आयला, भलतीच भानगड होऊन बसली. एकदा साधेपणाचा ब्रँड घेऊन बसलो की झालं, पुढे आयुष्यभर बळेबळेच खादी नेसायला लावतात, सूत कातायला लावतात हो! अहो, निवडणुकातला साधेपणा तो काय, तो आवश्यकच होता. म्हणून आम्ही काय आयुष्यभर नॅनोतून फिरायचं? गांधींचं आपलं बरं होतं, जागेचा प्रश्न नव्हता. आश्रमच्या आश्रम होता बागडायला. इथं आम्ही एक सरकारी फ्लॅट काय घेतला, आमच्या साधेपणाची आयमाय निघाली. शिवाय पूर्वी विमान अथवा जहाजप्रवास फारसे कुणी करत नसत. मग इकॉनॉमी क्लास काय आणि बिझनेस क्लास काय, त्यांना अख्खं विमान किंवा जहाज मिळालं असेल गोलमेज परिषदेला जाताना. आणि मी मुंबईहून पुण्याला जायचं होतं तेव्हा नुसतं म्हटलं, जरा फर्स्ट क्लास इंद्रायणीचं तिकीट मिळतं का बघा हो, या लोकलमधून प्रवास करून जीव शिणला नुसता. माझं पाकीट गेलं, घड्याळ तर माझ्या डोळ्यासमोर कुणीतरी काढून घेतलं. ते वाचवायला हात सोडला असता तर थेट ताशी ६० किमीच्या गतीने रुळावर पडलो असतो. निम्मा दाराबाहेर लोंबकळत होतो. च्यायला त्यातून मुंबईचे लोक एक नंबरचे बदमाश नुसते. फास्ट लोकल धरली होती. घाटकोपर स्टेशनातून जाताना कुणीतरी सणसणीत सटका ठेवून दिला मला. पार्श्वभाग अजून ठणकतो कधी कधी. मुंबईतला आम आदमी असाच प्रवास करतो असं वर ऐकायला मिळालं. म्हटलं पुण्याला जाताना तरी निदान पार्श्वभाग पूर्ण टेकायला मिळाला तर किती बरं असं वाटत होतं. पण तेही नाही. पक्षाकडे निधी नाही म्हणून रात्रीच्या पुणे पॅसेंजरने जा म्हणे. दिल्लीतून निघताना ही म्हणालीच होती, "मुंबईला जाताय, धड परत या म्हणजे मिळवली. आणि हो, तुमच्या त्या आम बिम भानगडीतून माझी आणि मुलांची आठवण झालीच तर लिंकिंग रोड का काय आहे म्हणे तिथून काही कपडे तरी आणा. तुमच्यासाठी मफलर बिफलर स्वस्तात मिळतो का पहा. दोन वर्षं झाली एकच वापरताय!". युद्धाला चाललेल्या योद्ध्याला ओवाळताना,"जरा युद्ध सांभाळूनच करा बरं का! मागच्या युद्धात सुरवार नको तिथे फाटली होती. आता ठिगळ लावलंय तसं, पण केव्हाही उसवेल हो!" असं म्हटल्यावर जे होत असेल तसंच माझं झालं. पण एक सांगतो, मुंबई पुणे पॅसेंजरमधील लाकडी बाकातील रेसिडंट ढेकूण हे एक भीषण सत्य आहे. पण एक बरं झालं, पार्श्वभाग जो ठणकत होता तो थांबून खाजायला लागला. ठणक्यापेक्षा खाज बरी! पण हा ठणका परवडला असा अनुभव दुसऱ्या दिवशी पुणेकरांनी दिला. पुण्यातील सभेत सर्व समाजातील, सर्व वयोगटातील लोक हजर होते. तिकीट नसेल तर पुण्यातील लोक शोकसभेलाही तितक्याच उत्साहाने जातात असे कळले. त्यातील इयत्ता तिसरीतील पुणेरी विद्वानाने (पुण्यात सर्व लोक विद्वान या नावाने संबोधले जातात असे मला आधीच बजावून सांगण्यात आले होते.) प्रथम "नीट ताठ उभे राहा" असे खडसावून सत्तर-ऐंशीच्या दशकातील बालसंस्कृती परत आणण्यासाठी तुम्ही काय कराल असे विचारले. त्यावर मी गमतीने गेलेले "बाल" परत येत नसतात अशी कोटी केली तर "तुमच्या या उथळ विधानाचा मी निषेध करतो. तुमचा पक्ष आमच्या समस्या काय सोडवणार? तुम्हाला अजिबात कशाचे गांभीर्य नाही." असे म्हणून त्याने सभात्याग केला. जाताना,"अंकल, पण तुम्ही आमच्या रिक्षावाल्या काकांसारखे दिसता हं." असे म्हणायला तो विसरला नाही. नंतर एका बॅकपॅक लावलेल्या तरुणाने,"आपण दिल्लीत आम्हाला सही पेरू दिलात. जबरी हं काका! यंदाच्या पुरुषोत्तम करंडकाला आमच्या नाटकाचं दिग्दर्शन कराल का तुम्ही? 'दिल्लीचं काय करायचं' अशी एक छोटी नाटिका आहे. दिग्दर्शक मध्येच सोडून गेल्यानंतर नाटक कसं पोकळीत चालू राहतं, त्याला भेदक वास्तवता कशी येते अशी काहीशी संकल्पना आहे. अलिप्ततेचं (alienation) तंत्र प्रभावीपणे तुम्हीच दाखवाल. या तंत्रात प्रेक्षक अलिप्त होऊन नाटक पाहतो, नंतर घरी जाऊन पश्चात्ताप करत बसतो. " त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या तंत्राचं प्रात्यक्षिक तिथल्यातिथेच करून दाखवलं. पण एक वृद्ध गृहस्थ मात्र माझ्याकडे पाहून मान डोलवत होते. माझे सर्व भाषण त्यांना पटले असावे. मी स्वत:च त्यांच्याकडे गेलो आणि नमस्कार केला. "आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक आमच्या पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देताहेत हे पाहून आनंद झाला. " असे मी म्हणालो. तर त्यांनी चारचौघांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात "अॅं!!!" असे उद्गार काढले. मग नंतर त्यांच्या काहीतरी लक्षात येऊन त्यांनी शर्टाच्या खिशातून ऐकू येण्याचे यंत्र बाहेर काढले आणि कानात बसवले. म्हणाले,"हां! आता बोला! संपलं का तुमचं भाषण? शिंचे हे यंत्र लावण्याचे नेहमी विसरतो मी. सवय नाहीये ना अजून! शिवाय घरी काही उपयोग नाही म्हणून काढूनच ठेवलेले असते. ह्या: ह्या: ह्या:! तुमचेही कुटुंब असेच बोलत असेल ना घरी! असो, फिरत फिरत या बाजूस आलो होतो, तुमच्या सभेचा बोर्ड दिसला. म्हटलं बघावं काय आहे ते. काही काही वेळा काहीतरी मनोरंजक सापडते. मागच्या आठवड्यात कुणी तरी असेच लडाखला जाऊन आले त्या प्रवासाचे फोटोसहित कथन होते, मज्जा आली. मानसरोवर काय सुरेख दिसते हो!" कार्यक्रम संपला तेव्हा डोके अशक्य ठणकू लागले होते. म्हटलं परत मुंबईला जाताना आता सीटवर शीर्षासन करून डोके ढेकणांच्या ताब्यात द्यावे.
आमचे बाकीचे सगळे लेकाचे बिझनेस आणि फर्स्ट क्लासने प्रवास करणारे. प्रशांत भूषण स्वत:चा व्यवसाय आहे म्हणून करतो, कुमार विश्वासचं तर काही बघायलाच नको. परवाच बिझनेस क्लासचं तिकीट तीस शेरांना पडलं म्हणून सांगत आला होता. तिकीट शेरावर विकतात? मला तर काही लाख चंदकिशोर लागतील म्हणून सांगत होता माझा एजंट. म्हणालो, बरं तुम्हाला वजनावर विकतात हे लोक! तशी म्हणाला, अहो ते तसले शेर नव्हेत काही. हे शेर म्हणजे म्हणजे माझ्या कविता. तुम्ही माझ्या कविता ऐका कधी तरी. लोक तिकीट काढून ऐकायला येतात. असतील बापडे. मी कुठल्याही नाटकसिनेमाला थेटरमध्ये गेलो की मला फक्त मध्यंतराचे वेध लागतात. आणि मध्यंतरानंतर "धी एंड" चे. मुशायरे वगैरे असतील तर मी कॉफी फुकट मिळते म्हणून शेवटपर्यंत बसतो. बाकी काही म्हणा हिज्र, मरासिम असले घनघोर उर्दू शब्द ऐकले की दचकायला होतं. कसं काय हो कुणाला हिज्र वगैरे म्हणायचं? कधी कधी मला वाटतं या आमच्या सगळ्या लोकांमध्ये मीच खरा आम आदमी आहे. पण हा कुमार, माणूस बरा आहे मनाने तसा. आता वेळीअवेळी होतात कविता त्याला, तो तरी काय करील? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पण त्यातूनच त्याने त्याचा बिझनेस उभा केला आहे हे लक्षणीय आहे. त्यामुळे बिझनेस क्लासमधून फक्त बिझनेसवाले लोकच जातात असे आजवर वाटायचे. मी तर नुसतं बिझनेस क्लासमधून गेलो. आपले वडाप्रधान तर अक्खा बिझनेस क्लास बरोबर घेऊन जातात. बघावं तेव्हा हे परदेशात. एनआरआय (नॉन रेसिडंट इंडियन) लोकांना आणि आरएनआय (रेसिडंट नॉन इंडियन) लोकांचा परदेशी पैसा परत आणण्यासाठी म्हणून गेले ते स्वतःच एनआरआय होऊन बसले. आता काळा पैसा राहूद्या, तुम्ही तरी आधी परत या अशी मागणी होऊ लागल्याचे ऐकतो. हे म्हणजे आमच्या लहानपणच्या गोष्टीसारखे झाले. माझ्या आत्तेभावाला काही कामासाठी पाठवलं की तो बराच काळ येतच नसे. मग त्याला शोधून परत पिटाळत आणण्याच्या कामगिरीवर माझी नेमणूक होई. निघताना आई सांगे,"उगाच तोंड वर करून वरावरा फिरत बसू नकोस!" मग पुढे आमचे बंधुराज कुणा डोंबाऱ्याचा खेळ पहात उभे असलेले आढळायचे. मग मीही सगळे विसरून त्याच्याबरोबर तो पाहत उभा राहायचो. पूर्वी बडोदा संस्थानचे राजेसाहेब बाहेरचे पाणी वापरायचे नाही म्हणून हंडेच्या हंडे जहाजावर लादून घेऊन जात असत अशी एक दंतकथा आहे. मोदी ढोकळा अने ठेपला घेऊन जातात की नाही त्याची कल्पना नाही. बहुधा असावेत. मग तो साठा संपला की भारतात यावे लागते. जायला कशाला लागते कुणास ठाऊक. आम्ही नाही स्काईपवर बोलत? आम्ही येतो म्हटले की आमचे परदेशातील कार्यकर्ते ,"अहो कशाला? बीपीओ तत्वावर चालवायचं हे सगळं. खर्च कशाला?" असं म्हणतात. त्यांना काय रात्रीच्या ऑफशोअर कॉल्सची सवय आहे. इथे मला मफलर गुंडाळून रात्रीअपरात्री जागत बसावे लागते.
तेव्हा मंडळी, उगाच बिझनेस क्लासचा बिझनेस करू नका. चांगले मुद्दे असतील तर जरूर भांडा. पण हे अगदीच चीप होते आहे. आपण वर सरकारी विमानातून हिंडायचे आणि खाली कुणी स्वत:च्या पैशाने टॅक्सीतून हिंडले तरी बोंब ठोकायची असा हा प्रकार आहे. कधी नाही ते आम्हाला कुठे तरी कसला तरी मान मिळत होता. आता सन्मान करायला बोलावल्यावर प्रमुख पाहुण्याला काय यष्टीतून या असे सांगणार? यथोचित सन्मानानेच बोलावणार ना? पब्लिकचा (पक्षी:पक्षाचा)पैसा वापरून जायचे असेल तर आम्हाला लोकल अथवा पॅसेंजरनेच प्रवास करावा लागतो, किंबहुना आम्ही तो करतोच. पब्लिकच्या पैशाची एवढीच चिंता असती तर पर्वा महाराष्ट्रात शपथविधीच्या कार्यक्रमावर असले किती बिझनेस क्लास खर्च झाले असतील हो?

No comments:
Post a Comment