Tuesday, June 9, 2026

Entropy चे गूढ?

 Collatz conjecture हे गणितातल्या अनेक  “हे असे का?“ याचे उत्तर देता न येणाऱ्या निरीक्षणांपैकी एक आहे. कुठलाही एक पूर्ण धन अंक घ्या. तो विषम असेल तर त्याला ३ ने गुणून १ मिळवा. जर तो सम असेल तर २ ने भागा. येणाऱ्या उत्तराला परत हेच दोन नियम लावा. इतकी साधी प्रोसेस आहे. गंमत अशी, की कुठलाही आकडा, मग तो कितीही मोठा असो, शेवटी ४-३-२-१ या अनंत लूपमध्ये अडकतो. मोठी संख्या मूळ घेतली तर खूप काळ ही प्रक्रिया चालू राहील, अशक्य मोठे असे अंक येत राहतील, पण शेवटी ४-३-२-१ मध्येच या प्रक्रियेचा अंत होईल.


मला असं वाटतं की या एका पॅटर्नमध्ये सगळ्या विश्वामधील सिस्टिम्सच्या behavior ची व्याख्या आहे. हा गणितीय पॅटर्न Entropyचं सूत्र सांगतो असं मला वाटतं. कुठलीही सिस्टिम (पक्षी संरचना) ही नैसर्गिकरीत्या सगळ्यात स्टेबल अशा सिस्टिमच्या दिशेने जाते.  Low entropy to high entropy. Particle reaching highest entropy state, means it has stopped vibrating. It also means it reaches absolute zero temperature. पण हा प्रवास सरळ नसतो. मध्येच सिस्टिम low entropy state मध्येही जाते. तिथून कदाचित अजून low entropy कडे जाते. Collatz conjecture मध्ये peak value ही low entropy state दर्शवते. पण ऱ्हास अटळ असतो. आपल्या भोवतीचं सगळं जग हे कमीअधिक प्रमाणात low entropy state मध्ये आहे.  उदाहरणार्थ- काचेचा ग्लास हे low entropy configuration नैसर्गिकरीत्या फुटलेला ग्लास या hight entropy / more stable configuration कडे जात असते. Collatz Conjecture च्या नजरेतून पाहिलं तर ग्लासाचा seed नंबर मोठा असणार. पण तरीही जसा काळ जाईल तसे त्यात सूक्ष्म तडे पडतील, पुढे तुकडे पडतील. अजून काही काळाने ते तुकडे काचेच्या मोलेक्यूल या क्वार्ट्झ स्थितीत पोचतील. क्वार्ट्झ म्हणजे आता ही संरचना ४ या स्टेटला पोचली. त्यापुढे अजून decay होत अणू या स्टेटला म्हणजे १ ला पोचेल. मग पुन्हा लाखो वर्षांनी कदाचित हे अणू कुठल्यातरी प्रक्रियेतून एकत्र येऊन काचेचा मोलेक्यूल बनतील. म्हणजे १ वरून ४ ची स्थिती. पण आता ग्लासाच्या त्या मूळ नंबरपर्यंत परत जाण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. याचाच अर्थ आता ही संरचना ४-३-२-१ या लूपमध्ये अनंत काळ राहील. यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते म्हणजे १ च्या खाली ही सिस्टिम जात नाही. ० कधीच येत नाही. पूर्ण विस्कळितपणा म्हणजे शून्य असे धरले तर अनंत विस्कळितपणाची ही प्रक्रिया अनंत काळ चालू राहील हेच हा लूप दर्शवतो असे मला वाटते.


हे यच्चयावत सर्व ऐहिक गोष्टींना लागू आहे. माणसाचं आयुष्य - भावनिक असो वा भौतिक, in larger scheme of things, काही स्पेशल गोष्ट नाही. प्रत्येकाच्या सीड नंबरनुसार त्याची peak value (low entropy state/configuration) असेल. पण शेवटी ४-३-२-१ हा लूप अटळ आहे. सजीव प्राण्यांच्या बाबतीत म्हणायचं तर ४-३-२-१ हे मृत्यूचं स्टेट आहे. 4 defines dust. 3-2-1 would be breaking down to atom level. Then perhaps 1-2-3-4 would take the atom to become a carbon molecule. But, stupendously very very low probability  that it is going to become the same live organism again. 4-3-2-1 loop stays for infinity, a state of highest entropy. 

Thursday, March 9, 2023

गजालगीता महाभारत पर्व - अंतिमोध्यायः

अर्जुन बोलतासा

रे कृष्णा,हो सप्तो काय माका लाभाक नाय

मगे प्रयत्न तरी कशाक करूचे सांगशीत काय

तुका सांगूक काय कर्माचो सिद्धांत

कलमाक आंबो जांवदे, तोरां तरी येऊ नाय?


दुर्योधन बोलता

माकाही वाटता माझी तीच अवस्था झाली आसा

डोक्यार मुगुट पण खाली उघडा उघडा वाटतासा

आता द्रौपदी जांवदे

भानुमतीकडेच आता काय ती थोडी तरी आशा


दुःशासन बोलता

रे आमका काय्येक फरक पडूचो नाय

गडग्याच्या दगडाक उन्हाचा भय ता काय

तू जा कसो भानुमतीकडे

माझी चारुमती बरी, मी तेच्या मागे मागे जाय


कर्ण बोलतासा

हे वृषाली, माझा उत्तरीय खंय ठेयलंस

माझी कवचकुंडला कशाक लपवलंस

व्हॅलेंटाईन आज मगे

माझे सगळे पितांबर वाळत कशाक घातलंस?


नकुल बोलता

रे वासुदेवा, आमची काय तरी बघ सोय

सगळ्यांका मिळता आंबो, आमका मात्र कोय

व्हॅलेंटाईनचा नसता काय ता ह्या झेंगाट

आमच्या नशिबी मात्र घोड्यांचो थयथयाट


धृतराष्ट्र म्हणता

ऐकलंस काय गो दुर्योधन काय म्हणताहा

दुर्यौधनान आणि एक खूळ हाडल्यान हा

म्हणता डॅड डॅड पार्टी करू या

मामाकडून गांधाराची फेमस पावडर मागवया


गांधारी करवादता

बापलेक तुमका काय होया ता करा

हस्तिनापुराचो कळंगुट बीच करा

पावडर घेया नाय तर गुळी

मी येवचंय नाय माका मापी करा


कृष्ण बोलता

रे अर्जुना, बघितलंय मां एकेकाची कथा  

माणूस समाधानी रवना नाय हीच खरी व्यथा

तुका आस द्रौपदीच्या मिठीची असता

ओ माजी बडबड ऐका ही तिची आस रवता


बायलेक आजवर कोण्येक समजूक नाय

सत्यभामा रुक्मिणीचे पण मातीचेच पाय

म्हणतंत, गावाची भांडणा सोडवतंत गो बाय

पण तुम्ही आमचा काय्येक ऐकनंत नाय


तस्मात् पार्था, आणी बाकीचे तुमी,

खरो व्हॅलेंटाईन बडबड ऐकणारो असता

गुलाब देवन कान बंद ठेवन बसणारो असता

दोन तास गप रव ऐकान घेतल्यात 

तरच घरी इल्यार खरा सेलेब्रेशन जाता


इतिश्री व्हॅलेंटाईन अंतिमोध्यायः॥


समाप्त


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - चुंबनोध्यायः

दुःशासन बोलतासा

दुर्योधना रे, आम्ही अशे कशे कमनशिबी

लुगडी उचलणारे जशे द्रौपदीचे धोबी

सगळे चान्स तुका होये

शिरां पडली, अरे आमका एक तरी चान्स दी


दुर्योधन बोलता

मांयझंया आधी मी सांगतंय ती कामा कर

आजचो द्रौपदीचो प्लॅन कायहा म्हायती कर

मगे भालेकराक फोन कर

मच्छीची दोन थाळ्ये रिजर्व सांग ठेवक सत्वर


हंयसर द्रौपदी लाडात येवन म्हणा आसा

काय हो कौंतेय, माझ्या मनात एक विचार आयलो

सांगा की सांगा नको.. काल एक दागिनो दिसलो

घेतात काय हो आज, 

घेतल्यात तर.. तर..तुमका माझो किस भेटतलो..


अर्जुन बोलता

रे कृष्णा!! वासुदेवा! ह्या मी काय ऐकतंसय

मुंगीन मेरू पर्वत गिळून तर नाय टाकलंय

कर्म, आजच हेका ह्या सुचला

मी आत्ताच बोंबलाची चटणी भाकरी खावन बसलंय


कृष्ण बोलतासा

रे अर्जुना, हेका म्हणतंत नियतीचो फाको

लक्ष नसताना पडलेलो कर्मफळाचो फटको

ठेयली लिपस्टिक ओठांची अपेक्षा 

प्रत्यक्षात टोचता भरघोस मिशांचो झुपको


अर्जुन बोलतासा

शी शी कृष्णा, वशाडी इली तुज्यार ती

सल्लो मागतंय तर तू लावतंय पनवती

आजचो दिवस कसो चुंबनाचो

पण डोळ्यासमोर हाडलंस दुर्योधनाची मूर्ती


आमचा नशीबच म्हणतंत फुटक्या की काय ता 

चुंबनाचा आज काय होऊचा नायसा दिसता

जरा खंय मी जवळ जातंय 

तर म्हणता तुमच्या तोंडाक कांद्याचो वास मारता


कृष्ण बोलतासा

न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगतलंय चार

बाकीचा सोड माका प्लॅन तरी इचार

भालेकराकडे घेवन जा द्रौपदीक

सांग,मी दुर्योधन, होया माका टेबल फॉर चार


भालेकराकडचा डिनर तुझी सेटिंग करतला

तळलेलो बांगडो आणि सुरमईत काम जातला

खरो दागिनो होयो कशाक

तिसऱ्यांचा कालवण तुका किस देवन जातला


तर अशा शब्दात कृष्णान अर्जुन द्रौपद्येची सोय आणि दुर्योधनाचो प्लॅन चौपट केल्यान या अध्यायात.


इतिश्री व्हॅलेंटाईन चुंबनोध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - हग-गोध्यायः

नकुल बोलतासा

रे सहदेवा वांयच माझा ऐकतंस काय

गोठ्यात्सून भायर जरा येशीत काय

दादान सक्काळी आज्ञा दिल्यान

धेनु आपली, तेका सजवन तयार करशात काय


सहदेव बोलता

भैनीक, आवशीक, आमकाच हो कामा सांगता

तो भीम बघ कसो गदा घेवन गावभर फिरता

व्हॅलेंटाईन यांचो जातलो

हडे आमी मात्र गाडयेवर भजी पाव खातलो


द्रौपदी गुणगुणता

बाय गोऽऽ कस्सं करमत नाही गो..बाई गो

काल अस्वल झाला आजचो काय उजेड गो

बभ्रुवाहनाचे बाबा, ऐकल्यात काय हो 

आज मेणबत्त्ये लावन काय ता डिनर करुया काय हो


अर्जुन बोलतासा

होय गे होय! आजचो दिवसच खास आसा

तरी मी म्हणा होतंय आंघोळ करूशी वाटतासा

पण ह्या काय? वशाडी इली नशिबार 

युधिष्ठिरान माका क्यान्सल करुन आपलो नंबर लावलोसा


रे कृष्णा, आज खंय गेलंय तू माका सोडान

गोष्टी युक्तीचे चार होये होते आज आईच्यान

कधी नाय तो मिठी मारूचो चान्स

पण युधिष्ठिरान माका माशे पागूक बसयल्यान


युधिष्ठिर येता

हे भ्राताश्री म्हायती आसा मां आज काय आसा

हस्तिनापुरात पयल्यांदाच ह्या करूचा आसा

जा सगळ्या भावांक बोलावून हाड

हे द्रौपदी तुमी पण तयार होवन बसा

सगळ्यांनी मिळून करूचा मी सांगतंय तसा


द्रौपदी आरडता

ओ तुमच्या जिभेचा हाड मोडला काय ओ

एकाच येळेक पाची येवक मी काय मुन्शिपाल्टीची बांव काय हो

काय बाये तरी एकेक ही पांडवांची नक्षत्रां

हेडएकच झालोहा पदरात पडली ही पात्रा


युधिष्ठिर हहहह करून बोलता

गे माझे बाये, तुझो गैरसमज झालो वाटता

आजचो दिवस मोठो शुभ असता

आरतीचा तबक घेवन गोठ्यात ये

आज गाईक मिठी मारून ओवाळूचा असता


आम्ही भाव भाव गाईक वंदन करतलो

तेची शेपूट हातात घेवन डोळ्यांक लावतलो

हे द्रौपदी, तू गाईवांगडा रव

आजचो सगळो स्वैपाक हो भीम करतलो


अशा प्रकारे युधिष्ठिरान गाईक आणि द्रौपदीक एकाच वेळेक आनंदी केल्यान या अध्यायात.


इतिश्री व्हॅलेंटाईन हग-गोध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - प्रॉमिसोध्यायः

कृष्ण बोलतासा

रे पार्था, ऊठ, युद्धाचो दिवस जवळ आयलो

धनुष्य बघ बाण बघ टायम कमी रवलो

पण युद्धाचा काय होईत ता होईत

घरचा युद्ध शांत करूचा बघ पयलो


अर्जुन बोलता

उठतंय रे कृष्णा, झोपतंय अजून अर्धो कलाक

अस्वलापाठी धावन कमरेक आयलोसा बाक

तुका गीता सांगूची आसा मोठी हौस

मी आपलो ऐकतंय म्हणान तू माकाच घेवन बस


कृष्ण बोलता

कर्म करणाऱ्याकच देवचा लागता कर्माचा ज्ञान

नांगराक जुपलो म्हणान तर पोळ्याक बैलाचो मान

एकशे पाचांत तू माझो लाडको आणि द्रौपदी चेडू

खटखट्ये लाडवात जसो बुंदीचो मऊसर लाडू


द्रौपदी बाहेर येवन बोलता

ओ दादानू, तुमी तेंका कायेक सांगू नकात

दोन तास अजून पसरतले सुशेगात

दोन म्हैने सांगतंय रथाचा चाक बदलूक झाला

माका सांगतंत अण्णा गेलो गावाक

रथाचा स्पेअर चाक तेच्या दुकानात इसारला


कृष्ण बोलता

रे अर्जुना! मांयझंया हडे ये जरा सायटीक

आजचो दिवस वचनाचो, जा जरा भेटीक

सांग तेका चाकाचा काय घेवन बसलंय

ह्या एक युद्ध कायता होऊन जांवदेत

तुका चकचकित बीएमडब्लू आणून दितंय


अर्जुन बोलतासा

रे मधुसूदना, तू पाच गावां पण आमका देवक नाय

रोज अकाऊंट बघतंय बॅलन्स चार रुपयांच्या वर नाय

आणि जरी बीएमडब्ल्यू घेतलंय

तरी वासुदेवा सांग, तेच्या टाकीत घालूचा तरी काय


कृष्ण बोलता

म्हणानच तुका सांगतंय आपण कर्म करूचा

फळ इला तर इला नाय तर गप रवूचा

तू वचन दिल्यार द्रुपग्याक आनंद जातलो

तेका आनंद झालो तर

युधिष्ठिराआधी तुझो नंबर लागतलो


अशा शब्दात कृष्णान गृहस्थाश्रमाचा गुह्य एकदमच स्पष्ट केल्यान या अध्यायात.


इतिश्री व्हॅलेंटाईन प्रॉमिसोध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - अस्वलोध्यायः

दुर्योधन बोलता

रे अर्जुना, धनुर्विद्या आत्मसात केलंय

फायनल एक्झामात टॉप केलंय

माशाचो डोळो फोडून द्रौपदेक पळयलंय

वर्गात पयलो इलंय..

मगे आता आमचे वांधे कशाक करतंय


बायलेक कॅडबरी काय देतंय

तेका गजरो काय हाडून देतंय

आमची बाईल म्हणता शिरां पडली

आता मी पण पाच घोव शोधतंय


अर्जुन बोलता

दुर्योधना, मांयझंया कायतरी बोला नुको

वडाची साल पिपळाक लाव नुको

तुका काय आमची दुखा ठावक

आमका अपॉइंटमेंट घेवक लागता

युधिष्ठिराक मात्र डायरेक ॲक्सेस मिळता


आज मी जरा सावध आसंय

पहिलोच जावन कृष्णाक इचारून इलंय

पयल्यांदी माका चार गाळये दिल्यान

आणि मगे अस्वलाचा पोर आणूक सांगल्यान


द्रौपदी करवादता

अगो बाये माज्या! माज्यासाटी हाडल्यानी दिसता

रवळनाथान हेंका अक्कल दिली नायशी वाटता

हंयसर बाईल रवता दोन लुगड्यांवर

आणि यांचो सातबारा कृष्णाच्या नावावर


ओ! तुमची अक्कल खंय चराक गेली काय

ह्या अस्वल घरात हाडलंत तेचा करूचा काय

थोरल्याचो हत्ती, धाकल्यांचे घोडे घरात फिरतंत

आता हो प्राणी हाडून काय सर्कस लावतसंत?


कृष्ण बोलता

रे अर्जुना, असो कसो रे तू सांगकामी

खरा अस्वल आणूक नाय सांगूक मी

पळ, आधी पावसकराच्या दुकानात धाव

कापूस भरलेलो टेडी घे, आणि करू नको भाव


अशा शब्दांत कृष्णान पुन्हा एकदा अर्जुनाक मांगरात झोपण्यापासून वाचवल्यान.


इतिश्री व्हॅलेंटाईन अस्वलोध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - चॉकलेटाध्यायः

अर्जुन बोलतासा

गो पांचाली, मी सकाळपासून बघतंय

तू माका जरा कशीशीच दिसतंय

राजपुत्राचो मान तू काय नाय ठेयनंय

माका चा पन गुळाचो बनवन दिलंय


काय चल्लाहा काय तुझ्या मनात

असो काय गुन्हो मी केलंय म्हणात

स्वयंवरात माजो केवडो रुबाब होतो

पांडूचो झिलगो म्हणान माका मान होतो


तू इल्यापासून माझा धनुष्य 

खुंटीवर टांगलेला आसा

डोळो फोडलेलो पोपट पण म्हणता

माझाच ब्रह्मचर्य बरा आसा


तुका रुसून बसाक झाला तरी काय

काल गजरो दिलंय तो पण माळूक नाय

बरे पेडये गावलेले बाजारात काल

पण वाटता आज मिळतली पेज नि डाळ


पांचाली स्वतःशीच बोलता

बाये हेंच्यावांगडा बोलूचा तरी काय

सांगितल्याशिवाय एक गोष्ट करनंत नाय

कालपासून सांगा होतंय आज काय ता

माणूस व्हाळाकडे जाऊन इलो आणि तरी विचारता


काय्येक होऊक नाय माका गप रवा

सोरट्ये खेळूची प्रॅक्टिस चालू ठेवा

एकाय भावाक नाय बायलेची काळजी

आणि सासू थंयसून आरडता

मेरे करन अर्जुन आयेंगे जी


कृष्ण बोलतासा

अरे पार्था सामको खुळो मरे तू

सगळ्या भावंडांत जरा तरी बरो तू

पयलो जा कसो धावत बाजारात

कॅडबरी धा रुपायची हाडून

दे पांचालीच्या हातात


अशा प्रकारे कृष्णान अर्जुनाक सक्काळी सक्काळी धा रुपयांची पनवती लावल्यान. 


इतिश्री व्हॅलेंटाईन चॉकलेटाध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

गजालगीता महाभारत पर्व - प्रपोजाध्यायः

दुर्योधन बोलतासा

रे दुःशासना वांयच ऐक माजा

सकाळ सकाळ नको रे 

चाय आणि खाजा

कौरवांचो मान जरा ठेय

पांडव बग कशे मारतंत मजा


दुःशासन बोलता

काय केल्यांनी आता पांडवांनी

एक दिवस पण जगूचा नाय धडपणी

तू बसतंय घेवन नवटाक नवटाक फेणी

मांयझयो माझो हो चा पण लागता फुळकवणी


दुर्योधन बोलतासा 

आयक रे जरा तोंड बंद ठेय

आज व्हॅलेंटाईन तेची कर कायतरी सोय

द्रौपदीन आज मेकअप केल्यान ऐकलंय

वांयच जावन जरा बघूया विचार करतंय


दुःशासन बोलता

होय रे होय मी तेका मगाशीच बघितलंय

पानदीतसून जाय होता विदुराच्या घराकडे

बरी गावली म्हणान गेलंय तर

वशाडी ईली हो कृष्ण येवन उभो रवलो पुढे


माका सांगता नवीन घर बांधल्यानी

तुमच्या चौपट कार्पेट एरिया केल्यानी

संध्याकाळी म्हाळ आसा या सगळ्यांनी

बरोबर घेवन या तुमच्या व्हॅलेंटायनी


दुर्योधन बोलतासा

आवशीक.. आमच्या खंयच्या व्हॅलेंटायनी

जी होती तेका पांडवानी केली आमची वयनी

आणि म्हाळाक जावन करूचा तरी काय

वाटाण्याचा सांबारा घावणे खांवचा की काय


कृष्ण प्रकट होऊन बोलतासा

सुधरा रे मांयझंयांनो आता तरी

दुःशासना तू तर एक नंबर पदरधरी

दुर्योधना, द्रौपदीकडे तू बघूपण नको

तोंड वर करून चाललंस तर पडतलंय

ह्या विसरा नुको..


अशा शब्दांत श्रीकृष्णान दुर्योधनाची आवाजी बंद केल्यान एकाच श्लोकात..


इतिश्री व्हॅलेंटाईन सप्ताह प्रपोजाध्यायः॥


#मालवणी_गजालगीता

विनोदाची टेम्प्लेट

 विनोदी कसे लिहावे असा प्रश्न बरेच जणांना पडत असेल. ते विनोदी लिहायला जातात पण हाहाऐवजी निळे लाईक मिळतात किंवा बदाम मिळतात. विनोद करण्याची सोपी आणि घरगुती रेसिपी देणं गरजेचं वाटतं. या रेसिपीला अक्षरशः काहीही साहित्य चालते. नारळाच्या काथ्यापासून भरजरी रेशमी वस्त्रापर्यंत आणि मोहरीपासून भोपळ्यापर्यंत काहीही चालते. काहीही वर्ज्य नाही. जे समोर दिसेल ते. वेळेला केळं नि उपासाला रताळं ही म्हण काही उगीच नाही आली. तेव्हा साहित्य काहीही चालते हे लक्षात ठेवावे. 


रेसिपी अशी -

लक्ष्य केलेले साहित्य नीट न्याहाळावे. त्यात काही वैगुण्य सहज दिसल्यास पुढची कृती सोपी आहे. 

उदाहरणार्थ - एखाद्याने Feeling excited in my new बनियन अशी पोस्ट टाकली असेल तर (हो, कालच घाईची लागल्यानंतर पोट मोकळे झाल्यावर जी काही विलक्षण अनुभूती असते यावरही एकाची एक विस्तृत पोस्ट होती. त्यापुढे बनियन पोस्ट ही बाब फारच किरकोळ आहे.) - 


१ बनियनला मोठे भोक दिसल्यास भोक ही मुख्य वस्तू हायलाईट करावी. वाह! छान मिळालं हो हे भोक तुम्हाला! जयहिंद कलेक्शन्स की पिसे टेलर्स? शिवून घेतला की रेडीमेड? भोकाबरोबर बनियन फ्री अशी ऑफर पाहिली होती परवा. असे काही तरी लिहावे.


२ बनियनला बारीक भोक असल्यास - अशी बारीक भोकं असलेला बनियन घेण्यापेक्षा जाळीचा का नाही घेतला? अमर अकबर ॲंथनी मधील ऋषिकपूरच्या बनियनची आठवण करून देणे. असा जाळीचा बनियन पाहिला की थेट बकरे, कोंबड्यांचा वास असलेले गावातले उस्मानचिच्याचे हलाल झबीहा हे दुकान आठवले असे आवर्जून सांगावे.


३ बनियनला भोक नसल्यास - अरे वा! हल्ली भोकवाले बनियन मिळणं बंद झालं की काय? काय छान वायुवीजन व्हायचं! पूर्वीची ती भोकंच काय क्वालिटीची असत असे टोमणे मारावेत.


४ काहीच वैगुण्य न आढळल्यास अथवा वरील विनोदी पद्धती आधीच कुणी वापरून गेले असेल तर मग आपण स्थानमहात्म्यावर उतरावे. तुमच्या भिकारपुरात बनियन चांगले मिळत नाहीतच. आमच्या टुकारपुरात येऊन पहा, माणूस मरेल पण बनियन टिकून राहील. आमच्या गावातले बनियन अफगाणिस्तानला एक्स्पोर्ट होतात. तिथे ते बुलेटप्रूफ जॅकेटच्या आतून अस्तर म्हणून वापरतात. अमेरिकन सैनिक जॉन डो याने आमच्या गावात तयार झालेला बनियन पॅराशूट फेल झाल्यावर पर्याय म्हणून वापरला. दुर्दैवाने जॉन हा जोरात जमिनीवर आदळल्याने मृत्यू पावला पण बनियन मात्र झाडात अडकूनही जसाच्या तसा राहिला. असे काही तरी तीक्ष्ण बुद्धिदर्शक लिहावे. आपल्या गावात वास्तविक सगळे उघडे फिरत असतात हे लक्षात ठेवून आपल्याच गावबांधवाच्या पोस्टवर टिंग्या मारू नयेत हे लक्षात ठेवावे. “अबे का फिजूल फोका मारून रायला बे” हे पुल देशपांड्यांचे वाक्य लक्षात ठेवावे.


५ सर्वात शेवटी, निखळ विनोद करायचा असेल तर वरीलपैकी काहीच करू नये. सर्वथैव वेगळ्या विषयावर सर्वांना हसण्यासारखे काही लिहिता आले तर ते लिहावे, आपण हसावे, इतरांनी आपल्याबरोबर हसावे. प्रत्येक वेळी आपण विनोदी असायलाच हवे हे प्रेशर घेऊ नये. टोमण्यांतून विनोदनिर्मिती होते असा समज प्रचलित झाल्याने ते वापरणे सोपे वाटते. पण ते टाळावे. ते वर उल्लेखलेल्या एका पोस्टप्रमाणे, विनोदाची नैसर्गिक कळ आली तरच विनोदी लिहावे. 


६ हे जमत नसेल तर सरळ हॉंटसांपला शरण जावे. तिथे आलेले विनोद जणू काही इतरांकडे हॉंटसांप नाहीच असे धरून बिनधास्त पोस्टावेत. तेही लोक विनोद आधीच वाचलेला असूनही “हॅहॅहॅ…आमी हाय बरं का तुमच्या पोस्टवर” वाले असतात, हाहा करून जातीलच. अगदी खाली स्वच्छ c/p WhatsApp असं लिहिलं तरी नव्यानेच वाचल्यासारखे हाहा करणारे करुणाशील वाचक अस्तित्वात आहेत हे लक्षात ठेवावे. ही सगळ्यात सेफ आणि पॉप्युलर रेसिपी असून आपल्या अवतीभवती अनेकजण हीच फॉलो करताना दिसतील. Watch and learn.. Watch and learn.

प्रेमाचे अद्वैत

 मी अन् तू

तू अन् मी

तू म्हणजेच मी

मी म्हणजेच तू

मी मला गुणावे

तर तुलाही आपोआप मी गुणावे

माझ्यातून तुला वजा करावे

तर माझे अस्तित्वच विरावे

मी मला विस्कटावे

तू तुला वेगळे करावे

सारखेपण संपल्यावरही

तू आणि मीच उरावे

तरीही…

दोघे म्हणजे एकच असावे

प्रेम म्हणतात ते हेच असावे

प्रेम म्हणतात ते हेच असावे

- कवी सॉक्रेटिस, बाभूळगाव


अशाच काहीशा भावना प्रा. ज्ञानेश्वर झिरपे, अण्णासाहेब जाधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भुदरगड (विषयः गणित) यांनी त्यांच्या कवितेत व्यक्त केल्या आहेत. दोघेही कवी “दोन शरीरं पण एक मन” या वैश्विक निष्कर्षापर्यंत आले आहेत हे पाहून आपण थरारून जातो.


Lt a -> b (a ने b ला पाहिले, आणि b कडे ओढला गेला. पण लिमिट ओलांडली नाहीय. संस्कार!)

a = b

a^2 = ab

a^2 - b^2 = ab - b^2

(a+b) (a-b) = b(a-b)

(a+b) = b

(b+b) = b

2b = b

2=1


कोण म्हणतो गणितात भावना नाहीत? माणूस चेहऱ्याने मख्ख असला तरी त्याच्या हृदयी प्रेमाचा झरा झुळूझुळू वाहत असू शकतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते, गणिताचे मास्तर वरकरणी कितीही रुक्ष आहोत असे दाखवत असले तरी आतून प्रेमाचे भुकेले असतात. असोल्या नारळात जसे लुसलुशीत खोबरे आणि पाणी असते तसे. प्रेमाला कुठलीही भाषा समजते.


तटीः उगाच झीरो डिव्हायडेड बाय झीरो ही मीनींगलेस क्वांटिटी आहे वगैरे सांगून मोडता घालू नये. प्रेमाच्या जगात सगळंच मीनींगलेस असूनही सगळं मीनींगफुल असतं आणि झीरो तोच हीरो असतो.

- मंदार वाडेकर

महापुरुष पिंपळ

 आयुष्यातला एखादा महापुरुष येतो तसा हा पिंपळ. चांगला वीसएक फुटांचा परीघ असलेला. खूप लहानपणच्या आठवणी धूसर का होईना त्यातली एखादी गोष्ट तरी अगदी ठळक असते. माझ्या त्या धूसर झालेल्या आठवणींतील हा जिताजागता पिंपळ एक ठळक आठवण. याच्याबरोबर दीस उजाडायचा आणि याच्याबरोबरच संपायचा. खेळणं, उंडारणं याच्याबरोबर, दुपारच्या संथ शांततेत पानांची सळसळ ऐकणं याच्याबरोबर, संध्याकाळची पानगळ पाहणं याच्याबरोबर, अंधार पडल्यानंतर वर बसलेल्या मुंजाला शोधणं याच्याबरोबरच. केवळ आईनं आता घरी ये नाही तर बघते तुझ्याकडे अशी धमकी दिल्यावरच याच्या पारावरून हलायचं. याच्याच पुढ्यात हंगामानुसार खेळ व्हायचे. स्वत:ची फळकूट नसलेली, खरीखुरी पहिलीवहिली बॅट घेऊन मी खेळलो ते यानंच पाहिलं. कडाक्याच्या थंडीत ढोपरं फुटलेली, ठेचा लागून अंगठे फुटलेले यानंच पाहिलेलं. वसंतात कोंब फुटायचे याला. तसे सगळ्या झाडांनाच फुटतात, पण याचे कोंब वेगळे. ते खुडायचे, लांब शंकूप्रमाणे असलेला तो कोंब जिभेवर ठेवायचा आणि त्यातून हवा शोषून हुबेहूब एखाद्या चिकचिक्याप्रमाणे (एक छोटा पक्षी) आवाज काढायचा. स्वत:चा कोंब खुडल्याचं दु:ख विसरून माझ्याबरोबर त्या आवाजाचा आनंद घ्यायचा तो हा पिंपळ. उन्हाळ्यात दुपारी सर्वत्र नीरव शांतता असताना मी आणि माझ्यासारखाच एक महाउपद्व्यापी मित्र या पाराच्या दगडांमध्ये घरं करून राहिलेले विंचू शोधत बसायचो. हिरवागार हीर (नारळाच्या पानाची काडी) घ्यायचा, त्याच्या लवलवत्या टोकाची आकडी करायची आणि बिळात घालायची. कुठल्या कपारीत विंचू असेल हे ज्ञान आम्हाला कसं आलं हे कुणालाच माहीत नाही. पण शंभर टक्के असायचाच. मग तो विंचू त्या आकडीला पकडायचा. ती ओढ जाणवली की सर्रकन हीर ओढायचा. भली मोठी इंगळी बाहेर पडून आमच्याच पायाशी पडायची. मग पाच दहा मिनिटं तिचं निरीक्षण करून तिला परत त्याच हीराने दगडात सोडायचं. तीही बिचारी “च्यायची कटकट” म्हणत गायब व्हायची. पुढे आम्ही हे बंद केलं. मुका जीव तो.


या पारावर हनुमानाची इटुकली देवडी. पूर्वी ही नुसतीच देवडी होती. हे पत्र्याचं छप्पर कुणातरी दिव्य आर्किटेक्टची नंतर झालेली कृपा असावी. हनुमान जयंतीला अगदी पहाटेपहाटे जायचं आणि नमस्कार करायचा. खूप खूप काही मागावं असा विचार करून तिथं गेलेला मी, प्रत्यक्षात तिथं काहीच मागायचो नाही. मन कसं रिक्त, समाधानी असायचं. काहीही न मागता या पिंपळानं सगळं दिलं. जे पैशाने कधीही विकत घेता येणार नाही असं बालपण दिलं. जोवर हा असेल तोवर माझं ते बालपणही कधी हरवणार नाही.


फोटो क्रेडिटः Subodhan Kashalikar


त्या वळणावर

 असशीलच तू इथे

माझं नाव ओठांत घेऊन

आणि एक स्वप्न घेऊन

या वळणावर


असशीलच तू इथे

जीवघेणी तान होऊन

सुखाची भैरवी देऊन

या वळणावर


असशीलच तू इथे

दंवबिंदूचं रूप लेऊन

त्याचं इवलं इंद्रधनु होऊन

या वळणावर


असशीलच तू इथे

राधेचं मन होऊन

प्रेमाला पूर्णत्व देऊन

या वळणावर


असशीलच तू इथे

जन्मजन्माची सखी होऊन

अथांग अनंत होऊन

या वळणावर

-मंदार वाडेकर


ग्रेस आणि तत्वज्ञान

 ग्रेसांची कविता गूढ, अगम्य, भरजरी प्रतिमांनी भारलेली असते. प्रतिमांचा हा उत्सवच असतो. दोन शब्दांची विलक्षण संधि, त्यातून अर्थ थेट समजत नाही पण नेणिवेच्या पातळीवर जाणवणे हे ग्रेसांच्या कवितेचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्या प्रतिमांचा प्रत्येकाच्या तत्कालीन मनःस्थितीप्रमाणे तसा तसा अर्थ लागणे हेही त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य. चंद्रमाधवीचा प्रदेश हा शब्दसमूह वाचला की शिशिर ऋतू सुरू होत असताना येणारी निरभ्र रात्र, चमचमणाऱ्या चांदण्या, गूढ निळ्या डोंगररांगा, स्तब्ध सूचीपर्ण वृक्ष, पौर्णिमेच्या चंद्राचा सौम्य संथ प्रकाश, मंद वाऱ्याने कळत नकळत हलणारे वृक्षांचे शेंडे, खाली दंवबिंदूंनी चमकणारी गवताची पाती हे डोळ्यांसमोर येतं. पण ते तेवढंच नसतं. त्या शब्दात गूढतेची छटा दर्शवणारा डोंगररांगांच्या मध्ये आणि वृक्षांच्या माथ्यावर उतरलेला धुक्याचा समुद्रही दिसतो. हे ग्रेसांचं प्रतिमासामर्थ्य आहे. 


पण ग्रेसांची ही कविता मला तत्वज्ञानाने सत्याचा मागोवा घेणारी वाटते. ती विज्ञानाशीही एकनिष्ठ वाटते. अर्थात हा कवडसा माझ्या मनाचा कवडसा आहे. अनेक अन्वयार्थांपैकी एक.


ही धूळ धुक्यासम कोमल

ताऱ्यांच्या मागुन येते

पाण्यावर हलके हलके

चंद्राची साय पसरते.


हा प्रश्न जीवाला छळतो

टिचलेले बिल्वर हसती;

कोणत्या फुलातुन गळते

कोणत्या कळीची माती?


घे हळुहळु स्मरणाने

पानांचा तू कानोसा

झाडांच्या अगदी मागे

तुज दिसतो काय कवडसा?


माधुर्य सांडते संध्या

किणकिणती सर येताना

मेघांना कळला नाही

हलकासा रंगउखाणा


जोगवा मिळाला तेव्हा

लहरीत नाचलो होतो;

पायात मोडतो तोही

पाऱ्याचा घुंगूर असतो....


शोकातिल दाट विणीची

गुंफात अरण्ये असती

वाटेत झरा उचलाया

दगडाची लागे छाती.


तुज शोधाया मी गेलो

नक्षत्र निघाले आर्द्रा;

हळदीच्या हातामधल्या

घे काढुन अवघ्या मुद्रा.

~ग्रेस


येथे कवी विज्ञानाच्या खूपच जवळ आला आहे. धूळ, गुरुत्वाकर्षण, ग्रहनिर्मिती चार ओळींत मांडण्याचे कसब ग्रेसांपाशी आहे.


कुठल्याही जातीच्या वैज्ञानिकाला सत्याचा शोध छळत असतो. सगळ्याच्या मुळाशी शेवटी ते मातीचेच अणुरेणू आहेत.


स्मरणाच्या नोंदींचा संदर्भ घेत प्रत्येक घटनेचा अन्वयार्थ लावत कवडशामधून येणारे फोटॉन्स हे कण नसून लाटा आहेत हे सत्य येथे उमगले आहे.


माधुर्य तरी काय आहे? न्यूरॉन्ससमूहाने एकत्र येऊन केलेला जाणिवोत्सवच ना? मेघांच्या नकळत काही फ्रीक्वेन्सी शोषल्या जाऊन रंग उधळले जातात जे आपल्याला दिसतात. हलकीशी सर आली की रिफ्रॅक्शनउत्सव होतो.


फंडिंगचा जोगवा मिळाला तेव्हाचा आनंद औरच. पायात घुंगूर लावून नाचतो तोच वैज्ञानिक. हा विनोद झाला, पण एखादे गूढ उलगडते तेव्हा ज्ञानी आनंदाचे नृत्यच करावेसे वाटते. तरीही, हे अंतिम सत्य नसून त्याच्या वाटेवरचा एक टप्पा आहे याचीही जाणीव त्या आनंदोत्सवात हळूच टोचत असते.


सगळंच काही सरळ मिळत नाही. काही गूढे उकलता उकलत नाहीत. माहिती झऱ्यासारखी वाहत राहते, गूढ एखाद्या खडकासारखे मध्ये दिसत राहते. कठीण, न उकलणारे.


एकाचा शोध घेताना भलतेच गूढ उकलणे हे काही नवीन नाही. भारत शोधायला निघालेला कोलंबस अमेरिकेत जाऊन पोचला. अशा वेळी आपण त्याचाच शोध लावत होतो असं सांगितलं की हाताला लावलेल्या हळदीप्रमाणे नवलाई दाटून येते. हे तसं शाश्वत सत्य. आयुष्यभर सत्याचा शोध घेऊन झालेला साक्षात्कार “हा शोध संपणार नाही” याचाच असावा असं ग्रेस सुचवतात. आपलं जगणं हा सत्यशोधनाचा आणि स्व-शोधनाचा अखंड प्रवास आहे असं ते सांगून जातात.

-मंदार वाडेकर

निखळ प्रेम

आमच्या घराशेजारी एका शेतकरी कुटुंबाचं आवार होतं. कोंबड्या, म्हशी, शेळ्या बकऱ्या असा बक्कळ मोठा बारदाना होता. यात एक विजोड पात्र होतं. ते म्हणजे पांढरी शुभ्र रेशमी केसांची एक पामेरेनियन कुत्री. ठार देशी गावरान घरात एखादी गोरी मड्डम सून यावी तशी ती दिसत असे. गवत, गोवऱ्या, शेणखड्डा, लाकडांची रास, कोंबड्यांनी केलेली घाण या सगळ्यात आपला पायघोळ झगा सांभाळत अलगद पायाने चालावं तशी ही कुत्री वावरत असे. दुःखी वगैरे काही नाही, ती ही सगळी आपलीच प्रॉपर्टी आहे अशा थाटात असे. तरी हे कुटुंब तिचे लाडबिड करत नसे. भाकरीचा तुकडा कधीतरी देत. मध्यमवर्गीय घरातलं “अगं हे काय व्हिके? ते काका आहेत ना आपले? त्यांच्या पायावर शू करतात का? हसतेय आणि वर!” असलं कौतुक नसे. तर.. आता सांगतो आपल्या हीरोबद्दल. त्यांच्याकडे एक गावठी कुत्राही होता. अगदी सर्वसामान्य रूप. त्याचं नाव काही अगम्य कारणास्तव त्यांनी म्हमद्या ठेवलं होतं. बरेच वेळा क्रिकेट खेळताना आमचा बॉल त्यांच्या कंपांऊंडमध्ये जात असे. अशा वेळी मात्र आमच्या या महाशयांशी सामोपचाराच्या वाटाघाटी होत. तो रोखून पाहत असताना बॉल घेऊन येणे फार जोखमीचे असे. तर ते असो. या महाशयांचे या व्हिकीवर निरतिशय प्रेम होते. लिव्ह-इन रिलेशन्स जरी असली तरी लग्नाचीच मानत असे. आम्ही बारकाईने निरीक्षण केले होते. फाटकापाशी कुणी आले की प्रथम व्हिकी ओरडे. हे महाशय कुशीवर पडून पाहत असत. ती ओरडे आणि याच्याकडे पाही. मग मात्र हे तटशिरी उठून फाटकाकडे भुंकत धावत येत. करत काहीच नसत. भुंकून झाले की परत व्हिकीशेजारी उभे राहून तिच्याकडे अभिप्रायार्थ पाहत. ती लक्षही देत नसे. 


हा म्हमद्या महा धडपड्या होता. समोर मेजर रहदारीचा रस्ता होता. ट्रक, एस्टी बसेस सारख्या जातयेत. एकदा असाच तो धावला आणि पुढचे पाय प्लास्टरमध्ये घेऊन बसला. पण तरीही अक्कल आली नाही. आठवड्यातच पुन्हा प्लास्टरसकट धावला आणि या खेपेस मागचेही दोन पाय प्लास्टरमध्ये आले. चारी पाय प्लास्टरमध्ये घेऊन पाय लांब करून पहुडलेला असायचा. जाम हसू यायचं. पण स्वारीची व्हिकेप्रतिची निष्ठा अस्खलित होती. तिला त्याच्या अवस्थेची जराही पर्वा नव्हती तरी. तर असं हे विकलांग अवस्थेत तो पडून असताना, अचानक माकडं आली. समोर सान्यांच्या आवारात जांभळाचं झाड होतं त्यावरची जांभळं खाणं हा वार्षिक कार्यक्रम करायला. त्यातला एक बलदंड हुप्प्या सान्यांच्या गेटच्या दगडी खांबावर येऊन बसला. तो यांच्यापासून १०० फुटांवर, रस्त्याच्या पलीकडे. काही अडलंय का? पण नाही, व्हिकीला ते पटलं नाही. तिने जोरजोरात भुंकून म्हमद्याकडे पाहिलं. जणू “जा, जरा बघ, नुसता पडलायस तंगड्या गळ्यात घेऊन” असंच म्हणत असावी. म्हमद्या जिवाच्या कराराने उठला. पाय तर वाकत नव्हते. तसेच ताठ पाय करत एक एक पाऊल टाकत त्या हुप्प्यापर्यंत पोचला. आणि वर बघून त्याच्याकडे पाहत जोरजोरात भुंकू लागला. पायात ताकद नसली तरी नरड्यात बक्कळ होती. त्या हुप्प्याने दुर्लक्ष केलं. पण हा गडी थांबेचना. शेवटी त्याला असह्य झालं ते. तो चटशिरी खाली उतरला आणि उजव्या पंजाने एक सण्णदिशी म्हमद्याच्या कानाखाली ठेवून दिली. म्हमद्याचे चारी पाय अचानक वेदना विसरले. गाड्यांची पर्वा न करता तो तुरूतुरू परत आपल्या आवारात आला आणि व्हिकीच्या शेजारी उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचं कसंनुसं हसू आम्हाला स्पष्ट दिसत होतं. व्हिकीनं,”पडला उज्जेड. काही उपयोग नाही तुमचा!” हे म्हटलेलंही आम्हाला स्पष्ट ऐकू आलं. ती निघून जात असताना म्हमद्याचं “जानू! जानू! अगं ऐकून तर घे! पाय धड असते तर सोडला नसता त्याला! दत्ताची आण!” हे केविलवाणं बोलणंही ऐकू आलं. निखळ प्रेम प्रेम ते हे!

असा मी कवी मी

 “धोंडोपंत!!” नानू जवळजवळ ओरडलाच! काही अगम्य कारणाने तो खुर्चीच्या अगदी कडेवर बसून काम करत होता. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार ओरडण्यासाठी जी शक्ती लागली तिची समान विरुद्ध शक्ती कार्यान्वित झाल्यामुळे तो सटकन खुर्चीवरून खाली घसरला. मी टेबलासमोर उभा असल्याने मला आता त्याचे फक्त कपाळ टेबलाच्या कडेवरून सूर्य वर येत असल्यासारखे दिसले. नानूचे टक्कल तेजोनिधी लोहगोल होऊन प्रच्छन्नपणे चमकले. 

“काय रे  नानू, कामात आहेस का?” मी विचारले.

“अं? हां हां. नाही. म्हणजे हो. जरा काम चालू होतं.” नानू गडबडून म्हणाला. त्याने समोरच्या कागदावर एक फाईल हळूच कॅज्युअली ठेवली. पण त्याआधी खालच्या कागदावर अनेक ठिकाणी केलेली खाडाखोड मला दिसली होती. म्हणजे तो कविता लिहीत असणार याचा मला अंदाज आला होता.


“धोंडोपंत! तुम्ही काय केलंत म्हणालात?” नानूच्या चेहऱ्यावरचा अविश्वास वाहून चालला होता.


“होय नानू. मी कविता केलीय.” मी गुन्ह्याची कबुली दिली. नानू स्थिर नजरेने आ वासून माझ्याकडे पाहत होता. त्या नजरेने मीच अस्वस्थ झालो.


“हे पहा नानू, असं काहीतरी अघटित घडल्यासारखं करू नकोस. मान्य, आजवर मी आफिसच्या कागदावर टॅली, आणि शंकऱ्या शरीच्या प्रगतीपुस्तकावर सही यापलीकडे काही लिखाण केलेलं नाही, पण तू असा चेहरा करतोयस जसा काही मी कुणाचा तरी खून केला आहे आणि मर्डर वेपन घेऊन स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झालो आहे.” मी म्हणालो. 


 नानू तसाच काही वेळ माझ्याकडे पाहत राहिला. मग हळूहळू त्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य ओसरत जाऊन मिष्किलपणाचे भाव आले.


“धोंडोपंत, तुम्ही मला असं फसवू शकणार नाही. खरं सांगा, अलिकडे तुम्ही लंचटाईममध्ये पंचाक्षरी मंत्र लिहीत बसता ते मी पाहिलंय. ते मला दाखवून माझ्यावर काही परिणाम होतो ते पहायचं आहे ना तुम्हाला? धोंडोपंत, तुम्हाला खरंच वाटतं मी ॲबनॉर्मल इसम आहे?” नानू हसत पण जरा गंभीर होऊन म्हणाला.


“अरे नानबा, मी कशाला असं करू? एक तर लंचटाईम मध्ये मी मंत्रबिंत्र लिहीत नाही. मला नामस्मरणाने झोप लागते. आमच्या हिला ती ध्यानधारणा वाटते. परवाच मी असा पेंगत असताना ही तिच्या मैत्रिणीला फोनवर आमचं ध्यान जपाला बसलंय असं सांगत होती ते अंधुकसं कानावर पडलं. मला बरं वाटलं. जरा तरी मान मिळतोय असं वाटलं. त्यानंतर त्या फिदीफिदी हसत होत्या ते मात्र जरा खटकलं. ध्यान करतोय त्यात हसायचं ते काय? तर, मी काही मंत्रबिंत्र लिहीत बसत नाही. गेले काही दिवस आयुष्यात काही तरी करावं असं वाटतंय मला. आयुष्य कचेरीत खर्डेघाशी, परत येताना मेथीची पेंडी, ताकभात आणि मग रात्री आठलाच ऊर्ध्व लागणे असं मलखांबासारखं तुळतुळीत आयुष्य गेलं. पूर्वी अचानक पाऊस आला की चटकन् आडोसा शोधायचो. पण आता वाटतं पाऊस आला की हात पसरून आकाशाकडे चेहरा करून ते थेंब मुक्तपणे झेलावेत, कोटधोतर वाळायची चिंता न करता. ही ओरडेल त्याची पर्वा न करता. शंकऱ्या फादर फादर, तुम्ही धोतर नेसलेला शारुक खान दिसत होता असं म्हणेल तिकडे लक्ष न देता.” मी श्वास घ्यायला थांबलो.


नानू चटकन् उठला, मला हाताला धरून त्याच्या टेबलासमोरच्या खुर्चीवर बसवलंन. बाजूच्या माठातून पाण्याचा ग्लास भरून आणलान आणि दरडावणीच्या सुरात म्हणाला,”धोंडोपंत! आधी शांत व्हा आणि हे प्या!” असं सांगून तो लगबगीने गेला. आणि एका मिनिटात आप्पा, गोपाळराव, रेग्या, केशर मडगावकर, हेडक्लार्क काळे, सेक्शनच्या पोक्त्या पुरवत्या आजीबाई मिसेस जोग असा अख्खा सेक्शनच काळजीयुक्त चेहऱ्याने माझ्याभोवती जमला. या नानूने त्यांना काय सांगितलं होतं देव जाणे. 

“धोंडोपंत! तुम्ही काळजी करू नका! या वयात असं होतं. माझ्या चुलतबहिणीच्या यजमानांनाही असंच झालं होतं. रोज योगासनं, बारा सूर्यनमस्कार घालणारा, बसल्या बैठकीला पन्नास गुलाबजाम उठवणारा, वाघाला लाजवेल अशा डरकाळ्या फोडत झोपणारा माणूस एके दिवशी सकाळी उठला आणि माझ्या बहिणीला म्हणाला मी तुझ्यासाठी आजवर काहीच केलं नाही गं, तू बस आज तुला चहा मी करून देतो. माझी बहीण तर खचलीच. रडारड सुरू. काल रात्रीपर्यंत बरे होते, छान खेकसून वगैरे झोपले आणि सकाळी काय बाधा झाली न कळे असं बोलणं सुरू झालं. मी म्हटलं बहिणीला, कुंदे, यू डोन्टच वरी. आय नो व्हाट टू डू. सरळ उचलून ठाण्याला नेला. मनोरुग्णालयाची पाटी पाहिली आणि गडी निम्मा तिथेच बरा झाला.” आप्पा वदला. 


“बरं झालं बाई आप्पा तुम्ही होतात. मग झाले का बरे तुमचे मेहुणे?” केशरने विचारले.


“निम्मे बरे झाले म्हटलं की. उरलेल्याला वेळ लागेल असं डॉक्टर म्हणतायत आता. पण फरक पडलाय हो. पूर्वीसारखे बहिणीवर गुरगुरू लागलेत. कुंदेला त्याचंच अप्रूप. तेव्हा धोंडोपंत! डोन्ट वरी! नाऊ लीव्ह इट टू आप्पा!” आप्पाचा आत्मविश्वास त्याला स्वतःला एकदा त्याच इस्पितळात भरती करणार आहे.


“मिस्टर जोशी, तुम्ही हाफ डे टाकून जरा घरी जा पाहू. विश्रांती घेतली की बरं वाटेल.” हेडक्लार्क काळे.


“धोंडोपंत, ऐका माझं. हे काहीतरी बाहेरचं आहे हां. आपल्या जाणिवेपलीकडच्या गोष्टी असतात. तुम्ही माझ्याबरोबर चला. चिंचपोकळीला एक अधिकारी पुरुष आहेत, वालावलकर म्हणून. अगदी साधा माणूस. पण सिद्ध! तुमचा विश्वास असेल तर डोक्याभोवती प्रभावळपण दिसेल हां. काही बाहेरचं लागलं असेल तर तिथे नुसता प्रवेश केल्यावर ते तडफडतं. तुम्हाला हे खरंतर चुकून लागलं असावं. काय मिळणार हो तुमच्या मागे लागून?“ गोपाळराव कळकळीने म्हणाले. खरंच पुण्यवान सच्छील माणूस.


“अरे अरे! लोक हो, माझं ऐकाल का जरा? मला साहित्यिक प्रेरणा होऊ शकते यावर तुमचा विश्वास नाहीये का? आम्ही काय फक्त कौटुंबिक साहित्याचाच विचार करायचा? आम्हाला काय केशराची घमघमणारी शेतं दिसू नयेत?” मी चिडून म्हणालो.


“हे सालं केशराचं घमघमणार जे म्हणालात ना ते फार किळसवाणं हां धोंडोपंत! चाळीत राहून सकाळी तपश्चर्या करणाऱ्याने तरी ही उपमा देऊ नये. आणि जरी ते वास्तव असलं तरी थेट कविता?” नानू गांभीर्याने म्हणाला. 


“धोंडोपंत, काय आहे तरी काय तुमची कविता? वाचा पाहू! त्यावरून ठरवतो अर्जंट ठाण्याला जाऊ की कसे ते.” हा आप्पा निर्दयी आहे.


तरी मी त्यांना कविता ऐकवली.


सहा आण्यांचं जगणं

दोन आणे खाणं

दोन आणे पिणं

दोन आणे झोपणं

सूर्याचं रोज उगवणं

तेच विश्व पाहून मावळणं

पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं

काळवेळ पाहून कलणं

मुंगीचं कण कण गोळा करणं

का? त्याचं कारणही न कळणं

कारण न कळताच मरणं

सत्य न जाणताच विरणं

मग आपलं अस्तित्व खरं की 

की अज्ञाताचा क्षणिक बुडबुडा असणं?


मी थांबलो. सगळ्यांकडे पाहिलं. आप्पा निर्विकार होता. गोपाळरावांच्या डोळ्यात काळजी होती. केशर आपलं नेलपॉलिश पाहत होती. काळेंच्या कपाळावर आठी होती. मिसेस जोगांच्या डोळ्यांत कणव होती. आणि नानू.. त्याच्या चेहऱ्यावर आनंदयुक्त मत्सर होता.


“जोशी! रोजच्या कामाचा बुडबुडा येवंदे हां, हे नसते बुडबुडे काय ना!” मिसेस जोगांनी नेहमीच्या स्टाईलने टोमणा मारलाच.


“धोंडोपंत! वेलकम् टू वन परसेंट! तुम्हाला मागे आरस्पानी दर्शन होईल म्हटलं तर तुम्ही म्हणजे बनियन वगैरे का असं विचारलं होतंत. या कवितेत मला तुमच्या बनियनच्या खिशातील तंबाखूची डबीही दिसली. एवढंच नव्हे तर माणूस वर टेरलीनची प्यांट असली तरी आत चट्ट्यापट्ट्यांची आकाशकंदील चड्डी घालूनच असतो हे वैश्विक सत्य तुम्हाला उमगलंय तेही मला या कवितेत दिसलं. माणूस फार काळ अज्ञानी राहू शकत नाही हेच यातून दिसतं.” नानू म्हणाला. 


“धोंडोपंत, हे फार पुढे जायच्या आत माझ्याबरोबर ठाण्याला चला.” आप्पा निर्विकारपणे म्हणाला. त्याला अज्ञान ठाऊकच नाही. 


सगळे गेल्यावर नानू जरासा खिन्न होऊन म्हणाला,”धोंडोपंत, तुम्हाला काय कमी आहे? कविता हे एकच कुरण असं आहे जिथे मी इतर वत्सल कामधेनूंकडे पाहत हिरवं बाटूक चघळतो. तुम्हाला तुमची मालकीण स्वहस्ते आंबोण आणून समोर टाकते. तुम्ही आमच्या कुरणात येऊन माझ्यासमोरचं पावशेर गवतही का हिरावून घेता?” असं म्हणून त्याने मघाशी ठेवलेली फाईल उचलली आणि भाराभर खाडाखोड असलेली कविता लिहिलेला कागद प्रेमाने उचलला. त्याची घडी घालत असताना मला त्यावर लिहिलेले “प्रिय सरला हीस” ही अक्षरे ओझरती दिसली. म्हणजे सध्याच्या वत्सल कामधेनूचं नाव सरला होतं तर. काव्याचं कुरण नेहमीच बहरलेलं असावं.

-मंदार वाडेकर

Friday, January 13, 2023

धर्माचे प्रयोजन तरी काय

 मनुष्य हा जाणिवेच्या पातळीवर आणि तिच्याहून खालच्या अशा दोन पातळ्यांवर काम करू शकतो. नेणिवेच्या पातळीवर ज्या प्रेरणा उद्भवतात त्यांना आपण सहजप्रवृत्ती म्हणतो तर जाणिवेच्या पातळीवरून ज्या प्रेरणा येतात त्यांना तर्कबुद्धि म्हणतो. परंतु यापेक्षाही उच्च अशी एक पातळी आहे. ती अतींद्रिय ज्ञानाची पातळी होय. वरवर पाहता ते नेणिवेसारखी वाटते कारण ती जाणिवेच्या पलीकडील आहे. पण ही जाणिवेच्या वरची पातळी आहे. खालची नव्हे. ही सहजप्रवृत्ती नसून, दिव्यस्फूर्ति आहे. जे महान द्रष्टे, संत, विभूती होऊन गेले, त्यांच्या सर्वसामान्य लोकांसारख्या आषुष्यात काही क्षण वा प्रसंग असे येऊन गेलेले दिसतात जेथे त्यांना बाह्य जगाची जाणीव नसल्याचे दिसते पण जेव्हा ते त्या स्थितीतून बाहेर आले तेव्हा त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालेले होते. सॉक्रेटिसबद्दल असं सांगतात की सैन्याबरोबर चालत असताना एके ठिकाणी त्याला सूर्योदयाचे सुंदर दृश्य पहायला मिळाले आणि तात्काळ त्याच्या मनात एक विचारप्रवाह सुरू झाला, त्याचे देहभान हरपले. तो सतत दोन दिवस तेथेच उभा होता. जेव्हा त्या स्थितीतून बाहेर आला तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झालेले होते. असेच प्रसंग ख्रिस्त, गौतमबुद्ध, ज्ञानेश्वर अशा महात्म्यांच्या आयुष्यात आले. जणूकाही जाणिवेच्या पातळीवरून ते बाहेर पडले आणि जेव्हा जाणिवेत ते परतले तेव्हा आत्मज्ञानाने ते उजळून गेलेले होते. आता ही जी अवस्था होती ती दिव्यस्फूर्ती. ती कधी कशाने आणि कुणाला प्राप्त होईल ते माहीत नाही पण ती झाली तर अंतिम ज्ञान प्राप्त होते हे या थोरांच्या उदाहरणावरून दिसले आहे. आपण सर्वसामान्य माणसे सहजप्रवृत्तित जगत असतो. दिव्यस्फूर्तीच्या असण्याचे ज्ञानही आपल्याला नसते. हीच ती दिव्यस्फूर्ती जे धर्माचे एकमेव उगमस्थान आहे. परंतु दुर्दैवाने याला मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा स्पर्श झाला आणि त्यातून “ईश्वराने आम्हाला संदेश दिला आहे आणि आम्हीच त्याचे संदेशवाहक आहोत, इतर कोणासही हा संदेश प्राप्त करण्याचा अधिकार नाही” अशी लुच्चेगिरी पुढे आली. कुठलेही उदात्त तत्त्व, अंतिम ज्ञान “आम्ही सांगतो तेच सत्य, आमचे सत्य न मानणाऱ्यांना तुम्ही ठार मारा” असे असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण अंतिम सत्यात केवळ सच्चिदानंद आहे, तो मानवी जाणिवेच्या वरच्या स्तरावरचा आहे. त्यात जाणिवेच्या पातळीवरील तर्कशास्त्र लावून निरर्थक शिक्षा वा नियम लावण्याची गरजच नाही. आम्हीच काय ते ईश्वराचे एजंट हे म्हणणे तर्कदुष्ट आहे. कारण, या विश्वात एकही हालचाल अशी नाही जी विश्वव्यापी नाही. संपूर्ण विश्व हे नियमांनी नियंत्रित आहे. ते पूर्णपणे सुव्यवस्थित आणि सुसंवादी आहे. केप्लरचे ग्रहभ्रमणासंबंधीचे नियम हे संपूर्ण विश्वात लागू होतात. हेच इतर सर्व बाबींत आहे. याचाच अर्थ, जे सामान्यपणे विश्वात घडते ते सर्वांना समान अनुभवता येते. हीच बाब अंतिमज्ञानाबाबतही लागू होते. तेव्हा अंतिमज्ञान जर काही असेल तर ते दिव्यस्फूर्तीमार्गे सर्वांना समान दिसले पाहिजे. मग ही दिव्यस्फूर्ती तरी काही लोकांनाच झाली हे कसे काय? तर मला वाटतं दिव्यस्फूर्ती स्वीकारण्यासाठी जी क्षमता लागते ती सर्वांच्या ठायी नसावी. उदाहरणार्थ, ४०,००० व्होल्ट दाब असलेला विद्युतप्रवाह साध्या घरातल्या फ्यूजच्या तारेला सहन होणार नाही. त्यासाठी उच्चदाबाच्याच तारा हव्यात. तसे काहीसे हे असावे. आपण सर्वसामान्य माणसे दिव्यस्फूर्तिचा दाब सहन होणारे नसू. आपण आपला साधा २१० व्होल्टचा सामान्य करंट वाहून आपले जीवन जगू. आपल्याला ४०,०००० व्होल्टची अनुभूती येणं शक्यच नाही. पण त्या दिशेने आपण पाऊल तरी टाकू शकतो. साधी फ्यूजची तार ते उच्चदाब सहन करणारी तार ही साधना करण्याचे साधन म्हणजे धर्म होय. देवळात, चर्चमध्ये वा मशिदीत जाणे म्हणजे धर्म ही भरकटलेली आणि भरकटवलेली व्याख्या आहे. धर्माचे लक्ष्य हे अंतिम ज्ञान हेच आहे.

- मंदार वाडेकर

Thursday, January 5, 2023

श्रद्धा आणि विज्ञान

काही वेळा बुद्धिवंत लोकांमध्येही वादविवाद होत असतात. किंबहुना बुद्धिवंत लोकांमध्येच वाद होऊ शकतात. Idiocracy चित्रपटात आर्मी अधिकारी हीरोला विचारतो,”There are only three things people do. Lead, follow or get out of the way. What are you?” काही बुद्धिवंत लीड करणारे होतात, बाकीचे फॉलो आणि गेट आऊट ऑफ द वे टाईपच निघतात. मग हे जे लीड करणारे म्हणजे स्वतःची बुद्धि लावणारे असतात ते काही विशिष्ट विचारसरणी अनुसरतात. या विचारसरण्या वेगळ्या असू शकतात. आणि हेच मग वादाचं कारण होऊन बसतं. वाद जरूर व्हावेत. पण ते लॉजिकल असावेत, वैयक्तिक उणीदुणी काढणारे नसावेत. ते असो. आमचीच विचारसरणी बरोबर या दुराग्रहातून कुठेतरी आपलाच सत्यशोधनाचा मार्ग आपण मर्यादित करतो आहोत का असा विचार निश्चितच करावा. शास्त्रज्ञाची विचारसरणी ही चिकित्सक विचारसरणी असते. तो मूलभत संशोधन करतो, कार्यकारणभाव शोधतो. त्यानुसार हायपोथेसिस मांडतो. निरीक्षणं करतो, प्रयोग करतो. निरीक्षणं आणि प्रयोगांतून मिळालेला डेटा एक तर हायपोथेसिस सिद्ध करतो वा ते चूक आहे असं तरी सांगतो. खरा शास्त्रज्ञ मग हायपोथेसिस फेकून देऊन दुसरं हायपोथेसिस मांडतो आणि पुन्हा निरीक्षण, प्रयोगाच्या प्रोसेसमधून जातो. वर्षानुवर्षं जातात, शास्त्रज्ञ चिवटपणे चिकित्सा चालू ठेवतो. पण जोवर निरीक्षणांती वा प्रयोगांती सिद्ध होत नाही तोवर एखादी गोष्ट ही नैसर्गिक नियम म्हणून तो स्वीकारत नाही. असाच एक वाद पाहिला आणि कार्ल सागानने लिहिलेली कादंबरी आठवली. द कॉंटॅक्ट.

या कादंबरीत कार्लने अतिशय सुंदर चर्चा केली आहे. धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक मार्ग यांतील. श्रद्धा आणि मार्ग असे शब्द मी मुद्दाम वापरतो आहे. श्रद्धा म्हणजे कार्यकारणभाव न पाहता ठेवलेला गाढ विश्वास, तर मार्ग म्हणजे सत्य शोधण्याची एक शिस्तबद्ध पद्धत. पृथ्वीवरील सर्व रेडिओ दुर्बिणींनी एका विशिष्ट पॅटर्नचा संदेश डिटेक्ट केला आहे. तो एका ठराविक कालावधीने रीपीट होतो आहे. हा संदेश अवकाशातील एका विशिष्ट तारकासमूहाच्या दिशेने येतो आहे. अर्थातच ही घटना मानवजातीच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना आहे. प्रथमच कुठेतरी विश्वात इंटेलिजंट जीवसृष्टी असल्याचा पुरावा म्हणून या संदेशाकडे पाहिलं जात आहे. आणि इथे वेगळ्या विचारसरणींचा संघर्ष सुरू होतो. ख्रिश्चन धार्मिक विचारवंतांचं म्हणणं असतं हा देव असल्याचा पुरावा आहे. तर शास्त्रज्ञ हा नक्कीच एका प्रगत बुद्धिमान संस्कृतीकडून प्रक्षेपित झालेला संदेश आहे. मग श्रद्धा आणि शास्त्रीय विचारसरणी यांच्यातील वादविवाद सुरू होतो. धर्मगुरुंच्या मते,”तुम्ही शास्त्रज्ञ फारच कीस पाडता. तुम्ही कशावरही विश्वास ठेवत नाही. फार चिकित्सा करता. तुम्हाला सत्यासत्यता लगेच पडताळून पहायची असते. आणि तीसुद्धा तोकड्या ज्ञानाच्या चौकटीत राहून. तुमच्या सत्यासत्यतेचे निकषही काय तर, निरीक्षणातून जमवलेला इंपिरिकल डेटा. तुमच्या मते सत्य तेच, जे पंचेंद्रियांमार्फत अनुभवता येतं. अंतर्भूत प्रेरणेला कुठेही जागा नसते, साक्षात्काराला कुठेही स्थान नसते. धार्मिकतेला तुम्ही अगदी सुरुवातीलाच कंडम करून टाकता. काही गोष्टी या विश्वास ठेवून करायच्या असतात, अंतर्मनाच्या अनुभूतीवर विश्वास ठेवून करायच्या असतात. ज्या गोष्टी पारंपारिकरीत्या छान चालल्या आहेत त्यांना धक्का द्यायचाच कशाला? Haven’t you heard, if it ain’t broken, don’t fix it? बरं, एकदा एक गोष्ट सिद्ध झाली तरी तुम्ही गप्प बसत नाही. त्यातही परत परत संशोधन करत राहता. आणि नवं काही तरी आढळलं की आधीचा सिद्धांत टाकून देता. यासाठीच मलाही शास्त्रज्ञांवर अजिबात विश्वास ठेवावासा वाटत नाही कारण त्यांचा कशावरही विश्वास नाही.”
यावर एली, जी कादंबरीत एक शास्त्रज्ञ आहे, ती प्रतिवाद करते,”शास्त्रज्ञाला कुठलीही संकल्पना त्याज्य नाही. अगदी तुमची विनाधार श्रद्धादेखील तुम्हाला मान्य आहे ही गोष्ट शास्त्रज्ञ स्वीकारतो. त्या श्रद्धेचं शास्त्रीय प्रयोगासारखं डेमॉन्स्ट्रेशन करता येत नसूनही ती एक विचारधारा आहे हे मान्य आहे. शास्त्रोक्त चिकित्सेला सामोरे जायला तुम्ही कचरता. चिकित्सेची पद्धत काही अचानक निर्माण झालेली नाही. हे विश्व साधे सोपे सरळ नाही. ते अगदी साधे सरळ आणि तरीही क्लिष्ट आहे. क्लिष्ट गोष्टींमागील तत्व समजून घेण्याचा मार्गही सरळ साधा सरधोपट नसतो. सुरुवात साध्या तर्काने होते. त्या आधारावर एक थिअरी मांडली जाते. ती सिद्ध करायला निरीक्षणं केली जातात. पहिल्याच फटक्यात कधीच थिअरी सिद्ध होत नाही. पण मग स्वतःला फसवणं हे येतं. सद्यकालात चुकीचे आहेत असे माहीत असलेले सिद्धांत एके काळी सर्वांनीच उचलून धरले होते. शास्त्रज्ञांनीही. धर्मगुरूंनी आणि राजकीय शक्तींनीही! गुलामी, नात्झी वंशवाद, पृथ्वीभोवती सूर्य फिरतो ही काही उदाहरणं. पण चूक कोण करत नाही? To err, is human असं म्हटलंच आहे. पण अशा चुका टाळण्याचा किंवा कमी करण्याचा मार्ग म्हणजे चिकित्सा करणे, कुठलाही सिद्धांत अंतिम हे न मानणे. आणि तो सिद्धांत काटेकोर कठोर निकषांच्या आधारावर तपासून पाहणे. साक्षात्कार, म्हणजे कुणीतरी ज्ञान हे अंतिम ज्ञान म्हणून हातावर ठेवणे हे मी मानत नाही. कुणावर तरी विश्वास हा सिद्धांत सिद्ध होण्यासाठी निकष असणं हे पटण्याच्या पलीकडे आहे. परंतु वेगवेगळे विचार असणाऱ्यांनी एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने विचारविमर्श केला, आपल्या पद्धतीने प्रयोग वा परीक्षा केल्या तर या सर्व विचारमंथनातून सत्य दिसण्याची शक्यता वाढते. वैज्ञानिक संशोधनाचा इतिहास हेच सिद्ध करतो. चिकित्सेचा मार्ग काही शंभर टक्के सत्य समोर आणेल असे नाही पण या मार्गात अपयश स्वीकारण्याची आणि वेगळ्या विचाराने पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद आहे. आणि त्यामुळे हीच पद्धत हळूहळू का होईना आपल्याला सत्याकडे नेऊ शकणारी आहे. देवाने काही धर्मातील लोकांना सांगितले की विश्वाचे वय ६००० वर्षं आहे. पण त्याच देवाने हिंदूंना सांगितले की विश्व अनंत वर्षांचे आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत. दोघांनीही आपला विश्वास चूक असू शकतो असे गृहीत धरून संशोधन करायला हवे. दोन्ही बाजूंनी जर असे म्हटले,”आमच्या ग्रंथांत तसे म्हटले आहे आणि आम्ही तेच खरे मानू” तर हा परस्परविरोध तसाच राहून सत्य काय ते कळणार नाही. मग पुढे काय? तर दोन्ही वेगळ्या मतांच्या समूहांनी चिकित्सा करावी. निरीक्षणं करावीत, डेटा गोळा करावा. त्यातून एक काही तरी सिद्ध होईल. किंवा दोन्ही चुकीचे असून सत्य काहीतरी वेगळेच आहे असं तरी दिसेल. पण तो पुढे जाण्याचा मार्ग असेल. प्रगतीचा मार्ग असेल.”
शास्त्रोक्त चिकित्सा आणि त्यावर आधारित असा सिद्धांत वा नियम हे मानायला कुठल्याही बाजूचा विरोध का असावा? खरा शास्त्रज्ञ तयार असेल. पण श्रद्धा, विश्वास, साक्षात्कार वाल्यांनाही हे मान्य असायला प्रत्यवाय नसावा.
स्वतःची श्रद्धा ही अंतिम असं वाटणाऱ्यांना तशीच श्रद्धा असणाऱ्यांची झुंड का हवी असते हे मला कळू शकत नाही. आपल्या मताप्रमाणे दुसऱ्याचं मत परिवर्तन करायची गरजच काय? दुसऱ्याला सत्याची आस असेल तर तो स्वतःहून तुमची श्रद्धा मान्य करेल अथवा करणार नाही. हिंदू धर्मात हे एक अतिशय चांगलं आहे. हिंदू धर्म प्रसार आणि प्रचारक ही संकल्पना अस्तित्वातच नाही. तसंच शास्त्रज्ञांचंही असतं. माना अथवा मानू नका, संशोधन चालू राहील. पण श्रद्धा आणि विश्वासवाल्यांचं असं नसतं. भावनाशील होऊन ते हिरीरीने पटवायला जातात, अनुयायी बनवायला जातात. धर्मप्रसारासारखंच ते वाटतं. सत्यशोधनात भावनेला थारा नाही.
-मंदार वाडेकर

नानबाची उपवास कथा

आज नानू परत आमच्या घरी आला. तशीच ती शबनम खांद्याला अडकवलेली. नेहरू शर्टाच्या खिशाला पेन खोचलेलं. पण आज ते पेन गळलं होतं. त्याचा रुपायाएवढा डाग खिशाच्या खाली दिसत होता. दाढीचे खुंट नुकतीच लावणी केलेल्या भाताच्या शेताप्रमाणे दिसत होते. गेल्या काही वर्षांत नानूच्या डोक्यावरील केसांनी स्वयंघोषित तह डिक्लेअर करून सैन्य चांगले दोनतीन मैल मागे नेले होते. क्षितिजावर काही केस उभे होते तेही आज जरा हतबुद्ध झाल्यासारखे वाकले होते.

“ये ये नानू! अगदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आलास. आता नवीन वर्षसोहळा साजरा करूनच जा हो! हिने छान मुगाची खिचडी आणि कढी असा बेत केलाय! सोबत पोह्याचा पापडही! तुला आवडतो ना, मला माहीत आहे.” मी म्हणालो.
“हं…” प्रदीर्घ निःश्वास टाकून नानू तसाच उभा राहिला.
त्या प्रदीर्घ हं ने मी ओळखलं, नानूचा पापड मोडलाय. एरवी पोह्याच्या पापडाचं नाव काढलं की तो खुलत असे. आज तसं काही झालं नाही.
“नानबा, आणि हे रे काय? खिशाखाली डाग पडलाय शाईचा. पेन गळतंय की काय? जरा कविता कमी कर थोडे दिवस. पेनालाही विश्रांती लागते बरं.” मी जरा वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.
“हं!” पुन्हा एकदा दीर्घ निःश्वास!
“धोंडोपंत, इथे हृदयच गळतंय भळाभळा. त्यातून येणाऱ्या रुधिराने अंतःकरणाला मोठ्ठा डाग पडलाय आणि तो कुणालाही दिसत नाहीय.” नानू शून्यात बघत म्हणाला. रुधिर वगैरे म्हणजे प्रकरण गंभीर दिसत होते.
“काय रे, ती तुझी परांजपीण परत आलीय का गावात?” मी जरासं मिष्किलपणे म्हणालो.
“धोंडोपंत, परांजपीण कशाला येतेय आता? तिच्यावर वट्ट बारा कविता झाल्या. आठवड्याला एक या हिशेबाने. इराण्याच्या हॉटेलात फॅमिलीरूममध्ये चहा आणि ब्रूनमस्का एवढीच प्रगती झाली आमची. नाही. आता तिचा त्रास होत नाही मला. चिनी मातीच्या बरणीत तिच्या आठवणी घालून वरून फडकं घट्ट बांधून टाकलंय. परवा कुडाळकरने माहिती काढून आणली. तिचं खरं नाव बापट आहे म्हणे. माझ्या प्रेमाशी ती कधीच एकनिष्ठ नव्हती धोंडोपंत. मरूदे. मी बरणीवर बापटीण असं लिहून टाकलंय आता.” नानूने खांदे पाडले आणि डोळे मिटले.
“अरे नानू, जाऊ दे रे. ही परांजपीण गेली तर दुसरी येईलच की. परांजपे वंश काही संपला नाहीये.” मी म्हणालो.
“नाही धोंडोपंत, परांजपे-सरंजामे युती आता होणे नाही. त्या युतीमधून केवळ चौतीस रुपये बारा आण्यांची बिलं प्रसवली आहेत. ते असो. पण आज आकाश कुंद झालंय. हृदयात खिन्नतेच्या लाटांचा पूर उसळला आहे. माझं आयुष्य हे काही एव्हरेस्टइतकं उच्च नाही पण ते पर्वतीसुद्धा नसावी असं लोकांना वाटतं?” नानू उद्गारला.
“अरे पण एवढं आकाश कुंद व्हायला काय झालं? सकाळीच हवामानखात्याच्या अंदाजात लख्ख उजेड आणि छत्तीस डिग्री तापमान राहील असं सांगत होते. टोपीच्या आत कांदा ठेवा, ताक किंवा पाणी सतत प्या असाही सल्ला देत होते.” मी म्हणालो.
परत एक दीर्घ निःश्वास.
“जाऊ दे धोंडोपंत. नाही कळायचं तुम्हाला. सर्जनशील मनाची घुसमट काय असते हे दुसऱ्या सर्जनशील मनालाच कळतं. चाळीतल्या नळाला काय कळणार धरणाच्या काळजातलं ओझं?” नानू विद्ध झाला होता.
“मी म्हणजे चाळीतला नळ काय रे? मलाही कळतं हं ते तुझं सर्जनशील का काय ते. हिचा एक लांबचा भाऊ चांगला सर्जन झालाय. इथेच केईएमला असतो. उत्तम शील आहे त्याचं. तिथल्या नर्सेस सांगतात. आणि काय रे, झालंय काय एवढं तुला घुसमटायला? चांगला रोज चौपाटीवर जातोस, भेळ चापतोस, तो ओझोन की काय ते पितोस.” मी म्हणालो.
“धोंडोपंत, माझी कला मी कधीच स्वार्थासाठी वापरली नाही. कला आपल्यात असली तरी तिच्यावर मानवतेचा अधिकार आहे असंच मी मानतो.” नानू.
मला कळेना, हा दृष्टद्युम्न असा बाण न लागताच रथात आडवा का पडतोय?
“म्हणजे रे काय? आणि कसली कला? तू मागे शंकऱ्याला ती जादू दाखवली होतीस ती? तुझ्या कवितेच्या कागदाची सुरळी तोंडातून घालून विजारीच्या मागच्या खिशातून काढून दाखवली होतीस ती? शंकऱ्या जाम इम्प्रेस झाला होता. फादर फादर, मी मोठा होऊन कवी होणार म्हणत होता.” मी म्हणालो.
“धोंडोपंत! आजही तुम्ही माझ्या कवितेला कला मानत नाही ठाऊक आहे मला. पण तुम्हाला सांगतो मला वाचकवर्ग आहे. त्याला ती आवडते. हा वाचकवर्ग म्हणजे दिवसभर पोराबाळांची, नवऱ्याची उस्तवार करून दमलेला, कपाळावरच्या कुंकवाचा फराटा झालाय हे माहीत असूनही मरू दे मेलं, इथं कुणाला दाखवायचंय असं म्हणणारा, ओटा पुसून, उष्टं केराच्या डब्यात टाकून मगच घटकाभर आडवं होणाऱ्या गृहिणी! माझी कविता हीच काय ती त्यांची स्वातंत्र्याची पहाट असते. कित्येकजणी “नानू नानू, नवीन कविता म्हणा की!” असं लडिवाळपणे म्हणत येतात तेव्हा माझ्या दाढीच्या खुंटांत कसंसंच होतं. तुम्हाला ते फीलींग कधीच नाही कळणार. या सगळ्या सोज्वळ, साध्यासुध्या बायका रे. नवऱ्याने वाढदिवसाला कुकर किंवा केरसुणी दिली तरी बेहोष होणाऱ्या. कविता साबुदाण्यावर केली काय, ताजमहालावर केली काय.. साबुदाणा भिजवला या आनंदातच यांचा स्वर्ग. त्या आनंदालाही दृष्ट लागली. माझी साबुदाणा कविता हरली. सत्वाचा पराभव झाला. शेंगदाणा जिंकला.” नानूचं काही खरं नव्हतं.
“अरे पण काय झालंय काय? आणि कुठली ही कविता म्हणायची?” मी.
नानूचा चेहरा जरा उजळला. आणि मला माझी चूक उमगली. पण वेळ निघून गेली होती. नानूने झोळीतून कागद बाहेर काढला होता. चष्मा चढवला होता.
“पंत! ऐका!”
कवितेचं नाव आहे “आर्द्र”.
शुभ्र वाळूत ती आली
श्वेत वस्त्रं लेऊन आली
ठळक गोलाई घेऊन आली
अंगांग भिजवून आली
सावकाश आली थबकली
नजरेत वारुणी हरवली
ठिपके ठिपकेवाली
सोनेरी कंचुकी चमचमली
काय वाटते तुला म्हणाली
आठवते ती रात्र मखमली
धुंद झालास तू मी गंधाळलेली
तू भुकेला मी उपासलेली
युरेका! वीज चमचमली
आठवले भूक होती लागली
साबुदाणा खिचडीसम ती भासली
भिजवला का?
पोस्ट लगेच टाकली..
नानू, अभिप्रायाच्या अपेक्षेत माझ्याकडे पाहू लागला.
“संपली?” मी विचारले.
“छान आहे की. पण मला वरून ओलं खोबरं कोथिंबीर पखरलेलं आवडतं.” मी म्हणालो.
नानू म्हणाला,”होय ना? अरे या बायकांसाठी हाच उच्चबिंदू असतो रे. छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधत असतात. कुणी नुसता साबुदाणा म्हटलं तरी सात्विक आनंदात स्वतःच निथळून निघतात त्या. तर कुणा नतद्रष्टाला ते पाहवलं नाही. या कवितेत काही तरी सूचक आहे का तुम्हीच सांगा! मला परस्त्री ही साबुदाण्याच्या खिचडीप्रमाणे पवित्र वाटते. मासिक बोंबच्या या अंकात पहा काय म्हटलंय माझ्या कवितेविषयी..” नानूने अंक माझ्यासमोर आपटला.
“सरंजामेंची कविता ही युगायुगांच्या दमनातून आल्यासारखी वाटते. कवीने प्रथमच साबुदाणा पाहिला आहे. त्याची गोलाई त्याला कसलीतरी आठवण करून देते आहे. तो भिजला आहे या कल्पनेनेच कवीचे मन गळले आहे. भिजलेला साबुदाणा चिकट झाला आहे. क्लांत झाला आहे. कवीसुद्धा श्रांत झाला आहे. ही कविता म्हटलं तर खिचडी, म्हटलं तर वजडी आहे. भिजवला का? या दोन शब्दांत मानवतेचे उद्धरण आणि प्रजनन दोन्ही सामावले आहे.”
“नानू, अरे छान आहे की रसग्रहण! यात रागावण्यासारखं किंवा हिरमुसण्यासारखं काय आहे?” मी म्हणालो.
“धोंडोपंत, नाही कळणार तुम्हाला. तुम्हाला काय माहीत स्त्रीचं मन काय असतं ते. त्यांना नानूचं रुसणंही आवडतं. त्यांचे नवरे स्वतः रुसणं तर सोडा, या रुसल्या तरी दुर्लक्ष करणारे असतात. इथे त्यांचा हा कृष्णमुरारी, कन्हैया, त्यांच्या साबुदाण्याशी खेळतो, प्रसंगी ते चोरतो, कधी ते मिळाले नाहीत तर रुसतो, ही रासलीला फार गोड असते. या रासलीलेला जर एक नतद्रष्ट रीसलीला म्हणत असेल तर मी ती बंदच केलेली बरी.” नानू एवढं बोलून गप्प झाला.
“नानूभावजी, हे हो काय? अहो तुमच्या साबुदाणा कवितेची मी कित्ती कित्ती वाट पाहत असते. तुम्ही या धोंडोपंतांकडे लक्ष नका देऊ, या समीक्षेकडे लक्ष नका देऊ. माझ्यासाठी.. माझ्यासाठी एवढं कराल ना? भिजवाल ना तुमचा.. साबुदाणा??” पिटपिट पापणी, ओष्ठलाली लावलेली एक चाळिशीतली यौवना नानूला पाहून थबकली होती आणि त्याला गळ घालत होती. नानू फुलला होता. त्याच्या खिशाखाली शाईचा डाग मोठा होऊ लागला होता.


छान छान डॉक्टर

 लोकांना काय छान छान डॉक्टर लोक भेटतात. ते शारीरिक इलाज तर करतातच, पण मित्रही बनतात, समुपदेशकही बनतात, क्वचित प्रसंगी तत्वज्ञानी बनून आदिभौतिक, पारलौकिक आणि पारमार्थिक मार्गदर्शनही करतात. परवा प्राजक्ताची पोस्ट वाचली आणि मला तिचा हेवाच वाटला. काय छान डॉक्टर आहेत तिचे! नऊ तास झोप काढा असं सांगणारा डॉक्टर मला मिळण्यासाठी मी नवसही बोलायला तयार आहे. आणि हे डॉक्टर तेवढ्यावर थांबले नाहीत. प्रिस्क्रिप्शनच्या कागदावर जिथे जेमतेम P काढून ते पॅरासिटॅमॉल आहे असं गृहीत धरलं जातं तिथे या डॉक्टरांनी सुवाच्य अक्षरात दोन सुविचारही लिहून दिले. ते सुविचार जीवनोन्नतीच्या सहा सोपानांपैकी पहिले दोन तरी नक्कीच होते. हे सगळं वाचून मला माझे काही डॉक्टर आठवले.

त्याचं झालं असं, टेबल टेनिस खेळताना माझ्या उजव्या खांद्याच्या स्नायूत जोरदार कळ आली. गेलो ऑर्थोपेडिककडे. त्यांनी हं हं हं करत ऐकून घेतलं आणि एक मस्तपैकी स्टीरॉईडचं इंजेक्शन ठोकलं खांद्यात. म्हणाले नाही बरं वाटलं तर परत या, सर्जरीच करावी लागेल. हे म्हणजे मडगार्ड चेपल्यावर मेकॅनिकदादा जसं “सायेब, इंजिन खोलावं लागेल” असं सांगतात तसंच. साला आमच्या चेहऱ्यावरच “मी भोट आहे” असं लिहून आलंय की काय. इंजेक्शनने शष्प फरक पडत नाही. मी मडगार्ड तसंच ठेवतो. उगाच इंजिन खोलायचं आणि मेकॅनिकदादा,”सायेब, तुमच्या कबाटाची बिजागरी गंजून खल्लास, बदलाय लागेल.” असं सांगायचे. नकोच ते. टेबलटेनिस बंद म्हणजे श्वासोच्छ्वास बंद अशीच परिस्थिती. फोरहॅंड बंदच झाला. पण देव एक दार बंद करतो पण दुसरं उघडतो तसं झालं. फोरहॅंड बंद झाल्यामुळे बॅंकहॅंड स्ट्रोक्स सुधारले. तर ते असो. मडगार्ड चेपलेलंच राहिलं.
मग भारतात येणं झालं. बोलताबोलता बाबांना खांद्याबद्दल सांगितलं. ते अस्वस्थ झाले. लगेच डॉक्टरांकडे जायचं फर्मान निघालं. त्यांची एक आवड होती. मुलं कितीही कमावती झाली तरी त्यांच्यासाठी कपडे करणे, चपला घेणे, अंगाला तेलाने मालिश करून आंघोळीला पाठवणे हे त्यांना अत्यंत आनंदाचं वाटे. आम्हीही ते आनंदाने करून देत असू कारण त्यात त्यांना “I am taking care of my children” याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो असं आम्हाला वाटे. ते आम्हा दोन भावांनाच असं नाही तर सगळ्या आमच्या चुलत, आत्तेभावंडांनासुद्धा पोटच्या मुलांप्रमाणेच हे करत. प्रेमळ आणि अतिभावुक वृत्तीचे होते ते. तर माझ्या खांद्यामुळे ते अस्वस्थ झाले. दुसऱ्याच दिवशी एका स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे मला ते घेऊन गेले. हे डॉक्टर स्वतः निरोगी होते. म्हणजे एकही रोगी वेटिंग रूममध्ये नव्हता. तरी आम्हाला त्यांनी पंधरा मिनिटे बसवून ठेवले आणि मगच आत बोलावले. नाव गाव, काम काय करता वगैरे प्राथमिक चौकशी झाल्यावर काय होतंय वगैरे विचारलं. मी सांगितलं. तशी म्हणाले,”फ्रोझन शोल्डर. हो हो. हे होणारच.”
आं? होणारच म्हणजे? मी विचारलं.
“म्हणजे असं बघा, तुमचा बीएमआय असा आहे की तुमच्या खांद्याचीच काय, कशाचीच गॅरंटी देता येत नाही. तुम्ही डायबेटिक असणार. तेव्हा हे फ्रोझन शोल्डर वगैरे होणारच.”
बाबा प्रचंड भडकले, तरी संयम ठेवून म्हणाले,”अहो म्हणून तर तुमच्याकडे आलो ना? यावर इलाज करायला?”
त्यावर ते म्हणाले,”त्याला काही इलाज नाही. यांची काहीच गॅरंटी नाही. इथून बाहेर पडल्यावर कोपऱ्यापर्यंत जाईस्तोवर हे वर जाऊ शकतात.”
बाबा उठले नि म्हणाले,”नमस्कार!” आम्ही बाहेर पडलो. फी तर आगाऊ घेऊनच आत सोडलं होतं.
तणतणतच घरी आलो. आईही चिडली हे ऐकून. बाबा म्हणाले,”आता आपण उद्या दुसरीकडे जाऊ.” मी म्हणालो,”जाऊद्या बाबा, इतकं काही महत्वाचं नाहीय हे.” पण त्यांनी ऐकलं नाही. राजा विक्रमादित्याप्रमाणे त्यांनी माझा खांदा त्यांच्या खांद्यावर घेतला आणि आम्ही दुसऱ्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या दिशेने वाटचाल करू लागलो.
हे डॉक्टर मुळीच निरोगी नव्हते. बाहेर साधारण पन्नास ते साठ दुर्मुखलेले लोक बसलेले होते. म्हणजे हे डॉक्टर खरंच चांगले असणार. “कार्ड काडलंय का?” ही एक स्टॅंडर्ड चौकशी असते ती झाली. कार्ड काढलं. यथावकाश डॉक्टरांच्या समोर मी उभा होतो. हे डॉक्टर काही केबिनमध्ये वगैरे बसलेले डॉक्टर नव्हते. एका मोठ्या ऑपरेशन थिएटर कम गोठा वाटणाऱ्या प्रशस्त खोलीत मी उभा होतो. समोर बाह्या सरसावून उभे असलेले डॉक्टर होते. मला त्यांनी टेबलवर बसायला सांगितले. आणि हात वर करा म्हणाले. त्यांनी एक हात माझ्या काखोटीत धरला, दुसरा हाताने माझं मनगट धरलं. मला अचानक पशु वैद्यकीय दवाखान्यात लोखंडी पाईपच्या पिंजऱ्यात डांबलेल्या वळूचं फीलींग आलं. पण सुटका नव्हती. त्यांनी माझा हात हळूहळू मागे न्यायला सुरुवात केली. प्रचंड वेदना सुरू झाल्या. मला म्हणाले,”तुम्हाला बोंबलायचं वगैरे असेल तर खच्चून ओरडा बरं. काही हरकत नाही.” वेल, थॅंक्स अ लॉट डॉक्टर! पुढील एक मिनिट मी गुरासारखा ओरडत राहिलो. ते “हं हं!” करत राहिले. मला सडकून घाम फुटला. आता मी बेशुद्ध पडणार असं वाटत असताना त्यांनी माझा हात सोडला. पाच मिनिटं पडून रहा म्हणाले. नंतर काय आश्चर्य, माझा खांदा अगदी ३६० डिग्रीत फिरू लागला होता. ब्लड सर्क्युलेशन सुरू झालं. डॉक्टर मात्र पुढच्या वळूकडे वळले होते.
हे असे डॉक्टर कुठे आणि प्राजक्ताला भेटलेले,”तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का? जरुर वाचा. आपला सोल युनिव्हर्सशी हार्मनीमध्ये असला की सगळे अवयवही आपोआप हार्मनीत असतात साहेब.” असं सांगणारे डॉक्टर कुठे. नशीब एकेकाचं.

Saturday, October 9, 2021

वग : आला आला पावसाळा

 सूत्रधार : पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर नवीन अंकुर येतात, कोंब येतात, पालवी फुटते, हिरवंगार होतं सगळीकडे.सगळे हिरवे हिरवे गार गालिचे पसरलेले दिसतात सगळीकडे. सुखद असं दृश्य दिसत असतं. पावसाळा जसं नवीन जीवन घेऊन येतो तसंच प्रत्येक ऋतू काही बरं तर काही वाईट घेऊन येत असतो. 


(गातो) - दिसलीस तू, फुटले ऋतू
(विंगेतून प्राॅप्टरची खणखणीत कुजबूज)- फुलले! फुलले ऋतू असं आहे ते!
सूत्रधार - हो हो! (परत गातो) फुललीस तू, सरले ऋतू.. प्राॅम्पटर ही नाटकातली किती सोय आहे नाही?
राजा - पाऊस म्हटलं ना की मला आपल्या बैठका आठवतात. परवाच छान दोन बैठका झाल्या. बाहेर पाऊस पडतोय, गडगडतंय, आम्ही बसलोय. म्हटलं... आम्ही ब स लो य. 

सूत्रधार - हो हो! वा! आपलं बसणं म्हणजे काय! प्रश्नच नाही!

राजा - पावसाचा अंदाज हवामानखात्यानं दिला रे दिला की आम्ही सगळी तयारी करूनच ठेवतो. मग कुठे पाऊस पडणार आहे, त्या भागात आपले कुणी हितचिंतक आहेत का, किंवा मग आपलं एखादं फार्महाऊस आहे का असं सगळं बघावं लागतं. पाऊस आनंद घेऊन येतो, नवजीवन घेऊन येतो, तशा या काळज्याही घेऊन येतो. 

परवाचा पाऊस डोंबलवाडीत पडणार आहे असं हवामानखात्याने कळवलं, मग प्रोग्राम कॅन्सल करावा लागला. तिथे डेंग्यूचे डास आहेत. आम्हीच पाळले होते, पण सुटले मच्छरदाणीतून. काय करणार?

सूत्रधार - खरंच, काय करणार? अलिकडे मच्छरदाण्यांचीही क्वालिटी खालावलीय.

राजा - पाऊस पडला की आम्ही गाव सोडून पळतोच कुठेतरी. पळावंच लागतं. अहो, लोक कविता घेऊन येतात. किती वेळा सांगितलं तरी ऐकत नाहीत. मुसक्या बांधून मास्क आवळला तरी कविता करतात. आमच्या पहारेकऱ्यांनी पोटऱ्या शेकाटून काढल्या तरी वाचून दाखवतात. काय करणार?

सूत्रधार - खरंच, काय करणार?

राजा - प्रत्येकाची संवेदनशीलता... 

सूत्रधार - (मध्येच तोडत) खरंच, संवेदना नाही, शील तर नाहीच नाही..

राजा - आम्ही म्हणत होतो प्रत्येकाच्या संवेदनेची वेदना आम्ही का सहन करायची? बरं यांची संवेदना गुलाबजांबू पासून रानीवनी शीळ घालणाऱ्या बांबूपर्यंत पसरलेली असते.

गवळण १ येते (पैंजणाचे आवाज) -
साद घालतो हा वारा
घुमते शीळ हिरवे बांबू
गोडवा पसरे मनी माझ्या
जसा जिभेवर गुलाबजांबू॥

सूत्रधार - महाराज, त्याच बांबूने या कवीला वाजवू का? हुकूम द्या नुसता.

राजा - सूत्रधार, तुम्ही असं कॅरॅक्टरचं बेअरिंग सोडू नका. आमचीच प्रजा ती. कवितेने पछाडलं, बांबूने बडवलं आणि राजाने हाकललं तर कसं व्हायचं? सहन करू आपण काय करणार?

सूत्रधार - खरंच, काय करणार? अलिकडे बांबूही पूर्वीसारखे दणकट राहिले नाहीत.

राजा - अलिकडे काही वर्षांत चारोळ्या नावाचा नवीन जिवाणू आला आहे. सर्व ऋतूत असणारा पण पावसाळ्यात जास्त ॲक्टिव्ह होणारा. हा अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे मराठीत कसेबसे पस्तीस मार्कवाल्यांनाही सहज होतो. कुठल्याही उपायाला जुमानत नाही. आणि कुठेही असू शकतो. विषयाचं बंधनच नाही. कोकाकोलाच्या बाटलीचं बूच ते नारळाची, आपलं काय ते, कवटी.. हां, नारळाच्या कवटीपर्यंत कुठल्याही विषयावर चारोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. काय करणार?
आता हीच पहा, आली बघा कशी बागडत.

गवळण २-
आला आला पावसाळा
सर सर मौक्तिकमाळा
मनी आठवणींना उजाळा
हाती ओपनरचा चाळा...

आता याला काय करणार?
पण हा रोग जसा येतो तसा आपोआप जातो. त्रास द्यायचा नुसता चंगो बांधलाय यानं. काय करणार? अरेच्या! माफ करा हं, चंग म्हणायचं होतं. हो. ते चारोळीवाले चंद्रशेखर गोखले उगाच भडकायचे आणि आणखी चारोळ्या करायचे.

सूत्रधार - खरंच, काय करणार? हल्ली चंगोही पूर्वीसारखे चारोळ्या करत नाहीत असं ऐकलं.

राजा - देवाला काळजी. चंगोंची नाही, आपली. 

आला पावसाळा
पिण्याचे पाणी उकळा
चारोळ्या कविता गाळा
रोगराई नारू टाळा..

बरं, आज आमच्या मनोरंजनाची काय व्यवस्था आहे?

सूत्रधार (टाळी वाजवत) - अरे कोण आहे रे तिकडे?

(कुणीच येत नाही.)

अरे हो, महाराज, सांगायचं विसरलो. आपणच हुकूम काढून सगळ्या पहारेकऱ्यांना घरून काम करायचा आदेश दिला आहे ना? हवं असल्यास सांडणीस्वार पाठवून हशम बोलावून घेतो.

राजा - नको नको. हे हशम लोक आमची सुरक्षा फारच मनावर घेतात. परवा आम्ही महालातून धावत जात होतो तर आमच्या मागे धावत थेट पायखान्यात आले. आता आम्हाला अचानक अत्यंत निकडीने पायखान्यात जावे लागले तर तीही मुभा नाही का? बरं, एरवी पायखान्यात हे असे शेजारी उभे राहिले तर आम्हाला स्फूर्ती कशी येणार? बरं काढून टाकलं तर पायखान्यात निश्चिंत होऊन साधना करता येणार नाही. म्हणून मग आम्ही त्यांना काही दिवस घरून काम करण्याचा आदेश दिला आहे.

(दासी येऊन वर्दी देते)
  • महाराजांचा निजय असो. सरकारांच्या सहाव्या राणीसाहेब, हर हायनेस सौभाग्यवती ताराबाईसाहेब येत आहेत.

सूत्रधार - मुजरा, श्रीमंत हर हायनेस सरकार.

ताराबाईसाहेब - महाराज, आज आम्ही मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो आहोत. का सांगा बरं?

राजेसाहेब (खाकरत) - प्रधानजी, तुम्हा या आता. इथून हे संभाषण कुठे जाईल हे सांगता येणार नाही.

ताराबाईसा - तुम्ही थांबा हो. आम्ही काही यांना झापण्यासाठी आलो नाही. महाराज, आज आम्ही काव्याचा एक नवीन प्रकार प्रसवला आहे.

राजेसाहेब (खालच्या आवाजात) - प्रधानजी, बघा. लग्न होऊन तीन वर्षं झाली, आमच्या आऊसाहेब नातू प्रसवण्याचा धोशा लावून आहेत आणि यांना इकडे काव्य प्रसवतंय.
(मोठ्याने) - वा वा! काव्य म्हणजे वा वा च! आम्हाला काव्यशास्त्रविनोद आवडतो. हल्ली काव्यात शास्त्र कुणी फारसं वापरत नसल्याने त्याचा काव्यविनोद झालाय तो भाग वेगळा. आम्ही तुमचं काव्य ऐकण्यास उत्सुक आहोत.

ताराबाईसा - हसायचं नाही हं. आम्ही पावसावर चारोळी केलीय.

सूत्रधार - हरे रामा! (गडबडून) म्हणजे मला म्हणायचं होतं, अरे वा! 

ताराबाईसा - प्रधानजी, कळतात आम्हाला हे टोमणे. तरी तुम्हाला ऐकावंच लागेल.

[आला पाऊस सरा सरा
गळती मोतियांच्या धारा]२
मन चिंब ओले माझे
आणि तन मोरपिसारा..

राजा - वाहवा वाहवा वाहवा! क्या बात क्या बात क्या बात! 
(थांबतो, हळूच म्हणतो) प्रधानजी, जरा जास्तच दाद गेली का?

सूत्रधार - मलाही स्फूर्ती येतेय महाराज!
महाराज - करा, तुम्हीही करा. 

सूत्रधार -
[आला पाऊस सरा सरा
शोधा छत्री अन् डोक्यावर धरा]२
डोके राहिले स्वच्छ कोरडे
चिंब टिंबटिंब अन् चिखल धोतरा..

राजेसाहेब - वाहवा वाहवा! म्हणजे.. मला म्हणायच होतं, लाहोर विलायतकुवत! राणीसाहेबांच्या चारोळीचं विडंबन करताना तुम्हाला भीती नाही वाटली?!

सूत्रधार - महाराज, ते लाहोल विलाकुवत असं असतं.

राजेसाहेब - खामोष! वर आम्हाला अक्कल शिकवता?? याची सजा तुम्हाला मिळालीच पाहिजे! ऐका! यापुढे राणीसाहेब ज्या काही कविता करतील त्या सर्व त्या तुम्हाला ऐकवतील! ही सजा तुम्ही एक वर्ष भोगायची आहे.

सूत्रधार - माफी! माफी!

[आला पाऊस सरा सरा
धरती चिंब झुळझुळ वारा]२
रयत सुखी समृद्ध झाली
सरकारांचा त्यांना सहारा..

राजेसाहेब - वाहवा! वाहवा! वाचलात प्रधानजी! तुमच्या उस्फूर्त प्रतिभेकडे पाहून तुमचा प्रमाद आम्ही माफ करतो आहोत.
(दोघे हसतात आणि टाळी देतात)

ताराबाईसा - हं:! कळतात आम्हाला तुम्हा दोघांची बोलणी! आमच्या कविता म्हणजे सजा काय! येतो आम्ही!

महाराज - अहो राणीसाहेब, अशा नाराज होऊ नका. आम्हाला आवडली तुमची कविता. इतकी आवडली ती आता आम्हालाही कविता होतेय अशी भावना होऊ लागलीय.

[आला पाऊस सरा सरा
पाझरला कल्पनेचा झरा]२
राजा असो वा कोणी रंक
त्याला उदार मनाने माफ करा

(मोठ्याने हसतो)

सूत्रधार - वाह महाराज, वाह! महाराजांचा कल्पनासूर्य माध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे तळपतो आहे. या सूर्याच्या दिव्य तेजापुढे भले भले कवी अगदी काजव्याप्रमाणे क्षीणतेज वाटतील. आपल्या प्रतिभेच्या उत्तुंग शिखरापुढे मेरूमांदार धाकुटे पडतील. तिच्या गतीसी कुठलीच तुळणा नसे. तिच्या आरक्त प्रभेने सूर्यमंडळ ग्रासून टाकले आहे.

महाराज - अहो! पुरे! स्तुती करताहात की भीमरूपी महारुद्रा म्हणताहात? आता चपळांग पाहता मोठे करा आणि विद्युल्लतेपरी जाऊन राज्याची काय व्यवस्था आहे ते पाहून या. थांबा, शेवटची चारोळी ऐका आणि जा

[पाऊस आला सरा सरा
इकडून तिकडे गेला वारा]२
जित्याची खोड काही सुटेना
र ला ट लावा, पण कविता करा