छोटू सदरेत आला तेव्हा सदरेत सामसूम होती. एकदोन पाणके कंटाळलेल्या चेहऱ्याने पाणी भरायच्या पाट्या टाकत होते. "दोन दोन दिवस अंघुळसुद्धा करत नाहीत, कशाला पाणी भरायला सांगतात कुणास ठाऊक. पाणी भरून झाले तरी भरलेल्या घड्यावर ओतण्याची आज्ञा झाली आहे. पालथ्या काय किंवा भरल्या काय यांच्या सगळ्याच घड्यांवरचे पाणी वाया जाते. " असे पुटपुटणे छोटूच्या कानावर पडले. छोटू सदरेतच घुटमळला. सदरेत सिंहासनाच्यावरती अश्वारूढ इंद्रवदन सरकारांचे राजा रविवर्मा स्टाईलचे तैलचित्र लावले होते. उजव्या हातात हातात तलवार, डाव्या हातात यष्टीची काच सहज फोडेल अशा मापाचा दगड, पाठीवर बांधलेल्या ढालीचे पट्टे त्या रुंद छातीवरून घेतलेले, कमरेला त्यांची आवडती दुर्बीण लटकवलेली, पाठीला भाता अन त्यात एक निळ्या रंगाचे भेंडोळे, अशी दिलखेचक पोझ दिलेली ती मूर्ती पाहून कुणाचाही ऊर भरून येत असे. वास्तविक घोड्याने पुढचे दोन्ही पाय उंचावून तो झेप घेतो आहे असे चित्र त्यांना हवे होते. पण ते घोड्यास मान्य झाले नाही, शिवाय घोड्याने एकदा पाय वर केल्यावर सरकार स्वत: दाणकन जमिनीवर आदळले होते. मग मोतद्दार घोड्याचा लगाम धरून उभा आहे आणि आपण छान पोझ देऊन वर बसलो आहोत असेच चित्र बनवावे असे सरकारांचे मत पडले. त्यावेळी घोड्यालाही वारंवार तोबरा देऊन मनवावे लागले होते. सर्वांनी कुतूहलाने सरकारांना भात्यातील भेंडोळीबद्दल विचारले होते. त्यावर ती ब्ल्यू प्रिंट आहे असे काहीसे गूढ उत्तर त्यांनी दिले होते. छोटूला जरासा धक्काच बसला होता. सिनेमाची प्रिंट बाजारात येते हे त्याला माहीत होते. डोक्यात "सिनेमाची प्रिंट","ब्ल्यू" असे शब्द एकत्र आले आणि छोटू चपापला. चाळीशीनंतर आयडेण्टिटी क्रायसिस होतो हे खरे पण सरकारांनी हा कसला भलताच नाद लावून घेतला असे त्याला वाटले. त्याने अदबीने,"सरकार, हा नाद वाईट. सोडा तो. म्हाराष्ट्राला आपली लै गरज आहे. आपण सत्तेत या, असल्या पन्नास प्रिण्टा आणून आपल्या पायाशी टाकतो. आणि आपल्यासारख्यांनी ट्रेलर कशाला पहायचा हो? थेट त्यातल्या हिरवीणीच आणून दावतो." ते ऐकून इंद्रवदन सरकार प्रथम थोडे सर्द झाले, मग त्यातील गोड शक्यता जाणवून त्यांचे डोळे स्वप्नाळू होऊन थोडेसे तूर्यावस्थेतही गेले, मग पुढच्याच क्षणी भानावर येऊन ते छोटूला म्हणाले होते,"छोटू, तू नक्कीच आणशील यात तिळमात्र शंका नाही. पण माझ्या हनुमंता, मी बेशुद्ध पडल्याशिवाय द्रोणागिरी आणायला जाऊ नकोस. लोकहो, हे निळे भेंडोळे साधेसुधे नाही. यात तुमचे, माझेच काय आपल्या पुढल्या दहा पिढ्यांचे भवितव्य रेखाटले आहे. सर्वांचे कुतूहल आणखी वाढले. महाराज त्यात काय चितारले आहे ते दाखवा तरी, असे काही जणांनी म्हटले. तेव्हा सरकार थोडेसे वरमले. ते म्हणाले,"आत्ता हे भेंडोळे फक्त चित्रापुरते आणले आहे. खरी ब्ल्यू प्रिंट काही नाही ही. ती आमच्या डोक्यात पक्की आहे. रेखाटन चालू आहे. आत्ता आयत्यावेळी पोझ देण्यापुरते काही तरी द्या असे राणी सरकारांना म्हणालो, तर त्यांनी गेल्या वर्षीच्या "कालनिर्णया"ची सुरळी करून हातात ठेवली. तीच या भात्यात ठेवली आहे. एवढे चित्र तरी होऊद्या, माझ्या डोक्यात अशा काही कल्पना आहेत की बासच. मला फक्त राज्याभिषेक करा आणि या कल्पना प्रत्यक्षात येताना पहा."
सरकारांच्या डोक्यात भव्य कल्पना होत्या. म्हाराष्ट्र सध्या एक बिगरशेती परवाना नसलेला तुकडा आहे. पयले छूट तो एनए करून घ्यावा मागाहून ब्ल्यू प्रिंटबरहुकूम बांधकाम प्रत्यक्षात आणताना कटकट नको. त्यानंतर छोटू आणि सरकार यांच्यात अनेक खलबतेही झाली. जागेचा तुकडा आणि त्याचा विकास म्हणजे अन्य बिल्डरांची ब्याद आलीच. त्यातल्या त्यात शंभूराजांचा ताप डोक्याला नेहमी असायचा. कायम स्पर्धा. इंद्रवदन सरकारांनी वाड्याची शाकारणी केली की शंभूराजे आपल्या वाड्याची साधी कौले काढून त्यावर मंगळुरी कौले चढवणार. यांनी बाथरूममध्ये विलायती कमोड बसवले की शंभूराजे बाथटब बसवून घेणार. यांनी कोबा करून घेतला की ते संगमरवरी फरशी बसवणार. हे असं सगळं असल्यामुळे म्हाराष्ट्राच्या विकासाचा नकाशा गुप्त राहायला हवा होता. म्हणूनच सरकारांनी त्याला खुणेचे गुप्त नाव ठेवले होते, ब्ल्यू प्रिंट. त्यात काय चित्र असणार आहे याची कल्पना फक्त सरकारांनाच होती. छोटूने एकदा त्यांना हळूच विचारले होते, "सरकार, मला तरी एकदा दाखवा की तुमचा नकाशा. मी पण विचार करतो आहे, गावकडलं घर दुरुस्तीला काढावं. आमचा म्हातारा लई दिवस मागं लागलाय, पोरा, घर जुनं झालं आपलं. डागडुजी कराया हवी. त्यापरीस पाडून नवं का बांधीनास? सरकार येवढा म्हाराष्ट्र बांधायला निघालेत, आपल्या घरासाठीबी कायतरी नकाशा काढून देतील की. नुसतं दाखवा तरी काय काढलंय तुम्ही आतापर्यंत." त्यावर सरकार म्हणाले होते,"तूर्तास थांब. सध्या नुसता आराखडा आहे. योग्य वेळ आल्यावर तुलाच प्रथम दाखवीन." त्यानंतर राणीसाहेबांनी हाक मारली म्हणून सरकार आत गेले. निळे भेंडोळे टेबलावर पडले होते. त्यावर "अत्यंत गोपनीय" असे शब्द होते. इकडे तिकडे पाहत छोटूने हळूच ते उघडले. पेन्सिलीने महाराष्ट्राचा नकाशा रफ रेषांमध्ये जेमतेम काढला होता. संदर्भ ठाऊक नसणाऱ्याने पाहिला तर उंटाचे तोंड म्हणून तो सहज खपला असता. त्यावर कमीअधिक जाडीचे बिंदू काढून त्यांशेजारी शहरांची नावे लिहिली होती. सगळ्यात जाड बिंदू नाशिकचा होता. त्याखालोखाल मुंबई. त्यानंतरचा नंबर पुण्याचा. सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरे जेमतेम अर्ध्यामुर्ध्या बिंदूवर उभी होती. मुंबईच्या बिंदूशेजारी ध्वजाचे चिन्ह होते, त्याखाली "वांद्रे" असे लिहिले होते. नागपूर शहर तर मुंबईशेजारी काढले होते. खानदेश आणि विदर्भ हे भाग सहारा वाळवंट असल्यासारखे संपूर्ण मोकळे होते. तिथे "शहरांची नावे? आणि येथे काय पिकते? गडकऱ्यांस विचारले पाहिजे. त्याची स्थूलमानाने (खी:खी:खी:)बहुधा वडाभाताची शेती असावी. " असा शेरा होता. कोकणपट्टीवर "व्हरांडा (टेन्टेटिव्ह)", घाटमाथ्यावर "परंपरागत ऊस लागवड, इथे कापूस लावावा काय? क्रांतिकारी विचार!" बारामतीच्या वाटेला पोकळ वर्तुळ असलेला बिंदू आला होता. तो कशासाठी हे छोटूला प्रथम समजले नाही. मग त्याचे लक्ष खाली उजवीकडील कोपऱ्यात गेले. तेथे "लीजेंड" होती. ठळक बिंदू - वसवणे, पोकळ बिंदू - बसवणे. हे असं करून झाल्यावर बहुधा सरकार कंटाळले असावेत. कारण वर कोपऱ्यात श्रीमंत बाबासाहेब सातारकर, बारामतीकर सरदार, शंभूराजे यांची व्यंगचित्रे काढली होती. त्यात बाबामहाराज खुर्चीवर बसण्यासाठी अर्धे खाली झाले आहेत, मागून बारामतीकर सरदार त्यांची खुर्ची ओढत आहेत आणि ते पाहून स्वत: नुसत्या तिकाटण्यावर बसलेले शंभूराजे दात काढून हसत आहेत असे दृश्य होते. छोटू गुंग होऊन ते पाहत राहिला. तेवढ्यात सरकारांची चाहूल लागली त्यासरशी त्याने ते भेंडोळे गुंडाळून जसे होते तसे ठेवून दिले होते.
आज छोटू सरकारांची भेट घेण्यासाठी मुद्दाम आला होता. पुण्यातील सेनेसमोरील आक्रमक आणि स्फूर्तीदायक भाषण करून सैन्यात उत्साह आणण्याचा त्यांचा प्रयत्न केविलवाणा ठरल्यानंतर सरकारांनी स्वत:ला वाड्यात कोंडून घेतले होते. त्यात त्यांच्या ब्ल्यू प्रिंटची खबर शंभूराजांपर्यंत पोचली आणि त्यांनी घाईघाईने स्वत:ची अतिनील अशी प्रिंट तयार करून घेतली आणि लोकांना दाखवलीसुद्धा. शंभूराजे स्वत: काही आर्किटेक्ट नव्हते पण, त्यांचा विश्वासू सेवक धनाजी याने पूर्वी पीडब्ल्यूडी मध्ये ज्युनिअर क्लार्कची नोकरी केली होती, तेवढे पुरे होते. छोटूने धनाजीला विश्वासात घेऊन विचारले. साधारण तीन ग्लासात धनाजी विश्वासात येत असे. धनाजीने "जीटी मारणे" या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून हे रेखाटन केल्याचे कबूल केले. अर्थात या तंत्रज्ञानात त्रुटीही आहेत हेही त्याने सांगितले. त्यामुळे पहिली प्रिंट जेव्हा तयार झाली आणि ती शंभूराजांकडे नजरेखालून घालण्यासाठी आली तेव्हा त्यांनी,"अरे? याच्यावर खाली सही त्या उंदीरवदनाची कशी काय आली?" असे उद्गार काढले. अर्थात धनाजीने ती चूक दुरुस्त करून खाली शंभूराजांचे नाव रीतसर टाकले. सहीखेरीज शंभूराजांना काही दिसत नसतेच असेही तो म्हणाला. तर ही सर्व माहिती मिळाल्यानंतर इंद्रवदन सरकार कुणाला दिसले नव्हते. म्हणूनच त्यांस पहावयास छोटू आला होता. राणी सरकारांनी, सरकार वर त्यांच्या खोलीत आहेत असे सांगितले. आणि वर जातोच आहेस तर "त्यांना म्हणावं आज तरी आंघोळ करा, किती दिवस पारोसे बसणार आहात?" असा निरोपही द्यायला सांगितला. राणी सरकारांना अदबीने मुजरा करून छोटू माडीवर गेला. सरकार त्यांच्या आवडत्या खुर्चीत बसले होते. दाढीचे खुंट वाढलेले, झोप न झाल्यासारखे तारवटलेले डोळे असा अवतार पाहून छोटूला वाईट वाटले. सरकार म्हणाले,"छोटू आलास? मला वाटलं आमच्या सैन्याप्रमाणे तूही घोड्यासकट परागंदा झालास. आता नालही नाही आणि घोडाही नाही म्हणा. म्हाराष्ट्रभूमीची आमची एवढी नाडीओळख, दिवसरात्र एक करून मी माझ्या मातृभूमीच्या विकासाचा नकाशा तयार केला होता. पुण्याच्या सभेच्या वेळेस स्वखर्चाने त्याचे हजारभर अमोनिया प्रिंटही काढून घेतले. एकाही महाभागानं त्याबद्दल विचारलं नाही रे. अरे अगदी फुकट देतो म्हणत होतो तरीही, राहूदे सरकार, नंतर नेतो म्हणाले लेकाचे सगळे. मग वाटलं अरे कशासाठी मी मरायचं एवढं? म्हणून ठरवलं आहे. मी स्वत:हून आता कुठल्याच मोहिमेवर जाणार नाही. बस, आता मी आणि माझी ही अभ्यासिका. मला काण्ट वाचायचा आहे, अॅरिस्टाॅटल, प्लेटो वाचायचे आहेत. आता ते मी करणार." असं म्हणून ते खिन्नपणे गवाक्षाबाहेर पाहत राहिले. थोड्या वेळाने छोटू उठला आणि मुजरा करून "येतो सरकार" म्हणाला. त्याच्याकडे न पाहताच त्यांनी हाताने त्याला निरोप दिला. छोटू जिन्यापर्यंत पोचला आणि खाली जाणार तेवढ्यात सरकार म्हणाले,"छोट्या, जर माझा राज्याभिषेक झालाच तर सांगायला ये, मी केव्हाही सैन्याचं नेतृत्व करायला तयार असेन." छोटू जिना उतरून दिसेनासा होईपर्यंत सरकार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले.