस. अमीर कोण? चित्रपट विधू विनोद ने बनवला आहे आणि राजू हिरानी ने डायरेक्ट केला आहे. आता आपली सद्सदविवेक बुद्धी १० अन पंधरा कोटीच्या समोर गुंडाळून ठेवणे यात नवल ते काय?
ReplyDeleteराहता राहिला प्रश्न धर्माच्या टिंगल टवाळीचा. यातही तू लिहिल्याप्रमाणे, जे उथळ पणे दाखवलं आहे त्यावर आक्षेप आहे. बुवाबाजीच्या अतार्किक पणाला त्याहून ही विचित्र अमानवीय स्पर्शातून डेटा ट्रान्स्फर ची संकल्पना दाखवणे हेच मुळी हास्यास्पद आहे.
बाकी ज्या पद्धतीने धर्माचा धंदा जो चालू आहे त्याने समाजाचं degradation होत नाही आहे असं जर आपण समजत असू तर आपण स्वत:ला फसवत आहोत.
राजेश, हिंदू लोकच स्वतः टवाळी करत असल्यामुळे बाकीचे सोकावणार हे मी म्हटलंच आहे. आता अमीरवर का टीका तर हे महाशय स्वतःला समाजसुधारक म्हणवतात, तसा कार्यक्रम करून कमाईही करतात. शिवाय ते चित्रपटाचा चेहरा आहेत. चोप्रा वगैरे मंडळी धंद्यालाच बसली आहेत. त्यांनी समाज वगैरे सुधारण्याचा प्रयत्न केत्याचा दावा केलेला नाही. ते फक्त स्वतः हिंदू असल्याचा फायदा घेऊन टवाळीचे पैसे करतात. बाकी धर्माचा धंदा ही गोष्ट वाईटच, पण सर्व धर्मातील असल्या गोष्टी दाखवण्याची हिंमत हे करत नाहीत हे मी मांडले आहे.
ReplyDelete