आमच्या लहानपणी कोकणाचा कॅलिफोर्निया कधी अन कसा होईल या विषयावर लिहून लिहून बोरूलेखण्या थकत नसत. निसर्गदत्त सौंदर्य असलेली ही भूमी. विकास भूमीचा करायचा की भूमीपुत्रांचा? कॅलिफोर्निया करायचा म्हणजे नेमके काय करायचे? त्यावर लिहिणारे आणि बोलणारे किती जण कॅलिफोर्नियात
जाऊन तिथल्या विकासाची संकल्पना समजावून घेऊन आले होते हे माहीत नाही. मी
स्वत:ही एका निबंधस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक मिळवल्याचं आठवतं. काय लिहिलं होतं देव जाणे. पण आज जर तोच निबंध लिहायचा झाला तर तो नक्की वेगळा लिहीन. निबंधस्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा, परिसंवाद, तर काही नुसतेच वाद, या सर्वांतून कॅलिफोर्निया भरून वाहे आणि शेवटी अरबी समुद्रात विलीन होई. डोक्यावर इरली घेऊन भातलावणी करणाऱ्या बायका, ते खपणारे गडी तसेच कोरडे राहिले. कोकणातील शेती म्हणजे काही घाटावरल्या शेतीप्रमाणे नाही. एखादा छोटासा जमिनीचा तुकडा, त्यावर वाऱ्याने सळसळणारी भाते, शेजारीच छोटेसे घर. शेणाने सारवलेले स्वच्छ खळे, बाजूला गोठावजा शेड, त्यात एखादी एखाददुसरे जनावर. या सर्व सरंजामातून जेमतेम घरापुरते दूधदुभते, भात निघणार. त्यातीलच काही बियाणे म्हणून पुढच्या पावसाळ्यासाठी राखून ठेवायचे. घाटावर सहकाराचा जसा प्रभाव तसा कोकणात आला नाही. सहकारवाल्या टोपीवाल्यांनीही कोकणात फारसा रस दाखवला नाही. भात, नारळ म्हणजे काही ऊस नव्हे. आंबा, काजूला सध्या सोन्याचा भाव आहे, पण उत्पादन तसे मर्यादित आणि धनदांडग्या शेतकरी अथवा एजंटांच्या ताब्यात. सर्वसामान्य कोकणी माणूस हापूस आंबा खात नाही किंवा भातात काजूही पेरत नाही. सरंग्याची एखादी कुडकी, किंवा बोंबील असंच काहीतरी जेवणात असायचं. अगदीच भटवाडीतील असेल तर पातळ पेज, लोणचे आणि एखादा पापड. हे असं काही असलं तरी कोकणात काम करणाऱ्याला दोन वेळचं जेवण महाग नसायचं. आजही नाही. कुठं भिकारी फारसे दिसायचे नाहीत, अथवा घरदार नसलेले देशोधडीला लागलेले कुणी दिसायचे नाहीत. हवा शुद्ध होती, काळाकरडा धूर ओकणारी कारखान्यांची धुराडी दिसत नव्हती. गर्द हिरव्या झाडीत, डोलणाऱ्या माडांत, नागमोडी लाल मातीच्या रस्त्यांत गावं शांतपणे वसलेली होती. सकाळी देवळातून घंटांचा नाद ऐकू यायचा. विहिरीवरील रहाटाची कुरकुर ऐकू यायची. जाग आलेली असे पण अंथरुणात पडल्यापडल्या डोळे मिटून हे आवाज ऐकत राहायचं. कोकणातील सकाळ अशी अलगद उठवायची. पुढं घाटावर शहरात गेल्यावर त्याची प्रकर्षानं जाणीव झाली. शहरात जाग यायची ती म्हणजे कर्कश गाड्यांच्या आणि त्यांच्या हॉर्नच्या आवाजानं. निसर्ग आणि कोकणी माणसाचं जगणं हे एक अद्वैत होतं. परस्परपूरक होतं. निसर्गनाश करून माणसाचा विकास होत नाही हे पृथ्वीवर सर्वत्र दिसत आहे. तरीही आपण एक विचित्र अनैसर्गिक अशा विकासाच्या मागे लागलो आहोत. विकास म्हणजे जंगलतोड, धूर आणि रसायने ओकणारे कारखाने, खाणकामे करून ढळवलेला भौगोलिक समतोल, सायकली ते मोटरसायकल ते गाडी, सारवलेले अंगण असलेले टुमदार घर ते अनेक मजली इमारतीत हरवून गेलेला एखादा कोपऱ्यातील स्वतंत्र गच्चीअसलेला फ्लॅट, जत्रेला जाणं ते बँकाॅक-पट्टायाच्या सहली, आवळीभोजन वनभोजन ते कॉण्टिनेन्टल रेस्तरॉमध्ये लंच अथवा डिनर, उडप्याच्या हॉटेलातील डोसा ते मॅकडोनाल्डचा बर्गर… असं काहीसं झालं आहे. लोकांकडे पूर्वी काय नव्हतं ते या विकासातून मिळणार आहे? काही लोक पर्यटनातून विकास करायचा म्हणताहेत. परंतु नीट ऐकलं तर ते पर्यटनासाठी मूलभूत सुविधा म्हणून केवळ इमारती, हॉटेले, क्लब्ज, बोलिंग अॅलीज, गोल्फ कोर्स हे असलंच काहीतरी काढून बसणार आहेत. मोठ्ठे मोठ्ठे प्रकल्प आणणार ते स्थानिक लोकांना रोजगार पुरवण्याच्या नावाखाली. म्हणजे आज जे मुंबईत जाऊन भांडी घासता ती घरी बसून घासा. पण आमचा कोकणचा तो थोर विकासपुरुष आपण किती समाजाभिमुख विचारसरणीतून हे थोर कार्य करतो आहे ते घशाच्या शिरा ताणून सांगत असतो. ऐकले नाहीत तर राजीनाम्याचे नारायणास्त्र वापरीन असे म्हणत असतो.
गाडगीळ अहवाल लागू झाला आणि कोकणातील गावे इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात गेली तेव्हा हे थोर विकासपुरुषच नव्हे तर तात्त्विक बैठकीची फुशारकी मारणारा भाजपसारखा पक्षसुद्धा वेगळा नाही हे दिसले. एकाने आपल्या राडा स्टाईलच्या सवयीने विरोध केला, तर निवडणुकीपूर्वी उतणार नाही मातणार नाही अशी ग्वाही दिलेल्या भाजपने सत्तेत आल्याआल्या सत्यनारायण घातल्याप्रमाणे हा अहवाल धाब्यावर बसवून खाणमालकांचा, लवासावाल्यांचा आणि तत्सम धंदेवाल्यांचा मार्ग मोकळा केला. ही मंडळी एकमेकांची राजकीय विरोधक पण या बाबतीत एकदम एकमतवाली. शेवटी निवडणूक निधी देणारे दोन्ही घोड्यांवर पैसे लावणार. हा जिंकला तरी चालेल, तो जिंकला तरी चालेल. पैसेवाले नेहमीच जिंकतात. प्रत्येक वेळेला हरते ती सामान्य जनता. केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी मुद्दा योग्य मांडला, पण दोघांनाही या मुद्द्यावर यश मिळवता आले नाही. याचा अर्थ तो मुद्दा चुकीचा आहे असे अजिबात नाही. जो पक्ष धनदांडग्या लोकांसाठी आहे त्याला विरोध व्हायलाच हवा, त्यांच्यावर अंकुश आणायलाच हवा. भाजपला स्वतंत्र अशी संघाच्या विचारसरणीची बैठक आहे, तर संघाने या निर्णयाला विरोध का केला नाही? दुर्घटना घडली की संघाचे कार्यकर्ते मदतीला धावतात हे चांगलेच आहे. पण इथे भाजपच्याच निर्णयाचे दूरगामी परिणाम म्हणून पुढे ज्या दुर्घटना घडतील त्या टाळता का येऊ नयेत? बरं गाडगीळ अहवालसुद्धा काही अगदी पर्यावरण हिताचा आहे असं नाही. सरकारने स्वत: नेमलेल्या समितीचा अहवाल जसा असायचा तसाच तो आहे. सरकारला खूष करणारा आणि स्थानिक जनतेला तक्रार करायला वाव न देणारा. मग या सर्व टोपीकुमारांचा या अहवालाला विरोध का? उत्तर सोपे आहे. गाडगीळसाहेबांनी आपली तैलबुद्धी वापरून एक ग्यानबाची मेख मारून ठेवली आहे. अहवाल मुळीच म्हणत नाही की या गावात उद्योगधंदे आणू नका. तो एवढंच म्हणतो की स्थानिक स्वराज्यसंस्था, ग्रामपंचायतीने होकार दिला तर वाट्टेल तो गोंधळ घाला. थोडक्यात तुम्हाला तुमच्या पर्यावरणाची वाट लावायची इच्छा असेल तर खुशाल लावा. आणि इथेच गोंधळ झाला. आतापर्यंत राजकीय नेते बड्या कारखानदार, उद्योगपतींशी साटेलोटे करून या जमिनी आपल्या बापाच्या असल्यासारख्या त्यांना आंदण देत. आता पंचाईत झाली. स्थानिक लोक, ग्रामपंचायत हे निर्णयाचे अधिकारी असणार. अर्थात मोठे राजकीय नेते स्थानिकक्षेत्रात आपापले चमचे अधिकारावर असतील याची खात्री करून घेतातच, पण तो एक अटकाव निर्माण झाला. नाना प्रकारच्या शासकीय प्रक्रिया आल्या. शिवाय कोकणातील लोक हे तैलबुद्धीचे. नको तो प्रकल्प आणला तर जबर विरोध करतात, प्रसंगी मुलाबाळांसकट निवडणुकांतून उठवतात. मग हे सर्व पक्ष एकत्र झाले आणि त्यांनी ही संवेदनशील क्षेत्रातील गावे बाहेर काढली. पेनच्या एका फटकाऱ्यात कोकणातील पर्यावरणाची आईमाई उद्धरली. आज काही लोकांना आनंद होत असेल, रोजगार मिळणार, भरभराट होणार अशी स्वप्ने ते पाहत असतील. आज हे लोक आपल्या साध्या पण स्वत:च्या टुमदार घरात राहत आहेत. स्वच्छ हवेचा श्वास घेत आहेत. काबाडकष्ट करत आहेत परंतु त्यांना उपासपोटी झोपायला लागत नाही. हेच लोक उद्या वन बीएचके, फार तर टू बीएचके खुराड्यात राहतील, आजूबाजूची झाडे नष्ट होताना पाहतील, डोंगर बोडके होताना पाहतील, लहानपणी कसे त्यात हुंदडत होतो हे आठवून नि:श्वास टाकतील, कुंद काळ्या आकाशात शिशाचे कण असलेल्या हवेचे श्वास घेतील आणि हल्ली कॅन्सरचे प्रमाण का वाढले आहे याची चर्चा करतील. पूर्वीसारखे पक्षांचे आवाज येत नाहीत हे पाहून चुटपुटतील. एखाद्या वर्षी अजिबात पाऊस नाही तर पुढच्या वर्षी ढगफुटीसारखा पाऊस का पडतो असा विचार करत बसतील. गावातील वाहळांचे पाणी कधी आतापर्यंत रस्त्यावर आले नाही ते आता आपल्या घरात का येते आहे यावर चर्चा करतील. लेकफ्रंट बंगल्यांच्या वसाहती झाल्या, त्यांच्या किमती आपल्यालाच परवडत नाहीत, उलट उन्हाळ्यात खन्ना, कपूर, मेहरा आपल्या मर्सिडीझ गाड्यांतून येऊन तिथे राहतात, आपण त्यांच्या घरकामाला जाऊन काय मिळवले याचा विचार करत बसतील. आपल्याला हवा तसा विकास झाला नाही याची खंत करीत दुसरा दिवस ढकलण्यासाठी ताकद मिळवण्यासाठी झोपतील. अशी ही गावे झोपेत असताना, शेजारचे डोंगर हळूहळू कणाकणाने खचत असतील आणि एक दिवशी या गावांचे 'माळीण' होईल. आणि त्याचे सर्व श्रेय आपल्याच या सर्व लोकांचे आणि त्यांनी निवडून दिलेल्या या नतद्रष्ट राजकारण्यांचे असेल. कोकणाचा कॅलिफोर्निया हे तीस चाळीस वर्षांपूर्वी स्वप्न होते, स्वप्नात निदान काही तरी चांगले घडायची शक्यता असते, आता तीही राहिली नाही. स्वप्नही राहिले नाही.

No comments:
Post a Comment