जितुद्दिन संभ्रमात पडला होता. साहेबांनी आज थेट इशारा दिला नव्हता. सांकेतिक इशारा जितुद्दिनला कधीच समजत नसे. साहेब त्याला "जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं" म्हणत तेव्हा तो बारीक डोळे करून विचार करी, साहेब चेष्टा करताहेत की कौतुक हे त्याला समजत नसे. वरिष्ठं वगैरे ठीक आहे पण आपल्याला बुद्धिमतां का म्हणताहेत हे त्याच्या बुद्धीच्या पलीकडचे असे. मागे साहेबांचे काका एकदा इस्त्रायलला जाऊन ठिबकसिंचन योजना पाहून आले होते. त्या भेटीचा दूरगामी परिणाम साहेबांच्या शेतकरी कुटुंबावर झाला. शेतातील लोटा परेड बंद होऊन छानपैकी कमोड परेड आली पण अजून त्या घरात ठिबक योजनाच राबवण्यात येते. येक येक थेंब मोलाचा. म्हंजे पाण्याचा. धरणांपासून धोरणांपर्यंत इथे थेंब तिथे ठिबक हा मंत्र राबवला जातो आहे. दिसली समस्या की तंगडी वर करून धीमे धीमे टिप टिप सुरू करा असा सल्ला साहेबांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. कळत नसेल तर मान्नीय दादासाहेबांचे अनुकरण करा असेही सांगितले गेल्याचे ऐकतो. जितुद्दिन हे आघाडीचे कार्यकर्ते. आघाडीचे म्हंजे येकदम फर्ष्ट लायनीतले. त्याचा आघाडी सरकारशी काही संबंध नाही. यांची नजर साहेबांच्या हातावर खिळलेली असते. एक बोट हलले की चारी पायांवर उभे राहायचे, ते बोट एखाद्या दिशेने वळले की त्या दिशेने भुंकत चौखूर उधळायचे, जो दिसेल त्याला चावायचे, दोन बोटे वर झाली की साहेबांना बहिर्दिशेला जायचे आहे हे ओळखून जागेवर बसून राहायचे, शेपूट हलवत त्यांच्या मागेमागे जायचे नाही, असे अनेक हस्तसंकेत त्यांना माहीत आहेत. साहेबही प्रेमाने त्यांना वेगवेगळ्या क्रीडा, क्लुप्त्या शिकवत असतात. बेरजेचं राजकारण हा साहेबांचा प्रेमाचा विषय. पण या बेरजा हातचा घेऊन नाही तर हातचे राखून कसे करायच्या हे कसब अजून साहेबांनी कुणाला शिकवलेलं नाही. दिल्लीत जाऊन जगदंबा दर्शन करत बेरीज करायची आणि गल्लीत परत येऊन त्यातला हातचा काढून घ्यायचा हे साहेबांचे तंत्र. आता विधानसभा निवडणुका समोर दिसत असल्याने वेगवेगळ्या बेरजा दिसू लागल्या आहेत. कुठली बेरीज केली म्हणजे चड्डीवाल्यांच्या संख्येपेक्षा जास्त येईल बरे? अशा वेळी मग ठेवणीतील हातचे दिसू लागतात. हिरवे प्रेम उफाळून येते. जितुद्दिन आतुरतेने साहेबांकडे पाहत होताच. या वेळी साहेबांनी बोटे अथवा हात हलवला नाही. उलट त्यांनी डोके जमिनीवर टेकून आपला विस्तीर्ण पार्श्वभाग ऊर्ध्वदिशेला केला. प्रथम वाटले साहेब बैठकीत बसल्याबसल्या पुढे कोलमडले. दादापण तिथेच होते. पण त्यांना कोणतीही ऐसपैस मोकळी जागा दिसली की त्यांच्या डोक्यात सातबाराचा उतारा, खरेदीपत्र, भूसंपादन, लवासा असलंच काही तरी चालू होतं. आत्तापण तसंच झालं. ते टक लावून साहेबांच्या पार्श्वभागाकडे पाहतच राहिले. जितुद्दिन मात्र भानावर येऊन लगबगीने पुढे झाले आणि त्यांनी अदबीने साहेबांच्या खांद्याला स्पर्श केला. "साहेब, काही होतंय का? महाराष्ट्र सदनातील उसळबिसळ खाल्लीत की काय? काल मीसुद्धा खाल्ली. लेकाचे नुसता सोडा घालतात भरमसाट. मग असंच पवनमुक्तासन केल्यावर बरं वाटलं होतं." हे शब्द ऐकल्यावर साहेबांच्या मागे बसलेले दादा विंचूदंश झाल्याप्रमाणे ताडदिशी उठले आणि बाजूला जाऊन बसले. "मायला, मागं एकदा अस्संच ग्गाफीलपणे सापडलो होतो. ऑक्सिजनवर ठ्ठेवायची पाळी आली होती." असं पुटपुटणं ऐकू आलं. जितुद्दिन मात्र अत्यंत इमानी आणि विश्वासू प्रकारचे सेवक असतात त्याप्रमाणे जिवावर उदार होऊन वाट पहात थांबून राहिले. पाच मिनिटांनी साहेबांनी आसन मोडलं. "लोकहो, इतकी वर्षं आमच्याबरोबर राहून तुम्ही फक्त वजाबाक्याच कशा शिकला? रोजे चालू आहेत. विधानसभा समोर दिसताहेत. वर्गसमीकरणात अ आणि ब वाट्टेल तेवढे बदलोत, कॉन्सटंट क आपल्या बाजूनं केला की काम झालं." साहेब वदले. "आयला न्हेमी अस्सलंच क्काहीतरी सांगायचं आणि मग क्कार्यकर्त्यांनी भलतंच काही केलं की कानपिचक्या द्यायच्या. स्सगळीकडं नुसती धोरणं यांची." दादा पुटपुटले. जितुद्दिन "काय भारी बोलत्यात, पन काय तरी समजेल आसं सांगा स्वामी" असे भाव चेहऱ्यावर घेऊन उभे होते. साहेबांनी एक खिन्न नि:श्वास सोडला आणि म्हणाले,"आपल्याला हे रोजेच निवडणुकीतून तारतील. तेव्हा काय पण करा, रोजे घाला, इफ्तार पार्ट्या करा, विणलेल्या टोप्या घाला, पण ही जित्रापं आपल्या गोठ्यात आणा रे बाबांनो. म्हटलंच आहे, ज्याच्या हाती काठी तो गुराखी. " जितुद्दिन नम्रपणे म्हणाला, "साहेब, आपली जित्रापं मी कधीच आणून गोठ्यात बांधली, वैरणपाणी बघूनच आलो आहे. साहेब, आपली आवडती म्हस, सनी, पोटुशी आहे बरं का! शेजारपाजारातून आत्त्तापासूनच खरवसाचं बुकिंग यायला लागलं आहे. मी सांगितलं आहे, पहिला चीक सायबांच्या पोटात जाणार, मग तुमच्या. साताऱ्यातून एक निनावी फोन आला होता खर्वसासाठी. मी ओळखलंच कुणाचा ते. बघू असं सांगितलं त्यांना. तर रेडा कुणाचा असं विचारत होते. भयंकर आगाऊ माणूस! हा काय प्रश्न झाला? खर्वस खायचा तर रेडा कशाला बघायला हवा?" साहेबांनी खिन्नपणे जितुद्दिनचे मस्तक थोपटले आणि दादांना म्हणाले, सांगा याला जरा समजावून. "पण जे काही करायचं ते लवकर करा, ते मेणबत्ती मोर्चावाले आपल्या पुढे गेले आहेत. अभिनयात ते आपल्या पुढे आहेतच. तो मेणबत्तीमोर्चा, ते डोळ्यातील पाणी पाहून असं वाटलं की यांची कुटुंबं गाझामध्ये आहेत आणि हे भारतात नोकऱ्या करतायत. मेण वितळायच्या आधी आम्हीच वितळलो क्षणभर."
जितुद्दिन बैठकीतून बाहेर आला तोच ज्याला त्याला मुजरा घालत. टोपी नव्हती म्हणून डोक्याला रुमाल गुंडाळला होता. सायबांनी गाझा वाचवायला सांगितलं आहे म्हणाला. कुणापासून असा प्रश्न कुणीतरी विचारल्यावर जितुद्दिन बावचळला. "कुणापासून म्हंजे? जातीयवादी शक्तींपासून! सायबांनी आधीच म्हटलं होतं हा देश चड्डीवाल्यांच्या ताब्यात जाता कामा नये. तरी तुम्ही चड्डीला धरून राहिलात. घ्या आता, भोगा कर्माची फळं. झाला ना गाझावर हल्ला? पण त्या गाझाबांधवांना सांगा, आम्ही आहोत म्हणावं अजून जिवंत. आम्ही तुमच्या बाजूनं आहोत. सर्वतोपरी सहाय्य करू आणि जातीय शक्तींना विरोध करू. " अवाक झालेल्यांपैकी एकानं विचारलं,"काय हो, आज सकाळी सकाळीच? बरं वाचवणार म्हणजे काय करणार?" त्यावर जितुद्दिन जोशात म्हणाला,"हा काय, शिंप्याकडेच निघालो आहे. सायबांनी 'गाझा वाचवा' असं लिहिलेले टीशर्ट बनवून घ्या असं सांगितलं आहे. मला स्वत:ला उभं राहून शिवून घे म्हणाले आहेत. आमचा शिंपी म्हणजे तद्दन मूर्ख मनुष्य आहे. मागे लोकसभेच्या वेळी फोनवरून ऑर्डर दिली होती. घोषणा होती "भगाव चड्डी, सेव्ह राष्ट्रवादी". आता ऑर्डर देणार आमचे आबा. त्यांचं बोलणं म्हणजे दिव्यच. तंबाखूची गोळी लावून बसले असणार. तोंडात गुळणा धरून यांनी काय सांगितलं देव जाणे, आमच्या शिंप्यानं "बचाव चड्डी, शेव्ह राष्ट्रवादी" असं छापून टीशर्ट केले. आता आम्ही काय ते घातले नाहीत, पण आमचं शेव्हिंग व्हायचं ते झालंच. म्हणून या वेळेला स्वत: उभं राहून स स सशातला, सेव्ह, असं म्हणून घेऊन त्याच्याकडून बनवून घेणार आहोत. दादांनी खास XXL साईझ सांगितला आहे. हल्ली म्हणे प्यांट घालायचा कंटाळा येतो त्यांना. नुसताच टीशर्ट घालणार आहेत. मी पण मोठा साईझचा ऑर्डर करणार आहे. जेवढा शर्ट मोठा तेवढी आमची कळकळ मोठी असं नाही का? आणि खरं तर ये मेरे पापी पेट का सवाल है. म्हंजे जरा जास्तच सुटलं आहे हो! घट्ट शर्ट घातला की श्वास घ्यायचे वांधे होतात. हे टीशर्ट घालून आम्ही सक्काळी पाच वाजता महंमदअली रोडवर भेजा फ्राय खायला जाणार आहोत. साहेब म्हणाले आहेत, आपला गाझा पाठिंबा महंमद अली रोडवर पोचला की गाझात पोचलाच म्हणून समजा. आम्ही तर सायबांच्या दोन पावलं पुढं जाऊन आमची सुंताच करून घेणार होतो. पक्षासाठी "ती" प्रसववेदनासुद्धा सहन करायला मी तयार आहे. पण आम्ही सुंता करून घेतली ते आमच्या बांधवांना दिसणार कसं हो? आणि कळलं नाही तर आमचा गाझा पाठिंबा त्यांना कसा कळणार? म्हटलं फुकटच आपला ओरिजिनल स्पेअरपार्ट कशाला रिपेअर करा? तेव्हा आपला टी शर्टच बरा.
No comments:
Post a Comment