Thursday, January 5, 2023

छान छान डॉक्टर

 लोकांना काय छान छान डॉक्टर लोक भेटतात. ते शारीरिक इलाज तर करतातच, पण मित्रही बनतात, समुपदेशकही बनतात, क्वचित प्रसंगी तत्वज्ञानी बनून आदिभौतिक, पारलौकिक आणि पारमार्थिक मार्गदर्शनही करतात. परवा प्राजक्ताची पोस्ट वाचली आणि मला तिचा हेवाच वाटला. काय छान डॉक्टर आहेत तिचे! नऊ तास झोप काढा असं सांगणारा डॉक्टर मला मिळण्यासाठी मी नवसही बोलायला तयार आहे. आणि हे डॉक्टर तेवढ्यावर थांबले नाहीत. प्रिस्क्रिप्शनच्या कागदावर जिथे जेमतेम P काढून ते पॅरासिटॅमॉल आहे असं गृहीत धरलं जातं तिथे या डॉक्टरांनी सुवाच्य अक्षरात दोन सुविचारही लिहून दिले. ते सुविचार जीवनोन्नतीच्या सहा सोपानांपैकी पहिले दोन तरी नक्कीच होते. हे सगळं वाचून मला माझे काही डॉक्टर आठवले.

त्याचं झालं असं, टेबल टेनिस खेळताना माझ्या उजव्या खांद्याच्या स्नायूत जोरदार कळ आली. गेलो ऑर्थोपेडिककडे. त्यांनी हं हं हं करत ऐकून घेतलं आणि एक मस्तपैकी स्टीरॉईडचं इंजेक्शन ठोकलं खांद्यात. म्हणाले नाही बरं वाटलं तर परत या, सर्जरीच करावी लागेल. हे म्हणजे मडगार्ड चेपल्यावर मेकॅनिकदादा जसं “सायेब, इंजिन खोलावं लागेल” असं सांगतात तसंच. साला आमच्या चेहऱ्यावरच “मी भोट आहे” असं लिहून आलंय की काय. इंजेक्शनने शष्प फरक पडत नाही. मी मडगार्ड तसंच ठेवतो. उगाच इंजिन खोलायचं आणि मेकॅनिकदादा,”सायेब, तुमच्या कबाटाची बिजागरी गंजून खल्लास, बदलाय लागेल.” असं सांगायचे. नकोच ते. टेबलटेनिस बंद म्हणजे श्वासोच्छ्वास बंद अशीच परिस्थिती. फोरहॅंड बंदच झाला. पण देव एक दार बंद करतो पण दुसरं उघडतो तसं झालं. फोरहॅंड बंद झाल्यामुळे बॅंकहॅंड स्ट्रोक्स सुधारले. तर ते असो. मडगार्ड चेपलेलंच राहिलं.
मग भारतात येणं झालं. बोलताबोलता बाबांना खांद्याबद्दल सांगितलं. ते अस्वस्थ झाले. लगेच डॉक्टरांकडे जायचं फर्मान निघालं. त्यांची एक आवड होती. मुलं कितीही कमावती झाली तरी त्यांच्यासाठी कपडे करणे, चपला घेणे, अंगाला तेलाने मालिश करून आंघोळीला पाठवणे हे त्यांना अत्यंत आनंदाचं वाटे. आम्हीही ते आनंदाने करून देत असू कारण त्यात त्यांना “I am taking care of my children” याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो असं आम्हाला वाटे. ते आम्हा दोन भावांनाच असं नाही तर सगळ्या आमच्या चुलत, आत्तेभावंडांनासुद्धा पोटच्या मुलांप्रमाणेच हे करत. प्रेमळ आणि अतिभावुक वृत्तीचे होते ते. तर माझ्या खांद्यामुळे ते अस्वस्थ झाले. दुसऱ्याच दिवशी एका स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे मला ते घेऊन गेले. हे डॉक्टर स्वतः निरोगी होते. म्हणजे एकही रोगी वेटिंग रूममध्ये नव्हता. तरी आम्हाला त्यांनी पंधरा मिनिटे बसवून ठेवले आणि मगच आत बोलावले. नाव गाव, काम काय करता वगैरे प्राथमिक चौकशी झाल्यावर काय होतंय वगैरे विचारलं. मी सांगितलं. तशी म्हणाले,”फ्रोझन शोल्डर. हो हो. हे होणारच.”
आं? होणारच म्हणजे? मी विचारलं.
“म्हणजे असं बघा, तुमचा बीएमआय असा आहे की तुमच्या खांद्याचीच काय, कशाचीच गॅरंटी देता येत नाही. तुम्ही डायबेटिक असणार. तेव्हा हे फ्रोझन शोल्डर वगैरे होणारच.”
बाबा प्रचंड भडकले, तरी संयम ठेवून म्हणाले,”अहो म्हणून तर तुमच्याकडे आलो ना? यावर इलाज करायला?”
त्यावर ते म्हणाले,”त्याला काही इलाज नाही. यांची काहीच गॅरंटी नाही. इथून बाहेर पडल्यावर कोपऱ्यापर्यंत जाईस्तोवर हे वर जाऊ शकतात.”
बाबा उठले नि म्हणाले,”नमस्कार!” आम्ही बाहेर पडलो. फी तर आगाऊ घेऊनच आत सोडलं होतं.
तणतणतच घरी आलो. आईही चिडली हे ऐकून. बाबा म्हणाले,”आता आपण उद्या दुसरीकडे जाऊ.” मी म्हणालो,”जाऊद्या बाबा, इतकं काही महत्वाचं नाहीय हे.” पण त्यांनी ऐकलं नाही. राजा विक्रमादित्याप्रमाणे त्यांनी माझा खांदा त्यांच्या खांद्यावर घेतला आणि आम्ही दुसऱ्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या दिशेने वाटचाल करू लागलो.
हे डॉक्टर मुळीच निरोगी नव्हते. बाहेर साधारण पन्नास ते साठ दुर्मुखलेले लोक बसलेले होते. म्हणजे हे डॉक्टर खरंच चांगले असणार. “कार्ड काडलंय का?” ही एक स्टॅंडर्ड चौकशी असते ती झाली. कार्ड काढलं. यथावकाश डॉक्टरांच्या समोर मी उभा होतो. हे डॉक्टर काही केबिनमध्ये वगैरे बसलेले डॉक्टर नव्हते. एका मोठ्या ऑपरेशन थिएटर कम गोठा वाटणाऱ्या प्रशस्त खोलीत मी उभा होतो. समोर बाह्या सरसावून उभे असलेले डॉक्टर होते. मला त्यांनी टेबलवर बसायला सांगितले. आणि हात वर करा म्हणाले. त्यांनी एक हात माझ्या काखोटीत धरला, दुसरा हाताने माझं मनगट धरलं. मला अचानक पशु वैद्यकीय दवाखान्यात लोखंडी पाईपच्या पिंजऱ्यात डांबलेल्या वळूचं फीलींग आलं. पण सुटका नव्हती. त्यांनी माझा हात हळूहळू मागे न्यायला सुरुवात केली. प्रचंड वेदना सुरू झाल्या. मला म्हणाले,”तुम्हाला बोंबलायचं वगैरे असेल तर खच्चून ओरडा बरं. काही हरकत नाही.” वेल, थॅंक्स अ लॉट डॉक्टर! पुढील एक मिनिट मी गुरासारखा ओरडत राहिलो. ते “हं हं!” करत राहिले. मला सडकून घाम फुटला. आता मी बेशुद्ध पडणार असं वाटत असताना त्यांनी माझा हात सोडला. पाच मिनिटं पडून रहा म्हणाले. नंतर काय आश्चर्य, माझा खांदा अगदी ३६० डिग्रीत फिरू लागला होता. ब्लड सर्क्युलेशन सुरू झालं. डॉक्टर मात्र पुढच्या वळूकडे वळले होते.
हे असे डॉक्टर कुठे आणि प्राजक्ताला भेटलेले,”तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का? जरुर वाचा. आपला सोल युनिव्हर्सशी हार्मनीमध्ये असला की सगळे अवयवही आपोआप हार्मनीत असतात साहेब.” असं सांगणारे डॉक्टर कुठे. नशीब एकेकाचं.

No comments:

Post a Comment