आज नानू परत आमच्या घरी आला. तशीच ती शबनम खांद्याला अडकवलेली. नेहरू शर्टाच्या खिशाला पेन खोचलेलं. पण आज ते पेन गळलं होतं. त्याचा रुपायाएवढा डाग खिशाच्या खाली दिसत होता. दाढीचे खुंट नुकतीच लावणी केलेल्या भाताच्या शेताप्रमाणे दिसत होते. गेल्या काही वर्षांत नानूच्या डोक्यावरील केसांनी स्वयंघोषित तह डिक्लेअर करून सैन्य चांगले दोनतीन मैल मागे नेले होते. क्षितिजावर काही केस उभे होते तेही आज जरा हतबुद्ध झाल्यासारखे वाकले होते.
“ये ये नानू! अगदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आलास. आता नवीन
वर्षसोहळा साजरा करूनच जा हो! हिने छान मुगाची खिचडी आणि कढी असा बेत केलाय! सोबत पोह्याचा पापडही! तुला आवडतो ना, मला माहीत आहे.” मी म्हणालो.
“हं…” प्रदीर्घ निःश्वास टाकून नानू तसाच उभा राहिला.
त्या प्रदीर्घ हं ने मी ओळखलं, नानूचा पापड मोडलाय. एरवी पोह्याच्या पापडाचं नाव काढलं की तो खुलत असे. आज तसं काही झालं नाही.
“नानबा, आणि हे रे काय? खिशाखाली डाग पडलाय शाईचा. पेन गळतंय की काय? जरा कविता कमी कर थोडे दिवस. पेनालाही विश्रांती लागते बरं.” मी जरा वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.
“हं!” पुन्हा एकदा दीर्घ निःश्वास!
“धोंडोपंत, इथे हृदयच गळतंय भळाभळा. त्यातून येणाऱ्या रुधिराने अंतःकरणाला मोठ्ठा डाग पडलाय आणि तो कुणालाही दिसत नाहीय.” नानू शून्यात बघत म्हणाला. रुधिर वगैरे म्हणजे प्रकरण गंभीर दिसत होते.
“काय रे, ती तुझी परांजपीण परत आलीय का गावात?” मी जरासं मिष्किलपणे म्हणालो.
“धोंडोपंत, परांजपीण कशाला येतेय आता? तिच्यावर वट्ट बारा कविता झाल्या. आठवड्याला एक या हिशेबाने. इराण्याच्या हॉटेलात फॅमिलीरूममध्ये चहा आणि ब्रूनमस्का एवढीच प्रगती झाली आमची. नाही. आता तिचा त्रास होत नाही मला. चिनी मातीच्या बरणीत तिच्या आठवणी घालून वरून फडकं घट्ट बांधून टाकलंय. परवा कुडाळकरने माहिती काढून आणली. तिचं खरं नाव बापट आहे म्हणे. माझ्या प्रेमाशी ती कधीच एकनिष्ठ नव्हती धोंडोपंत. मरूदे. मी बरणीवर बापटीण असं लिहून टाकलंय आता.” नानूने खांदे पाडले आणि डोळे मिटले.
“अरे नानू, जाऊ दे रे. ही परांजपीण गेली तर दुसरी येईलच की. परांजपे वंश काही संपला नाहीये.” मी म्हणालो.
“नाही धोंडोपंत, परांजपे-सरंजामे युती आता होणे नाही. त्या युतीमधून केवळ चौतीस रुपये बारा आण्यांची बिलं प्रसवली आहेत. ते असो. पण आज आकाश कुंद झालंय. हृदयात खिन्नतेच्या लाटांचा पूर उसळला आहे. माझं आयुष्य हे काही एव्हरेस्टइतकं उच्च नाही पण ते पर्वतीसुद्धा नसावी असं लोकांना वाटतं?” नानू उद्गारला.
“अरे पण एवढं आकाश कुंद व्हायला काय झालं? सकाळीच हवामानखात्याच्या अंदाजात लख्ख उजेड आणि छत्तीस डिग्री तापमान राहील असं सांगत होते. टोपीच्या आत कांदा ठेवा, ताक किंवा पाणी सतत प्या असाही सल्ला देत होते.” मी म्हणालो.
“जाऊ दे धोंडोपंत. नाही कळायचं तुम्हाला. सर्जनशील मनाची घुसमट काय असते हे दुसऱ्या सर्जनशील मनालाच कळतं. चाळीतल्या नळाला काय कळणार धरणाच्या काळजातलं ओझं?” नानू विद्ध झाला होता.
“मी म्हणजे चाळीतला नळ काय रे? मलाही कळतं हं ते तुझं सर्जनशील का काय ते. हिचा एक लांबचा भाऊ चांगला सर्जन झालाय. इथेच केईएमला असतो. उत्तम शील आहे त्याचं. तिथल्या नर्सेस सांगतात. आणि काय रे, झालंय काय एवढं तुला घुसमटायला? चांगला रोज चौपाटीवर जातोस, भेळ चापतोस, तो ओझोन की काय ते पितोस.” मी म्हणालो.
“धोंडोपंत, माझी कला मी कधीच स्वार्थासाठी वापरली नाही. कला आपल्यात असली तरी तिच्यावर मानवतेचा अधिकार आहे असंच मी मानतो.” नानू.
मला कळेना, हा दृष्टद्युम्न असा बाण न लागताच रथात आडवा का पडतोय?
“म्हणजे रे काय? आणि कसली कला? तू मागे शंकऱ्याला ती जादू दाखवली होतीस ती? तुझ्या कवितेच्या कागदाची सुरळी तोंडातून घालून विजारीच्या मागच्या खिशातून काढून दाखवली होतीस ती? शंकऱ्या जाम इम्प्रेस झाला होता. फादर फादर, मी मोठा होऊन कवी होणार म्हणत होता.” मी म्हणालो.
“धोंडोपंत! आजही तुम्ही माझ्या कवितेला कला मानत नाही ठाऊक आहे मला. पण तुम्हाला सांगतो मला वाचकवर्ग आहे. त्याला ती आवडते. हा वाचकवर्ग म्हणजे दिवसभर पोराबाळांची, नवऱ्याची उस्तवार करून दमलेला, कपाळावरच्या कुंकवाचा फराटा झालाय हे माहीत असूनही मरू दे मेलं, इथं कुणाला दाखवायचंय असं म्हणणारा, ओटा पुसून, उष्टं केराच्या डब्यात टाकून मगच घटकाभर आडवं होणाऱ्या गृहिणी! माझी कविता हीच काय ती त्यांची स्वातंत्र्याची पहाट असते. कित्येकजणी “नानू नानू, नवीन कविता म्हणा की!” असं लडिवाळपणे म्हणत येतात तेव्हा माझ्या दाढीच्या खुंटांत कसंसंच होतं. तुम्हाला ते फीलींग कधीच नाही कळणार. या सगळ्या सोज्वळ, साध्यासुध्या बायका रे. नवऱ्याने वाढदिवसाला कुकर किंवा केरसुणी दिली तरी बेहोष होणाऱ्या. कविता साबुदाण्यावर केली काय, ताजमहालावर केली काय.. साबुदाणा भिजवला या आनंदातच यांचा स्वर्ग. त्या आनंदालाही दृष्ट लागली. माझी साबुदाणा कविता हरली. सत्वाचा पराभव झाला. शेंगदाणा जिंकला.” नानूचं काही खरं नव्हतं.
“अरे पण काय झालंय काय? आणि कुठली ही कविता म्हणायची?” मी.
नानूचा चेहरा जरा उजळला. आणि मला माझी चूक उमगली. पण वेळ निघून गेली होती. नानूने झोळीतून कागद बाहेर काढला होता. चष्मा चढवला होता.
कवितेचं नाव आहे “आर्द्र”.
शुभ्र वाळूत ती आली
श्वेत वस्त्रं लेऊन आली
ठळक गोलाई घेऊन आली
अंगांग भिजवून आली
सावकाश आली थबकली
नजरेत वारुणी हरवली
ठिपके ठिपकेवाली
सोनेरी कंचुकी चमचमली
काय वाटते तुला म्हणाली
आठवते ती रात्र मखमली
धुंद झालास तू मी गंधाळलेली
तू भुकेला मी उपासलेली
युरेका! वीज चमचमली
आठवले भूक होती लागली
साबुदाणा खिचडीसम ती भासली
भिजवला का?
पोस्ट लगेच टाकली..
नानू, अभिप्रायाच्या अपेक्षेत माझ्याकडे पाहू लागला.
“संपली?” मी विचारले.
“छान आहे की. पण मला वरून ओलं खोबरं कोथिंबीर पखरलेलं आवडतं.” मी म्हणालो.
नानू म्हणाला,”होय ना? अरे या बायकांसाठी हाच उच्चबिंदू असतो रे. छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधत असतात. कुणी नुसता साबुदाणा म्हटलं तरी सात्विक आनंदात स्वतःच निथळून निघतात त्या. तर कुणा नतद्रष्टाला ते पाहवलं नाही. या कवितेत काही तरी सूचक आहे का तुम्हीच सांगा! मला परस्त्री ही साबुदाण्याच्या खिचडीप्रमाणे पवित्र वाटते. मासिक बोंबच्या या अंकात पहा काय म्हटलंय माझ्या कवितेविषयी..” नानूने अंक माझ्यासमोर आपटला.
“सरंजामेंची कविता ही युगायुगांच्या दमनातून आल्यासारखी वाटते. कवीने प्रथमच साबुदाणा पाहिला आहे. त्याची गोलाई त्याला कसलीतरी आठवण करून देते आहे. तो भिजला आहे या कल्पनेनेच कवीचे मन गळले आहे. भिजलेला साबुदाणा चिकट झाला आहे. क्लांत झाला आहे. कवीसुद्धा श्रांत झाला आहे. ही कविता म्हटलं तर खिचडी, म्हटलं तर वजडी आहे. भिजवला का? या दोन शब्दांत मानवतेचे उद्धरण आणि प्रजनन दोन्ही सामावले आहे.”
“नानू, अरे छान आहे की रसग्रहण! यात रागावण्यासारखं किंवा हिरमुसण्यासारखं काय आहे?” मी म्हणालो.
“धोंडोपंत, नाही कळणार तुम्हाला. तुम्हाला काय माहीत स्त्रीचं मन काय असतं ते. त्यांना नानूचं रुसणंही आवडतं. त्यांचे नवरे स्वतः रुसणं तर सोडा, या रुसल्या तरी दुर्लक्ष करणारे असतात. इथे त्यांचा हा कृष्णमुरारी, कन्हैया, त्यांच्या साबुदाण्याशी खेळतो, प्रसंगी ते चोरतो, कधी ते मिळाले नाहीत तर रुसतो, ही रासलीला फार गोड असते. या रासलीलेला जर एक नतद्रष्ट रीसलीला म्हणत असेल तर मी ती बंदच केलेली बरी.” नानू एवढं बोलून गप्प झाला.
“नानूभावजी, हे हो काय? अहो तुमच्या साबुदाणा कवितेची मी कित्ती कित्ती वाट पाहत असते. तुम्ही या धोंडोपंतांकडे लक्ष नका देऊ, या समीक्षेकडे लक्ष नका देऊ. माझ्यासाठी.. माझ्यासाठी एवढं कराल ना? भिजवाल ना तुमचा.. साबुदाणा??” पिटपिट पापणी, ओष्ठलाली लावलेली एक चाळिशीतली यौवना नानूला पाहून थबकली होती आणि त्याला गळ घालत होती. नानू फुलला होता. त्याच्या खिशाखाली शाईचा डाग मोठा होऊ लागला होता.