आपल्या मंडळाच्या स्थापनेला तीस
वर्षं लोटली. तीस वर्षांपूर्वी भारतातून डोळ्यांत स्वप्न, उरात अज्ञाताची
धडधड घेऊन काही मराठी माणसं इथे आली. परका प्रांत, परकी भाषा, परक्या
चालीरीती, परके अन्न, सगळेच कसे परके. काय मन:स्थिती झाली असेल त्यांची?
तिकडे मायदेशात तसे नव्हते. तिथे मायेची माणसे होती, ओळखीचा आसमंत होता,
मृदू हवामान होते. मायदेशाचा पाऊस रिमझिम पडायचा, वारा यायचा तो झुळूक
बनून. पहाट व्हायची ती दुरून ऐकू येणाऱ्या काकडआरतीने किंवा देवळाच्या
घंटेने, कुठे जात्याच्या आवाजाने तर कुठे आईच्या सात्विक आवाजाच्या ओवीने. त्या काळातील पिढी तशी भाग्यवानच. एकत्र कुटुंब पद्धती अजून तग धरून होती. वडिलधाऱ्यांत कुरबुरी होत असतील पण त्यांचा मुलांवरील प्रेमावर कधी परिणाम व्हायचा नाही. काका, काकू, आत्या सगळे प्रेम करणारे असायचे. सुट्टीच्या दिवसांत सगळी भावंडं एकत्र येऊन घरात उच्छाद मांडायची, मोठ्यांची बोलणी खायची, पण त्या सगळ्यातूनच अतूट असं नातं तयार झालेलं असायचं. बाहेरही तसंच जग. मित्र जीव लावणारे असायचे. शाळेतल्या मास्तर खडूस खडूस म्हणायचं पण त्याच मास्तरांनी एक पैसाही न घेता शिकवणी घेतली होती हे कुठं तरी आत जपून ठेवलं जायचं. मोठं झाल्यावर याच खडूस मास्तरांच्या आठवणीनी गहिवरून यायचं. अर्थात सगळंच काही आनंद देणारं असायचं असं नाही. दु:ख, निराशा, राग, लोभ, द्वेष वगैरे षडरिपु सर्वत्रच असतात तसे भारतातही होते, आहेत. पण ते पचवून पुढे जाण्यासाठी जे बळ लागतं ते आपल्या कुटुंब आणि मित्र संस्थांत होतं. या संस्था धीर द्यायच्या, प्रसंगी कान उपटून मार्गावर आणायच्या. आपल्या माणसाचं भलं व्हावं यासाठी निरलसपणे काम करणाऱ्या या संस्था. भारतातलं, मायदेशातलं हे असं जगणं हे एखाद्या मोठ्या कुटुंबात जगल्यासारखं असायचं.
हे असं जीवन सोडून काही तरी वेगळं करायचं, नवी दिशा शोधायची, नवा मार्ग निर्माण करायचा अशा ध्येयातून माणसे इथे आली. प्रथम प्रथम काही दिवस बस्तान बसवण्यात गेले. नव्या रूढी, पद्धती शिकण्यात गेले, स्थिरस्थावर होण्यात गेले. आपल्या संस्कृतीची, पद्धतीची आठवण काढून कुढायला वेळ नव्हता. पण जरा स्थिरस्थावर झाल्यावर उसंत मिळाली. कामात असलेलं डोकं वर उचलून आजूबाजूला बघता येऊ लागलं. तेव्हा मग प्रथम जाणवलं ते मायदेशाचं जवळ नसणं. कॅलेन्डरवर दिवाळी, गणपती यायचे आणि तसेच निघून जायचे. मनात गणपतीची आरती आणि मनातच दिवाळीची पणती. मनातल्या मनात गणपती बसायचे, विसर्जित व्हायचे. मग यातूनच विचार पुढे आला. अरे, वसुधैव कुटुंबकम ना? आपण दूर आहोत असे कशाला मानायचे. आपण आता आपली कर्मभूमी जर ही मानली आहे, तर हीच मायभूमीसारखी का नाही करायची? शेवटी मायभूमी मायभूमी म्हणजे असतं तरी काय? ज्या जीवनपद्धतीत जन्मलो, ती जिथे अनुभवता येते, जगता येते ती मायभूमी. परदेशात राहून ती जगता यावी या विचारातून महाराष्ट्र मंडळाची स्थापना झाली.
आज जीवनपद्धती बदलली आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले आहे. स्काईप, फोन इत्यादी सोईमुळे मायदेश, आपली माणसे जणू हाताच्या बोटांवर आले आहेत. पण तरीही एक समाज म्हणून आपल्या काही गरजा असतातच. आपण या ठिकाणी एकटे नाही हा दिलासा द्यायला आजूबाजूला आपली माणसेच लागतात. प्रसंगी धावून येणारी, अडीनडीला मदत करणारी, आपली माणसे येणार नाहीत तर कोण? शिवाय अडीनडीची गरज हीच केवळ गरज नसते. आपण गर्दीत रमणारी माणसे. मराठी माणूस एकटा जगू शकत नाही. खेड्यात असेल तर गावच्या चावडीवर आणि पुण्यात असेल तर नेहमीच्या कट्ट्यावर तो जाणारच. दिवसभर ऑफिसात परीटघडीचा चेहरा करून वावरल्यावर कधी एकदा कट्ट्यावर जातो आणि मित्रांना "च्यायला"चा रामराम घालतो असे त्याला होते. गणपतीच्या विसर्जनाचा सोहळा ज्याला बेभान करत नाही असा कुणी आहे का? ताशाचा कडक तडतडाट, घुमणारे ढोल, उंच उंच नाचणारे ते भगवे झेंडे, आणि त्यात स्वत्व हरवून बसलेले असे आपण, हे कुणी अनुभवलं नाहीय? हे सगळं आपल्याला मराठी म्हणून जगवतं. एक समाज म्हणून घडवतं. असा हा समाज एकत्र ठेवावा, केवळ कार्यक्रम करण्यासाठी म्हणून नव्हे तर माणसांना जोडून ठेवावा यासाठी आजही आपल्याला एका अशा एका संस्थेची गरज आहे, ते म्हणजे आपलं महाराष्ट्र मंडळ. हे करत असताना आपण सजगपणे बदलांकडेही पाहायला हवं. आपण राहतो तिथल्य आणि मायदेशातल्याही. संकटं येत असतात, आव्हानं बदलत असतात. मायदेशात दुष्काळाचं सावट आलं, आपण धावून जायला हवं, मदत द्यायला हवी. इथे आपण महाराष्ट्रीय नसतो, तर भारतीय असतो. आपण जिथे राहतो तिथे आव्हानं सामोरी येतात. काही राजकीय असतात, काही सामाजिक असतात. अशा वेळी ठामपणे पण आदरपूर्वक आपली मतेही मांडता आली पाहिजेत. ज्या देशात आपण राहतो त्या देशाशीही आपली बांधिलकी आहे हे ध्यानात ठेवून वागलं पाहिजे. तीस वर्षांमध्ये मंडळाने ही प्रगल्भता आणली आहे आणि ती तशीच वाढीस लागेल याची खात्री आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या मराठी मनास आवाहन करतो, आपण असेच एक राहूया.
-मंदार वाडेकर
अध्यक्ष,
२०१७ समिती

No comments:
Post a Comment