Thursday, March 12, 2015

उगाळावा जरा कोळसा

आत्ता कुठे म्याडमचा दूरदर्शीपणा लक्षात येतो आहे. धाकले धनी "ममा, ममा, मी! मी!" अशी मची बाराखडी म्हणत होते तेव्हा आम्ही पण "म्याडम, म्याडम, तुमी तुमी!" अशी म्याड बाराखडी म्हणत होतो. पण म्याडम हुशार निघाल्या. आम्ही सगळे पक्षानं दिलेला कित्ता गिरवत बसलो होतो तेव्हा मौनी सिंग बाबा डोळे मिटून खुरमांडी घालून बसले होते. लोकसभा नव्हे, जणू काही गुरुद्वारातच बसले आहेत. गुरु ग्रंथसाहिबांचं दर्शन घेऊन झालं आहे. हातावर तुपानं माखलेला शिरा प्रसाद पडला होता तो खाऊन झाला आहे. तूर्तास तरी भूक थोडी शमली आहे. समोर दोन सरदारजी अगम्य भाषेत सर्दी झालेल्या आवाजात भजन म्हणत आहेत. त्यांच्या बाजूला अजून दोन डिट्टो तसेच दिसणारे सरदार तबला आणि पेटी कुटत आहेत. लंगरात आज काय असावं बरं, तो नेहमीचा सरसोदा साग नको बुवा, लसणाच्या ढेकरा येत राहतात, म्याडमच्या शेजारी बसायचं असतं. बैंगन का भरता वातुळ, सभागृहात दिवस काढायचा आहे, कारण नसता इतरांचा सभात्याग नको व्हायला, त्यापेक्षा राजमा बरा, इत्यादी सुखद विचारात ते पडले असावेत असं वाटत होतं. आम्हाला ते स्पष्ट कळतं. विरोधक मात्र सगळ्याला विरोध करायचा म्हणून कायच्या काहीच समजत असतात. म्हणे मौन हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. एवढा ऑक्सफर्डला शिकलेला माणूस काय साधा विचार करत असणार काय? नक्कीच जीडीपी, ग्रोथरेट ऑफ इकॉनॉमी, परकीय चलन गंगाजळी असलंच कायबाय सारखं डोक्यात असणार. आपल्याला तर हे शब्द ऐकून म्हायती. सालं धावीनंतर कोणी पुस्तक हातात धरलंय? वाटलं होतं धाकले धनीपण ऑक्सफर्ड का केम्ब्रिज कुठं तरी मोठ्ठ्या शाळेत जाऊन आले आहेत म्हणे, त्यांना म्हायती असेल. त्यांना जीडीपी म्हणजे काय असं एकदा विचारलं होतं. तेव्हा त्यांनी "देशाचे मैल्याचे वट्ट उत्पादन" असे उत्तर दिले होते. च्यायला आपल्याला तर धक्काच बसला होता. मी सरळ म्हणालो, ओ, काय पन फेकू नका ओ, म्हाईत नाही तर तसं सांगा. तर ते पेटलेच. तडक जाऊन ऑक्सफर्डचीच डिक्शनरी घेऊन आले. म्हणाले हे बघा "ग्रोस" या शब्दाचा अर्थ बघा त्यात. अनेक अर्थ आहेत, पण त्यातला एक अर्थ गलिच्छ, अनप्लेझंट असा आहे. आता "देशाचे रोजचे गलिच्छ उत्पादन" दुसरे काय असणार? मी अत्यंत आदराने त्यांच्याकडे पाहिले. काही म्हणा, माणूस आहे हुशार. नापास का असेना, ते काय आपण पण आहोत. पण आज इथं लोकसभेत आलोच की नाही? त्यावेळी पैल्या बाकावर बसणारे देशपांडे जोशी आज बसलेत अमेरिकेत जाऊन कॉम्प्युटर कुटत. पण काही असो, आपल्याला लई अभिमान वाटला. च्यायला इतके दिवस आपण जीडीपी ला हातभार लावत होतो आणि आपल्याला त्याचा पत्ता पण नव्हता! तरीच सगळे जीडीपी वाढायला पायजे जीडीपी वाढायला पायजे म्हणत असतात. मी आपला पक्षाचा आदेश मानून मान डोलवत असायचो. तसं भाजपमध्ये तरी किती शाने लोक आहेत? त्यांनाही हे शब्द घंटा कळत नसणार. परकीय गंगाजळी म्हटलं की बरेच जण आदरानं नमस्कार करतात आणि "परकीय" या शब्दाला आक्षेप घेतात. गंगा आणि जळ हे दोन शब्द एकत्र आले की झालं, भाजप खासदार साष्टांग नमस्कार घालतात. फक्त ती गंगाजळी स्वदेशी असावी असा त्यांचा आग्रह असतो. तेव्हा आपल्याला एवढं काही वाईट नको वाटायला.

तेव्हा म्याडमच्या दूरदर्शीपणाबद्दल बोलत होतो. पंतप्रधान पदाला आगदी योग्य माणूस शोधून काढला. पद दुर्मिळ, तसंच कॉंग्रेसमध्ये शिक्षणवालेही दुर्मिळच. म्याडम स्वत: काय शिकल्या आहेत ते त्या आकाशातील प्रेमळ बापासच ठाऊक. तो येणार, शुभ वर्तमान घेऊन येणार असं बरीच वर्षं ऐकतो आहे. ते जे काही शुभ वर्तमान असेल त्याबरोबर म्याडमच्या शिक्षणाचे शुभ नसले तरी वर्तमान तरी घेऊन यायला काय हरकत आहे म्हणतो मी? शिकल्यालं सवरल्यालं म्हटले की शशी थरूर हे एक प्रात:स्मरणीय नाव नजरेसमोर येते. पण त्यांचे अलीकडील वर्तमान पाहिले की एकूण गडी नुसताच शिकलेला आहे सवरलेला काय वाटत नाही. गड्यानं बायकोच्या हत्येचं प्रकरण असं काही हाताळलंन की वाटावं हा इसम खरंच कॉंग्रेसचा आहे की आप पार्टीचा? म्हणे तपासात पूर्ण सहकार्य करीन! अरे खरा कॉंग्रेसचा असतास तर ती आपली बायको असल्याचाच मुळात नकार दिला असतास! बसा मग करत तपास बिपास. या बाबतीत भाजपवाले कॉंग्रेसपेक्षाही चालू. बायको बियको भानगड येऊच नये याची व्यवस्था तीसतीस वर्षांपूर्वीच करून ठेवतात. मग एका दगडात दोन पक्षी. रोज घरी आल्यावर "झाल्या लष्कराच्या भाकऱ्या भाजून? घरात मेलं जोंधळ्याचं पीठ संपलंय ते आणून टाकता येत नाही!" ही कटकट करायला कुणी नाही आणि जनांत ब्रम्हचर्याचा दबदबा! अहो "पूर्णवेळ" आहेत ते, देशकार्याला वाहून घेतलं आहे, स्वत:ची आई आणि राष्ट्रदेवता यांशिवाय कुणालाही वंदन करत नाहीत ते इत्यादि वाक्ये अशीच तयार होतात मग त्यांच्याबद्दल. हुषार लेकाचे. आम्ही एकदा त्यांचे स्खलन करण्याचा प्रयत्न केला होता. बाजार समितीची निवडणूक झाली होती. अर्थातच कॉंग्रेसचेच सगळे लागून आले होते. मग पार्टी घातली होती मळ्यावरच्या बंगल्यात. आपलेच खास लोक होते. गम्मत म्हणून बोलावलं एका संघिष्ट भाजपवाल्याला. तेवढीच आपलीपण करमणूक. तर लेकाचा उपवास आहे म्हणून घरून साबुदाण्याची खिचडी बांधून घेऊन आला होता. आम्ही सोडा उघडला तेव्हा याने उपवास सोडला. एवढी खास आयटम आणली होती डान्सला तर "परस्त्री मातेसमान" असं म्हणून हा अक्खा टाईम सावरकरांची "सोनेरी पाने" वाचत बसला होता. पुन्हा काय बोलावलं नाही त्याला. असो. तर हा थरूर काही कामाचा नाही. आम्ही घोटाळे करायचे आणि हा त्यांच्या तपासात सहकार्य करत बसणार. दुसरं थोर व्यक्तिमत्व म्हणजे आमचे दिग्गीराजे. राजा माणूस. राजारजवाड्यांसारखेच वागणे. भानगडी करायच्या त्या मान ताठ ठेवून. अगदी अंगवस्त्राबरोबर पकडलं गेलं तरी लाज न वाटू देता उलट "कोण आहे रे तिकडे! आमचा असा एकांतभंग? हत्तीच्या पायी देईन एकेकाला!" अशी आरोळी ठोकायची. पण हेही पक्षधोरणात बसत नाही. अळीमिळी गूपचिळी हे पक्षाचं ब्रीदवाक्य! इथं दिग्गीराजे स्वत:च ट्वीटरवर चौवीस तास पडीक. म्हणजे आम्ही घोटाळा करून घरी जाऊन पडायच्या आत ब्रम्हांडात झेंडे लागून त्याला हजारो लाईक्स भेटणार. शिवाय ते क्यागवाले आमच्या आधी घरी जाऊन आमची वाट बघत बसलेले असणार. नकोच ते. चिदंबरम हे आणखी लुंगीवेष्टित शिकल्यालं व्यक्तिमत्व. चेट्टीनाड प्रांतातून आलेलं आणखी एक तिखट रसायन. पार हार्वर्डमधून शिकून आलेलं. पण टूजी स्पेक्ट्रममुळं घोळ झाला. काय पण माणसाला हव्यास असतो. स्वत: एक नाही दोन दोन ब्यांका काढलेल्या. म्हणजे दुसऱ्याचा पैसा घेऊन परत त्यालाच फी लावायचा सरकारमान्य धंदा. कशाला पायजे हो राजकारण आणि घोटाळ्यांची भानगड?

पदावर माणूस पण असा पायजे की स्वत: स्वच्छ पायजे. लोकान्ला विश्वास बसला पायजे. आगदी पार चौकशी बिवकशी झाली तर उत्तर देणारा आसा पायजे की लोकान्लाच उलट वाटलं पायजे की  काय मोगलाई लावली आहे? माणूस कसा वारकरी दिसतो आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे, मुखानं पांडुरंग हारी म्हणतो आहे, वाटेत भाकरतुकडा मिळाला न मिळाला, मिळेल त्याला पांडुरंगाचा प्रसाद मानून ग्रहण करतो आहे. वारीतल्याच कुणी दुसऱ्याचं पाकीट मारताना पाहिलं तरी त्याला "ही सारी ईश्वरची करणी" मानून मुखानं चकार शब्द न काढता चालतो आहे. आसा माणूस पाहिजे! मग आपले मौनी बाबा आयतेच सापडले म्याडमना. "तुम्हाला पंतप्रधान करू का" असं विचारलं तरी "जशी आपली इच्छा" एवढंच म्हणाले होते म्हणे त्यांना. तेही नुसती मान हलवून. आता आम्हीही कधी कधी नुसती मान हलवून होकार देतो बैठकीत. पण तेव्हा आमच्या तोंडात गुळणी असते. एकशेवीस तीनशेची छान किक बसलेली असते. शिवाय नकार द्यायची अथवा तोंड उघडून बोलायची पक्षात पद्धत नाही आमच्या. या सगळ्या अर्हतेत मौनी बाबा फिट्ट बसत होते. आम्हाला खात्री आहे "पंतप्रधान" ऐवजी "दत्तकविधान" असं जरी म्हटलं असतं तरी ते "जशी आपली इच्छा" असंच म्हणाले असते. आज म्याडम किती धोरणी आणि दूरदर्शी ते लक्षात येतं आहे. साधा कोळसा तो काय. तो द्यायला काय कुणाची परवानगी लागते? आम्ही कित्येक वेळेला आमच्या शेजारच्या घरी बंब पेटवायला हवेत म्हणून फुकट कोळसे दिले आहेत. काही पेटवायचं असेल तर कुठलाही कॉंग्रेसवाला मागे हटणार नाही. पण आम्हाला न विचारता का दिलेत म्हणून आमच्या गल्लीतील लोक कधी भांडायला आले नाहीत. हे भाजपवाले काहीही काळं दिसलं की ते कॉंग्रेसचंच समजतात. आपल्या स्वत:च्या तोंडाला मिश्री लावून दात काळे झाले तरी आमची कोलगेट वाईट दिसते त्यांना. आता मौनी बाबा चौकशीला तोंड देतील. तशी आम्हाला खात्री आहे इतक्या वर्षात ते न उघडलेलं तोंड आताही उघडणार नाही. पण न जाणो, म्हातारपणात तोंडावर आणि मूत्रपिंडावर नियंत्रण राहत नाही म्हणतात. सोसले नाही तरी नको ते खावेसे वाटते आणि इच्छा नसली तरी कुठेही घंपतीबाप्पा होऊन जातो. म्हणून आम्ही सक्काळी ते घरातून बाहेर पडायच्या आधी त्यांना गाठणार आहोत. उगाच त्यांच्या समोर जाऊन "ह्या: ह्या: ह्या: काय आपलं तसं काय नाय बरं का. आपण न्हेमीच तुम्हाला पाठिंबा देत आलोय. तुम्ही काय भिऊ नका, हे चौकशी बिवकशी म्हंजे नुसता भाजपचा कावा हाये बरं का. म्हंजे उगाच भ्या दावून नावं काढून घ्यायची आन पुढच्या इलेक्शनला वापरायची. ह्ये: ह्ये: तुमाला तसं सगळं म्हाईतच हाये म्हणा. तेवा तेवढं आपलं नाव जरा दोन चार दिवस इसरून जावा म्हंजे झालं. काय? ह्ये: ह्ये: ह्ये: बाकी आमाला तुमच्याबद्दल आदरच हाये हो. तो दावण्यासाठीच आमी आलोय." असं म्हणून यायचं आणि पुढील सर्व परमेश्वराच्या इच्छेवर सोडून द्यायचं. देव करो आणि त्यांना खोटं बोलण्याची ताकद मिळो. च्यायला पंतप्रधान असताना कधी भ्यालो नाही त्यांना, आता ते पंतप्रधान नसताना आमची फाटली आहे. स्वच्छ, शिकलेला  माणूस पदावर बसवला की कार्यकर्त्यांची पंचाईत होते. म्याडम तुम्ही दूरदर्शीच.

Friday, March 6, 2015

निर्भया डॉक्युमेंटरीच्या निमित्तानं

बीबीसीने केलेली निर्भया डॉक्युमेंटरी पाहिली. डोक्याचा भुगा झाला. शाळेत असताना शोले पाहिला होता. त्यात तो आंधळा इमाम झालेला ए के हंगल म्हणतो,"तुम्हे मालूम है दुनिया में सबसे बडा बोझ क्या है? बूढे बाप के कंधे पे बेटे का जनाजा." हे वाक्य मला "कितने आदमी थे" पेक्षा जास्त लक्षात राहिलं. या डॉक्युमेंटरीमध्ये जेव्हा तो बाप अश्रू आवरत म्हणाला,"जिस बेटी को हमने सीनेसे लगा के बडा किया, जब उस बेटी को अग्नी देना पडता है तब आवाजही नही निकल पाता." तेव्हा मला पुन्हा त्या इमामसाहेबांची आठवण आली. हृदय पिळवटलं. एकुलती एक मुलगी. हातातोंडाशी आलेली. घरच्या परिस्थितीची जाणीव असलेली. मेडिकलला जायला पैसे कुठून आणायचे असा प्रश्न पडल्यावर "माझ्या लग्नासाठी जे जमवले आहेत ते माझ्या शिक्षणावर खर्च करा" असं म्हणणारी. परिस्थिती माणसाला समजूतदार बनवते हे खरं असलं तरी हा समजूतदारपणा लहान वयात येणं कौतुकास्पदच. सिनेमा पाहायला बाहेर काय पडली ते परत न येण्यासाठी. कुठल्याही आईबापाच्या जिवाला घोर लागणारी ही गोष्ट असते. मुलं लहान असतात तेव्हा बरं असतं, सगळ्या ठिकाणी आपल्याबरोबर असतात. त्यांच्यावर आपलं लक्ष राहतं. पण तीच मोठी झाली, आपली आपली फिरू लागली की हा घोर चालू होतो. माझा मुलगा स्वत:ची स्वत: गाडी चालवायला लागून आता सहा वर्षं झाली, तरी आजही मी कितीही उशीर झाला तरी जागत बसलेला असतो. तो अत्यंत जबाबदार आहे, उशीर होणार असला तर तसं त्यानं सांगितलेलं असतं, तरीही काळजी संपत नाही. मुलीला तर मी सांगतोच, काय तुमचं ते प्रॉम वगैरे असेल ते असो, ड्रायव्हर होऊन गाडीत बसून राहीन पण तिथे येईन, हातात शॉटगन असेल. कॉलेजला कुठे दुसऱ्या गावात गेलीस तर कॉलेजच्या पार्किंगलॉट मध्ये आपली आरव्ही लागलेली असेल. त्या पार्किंग लॉटमध्येच माझं क्याम्पिंग चालू होईल. छानपैकी दोऱ्या वगैरे लावून चड्डीबनियन सुद्धा वाळत घालीन तिथे. माझी मुलगी हे ऐकून डोळे फिरवत मान हलवत म्हणते,"बाबा, त्यापेक्षा मी घरात राहून इथल्याच कॉलेजमध्ये जाईन. एम्बारेसिंग वाचेल तुमचं आणि माझं." तिला कसं सांगू तुझ्या सुरक्षिततेपेक्षा माझी एम्बारेसमेंट क्षुद्र आहे. 

सुरक्षित वातावरण निर्माण होणं हे कायदा आणि कायदा राबवणारे यांच्याबरोबरच जनतेवरही अवलंबून आहे. भारतामध्ये बरेचसे गुन्हे हे अनामिकतेच्या आवरणात होत असतात. शहरे मोठी झाली, जनसंख्या अफाट झाली. वाडे गेले, बंद दारं असलेल्या सदनिका आल्या. शेजारी कोण राहतं, त्या कुटुंबाचं नाव काय हेही माहीत नसतं. पूर्वी छोट्या गावांमध्ये सर्वांना सर्व माहीत असायचे. कुणी काही आगळीक केलीच तर ती करणारा घरी पोचेपर्यंत त्याच्या घरच्यांना ते कळलेलं असायचं. आता संपूर्ण अनामिकता आली. मुखवटे घातलेल्या या जगात अनामिकता मुखवट्याखालच्या विकृतीला बळ देते, काहीही केलं तरी चालेल हा विश्वास देते. पूर्वी कुठे तरी मी वाचलं होतं. जपानी लोक आत्मसन्मानाला उच्च स्थान देतात. इतकं की जर ते जाहीररीत्या बदनाम झाले तर हाराकिरी करणं पत्करतात आणि करतातही. "ब्रिज ऑन रिव्हर क्वाय" मध्ये ते दिसलं होतंच. ब्रिटीश कर्नलनं शिस्तीनं पूल बांधून दाखवला, ते आपल्याला करता आलं नाही म्हणून तो जपानी कर्नल हाराकिरीच्या मनस्थितीत असतो. तात्पर्य जपानी माणूस हा जाहीर मानहानीची प्रचंड भीती बाळगतो. परंतु तोच जपानी माणूस दुसऱ्या गावात गेला की नुसता सुटतो.  प्रचंड दारू पिणं, दंगा करणं, बाहेरख्यालीपणा करणं हे सगळं करतो. ही अनामिकता माणसाला एरवी असलेली सर्व सामाजिक बंधनं झुगारून द्यायला लावते. आणि हे सर्व सुशिक्षित असलेले लोक करतात. मग मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचे असलेल्या, अशिक्षित लोकांबद्दल काय बोलावे? इथे मी "मुळातच गुन्हेगारी प्रवृत्ती" हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे. शास्त्रीय दृष्ट्या आपला मेंदू हा दोन भागात बनलेला आहे.  मानवी मेंदू हा उत्क्रांतीपूर्व काळातील मेंदू (रेप्टीलियन ब्रेन) आणि त्यावर उत्क्रांतीमुळे बनलेला मेंदू अशा दोन भागात बनला आहे. उत्क्रांतीपूर्व मेंदूला फक्त तीन भावना कळतात - हिंसा, भय, मैथुन. वात्सल्य, प्रेम, समाजप्रियता या भावना सस्तन प्राण्यांत उत्क्रांतीमुळे निर्माण झाल्या. मानवी मन हे सदैव या दोन मेंदूंच्या परस्परविरोधी द्वंद्वात असतं. जेव्हा उत्क्रांत पावलेल्या मेंदूचा विजय होतो तेव्हा मनुष्य समाजप्रिय असतो, नीतीने वागणारा असतो, दुसऱ्यावर प्रेम करणारा असतो. जेव्हा रेप्टीलियन मेंदूचा विजय होतो तेव्हा तोच समाजकंटक बनतो, हिंस्त्र बनतो. "मुळात गुन्हेगार प्रवृत्ती" असणारे लोक हे या रेप्टीलियन मेंदूच्या प्रभावात असतात, तो मेंदू सतत जिंकत असतो. शिक्षण, सशक्त समाजव्यवस्था, अवतीभवती प्रेम करणारी कुटुंबव्यवस्था या गोष्टी माणसाला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळणे टाळू शकतात. अर्थात ते शंभर टक्के प्रूफ नाही, पण या गोष्टी नसण्याने मात्र माणूस गुन्हेगारीकडे शंभर टक्के वळू शकतो.  तेव्हा गुन्हे करणारे दोन प्रकारचे लोक. एक पांढरपेशे - जे अनामिकता सापडली तर गुन्हा करणारे, दुसरे पूर्ण गुन्हेगारी प्रवृत्तीचे. दोन्हीसाठी शिक्षण, सशक्त समाजव्यवस्था, कुटुंबव्यवस्था अत्यंत जरूर आहेत. 

डॉक्युमेंटरीला भारतात बंदी घातली गेली. मला त्याचं कारण समजू शकलं नाही. आक्षेप काय? बाब कोर्टात आहे वगैरे गोष्टी झाल्या किरकोळ. भारतीय लोकांना व्हिलन दाखवलं आहे म्हणून? की आपण आरशात आपला चेहरा पाहायला घाबरतो आहोत म्हणून? त्या नराधमाचे विचार आपल्याला घाबरवतात म्हणून की आपणही सुप्तपणे त्या वकिलांप्रमाणे आहोत हे जाणवले म्हणून? अत्यंत विसंगतीत आपण जगतो आहोत हे दिसतं म्हणून? एका बाजूला दुर्गापूजा करायची, सरस्वती, लक्ष्मी या देवता मानायच्या, दुसरीकडे मात्र स्त्रीला अबला म्हणायचं, चूल आणि मूल ही तिची कार्यभूमी आहे म्हणायचं, "सातच्या आत घरात" ही अट मुलींना लागू करायची, मुलं मात्र रात्रभर आली नाहीत तरी सकाळी आल्यावर त्यांना पहिला ब्रेकफास्ट बनवून द्यायचा. इकडे म्हणायचं "बालिका बचाव", तिकडे तो मुल्ला मुलायमसिंग "बच्चे है, गलती करेंगेही" असं म्हणत बलात्कारी हरामखोरांना अभय देणार. अरे किती विसंगतीत जगणार आहोत आपण? डॉक्युमेंटरीच्या बंदीला पाठिंबा देणारे हे छुपे समाजकंटकच आहेत, त्यांना आपल्या मनात खोलवर आत काय खरं दडलं आहे याची भीती आहे. ही डॉक्युमेंटरी ते दाखवते याची त्यांना भीती आहे असंच मला वाटतं. विरोध करण्यापेक्षा सकारात्मक दृष्टीने ही अंतर्मुख होऊन बदल घडवण्याची ही संधी आहे असं समजा. आपल्या स्त्रीविषयी, मुलींविषयी दृष्टीकोनात बदल करा. मुलींना निर्भयपणे जगू द्या, जगात वावरू द्या. निसर्गानं त्यांना पुरुषापेक्षा नाजूक बनवलं असेल, पण कर्तृत्वात कुठंही त्या कमी नाहीत. मी तर म्हणेन त्या कांकणभर सरसच आहेत. पुरुष किचकट काम मन लावून करू शकत नाहीत, पुरुषाची वेदना सहन करण्याची ताकद स्त्रीपेक्षा कमी असते, बिकट परिस्थितीत स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त तग धरू शकतात. परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करणारे पुरुषच असतात. ते सोपा मार्ग स्वीकारतात. मागे राहतात त्या त्यांच्या बायका, कर्जदारांना तोंड द्यायला, समाजाला तोंड द्यायला. अशा एकट्या स्त्रीला शिकार बनवायला लघळपणे जातात ते पुरुषच. बाई कुणा विधुर पुरुषापाशी जाऊन "इन गोरी गोरी कलाईयोंको काम करनेकी क्या जरूरत है?" असला प्रेम चोप्रा टाईप डायलॉग मारताना दिसत नाही. स्त्री ही मनाने शक्तीशाली आहे, पुरुषापेक्षा जास्त गुणवानही आहे. तिच्या शारीरिक बळाच्या अभावाचा फायदा घेणे हे केवळ नपुंसकपणाचे लक्षण आहे. 

ती निर्भया बिचारी गेली. तिच्या सर्व आशा, आकांक्षा, स्वप्नं काही नराधमांनी नष्ट केली. त्याची सजा ते भोगतील. परंतु ज्या परिस्थितीने हे घडण्यास हातभार लावला, किंवा निदान त्याला अटकाव तरी करू शकली नाही, त्या परिस्थितीची सामूहिक जबाबदारी आपली आहे, समाजाची आहे. डॉक्युमेंटरीला विरोध करण्यापेक्षा अंतर्मुख व्हा, आणि यातून सशक्त समाज कसा निर्माण होईल ते पहा. उद्या अशा निर्भया मुक्तपणे बागडतील तेव्हाच आपण काही प्रगती केली आहे असं समजूया. तोवर "बलशाली भारत", "एकविसाव्या शतकातील महासत्ता" या नुसत्या गप्पा आहेत गप्पा. 

Tuesday, March 3, 2015

गोहत्याबंदी आणि आम्ही

इतक्या वर्षांचा गाईंच्या संघर्षाला गोड फळ लागले म्हणायचे. ते रस्त्यात मध्येच बैठक मारून धरणे धरणे, कितीही हॉर्न मारले तरी मुळीच न हलणे, एकदम घोळक्याने रस्त्यात येऊन अख्ख्या ट्राफिकला आपल्या वेगाने जायला लावणे, वसुबारस असेल त्या दिवशी मात्र अजिबात न सापडणे हे सर्व उपयोगी पडले आहे. गाय दिसली की तिचे शेपूट उचलून डोळ्यांना लावणारे आम्ही. महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने पार गहिवरलो आहोत. आता फडणवीस समोर आले तर त्यांचेसुद्धा शेपूट आम्ही डोळ्यांना लावायला तयार आहोत. अर्थातच त्यांना शेपूट नाही. असलेच तर निदान आजवर कुणी ते पाहिल्याचे ऐकिवात नाही. तसे राजकारणात सगळ्यांना शेपूट असतेच, नव्हे लागतेच. आता विरोधक त्यांना मोदींचे शेपूट म्हणतात ते केवळ प्रतीकात्मक बोलणे म्हणायचे. विरोधक काय, कशालाही विरोध करतात. विरोधकांनो, विरोध नीट करा असे म्हटले तर त्यालाही ते विरोध करतात. विरोधी बाकांवर बसा म्हटले तर त्यालाही विरोध. भुणभुण सहन न होऊन सत्तेत घेतले तर तिथेही सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका निभावणार. थोडक्यात तिथेही मारक्या गायीसारखेच वागणे. गोठ्यात बांधले तर दावे तोडायचे आणि रस्त्यात जाऊन धरणे धरायचे, सोडून दिले तर गोठ्याबाहेर उभे राहून करुण मुद्रेने हंबरत राहायचे, जणू काही या गोमातेला सारे उठले छळण्याला. वास्तविक या गोमातेने आपल्याच गवळ्याचे दिवाळे निघालेले पाहून पत्रकार परिषद बोलावून आनंदाने हम्माsss केले होते. आलेल्या पत्रकारांना स्वत: भाकड असल्याचे विसरून दूधच नव्हे तर खर्वसाचेसुद्धा आश्वासन दिले होते. पण गवळी कनवाळू निघाला. गाय मारकुटी असली म्हणून काय झालं, आपल्या संस्कृतीत ती गोमाताच असं म्हणून तिने टाकलेले शेण गोळा करून, तिच्या चारापाण्याची व्यवस्था करून चूप घरात जाऊन बसला. आम्ही फडणविसांना हळूच विचारलं, अहो ही गोहत्याबंदी वगैरे ठीक आहे, पण ही घरातील मारकुटी गाय, तिचं काय करणार आहात? तेव्हा ते म्हणाले,"अहो गाय भाकड झाली म्हणून कसायाकडे देणे ही झाली म्लेञ्छ संस्कृती. आपली संस्कृती तिने आजवर दिलेल्या दुधाला जागण्याची. तेव्हा, त्या दुधाला जागतो आहोत. पण कधी कधी ही गाय आहे की बैल अशी शंका येते."

या निर्णयाने आमची मात्र वैचारिक पंचाईत झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत. गाय हा एक उपयुक्त पशू आहे असं म्हणणारे सावरकर बरोबर की तिला संरक्षण देणारे हे धोतर सावर कर बरोबर? आम्ही हा प्रश्न घेऊन प्रंपूज्य साक्षी महाराजांच्या मठात गेलो. महाराज सरकारमान्य नसले तरी सरकार अमान्य तरी नाहीत. मठात सणावाराचे वातावरण होते. भव्य प्रवेशद्वारावर तोरण लावले होते. रांगोळ्या काढल्या होत्या. आत चौकात पताका लावल्या होत्या. चौक गोमातेच्या मयाने सारवलेला होता. आम्ही प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अंगावर गुलाबदाण्यांनी सुखद गार शिडकावा केला गेला. वा! असे म्हणून आम्ही बाही उंचावून त्याचा सुगंध अनुभवणार तेवढ्यात आमचे स्वागत करण्यास आलेली ब्रह्मवादिनी म्हणाली,"तुमची सर्व पापे धुवून काढणारे पवित्र गोमूत्र आहे ते. अभ्यागतास शुचिर्भूत करून घेतल्याखेरीज आम्ही मठात प्रवेशच करू देत नाही." आम्ही बाही खाली केली. तो पवित्र शिडकावा आपल्या मुखावरही झाला होता ही जाणीव अस्वस्थ करत होती त्याकडे दुर्लक्ष करून तसेच पुढे गेलो. आश्रमात गाई मुक्तपणे संचार करीत होत्या. नुकत्याच जाहीर झालेल्या गोहत्या बंदीचे वृत्त त्यांच्यापर्यंत पोचले असावे असे वाटले. कारण त्यांच्या मुखावर त्या ब्रम्हवादिनीपेक्षा अधिक आनंदाचे भाव होते. बैठकीच्या खोलीत आम्हाला बसवून ती ब्रम्हवादिनी म्हणाली,"महाराज थोड्याच वेळात दर्शन देतील. आत्ता त्यांची गोमाता उपलालनाची वेळ आहे." आम्ही चमकलोच. "कसली वेळ आहे म्हणालात?" ब्रम्हवादिनीने आमच्याकडे एक कठोर कटाक्ष टाकला आणि म्हणाली,"उपलालन कर्माची वेळ. उपलालन म्हणजे कुरवाळणे हे तुम्हांस माहीत नसावे याचे आश्चर्य वाटते. गायीचे वशिंड आणि मस्तक यांच्या मध्ये कुरवाळले असता त्यायोगे साधकास सिद्धी प्राप्त होते. गाय उत्तम दूध देते आणि साधकास बैलांपासून भय राहत नाही." आम्ही आश्रमात कसले कसले उपलालन चालते याचा विचार करू लागलो. तेवढ्यात महाराजांनी दालनात प्रवेश केला. आम्ही उठून उभे राहिलो. काहीशा आदराने आणि बऱ्याचशा भीतीने. आमची मागील भेट लक्षात होती. किमान चार बालके जन्मास घातल्याखेरीज पुन्हा तोंड दाखवू नकोस अशी आज्ञा घेऊन आम्ही बाहेर पडलो होतो. मोठ्या उत्साहाने आम्ही ती आज्ञा आमच्या धर्मपत्नीच्या कानावर घातली होती. त्यावर तिने पत्नीचे पवित्र कर्तव्य पार पाडत आमचे बेसिक, महागाई भत्ता, टी ए, डी ए, कन्व्हेयन्स, बोनस अशी सगळी आकडेवारी विष्णुसहस्त्रनामाप्रमाणे म्हणून दाखवली होती. टीव्हीचे आठ हप्ते अजून बाकी आहेत हीपण  एक अनावश्यक आठवण करून दिली होती. प्रसंग हाताबाहेरच जात होता. मी वेळीच शांतिमंत्र आणि शांति आसन सिद्ध करून (पक्षी:निद्रा) ते आख्यान थांबवले होते. चार बालकांची भीक नको पण हे तेजोभंगाचे कुत्रे आवर अशी अवस्था झाली होती.

आम्ही भानावर आलो तेव्हा महाराज काहीशा त्रासिक पण भेदक दृष्टीने आमच्याकडे पाहत होते. "बोला!" पुढे कंसातील "आता काय आणि?" हे स्पष्ट ऐकू आले. "महाराज, गायीविषयी आपले विचार जाणून घेण्यासाठी आलो आहे. सावरकर आणि त्यांचा राष्ट्रवाद याविषयी अभ्यास करीत असताना उगाचच त्यांचे ते गायीविषयी तेवढे विधान लक्षात राहिले आहे. शेंगदाणे खाल्ल्यानंतर एखादा कण दातात अशक्य ठिकाणी अडकून जसा मानसिक त्रास देत राहतो तसे ते विधान आम्हाला सलते आहे. तुम्हीच आता मार्गदर्शन करा." स्वामीजी एकदम भडकून म्हणाले,"अरे तो काय सांगणार राष्ट्रवाद आणि गोमातेबद्दल?" मी सटपटलोच. सावरकरांना एकदम अरेतुरे? तेही "परिवारा"तीलच अशा महत्वाच्या व्यक्तीने करावे?

 "अरे सिनेमा नाटकांत कामं करून हिंदुराष्ट्रवादावर अधिकारवाणीने बोलता येत नाही! बाकी सूर्यास्त नाटकातला तो गायकवाडचा पार्ट मात्र झकास केला होतान हो त्यानं! पाहिलाय मी तो. सुटाबुटांत अगदी ओळखू येत नव्हता. तो आणि कधीपासून हिंदुराष्ट्रवादावर बोलू लागला? आणि गाय हा उपयुक्त पशु आहे असं म्हणायला जातंय काय त्याचं? जन्म मुंबईत गेला त्याचा. मुंबईकरांना गायींपेक्षा अंधेरीच्या गोठ्यांतील म्हशी जास्त पाहायला मिळतात. एरवी गाय फक्त कॉंग्रेसच्या जाहिरातीत दिसायची. नंतर तीही गेली."

मग माझ्या लक्षात आलं. मी नम्रपणे म्हणालो,"महाराज, ते जयंत सावरकर. ते बिचारे कुठले या विषयावर बोलणार? त्यांना प्रत्यक्षात सोडा, नाटका सिनेमात सुद्धा फार बोलू देत नाहीत. आम्ही विचारलं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी."

स्वामीजी स्तब्ध झाले. सावधगिरीने म्हणाले,"असं असं! ते सावरकर होय? काय तेजस्वी विचार होते त्यांचे! पोहायचेही उत्तम! उगाच नाही बोटीतून तडक खवळलेल्या दर्यात उडी मारून पोहत किनाऱ्याला लागले. जाज्वल्य देशप्रेम असल्याशिवाय हे होत नाही." आम्ही विचार करू लागलो.  मागे पोहायच्या क्लासला गेलो होतो.  सरांनी कमरेला डालड्याचा डबा बांधून अचानक पाण्यात ढकलले होते.  तेव्हा कसेबसे बाहेर पडून सरांच्या नावाने ठणाणा करत तडक घरी गेलो होतो. त्याऐवजी धीर धरून "ने मजसी ने परत" म्हटलं असतं तर आज पोहायला आलं असतं.

"परंतु स्वामीजी, ते गाय हा एक उपयुक्त पशु…"  एक हात वर करून त्यांनी मला चूप केले आणि ते कडाडले,"अरे मातेची उपयुक्तता पाहतोस? ज्या मातेने तुला जन्म दिला, तुझे पालनपोषण केले, जिच्या दुधावर तू वाढलास त्या मातेला असं म्हणशील?" माझ्या डोळ्यासमोर आमचा गावातला बाबा गवळी आणि त्याच्या मागून निमूटपणे चालणारी त्याची म्हैस आठवली. तिच्या दुधावर आम्हीच काय आमची अख्खी आळी वाढली होती. "स्वामीजी, तसं विचार करू गेलं तर, मी आयुष्यात एकदाच गाईचं दूध घेतलं होतं. तेही कावीळ झाली होती म्हणून  आयुर्वेदिक औषध घ्यायला सक्काळी उठून दादरला जात होतो तेव्हा. वैद्यबुवा ते औषध गाईच्या दुधाबरोबर घ्यायला लावायचे. एरवी हिंदुस्थानात गाईपेक्षा म्हशीच्या दुधावर वाढणारी जनता जास्त आहे. मग म्हशीला सुद्धा संरक्षण नको? म्हशीनं कुणाची गाय मारली आहे? खुद्द ज्ञानेश्वरांनीही वेद वदवून घेण्यासाठी रेड्याला प्रेफरन्स दिला होता. रेड्याचा आवाज गायबैलापेक्षा घनगंभीर असतो, मंत्र वगैरे ऐकायला छान वाटलं असणार. शिवाय आमच्या हफिसातला महंमद चपरासी म्हणतो, तुम्ही भटा बामणांनी अभक्ष्य भक्षण करायला सुरुवात केल्यापासून त्याला कुक्कुट किंवा अजापुत्राचे मांस परवडत नाही. त्याने कुठे जावे? " आम्ही धाडस करून विचारले.

आता महाराज आमच्याकडे मारक्या बैलाप्रमाणे पाहत होते. तेणेयोगे आमच्या ठायी भय उत्पन्न झाले आणि आम्ही तत्काळ तेथून बाहेर पडलो. ब्रह्मवादिनीचे बोलणे लक्षात ठेवून आम्ही आता एक मध्यम आकाराची गाय पाळून रोज उपलालन कर्म करावे असे ठरवले आहे.