Thursday, July 23, 2015

वैश्विक भाषा

चराचराची एक समान भाषा जर असेल तर ती गणितच असावी. ग्रह तारे यांच्या भ्रमणकक्षा, धूमकेतूंचे क्लिष्ट भ्रमणमार्ग, गुरुत्वाकर्षण आणि त्याचे परिणाम हे मूलभूत असे भौतिक नियम संपूर्ण विश्वात सारखेच लागू होतात, मग ते नियम व्यक्त कोणत्या भाषेत करणार? आणि कसे? संतांनी सांगितले,"चराचरात 'मी' वसतो". येथे संतांनी 'मी' हा शब्द वापरला असावा तो केवळ सर्वसामान्य जनतेला रुचेल, भावेल आणि कळेल म्हणून. येथे 'मी' म्हणजे हे ब्रम्हांड चालवणारा असा तो अध्याहृत आहे. त्याचे स्वरूप सामान्य मानवी मेंदूच्या आकलनापलीकडे असल्यामुळे त्याचा उल्लेख प्रथमवचनी करायचा. वास्तविक हा "मी", 'तो' नाही, 'ती' नाही किंवा 'ते'ही नाही. म्हणजे नसावा. कुणास ठाऊक. तो, ती किंवा ते मुळात आहे की नाही तेही माहीत नाही. पहा, नुसत्या शब्दांत व्यक्त करायचं झालं की कसा गोंधळ उडतो ते. मला काय म्हणायचं आहे ते मलाच कळतं आहे, पण तुम्हाला मी नीट या "मी"चे दर्शन करू शकतो का? मला तरी कुठे कळलंय म्हणा. तत्ववेत्त्यांना, संतांना, ऋषींना कळलं असेल. त्याच्या रूपाचे आकलन झाले असेल. मग त्यांनीही प्रयत्न केला. सॉक्रेटिसचे संवाद झाले, सांख्य दर्शन झाले.,गीता झाली, ते कळले नाही मग ज्ञानेश्वरी आली, तीही कळली नाही. अजून सोपे करून सांगायला तुकारामाची गाथा आली. पण झाले भलतेच. लोक उगाच भक्तीमार्गाला लागले. चराचराचे मूळ कळले की नाही, आपल्या अस्तित्वाचे कारण कळले की नाही ते ठाऊक नाही. असो. मुद्दा असा की चराचरात मी वसतो हे अनेक शब्दांत सांगून झाले. मग संतांनीच कशाला, पुढे हळूहळू विज्ञान आणि गणितही त्याला दुजोरा देऊ लागले. आईनस्टाईनने जड विश्व आणि ऊर्जा हे एकाच पदार्थाच्या दोन अवस्था असल्याचे सांगितले. नुसते सांगितले नाही तर त्याचा कार्यकारण भाव आणि ज्या समीकरणाने ते दोघे जुळले आहेत ते समीकरणही सांगितले. दृष्टांत देऊन फार तर साम्य सांगता येते पण "का" याचे उत्तर देता येत नाही. गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. रसाळ दृष्टांत वाचायला मिळतात, पण चिकित्सक वृत्तीच्या एखाद्याला "का"चे उत्तर मिळत नाही. अहं ब्रम्हास्मि! बरं बाबा तू ब्रम्ह! पण का आणि कसा काय? गणिताने हे थोडेसे सोपे केले. तर्कज्ञानाने पूर्वी ताडलेले सत्य हे गणिताने सत्य केले. गणिताला भावना नाहीत. गणित एखाद्याला उगाच भक्तीचा गहिंवर आणून "पांडुरंग! पांडुरंग!" करायला लावत नाही. गणित तटस्थ असते. ते बाजू घेत नाही. शब्दबंबाळ होत नाही. ते पूर्ण सत्य सांगते आणि समर्पकपणे सांगते. म्हणूनच उद्या जर एखाद्या परग्रहावरील उत्क्रांत पावलेल्या आपल्याइतक्या किंवा जास्त प्रगत जीवसृष्टीशी आपला संपर्क आला तर त्यांना ज्ञानेश्वरी ऐकवण्याऐवजी गणिती भाषेत संवाद नक्की साधता येईल. 

हे असं असलं तरी मनुष्य हा भावूक, लहरी, मनाचे क्लिष्ट कंगोरे असलेला प्राणी आहे. त्याची जडणघडण, उत्क्रांती भावनाशील म्हणून अधिक होत गेली आहे. भावनाशील याला दुसरा शब्द रोमाण्टिक असाही वापरता येईल. एक अधिक एक याचे उत्तर चार असे असले तर त्याला अधिक आवडते. अशा भावनिक उत्क्रांतीमुळे गणिती रुक्षपणा, काटेकोरपणा, अचूकपणा याला कमी महत्व आले. भाषा ही अचूकतेवरून अलंकारिकतेकडे वळली. असं असलं तरी तो गूढ प्रश्न "मी कोण, हे सर्व काय आहे" याचे आकर्षण संपले नाही. गणितापासून लांब गेल्याने "हे सर्व काय" आहे हे उकलून सांगणाऱ्या शास्त्रापासून लांब जाणे झाले. मग आपल्या मनाच्या त्याच संवेदनशीलतेचा वापर करून आपण भंवतालच्या चराचराशी एकत्व अनुभवू शकतो का याचाही काही जणांनी मागोवा घेतला. रेड इंडियन, मायन संकृतीचे लोक, मूळ आफ्रिकन लोक हे त्या बाबतीत बरेच विकसित होते असे दिसते. इन हार्मनी विथ नेचर, म्हणजेच चराचराशी एकरूप होऊन जगण्याची कला त्यांनी साधली होती. शेवटी विश्वातील सर्व कण हे ऊर्जेचे जड रूप आहे, आपण सर्व त्यांनीच बनलो आहोत हे त्यांना आईनस्टाईनचा सिद्धांत माहीत नसतानाही कळले होते. गणिती भाषा तर सर्व विश्वात चालेल, पण ही "नेणिवेची"अबोल भाषा त्याहूनही बोलकी असावी.

2 comments: