Thursday, March 23, 2017

वग - घरात बायकूराज आणि बाहेर अभिजितम्हाराज

सूत्रधार - म्हाराज! ओ म्हाराज! उटला का न्हाय हो? सूर्य कासराभर वर आलाया. नगरातून रपेट मारायची न्हवं? घोडं तयार करून आणलंय.
(प्रेक्षकांकडे पाहत) - ह्ये आमचं अभिजित म्हाराज सरकार. सक्काळच्या पारी चार वाजता उटत्यात आन भूत मागं लागल्यागत अंधारातनं चालत सुटत्यात. जाता जाता चार जणांना उटवत्यात आन सोताबरोबर फरपटत नेत्यात. आसं सगळ्यांच्या झोपेचा कुटाणा करून झाल्यावर सोता मात्र पाचला घरी येऊन कसं पुन्ना पाखरावानी झोपत्यात. मग आगदी कुनी कानापाशी पार बोंबललं तरी उठत न्हाईत. त्यावर मग अर्चनाराजे राणीसरकारांनी येक युगत काडलीय. हुजऱ्याला कानाशी जाऊन ओरडायला सांगून ठेवलंय. मग त्यो जाऊन खच्चून वरडतोय "म्हाराज म्हाराज! कोण तरी भाईर रस्त्यावर प्लास्टिकची ग्लासं, बाटल्या फेकायलाय. उटा! उटा!" निसता प्लास्टिक शब्द कानावर पडू द्या, येकादी इंगळी डसल्यावानी म्हाराज ताडदिशी उटत्यात. धावत रस्त्यावर जात्यात आन जे काय शिव्या सुरू करत्यात! नाव नगं! "कोन हाय रं त्यो रांडंचा कचरा टाकायलाय रस्त्यावर? सुक्काळीच्या तुझ्या बाचा हाय व्हय रं रस्ता? उचल पयल्यांदा त्यो कचरा!" त्यास्नी शांत करस्तंवर अर्धा तास जातुया.

तसं आमचं हे आताचं म्हाराज काय मूळचं म्हाराज बिराज न्हवतं. तीबी एक ष्टोरीच हाय म्हना. आमच्या गावचं म्हाराज होतं सरकार अमरसिंह प्रतापसिंह इदरउच्चीकर! आता नावावर जाऊ नगा. इथं कुनी कानडी बोलनारं न्हाई न्हवं? न्हाईतर "काय म्हनला? उच्ची कर? बसून करू का उभ्यानं?" आसं म्हनून फिदीफिदी हासशिला. पन नावात काय आसतंय आसं तो शेक्सपियरबाबा म्हणूनच गेलाय न्हवं? तर आमचं उच्चीकर सरकार पाच वर्सांखाली गचाकलं. साॅरी, म्हंजे तेंचं महानिर्वाण का काय म्हणत्यात ते झालं. थोरलं म्हाराजांना बरं का, (डोळे बारीक करून) येक नाद होता. अहो त्यो तसला नाद न्हवं! तुमी लोक बी लै आंबटषौकीन बघा. निसतं नाद आसं म्हटलं, आन तुमी लागले कान टवकारून आयकायला. तर थोरल्या म्हाराजांना नाद हुता तो पावलं मोजायचा. पयल्यांदा एक चाळा म्हणून हे सुरू झालं. पन फुडं फुडं हे वाढतच गेलं. कुटंबी पावलं टाकत गेलं की तोंडानं येक दोन तीन चार चालू. येवढा चाळा लागला की सकाळच्याला म्हालातल्या पलंगावरून उठून पायखान्यात....  पायखाना म्हंजे संडास हो. व्हय. आजकाल तेबी सांगाया लागतंय लोकास्नी. तर, काय सांगत हुतो ..... हां! तर निस्तं पलंगापास्नं पायकान्यात जरी गेलं तरी पावलं मोजत जायचं. फुडं वय झालं, चालणं बंद झालं. मग सज्ज्यात बसून रस्त्यावर चालणाऱ्या कुनाचंबी पावलं मोजत बसायचं. 

(एक जण  कुबड्या घेऊन चालत जातो)
थोरले महाराज - एक... दीड....  दोन...  अडीच...  तीन...  साडेतीन. आरारारा! अरं ए बारा बोडीच्या! काय लग्नाच्या वरातीत चालतुयास काय रं? जरा पावलं जोरात टाक की! दोन न्हाई चांगलं चार तंगड्या हैत की तुला!

प्रधान - म्हाराज, त्या तंगड्या न्हवं, कुबड्या हैत. आपल्या गावातलं एक नंबर चालणारा हुता ह्यो. 

थो. म - आं!? मंग याला कुबड्या का आल्या हैत?

प्रधान - फाटं उटून अंधारात चालायची सवय म्हागात पडली म्हाराज. येक दिशी आसाच अंधारात चालला व्हता. गल्लीत कुत्रीबी गाढ झोपल्याली. याचा पाय येकाच्या शेपटावर पडला आन ते कळवाळलं आन जे काय खच्चून वराडलं! मग बाकीची कुत्री काय मागं ऱ्हात्यात होय? ती बी लागली भुंकाया. आसा काय खकाणा उसळला. झोपलेल्या लोकांस्नी वाटलं, कुनी चोर आलाया. काट्या बिट्या घिऊन लोकं  आली, आन ह्याला धरला, डोस्क्यावरनं कांबळं टाकलं आन आसा काय धुतलाय गड्याला, धोतरातलं दोन्ही पाय गळ्यात घिऊन बसलं ह्ये.

सूत्रधार - गावातल्या शाळांना म्हाराजांनी मोठ्या देणग्या दिलेल्या. तिथंही  यांनी मास्तरांना ताकीद देऊन ठिवल्याली. पोरांस्नी चालताना पावलं मोजायला लावायची. शाळा सुटताना परत्येक पोरांनं मास्तरांकडे पावलांची नोंद करायची.

मास्तर - हजेरी द्या रे पोरानहो! विघ्नेश खाडे!
विघ्नेश  - हजर! आठहजार पावलं!
मास्तर - मिलिंद केळकर!
मिलिंद - हजर!
मास्तर - (वर पाहत ) आणि पावलं?
मिलिंद - आज काय न्हाईत मास्तर. उद्याच्याला भरून काडतो की. 
मास्तर - लेका या इग्नेशकडं बग. पाय म्हंजे तूरकाड्या हैत पन चालतंय बग कसं तुरुतुरु. (विघ्नेश आपले पाय चाचपून पाहतो) आन तू!
मास्तर - बरं फुडं! अमित अर्काटकर 
(अमित नुसताच खाली मन घालून उभा राहतो)
मास्तर - हं! म्हंजे आज बी घरनं मार खाऊन आलायस वाटतं. 
अमित - व्हय मास्तर. मी लै चालायला जायचं म्हंतो पन घरची मानसं लगेच कामाला लावत्यात. कदी गोठ्यातलं शेन आन, कदी शेतकडं जाऊन बांधावरनं पाला घिऊन ये, कदी बाजारात जाऊन त्यालच घिऊन ये. लै कामं मागं लावत्यात. 
मास्तर - व्हय रं पोरा, तुझी दशा म्हाईत हाये मला. बस खाली, लावतो तुजी पावलं हजेरीत मी.बरं, सलील जोशी!
सलील - हजर हाये! 
मास्तर - ते दिसतंय! पावलं सांग!
सलील - आज काय न्हाई मास्तर. 
मास्तर - आं! तुलाबी कामाला लावत्यात काय घरला?
सलील - न्हाई मास्तर. जा म्हनत्यात चालाया. पन मलाच कामं आठवत्यात. फुडल्या वेळेला नक्की. 
मास्तर - पोरांहो, लै टंगळमंगळ चाललीया तुमची. महाराजास्नी कळलं तर मला नोकरीवरून काडत्याल आनि सोता मास्तर होऊन शाळेत येऊन बस्त्याल. बगा मग तुमचं तुमी. भीक नगो पन म्हाराज आवर असं होऊन बसेल. 
सगळी मुले एकसुरात - नगं नगं मास्तर, आमी जातो चालाया आता.

सूत्रधार -अशी ही शाळेची तऱ्हा.

बरं, म्हाराजांस्नी काय पोरबाळ न्हवतं. मग गादी कोन चालवनार? म्हाराजांनी हुकूम काडला. परधानजी, दवंडी पिटवा! गावात जो कुनी चालताना न चुकता न्हेमी पावलं मोजत आसंल त्यो आमच्या माघारी गादीवर बसंल. आसा मानूस तुमी शोधून आणा. मग परधानजींनी गुप्तहेर सोडले. मंडईत, रस्त्यांवर, तमाशाच्या कनातीत, शेताच्या बांधावर, नदीवरच्या घाटांवर, देवळांच्या देवडीवर, गावच्या वेशीवर, चावडीवर , आगदी पार सम्शानातही आशी सगळीकडं मान्सं पेरली. दिवस गेले, म्हैने गेले, कुनीच गावलं न्हाई. थोरलं म्हाराज हातरुनाला खिळल्यालं. पन कुणी तरी घावल ही आस घेऊन बसल्यालं. परधानजी पन डोसकं धरून बसल्यालं. 

कोतवाल (धावत येतो. मुजरा करतो) -  "घावला, परधानजी घावला!"

(आनंदाने) "आं!! कवा, कसा आन कुटं घावला रं?"
कोतवाल - "फाटं फाटंला चालली हुती स्वारी. नदीच्या कडंनं. हातात लोटा, डुईला कमरेचं गुंडाळल्यालं, सदऱ्याच्या खिशात मोबाईल, तेच्यावर हिंदी गानी लावल्याली. म्हटलं आपलाच गावातला आसंल कुनी चाललेला मोकळा हुयाला. पन ह्यो बाबा तोंडानं काय काय बडबडत चाललेला. म्हटलं काय बोलतोय सोताशीच म्हनून बगाया गेलो मागनं, तर कानावर आकडे आले. "दोन हजार पाच, दोन हजार सा, दोन हजार सात..."  म्हनलं, "ओ पावनं! जरा दम धरा.." तर ह्यो बाबा पळायला लागला. मीबी तेच्या मागं लागलो पळायला मग. झुडपामागं लपायला बघत हुता तितक्यात धरला गड्याला. 

"आहो कोतवालसाहेब, माझ्या मागं आसं का लागलाय हो? कालच आलोय गावात. लोटापरेड करायला तुमच्या गावात काय सरकारी परमिट लागतंय काय? निवांत तेबी करू दीना तुमी." 

कोतवाल - "पावने, लै घाईत हाय तुमी!"

अभि- "सक्काळच्या पारी घाई नसंल तर काय असंल सांगा बरं! सोडा हो सोडा लौकर.. न्हाई तर हितंच आमचा घंपतीबाप्पा मोरया होयाचा!"

कोतवाल - "जाशिला हो! येक सांगा की, हे तोंडानं कोणचं स्तोत्र म्हनत होता म्हनं तुमी?"

अभि - " स्तोत्र?  न्हाय हो, स्तोत्र कुटलं म्हनायला? पावलं मोजीत हुतो सोताचीच."

कोतवाल - वा! वा! न्हेमी मोजता का?

अभि - न्हेमी? काय प्रश्न विचारायलाय नको त्या वेळी ? अवं, त्याबिगर चालतच न्हाई. जाऊ द्या ओ आता तरी!

(तुतारी, ढोल, ताशा)
(माळ घालतात) 
"आज पासून आमच्या गावचं राजे तुमी! थोरल्या म्हाराजांची पावलं मोजायची गादी तुमी फुडं चालवनार!"

अभि - "अहो अहो तसं न्हाई हो! माझं आयकून तर घ्या की मी का आकडे मोजत व्हतो ते! त्याचं असं आहे, पाच हजार आकड्यापर्यंतच तग धरता येते आपल्याला. पाच हजार आकडे झाले की जिथं आसंल थितं बसावं लागतं मग. कळ काढता येत न्हाई मग. आज या तुमच्या कोतवालांनी लै घोर परसंग आनला हुता. पाच हजार आकडं झाल्यालं, आन हे चौकशी करत बसले. हितं आमचा जाग्यावर नागिन डान्स चालल्याला. कुटल्याबी टायमाला समदं पुंडलीक वरदा हाssssरी विठ्ठल झालं आसतं."

प्रधान - मंग झालं न्हाई न्हवं? न्हाई तरी आता ही कापडं तुमास्नी लागनार न्हाईत. आता पालकीतनं राजवाड्यावर चलायचं. चला म्हाराज!

सूत्रधार -आन अशा प्रकारे अभिजित सरकार म्हाराजांना राज्य गावलं. सकाळी सकाळी पाच हजार पावलांची सवय चालू ऱ्हायली. गावातल्या लोकांनाही ती लागली पायजे असा तेंचा आग्रह होता. त्यात प्लास्टिकचे कप, बाटल्या उचलायची सवय लागली. कुनी बिसलेरीची बाटली तोंडाला लावून पानी पीत आसेल तर म्हाराज बाटली टाकेतंवर तेच्या मागं मागं फिरायचे. मग फुडं फुडं लोक सोताच येऊन गावात कुटं प्लास्टिकच्या बाटल्या पडल्या आसतील ते नेऊन दाखवायचे.

( गाणं - प्लास्टिकवाले बाबू)

सूत्रधार -कसं का आसंना, म्हाराजांच्या या नादापाई गावाला मात्र लै फायदा झालाया. मानसं चडफडत का हुईना लवकर उठत्यात, चालाया जात्यात, सरकारांच्या शिव्या खात्यात पन तब्येतीत असत्यात. कुनी आजारी फारसं पडंना झालंय. डॉक्टर लोकं माश्या मारत बसू लागली हैत. एक दोन डॉक्टर तर कायमचं गाशा गुंडाळून दुसऱ्या गावाला गेलं. गावातलं प्लास्टिक कमी झालं. किती तरी गाईगुरं पॉट फुगून मरायची. कारण प्लास्टिक पोटात जायाचं. म्हाराज बोंबलून बोंबलून लोकांनला सांगायचं, बाबांनो आपल्या जुन्या पद्धतीच बऱ्या. बाजारला जावाल तेवा घरनं सोताची पिशवी न्या, थितली प्लास्टिकची पिशवी घरला आनून निस्ता प्लास्टिकचा बाजार मांडू नगा. लोक ऐकायला लागले. गावात आता प्लास्टिक नावालापन दिसत न्हाई. सगळीकडं कसं हिरवं हिरवं दिसू लागलंय. खिल्लारं शेपट्या उडवत फिरत्यात, पाखरं चिवचिव करत्यात, घरटी बांधत्यात. त्यास्नी घरटी बांधायला आता झाडं बी झाल्यात. गाईगुरं निवांत चरत्यात, त्यांना आता प्लास्टिक पोटात जाऊन मरायचं भ्या ऱ्हायलं न्हाई. 

म्हाराज - काय परधानजी, राज्यात समदं ठीक हाय ना?

प्रधान - आपल्या कृपेनं म्हाराज सगळं ठीक हाय, सगळं ठीक हाय. चांगभलं जी! चांगभलं!

(ज्योतिबाचा येळकोट, तुतारी. सर्व मुजरा करतात, महाराज समाधानानं मागे रेलून बसतात)

1 comment:

  1. The whole drama you guys acted out came in front of my eyes ������������

    ReplyDelete